Tuesday, June 27, 2017

उमलत्या अंकुरांना बळ द्या!

मोठ्या वृक्षाखाली छोटी झाडं वाढत नाहीत असं म्हटलं जातं. मात्र या मोठ्या झाडांमुळेच नवनवीन झाडे तयार होतात आणि सृष्टीत नवचैतन्य फुलवतात. साहित्याचंही तसंच आहे. (फार तर होतं असं म्हणूया!) अफाट ताकदीच्या बेफाट लेखकांनी नव्या पिढीला ‘विचार’ दिला. चांगलं लिहिणार्‍यांना हेरून त्यांच्या प्रतिभेला खतपाणी घातलं. सध्याच्या काळात मराठीला प्रतिसादशून्यतेचं ग्रहण लागलेलं असताना एकेकाळी मात्र या लेखकांनी अनेक उमलते अंकुर पुढे आणले.
शिवाजी सावंत यांनी ‘मृत्युंजय’ लिहिली; मात्र त्यांना प्रकाशकच मिळत नव्हता. अनेकांचे उंबरठे झिजवूनही निराशाच वाट्याला येत होती. त्यावेळी त्यांनी गदिमांना त्यातील काही प्रकरणं पाठवली. गदिमांनी ती वाचली आणि ‘कॉन्टिनेन्टल प्रकाशन’च्या कुलकर्णींना फोन केला. गदिमा कुलकर्णींना म्हणाले, ‘मुलगी नाकीडोळी नीटस आहे. तुम्ही करून घ्यायला हरकत नाही...’ त्यानंतर शिवाजी सावंत यांच्यासारखा बलाढ्य लेखक मराठीला मिळाला.
कुसुमाग्रजांचंही तसंच! कविता हा साहित्यातील सर्वोत्कृष्ट आविष्कार असला तरी कवितासंग्रह छापण्याचे धाडस फारसे कोणी करत नाही. त्यातही नवोदित कविंच्या वाट्याला तर प्रचंड उपेक्षा आणि अवहेलना येते. तात्यासाहेबही याला अपवाद ठरले नाहीत. या कविता भाऊसाहेब खांडेकरांच्या वाचण्यात आल्या. त्यांनी पदरमोड करून कुसुमाग्रजांचा ‘विशाखा’ हा काव्यसंग्रह प्रकाशित केला. यातूनच मराठीला ‘ज्ञानपीठ’विजेता कवी मिळाला.
ज्येष्ठ कवी रमेश गोविंद वैद्य यांनी एक किस्सा सांगितला. म. दा. भट नावाचे एक विख्यात ज्योतिषी होते. वैद्य त्यांच्या घरी बसले होते. त्याचवेळी तिथे गझलसम्राट सुरेश भट आले. मदा आणि सुरेश भट यांच्यात चर्चा झाली. नंतर मदांनी सुरेश भटांना सांगितले, ‘हे रमेश गोविंद. उत्तम कविता करतात.’ सुरेश भटांनी लगेच त्यांना कविता म्हणायला लावल्या. त्या ऐकल्यानंतर ते म्हणाले, ‘माझ्यासाठी रिक्षा घेऊन ये...’
वैद्यांनी त्यांना ‘कुठं जायचंय?’ असं विचारल्यावर ते म्हणाले, ‘तुम्ही रिक्षा तर आणा.’
वैद्यांनी रिक्षा आणली. सुरेश भट घराबाहेर आले आणि वैद्यांना म्हणाले, ‘बसा रिक्षात.’ ते निमुटपणे रिक्षात बसले. भटांनी पहाडी आवाजात फर्मावले, ‘आकाशवाणीकडे घ्या...’
त्यानंतर ते दोघे पुणे आकाशवाणी केंद्रात पोहोचले. भटांनी तेथील प्रमुखांकडे रमेश वैद्यांना नेले आणि सांगितले, ‘मगाशी जी काही बडबड केली ती इथे करा...’
वैद्यांनी कविता ऐकवल्या. त्यानंतर भट आकाशवाणीतील अधिकार्‍याला म्हणाले, ‘वाट कसली पाहताय? यांच्या कविता आपल्या रसिकांपर्यंत जायला हव्यात...’ खुद्द सुरेश भट एका कविला घेऊन आल्याने त्यांना नकार देण्याची कुणाची बिशाद? रमेश गोविंद वैद्य हे नाव त्यावेळी सर्वप्रथम आकाशवाणीच्या श्रोत्यांपर्यंत गेले.
