Tuesday, January 24, 2017

‘अक्षर ऐवज’ - घनश्याम पाटील

माझे 'अक्षर ऐवज' हे तिसरे पुस्तक पुण्यात नुकतेच 'चपराक साहित्य महोत्सवा'त प्रकाशित झाले. यापूर्वी 'दखलपात्र' आणि 'झुळूक आणि झळा' या पुस्तकांना आपण उत्तम प्रतिसाद दिला, त्याबद्दल धन्यवाद. 'अक्षर ऐवज' हा निवडक पुस्तक परीक्षणांचा संग्रह आहे. या पुस्तकाला नाशिक येथील ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक संजय वाघ यांनी लिहिलेली ही प्रस्तावना... अवश्य वाचा, अभिप्राय कळवा. 
या पुस्तकासाठी संपर्क : 'चपराक प्रकाशन', पुणे 
०२०-२४४६०९०९ / ७०५७२९२०९२ 


काळ बदलला तसा माणसांच्या जगण्याचा ट्रेंडही बदलत चालला आहे. काळाशी स्पर्धा करताना किंवा त्याच्या वेगाशी नाते सांगताना मनुष्यप्राणी पायाला भिंगरी लावून सैराटपणे धावतो आहे, यात्रेतील एखाद्या बिथरलेल्या वारूप्रमाणे. या धावण्याच्या नादात कौटुंबिक ओलावा आटत चालला आहे. नात्यातील स्नेहाची, आपुलकीची वीण उसवत चालली आहे. संस्कारांचा धागा तुटत चालला आहे. जमीन-जुमला, संपत्ती व प्रमोशनचा टप्पा गाठण्याच्या दलदलीत त्याचे जगणे स्वैराचारी आणि आत्मप्रौढी बनत चालले आहे. परिणामी माणूस माणसापासून दुरावतो आहे. परस्परांविषयीचा आकस, द्वेषबुद्धिने त्याच्या माणूसपणावर कब्जा मिळविला आहे. त्यामुळे सत्याला सत्य आणि चांगल्याला चांगले म्हणण्याची दानत लोप पावत चालली असल्याच्या विरोधी अशा सांस्कृतिक पर्यावरणात पत्रकार, संपादक व लेखक घनश्याम पाटील यांचा ‘अक्षर ऐवज’ कमालीचा आशादायी वाटतो.
‘भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणू काठी’ या वृत्तीने वाटचाल करणारा हा युवा संपादक-प्रकाशक ओठावर मिसरूडही न फुटलेल्या वयापासून ‘शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जनलोका’ म्हणत मोठ्या निष्ठेने अक्षरपुजा करीत आला आहे. वृत्तपत्र व प्रकाशन ही मुळात भांडवलदारांच्या मक्तेदारीची क्षेत्रे हे ठाऊक असताना आणि खिशात दमडी नसताना एक कोवळ्या वयाचा मुलगा उराशी स्वप्न बाळगून विद्येच्या माहेरघरी येतो, वाचनसंस्कृती जिवंत ठेवण्यासाठी तारूण्य पणाला लावतो ही सारी निस्पृह त्यागाची आणि साहित्यावरील आपल्या असीम निष्ठेचीच निदर्शके मानायला हवीत. ‘सच्चाईचे गुनगाण आणि बुराईवर शब्दप्रहार’ ही त्यांची खासीयत. त्यामुळे कोणाही हौश्या-गवश्यांचे लांगुलचालन करण्याचा शौक घनश्याम पाटील यांना कधी नव्हताच. म्हणूनच या ‘अक्षर ऐवजा’त  त्याचे कोठेही दर्शन घडत नाही. त्यांनी या ‘अक्षर ऐवजा’साठी महाराष्ट्रातील असे पंचवीस प्रतिभावंत हुडकून काढले की, ज्यांच्या साहित्यात विचार आहे आणि त्या विचारांना चिंतनाची किनार लाभलेली आहे. ज्यांना समाजातील बिघडलेल्या सांस्कृतिक आरोग्यावर अक्षर उपाय सुचवायचा आहे, ज्यांना समाजातील अप्रिय गोष्टींवर शब्दांचा आसूड ओढायचा आहे, ज्यांना गुज मनीचे सकळ जनाला सांगायचे आहे, ज्यांना प्रेरणादायी बेटांची ओळख अवघ्या महाराष्ट्राला करून द्यायची आहे, ज्यांना मनोरंजनातून प्रबोधनाची वात प्रज्वलित करायची आहे अशा पंचवीस साहित्यकृतींची शब्दमाळ त्यांनी कल्पकतेने या ग्रंथात ओवलेली आहे.                                                     