Sunday, January 15, 2017

‘चपराक साहित्य महोत्सवा’ची मेजवानी

असे म्हणतात की, ज्या राज्यात धान्याअभावी दुष्काळ पडतो तिथली जनावरे मरतात! काहीवेळा माणसेही मरतात; मात्र जिथे विचारांचाच दुष्काळ पडतो तिथली मानवताच मरते! ही मानवता जिवंत ठेवायची तर वाचकांना संस्कारशील साहित्य उपलब्ध करून देणे हा महत्त्वाचा पर्याय उरतो. त्यामुळे आम्ही ‘चपराक प्रकाशन’तर्फे सातत्याने वैविध्यपूर्ण विषयांवरील दर्जेदार साहित्य प्रकाशित करतो. याचाच एक भाग म्हणजे दरवर्षी होणारा ‘चपराक’चा साहित्य महोत्सव! एकाचवेळी राज्यभरातील लेखकांची पुस्तके प्रकाशित करण्याचा मानदंड ‘चपराक’ने घालून दिलाय. येत्या गुरूवारी म्हणजे दि. 19 जानेवारी रोजी ‘चपराक’चा चौथा साहित्य महोत्सव पुण्यातील श्रमिक पत्रकार भवनात पार पडतोय.
या महोत्सवाला पहिल्या वर्षी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे तेव्हाचे अध्यक्ष आणि सुप्रसिद्ध व्यवस्थापन तज्ज्ञ डॉ. प्र. चिं. शेजवलकर आणि समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस उपस्थित होते. दुसर्‍या महोत्सवात महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी लेखकांना आशीर्वाद दिले, तर गेल्या वर्षी तिसर्‍या महोत्सवात अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे आणि सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले होते. यंदाच्या महोत्सवासाठी नामवंत लेखक प्रा. डॉ. द. ता. भोसले, घुमानच्या संमेलनाचे आयोजक आणि ‘सरहद्द’ संस्थेचे प्रमुख संजय नहार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी उपस्थित राहणार आहेत.
यंदा ‘चपराक साहित्य महोत्सवा’त भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी वाचकांना मिळणार आहे. सुरूवातील एकाचवेळी तब्बल अठरा पुस्तकांचे प्रकाशन होईल. त्यानंतर सुप्रसिद्ध पत्रकार आणि राजकीय विश्‍लेषक भाऊ तोरसेकर यांची प्रकट मुलाखत होईल. ज्येष्ठ संपादक हरीश केंची आणि दै. ‘आपलं महानगर’चे वृत्तसंपादक आबा माळकर हे दोघे भाऊ तोरसेकर यांच्याशी दिलखुलास संवाद साधतील. त्यानंतर एक हटके कार्यक्रम म्हणजे ‘कॉलेज गेट’ फेम युवा लेखक सागर कळसाईत यांच्या कादंबरीतील एका प्रकरणाचे अभिवाचन. स्वतः सागर आणि त्याचे काही सहकारी हे अभिवाचन करतील. शेवटच्या सत्रात राज्यभरातील निमंत्रित कवी-कवयित्रींचे संमेलन होईल.
संजय सोनवणी हे मराठी साहित्यातील एक सशक्त नाव. त्यांच्या आजवर 85 कादंबर्‍या प्रकाशित झाल्यात. ते मराठीतील असे एकमेव लेखक आहेत की, ज्यांची पुस्तके अमेरिकेत व्हाईट हाऊस मध्ये ‘रेफरन्स बुक’ म्हणून ठेवलीत. त्यांनी आजवर अनेक कथा लिहिल्या; मात्र त्यांच्या कथा पुस्तकरूपात आल्या नाहीत. त्यांचा ‘आदमची गोष्ट’ हा पहिला कथासंग्रह ‘चपराक’कडून या महोत्सवात प्रकाशित होतोय. सुप्रसिद्ध साहित्यिक सदानंद भणगे हे नावही मराठी साहित्याला नवे नाही. त्यांची काही पुस्तके यापूर्वी ‘चपराक’ने प्रकाशित केलीत आणि ती सर्वच वाचकप्रिय ठरलीत. यंदाच्या महोत्सवात त्यांचा ‘हॅप्पी रिटर्न्स’ हा संग्रह प्रकाशित होतोय. आमच्या उपसंपादिका आणि ज्येष्ठ कवयित्री सौ. चंद्रलेखा बेलसरे यांचा ‘सत्याभास’ हा गूढ कथांचा संग्रहही वाचकांच्या भेटीस येणार आहे. मराठीत गूढ कथा लोप होत चाललेल्या असताना हा संग्रह मोलाचा ठरणार आहे. परभणी येथील लेखिका सौ. अर्चना डावरे याही सध्या कथाकार म्हणून पुढे येत आहेत. त्यांचा ‘जुलूस’ हा दुसरा कथासंग्रह यंदाच्या महोत्सवात आम्ही उपलब्ध करून देत आहोत.
