Sunday, January 29, 2017

झंझावाती चपराक

साहित्य व पत्रकारितेचे क्षेत्र विलक्षण आहे. प्रगल्भ व विचारी माणूस घडवण्यात जर सर्वात जास्त हातभार लागत असेल तर तो साहित्यातून होणार्‍या जीवनदर्शनाने आणि तटस्थ पत्रकारितेतून होणार्‍या समाजदर्शनाने. यातून भाषाही समृद्ध होत जाते हे वेगळेच! छपाईची आधुनिक कला भारतात आली तेव्हापासून विविध रुपांनी साहित्य-पत्रकारिता फोफावत आहे; पण मराठीच्या बाबतीत ती बहरत आहे असे चित्र क्वचित दिसते. आपले साहित्य हे प्रस्थापितांच्या अथवा त्यांच्या कंपुतील मांदियाळीत अडकले आहे; तर पत्रकारिता ‘शुद्ध’ आहे असा आरोप खुद्द पत्रकारही करणार नाहीत, असे दुर्दैवी वास्तव आहे. अशा स्थितीत मराठवाड्यातून एक मिसरुडही न फुटलेला घनश्याम पाटील नावाचा, कसलीही पूर्वपिठिका नसलेला तरुण पुण्यात येतो, एका वर्तमानपत्रात नोकरी मिळवतो आणि काही वर्षात स्वत:चे साप्ताहिक, मासिक आणि चक्क ग्रंथ प्रकाशनाचीही यशस्वी मुहूर्तमेढ रोवतो हा चमत्कार तर खराच; पण खरा चमत्कार आहे तो पत्रकारितेत आज दुर्मीळ झालेली अत्रे, शि. म. परांजपे, खाडीलकर आदींची परखड, तटस्थ शैली आणि समाजाप्रत असलेली तळमळ आणि तरीही भविष्याचा ध्यास व स्वप्नाळूपणा याचा वेधक संगम घनश्याम पाटील यांच्यात आहे हे सुरुवातीलाच नमूद करताना मला आनंद वाटतोय.
मराठी साहित्याचा वाचकवर्ग कमी झालाय हे त्यांना मान्य नाही, हे ते कृतीतूनच सिद्ध करुन देतात. दरवर्षी ‘चपराक साहित्य महोत्सव’ भरवणारे व त्यात 15-20 नव्या-जुन्या साहित्यिक/कवींची पुस्तके आनंद सोहोळ्यात प्रकाशित करणारे सध्या ते एकमेव प्रकाशक असावेत. तरुणाईची स्पंदने टिपणारे सागर कळसाईतसारखे नवप्रतिभाशाली लेखक असोत की निलेश सूर्यवंशींसारखे एकदम नवीन... इतर अनेक प्रकाशकांनी चक्क नाकारलेले नवप्रतिभावंत असोत, पाटील यांनी व्यावसायिक गणिते न मांडता त्यांची पुस्तके प्रकाशित केलीत. सध्या कवितांच्या प्रकाशनाला वाईट दिवस आलेत असे म्हटले जाते... कारण म्हणे कविता आणि त्याही विकत घेऊन कोण वाचणार? पण हाही कुतर्क घनश्याम पाटील यांनी खोटा ठरवत झपाट्याने कवितासंग्रह प्रसिद्ध केलेत. खरे म्हणजे ‘चपराक’ हे नवकवी/साहित्यिकांचे एक रम्य साहित्यकेंद्र बनले आहे ही बाब मराठी साहित्य विश्‍वासाठी एक दिलासादायक बाब आहे. प्रकाशकाला अनंत अडचणींचा, लेखकांच्या विक्षिप्तपणाचा सामना करावा लागतो हे मला माहीत आहे; पण पाटलांनी आपल्या स्थिरचित्ताने या स्थिती हाताळल्याचे मी पाहिले आहे.
मराठीवरची खरी माया हे यामागील एक कारण असावे. घुमान येथील साहित्य संमेलनावर इतर सर्व प्रकाशकांनी बहिष्कार घातलेला असताना, ‘आफ्रिकेच्या जंगलात जरी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले तरी तिथे आम्ही जाणार आणि ‘चपराक’चे ग्रंथदालन उभारणार’ असे जाहीरपणे सांगणारे घनश्याम पाटीलच होते. गेल्या वर्षी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष काहीतरी बरळले तर त्यांचाही समाचार घ्यायला त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. खरे तर हे अध्यक्ष त्यांना ‘मानसपुत्र’ मानायचे; पण पाटलांनी साहित्य निष्ठेसमोर त्यांचीही पत्रास ठेवली नाही. ते एकीकडे प्रकाशक जरुर आहेत पण ते त्याचवेळेस पत्रकारही आहेत, याचे भान त्यांच्या कृती व वक्तव्यात असते हे मी जवळून पाहिले आहे. खरे तर मी माणुसघाण्या माणूस... पण हातावरच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच मित्रांशी मी नित्य संपर्कात असतो व आवर्जून भेटतो... त्यात घनश्याम पाटील आहेत. उत्साहाचा, स्वप्नांचा नि स्वप्नपूर्तीसाठी अखंड खळाळणारा हा झरा आहे. मैत्रीची सीमा कोठे सरते आणि पत्रकारितेची सजग वाट कोठे सुरु होते हे त्यांना चांगले समजते. त्यामुळे मित्रांवरही लेखणीचा आसूड उगारायला त्यांनी कधी मागेपुढे पाहिलेले नाही.
साप्ताहिक ‘चपराक‘ हे सर्व क्षेत्रातील ताज्या घडामोडींचा वेध घेते; पण त्याची शोभा पाटलांचे अग्रलेख वाढवतात. त्यांच्या अग्रलेखांची पुस्तके झाली, आवृत्त्याही निघाल्या. मला वाटते, हे त्यांचे संपादकीय यश नसून त्यांच्यातील सत्यनिष्ठा व सर्जनशील टीकाकाराच्या वृत्तीचे हे यश आहे.
‘साहित्य चपराक’ हे मासिक नावाप्रमाणेच साहित्य-समाजजीवनाशी निगडित लेखन प्रसिद्ध करते. मला भावणारी बाब अशी की पाटलांची व्यक्तिगत विचारधारा कोणतीही असो, तिच्याशी प्रामाणिक राहत असतानाही अन्य विचारधारांच्या साहित्याला त्यांनी कधी त्याज्य मानत डावलले नाही. ‘चपराक’च्या प्रकाशनांचे ते वैशिष्ट्यच आहे. खरे तर माझे काही लेखन त्यांनी प्रकाशित करावे हे इतरांना एक आश्‍चर्यच वाटते कारण आमच्या विचारधारा या तशा विरोधी व संघर्षाच्या आहेत! पण हे वैचारिक मतभेद ना प्रकाशनात आडवे आले ना मैत्रीत! मी आयुष्यात असंख्य ढोंगी, दुटप्पी आणि भाट साहित्यिक/प्रकाशकांच्या अनुभवातून गेलो आहे. त्याचा खेद नाही. उलट त्यांच्या पार्श्‍वभूमिवर घनश्याम पाटील हा मराठी साहित्य व विचारविश्‍वात एक आशादायी किरण वाटतो.
‘चपराक’ हे अजून खुपच तरुण प्रकाशन आहे. त्यात तारुण्याचा असतो तसा झंझावात आहे. अलंघ्य क्षितिजे लांघायची उमेद आहे. किमान एक लाख पंचवार्षिक सदस्य बनवायचे स्वप्न आहे; तसेच नवनवे साहित्य मिळवून प्रकाशित करत रहायचे व्रत आहे. मराठी साहित्यात जे आजकाल नेहमी मरगळलेले, निराशाजनक बोलण्याचे वातावरण असते त्यात ही एक सुखद, दिलासादायक झुळूक आहे. ही झुळूक वादळवार्‍यात बदलत या सर्वच मळभाला हटवेल ही आशा आहे.

- संजय सोनवणी
सुप्रसिद्ध साहित्यिक आणि संशोधक
9860991205


Saturday, January 28, 2017

पद्मविभूषण शरद पवार!