पंचवीस शब्दपुजकांच्या साहित्यकृतींची, त्यातील सौंदर्यस्थळांची वाचकांना ओळख व्हावी या एकमात्र प्रांजळ हेतूने, मोठ्या आत्मीयतेने आणि सहृदयतेने घनश्याम पाटील यांनी हा ‘अक्षर ऐवज’ वाचकांच्या दरबारात रिता केला आहे. कोणी एखादा या ऐवजाला प्रस्तावनांचे बिरूद लावेल, कोण पुस्तक परीक्षण, रसग्रहण म्हणेल तर काही साहित्य समीक्षेची विशेषणेही लावतील. ‘जो जे वांछिल, तो ते लाहो’ या संतवचनाप्रमाणे या ग्रंथाकडे जो ज्या नजरेने पाहिल, त्या प्रकारचे रूप त्याच्या दृष्टिपथास पडेल. एक मात्र खरे की, या ग्रंथाला उपरोक्त प्रत्येक चौकटीत तंतोतंत आणि घट्ट बसविण्याची शब्दकिमया पाटील यांनी या ऐवजात साधली आहे. यामागे वाचनसंस्कृतीला खतपाणी घालण्याचा आणि लिहित्या हातांना सांस्कृतिक महाराष्ट्रातील भुसभुशीत मातीत अक्षरांचे वाण रूजविण्यासाठी ‘पेर्ते व्हा’ असे सांगणारी शाबासकीची आश्‍वासक थाप जरूर दिसेल. सभोवताली निंदकांची मुजोर वस्ती सुखैनैव नांदत असतानाच्या बजबजपुर्‍यात चांगल्याला चांगले म्हणायला मोठे धाडस आणि मनाचा मोठेपणा लागतो, तो घनश्याम पाटील यांच्या ठायी ठासून भरलेला आहे, म्हणूनच ही अक्षर चळवळ समृद्ध होताना दिसते आहे.
एकीकडे लिहित्या हातांना बळ देण्याचे काम अशाप्रकारे होत असताना दुसरीकडे लेखनक्षेत्रात पदार्पण करू इच्छिणार्‍या नवोदितांना नाउमेद करण्याचे पातकही घडत आहे. लिहिलं त्याला फैलावर घेणारी, मार्गदर्शनाचे डोस पाजणारी आणि आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करून त्याची पीसे मोकळी करणारी एक समीक्षकांची भोंदू जमात महाराष्ट्रात पद्धतशीरपणे सांस्कृतिक दहशत निर्माण करीत आली आहे. अशा या सांस्कृतिक दहशतवाद्यांमुळे नवी उमेद घेऊन या क्षेत्रात उमलू पाहणार्‍या कळ्यांचे फूल होण्याआधीच त्या कुस्करल्या जात आहेत. मग ही एकार्थाने साहित्यातील भृणहत्त्याच नव्हे काय? म्हणूनच अशा नतद्रष्टांच्या प्रभावळीत नवोदितांच्या पंखात बळ भरणार्‍या घनश्याम पाटील यांचा ‘अक्षर ऐवज’ ठसठशीतपणे अधोरेखित झाल्यावाचून राहत नाही. कोणतीच व्यक्ती जन्मतःच परिपूर्ण नसते. बोबडे बोल, रांगणे ही प्राथमिक अवस्थेतील अपरिपक्वता जशी ओघाने येते तशी नवख्या साहित्यातही ते अपरिहार्य आहे. अशावेळी नवोदितांना बोट धरून चालविण्याचा वाटा कोणी उचलत नसेल तर, किमान त्यांच्या नावाने बोटे मोडून त्यांना गर्भगळीत तरी करू नये इतकीच काय ती माफक अपेक्षा असते. पहिल्या प्रयत्नाला योग्य दिशा आणि प्रेरणा मिळाली की त्यातून ऊर्जा घेऊन नवोदितांमधून देखील कसदार साहित्याची निर्मिती घडू शकते, असा सकारात्मक विश्‍वास अंगी बाणून जे समतोल आणि थोडीशी उभारी देणारी समीक्षा करतात तेच खरे समीक्षक म्हणून अभिनंदनास पात्र ठरतात; परंतु अलीकडचे चित्र फारसे आशादायी दिसत नसले तरी घनश्याम पाटील यांच्यासारखी मोजकी माणसे साहित्यसंसार फुलविण्याच्या प्रवासात सांस्कृतिक कर्तव्यभावना मनाशी बाळगून आपापल्या परिने कार्यरत आहेत आणि हाच खरा साहित्य क्षेत्रातील आशेचा किरण मानायला हवा.
