Tuesday, June 27, 2017

उमलत्या अंकुरांना बळ द्या!

मोठ्या वृक्षाखाली छोटी झाडं वाढत नाहीत असं म्हटलं जातं. मात्र या मोठ्या झाडांमुळेच नवनवीन झाडे तयार होतात आणि सृष्टीत नवचैतन्य फुलवतात. साहित्याचंही तसंच आहे. (फार तर होतं असं म्हणूया!) अफाट ताकदीच्या बेफाट लेखकांनी नव्या पिढीला ‘विचार’ दिला. चांगलं लिहिणार्‍यांना हेरून त्यांच्या प्रतिभेला खतपाणी घातलं. सध्याच्या काळात मराठीला प्रतिसादशून्यतेचं ग्रहण लागलेलं असताना एकेकाळी मात्र या लेखकांनी अनेक उमलते अंकुर पुढे आणले.
शिवाजी सावंत यांनी ‘मृत्युंजय’ लिहिली; मात्र त्यांना प्रकाशकच मिळत नव्हता. अनेकांचे उंबरठे झिजवूनही निराशाच वाट्याला येत होती. त्यावेळी त्यांनी गदिमांना त्यातील काही प्रकरणं पाठवली. गदिमांनी ती वाचली आणि ‘कॉन्टिनेन्टल प्रकाशन’च्या कुलकर्णींना फोन केला. गदिमा कुलकर्णींना म्हणाले, ‘मुलगी नाकीडोळी नीटस आहे. तुम्ही करून घ्यायला हरकत नाही...’ त्यानंतर शिवाजी सावंत यांच्यासारखा बलाढ्य लेखक मराठीला मिळाला.
कुसुमाग्रजांचंही तसंच! कविता हा साहित्यातील सर्वोत्कृष्ट आविष्कार असला तरी कवितासंग्रह छापण्याचे धाडस फारसे कोणी करत नाही. त्यातही नवोदित कविंच्या वाट्याला तर प्रचंड उपेक्षा आणि अवहेलना येते. तात्यासाहेबही याला अपवाद ठरले नाहीत. या कविता भाऊसाहेब खांडेकरांच्या वाचण्यात आल्या. त्यांनी पदरमोड करून कुसुमाग्रजांचा ‘विशाखा’ हा काव्यसंग्रह प्रकाशित केला. यातूनच मराठीला ‘ज्ञानपीठ’विजेता कवी मिळाला.
ज्येष्ठ कवी रमेश गोविंद वैद्य यांनी एक किस्सा सांगितला. म. दा. भट नावाचे एक विख्यात ज्योतिषी होते. वैद्य त्यांच्या घरी बसले होते. त्याचवेळी तिथे गझलसम्राट सुरेश भट आले. मदा आणि सुरेश भट यांच्यात चर्चा झाली. नंतर मदांनी सुरेश भटांना सांगितले, ‘हे रमेश गोविंद. उत्तम कविता करतात.’ सुरेश भटांनी लगेच त्यांना कविता म्हणायला लावल्या. त्या ऐकल्यानंतर ते म्हणाले, ‘माझ्यासाठी रिक्षा घेऊन ये...’
वैद्यांनी त्यांना ‘कुठं जायचंय?’ असं विचारल्यावर ते म्हणाले, ‘तुम्ही रिक्षा तर आणा.’
वैद्यांनी रिक्षा आणली. सुरेश भट घराबाहेर आले आणि वैद्यांना म्हणाले, ‘बसा रिक्षात.’ ते निमुटपणे रिक्षात बसले. भटांनी पहाडी आवाजात फर्मावले, ‘आकाशवाणीकडे घ्या...’
त्यानंतर ते दोघे पुणे आकाशवाणी केंद्रात पोहोचले. भटांनी तेथील प्रमुखांकडे रमेश वैद्यांना नेले आणि सांगितले, ‘मगाशी जी काही बडबड केली ती इथे करा...’
वैद्यांनी कविता ऐकवल्या. त्यानंतर भट आकाशवाणीतील अधिकार्‍याला म्हणाले, ‘वाट कसली पाहताय? यांच्या कविता आपल्या रसिकांपर्यंत जायला हव्यात...’ खुद्द सुरेश भट एका कविला घेऊन आल्याने त्यांना नकार देण्याची कुणाची बिशाद? रमेश गोविंद वैद्य हे नाव त्यावेळी सर्वप्रथम आकाशवाणीच्या श्रोत्यांपर्यंत गेले.