विनोद श्रा. पंचभाई हे गेल्या काही काळात सातत्याने वैविध्यपूर्ण विषयांवर लिहित आहेत. आपले प्रशासकीय कामकाज सांभाळत त्यांचा लेखनगाडा सुसाट सुटलाय. ‘थोडं मनातलं’,  ‘मुलांच्या मनातलं’, ‘आपले राष्ट्रसंत’ ही त्यांची पुस्तके वाचकप्रिय ठरली. आता त्यांचे ‘तीच्या मनातलं’ हे हटके पुस्तक प्रकाशित होतंय. ‘ती’च्या मनात काय चाललंय हे खुद्द देवाधिदेवालाही कळत नाही, असे म्हणत असताना पंचभाईंनी हे शिवधनुष्य पेलले आहे. त्यांच्या या ‘धाडसा’ला आपण दाद द्यायलाच हवी.
नाशिक येथील लेखक आणि पत्रकार संजय वाघ हे माणसांची मने वाचण्यात निष्णात आहेत. सध्या बालसाहित्य दुर्मीळ होत चाललेय, अशी हाकाटी पिटली जात असतानाच त्यांची ‘जोकर बनला किंगमेकर’ ही किशोर कादंबरी आम्ही आकर्षक स्वरूपात प्रकाशित करीत आहोत. पुणे शहराचा आरसा दाखणारं ‘स्वप्नातलं पुणं’ हे दत्तात्रय वायचळ यांचं पुस्तकही लक्षवेधी ठरेल.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सध्या कवितासंग्रह कोणीही प्रकाशित करीत नाही, अशी एक अंधश्रद्धा जाणिवपूर्वक पसरवली जाते. त्याला उत्तर म्हणून आम्ही उत्तमोत्तम कवितासंग्रह प्रकाशित करीत आहोत. यातील कवी माधव गिर यांचे ‘शेतीबाडी’ हे खंडकाव्य तर मराठी काव्यक्षेत्रात मैलाचा दगड ठरेल. केवळ ‘शेती आणि शेतकरी’ हाच विषय घेऊन तीनशे छंदोबद्ध (संपूर्ण अष्टाक्षरी) कडवी त्यांनी केलीत. रविंद्र कामठे यांचा ‘प्रांजळ’, जयंत वाघ यांचा ‘शब्दमाला’, योगेश राऊत यांचा ‘झळा’, कस्तुरी देवरूखकर यांचा ‘स्वप्नसखा’, चंद्रलेखा बेलसरे यांचा ‘अरूणिमा’, दत्तू ठोकळे यांचा ‘माझा सावन’ असे दर्जेदार कवितासंग्रह आम्ही यंदाच्या ‘चपराक साहित्य महोत्सवा’त प्रकाशित करीत आहोत.
समीर नेर्लेकर हे लेखक, कवी, तंत्रज्ञ आणि चित्रकार म्हणून आपणास परिचित आहेत. यापूर्वी त्यांचा ‘एमरल्ड ग्रीन’ हा कथासंग्रह प्रचंड वाचकप्रिय ठरला. आता त्यांचा ‘पंधरा त्रिक पंचेचाळीस’ हा लघुकथासंग्रह प्रकाशित होतोय. नांदेड येथील लेखक प्रा. गोविंद गव्हाणे यांचेही एक आगळेवेगळे पुस्तक आम्ही प्रकाशित करीत आहोत. ‘बाजीराव मस्तानी आणि इतर प्रेमकथा’ हे त्यांचे जागतिक स्तरावर गाजलेल्या प्रेमकथांचे पुस्तक वाचकांना नक्कीच भावेल. सामाजिक विषयावर भाष्य करणारे प्रल्हाद दुधाळ यांचे ‘मना दर्पणा’ हे वैचारिक लेखांचे पुस्तक, करमाळा येथील लेखक नीलेश सूर्यवंशी यांची ‘आभाळ फटकलं’ ही ग्रामीण राजकारणावर आधारित कादंबरी हे यंदाच्या ‘चपराक साहित्य महोत्सवा’चे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
जाता जाता एक महत्त्वाचे! लेखक, वाचक, प्रकाशक आणि संपादक या नात्याने आजवर वाचकांनी माझे बरेच लाड पुरवलेत. त्यामुळेच मी यापूर्वी ‘दखलपात्र’ आणि ‘झुळूक आणि झळा‘  ही अग्रलेखांची दोन पुस्तके प्रकाशित केली. त्याच्या आवृत्याही हातोहात जात आहेत. सर्वात कमी वयात अग्रलेखांची पुस्तके प्रकाशित करणारा संपादक म्हणून सगळ्यांनी आम्हाला गौरविले. दै. ‘आपलं महानगर’मध्ये गेला काही काळ मी सातत्याने विविध पुस्तकांचे रसग्रहण करीत आहे. यातील निवडक पंचवीस लेखांचे ‘अक्षर ऐवज’ हे माझे तिसरे आणि ‘चपराक प्रकाशन’चे शंभरावे पुस्तक आपल्या सेवेत सादर करतोय.
सध्या वाचक कमी होत चाललेत, अशा अफवा काही प्रकाशक जाणिवपूर्वक पसरवत असताना आम्ही साहित्य आणि प्रकाशन विश्‍वात नवनवे प्रयोग करतोय. त्याला वाचकांचा उदंड प्रतिसादही मिळतोय. ‘चपराक’चा साहित्य महोत्सव हे नव्या जुन्या लेखकांसाठी एक हक्काचे व्यासपीठ ठरतेय. आपले प्रचंड प्रेम आणि मिळणारा पाठिंबा या बळावर भविष्यातही आम्ही असेच जोमाने कार्यरत राहू, याची प्रकाशक या नात्याने ग्वाही देतो आणि 19 जानेवारीला दुपारी 2 ते सायंकाळी 9 पर्यंत चालणार्‍या या महोत्सवाला आपणही उपस्थित रहावे यासाठी प्रकाशक या नात्याने निमंत्रण देतो.
अधिक माहितीसाठी संपर्क - 7057292092