देशपातळीवर महाराष्ट्राचा आवाज बुलंद करणारा लोकनेता अशी ज्यांची  ख्याती आहे ते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना अलीकडेच पद्मविभूषण जाहीर झाला, याचा आनंद राज्यातील प्रत्येक मराठी माणसाला झाला आहे.
देशातील बलाढ्य नेत्यांपैकी एक असलेल्या पवारांचे कर्तृत्व आणि त्यांचा दबदबा सर्वश्रूत आहे. आपले दुर्दैव हे की, या लोकनेत्याच्या कार्यकर्तृत्वाची म्हणावी तशी दखल आपण घेतली नाही. असा नेता जर कोणत्याही पाश्‍चात्य राष्ट्रात असता तर जागतिक राजकारणातले ते एक महत्त्वाचे नाव असते. तब्बल 45 वर्षे अव्याहतपणे कार्यरत असलेल्या आणि ‘जाणता राजा’ अशी बिरूदावली सार्थ ठरविणार्‍या शरदराव पवार यांच्याविषयी एव्हाना शे-पाचशे पुस्तके तरी यायला हवी होती; मात्र वर्तमानाचे तर्कसुसंगत वर्णन करत, त्यांच्या आयुष्याचा पट उलगडून दाखवत, तटस्थपणे लेखन करण्याचे कार्य आपले लेखक आणि साहित्यातील संशोधक करत नाहीत.
10 जून 1999 ला त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना केली. अटलबिहारी वाजपेयी असोत की, नरेंद्र मोदी! हे सारे नेते ‘बारामती पॅटर्न’चे कौतुक करत पवारांचे गोडवे गातात; मात्र वेळोवेळी पाय खेचण्याच्या वृत्तीने महाराष्ट्राने या अफाट क्षमतेच्या नेत्यावर अन्यायच केला आहे.
काही दिवसापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मी पवारांचे बोट धरूनच राजकारणात आलोय’ असे जाहीर सभेत सांगितले होते. आता शरद पवार यांना ‘पद्मविभूषण’ मिळाल्याने मराठी अस्मितेचा गौरवच झाला आहे. त्यांच्यावर असंख्य आरोप झाले. आरोप करणारे त्यामुळे मोठे झाले; मात्र पवार साहेब कधी डगमगले नाहीत. अत्यंत दूरदृष्टीने त्यांनी सतत कार्यरत राहून इतिहास निर्माण केला आहे.
‘पद्मविभूषण’ जाहीर झाल्यानंतर त्यांनी ‘हा सामुहिक कष्टाचा सन्मान’ असल्याचे सांगत स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची आणि आईची आठवण जागवली. ‘माझ्या घरात पद्म पुरस्कार मिळवणारा मी तिसरा आहे. एका आईच्या तीन मुलांना हा पुरस्कार मिळणे ही अभिमानाची बाब आहे. माझे बंधू अप्पासाहेब पवार आणि प्रतापराव पवार यांना यापूर्वी पद्मश्रीने गौरविण्यात आले. आता मला पद्मविभूषण पुरस्कार मिळाल्याने आई संतुष्ट झाली असती’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली. जगाच्या राजकारणावर लक्ष ठेवून असलेल्या या महानेत्याची कुटुंबवत्सलताच यातून दिसून येते.
शरद पवार यांच्यावर आजवर अनेक आरोप झाले. राज्यात आणि देशात कोणताही मोठा घोटाळा झाला, कोणताही मोठा प्रकल्प आला की त्यासोबत त्यांचे नाव जोडले जायचे. ‘पवारांवर टीका केली की आपल्याला मोठे होता येते’ हे अनेकांना उमगले होते. त्यामुळेच त्यांच्यावर अनेकांनी वाटेल तसे तोंडसुख घेतले. ‘या सर्व आरोपांचा तुम्हाला त्रास होत नाही का?’ असे विचारले असता त्यांनी मजेशीर उत्तर दिले होते. ते म्हणाले, ‘‘जोपर्यंत लोक म्हणणार नाहीत की, किल्लारीचा भूकंप तुमच्यामुळे झालाय तोपर्यंत मला चिंता करण्याचे काही कारण नाही.’’
शरद पवार यांचे महाराष्ट्राच्या राजकारणातील योगदान कोणीही नाकारणार नाही. सर्व विषयांचा अभ्यास असलेला आणि तळागाळातील लोकांशी संपर्क असलेला असा दुसरा नेता दिसणार नाही. पत्रकार या नात्याने त्यांना जवळून ऐकता आले. त्यांच्यावर आम्ही अनेक विशेषांक केले. आम्ही प्रकाशित केलेल्या ‘शिवप्रताप’ या ऐतिहासिक कादंबरीचे प्रकाशनही त्यांच्या हस्ते झाले. या नेत्याची जादू सांगण्यासाठी ‘शिवप्रताप’च्या प्रकाशनाचा एक किस्सा आवर्जून सांगावासा वाटतो.
‘शिवप्रताप’ ही ‘चपराक’ने प्रकाशित केलेली पहिली कादंबरी. एका दैनिकाने या कादंबरीची प्रकाशनपूर्व माहिती दिली. त्यातील रामदास स्वामींचा उल्लेख वाचून काही संघटनांनी ‘ही कादंबरी प्रकाशित करू देणार नाही’ अशी आक्रमक भूमिका घेतली. त्यावरून आम्हाला धमक्याही आल्या. लेखक उमेश सणस यांची ही पहिलीच कलाकृती आणि प्रकाशक म्हणून आमचीही ही पहिलीच कादंबरी. ‘काय करावे?’ हा प्रश्‍न असतानाच आम्हाला पवार साहेबांची आठवण झाली. आम्ही सर्वजण त्यांना भेटलो आणि या कादंबरीचे त्यांच्या हस्ते प्रकाशन करण्याची इच्छा बोलून दाखवली. ‘छत्रपती शिवाजीराजांवर अनेक पुस्तके असताना तुम्ही यात काय मांडलेय?’ असा सवाल त्यांनी केला. ‘शिवाजीराजे आणि अफजलखान यांच्या भेटीवर आणि प्रतापगडाच्या पराक्रमावर ही शिवदिग्वीजयाची रोमांचकारी कलाकृती आहे’ असे सांगताच त्यांनी ती ठेऊन घेतली आणि ‘कळवतो’ असे सांगितले. दुसर्‍याच दिवशी त्यांनी निरोप दिला की, ‘‘साधेपणाने कार्यक्रम घ्या. बारामती हॉस्टेलच्या सभागृहातही याचे प्रकाशन होऊ शकेल.’’ मग 1 एप्रिल 2006 रोजी त्यांच्या हस्ते ‘शिवप्रताप’चे प्रकाशन झाले आणि ही कादंबरी तुफानी गेली. मराठी साहित्यात या कादंबरीने अनेक विक्रम निर्माण केले. या कादंबरीला विरोध करणारे नंतर कुठे गेले हे अजूनही आम्हाला कळले नाही. त्यांच्या नावाचा असा दबदबा आहे.
शरद पवार यांचे मित्र धनाजीराव जाधव यांनी त्यांच्याबाबतच्या काही आठवणी आम्हाला सांगितल्या. ते म्हणाले, ‘‘त्यावेळी शरदची परिस्थिती खूपच नाजूक होती. पुण्यात शुक्रवार पेठेत ही सारी भावंडे एका छोट्या खोलीत रहायची. आमचा मित्र विठ्ठल मणियार याने आग्रह धरला की आपण मुंबई बघायला जाऊ. त्यापूर्वी शरदसह आम्ही कोणीही मुंबई बघितली नव्हती. सर्वजण तयार असताना शरद एकटाच सोबत येत नव्हता. त्याची आर्थिक अडचण होती हे कळल्यावर विठ्ठलने सांगितले की, मी माझ्याकडून सगळ्यांना घेऊन जातोय. मग खूप आग्रह केल्यावर तो तयार झाला पण त्याने तीन अटी घातल्या. ‘तुम्ही मला मुंबईचे विमानतळ, मुंबईचा समुद्र आणि मुंबईचे मंत्रालय दाखवणार असाल तरच मी सोबत येतो.’ विमानतळ आणि समुद्र या गोष्टी आम्हाला सहज शक्य होत्या. मंत्रालयाचे काय करायचे म्हणून विठ्ठलने त्याच्या वडिलांना सांगितले. मुलांना मंत्रालय बघावेसे वाटते म्हणून तेही खुश झाले. त्यांनी दारवटकर जगताप नावाच्या एका आमदारकडून मंत्रालयाच्या प्रेक्षक गॅलरीचे पास मिळवले. आम्ही विमानतळावर गेलो, समुद्र बघितला आणि मंत्रालयात गेलो. तिथे गेल्यावर आमदारांच्या कंटाळवाण्या चर्चा ऐकून आम्हालाही आळस येत होता. मग आम्ही आपापसात बोलत होतो. तिथल्या सुरक्षा रक्षकाने आम्हाला तीन-चार वेळा सांगितले की इथे बोलू नकात. आम्ही थोडावेळ शांत बसायचो आणि पुन्हा गप्पा सुरू. नंतर त्या सुरक्षा रक्षकाने सांगितले की, आता तुम्ही बोललात तर मला तुम्हाला बाहेर काढावे लागेल... ते ऐकून शरद ताडकन उठला आणि म्हणाला, ‘‘तुम्ही काय आम्हाला बाहेर काढताय? आम्हीच निघतो. आता मी या वास्तुत येणार नाही! आणि आलोच तर इथे न बसता समोर आमदारात बसून चर्चा करेन!’’  कॉलेज जीवनातील त्याची ही महत्त्वाकांक्षा पाहून आम्ही सगळेच थक्क झालो...’’
शरद पवारांनी अनेक नेते घडवले. स्थानिक स्वराज्य संस्थात महिलांना आरक्षण मिळावे यासाठी पुढाकार घेतला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा मुक्त विद्यापीठाच्या नामांतरावेळी सत्तेचीही पर्वा केली नाही. कच्छच्या भूकंपावेळी अटलजींनी त्यांना मदत आणि पुनर्वसनाच्या कामासाठी बोलवले होते. किल्लारी परिसरातील 52 गावांचे पुनर्वसन करताना त्यांनी जी तत्परता दाखवली त्याची ही फळे होती. ‘विदेशी बाई पंतप्रधानपदी नको’ म्हणून त्यांनी वेगळी चूल थाटली. महाराष्ट्राच्या, देशाच्या राजकारणात भरीव योगदान दिले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, केंद्रीय संरक्षण मंत्री, कृषी मंत्री अशा सगळ्या भूमिकांतून त्यांनी लोकहिताचे कल्याणकारी निर्णय घेतले. कबड्डीपासून किक्रेट असोसिएशनपर्यंत आणि रयत शिक्षण संस्थेपासून अनेक शिक्षणसंस्थांपर्यंत त्यांनी त्यांचा ठसा उमटवला. नाट्य परिषद असेल किंवा साहित्य संस्था असतील शरद पवार मदत करण्यात सदैव तत्त्पर असतात. अनेक कलावंतांना त्यांच्यामुळे अस्तित्व लाभलेय.
प्रत्येक प्रश्‍नाची उत्तम जाण, सामाजिक भान, सभ्य आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व, कलावंतांचा गौरव आणि संयमित भाषा यामुळे ते इतरांपेक्षा वेगळे ठरतात. आजही सकाळी सहाच्या आत आंघोळ, व्यायाम उरकून जगभरातील महत्त्वाची वृत्तपत्रे वाचत बसणारे आणि सकाळी सहा पासून रात्री बारापर्यंत लोकांच्या अडीअडचणी समजून घेणारे, त्या सोडविण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे हे दुर्मीळात दुर्मीळ नेतृत्व आहे.
भ्रष्टाचारापासून ते जातीय राजकारणापर्यंत त्यांच्यावर अनेक आरोप झाले. त्या कशालाही न जुमानता शरद पवार नावाचे हे अग्निहोत्र सतत धगधगत आहे. म्हणूनच निवडणुकीच्या काळात ‘एनसीपी म्हणजे नॅशनलिस्ट करप्ट पार्टी’ अशी टीका करणारे मोदी आज ‘त्यांचे बोट धरून राजकारण शिकलो’ असे सांगतात आणि त्यांच्याच कारकिर्दीत त्यांना ‘पद्मविभूषण’ देऊनही गौरवितात. दुर्दैवाने आपल्याकडे माणसांपेक्षा माणसांच्या राखेचा इतिहास पुजण्याचा रिवाज नवा नाही. त्यामुळेच या जबरदस्त नेत्यावर आपण अन्याय केलाय. देशाचे नेतृत्व करण्याची अफाट क्षमता असलेले शरद पवार भविष्यात किमान राष्ट्रपती व्हावेत असे अनेकांना वाटते. त्यांना ‘पद्मविभूषण’सारखा सन्मान प्राप्त झाल्याने मोदी सरकारकडूनही त्यांच्या कामगिरीवर शिक्कामोर्तब झाले आहे. ‘जाणता राजा’ अशी बिरूदावली सार्थ ठरविणार्‍या या लोकनेत्यास आमच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
