Saturday, January 14, 2017

बदलापूर आणि सोलापूर

सध्या थंडीचे दिवस आहेत. या गारव्यात वैचारिक ऊब देण्याचे काम साहित्य संमेलने करतात. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे वारे वाहू लागताच राज्यभर अनेक छोटीमोठी साहित्य संमेलने धडाक्यात पार पडतात. विविध ठिकाणी होणारी आणि विविध विचारधारांचा जागर घालणारी ही संमेलने आपल्या सांस्कृतिक समृद्धीत मोलाची भर घालतात. त्यामुळे या सगळ्या  संमेलनांचे महत्त्व मोठे आहे.
गेल्या 25 आणि 26 डिसेंबर रोजी बदलापूर येथे विचारयात्रा साहित्य संमेलन झाले. ‘संमेलनपूर्व संमेलन’ अशी जाहिरात आयोजकांनी केली होती. महाराष्ट्र साहित्य परिषदेची कुळगाव-बदलापूर शाखा, आगरी युथ फोरम - डोंबिवली (यंदाच्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे आयोजक), सुहृद एक कलांगण - बदलापूर आणि ग्रंथसखा वाचनालय यांनी एकत्र येऊन हे संमेलन भरवले होते. नियोजित संमेलनाध्यक्ष अक्षयकुमार काळे हेच याही संमेलनासाठी अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.
श्याम जोशी हे ग्रंथालय चळवळीतील एक मोठे नाव. नुकतेच महाराष्ट्र शासनाने त्यांना ग्रंथालय चळवळीच्या माध्यमातून मराठी वाचनसंस्कृती रूजवण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल कवीवर्य मंगेश पाडगावकर यांच्या नावे दिला जाणारा ‘भाषा संवर्धक’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर केला आहे. बदलापूर येथे ते ‘ग्रंथसखा’ हे अतिशय नेटके आणि समृद्ध ग्रंथालय चालवतात. ‘दुर्मीळ ग्रंथसंग्रहक’ अशी त्यांची ओळख आहे. तर या श्याम जोशी यांच्या प्रयत्नातून हे संमेलन पार पडले.
विचारयात्रा साहित्य संमेलनात पहिल्या दिवशी उद्घाटन सोहळा झाल्यानंतर निमंत्रितांचे कवीसंमेलन झाले. अशोक नायगावकर, प्रदीप निफाडकर, दामोदर मोरे, राजीव जोशी, मंदाकिनी पाटील, वैजनाथ जोशी, अनुपमा बेहेरे, विश्‍वास जोशी यांनी ही मैफल रंगवली. सुप्रसिद्ध कवी अरूण म्हात्रे यांनी सूत्रसंचालन केले. त्यानंतर साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांची मुलाखत झाली. याठिकाणी ‘सदानंद मोरे ग्रंथ महोत्सव’ भरवला होता. मात्र त्यात कोणीही सहभागी झाले नाही. मोरेंच्या नावे ग्रंथमहोत्सव भरवल्याची कुत्सित चर्चा मात्र सुरू होती. रात्री ‘प्रतिबिंब’ हा नृत्य, नाट्य आणि कवितांचा कोलाज असलेला कार्यक्रम झाला.
दुसर्‍या दिवशी पहिला परिसंवाद होता, ‘अश्‍लिलता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ या विषयावर. अनंत देशमुख यांचे अत्यंत अभ्यासपूर्ण बीजभाषण झाले. यात मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, ज्येष्ठ पत्रकार शशिकांत सावंत आणि ‘चिन्ह’ या नियतकालिकाचे संपादक सतीश नाईक सहभागी झाले होते. सावंतांनी त्यांचे लैंगिक विषयावरील वाचनाचे आणि लेखनाचे अनुभव सांगितले. सतीश नाईक यांनी मात्र स्वअनुभव सांगताना अत्यंत पाल्हाळीक आणि रटाळ माहिती दिली. प्रत्येकाला वीस मिनिटे दिलेली असताना त्यांनी पहिली