Sunday, January 29, 2017

झंझावाती चपराक

साहित्य व पत्रकारितेचे क्षेत्र विलक्षण आहे. प्रगल्भ व विचारी माणूस घडवण्यात जर सर्वात जास्त हातभार लागत असेल तर तो साहित्यातून होणार्‍या जीवनदर्शनाने आणि तटस्थ पत्रकारितेतून होणार्‍या समाजदर्शनाने. यातून भाषाही समृद्ध होत जाते हे वेगळेच! छपाईची आधुनिक कला भारतात आली तेव्हापासून विविध रुपांनी साहित्य-पत्रकारिता फोफावत आहे; पण मराठीच्या बाबतीत ती बहरत आहे असे चित्र क्वचित दिसते. आपले साहित्य हे प्रस्थापितांच्या अथवा त्यांच्या कंपुतील मांदियाळीत अडकले आहे; तर पत्रकारिता ‘शुद्ध’ आहे असा आरोप खुद्द पत्रकारही करणार नाहीत, असे दुर्दैवी वास्तव आहे. अशा स्थितीत मराठवाड्यातून एक मिसरुडही न फुटलेला घनश्याम पाटील नावाचा, कसलीही पूर्वपिठिका नसलेला तरुण पुण्यात येतो, एका वर्तमानपत्रात नोकरी मिळवतो आणि काही वर्षात स्वत:चे साप्ताहिक, मासिक आणि चक्क ग्रंथ प्रकाशनाचीही यशस्वी मुहूर्तमेढ रोवतो हा चमत्कार तर खराच; पण खरा चमत्कार आहे तो पत्रकारितेत आज दुर्मीळ झालेली अत्रे, शि. म. परांजपे, खाडीलकर आदींची परखड, तटस्थ शैली आणि समाजाप्रत असलेली तळमळ आणि तरीही भविष्याचा ध्यास व स्वप्नाळूपणा याचा वेधक संगम घनश्याम पाटील यांच्यात आहे हे सुरुवातीलाच नमूद करताना मला आनंद वाटतोय.
मराठी साहित्याचा वाचकवर्ग कमी झालाय हे त्यांना मान्य नाही, हे ते कृतीतूनच सिद्ध करुन देतात. दरवर्षी ‘चपराक साहित्य महोत्सव’ भरवणारे व त्यात 15-20 नव्या-जुन्या साहित्यिक/कवींची पुस्तके आनंद सोहोळ्यात प्रकाशित करणारे सध्या ते एकमेव प्रकाशक असावेत. तरुणाईची स्पंदने टिपणारे सागर कळसाईतसारखे नवप्रतिभाशाली लेखक असोत की निलेश सूर्यवंशींसारखे एकदम नवीन... इतर अनेक प्रकाशकांनी चक्क नाकारलेले नवप्रतिभावंत असोत, पाटील यांनी व्यावसायिक गणिते न मांडता त्यांची पुस्तके प्रकाशित केलीत. सध्या कवितांच्या प्रकाशनाला वाईट दिवस आलेत असे म्हटले जाते... कारण म्हणे कविता आणि त्याही विकत घेऊन कोण वाचणार? पण हाही कुतर्क घनश्याम पाटील यांनी खोटा ठरवत झपाट्याने कवितासंग्रह प्रसिद्ध केलेत. खरे म्हणजे ‘चपराक’ हे नवकवी/साहित्यिकांचे एक रम्य साहित्यकेंद्र बनले आहे ही बाब मराठी साहित्य विश्‍वासाठी एक दिलासादायक बाब आहे. प्रकाशकाला अनंत अडचणींचा, लेखकांच्या विक्षिप्तपणाचा सामना करावा लागतो हे मला माहीत आहे; पण पाटलांनी आपल्या स्थिरचित्ताने या स्थिती हाताळल्याचे मी पाहिले आहे.