एकेकाळी बालभारतीत प्रमुख असलेल्या आणि आता महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह असलेल्या माधव राजगुरू यांनाही असाच एक सुखद अनुभव आला. त्यांनी त्यांची एक कविता राम शेवाळकर यांना वाचायला दिली. ती वाचल्यावर शेवाळकरांनी सांगितले, ‘जेवायला बोलवून हातावर बडीसोप ठेऊ नकात. मला तुमच्या सगळ्या कविता वाचायला द्या.’ राजगुरू यांनी त्यांची कवितांची डायरी शेवाळकरांकडे सुपूर्द केली. त्यानंतर काही दिवस गेले. राजगुरूंना शेवाळकरांना प्रतिक्रिया विचारण्याचे धाडस झाले नाही. शेवाळकरांनीही काही कळवले नाही. राजगुरूंनी विषय सोडून दिला आणि एकेदिवशी अचानक पुण्यातल्या एका प्रकाशकांचा त्यांना फोन आला. ते म्हणाले, ‘शेवाळकर सरांनी तुमच्या कविता माझ्याकडे पाठवल्यात. त्याची प्रस्तावनाही त्यांनीच लिहिलीय. त्या प्रकाशित करायच्या आहेत. एकदा येऊन भेटा.’ आणि माधव राजगुरू यांचा कवितासंग्रह वाचकांच्या भेटीस आला.
मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्याबाबतही मी अनेकवेळा हा अनुभव घेतला आहे. महाराष्ट्रातील लिहित्या हातांना ते कायम बळ देतात. प्रकाशक या नात्याने त्यांनी अनेक कवी, लेखकांना माझ्याकडे पाठवले आहे. व्याख्यानाच्या निमित्ताने फिरताना कुणी उपेक्षित कवी भेटला तर त्याचे साहित्य प्रकाशित व्हावे यासाठी त्यांची धडपड असते. इतकेच नाही तर काहींना त्यांच्या योग्यतेनुसार कुठे नोकरी मिळेल काय यासाठीही ते प्रयत्नशील असतात.
दुर्दैवाने सध्या अशा लेखकांची कमतरता जाणवत आहे. ‘एकवेळ माझं साहित्य बाजूला ठेवा पण या नवोदितांचं वाचा’ असं सांगणारे लेखक दुर्मीळ झालेत आणि हीच मराठीची शोकांतिका आहे. जोपर्यंत उमलत्या अंकुरांना आपण बळ देणार नाही तोपर्यंत मराठी भाषा, साहित्य, संस्कृती, समीक्षेला बहर येणार नाही. त्यासाठी प्रस्थापितांनी पुढाकार घेणे, संकुचितपणा बाजूला सारून नव्याचे कौतुक करणे गरजेचे आहे.
महाराष्ट्र सरकार आपल्याकडील महाविद्यालयात मराठी वाङ्मय मंडळ सक्तीचे करतेय. मराठीसाठी ‘सक्ती’ करावी लागते हे आपल्या सांस्कृतिक अधोगतीचे लक्षण आहे. मायमराठीचे जतन आणि संवर्धन करणे हे आपल्या सर्वांचेच कर्तव्य आहे. त्यासाठी आपण जास्तीत जास्त मराठीत बोलायला  हवे. मराठी वाचायला हवे. प्रस्थापितांबरोबरच नवोदितांचे साहित्य वाचून त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे. चांगले वाचक तयार झाले तरच चांगले लेखक निर्माण होतील. त्यामुळे लेखकांनी समाजाभिमुख होणे जितके गरजेचे आहे त्याहून समाजाने साहित्याभिमुख होणे जास्त आवश्यक आहे. तसे झाले तर मराठी भाषेच्या भवितव्याची चिंता करण्याचे कारण नाही. प्रत्येकाने आपापली जबाबदारी लक्षात घेऊन खारीचा वाटा उचलला तरी मराठी ही जगातली प्रमुख भाषा होऊ शकेल.
- घनश्याम पाटील, पुणे
7057292092