एकेकाळी बालभारतीत प्रमुख असलेल्या आणि आता महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह असलेल्या माधव राजगुरू यांनाही असाच एक सुखद अनुभव आला. त्यांनी त्यांची एक कविता राम शेवाळकर यांना वाचायला दिली. ती वाचल्यावर शेवाळकरांनी सांगितले, ‘जेवायला बोलवून हातावर बडीसोप ठेऊ नकात. मला तुमच्या सगळ्या कविता वाचायला द्या.’ राजगुरू यांनी त्यांची कवितांची डायरी शेवाळकरांकडे सुपूर्द केली. त्यानंतर काही दिवस गेले. राजगुरूंना शेवाळकरांना प्रतिक्रिया विचारण्याचे धाडस झाले नाही. शेवाळकरांनीही काही कळवले नाही. राजगुरूंनी विषय सोडून दिला आणि एकेदिवशी अचानक पुण्यातल्या एका प्रकाशकांचा त्यांना फोन आला. ते म्हणाले, ‘शेवाळकर सरांनी तुमच्या कविता माझ्याकडे पाठवल्यात. त्याची प्रस्तावनाही त्यांनीच लिहिलीय. त्या प्रकाशित करायच्या आहेत. एकदा येऊन भेटा.’ आणि माधव राजगुरू यांचा कवितासंग्रह वाचकांच्या भेटीस आला.
मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्याबाबतही मी अनेकवेळा हा अनुभव घेतला आहे. महाराष्ट्रातील लिहित्या हातांना ते कायम बळ देतात. प्रकाशक या नात्याने त्यांनी अनेक कवी, लेखकांना माझ्याकडे पाठवले आहे. व्याख्यानाच्या निमित्ताने फिरताना कुणी उपेक्षित कवी भेटला तर त्याचे साहित्य प्रकाशित व्हावे यासाठी त्यांची धडपड असते. इतकेच नाही तर काहींना त्यांच्या योग्यतेनुसार कुठे नोकरी मिळेल काय यासाठीही ते प्रयत्नशील असतात.
दुर्दैवाने सध्या अशा लेखकांची कमतरता जाणवत आहे. ‘एकवेळ माझं साहित्य बाजूला ठेवा पण या नवोदितांचं वाचा’ असं सांगणारे लेखक दुर्मीळ झालेत आणि हीच मराठीची शोकांतिका आहे. जोपर्यंत उमलत्या अंकुरांना आपण बळ देणार नाही तोपर्यंत मराठी भाषा, साहित्य, संस्कृती, समीक्षेला बहर येणार नाही. त्यासाठी प्रस्थापितांनी पुढाकार घेणे, संकुचितपणा बाजूला सारून नव्याचे कौतुक करणे गरजेचे आहे.
महाराष्ट्र सरकार आपल्याकडील महाविद्यालयात मराठी वाङ्मय मंडळ सक्तीचे करतेय. मराठीसाठी ‘सक्ती’ करावी लागते हे आपल्या सांस्कृतिक अधोगतीचे लक्षण आहे. मायमराठीचे जतन आणि संवर्धन करणे हे आपल्या सर्वांचेच कर्तव्य आहे. त्यासाठी आपण जास्तीत जास्त मराठीत बोलायला  हवे. मराठी वाचायला हवे. प्रस्थापितांबरोबरच नवोदितांचे साहित्य वाचून त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे. चांगले वाचक तयार झाले तरच चांगले लेखक निर्माण होतील. त्यामुळे लेखकांनी समाजाभिमुख होणे जितके गरजेचे आहे त्याहून समाजाने साहित्याभिमुख होणे जास्त आवश्यक आहे. तसे झाले तर मराठी भाषेच्या भवितव्याची चिंता करण्याचे कारण नाही. प्रत्येकाने आपापली जबाबदारी लक्षात घेऊन खारीचा वाटा उचलला तरी मराठी ही जगातली प्रमुख भाषा होऊ शकेल.
- घनश्याम पाटील, पुणे
7057292092