1 comment:

  1. घनश्याम सर,
    फारच छान आणि अभिमानास्पद बाब आहे ही माझ्यासाठी. माझ्यासारख्या नवोदिताचे नाव आज ह्या प्रतिष्ठीत यादीत समाविष्ट झाले हे वाचून मला आभाळच ठेगणे झाल्या सारखे वाटले. चपराकमुळे मी आता साहित्य विश्वात खरा प्रवेश करतो आहे ह्याचा आनंद तर नक्कीच झाला आहे पण एक प्रकारे जबाबदारीचे दडपणही आले आहे. अर्थात चपराकच्या समूहाने माझ्यावर टाकलेल्या विश्वासामुळे व तुमच्या मार्गदर्शनामुळे माझा आत्मविश्वास नक्कीच वाढला आहे. जशी माझी तुमची भेट झाली तस तसे माझे पाय चपराकच्या कार्यालयाकडे आपसूकच वळायला लागले. प्रत्येक भेटीत काहीतरी नवीन शिक्यला मिळत जाते आणि प्रतिष्ठीत साहित्यिकांची भेट घडते हे माझ्यासाठी फार अप्रूप आहे.
    आभार तुमचे मानून मी कृतघ्न नाही होणार
    ऋणात तुमच्या व चपराकच्या हो राहणार ||
    रविंद्र कामठे

    ReplyDelete