Tuesday, June 20, 2017

इतिहासाचे भीष्माचार्य!

असे म्हणतात की, एकेक पायरी सोडवत गेल्यास गणित सुटते; मात्र इतिहासाचे तसे नसते! इतिहासलेखन जेव्हा पूर्ण होते तेव्हाच त्याला खरे फाटे फुटतात! म्हणूनच इतिहास लेखन हे आत्यंतिक जिकिरीचे आणि कष्टाचे काम असते. त्यासाठी प्रचंड अभ्यास लागतो. तटस्थ वृत्ती लागते. ते जीवनध्येयच बनायला हवे. महाभारतकार व्यास मुनींनी म्हटलंय की, ‘इतिहास ही राष्ट्राची ज्योत आहे’ आपल्या राष्ट्राचा उज्ज्वल आणि स्फूर्तिदायी इतिहास समाजापुढे यावा यासाठी अनेकजण प्रामाणिकपणे झटत असतात. ज्यांना इतिहासलेखन क्षेत्रातील भीष्माचार्य म्हटले जाते असे बहुव्यासंगी संशोधक वा. सी. बेंद्रे हे त्यापैकीच एक!
13 फेब्रुवारी 1894 ला पेण येथे जन्मलेल्या बेंद्रे यांनी 1918 ला प्रथम भारत इतिहास संशोधक मंडळात पाऊल टाकले आणि नंतर हयातभर स्वतःला महाराष्ट्राच्या इतिहास संशोधनासाठी वाहून घेतले. त्यांनी महाराष्ट्राचा ‘17 व्या शतकाचा इतिहास’ हे संशोधनाचे क्षेत्र निवडले. एक साधन-संग्राहक, साधनसंपादक, साधनचिकित्सक, संशोधक व इतिहासकार अशा भूमिका त्यांनी समर्थपणे पार पाडल्या. सन 1928 मध्ये शिवशाहीच्या इतिहासाचा प्रास्ताविक खंड ‘साधन चिकित्सा’ हा त्यांचा पहिला ग्रंथ प्रसिद्ध झाला. त्याद्वारे त्यांनी नवीन अभ्यासक आणि संशोधकांना बहुमोलाचे मार्गदर्शन केले. महाराष्ट्राच्या राष्ट्रीय इतिहासाची रचना करणे हेच त्यांचे जीवनध्येय होते. बेंद्रे यांचे अफाट कार्य, चिकाटी व इतिहासाविषयीचा त्यांचा अभ्यास पाहून 1938 मध्ये त्यांना खास शिष्यवृत्ती मिळाली व ते हिस्टॉरिकल रिसर्च स्कॉलर म्हणून इतिहास संशोधनासाठी युरोप व इंग्लंडला गेले. पेशवे दप्तरातील सुमारे चार कोटी विस्कळीत कागदपत्रांचे कॅटलॉगिंग व विषयवार मांडणी करण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी केले.
त्यावेळी इब्राहिम खान या परदेशी चित्रकाराने काढलेले मुस्लिम पेहरावातील छ. शिवाजी महाराजांचे चित्र प्रचलित होते. ते योग्य नाही हे बेंद्रेंच्या लक्षात आले होते. त्यामुळे शिवरायांच्या मूळ चित्राच्या संशोधनासाठी ते पुढे सरसावले. मॅकेनझीच्या ग्रंथाचे अवलोकन करताना त्यांना व्हलेंटाईन या डच चित्रकाराने काढलेले सुरतेच्या वखारीतील तिथल्या गव्हर्नराच्या भेटीचे महाराजांचे चित्र मिळाले. ज्यावेळी ते इंग्लंडला गेले त्यावेळी त्यांनी प्रथम या चित्राची खात्री केली. हे चित्र पुढे आणण्यासाठी ‘इंडिया हाऊस’कडून परवानगी मिळवली आणि पुण्याच्या शिवाजी मंदिरात साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांनी ते प्रसिद्ध केले. आज आपल्या सरकारी कार्यालयात लावले जाणारे छत्रपती शिवरायांचे हेच ते चित्र! वा. सी. बेंद्रे यांची ही कामगिरी इतिहास संशोधन क्षेत्रात उत्तुंग ठरली.