- घनश्याम पाटील, पुणे
7057292092

कोंबडं झाकणार्‍या म्हातारीची गोष्ट

भाऊ तोरसेकर हे गेली पन्नासएक वर्षे मराठी पत्रकारितेत कार्यरत आहेत. आचार्य अत्रे यांच्या ‘मराठा’मधून त्यांच्या पत्रकारितेला प्रारंभ झाला. महाराष्ट्रातील एक सडेतोड व परखड राजकीय विश्‍लेषक म्हणून त्यांची ओळख आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील राजेंद्र व्होरा आणि सुहास पळशीकर या दोन ‘विद्वान’ प्राध्यापकांनी ‘महाराष्ट्रातील सत्तांतर’ हे पुस्तक लिहिले. शब्दाशब्दाला चुकीचे संदर्भ देऊन त्यांनी वाचकांची दिशाभूल केली. ‘ग्रंथाली’सारख्या बड्या प्रकाशन संस्थेने या पुस्तकाचा धंदाही उत्तम केला. केवळ शरद पवारांची तळी उचलण्यासाठी पळशीकरांसारख्या प्राध्यापकांनी या पुस्तकात जी खटपट, लटपट केली ती केविलवाणी आहे. त्यामुळेच यातील सत्य मांडण्याच्या उद्देशाने भाऊंनी अतिशय मुद्देसूदपणे, पुराव्यासह ‘महाराष्ट्रातील सत्तांतर’ची, व्होरा-पळशीकर या दांभिक  आणि ढोंगी प्राध्यापकांची आणि एकंदरीत वैचारिक भ्रष्टतेची केलेली चिकित्सा म्हणजे ‘कोंबडं झाकणार्‍या म्हातारीची गोष्ट.’ पत्रकारितेचे विद्यार्थी, राजकीय-सामाजिक कार्यकर्ते-नेते, सत्याची चाड असणारे अभ्यासक आणि ज्या कुणाला महाराष्ट्राचा खरा इतिहास जाणून घ्यायचाय त्या प्रत्येकाने भाऊंचे ‘कोंबडं झाकणार्‍या म्हातारीची गोष्ट’ हे पुस्तक वाचायलाच हवे.
‘अभिनव वाचक चळवळ’ अशी बिरूदावली मिरवणार्‍या ‘ग्रंथाली’ने साहित्यप्रेमी, ग्रंथप्रेमी वाचकांना चक्क ‘गिर्‍हाईक’ केले आहे. भाऊ लिहितात, ‘झटपट पुस्तकांचे प्रकाशन करणारे आणि वारेमाप कमाई करणारे प्रकाशक भारतात वा मराठी भाषेत कमी नाहीत; परंतु वाचकांचा विश्‍वास संपादन केल्यावर ब्रँडचा माल म्हणून त्याच्या गळ्यात भेसळीचा, दुय्यम दर्जाचा माल बांधण्याचा धंदा मराठीत बहुधा आजवर कुठल्या प्रकाशनाने केला नाही. अगदी ‘धंदा’ म्हणून प्रकाशन व्यवसाय करणार्‍या कंपन्या देखील असा फ्रॉड, भेसळीचा माल विकत असल्याचा निदान मराठीत अनुभव नाही. असे असताना केवळ ‘वाचकांचीच चळवळ’ म्हणून उदयास आलेल्या ‘ग्रंथाली’ने वडापाव, भाजीपाव, झुणका-भाकर, बर्गर, पिझ्झा स्टाईलने ग्रंथाचा धंदा करावा काय? कसदार, दर्जेदार, गुणवान, अभिरूचीपूर्ण पुस्तकांचा हवाला देऊन ‘अभिनव वाचक चळवळ‘ म्हणवून घेणार्‍या ‘ग्रंथाली’ने राज्यात सत्तांतर होताच वाचकांच्या मनातील उत्कंठा, कुतूहल, उत्सुकतेचा लाभ उठवण्यासाठीच ‘महाराष्ट्रातील सत्तांतर’ हे झटपट खपणारे पुस्तक काढून वाचकांची घोर फसवणूक करावी काय?’
सुहास पळशीकर हे ‘राजकीय अभ्यासक’ म्हणून सगळीकडे मिरवत असतात. मात्र त्यांनी त्यांच्या या पुस्तकात धादांत खोट्या, न घडलेल्या घटना बिनधास्तपणे घुसडल्या आहेत. त्यात अभ्यास, संशोधन, सत्य किंवा कारणमीमांसेचा लवलेशही नाही. यातील खोटेपणा, चुकीचे संदर्भ, घटना, बनावट गोष्टी यांची यादीच भाऊंनी तयार केली आणि ती ग्रंथालीचे प्रकाशक दिनकर गांगल यांच्याकडे दिली. ‘पुढच्या आवृत्तीत दुरूस्त करू’ असे सांगत त्यांनी वेळ मारून नेली, पण त्या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या प्रकाशित होऊनही चूक सुधारली नाही. उलट ‘तुमचेही एखादे पुस्तक प्रकाशित करू’ असे लांच्छनास्पद आमिष ग्रंथालीने दाखवले. या पुस्तकाच्या लेखकांनीही ‘या दिवसात असे स्पष्टपणे, सडतोडपणे, निर्भिडपणे एखाद्या लेखनाची चिकित्सा होणे किती दुरापास्त झाले आहे, हे आपण सर्वजण जाणतोच. म्हणून तुमचे मनःपूर्वक आभार मानणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. ज्या वैचारिक संस्कृतीचा आग्रह आपण सर्वजण धरतो आहोत, त्याचा तुमचे पत्र म्हणजे एक परिपाठच आहे, असे म्हटले तरी वावगे होणार नाही. तुमची आमची यापूर्वीच ओळख झाली असती तर किती बरे झाले असते! हे पुस्तक आम्ही तुम्हाला प्रकाशित होण्यापूर्वीच दाखवले असते. परंतु असे होणे नव्हते. असो. तुम्ही सहा पाने भरून तुम्हाला खटकणार्‍या व तुम्हाला न पटणार्‍या मुद्यांची जंत्री दिली आहे. ते पडताळून पाहणे, त्याबाबत आमचे काय म्हणणे आहे हे ठरविणे यास काही दिवस लागतील. म्हणून आम्हाला पत्र मिळाल्या मिळाल्या हे प्राथमिक उत्तर तुम्हाला पाठवित आहोत. आम्ही तुमच्या पत्राची गंभीरपूर्वक दखल घेत आहोत व लवकरच त्यास योग्य ते उत्तर आम्ही तुम्हाला पाठवू’ असे पत्र भाऊंना पाठवले.
19 ऑगस्ट 1997 ला हे पत्र त्यांनी लिहिले. त्यानंतर या पुस्तकाच्या अनेक आवृत्या झाल्या. लेखक आणि प्रकाशकांनी रग्गड पैसा कमावला. मात्र त्यांच्या या धंद्यासाठी ते चुकीचा इतिहास मांडत आहेत. हे पुस्तक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘संदर्भ पुस्तक’ म्हणून वापरले जाते. केवळ पवारांची खुशमस्करी करायची आणि शिवसेना व बाळासाहेब ठाकरे यांना ‘टार्गेंट’ करायचे यासाठी लिहिलेल्या या पुस्तकामुळे राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. भाऊंनी या पुस्तकाचा प्रतिवाद करणारे ‘कोंबडं झाकणार्‍या म्हातारीची गोष्ट’ हे पुस्तक लिहिले, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या हस्ते त्याचे प्रकाशन झाले; मात्र तरीही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने वा संबंधितांनी त्याची म्हणावी तशी दखल घेतली नाही. शिवसेनेची अकारण होणारी बदनामी पुराव्यासह पुस्तकरूपात मांडूनही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे किंवा अन्य शिवसैनिकही गप्प का, तेही कळायला मार्ग नाही. वास्तविक केवळ हितसंबंध जोपासण्यासाठी सुहास पळशीकरांसारख्या प्राध्यापकाने जो लाळघोटेपणे केला त्याबद्दल त्यांना गंभीर शिक्षा व्हायला हवी आणि त्यांच्या पुस्तकावर बंदीही यायला हवी. जागतिक दर्जाचे विद्यापीठ असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात असे अशास्त्रीय, चुकीची मांडणी करणारे, शब्दाशब्दाला खोटे संदर्भ देणारे पुस्तक ‘संदर्भ’ म्हणून वापरले जाणे हे आपणा सर्वांचे मोठे अपयश म्हणावे लागेल.
‘महाराष्ट्राचे सत्तांतर’मधील चुकीची आणि परस्परविरोधी माहिती असलेले मुद्दे भाऊंनी तपशीलवार दिलेत. इतकेच नाही तर त्यातील नेमके सत्य काय होते हेही त्यांनी दिलेय. त्यामुळे राजकीय अभ्यासकांनी हे वाचलेच पाहिजे. चुकीच्या, धडधडीत खोट्या माहितीचा भाऊ तोरसेकर यांनी पद्धतशीर पंचनामा केलाय. ही वैचारिक भ्रष्टतेची चिकित्सा झाली असली तरी रोग अजून पूर्णपणे बरा झाला नाही. पळशीकरांनी बेलाशक खोट्या घटना, न घडलेले प्रसंग आणि अस्तित्वात नसलेल्या गोष्टींचे उल्लेख व संदर्भ त्यांच्या पुस्तकात दिले आहेत. ही माहिती त्यांनी कुठून, कशी मिळवली आणि ती कोणत्या हेतूने वापरली याचा खुलासा होणे गरजेचे आहे. गेली वीस-बावीस वर्षे आपले राज्यशास्त्राचे विद्यार्थी हा चुकीचा इतिहास गिरवत आहेत. ‘तपशीलाला फारसा अर्थ नाही, हा आमचा ‘थिसीस’ आहे, तपशील दुय्यम आहे, त्यात चुका, गफलत असल्याने बिघडत नाही’ असे निर्लज्जपणे सांगणार्‍या पळशीकरांवर खरेतर फौजदारी गुन्हे दाखल व्हायला हवेत. भाऊ तोरसेकर यांनी त्यांचे बेगडीपण पुराव्यासह पुढे आणले आहे. चोरांना पकडण्यासाठी भाऊ सर्वांना जागे करत आहेत; मात्र आपण सुस्तावलोय. इथली व्यवस्था, यंत्रणा, कायदा या वैचारिक भ्रष्टतेची दखल घेत नसेल तर आता शिवसेनेने पुढाकार घेऊन त्यांची बदनामी थांबवायला हवी आणि सत्यही पुढे आणायला हवे. मागच्या सत्तांतराच्या वेळी हा इतिहास लिहिला गेला. आता अठरा-वीस वर्षाने पुन्हा सत्तांतर घडले तरी तोच चुकीचा इतिहास आपण गिरवत आहोत. यातील ‘चोर’ ते उघडपणे मान्यही करत आहेत. तरी त्यांना ‘शिक्षा’ देण्याऐवजी आपण त्यांचा ‘गौरव’च करतोय. शिवाय हे अनेक वृत्तवाहिन्यांवरून, वृत्तपत्रांतून प्रामाणिकपणाचे डोस पाजत असतात. हे म्हणजे ‘वेश्येने पतीव्रता धर्म’ शिकवण्यासारखे आहे. म्हातारी कोंबडं झाकून ठेवण्याचा कितीही प्रयत्न करत असली तरी सत्य फार काळ लपून राहत नाही हेच खरे! भाऊंनी या सत्यावर प्रकाश टाकला आणि प्रकाशक या नात्याने आम्हाला ‘चपराक’च्या माध्यमातून तो वाचकांसमोर आणता आला. आता वाचकांनीच संबंधितांना योग्य तो धडा शिकवायला हवा!
कोंबडं झाकणार्‍या म्हातारीची गोष्ट
‘चपराक प्रकाशन,’ पुणे (7057292092)
पाने - 148, मूल्य - 150 रूपये
(महत्त्वाचे - डोंबिवली येथे येत्या 3 ते 5 फेब्रुवारी दरम्यान होणार्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात भाऊंचे हे पुस्तक ‘चपराक’च्या बी 53 आणि 54 या ग्रंथदालनात अवघ्या शंभर रूपयात मिळेल.)