9 comments:

  1. सर तुमच्यासारखा संस्थापक प्रकाशक असल्यावर हे सहज शक्य आहे । तुमचे आणि चपराकचे फार मोठे योगदान आहे ह्यात । हा माझा अनुभव आहे । धन्यवाद

    ReplyDelete
  2. सर तुमच्यासारखा संस्थापक प्रकाशक असल्यावर हे सहज शक्य आहे । तुमचे आणि चपराकचे फार मोठे योगदान आहे ह्यात । हा माझा अनुभव आहे । धन्यवाद

    ReplyDelete
  3. उत्तम विचार खूप चांगल्या पद्धतीने मांडले आहेत.

    ReplyDelete
  4. नवोदितांसाठी म्हणजेच उमलत्या अंकुरांना आनंद देणारा परिपूर्ण लेख!

    ReplyDelete
  5. खूप खरी गोष्ट आहे. कविता प्रकाशित जाण्यासाठी गेले असता मला असेच अनुभव आले. कथा आयकण्याआधीच आम्ही फक्त मान्यवरांच्या कथा प्रकाशित करतो असे सांगण्यात आले. पण चपराक सारखे प्रकाशक नवीन लेखकांचीही आवर्जून दखल घेतात आणि त्याविषयी कळकळीने लिहितात हे खरंच स्तुती करण्यासारखे आहे

    ReplyDelete
  6. खूप खरी गोष्ट आहे. कविता प्रकाशित जाण्यासाठी गेले असता मला असेच अनुभव आले. कथा आयकण्याआधीच आम्ही फक्त मान्यवरांच्या कथा प्रकाशित करतो असे सांगण्यात आले. पण चपराक सारखे प्रकाशक नवीन लेखकांचीही आवर्जून दखल घेतात आणि त्याविषयी कळकळीने लिहितात हे खरंच स्तुती करण्यासारखे आहे

    ReplyDelete
  7. खूप छान लेख,नवोदितांना बळ दया...लिहिते करा...खरंच आमच्यासारखे उपेक्षित कवी खूप आहेत.

    ReplyDelete
  8. मराठी साहित्य परिषदेने हे कार्य करायला हवे,मोठमोठी साहित्य संमेलने भरवली जातात,पण नवोदित साहित्यिक घडविण्याची प्रक्रिया यात दिसत नाही... जुन्यांचे कौतुक जरूर करावे पण नवीन साहित्यिक घडवायचे असतील तर फक्त मी मराठी आणि माझी मराठी,आम्ही मराठी करून चालणार नाही, ठोस पावले उचलायला हवीत,नवोदितांचे किमान 3 संग्रह,किंवा कथा,कादंबऱ्या शासनाने प्रकाशित करायला अनुदान द्यायला हवे,नव्हे तर मराठी साहित्य परिषदेमार्फ़त प्रकाशित करायला हवे...मी माझ्या वयाच्या 13 व्या वर्षी म्हणजे साधारण 26 वर्षांपूर्वी पहिली कविता लिहिली,त्यानंतर अनेक कविता लिहिल्या आणि आजतागायत 150 कविता तश्याच पैशाअभावी अप्रकाशित आहेत...प्रकाशन साठी विचारले तर अगदी 20 ते 35 हजार पर्यंत रक्कम सांगितली जाते.
    विवेक बच्चे
    कवी,पत्रकार

    ReplyDelete
  9. प्रत्येकात एक लेखक दडलेला असतो. पण आपले विचार कसे मांडावे हे त्याला समजत नसते. यातूनही जो प्रयत्न करतो त्याला व्यासपीठ मीळत नाही. म्हणून या लेखातील विचार मोलाचे आहेत. चपराक चे व्यासपीठ याल अपवाद आहे, कारण चपराक मधून अनेक लेखक समाजाला लाभले आहेत. हा आदर्श इतर प्रकाशकांनी घ्यावा.

    ReplyDelete