त्याकाळी संभाजी महाराजांच्या जीवनावर मराठी भाषेत पुष्कळ नाटके लिहिली गेली. त्यातील बहुतेक नाटकात संभाजीराजे व्यसनाधीन, बदफैली, व्यभिचारी, दुर्वर्तनी असेच चित्र नाटककारांनी उभे केले होते. सोनाबाई केरकर या पहिल्या महिला नाटककार. 1886 साली त्यांनी संभाजीराजांचे चरित्र लिहिले होते. त्यातही राजांचे असेच वर्णन होते. इतिहास संशोधनाच्या अपुर्‍या साधनांमुळे छ. संभाजीराजांची मलिन झालेली प्रतिमा प्रथम धुवून काढण्याचे प्रचंड मेहनती काम बेंेद्रे यांनी केले. त्यासाठी त्यांनी चाळीस वर्षे संशोधन केले. परदेशात जाऊन साधने मिळवली. इंग्लंडहून त्यांनी 25 खंड होतील इतकी कागदपत्रे भारतात आणली. पुढे सन 1958 साली ‘छ. संभाजीराजांचे चरित्र’ हा 650 पानांचा चिकित्सक ग्रंथ त्यांनी लिहून पूर्ण केला. त्यामुळे संभाजीराजांची युद्धनीती, त्यांची धर्मप्रवणवृत्ती, त्यांचा तेजस्वी पराक्रम लोकांना ज्ञात झाला. मराठ्यांची अस्मिता ठरणार्‍या या राजांच्या बदनामीचा कलंक पुसून काढण्याचे काम करणार्‍या या ग्रंथाच्या प्रसिद्धीसाठी तेव्हा स्व. यशवंतराव चव्हाण यांनी सात हजार रूपयांचे अनुदान दिले होते. छत्रपती संभाजीराजांची समाधी वढू ब्रुद्रुक येथे आहे हे सर्वप्रमथ त्यांच्याच लक्षात आले. त्यासाठीचे त्यांचे संशोधन महत्त्वाचे ठरले.
स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रेरणेने त्यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचेही चरित्र लिहिले. मालोजीराजे, शहाजीराजे, शिवाजी महाराज यांची चरित्रे लिहिली. विजापूरची आदिलशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही, शिवराज्याभिषेक प्रयोग, संत तुकाराम महाराजांचे अप्रकाशित अभंग, साठहून अधिक ग्रंथांचे लेखन, वयाच्या ऐंशीव्या वर्षी लिहिलेला ‘राजाराम चरित्रम्’ हा ग्रंथ, महाराष्ट्र इतिहास परिषदेची स्थापना अशा अफाट कार्यामुळे ते इतिहास संशोधन क्षेत्रातील भीष्माचार्य ठरतात. आपल्या सिद्धहस्त लेखणीद्वारे हे अफाट कार्य उभे करतानाच त्यांनी हुंडाविरोधी चळवळही उभी केली. ब्रदरहुड स्काऊट संघटना काढली. वयाच्या 90 व्या वर्षी म्हणजे 16 जुलै 1984 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांनी उभ्या केलेल्या अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेला त्यांची नात साधना डहाणूकर यांनी दीड लाख रूपये देणगी दिली. त्यातून दरवर्षी एका इतिहास संशोधकाला कै. वा. सी. बेंद्रे पुरस्कार दिला जातो. यंदाचा (2017) पुरस्कार संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांना देण्यात आला.
जाता जाता एक गोष्ट मात्र प्रांजळपणे सांगाविशी वाटते. प्रारंभी उल्लेख केल्याप्रमाणे इतिहास लेखन जिथे संपते तिथूनच त्याला खर्‍याअर्थी फाटे फुटतात. बेंद्रे यांनी छत्रपती संभाजीराजांचे ‘चंपा’ नावाच्या एका रजपूत मुलीशी लग्न झाल्याचे लिहिले आहे. या विवाहाचे सविस्तर वर्णनही त्यांनी केले आहे. वस्तुतः त्यावर पी. आर. गोडे या संशोधकाने शोधनिबंध लिहून ही घटना नंदुरबारच्या शंभूराजे देसाई यांच्याबाबत घडल्याचे सप्रमाण सिद्ध केले आहे. तरीही नुकत्याच प्रकाशित झालेल्या त्यांच्या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीतून हा मजकूर काढून टाकण्यात आला नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतिथी फाल्गुन वद्य तृतिया, शके 1551, (19 फेब्रुवारी, सन 1630) ही नक्की करण्याचे अभूतपूर्व कामही वा. सी. बेंद्रे यांनीच केले. या महान इतिहास संशोधकाची नव्या पिढीला माहिती व्हावी आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता जपली जावी यासाठी त्यांचे महाराष्ट्रात यथोचित स्मारक होणे गरजेचे आहे. त्यांना भावपूर्ण आदरांजली!
- घनश्याम पाटील, पुणे
7057292092