Tuesday, January 24, 2017

‘अक्षर ऐवज’ - घनश्याम पाटील

माझे 'अक्षर ऐवज' हे तिसरे पुस्तक पुण्यात नुकतेच 'चपराक साहित्य महोत्सवा'त प्रकाशित झाले. यापूर्वी 'दखलपात्र' आणि 'झुळूक आणि झळा' या पुस्तकांना आपण उत्तम प्रतिसाद दिला, त्याबद्दल धन्यवाद. 'अक्षर ऐवज' हा निवडक पुस्तक परीक्षणांचा संग्रह आहे. या पुस्तकाला नाशिक येथील ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक संजय वाघ यांनी लिहिलेली ही प्रस्तावना... अवश्य वाचा, अभिप्राय कळवा. 
या पुस्तकासाठी संपर्क : 'चपराक प्रकाशन', पुणे 
०२०-२४४६०९०९ / ७०५७२९२०९२ 


काळ बदलला तसा माणसांच्या जगण्याचा ट्रेंडही बदलत चालला आहे. काळाशी स्पर्धा करताना किंवा त्याच्या वेगाशी नाते सांगताना मनुष्यप्राणी पायाला भिंगरी लावून सैराटपणे धावतो आहे, यात्रेतील एखाद्या बिथरलेल्या वारूप्रमाणे. या धावण्याच्या नादात कौटुंबिक ओलावा आटत चालला आहे. नात्यातील स्नेहाची, आपुलकीची वीण उसवत चालली आहे. संस्कारांचा धागा तुटत चालला आहे. जमीन-जुमला, संपत्ती व प्रमोशनचा टप्पा गाठण्याच्या दलदलीत त्याचे जगणे स्वैराचारी आणि आत्मप्रौढी बनत चालले आहे. परिणामी माणूस माणसापासून दुरावतो आहे. परस्परांविषयीचा आकस, द्वेषबुद्धिने त्याच्या माणूसपणावर कब्जा मिळविला आहे. त्यामुळे सत्याला सत्य आणि चांगल्याला चांगले म्हणण्याची दानत लोप पावत चालली असल्याच्या विरोधी अशा सांस्कृतिक पर्यावरणात पत्रकार, संपादक व लेखक घनश्याम पाटील यांचा ‘अक्षर ऐवज’ कमालीचा आशादायी वाटतो.
‘भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणू काठी’ या वृत्तीने वाटचाल करणारा हा युवा संपादक-प्रकाशक ओठावर मिसरूडही न फुटलेल्या वयापासून ‘शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जनलोका’ म्हणत मोठ्या निष्ठेने अक्षरपुजा करीत आला आहे. वृत्तपत्र व प्रकाशन ही मुळात भांडवलदारांच्या मक्तेदारीची क्षेत्रे हे ठाऊक असताना आणि खिशात दमडी नसताना एक कोवळ्या वयाचा मुलगा उराशी स्वप्न बाळगून विद्येच्या माहेरघरी येतो, वाचनसंस्कृती जिवंत ठेवण्यासाठी तारूण्य पणाला लावतो ही सारी निस्पृह त्यागाची आणि साहित्यावरील आपल्या असीम निष्ठेचीच निदर्शके मानायला हवीत. ‘सच्चाईचे गुनगाण आणि बुराईवर शब्दप्रहार’ ही त्यांची खासीयत. त्यामुळे कोणाही हौश्या-गवश्यांचे लांगुलचालन करण्याचा शौक घनश्याम पाटील यांना कधी नव्हताच. म्हणूनच या ‘अक्षर ऐवजा’त  त्याचे कोठेही दर्शन घडत नाही. त्यांनी या ‘अक्षर ऐवजा’साठी महाराष्ट्रातील असे पंचवीस प्रतिभावंत हुडकून काढले की, ज्यांच्या साहित्यात विचार आहे आणि त्या विचारांना चिंतनाची किनार लाभलेली आहे. ज्यांना समाजातील बिघडलेल्या सांस्कृतिक आरोग्यावर अक्षर उपाय सुचवायचा आहे, ज्यांना समाजातील अप्रिय गोष्टींवर शब्दांचा आसूड ओढायचा आहे, ज्यांना गुज मनीचे सकळ जनाला सांगायचे आहे, ज्यांना प्रेरणादायी बेटांची ओळख अवघ्या महाराष्ट्राला करून द्यायची आहे, ज्यांना मनोरंजनातून प्रबोधनाची वात प्रज्वलित करायची आहे अशा पंचवीस साहित्यकृतींची शब्दमाळ त्यांनी कल्पकतेने या ग्रंथात ओवलेली आहे.                                                     पंचवीस शब्दपुजकांच्या साहित्यकृतींची, त्यातील सौंदर्यस्थळांची वाचकांना ओळख व्हावी या एकमात्र प्रांजळ हेतूने, मोठ्या आत्मीयतेने आणि सहृदयतेने घनश्याम पाटील यांनी हा ‘अक्षर ऐवज’ वाचकांच्या दरबारात रिता केला आहे. कोणी एखादा या ऐवजाला प्रस्तावनांचे बिरूद लावेल, कोण पुस्तक परीक्षण, रसग्रहण म्हणेल तर काही साहित्य समीक्षेची विशेषणेही लावतील. ‘जो जे वांछिल, तो ते लाहो’ या संतवचनाप्रमाणे या ग्रंथाकडे जो ज्या नजरेने पाहिल, त्या प्रकारचे रूप त्याच्या दृष्टिपथास पडेल. एक मात्र खरे की, या ग्रंथाला उपरोक्त प्रत्येक चौकटीत तंतोतंत आणि घट्ट बसविण्याची शब्दकिमया पाटील यांनी या ऐवजात साधली आहे. यामागे वाचनसंस्कृतीला खतपाणी घालण्याचा आणि लिहित्या हातांना सांस्कृतिक महाराष्ट्रातील भुसभुशीत मातीत अक्षरांचे वाण रूजविण्यासाठी ‘पेर्ते व्हा’ असे सांगणारी शाबासकीची आश्‍वासक थाप जरूर दिसेल. सभोवताली निंदकांची मुजोर वस्ती सुखैनैव नांदत असतानाच्या बजबजपुर्‍यात चांगल्याला चांगले म्हणायला मोठे धाडस आणि मनाचा मोठेपणा लागतो, तो घनश्याम पाटील यांच्या ठायी ठासून भरलेला आहे, म्हणूनच ही अक्षर चळवळ समृद्ध होताना दिसते आहे.
एकीकडे लिहित्या हातांना बळ देण्याचे काम अशाप्रकारे होत असताना दुसरीकडे लेखनक्षेत्रात पदार्पण करू इच्छिणार्‍या नवोदितांना नाउमेद करण्याचे पातकही घडत आहे. लिहिलं त्याला फैलावर घेणारी, मार्गदर्शनाचे डोस पाजणारी आणि आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करून त्याची पीसे मोकळी करणारी एक समीक्षकांची भोंदू जमात महाराष्ट्रात पद्धतशीरपणे सांस्कृतिक दहशत निर्माण करीत आली आहे. अशा या सांस्कृतिक दहशतवाद्यांमुळे नवी उमेद घेऊन या क्षेत्रात उमलू पाहणार्‍या कळ्यांचे फूल होण्याआधीच त्या कुस्करल्या जात आहेत. मग ही एकार्थाने साहित्यातील भृणहत्त्याच नव्हे काय? म्हणूनच अशा नतद्रष्टांच्या प्रभावळीत नवोदितांच्या पंखात बळ भरणार्‍या घनश्याम पाटील यांचा ‘अक्षर ऐवज’ ठसठशीतपणे अधोरेखित झाल्यावाचून राहत नाही. कोणतीच व्यक्ती जन्मतःच परिपूर्ण नसते. बोबडे बोल, रांगणे ही प्राथमिक अवस्थेतील अपरिपक्वता जशी ओघाने येते तशी नवख्या साहित्यातही ते अपरिहार्य आहे. अशावेळी नवोदितांना बोट धरून चालविण्याचा वाटा कोणी उचलत नसेल तर, किमान त्यांच्या नावाने बोटे मोडून त्यांना गर्भगळीत तरी करू नये इतकीच काय ती माफक अपेक्षा असते. पहिल्या प्रयत्नाला योग्य दिशा आणि प्रेरणा मिळाली की त्यातून ऊर्जा घेऊन नवोदितांमधून देखील कसदार साहित्याची निर्मिती घडू शकते, असा सकारात्मक विश्‍वास अंगी बाणून जे समतोल आणि थोडीशी उभारी देणारी समीक्षा करतात तेच खरे समीक्षक म्हणून अभिनंदनास पात्र ठरतात; परंतु अलीकडचे चित्र फारसे आशादायी दिसत नसले तरी घनश्याम पाटील यांच्यासारखी मोजकी माणसे साहित्यसंसार फुलविण्याच्या प्रवासात सांस्कृतिक कर्तव्यभावना मनाशी बाळगून आपापल्या परिने कार्यरत आहेत आणि हाच खरा साहित्य क्षेत्रातील आशेचा किरण मानायला हवा.
घनश्याम पाटील यांनी आपल्या ‘अक्षर ऐवजा’त त्यांना भावलेल्या पंचवीस साहित्यकृतींचा समावेश केलेला आहे. लेखकांनी जेवढ्या आत्मीयतेने पुस्तकांचे लेखन केले आहे, तेवढ्याच  ममत्वाने किंबहुना त्याहून अधिक पोटतिडकीने पाटील यांनी त्या कलाकृतींची उचित शब्दात दखल घेतली आहे. एखाद्या मित्राने गाजलेल्या चित्रपटाच्या कथानकावर मोजून पाच मिनिटांचे सफाईदारपणे भाष्य करावे आणि त्यानंतर एकतर तो चित्रपट पाहण्याची मनात इच्छा जागावी, नाहीतर ते भाष्य ऐकूनच तृप्ततेचा ढेकर द्यावा, अशा रितीनेच पाटील यांनीसुद्धा या ग्रंथातील साहित्यकृतींचा ओघवत्या शैलीत आपुलकीने नेटकेपणाने परामर्श घेतला आहे. मात्र हे करीत असताना या ग्रंथात समाविष्ट प्रत्येक पुस्तकातील सौंदर्यस्थळे त्यांनी जाणीवपूर्वक अचूकपणे अधोरेखित केलेली आहेत. त्यामुळे मूळ कलाकृती वाचण्याचा मोह वाचकांना झाला नाही तरच नवल!
असे म्हणतात सुरूवात चांगली झाली म्हणजे शेवट गोड होतोच. या वाक्याशी पाटील सहमत असल्यामुळे या ग्रंथाच्या मैदानावर असा बॅटस्मन ओपनर म्हणून उतरविला आहे की, ज्यांच्या नावावर असंख्य विक्रम कोरलेले आहेत. पहाडाची छाती आणि कल्पकतेचे विशाल हृदय घेऊन जन्मलेले आचार्य अत्रे म्हणजे मराठी साहित्यशारदेला पडलेले सुखद स्वप्नच. जिवंतपणी आचार्य अत्रे यांच्यासाठी जे करू शकली नाही ते त्यांच्या लेकीने अर्थात शिरीषताई पै यांनी ‘वडिलांच्या सेवेशी’ हा ग्रंथ लिहून अपराधीपणाच्या भावनेतून काहीसे मोकळे होण्याचा मार्ग शोधला आहे. या ग्रंथात अत्रे यांचा सहवास आणि त्यांच्या संदर्भातील कटू-गोड आठवणींना त्यांच्या गुण-दोषासकट मोकळेपणाने उजाळा दिला आहे. यात अत्रे यांची ध्येयनिष्ठा, कुटुंबवत्सलता, त्यांचे प्रेम, त्यांचा राग, त्यांचे श्‍वानप्रेम, त्यांचा भव्यतेचा ध्यास, ‘मराठा’च्या माध्यमातून आलेले आर्थिक अरिष्ट, संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील त्यांचे नेतृत्व, पती व्यंकटेश पै यांचे जगणे-वागणे, मातेबद्दलच्या कृतज्ञतेच्या आठवणी तर यात आहेतच; शिवाय ‘लिहिले पाहिजे, जे लिहितो त्याहून सुंदर लिहिता आलं पाहिजे’ तसेच ‘पहाडाशी टक्कर देताना पहाड फुटला पाहिजे, डोके फुटता कामा नये’ अशा शब्दात आचार्य अत्रे यांनी दिलेली एक निकोप दृष्टी व खंबीर बाणा शिरीषताईंना अधिक प्रिय वाटायचा. अत्रे आणि त्यांच्या परिवाराचा हा पारदर्शक पट त्यांच्या कुटुंबातीलच सदस्याने उलगडून दाखविल्यामुळे या ग्रंथाला सत्याची झळाळी प्राप्त झालेली आहे. 
हास्यचित्रांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकीक मिळविणार्‍या शि. द. फडणीस यांचे ‘मी आणि हसरी गॅलरी’ च्या माध्यमातून त्यांची पत्नी प्रसिद्ध विनोदी लेखिका शकुंतला फडणीस यांनी आपल्या लाडक्या पतीचे चित्रचरित्रच रेखाटले आहे. यात शिदंचं बालपण आहे, मुंबईतील जे. जे. तील दिवस, सासूबाईंचे भावलेले पदर, शकुंतलाबाईंचे बालपण, त्यांच्या लीना आणि रूपा या दोन्ही लेकी, शिदंचा चित्रप्रवास मराठीतील सकस लेखिका म्हणून परिचित असलेल्या शकुंतलाबाईंनी कधी गंभीर तर कधी नर्मविनोदी अंगाने मांडला आहे. लेखनाऐवजी घर सांभाळण्यात आणि पतीच्या आरोग्याची चिंता वाहायला प्राधान्य देणार्‍या आदर्श धर्मपत्नीचे रूप या पुस्तकाच्या माध्यमातून समोर येते, तेव्हा शकुंतलाबाईंची छबी वाचकांच्या मनात आदराने अधिक गडद झाल्यावाचून राहत नाही.
छत्रपती संभाजीराजांची कैद ते त्यांचा शिरच्छेद या 39 दिवसांचे अत्यंत यातनादायी चित्र ‘मी मृत्युंजय, मी संभाजी’ या केवळ सव्वाशे पृष्ठांच्या कादंबरीमध्ये प्रभावीपणे साकारून इतिहास संशोधक आणि व्यासंगी लेखक संजय सोनवणी यांनी इतिहास जिवंत आणि धगधगता ठेवण्याचे मोठे ऐतिहासिक कार्य केले आहे.  प्रवाही, संवादी आणि ओघवत्या शैलीतील ही कादंबरी वाचली की कोणाही मराठी माणसाचे रक्त खवळल्याशिवाय राहणार नाही. आत्मनिवेदनात्मक शैलीमुळे या कादंबरीचा प्रभाव पडतो आणि एकूणच शोकांतिका वाचकांसमोर घडत असल्याचा प्रत्यय येतो, हेच या कादंबरीच्या यशाचे गमक आहे.
सागर कळसाईत नावाच्या आणि मोजून पंचविशीतल्या युवकाने ‘कॉलेज गेट नाण्याची तिसरी बाजू’ या बहुचर्चित कादंबरीच्या यशानतंर त्याच धाटणीची ‘लायब्ररी फ्रेंड’ ही महाविद्यालयीन युवकांच्या भावविश्‍वाशी एकरूप होणारी कादंबरी साकारून साहित्याच्या प्रांतात दुसरे दमदार पाऊल टाकले आहे. मैत्री आणि प्रेमात गुंतलेल्या प्रेमवीरांना खिळवून ठेवण्याचे काम ‘कॉलेज गेट’ने केले आहे. सरळ-साध्या, ओघवत्या आणि प्रवाही संवादभाषेच्या कोंदणामुळे आजच्या तरूणांच्या भाव-भावनांचे प्रतिबिंबच त्यात उमटल्याचे जाणवते.
पत्रकार राजू परूळेकर यांनी ई टिव्हीवरील ‘संवाद’ कार्यक्रमांतर्गत विविध क्षेत्रातील मान्यवरांना बोलते केल्याने सांस्कृतिकदृष्ट्या एक वाङमयीन खजिनाच त्यांना गवसला आहे.  त्याचेच पुस्तक रूप म्हणजे ‘ते आणि मी’! समाजातील आयडॉल असलेल्या त्या महनीय व्यक्तींपैकी ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर, ‘लहानपणापासून मला स्वातंत्र्याची तहान आहे’ असे सांगणार्‍या व शेतकर्‍यांचे पंचप्राण म्हणून उभ्या महाराष्ट्राला परिचित असलेले शरद जोशी, भामरागड येथील आदिवासींसाठी आख्खं आयुष्य समर्पित करणारे पद्मश्री डॉ. प्रकाश व डॉ. मंदा आमटे नावाची ही देवमाणसे, आचार्य विनोबा भावे आणि महात्मा गांधींच्या संस्कारात वाढल्यामुळे धारणीपासून चाळीस किलोमीटर पर्यंतचे अंतर चालत जाऊन बैरागडवासियांची सेवा करण्यासाठी तेथेच मुक्काम ठोकणारे डॉ. रवींद्र कोल्हे, सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक गिरीश कर्नाड, प्रसिद्ध कथालेखिका सानिया अशा उत्तुंग व्यक्तिमत्त्वांच्या मुलाखती समाजाला प्रेरणादायी ठराव्यात अशाच आहेत.
यासह मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांची ‘ऐसी कळवळ्याची जाती’ ही व्यक्तीचित्रे, विनोद श्रा. पंचभाई यांचे मोठा आशय सांगणारे ‘थोडं मनातलं’ हा लेखसंग्रह, संजय वाघ यांचे जित्याजागत्या आदर्शांचे मनोरे उभारणारे ‘गंध माणसांचा’ हे व्यक्तीचित्रण, स्वर्गारोहिणीची ऐतिहासिक, भौगोलिक व पौराणिक माहिती देणारे प्रा. क्षितिज पाटुकले यांचे ‘स्वर्गारोहिणी’हे माहितीपर पुस्तक, नव्वदीनंतर मराठी पुस्तक लेखनाची प्रेरणा घेणार्‍या दुर्गानंद गायतोंडे यांची लेखनगाथा,  प्रसिद्ध सिनेसमीक्षक श्रीपाद ब्रह्मे यांचे ‘फर्स्ट डे, फर्स्ट शो’ हा चित्रपट परीक्षणांचा संग्रह, सच्च्या मैत्रीबद्दल कृतज्ञताभाव व्यक्त करणारे उत्तम कांबळे यांचे ‘काळजातले आर. आर. आबा’,समीर नेर्लेकर यांचा ‘एमरल्ड ग्रीन आणि इतर कथा’ नावाचा कथासंग्रह, शरद पवार यांच्या राजकीय पटाची दखल घेणारे स्वामी विजयकुमार यांचे ‘कर्णधार’, महाविद्यालयीन जीवनातील वृत्ती-प्रवृत्तींचा चिकित्सक उलगडा करणारी सागर कळसाईत यांची ‘लायब्ररी फे्रंड’, दत्ता वायचळ यांचा‘गजरा’ कथासंग्रह, ज्येष्ठ बालसाहित्यिक सुभाष कुदळे यांच्या ‘नवलकथा’ तसेच ज्येष्ठ कवी म. भा. चव्हाण यांचा ‘धर्मशाळा’, ‘चपराक’च्या ज्येष्ठ उपसंपादिका व कवयित्री चंद्रलेखा बेलसरे यांच्या ‘आईपणाच्या कविता’, रमेश जाधव यांचा ‘नाते मनाशी मनाचे’, प्रा. बी. एन. चौधरी यांचा ‘बंधमुक्त’या काव्यसंग्रहांचीही या ग्रंथात उचित आणि आशादायी शब्दात दखल घेतली आहे.
या ‘अक्षर ऐवज’च्या माध्यमातून मराठी साहित्यविश्‍वात ‘दखलपात्र’ अशी भर पडली आहे. हा ऐवज साहित्यरसिकांसाठी आणि साहित्याक्षरे गिरवू पाहू इच्छिणार्‍यांसाठी एका वाटाड्याची भूमिका जरूर पार पाडेल, असा विश्‍वास वाटतो. यानिमित्ताने घनश्याम पाटील यांना साहित्यक्षेत्रातील उज्ज्वल भविष्यासाठी सुयश चिंततो.
                                                                                            