मराठीवरची खरी माया हे यामागील एक कारण असावे. घुमान येथील साहित्य संमेलनावर इतर सर्व प्रकाशकांनी बहिष्कार घातलेला असताना, ‘आफ्रिकेच्या जंगलात जरी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले तरी तिथे आम्ही जाणार आणि ‘चपराक’चे ग्रंथदालन उभारणार’ असे जाहीरपणे सांगणारे घनश्याम पाटीलच होते. गेल्या वर्षी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष काहीतरी बरळले तर त्यांचाही समाचार घ्यायला त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. खरे तर हे अध्यक्ष त्यांना ‘मानसपुत्र’ मानायचे; पण पाटलांनी साहित्य निष्ठेसमोर त्यांचीही पत्रास ठेवली नाही. ते एकीकडे प्रकाशक जरुर आहेत पण ते त्याचवेळेस पत्रकारही आहेत, याचे भान त्यांच्या कृती व वक्तव्यात असते हे मी जवळून पाहिले आहे. खरे तर मी माणुसघाण्या माणूस... पण हातावरच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच मित्रांशी मी नित्य संपर्कात असतो व आवर्जून भेटतो... त्यात घनश्याम पाटील आहेत. उत्साहाचा, स्वप्नांचा नि स्वप्नपूर्तीसाठी अखंड खळाळणारा हा झरा आहे. मैत्रीची सीमा कोठे सरते आणि पत्रकारितेची सजग वाट कोठे सुरु होते हे त्यांना चांगले समजते. त्यामुळे मित्रांवरही लेखणीचा आसूड उगारायला त्यांनी कधी मागेपुढे पाहिलेले नाही.
साप्ताहिक ‘चपराक‘ हे सर्व क्षेत्रातील ताज्या घडामोडींचा वेध घेते; पण त्याची शोभा पाटलांचे अग्रलेख वाढवतात. त्यांच्या अग्रलेखांची पुस्तके झाली, आवृत्त्याही निघाल्या. मला वाटते, हे त्यांचे संपादकीय यश नसून त्यांच्यातील सत्यनिष्ठा व सर्जनशील टीकाकाराच्या वृत्तीचे हे यश आहे.
‘साहित्य चपराक’ हे मासिक नावाप्रमाणेच साहित्य-समाजजीवनाशी निगडित लेखन प्रसिद्ध करते. मला भावणारी बाब अशी की पाटलांची व्यक्तिगत विचारधारा कोणतीही असो, तिच्याशी प्रामाणिक राहत असतानाही अन्य विचारधारांच्या साहित्याला त्यांनी कधी त्याज्य मानत डावलले नाही. ‘चपराक’च्या प्रकाशनांचे ते वैशिष्ट्यच आहे. खरे तर माझे काही लेखन त्यांनी प्रकाशित करावे हे इतरांना एक आश्‍चर्यच वाटते कारण आमच्या विचारधारा या तशा विरोधी व संघर्षाच्या आहेत! पण हे वैचारिक मतभेद ना प्रकाशनात आडवे आले ना मैत्रीत! मी आयुष्यात असंख्य ढोंगी, दुटप्पी आणि भाट साहित्यिक/प्रकाशकांच्या अनुभवातून गेलो आहे. त्याचा खेद नाही. उलट त्यांच्या पार्श्‍वभूमिवर घनश्याम पाटील हा मराठी साहित्य व विचारविश्‍वात एक आशादायी किरण वाटतो.
‘चपराक’ हे अजून खुपच तरुण प्रकाशन आहे. त्यात तारुण्याचा असतो तसा झंझावात आहे. अलंघ्य क्षितिजे लांघायची उमेद आहे. किमान एक लाख पंचवार्षिक सदस्य बनवायचे स्वप्न आहे; तसेच नवनवे साहित्य मिळवून प्रकाशित करत रहायचे व्रत आहे. मराठी साहित्यात जे आजकाल नेहमी मरगळलेले, निराशाजनक बोलण्याचे वातावरण असते त्यात ही एक सुखद, दिलासादायक झुळूक आहे. ही झुळूक वादळवार्‍यात बदलत या सर्वच मळभाला हटवेल ही आशा आहे.

- संजय सोनवणी
सुप्रसिद्ध साहित्यिक आणि संशोधक
9860991205


No comments:

Post a Comment