Tuesday, June 13, 2017

अफाट प्रतिभेचे धनी!

लोककवी मनमोहन नातू आणि रॉय किणीकर या अफाट प्रतिभेच्या बेफाट अवलियांनी आपल्या कुटुंबाची होणारी परवड लक्षात न घेता केवळ साहित्यासाठीच स्वतःला वाहून घेतले. दोघेही स्वच्छंदी आणि बेफिकीर मनोवृत्तीचे; मात्र सरस्वती मातेच्या दरबारातले सच्चे पुजारी! एकेठिकाणी मनमोहनांनी लिहून ठेवले आहे, ‘‘भविष्यात जेव्हा कधी दगडाचे भाव स्वस्त होतील, तेव्हा, पुतळा माझा उभारणार्‍यांनो, आधी किणीकर खोदा!’’
मराठीत रूबाई हा प्रकार माधव जुलियन यांनी आणला हे त्रिकालबाधीत सत्य असले तरी त्यात ‘प्राण’ फुंकण्याचे काम मात्र रॉय किणीकर नावाच्या एका कलंदर माणसाने केले. कथा, कविता, नाटक अशा सर्वच साहित्यप्रकारात लीलया संचार करणारे रॉयसाहेब हे संपादन क्षेत्रात मैलाचा दगड ठरावेत. आपल्या संपादकीय कारकिर्दीत त्यांनी अनेक नवनवीन प्रयोग करून मराठी वाचकांची दर्जेदार वाचनाची भूक भागवली.
एका ध्येयाने झपाटून त्यांनी आपली कलासाधना अविरत सुरूच ठेवली. नियतीने त्यांची पदोपदी परीक्षा बघितली; मात्र अशा गोष्टींना न जुमानता त्यांनी आपल्या चेहर्‍यावरील स्मितरेषा कधीही ढळू दिली नाही. प्रचंड विद्वान असणारे रॉयसाहेब विनोदी वृत्तीचे होते. त्यांच्याबाबतचा एक भन्नाट किस्सा याठिकाणी आवर्जून सांगावासा वाटतो.
दत्तगुरूवरील एका चित्रपटाचे चित्रिकरण सुरू होते. श्री दत्त त्यांचे भगवे कपडे परिधान करून शिष्यांच्या लवाजम्यासह चाललेत आणि त्यांच्यामागे काही कुत्री येताहेत असा प्रसंग चित्रीत करायचा होता. मात्र कॅमेर्‍यात हा ताफा येत नव्हता. कुत्री काही दत्ताच्या मागे येईनात. काहीवेळा कुत्री पुढे तर दत्तगुरू मागे आणि काहीवेळा दत्तगुरू पुढे तर कुत्री मागे, अशी कवायत चालली होती. हा सगळा गमतीशीर प्रकार पाहून किणीकर पुढे सरसावले आणि दिग्दर्शकाला सांगितले की, ‘‘हा प्रसंग मी पाच मिनिटात पूर्ण करतो.’’ आधीच वैतागलेल्या दिग्दर्शकाने त्यांना अनुमती दिली.
किणीकरांनी हुकूम सोडला, ‘‘अरे, जरा पाव किलो मटण आणा.’’   एकतर श्रीदत्तावरील चित्रपट; त्यात बहुतेक कलाकार अस्सल सदाशिवपेठी! त्यामुळे सगळ्यांनाच हा काय प्रकार ते कळेना. शेवटी त्यांच्या आदेशाप्रमाणे मटण आणले गेले. त्यांनी सांगितले, ‘‘ते टाका आता दत्ताच्या झोळीत!’’
दत्ताच्या झोळीत मटण टाकले आणि त्या वासाने कुत्र्यांनी त्यांचा पिच्छा पुरवला. खरोखरच पाच मिनिटात तो प्रसंग चित्रीत झाला.
त्यांच्या ‘उत्तररात्र’ च्या पहिल्या पानावर एक रूबाई आहे. ती अशी-
पूर्वरात्र एक वेदना घेऊन येते
मध्यरात्र एक स्वप्न देऊन जाते
आणि उत्तररात्र म्हणजे
जागर... यात्रेचे पुन्हा प्रस्थान!