 - संजय वाघ
99229 04072

Sunday, January 22, 2017

आयुष्य समृद्ध करणारे अरुणिमा

प्रत्येक माणसाचं आयुष्य म्हणजे एक स्वतंत्र कादंबरी असते. समृद्ध जीवनानुभव असल्यास आयुष्यातील असंख्य घडामोडी काव्यात्म रूप घेतात आणि लेखणीतून पाझरू लागतात. हे झरे अविरतपणे वाहत असतात. आयुष्याची कादंबरी कवितांच्या ओळीत विरघळून जाते आणि या सर्वोत्कृष्ट भावनांचा आविष्कार दिसून येतो. त्यासाठी लागते फक्त थोडीशी सजगता, डोळसता आणि अर्थातच कल्पकता. जो समाजाकडे तटस्थ वृत्तीने पाहू शकतो, शोधक नजरेने बरेवाईट टिपू शकतो, ज्याचा विवेक कायम जागृत असतो तो नेहमीच संस्कारशील साहित्य जन्मास घालतो. आमच्या ‘चपराक’च्या उपसंपादिका 
सौ. चंद्रलेखा बेलसरे त्यापैकीच एक. त्यांचे हे साहित्यातले पाचवे आणि कवितांचे तिसरे पुस्तक. यासोबतच ‘सत्याभास’ हा गूढ कथांचा संग्रहही प्रकाशित होतोय. ‘माणूसपण’ ही त्यांच्या साहित्याची जातकुळी आहे. आपल्या प्रत्येक कलाकृतीतून भावभावनांच्या प्रगटीकरणाबरोबरच सत्याचा कैवार हे त्यांच्या लेखणीचे अंगभूत सामर्थ्य आहे. प्रस्तुत संग्रहातील अनेक रचना त्याची साक्ष पटवून देतील.
‘आदिमाया, आदिशक्ती’ या पहिल्याच कवितेतून त्यांनी स्त्रीशक्तीचा जागर घातलाय. व्यवस्थेपुढे, निसर्गापुढे, दैववादापुढे त्या हतबल नाहीत! तर न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा देणार्‍या ब्रह्मा, विष्णु, महेशालाही त्या चक्क ‘निर्लज्ज’ ठरवत स्त्रीमुक्तीचा एल्गार पुकारतात. सृष्टीच्या निर्मितीचे मूळ असलेल्या एका मातेचा हा हुंकार आहे. जुलमी शोषकांच्या विरूद्ध आवाज उठवताना इथल्या पुरूषी मानसिकतेच्या विषवल्ली कशा फोफावल्यात हे त्या सप्रमाण सांगतात आणि म्हणूनच आता कोणताही राम-कृष्ण आपल्या मदतीसाठी धावून येणार नाही हे सत्य अधोरेखित करतात.
अरूण म्हणजे सूर्य आणि ‘अरूणिमा’ म्हणजे सूर्याची किरणे. ही किरणे अंधार चिरत जातात. अंधार नष्ट करण्याचे सामर्थ्य ज्याप्रमाणे प्रकाशात असते अगदी तसेच इथले हलाहल दूर करायचे असेल तर आपल्या लेखणीचा लखलखीत आविष्कार दाखवून द्यायलाच हवा. चंद्रलेखाताई बेलसरे यांनी ही किमया यशस्वीरित्या साधलीय. आशयसंपन्नता, वास्तवावर ठेवलेले नेमके बोट, दुष्ट-दुर्जनांवर ओढलेले कठोर कोरडे आणि सज्जनांचा, सद्गुणांचा गौरव हे त्यांच्या लेखणीचे वैशिष्ट्य आहे. आजची मराठी कविता छंदापासून मात्र दूर चाललीय. या संग्रहातीलही बहुतेक रचना मुक्त छंदातल्या आहेत. तंतकाव्य, पंतकाव्य आणि संतकाव्य यापुढे जाऊन आधुनिक मराठी कवितांचा विचार केला तर अनेक प्रतिभासंपन्न कवी छंदाला, व्याकरणाला महत्त्व द्यायचे; त्यामुळे मराठी कविता समृद्ध झाली. चंद्रलेखाताई बेलसरे यांनी छंदाकडे विशेष लक्ष दिले नसले तरी या कवितांचे महत्त्व अजिबात कमी होत नाही. कारण या कविता आशय आणि भावनांनी ओथंबलेल्या आहेत.
चंद्रलेखाताईंचे यापूर्वी ‘आर्यमा’ आणि ‘अनुभूती’ हे दोन कवितासंग्रह प्रकाशित आहेत. त्यातील ‘अनुभूती’ हा संग्रह तर भावनांच्या पातळीवर अव्वल आणि काव्याच्या कसोटीवर चिरंतर टिकणारा आहे. स्त्रीला दिवस गेल्यापासून ते बाळाचा जन्म आणि नंतर काही काळ आईची जी मनोवस्था असते त्या अनुभूतीचे सशक्त चित्रण त्यांनी केले आहे. ‘अरूणिमा’ या संग्रहातीलही काही कविता त्यांनी त्यांच्या मुलीलाच केंद्रस्थानी ठेवून केल्या आहेत. असे असले तरी या कविता त्यांच्या वैयक्तिक किंवा कौटुंबिक ठरत नाहीत. त्या वैश्‍विक झाल्यात. प्रतिकात्मक झाल्यात. सूर्यकिरणांवर काय कुण्या एकाचा अधिकार असतो? तो नित्यनेमाने प्रकाश पेरत जातो. या प्रकाशात आपण काय ‘उजेड’ पाडायचा हे आपल्या इच्छाशक्तीवर व कर्तबगारीवर अवलंबून असते. सूर्य त्याचे काम चोखपणे पार पाडतो. चंद्रलेखाताईंनीही समाजाला जागृत करण्याचे काम त्यांच्या लेखणीद्वारे केलेय. आपल्या मुलीमध्ये आपले प्रतिरूप दिसते असे सांगत त्या लिहितात,
अशाच गौरी, दुर्गा, अंबा
अवतरू दे या पृथ्वीतलावर
शक्तीपीठाचा जागर होता
स्वर्ग अवतरे भूतलावर!
सर्व अनिष्ठ दूर सारून पृथ्वीवरच स्वर्ग निर्माण करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती या कवयित्रीची आहे. आजची पुरूषी मानसिकता सांगताना त्या लिहितात,
असा कोणताच दिवस उगवत नाही 
ज्या दिवशी स्त्री मरत नाही
सावित्री, अहिल्या, सीते
अजूनही तुमची अग्निपरीक्षा टळत नाही
माणसाने निसर्गाची प्रचंड हानी केली. स्वार्थापायी आपण वृक्षसंहार केला. धरणी बोडकी केली. मग निसर्गही कोपला. दुष्काळांच्या झळांनी माणूस होरपळला. सगळीच दैन्यावस्था झाली. त्यामुळे या वरूणराजाला कवयित्रीने विनवणी केली,
निसर्गाचा समतोल
आम्ही जीवापाड जपू
नाही तोडणार झाडे
त्यांचे जतनही करू
माझ्या पोरांच्या डोळ्यातील
आता अश्रू तू थांबव
दे दे जीवदान आम्हा
आता रूसवा संपव
शेवटी त्या म्हणतात
या सृष्टीची निर्माती 
आज विनविते तुला
कर आम्हावर कृपा
अन् वाचव विश्‍वाला
आपण सारे निसर्गाचा समतोल जपू याची सर्वांच्या वतीने ग्वाही देतानाच त्या विश्‍वाला वाचवण्याची विनंती सृष्टीच्या निर्मात्याकडे करतात. यात कुठेही वैयक्तिक स्वार्थाची जळमटे नाहीत. ही सर्वात्मकतेची भावना रूजवण्याचे कार्य सौ. चंद्रलेखा बेलसरे यांच्यासारखे संवेदनशील साहित्यिक जोमाने करीत आहेत. म्हणूनच आपण सर्वजण सुरक्षित आहोत. विचारांचा असा हा यज्ञ नेहमीच विवेक पेरतो. त्याची मधूर फळे समाजात ऐक्य, सामंजस्य, शांती, सुजलाम्-सुफलाम्ता निर्माण करतात. 
‘अरूणिमा’तील कवितात विषयांचे वैविध्य जबरदस्त आहे. प्रेमविवाहापूर्वीची आणि नंतरची अवस्था, पंचवीस वर्षापूर्वी ज्याला नकार दिलाय त्या प्रेमवीराची जाणीव, भरभरून प्रेम करण्याचा केलेला गुन्हा, मर्यादांची लक्ष्मणरेषा, आपटे विद्यालयाजवळील आनंदयात्रींच्या स्मृती, तारूण्याचा कालानुरूप कुचकामी ठरणारा जोश, ब्रह्मांडाच्या साक्षात्काराचे गणित, युगुलांचा श्रावण-वसंत असे असंख्य विषय या संग्रहात आलेत. एक चिमुकली आपल्या अशिक्षित आईला शिकून मोठ्ठं झाल्यावर काय करणार हेही सांगते.
चंद्रलेखा बेलसरे यांनी त्यांच्या कवितेत शेतकर्‍यांविषयी कनवाळाही व्यक्त केलाय. एकेकाळी शरद जोशी यांच्या कांदा आंदोलनात सक्रीय असलेल्या कवयित्रीला शेतकर्‍यांच्या व्यथा-वेदना चांगल्याच ज्ञात आहेत. म्हणूनच त्या म्हणतात,
नाही पोटामध्ये अन्न
नाही प्यावयास पाणी
अशी कशी रे शेतकर्‍या
तुझी करूण कहाणी
तू तर पोशिंदा जगाचा
धान्य पिकवून देई
तुझे तुलाच न उरे
अशी कशी दैना होई?
या संग्रहातील ‘वेदना’ ही शेवटची कविता तर मनाचा थरकाप उडवते.
बालपणी कधीच जाणवले नाहीत
वेदनेचे डंख
मोकळ्या अवकाशात विहरत होते
लेवून स्वातंत्र्याचे पंख
असे सांगणार्‍या कवयित्री लिहितात,
मृत्युलाही नाही पहावले
सर्वांगावरील ते असंख्य डंख
घातली मायेची गोधडी
वेदनांचे मिटले पंख
यातील ‘वेदनांनी पंख मिटणे’ ही वाटते तितकी सोपी कल्पना नाही. त्यासाठी परपीडा अनुभवता यायला हव्यात. सामाजिक, सांस्कृतिक, कौटुंबिक संदर्भांचे वस्तुनिष्ठ दर्शन घडवताना भावनाही समजून घ्यायला हव्यात. चंद्रलेखा बेलसरे यांची ही समज त्यांच्या अंत:करणातून आलेली आहे. त्यामुळे त्यांच्या रचनात मानवी भावभावनांचे प्रतिबिंब चकाकत असते. 
सूर्याची किरणे ज्याप्रमाणे प्रकाशाची पेरणी करतात त्याप्रमाणेच ‘अरूणिमा’ मानवी मनातील अंधार, जळमटं, किल्मिषं दूर सारेल असा आशावाद व्यक्त करतो आणि त्यांना भावी लेखन प्रवासास भरभरून शुभेच्छा देतो.

घनश्याम पाटील
७०५७२९२०९२

कवितासंग्रह - अरुणिमा 
कवयित्री - सौ. चंद्रलेखा बेलसरे 
प्रकाशक - 'चपराक प्रकाशन', पुणे (०२०-२४४६०९०९)
पाने - ८८, मूल्य - ८०
 

Saturday, January 21, 2017

‘चपराक’चं संमेलनपूर्व संमेलन!