वीस मिनिटे ‘सनातन’च्या साधकांनी त्यांना कसा त्रास दिला, ते दिसायचे कसे, बोलायचे कसे, वागायचे कसे, अंक चालवताना दडपण कसे येते यावरच घालवली. त्यांची चाळीस मिनिटे झाल्यावर नाईलाजाने संयोजकांनी त्यांना चिठ्ठी पाठवली. ती त्यांच्याकडे देत असताना त्यात काय लिहिलेय हेही न पाहता त्यांनी ‘माझे भाषण थांबविल्याचा निषेध आणि यावर मी आता कसे लिहितो ते पहाच’ असे म्हणत सभागृह सोडले. त्यांनी सभा संकेताचा भंग करत व्यासपीठ सोडल्यावर प्रा. मिलिंद जोशी यांनी मात्र त्यांच्या नेहमीच्या खुसखुशीत शैलीत वेळ निभावून नेली. त्यांच्या समारोपाच्या भाषणाने रसिक तृप्त झाले.
पुढच्या सत्रात ‘कथा कशी समजून घ्यावी’ या विषयावर संजय भास्कर जोशी यांनी व्याख्यान दिले. निलिमा बोरवणकर यांची आवेशपूर्ण कथा झाली. प्रतिमा इंगोले यांनी वैदर्भिय भाषेत कथाकथन केले मात्र ते रसिकांच्या डोक्यावरून गेले. संध्याकाळचा ‘साहित्य संमेलनाने नेमके काय साधते?’ या विषयावरील परिसंवाद मात्र उत्तम झाला. विनय हर्डीकर, महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालिका मंजुषा कुलकर्णी, सदानंद मोरे, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी आणि मिलिंद जोशी यांनी हा परिसंवाद रंगवला.
या परिसंवादाला आणि एकूणच साहित्य संमेलनाला जेमतेम शंभरएक लोक उपस्थित होते. श्रीकांत जोशी, श्याम जोशी, रवींद्र गुर्जर या सर्वांनी संमेलन यशस्वी करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र उपस्थिती आणि काही अपवाद वगळता कार्यक्रमांचा दर्जा अत्यंत सुमार होता. मान्यवर लेखक, त्यांचा पाहुणचार, बडेजाव, भोजन आणि निवासाची उत्तम व्यवस्था असे साहित्यबाह्य विषय दखलपात्र होते; मात्र लाखो रूपये खर्च करूनही या संमेलनाचे फलित काय, हा मात्र चिंतेचा आणि चिंतनाचा विषय आहे.
सोलापूरच्या संमेलनाची परिस्थिती याउलट होती. हे पहिलेच आदिवासी धनगर साहित्य संमेलन! मात्र यात नवखेपणाच्या खुणा कुठेही दिसत नव्हत्या. भंडारा उधळून या संमेलनाचे अनोख्या पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. सुप्रसिद्ध साहित्यिक आणि संशोधक संजय सोनवणी हे संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते. सोलापूरातील हुतात्मा स्मारक मंदिर रसिकांनी खचाखच भरले होते. बाहेर पडद्यावर लोक कार्यक्रम पाहत होते. पुस्तकांची विक्री तडाख्यात होती. ‘आपले संमेलन‘ म्हणून सर्वजण आत्मियतेने सहभागी होते. संजय सोनवणी यांच्यासारखा अभ्यासू संमेलनाध्यक्ष, डॉ. अभिमन्यू टकले यांच्यासारखे आयोजक, अमोल पांढरे यांच्यासारखे तळमळीने अहोरात्र कार्यरत असलेले कार्यकर्ते या सर्वांचे साध्य म्हणजे हे अभूतपूर्व आणि पूर्ण यशस्वी संमेलन. धनगर आणि आदिवासींच्या नावे होणार्‍या या संमेलनाला किती लोक गोळा होणार अशी सर्वांनाच चिंता होती! मात्र सर्वांचेच अंदाज साफ खोटे ठरले आणि सभागृह खचाखच भरले. समाजबांधवांची बौद्धिक भूक भागविणारा हा कार्यक्रम ठरला.