घनश्याम पाटील यांनी आपल्या ‘अक्षर ऐवजा’त त्यांना भावलेल्या पंचवीस साहित्यकृतींचा समावेश केलेला आहे. लेखकांनी जेवढ्या आत्मीयतेने पुस्तकांचे लेखन केले आहे, तेवढ्याच  ममत्वाने किंबहुना त्याहून अधिक पोटतिडकीने पाटील यांनी त्या कलाकृतींची उचित शब्दात दखल घेतली आहे. एखाद्या मित्राने गाजलेल्या चित्रपटाच्या कथानकावर मोजून पाच मिनिटांचे सफाईदारपणे भाष्य करावे आणि त्यानंतर एकतर तो चित्रपट पाहण्याची मनात इच्छा जागावी, नाहीतर ते भाष्य ऐकूनच तृप्ततेचा ढेकर द्यावा, अशा रितीनेच पाटील यांनीसुद्धा या ग्रंथातील साहित्यकृतींचा ओघवत्या शैलीत आपुलकीने नेटकेपणाने परामर्श घेतला आहे. मात्र हे करीत असताना या ग्रंथात समाविष्ट प्रत्येक पुस्तकातील सौंदर्यस्थळे त्यांनी जाणीवपूर्वक अचूकपणे अधोरेखित केलेली आहेत. त्यामुळे मूळ कलाकृती वाचण्याचा मोह वाचकांना झाला नाही तरच नवल!
असे म्हणतात सुरूवात चांगली झाली म्हणजे शेवट गोड होतोच. या वाक्याशी पाटील सहमत असल्यामुळे या ग्रंथाच्या मैदानावर असा बॅटस्मन ओपनर म्हणून उतरविला आहे की, ज्यांच्या नावावर असंख्य विक्रम कोरलेले आहेत. पहाडाची छाती आणि कल्पकतेचे विशाल हृदय घेऊन जन्मलेले आचार्य अत्रे म्हणजे मराठी साहित्यशारदेला पडलेले सुखद स्वप्नच. जिवंतपणी आचार्य अत्रे यांच्यासाठी जे करू शकली नाही ते त्यांच्या लेकीने अर्थात शिरीषताई पै यांनी ‘वडिलांच्या सेवेशी’ हा ग्रंथ लिहून अपराधीपणाच्या भावनेतून काहीसे मोकळे होण्याचा मार्ग शोधला आहे. या ग्रंथात अत्रे यांचा सहवास आणि त्यांच्या संदर्भातील कटू-गोड आठवणींना त्यांच्या गुण-दोषासकट मोकळेपणाने उजाळा दिला आहे. यात अत्रे यांची ध्येयनिष्ठा, कुटुंबवत्सलता, त्यांचे प्रेम, त्यांचा राग, त्यांचे श्‍वानप्रेम, त्यांचा भव्यतेचा ध्यास, ‘मराठा’च्या माध्यमातून आलेले आर्थिक अरिष्ट, संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील त्यांचे नेतृत्व, पती व्यंकटेश पै यांचे जगणे-वागणे, मातेबद्दलच्या कृतज्ञतेच्या आठवणी तर यात आहेतच; शिवाय ‘लिहिले पाहिजे, जे लिहितो त्याहून सुंदर लिहिता आलं पाहिजे’ तसेच ‘पहाडाशी टक्कर देताना पहाड फुटला पाहिजे, डोके फुटता कामा नये’ अशा शब्दात आचार्य अत्रे यांनी दिलेली एक निकोप दृष्टी व खंबीर बाणा शिरीषताईंना अधिक प्रिय वाटायचा. अत्रे आणि त्यांच्या परिवाराचा हा पारदर्शक पट त्यांच्या कुटुंबातीलच सदस्याने उलगडून दाखविल्यामुळे या ग्रंथाला सत्याची झळाळी प्राप्त झालेली आहे. 