सध्याच्या नोटाबंदीच्या काळात प्रकाशन व्यवहार ठप्प होत असल्याची ‘अफवा’ तेजीत असतानाच आम्ही पुण्यात चौथा ‘चपराक साहित्य महोत्सव’ घेतला. गुरूवार 19 जानेवारी 2017 रोजी झालेल्या या महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे यात एकाचवेळी तब्बल 19 पुस्तके ‘चपराक‘तर्फे प्रकाशित करण्यात आली. सुप्रसिद्ध लेखक प्रा. द. ता. भोसले यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. घुमानच्या साहित्य संमेलनाचे आयोजक आणि ‘सरहद’चे प्रुमख संजय नहार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, साहित्यिक आणि संशोधक संजय सोनवणी यांच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक सोहळा झाला. ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांची मुलाखत, सागर कळसाईत लिखित ‘कॉलेज गेट’ कादंबरीच्या एका प्रकरणाचे अभिवाचन, माधव गिर यांच्या अध्यक्षतेखाली रंगलेले कवी संमेलन अशा भरगच्च कार्यक्रमामुळे हे खर्‍याअर्थी ‘संमेलनपूर्व संमेलन’ रंगले.
प्रकाशन व्यवहाराला गती मिळण्यासाठी मराठीत उत्तमोत्तम पुस्तके सातत्याने प्रकाशित होणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे ‘चपराक साहित्य महोत्सवा’ची संकल्पना पुढे आली. यापूर्वी या संमेलनास सुप्रसिद्ध व्यवस्थापन तज्ज्ञ प्राचार्य डॉ. प्र. चिं. शेजवलकर, महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ. सदानंद मोरे अशा दिग्गजांनी अध्यक्ष, उद्घाटक म्हणून उपस्थिती लावली. गुरूवारी झालेल्या समारंभात ‘चपराक’ने 19 पुस्तके प्रकाशित करून मराठी भाषेच्या भवितव्याची चिंता करणार्‍यांना कृतिशील ‘चपराक’ दिली आहे.
‘‘ग्रामीण भागाची पार्श्‍वभूमी असतानाही पुण्यासारख्या महानगरात येऊन ‘चपराक’च्या प्रकाशकांनी हे कार्य उभे केले आहे. आज महाराष्ट्र साहित्य परिषद आणि चपराक मासिक ही साहित्य चळवळीची दोन अविभाज्य अंग झाली आहेत. या दोन्ही संस्थांचे काम मराठी भाषेच्या विकासासाठी भरीव आणि नैतिक अधिष्ठान असणारे असून ‘चपराक’ हे नवोदितांसाठी हक्काचे व्यासपीठ झाले आहे’’ असे गौरवोद्गार द. ता. भोसले यांनी काढले.
संजय नहार यांनी ‘चपराक’चा पाचशे पानांचा विक्रमी दिवाळी अंक, वेळोवेळी घेतलेल्या धाडसी भूमिका यांचे कौतुक केले. मिलिंद जोशी, स्वागताध्यक्ष संजय सोनवणी यांनीही ‘चपराक’मध्ये लेखन येणे कसे प्रतिष्ठेचे आहे आणि ही साहित्य चळवळ जोमाने कशी पुढे येत आहे हे सविस्तरपणे सांगितले.
‘चपराक’चा प्रकाशक या नात्याने मी आणि ज्येष्ठ पत्रकार आबा माळकर यांनी भाऊ तोरसेकर यांच्याशी संवाद साधला. लेखक, पत्रकार म्हणून भाऊ सर्वांना सुपरिचीत आहेत; मात्र या मुलाखतीतून भाऊंची अनेक रूपे समोर आली. महाविद्यालयीन जीवनात विविध आंदोलनात सक्रिय असणारे भाऊ, भाऊंच्या आईने त्यांच्यावर केलेले संस्कार, बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेब विखे या दिलदार नेत्यांच्या आठवणी, शरद पवारांचे राजकारण, मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या गंमतीजंमती आणि त्यांचे भवितव्य, ‘चपराक’चे साहित्यिक योगदान, शिवसेना, मुंबईतील गिरणी कामगार, भाऊंचा ‘पँथर’मधील सहभाग आणि नामदेव ढसाळांच्या आठवणी, त्यांचे लेखन, नरेंद्र मोदी यांच्याबाबतची त्यांची मते, आचार्य अत्रे यांच्या सभेच्या आणि भाऊंच्या ‘मराठा’मधील कामाच्या आठवणी अशा चौफेर विषयांवर ही मुलाखत रंगली. मुख्य म्हणजे भाऊ तोरसेकर हे एक उत्तम कवी आहेत हे अनेकांना माहीत नव्हते. या संमेलनात अनेक दर्जेदार कविता प्रभावीपणे सादर करून त्यांनी ही मुलाखत अत्यंत उंचीवर नेली.
‘मार्मिक’मधील त्यांच्या सहभागाबाबत सांगताना त्यांनी सांगितले की, ‘‘लेखनासंदर्भात एका विषयावर त्यांची बाळासाहेब ठाकरे यांच्याशी चर्चा होती. सुभाष देसाई, मनोहर जोशी असे नेते त्यात सहभागी होते. बाळासाहेबांनी सांगितले की, हा विषय योग्य होणार नाही. भाऊ निर्धाराने आणि ठामपणे म्हणाले, ‘‘हे असेच आले पाहिजे.’’ तेव्हा बाळासाहेब उभे राहिले आणि म्हणाले, ‘मी शिवसेनाप्रमुख आहे...’ भाऊही उभे राहिले आणि म्हणाले, ‘मीही पत्रकार आहे...’ उपस्थित सर्वच नेत्यांच्या चेहर्‍यावर तणाव जाणवत असताना बाळासाहेब हसू लागले आणि त्यांनी सांगितले, ‘मार्मिकला असा भूमिका घेणारा आणि स्वतःच्या मतावर ठाम असणारा संपादक हवाय....’ त्यानंतर माझं आणि त्यांचं नातं अधिक दृढ झालं.’’
शिवसेनेमुळं मुंबईतील मराठी माणूस कसा सुरक्षित आहे हे सांगतानाच भाऊंचं एक विधान तर खरंच खूप विचार करण्यासारखं होतं. ते म्हणाले, ‘‘मुंबईत पोलीस ठाणे नसले तरी चालेल पण शिवसेनेची शाखा पाहिजेच पाहिजे. मुंबई सुरक्षित आहे ती शिवसेनेमुळे आणि त्यात बाळासाहेबांनी रूजवलेला विश्‍वास लोकांच्या मनात आणि हृदयात आहे.’’
सागर कळसाईत हा मराठीतील एक प्रतिभावंत लेखक. वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी या तरूणाने बार्शीहून पुण्यात येऊन एम. बी. ए. केले. त्या अनुभवावर ‘कॉलेज गेट’ ही कादंबरी लिहिली. ‘चपराक’ने ती प्रकाशित केली आणि मागच्या चार वर्षात या कादंबरीच्या चार आवृत्या झाल्यात. यावर लवकरच एक चित्रपटही येतोय. सागरची ‘लायब्ररी फ्रेंड’ ही कादंबरीसुद्धा सध्या वाचकप्रिय ठरतेय. सागर आणि त्याच्या सहकार्‍यांनी या महोत्सवात ‘कॉलेज गेट’चे प्रभावी अभिवाचन केले.
शेवटच्या सत्रात माधव गिर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काव्यसंमेलनाने तर वेगळीच उंची गाठली. स्वप्निल पोरे, रमजान मुल्ला, नागेश शेलार, सरिता कमळापूरकर, लक्ष्मण खेडकर, विद्या बयास, रविंद्र कामठे, प्रल्हाद दुधाळ, सौ. चंद्रलेखा बेलसरे, जयंत वाघ, कस्तुरी देवरूखकर, योगेश राऊत, संगीता झिंजुरके, रमेश जाधव, दत्तु ठोकळे अशा कवींनी मैफल गाजवली.
संजय सोनवणी हे महाराष्ट्रातील सुपरिचित नाव आहे. त्यांनी आजवर 85 कादंबर्‍या लिहिल्या. विपुल वैचारिक आणि संशोधनात्मक पुस्तके लिहिली. त्यांचे ‘चपराक’ने यापूर्वी ‘भाषेचे मूळ’ हे भाषाशास्त्रावरील अत्यंत सुंदर पुस्तक प्रकाशित केले होते. यंदाच्या साहित्य महोत्सवात त्यांचा ‘आदमची गोष्ट’ हा कथासंग्रह प्रकाशित झाला. गंमत म्हणजे या संग्रहाचे मुखपृष्ठही त्यांनीच साकारले आहे. सदानंद भणगे हे सुद्धा एक मोठे लेखक. त्यांच्या विनोदी कथा, नाटके सर्वश्रूत आहेत. अस्सल आणि गुणवत्तापूर्ण लेखन असलेल्या सदानंद भणगे यांची ओळख प्रामुख्याने ‘विनोदी लेखक’ अशीच आहे. यापूर्वी ‘चपराक’नेही त्यांचे विनोदी लेखन प्रकाशित केले आहे; मात्र या महोत्सवात त्यांचा ‘हॅपी रिटर्न्स’ हा गंभीर कथांचा अत्यंत वाचनीय कथासंग्रह प्रकाशित झाला. ‘एमरल्ड ग्रीन’नंतर समीर नेर्लेेकर यांचा ‘पंधरा त्रिक पंचेचाळीस’, गोविंद गव्हाणे यांचा ‘बाजीराव मस्तानी आणि इतर प्रेमकथा’ परभणी येथील लेखिका अर्चना डावरे यांचा ‘जुलूस’ हे कथासंग्रहही यावेळी प्रकाशित झाले.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सध्या कवितासंग्रह फारसे कोणी वाचत नाहीत, अशी ‘अंधश्रद्धा’ असताना ‘चपराक’ने सहा कवितासंग्रह प्रकाशित केलेत. त्यात माधव गिर यांच्या ‘शेतीबाडी’ या तंत्रशुद्ध, अष्टाक्षरी खंडकाव्यासह चंद्रलेखा बेलसरे यांचा ‘अरूणिमा’, रविंद्र कामठे यांचा ‘प्रांजळ’, कस्तुरी देवरूखकर यांचा ‘स्वप्नसखा’, जयंत वाघ यांचा ‘शब्दमाला’, योगेश राऊत यांचा ‘झळा’ आणि दत्तू ठोकळे यांचा ‘माझा सावन’ या संग्रहांचा समावेश आहे.
प्रल्हाद दुधाळ यांचा ‘मना दर्पणा’, विनोद श्रा. पंचभाई यांचे ‘ती’च्या मनातलं’, दत्तात्रय वायचळ यांचं ‘स्वप्नातलं पुणं’ ही पुस्तके प्रकाशित झाली. नाशिक येथील लेखक संजय वाघ यांची ‘जोकर बनला किंगमेकर’ ही प्रेरणादायी किशोर कांदबरीही मराठी साहित्यात नवा विक्रम प्रस्थापित करेल.
करमाळा येथील लेखक निलेश सूर्यवंशी हे एक असेच दुर्लक्षित व्यक्तिमत्त्व! त्यांनी 2009 साली ‘आभाळ फटकलं’ ही ग्रामीण पार्श्‍वभूमी असलेली कादंबरी लिहिली. अनेक प्रकाशकांकडे चकरा मारूनही या हरहुन्नरी लेखकाची फारशी कुणी दखल घेतली नाही. गेल्या वर्षी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या जुळे सोलापूर शाखेने ‘चपराक’च्या दिवाळी अंकाला प्रथम पुरस्कार दिला. त्या कार्यक्रमाची बातमी वाचून त्यांनी ही कादंबरी ‘चपराक’कडे पाठवली आणि आता ती वाचकांच्या भेटीस आली आहे. ‘चपराक नवोदित लेखकांच्या दर्जेदार लेखनास हक्काचे व्यासपीठ देते’ असे सांगत सविस्तर बातमी देणारी सोलापूरातील वृत्तपत्रं आणि मसापची जुळे सोलापूर शाखा यांच्यामुळे हा अस्सल लेखक उजेडात येऊ शकला. उद्या या कादंबरीवर आधारित चित्रपट आला तर कुणाला आश्‍चर्य वाटू नये.
जाता जाता आणखी एक महत्त्वाचे.
सध्या ‘लिहिणारे’ प्रकाशक ही कल्पनाच दुर्मीळ होत चाललीय. सातत्याने येणारी पुस्तके, त्यासाठी त्यांचे पुन्हा पुन्हा करावे लागणारे वाचन, त्याचे वितरण आणि विक्री, प्रसिद्धी यात प्रकाशक इतके अडकून पडतात की क्षमता असूनही ते लेखनासाठी वेळ देऊ शकत नाहीत. इतरांना ‘प्रकाशात’ आणणारा प्रकाशकच दुर्लक्षित राहतो. हे आम्ही जाणिवपूर्वक होऊ दिले नाही. माझी ‘दखलपात्र’ आणि ‘झुळूक आणि झळा’  ही अग्रलेखांची दोन पुस्तके प्रकाशित झाली. आता या महोत्सवात ‘अक्षर ऐवज’ हे निवडक प्रस्तावनांचे आणि परीक्षणांचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.
भविष्यातही आम्ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करू ही ग्वाही देतो. कसदार लेखन असणार्‍यांनी खचून न जाता उमेदीने सातत्याने लिहित रहावे आणि माय मराठीची सेवा करावी हेच यानिमित्ताने सांगावेसे वाटते. असे म्हणतात की, ‘प्रत्येक वाचकामध्ये एक लेखक दडलेला असतो.’ त्या लेखकाला ‘जागे’ करणे आणि मराठी भाषेच्या सर्वंकश विकासाला हातभार लावणे यादृष्टिने ‘चपराक’चे उपक्रम आणि हा संमेलनपूर्व संमेलन ठरणारा महोत्सव मोलाचा ठरणार आहे.
- घनश्याम पाटील, पुणे
7057292092

Sunday, January 15, 2017

‘चपराक साहित्य महोत्सवा’ची मेजवानी

असे म्हणतात की, ज्या राज्यात धान्याअभावी दुष्काळ पडतो तिथली जनावरे मरतात! काहीवेळा माणसेही मरतात; मात्र जिथे विचारांचाच दुष्काळ पडतो तिथली मानवताच मरते! ही मानवता जिवंत ठेवायची तर वाचकांना संस्कारशील साहित्य उपलब्ध करून देणे हा महत्त्वाचा पर्याय उरतो. त्यामुळे आम्ही ‘चपराक प्रकाशन’तर्फे सातत्याने वैविध्यपूर्ण विषयांवरील दर्जेदार साहित्य प्रकाशित करतो. याचाच एक भाग म्हणजे दरवर्षी होणारा ‘चपराक’चा साहित्य महोत्सव! एकाचवेळी राज्यभरातील लेखकांची पुस्तके प्रकाशित करण्याचा मानदंड ‘चपराक’ने घालून दिलाय. येत्या गुरूवारी म्हणजे दि. 19 जानेवारी रोजी ‘चपराक’चा चौथा साहित्य महोत्सव पुण्यातील श्रमिक पत्रकार भवनात पार पडतोय.
या महोत्सवाला पहिल्या वर्षी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे तेव्हाचे अध्यक्ष आणि सुप्रसिद्ध व्यवस्थापन तज्ज्ञ डॉ. प्र. चिं. शेजवलकर आणि समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस उपस्थित होते. दुसर्‍या महोत्सवात महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी लेखकांना आशीर्वाद दिले, तर गेल्या वर्षी तिसर्‍या महोत्सवात अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे आणि सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले होते. यंदाच्या महोत्सवासाठी नामवंत लेखक प्रा. डॉ. द. ता. भोसले, घुमानच्या संमेलनाचे आयोजक आणि ‘सरहद्द’ संस्थेचे प्रमुख संजय नहार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी उपस्थित राहणार आहेत.
यंदा ‘चपराक साहित्य महोत्सवा’त भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी वाचकांना मिळणार आहे. सुरूवातील एकाचवेळी तब्बल अठरा पुस्तकांचे प्रकाशन होईल. त्यानंतर सुप्रसिद्ध पत्रकार आणि राजकीय विश्‍लेषक भाऊ तोरसेकर यांची प्रकट मुलाखत होईल. ज्येष्ठ संपादक हरीश केंची आणि दै. ‘आपलं महानगर’चे वृत्तसंपादक आबा माळकर हे दोघे भाऊ तोरसेकर यांच्याशी दिलखुलास संवाद साधतील. त्यानंतर एक हटके कार्यक्रम म्हणजे ‘कॉलेज गेट’ फेम युवा लेखक सागर कळसाईत यांच्या कादंबरीतील एका प्रकरणाचे अभिवाचन. स्वतः सागर आणि त्याचे काही सहकारी हे अभिवाचन करतील. शेवटच्या सत्रात राज्यभरातील निमंत्रित कवी-कवयित्रींचे संमेलन होईल.
संजय सोनवणी हे मराठी साहित्यातील एक सशक्त नाव. त्यांच्या आजवर 85 कादंबर्‍या प्रकाशित झाल्यात. ते मराठीतील असे एकमेव लेखक आहेत की, ज्यांची पुस्तके अमेरिकेत व्हाईट हाऊस मध्ये ‘रेफरन्स बुक’ म्हणून ठेवलीत. त्यांनी आजवर अनेक कथा लिहिल्या; मात्र त्यांच्या कथा पुस्तकरूपात आल्या नाहीत. त्यांचा ‘आदमची गोष्ट’ हा पहिला कथासंग्रह ‘चपराक’कडून या महोत्सवात प्रकाशित होतोय. सुप्रसिद्ध साहित्यिक सदानंद भणगे हे नावही मराठी साहित्याला नवे नाही. त्यांची काही पुस्तके यापूर्वी ‘चपराक’ने प्रकाशित केलीत आणि ती सर्वच वाचकप्रिय ठरलीत. यंदाच्या महोत्सवात त्यांचा ‘हॅप्पी रिटर्न्स’ हा संग्रह प्रकाशित होतोय. आमच्या उपसंपादिका आणि ज्येष्ठ कवयित्री सौ. चंद्रलेखा बेलसरे यांचा ‘सत्याभास’ हा गूढ कथांचा संग्रहही वाचकांच्या भेटीस येणार आहे. मराठीत गूढ कथा लोप होत चाललेल्या असताना हा संग्रह मोलाचा ठरणार आहे. परभणी येथील लेखिका सौ. अर्चना डावरे याही सध्या कथाकार म्हणून पुढे येत आहेत. त्यांचा ‘जुलूस’ हा दुसरा कथासंग्रह यंदाच्या महोत्सवात आम्ही उपलब्ध करून देत आहोत.
विनोद श्रा. पंचभाई हे गेल्या काही काळात सातत्याने वैविध्यपूर्ण विषयांवर लिहित आहेत. आपले प्रशासकीय कामकाज सांभाळत त्यांचा लेखनगाडा सुसाट सुटलाय. ‘थोडं मनातलं’,  ‘मुलांच्या मनातलं’, ‘आपले राष्ट्रसंत’ ही त्यांची पुस्तके वाचकप्रिय ठरली. आता त्यांचे ‘तीच्या मनातलं’ हे हटके पुस्तक प्रकाशित होतंय. ‘ती’च्या मनात काय चाललंय हे खुद्द देवाधिदेवालाही कळत नाही, असे म्हणत असताना पंचभाईंनी हे शिवधनुष्य पेलले आहे. त्यांच्या या ‘धाडसा’ला आपण दाद द्यायलाच हवी.
नाशिक येथील लेखक आणि पत्रकार संजय वाघ हे माणसांची मने वाचण्यात निष्णात आहेत. सध्या बालसाहित्य दुर्मीळ होत चाललेय, अशी हाकाटी पिटली जात असतानाच त्यांची ‘जोकर बनला किंगमेकर’ ही किशोर कादंबरी आम्ही आकर्षक स्वरूपात प्रकाशित करीत आहोत. पुणे शहराचा आरसा दाखणारं ‘स्वप्नातलं पुणं’ हे दत्तात्रय वायचळ यांचं पुस्तकही लक्षवेधी ठरेल.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सध्या कवितासंग्रह कोणीही प्रकाशित करीत नाही, अशी एक अंधश्रद्धा जाणिवपूर्वक पसरवली जाते. त्याला उत्तर म्हणून आम्ही उत्तमोत्तम कवितासंग्रह प्रकाशित करीत आहोत. यातील कवी माधव गिर यांचे ‘शेतीबाडी’ हे खंडकाव्य तर मराठी काव्यक्षेत्रात मैलाचा दगड ठरेल. केवळ ‘शेती आणि शेतकरी’ हाच विषय घेऊन तीनशे छंदोबद्ध (संपूर्ण अष्टाक्षरी) कडवी त्यांनी केलीत. रविंद्र कामठे यांचा ‘प्रांजळ’, जयंत वाघ यांचा ‘शब्दमाला’, योगेश राऊत यांचा ‘झळा’, कस्तुरी देवरूखकर यांचा ‘स्वप्नसखा’, चंद्रलेखा बेलसरे यांचा ‘अरूणिमा’, दत्तू ठोकळे यांचा ‘माझा सावन’ असे दर्जेदार कवितासंग्रह आम्ही यंदाच्या ‘चपराक साहित्य महोत्सवा’त प्रकाशित करीत आहोत.
समीर नेर्लेकर हे लेखक, कवी, तंत्रज्ञ आणि चित्रकार म्हणून आपणास परिचित आहेत. यापूर्वी त्यांचा ‘एमरल्ड ग्रीन’ हा कथासंग्रह प्रचंड वाचकप्रिय ठरला. आता त्यांचा ‘पंधरा त्रिक पंचेचाळीस’ हा लघुकथासंग्रह प्रकाशित होतोय. नांदेड येथील लेखक प्रा. गोविंद गव्हाणे यांचेही एक आगळेवेगळे पुस्तक आम्ही प्रकाशित करीत आहोत. ‘बाजीराव मस्तानी आणि इतर प्रेमकथा’ हे त्यांचे जागतिक स्तरावर गाजलेल्या प्रेमकथांचे पुस्तक वाचकांना नक्कीच भावेल. सामाजिक विषयावर भाष्य करणारे प्रल्हाद दुधाळ यांचे ‘मना दर्पणा’ हे वैचारिक लेखांचे पुस्तक, करमाळा येथील लेखक नीलेश सूर्यवंशी यांची ‘आभाळ फटकलं’ ही ग्रामीण राजकारणावर आधारित कादंबरी हे यंदाच्या ‘चपराक साहित्य महोत्सवा’चे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
जाता जाता एक महत्त्वाचे! लेखक, वाचक, प्रकाशक आणि संपादक या नात्याने आजवर वाचकांनी माझे बरेच लाड पुरवलेत. त्यामुळेच मी यापूर्वी ‘दखलपात्र’ आणि ‘झुळूक आणि झळा‘  ही अग्रलेखांची दोन पुस्तके प्रकाशित केली. त्याच्या आवृत्याही हातोहात जात आहेत. सर्वात कमी वयात अग्रलेखांची पुस्तके प्रकाशित करणारा संपादक म्हणून सगळ्यांनी आम्हाला गौरविले. दै. ‘आपलं महानगर’मध्ये गेला काही काळ मी सातत्याने विविध पुस्तकांचे रसग्रहण करीत आहे. यातील निवडक पंचवीस लेखांचे ‘अक्षर ऐवज’ हे माझे तिसरे आणि ‘चपराक प्रकाशन’चे शंभरावे पुस्तक आपल्या सेवेत सादर करतोय.
सध्या वाचक कमी होत चाललेत, अशा अफवा काही प्रकाशक जाणिवपूर्वक पसरवत असताना आम्ही साहित्य आणि प्रकाशन विश्‍वात नवनवे प्रयोग करतोय. त्याला वाचकांचा उदंड प्रतिसादही मिळतोय. ‘चपराक’चा साहित्य महोत्सव हे नव्या जुन्या लेखकांसाठी एक हक्काचे व्यासपीठ ठरतेय. आपले प्रचंड प्रेम आणि मिळणारा पाठिंबा या बळावर भविष्यातही आम्ही असेच जोमाने कार्यरत राहू, याची प्रकाशक या नात्याने ग्वाही देतो आणि 19 जानेवारीला दुपारी 2 ते सायंकाळी 9 पर्यंत चालणार्‍या या महोत्सवाला आपणही उपस्थित रहावे यासाठी प्रकाशक या नात्याने निमंत्रण देतो.
अधिक माहितीसाठी संपर्क - 7057292092