त्याखाली नाव आहे ‘रवीन्द्रनाथ ठाकूर’ यांचे! मात्र गुरूवर्य रवीन्द्रनाथ टागोर यांच्याच वाटाव्यात इतक्या या अर्थपूर्ण ओळी खुद्द किणीकर साहेबांच्याच आहेत.
सदाशिव पेठेतील दीड खोल्यात आपला संसारगाडा चालविणार्‍या किणीकरांनी ‘खजिन्याची विहीर’ हे नाटक लिहून नाट्य रसिकांना एक विलक्षण अनुभव मिळवून दिला.
रॉयसाहेबांच्या रूबाईतला टवटवीतपणा अजरामर आहे. मराठी साहित्यात या माणसाने जे भरीव योगदान दिले त्याला तोड नाही. त्यांच्या  जबरदस्त क्षमतेचा अंदाज येण्यासाठी त्यांच्या काही रूबाया सांगतो-

इतिहास घडविला त्यांची झाली कीर्ती
इतिहास तुडवला त्यांची देखील कीर्ती
गहिवरला अश्रू कीर्तिस्तंभावरला
पिंडास कावळा अजून नाही शिवला

येताना त्याने दार लावले नाही
जाताना त्याने वळून पाहिले नाही
येईन म्हणाला, पाहिन वाट म्हणाली
दारात अहिल्या शिळा होऊन बसली

पण लिहावयाचे लिहून झाले नाही
पण सांगावयाचे सांगून झाले नाही
संपली कथा जी कुणी ऐकली नाही
संपली रात्र, वेदना संपली नाही

खांद्यावर घेऊ नको सोन्याचा सूळ
चार्वाक म्हणाला, पुनर्जन्म हे खूळ
देहाला कसलें आहे पुण्य नि पाप
आत्म्यास भोगुं द्या अमरत्वाचा शाप

कलेचा ध्यास घेऊन मराठी मनावर अधिराज्य गाजवणार्‍या या महान साहित्यिकास आमची प्रेमाची मानवंदना!!
- घनश्याम पाटील, पुणे
7057292092