हास्यचित्रांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकीक मिळविणार्‍या शि. द. फडणीस यांचे ‘मी आणि हसरी गॅलरी’ च्या माध्यमातून त्यांची पत्नी प्रसिद्ध विनोदी लेखिका शकुंतला फडणीस यांनी आपल्या लाडक्या पतीचे चित्रचरित्रच रेखाटले आहे. यात शिदंचं बालपण आहे, मुंबईतील जे. जे. तील दिवस, सासूबाईंचे भावलेले पदर, शकुंतलाबाईंचे बालपण, त्यांच्या लीना आणि रूपा या दोन्ही लेकी, शिदंचा चित्रप्रवास मराठीतील सकस लेखिका म्हणून परिचित असलेल्या शकुंतलाबाईंनी कधी गंभीर तर कधी नर्मविनोदी अंगाने मांडला आहे. लेखनाऐवजी घर सांभाळण्यात आणि पतीच्या आरोग्याची चिंता वाहायला प्राधान्य देणार्‍या आदर्श धर्मपत्नीचे रूप या पुस्तकाच्या माध्यमातून समोर येते, तेव्हा शकुंतलाबाईंची छबी वाचकांच्या मनात आदराने अधिक गडद झाल्यावाचून राहत नाही.
छत्रपती संभाजीराजांची कैद ते त्यांचा शिरच्छेद या 39 दिवसांचे अत्यंत यातनादायी चित्र ‘मी मृत्युंजय, मी संभाजी’ या केवळ सव्वाशे पृष्ठांच्या कादंबरीमध्ये प्रभावीपणे साकारून इतिहास संशोधक आणि व्यासंगी लेखक संजय सोनवणी यांनी इतिहास जिवंत आणि धगधगता ठेवण्याचे मोठे ऐतिहासिक कार्य केले आहे.  प्रवाही, संवादी आणि ओघवत्या शैलीतील ही कादंबरी वाचली की कोणाही मराठी माणसाचे रक्त खवळल्याशिवाय राहणार नाही. आत्मनिवेदनात्मक शैलीमुळे या कादंबरीचा प्रभाव पडतो आणि एकूणच शोकांतिका वाचकांसमोर घडत असल्याचा प्रत्यय येतो, हेच या कादंबरीच्या यशाचे गमक आहे.
सागर कळसाईत नावाच्या आणि मोजून पंचविशीतल्या युवकाने ‘कॉलेज गेट नाण्याची तिसरी बाजू’ या बहुचर्चित कादंबरीच्या यशानतंर त्याच धाटणीची ‘लायब्ररी फ्रेंड’ ही महाविद्यालयीन युवकांच्या भावविश्‍वाशी एकरूप होणारी कादंबरी साकारून साहित्याच्या प्रांतात दुसरे दमदार पाऊल टाकले आहे. मैत्री आणि प्रेमात गुंतलेल्या प्रेमवीरांना खिळवून ठेवण्याचे काम ‘कॉलेज गेट’ने केले आहे. सरळ-साध्या, ओघवत्या आणि प्रवाही संवादभाषेच्या कोंदणामुळे आजच्या तरूणांच्या भाव-भावनांचे प्रतिबिंबच त्यात उमटल्याचे जाणवते.