Saturday, January 14, 2017

बदलापूर आणि सोलापूर

सध्या थंडीचे दिवस आहेत. या गारव्यात वैचारिक ऊब देण्याचे काम साहित्य संमेलने करतात. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे वारे वाहू लागताच राज्यभर अनेक छोटीमोठी साहित्य संमेलने धडाक्यात पार पडतात. विविध ठिकाणी होणारी आणि विविध विचारधारांचा जागर घालणारी ही संमेलने आपल्या सांस्कृतिक समृद्धीत मोलाची भर घालतात. त्यामुळे या सगळ्या  संमेलनांचे महत्त्व मोठे आहे.
गेल्या 25 आणि 26 डिसेंबर रोजी बदलापूर येथे विचारयात्रा साहित्य संमेलन झाले. ‘संमेलनपूर्व संमेलन’ अशी जाहिरात आयोजकांनी केली होती. महाराष्ट्र साहित्य परिषदेची कुळगाव-बदलापूर शाखा, आगरी युथ फोरम - डोंबिवली (यंदाच्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे आयोजक), सुहृद एक कलांगण - बदलापूर आणि ग्रंथसखा वाचनालय यांनी एकत्र येऊन हे संमेलन भरवले होते. नियोजित संमेलनाध्यक्ष अक्षयकुमार काळे हेच याही संमेलनासाठी अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.
श्याम जोशी हे ग्रंथालय चळवळीतील एक मोठे नाव. नुकतेच महाराष्ट्र शासनाने त्यांना ग्रंथालय चळवळीच्या माध्यमातून मराठी वाचनसंस्कृती रूजवण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल कवीवर्य मंगेश पाडगावकर यांच्या नावे दिला जाणारा ‘भाषा संवर्धक’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर केला आहे. बदलापूर येथे ते ‘ग्रंथसखा’ हे अतिशय नेटके आणि समृद्ध ग्रंथालय चालवतात. ‘दुर्मीळ ग्रंथसंग्रहक’ अशी त्यांची ओळख आहे. तर या श्याम जोशी यांच्या प्रयत्नातून हे संमेलन पार पडले.
विचारयात्रा साहित्य संमेलनात पहिल्या दिवशी उद्घाटन सोहळा झाल्यानंतर निमंत्रितांचे कवीसंमेलन झाले. अशोक नायगावकर, प्रदीप निफाडकर, दामोदर मोरे, राजीव जोशी, मंदाकिनी पाटील, वैजनाथ जोशी, अनुपमा बेहेरे, विश्‍वास जोशी यांनी ही मैफल रंगवली. सुप्रसिद्ध कवी अरूण म्हात्रे यांनी सूत्रसंचालन केले. त्यानंतर साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांची मुलाखत झाली. याठिकाणी ‘सदानंद मोरे ग्रंथ महोत्सव’ भरवला होता. मात्र त्यात कोणीही सहभागी झाले नाही. मोरेंच्या नावे ग्रंथमहोत्सव भरवल्याची कुत्सित चर्चा मात्र सुरू होती. रात्री ‘प्रतिबिंब’ हा नृत्य, नाट्य आणि कवितांचा कोलाज असलेला कार्यक्रम झाला.
दुसर्‍या दिवशी पहिला परिसंवाद होता, ‘अश्‍लिलता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ या विषयावर. अनंत देशमुख यांचे अत्यंत अभ्यासपूर्ण बीजभाषण झाले. यात मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, ज्येष्ठ पत्रकार शशिकांत सावंत आणि ‘चिन्ह’ या नियतकालिकाचे संपादक सतीश नाईक सहभागी झाले होते. सावंतांनी त्यांचे लैंगिक विषयावरील वाचनाचे आणि लेखनाचे अनुभव सांगितले. सतीश नाईक यांनी मात्र स्वअनुभव सांगताना अत्यंत पाल्हाळीक आणि रटाळ माहिती दिली. प्रत्येकाला वीस मिनिटे दिलेली असताना त्यांनी पहिली वीस मिनिटे ‘सनातन’च्या साधकांनी त्यांना कसा त्रास दिला, ते दिसायचे कसे, बोलायचे कसे, वागायचे कसे, अंक चालवताना दडपण कसे येते यावरच घालवली. त्यांची चाळीस मिनिटे झाल्यावर नाईलाजाने संयोजकांनी त्यांना चिठ्ठी पाठवली. ती त्यांच्याकडे देत असताना त्यात काय लिहिलेय हेही न पाहता त्यांनी ‘माझे भाषण थांबविल्याचा निषेध आणि यावर मी आता कसे लिहितो ते पहाच’ असे म्हणत सभागृह सोडले. त्यांनी सभा संकेताचा भंग करत व्यासपीठ सोडल्यावर प्रा. मिलिंद जोशी यांनी मात्र त्यांच्या नेहमीच्या खुसखुशीत शैलीत वेळ निभावून नेली. त्यांच्या समारोपाच्या भाषणाने रसिक तृप्त झाले.
पुढच्या सत्रात ‘कथा कशी समजून घ्यावी’ या विषयावर संजय भास्कर जोशी यांनी व्याख्यान दिले. निलिमा बोरवणकर यांची आवेशपूर्ण कथा झाली. प्रतिमा इंगोले यांनी वैदर्भिय भाषेत कथाकथन केले मात्र ते रसिकांच्या डोक्यावरून गेले. संध्याकाळचा ‘साहित्य संमेलनाने नेमके काय साधते?’ या विषयावरील परिसंवाद मात्र उत्तम झाला. विनय हर्डीकर, महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालिका मंजुषा कुलकर्णी, सदानंद मोरे, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी आणि मिलिंद जोशी यांनी हा परिसंवाद रंगवला.
या परिसंवादाला आणि एकूणच साहित्य संमेलनाला जेमतेम शंभरएक लोक उपस्थित होते. श्रीकांत जोशी, श्याम जोशी, रवींद्र गुर्जर या सर्वांनी संमेलन यशस्वी करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र उपस्थिती आणि काही अपवाद वगळता कार्यक्रमांचा दर्जा अत्यंत सुमार होता. मान्यवर लेखक, त्यांचा पाहुणचार, बडेजाव, भोजन आणि निवासाची उत्तम व्यवस्था असे साहित्यबाह्य विषय दखलपात्र होते; मात्र लाखो रूपये खर्च करूनही या संमेलनाचे फलित काय, हा मात्र चिंतेचा आणि चिंतनाचा विषय आहे.
सोलापूरच्या संमेलनाची परिस्थिती याउलट होती. हे पहिलेच आदिवासी धनगर साहित्य संमेलन! मात्र यात नवखेपणाच्या खुणा कुठेही दिसत नव्हत्या. भंडारा उधळून या संमेलनाचे अनोख्या पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. सुप्रसिद्ध साहित्यिक आणि संशोधक संजय सोनवणी हे संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते. सोलापूरातील हुतात्मा स्मारक मंदिर रसिकांनी खचाखच भरले होते. बाहेर पडद्यावर लोक कार्यक्रम पाहत होते. पुस्तकांची विक्री तडाख्यात होती. ‘आपले संमेलन‘ म्हणून सर्वजण आत्मियतेने सहभागी होते. संजय सोनवणी यांच्यासारखा अभ्यासू संमेलनाध्यक्ष, डॉ. अभिमन्यू टकले यांच्यासारखे आयोजक, अमोल पांढरे यांच्यासारखे तळमळीने अहोरात्र कार्यरत असलेले कार्यकर्ते या सर्वांचे साध्य म्हणजे हे अभूतपूर्व आणि पूर्ण यशस्वी संमेलन. धनगर आणि आदिवासींच्या नावे होणार्‍या या संमेलनाला किती लोक गोळा होणार अशी सर्वांनाच चिंता होती! मात्र सर्वांचेच अंदाज साफ खोटे ठरले आणि सभागृह खचाखच भरले. समाजबांधवांची बौद्धिक भूक भागविणारा हा कार्यक्रम ठरला.
या संमेलनात आदिवासी धनगरांचे गजनृत्य आणि ओव्यांचे सादरीकरण झाले. आदिवासी धनगर पुरातनाचे एक वास्तव, आदिवासी धनगरांच्या महिलांसमोरील समस्या आणि नवयुगातील आव्हाने, आदिवासी धनगर समाजाचा इतिहास, माध्यमातील धनगर समाजाचे चित्रण, मराठी साहित्यात धनगर समाज दुर्लक्षित का?, धनगर समाजाच्या उज्ज्वल भवितव्याचा राजमार्ग, धनगर आरक्षण लढाई अशा अभ्यासपूर्ण विषयांवर परिसंवाद झाले. अत्यंत नेटके नियोजन, शिस्तबद्धता, एका जातीच्या अस्मितेला उजाळा, पंढरपूरच्या पांडुरंगापासून ते सातवाहन, महाराजा छत्रपती यशवंतराव होळकर, पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर,  स्वातंत्र्यसेनानी भीमाबाई होळकर अशा सर्वांच्या आदर्शवादी तत्त्वांचा जागर घालण्यात आला.
मुख्य म्हणजे सध्या जातीय अस्मिता टोकदार बनत चाललेल्या असताना यात सर्व जातीचे लोक वक्ते म्हणून आणि रसिक म्हणून सहभागी होते. इतर जातींविषयी कोणीही द्वेष व्यक्त केला नाही. आपले बांधव एकत्र येऊन या बिकट परिस्थितीतून कसे मार्ग काढू शकतील याविषयी सर्वजण तळमळीने बोलत होते. या साहित्य संमेलनात धनगर इतिहास परिषद आणि धनगर साहित्य परिषद सुरू करण्याचा ऐतिहासिक संकल्प करण्यात आला. त्यादृष्टिने सर्वांनी जोरदार तयारीही सुरू केली. प्रस्थापितांविरूद्ध रडत बसण्याऐवजी स्वाभिमानाने पुढाकार घेत एक नवा इतिहास निर्माण करण्याचे हे धाडस हेच या संमेलनाचे मोठे फलित आहे. प्रस्थापित संमेलने मानपानात आणि रिकामटेकड्या डामडौलात अडकलेले असताना एक उपेक्षित वर्ग पुढे येऊन त्यांच्या जाज्ज्वल्य इतिहासाचे स्मरण करत असेल, त्यातून नव्या पिढीपुढे आदर्शांचे मनोरे उभे करत असेल तर हे निश्‍चितच अभिमानास्पद आणि कौतुकास्पद आहे. संजय सोनवणी, डॉ. टकले, जयसिंगतात्या शेंडगे, छगनशेठ पाटील, अमोल पांढरे या सर्वांच्या प्रयत्नांना आलेले हे मधुर फळ आहे.
मुळात आपण सर्वजणच पशुपालक. पूर्वी शिकारीवर आपली उपजिविका चालायची. त्यानंतर मनुष्य पशुपालन करू लागला आणि त्यातून शेतीचा शोध लागला. याच शोधातून वेगवेगळे उद्योग निर्माण झाले आणि या उद्योगातून जातींचा जन्म झाला. या जातीपातीत आपण इतके अडकलोय की, आपल्या अस्मिताच बोथट झाल्यात. जे मूळ आदिवासी आहेत त्यांनाच दुर्दैवाने आपण कमी लेखू लागलोय. त्यामुळे या संमेलनाची नितांत गरज होती. ती गरज पहिल्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनाने पूर्ण केली आहे.
बदलापूर आणि सोलापूर या दोन्ही साहित्य संमेलनात हाच तर फरक होता! मात्र काहीही असले तरी अशी संमेलने आपली भाषा, साहित्य, संस्कृती जिवंत ठेवण्यात मोठा हातभार लावत असल्याने त्यांचे स्वागतच करायला हवे. आदिवासी - धनगरांनी यादृष्टिने एक पाऊल पुढे टाकून महाराष्ट्राचा सांस्कृतिक परिघ तिकडे सरकल्याचे सिद्ध केले आहे. ‘उपेक्षित ते अपेक्षित’ या न्यायाने ही संमेलनेच समाजाचे वैचारिक भरणपोषण करू शकतील.
 - घनश्याम पाटील, पुणे
7057292092