या संमेलनात आदिवासी धनगरांचे गजनृत्य आणि ओव्यांचे सादरीकरण झाले. आदिवासी धनगर पुरातनाचे एक वास्तव, आदिवासी धनगरांच्या महिलांसमोरील समस्या आणि नवयुगातील आव्हाने, आदिवासी धनगर समाजाचा इतिहास, माध्यमातील धनगर समाजाचे चित्रण, मराठी साहित्यात धनगर समाज दुर्लक्षित का?, धनगर समाजाच्या उज्ज्वल भवितव्याचा राजमार्ग, धनगर आरक्षण लढाई अशा अभ्यासपूर्ण विषयांवर परिसंवाद झाले. अत्यंत नेटके नियोजन, शिस्तबद्धता, एका जातीच्या अस्मितेला उजाळा, पंढरपूरच्या पांडुरंगापासून ते सातवाहन, महाराजा छत्रपती यशवंतराव होळकर, पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर,  स्वातंत्र्यसेनानी भीमाबाई होळकर अशा सर्वांच्या आदर्शवादी तत्त्वांचा जागर घालण्यात आला.
मुख्य म्हणजे सध्या जातीय अस्मिता टोकदार बनत चाललेल्या असताना यात सर्व जातीचे लोक वक्ते म्हणून आणि रसिक म्हणून सहभागी होते. इतर जातींविषयी कोणीही द्वेष व्यक्त केला नाही. आपले बांधव एकत्र येऊन या बिकट परिस्थितीतून कसे मार्ग काढू शकतील याविषयी सर्वजण तळमळीने बोलत होते. या साहित्य संमेलनात धनगर इतिहास परिषद आणि धनगर साहित्य परिषद सुरू करण्याचा ऐतिहासिक संकल्प करण्यात आला. त्यादृष्टिने सर्वांनी जोरदार तयारीही सुरू केली. प्रस्थापितांविरूद्ध रडत बसण्याऐवजी स्वाभिमानाने पुढाकार घेत एक नवा इतिहास निर्माण करण्याचे हे धाडस हेच या संमेलनाचे मोठे फलित आहे. प्रस्थापित संमेलने मानपानात आणि रिकामटेकड्या डामडौलात अडकलेले असताना एक उपेक्षित वर्ग पुढे येऊन त्यांच्या जाज्ज्वल्य इतिहासाचे स्मरण करत असेल, त्यातून नव्या पिढीपुढे आदर्शांचे मनोरे उभे करत असेल तर हे निश्‍चितच अभिमानास्पद आणि कौतुकास्पद आहे. संजय सोनवणी, डॉ. टकले, जयसिंगतात्या शेंडगे, छगनशेठ पाटील, अमोल पांढरे या सर्वांच्या प्रयत्नांना आलेले हे मधुर फळ आहे.
मुळात आपण सर्वजणच पशुपालक. पूर्वी शिकारीवर आपली उपजिविका चालायची. त्यानंतर मनुष्य पशुपालन करू लागला आणि त्यातून शेतीचा शोध लागला. याच शोधातून वेगवेगळे उद्योग निर्माण झाले आणि या उद्योगातून जातींचा जन्म झाला. या जातीपातीत आपण इतके अडकलोय की, आपल्या अस्मिताच बोथट झाल्यात. जे मूळ आदिवासी आहेत त्यांनाच दुर्दैवाने आपण कमी लेखू लागलोय. त्यामुळे या संमेलनाची नितांत गरज होती. ती गरज पहिल्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनाने पूर्ण केली आहे.
बदलापूर आणि सोलापूर या दोन्ही साहित्य संमेलनात हाच तर फरक होता! मात्र काहीही असले तरी अशी संमेलने आपली भाषा, साहित्य, संस्कृती जिवंत ठेवण्यात मोठा हातभार लावत असल्याने त्यांचे स्वागतच करायला हवे. आदिवासी - धनगरांनी यादृष्टिने एक पाऊल पुढे टाकून महाराष्ट्राचा सांस्कृतिक परिघ तिकडे सरकल्याचे सिद्ध केले आहे. ‘उपेक्षित ते अपेक्षित’ या न्यायाने ही संमेलनेच समाजाचे वैचारिक भरणपोषण करू शकतील.
 - घनश्याम पाटील, पुणे
7057292092

1 comment:

  1. या लेखामुळे दोन्ही संम्मेलनाची सैर घडवून आणली. खुप छान तुलना केली आहे.

    ReplyDelete