पत्रकार राजू परूळेकर यांनी ई टिव्हीवरील ‘संवाद’ कार्यक्रमांतर्गत विविध क्षेत्रातील मान्यवरांना बोलते केल्याने सांस्कृतिकदृष्ट्या एक वाङमयीन खजिनाच त्यांना गवसला आहे.  त्याचेच पुस्तक रूप म्हणजे ‘ते आणि मी’! समाजातील आयडॉल असलेल्या त्या महनीय व्यक्तींपैकी ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर, ‘लहानपणापासून मला स्वातंत्र्याची तहान आहे’ असे सांगणार्‍या व शेतकर्‍यांचे पंचप्राण म्हणून उभ्या महाराष्ट्राला परिचित असलेले शरद जोशी, भामरागड येथील आदिवासींसाठी आख्खं आयुष्य समर्पित करणारे पद्मश्री डॉ. प्रकाश व डॉ. मंदा आमटे नावाची ही देवमाणसे, आचार्य विनोबा भावे आणि महात्मा गांधींच्या संस्कारात वाढल्यामुळे धारणीपासून चाळीस किलोमीटर पर्यंतचे अंतर चालत जाऊन बैरागडवासियांची सेवा करण्यासाठी तेथेच मुक्काम ठोकणारे डॉ. रवींद्र कोल्हे, सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक गिरीश कर्नाड, प्रसिद्ध कथालेखिका सानिया अशा उत्तुंग व्यक्तिमत्त्वांच्या मुलाखती समाजाला प्रेरणादायी ठराव्यात अशाच आहेत.
यासह मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांची ‘ऐसी कळवळ्याची जाती’ ही व्यक्तीचित्रे, विनोद श्रा. पंचभाई यांचे मोठा आशय सांगणारे ‘थोडं मनातलं’ हा लेखसंग्रह, संजय वाघ यांचे जित्याजागत्या आदर्शांचे मनोरे उभारणारे ‘गंध माणसांचा’ हे व्यक्तीचित्रण, स्वर्गारोहिणीची ऐतिहासिक, भौगोलिक व पौराणिक माहिती देणारे प्रा. क्षितिज पाटुकले यांचे ‘स्वर्गारोहिणी’हे माहितीपर पुस्तक, नव्वदीनंतर मराठी पुस्तक लेखनाची प्रेरणा घेणार्‍या दुर्गानंद गायतोंडे यांची लेखनगाथा,  प्रसिद्ध सिनेसमीक्षक श्रीपाद ब्रह्मे यांचे ‘फर्स्ट डे, फर्स्ट शो’ हा चित्रपट परीक्षणांचा संग्रह, सच्च्या मैत्रीबद्दल कृतज्ञताभाव व्यक्त करणारे उत्तम कांबळे यांचे ‘काळजातले आर. आर. आबा’,समीर नेर्लेकर यांचा ‘एमरल्ड ग्रीन आणि इतर कथा’ नावाचा कथासंग्रह, शरद पवार यांच्या राजकीय पटाची दखल घेणारे स्वामी विजयकुमार यांचे ‘कर्णधार’, महाविद्यालयीन जीवनातील वृत्ती-प्रवृत्तींचा चिकित्सक उलगडा करणारी सागर कळसाईत यांची ‘लायब्ररी फे्रंड’, दत्ता वायचळ यांचा‘गजरा’ कथासंग्रह, ज्येष्ठ बालसाहित्यिक सुभाष कुदळे यांच्या ‘नवलकथा’ तसेच ज्येष्ठ कवी म. भा. चव्हाण यांचा ‘धर्मशाळा’, ‘चपराक’च्या ज्येष्ठ उपसंपादिका व कवयित्री चंद्रलेखा बेलसरे यांच्या ‘आईपणाच्या कविता’, रमेश जाधव यांचा ‘नाते मनाशी मनाचे’, प्रा. बी. एन. चौधरी यांचा ‘बंधमुक्त’या काव्यसंग्रहांचीही या ग्रंथात उचित आणि आशादायी शब्दात दखल घेतली आहे.
या ‘अक्षर ऐवज’च्या माध्यमातून मराठी साहित्यविश्‍वात ‘दखलपात्र’ अशी भर पडली आहे. हा ऐवज साहित्यरसिकांसाठी आणि साहित्याक्षरे गिरवू पाहू इच्छिणार्‍यांसाठी एका वाटाड्याची भूमिका जरूर पार पाडेल, असा विश्‍वास वाटतो. यानिमित्ताने घनश्याम पाटील यांना साहित्यक्षेत्रातील उज्ज्वल भविष्यासाठी सुयश चिंततो.
                                                                                            

 - संजय वाघ
99229 04072

2 comments:

  1. खूपच प्रभावी व विवेचनात्मक प्रस्तावना!

    ReplyDelete