Sunday, January 8, 2017

मराठवाड्याची बहिणाबाई!


आभाळ दाटल्यावर काय होतं?
पाऊस कोसळतो!

आणि ‘अंतरी’चे आभाळ दाटल्यावर?
अस्सल कविता बरसतात!!

पाऊस पडल्यानंतरची प्रसन्नता आणि अंतःकरणातले काव्यमय विचार कागदावर उतरल्यानंतरची भाव्यात्मकता फारशी वेगळी नसते. धो धो बरसणार्‍या सरी पाण्याचा दुष्काळ नष्ट करतात आणि अंतरीच्या सरसर येणार्‍या ओळी मन मोकळे करतात. ‘आकाश’ आणि ‘आभाळ’ याच्यात हाच तर फरक आहे. आकाश कसं? नेहमीच निरभ्र! ‘आभाळ’ मात्र भरून आलेलं! आपल्या वर्षावानं धरतीला तृप्त करण्यासाठी सरसावलेलं! आमची मराठवाड्याची ‘बहिणाबाई’ म्हणजे कवयित्री सौ. विद्या बयास ठाकूर यांचा ‘आभाळ अंतरीचे’ हा कवितासंग्रह याच पठडीतला! मनातलं सारंसारं व्यक्त करताना त्यांची काव्यात्म अनुभूती वेगळ्याच उंचीवर जाते.
सुटून जातात माणसं
तुटून जातात नाती
आयुष्यभर काळजावरती
एक जखम भळभळती

असं लिहिणार्‍या विद्या बयास यांनी त्यांचे जीवनानुभव समर्थपणे मांडले आहेत. अर्थात, यातल्या सर्वच कविता अनुभवातून आल्यात असंही नाही. स्त्रीत्त्वाच्या हृदयानं घेतलेली अनुभूतीही त्यांनी लेखणीच्या माध्यमातून मांडली आहे. कवयित्री मुळूमुळू रडत बसणारी कोणी अबला नाही. स्वतंत्र विचारधारेची, आजच्या पिढीचे नेतृत्व करणारी, अन्याय-असत्यावर तुटून पडणारी ती एक बंडखोर प्रतिनिधी आहे. ‘फिनिक्स’ या पहिल्याच कवितेत ती म्हणते,
मी एक फिनिक्स राखेआड दडलेला
कितीही गाडलं तरी पुन्हा पुन्हा उडणारा

स्त्रीत्वाचं सामर्थ्य मांडतानाच
झुंजूमुंजू होण्याआधी
रात नको होऊ देऊ
गर्भातल्या अंधारात माझा
घात नको होऊ देऊ

अशी रास्त अपेक्षा व्यक्त करत ही ‘माय माऊली’ स्त्री भ्रुणहत्या थांबविण्याचे कळकळीचे आवाहन करते.
आपल्या मनातल्या जोडीदाराविषयी लिहिताना या कवयित्रीचा आविष्कार पहा -
असा हवा जोडीदार
स्वप्नातला राजकुमार
धडपडत्या पावलांना
नकळत जो देईल आधार
आकाशाची ओढ मला
क्षितिजापर्यंत माझ्या कक्षा

धावण्याचा कैफ मला
उडण्याची डोक्यात नशा

विद्या बयास यांचा हा पहिलाच कवितासंग्रह! तरीही मी त्यांना ‘मराठवाड्याची बहिणाबाई’ असंच म्हणतो. काहींना हे विशेषण म्हणजे अतिशयोक्ती वाटेल. वाटू देत! पण त्या त्या क्षेत्रातील मनोर्‍यांचा वारसा पुढे कुणीतरी चालू ठेवावा लागतो. विद्याताई हा वारसा जपत आहेत. त्यांच्या काही ओळी बघाच -
एखादी स्त्री मुक्त होताना
समाज इतका का अस्वस्थ होतो?
बाईच्या देहातसुद्धा
एक स्वतंत्र आत्मा वसतो
/ (अनुत्तरीत प्रश्‍न)

रोज नवीन प्रश्‍न समोर
रोज नवी आव्हाने
सांग कसे लक्षात राहिल
जीवनाचे मंजूळ गाणे
/ (झिंग)

माझ्या बदलत्या मोसमांचा
तुला कधीच अंदाज नसतो
रम्य, अहंकारी मोरसुद्धा
मेघांसाठी नाही
त्याच्या सहचारिणीसाठी नाचतो
/ (शिकायत)

प्रेताचं एक बरं असतं
एकदाच ते तर जळत असतं
बाईतल्या रूपातलं एक जीवन
रोज कितीदा मरत असतं
/ (बाई)

विद्या बयास यांच्या या संग्रहात 59 रचना आहेत. मम्मटाची ‘स्वान्तसुखाय’ची कल्पना इथे दिसत नाही. विद्याताई त्यांच्या लेखणीतून आजचे प्रश्‍न मांडतात. अनेक तरल भावना व्यक्त करतानाच मधुनच अंगार फुलवतात. जीवनात समरसून गेलेल्या प्रत्येकालाच हा आपल्याच भावनांचा आविष्कार वाटेल. मनातील वेदना शब्दबद्ध झाल्याची जाणीव होईल. आभाळ कोसळल्यानंतर जो मृद्गंध दरवळतो तशी प्रसन्नता अनुभवता येईल. शब्दलालित्य आणि यमकांचा हव्यास न धरता, त्यात न गुरफटता विद्याताई प्रांजळपणे आणि उत्फुर्तपणे व्यक्त होतात. जीवनाचे प्रतिबिंब त्यांच्या लेखणीत उमटते. मानवी स्वभावाचे मुलभूत चिंतन त्यातून प्रगट होते.
संघर्षातून शिक्षण पूर्ण केेलेल्या विद्याताई मराठवाड्यातील शिरूर ताजबंद येथे प्राध्यापक या नात्याने विद्यादानाचेच काम करतात. या परिसरावर उर्दू आणि कन्नड भाषेचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे काही ठिकाणी त्यांनी हिंदी (खरंतर उर्दू) शब्दांचा चपखल वापर केला आहे. मात्र हे शब्द मराठवाड्याच्या लोकजीवनात इतके एकरूप झालेत की ते मराठी नाहीत हे कुणाला सांगूनही पटणार नाही.
बाईच्या काळजाचा
कुणा लागना कधी ठाव
वरून शिनगार साजरा
काळजात खोल घाव

असं मानणार्‍या विद्याताईंनी अनेक घाव यशस्वीरित्या पचवलेत. त्याची तमा मात्र त्या बाळगत नाहीत.
आभाळ अंतरीचे
तू चंद्र त्यात माझा
चुकवून चांदण्याला
उधळून ऊन गेला

अशी स्त्रीसुलभ अंतर्व्यथा त्या मांडतात.
आई, मुलगी, जोडीदार यांच्याविषयीच्या त्यांच्या प्रामाणिक भावना या कवितांतून शब्दांकित झाल्या आहेत. त्यामुळे वाचकांना या कविता आपल्याच आयुष्याचा चलचित्रपट वाटेल. त्यात कुठंही नैराश्य नाही तर नव्याने उभं राहण्याची, सुसज्ज होण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती आहे. हा असा आशावादच प्रत्येकाच्या आयुष्यात सुखाची दारं उघडतो. हतबलता, नैराश्य पळवून लावून वाचकांचे मनोरंजनातून प्रबोधन करतो. हीच तर कोणत्याही प्रतिभावंताची कसोटी असते. विद्याताई या कसोटीत अव्वल उतरल्यात. प्रेमाचा आविष्कार व्यक्त करतानाच त्यांनी जीवनातील सत्य त्यांच्या कवितेतून ठळकपणे अधोरेखित केले आहे. काव्यक्षेत्रातील त्यांची सुरूवात दमदार झाली असून भविष्यात त्यांच्याकडून विपुल साहित्यनिर्मिती होईल अशी अपेक्षा ठेवायला मोठा वाव आहे. त्यांच्या भावी लेखनप्रवासास आमच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
कवयित्री - विद्या बयास (7841968366)
प्रकाशक - निर्मल प्रकाशन नांदेड
पाने - 71, किंमत - 80


- घनश्याम पाटील, पुणे 
७०५७२९२०९२ 

गडकरींचे नाटक आणि ब्रिगेडचा ‘ड्रामा!’

आपल्या समाजाला सध्या एक मोठी कीड लागलीय. सर्व महापुरूषांना आपण जातीपातीत वाटतोय. बरे, त्यांचे काही विचार अंमलात आणतोय असेही नाही. आचार्य विनोबा भावे म्हणायचे की, ‘महापुरूषांचा पराभव त्यांचे अनुयायीच करतात.’ त्यांच्या या विचाराची सत्यता गेल्या काही वर्षात दिसून येत आहे. आमच्या जातीय अस्मिता अधिक टोकदार होत चालल्यात. यातून किमान त्या त्या समाजाचे भले होतेय असेही नाही. भालचंद्र नेमाडे यांच्यासारख्या ज्येष्ठ लेखकाने ‘समाजशास्त्रीय भूमिका’ म्हणून जातीवादाला खतपाणी घातले. त्या-त्या जातीपातीतील लोक एकत्र आल्यास त्यांच्या समस्या सुटायला हातभार लागेल अशी त्यांची भाबडी समजूत; मात्र आपण स्वार्थाच्या आणि विविध विचारधारांच्या इतके आहारी गेलोय की आपले स्वत्वच हरवत चाललेय.
पुण्यात संभाजी उद्यानातील नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा काही समाजकंटकांनी रात्रीतून काढून टाकला. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हे कृत्य केल्याचे त्यांच्यावतीने सांगण्यात आले. नितेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेनेही या दुष्कृत्याची जबाबदारी घेतली. एखादी अतिरेकी, दहशतवादी संघटना एखादा घातपात घडल्यानंतर तो आपण घडवल्याचे ज्या आविर्भावात सांगते तोच आवेश ही जबाबदारी घेणार्‍यांचा होता. ज्या गोष्टीची लाज वाटायला हवी तीच घटना अभिमानाने मिरवणार्‍यांना काय म्हणावे? यापूर्वी भांडारकर इन्स्टिट्यूट फोडणार्‍यांनी, दादोजी कोंडदेव यांचा पुतळा लालमहालातून काढणार्‍यांनी, वाघ्याचा पुतळा फोडणार्‍यांनीच राम गणेश गडकरींचा पुतळा काढून टाकला आहे. साहित्य, नाट्य, चित्रपट क्षेत्रातील धुरिणांनी या घटनेचा निषेध केला असला तरी या गुन्हेगारी कृत्याची आणि त्यांच्या निगरगट्ट मानसिकतेची गंभीर नोंद घ्यायलाच हवी.
‘संभाजी ब्रिगेड’ या संघटनेचे नुकतेच राजकीय पक्षात रूपांतर झाले आहे. यापूर्वीही या मंडळींनी एक राजकीय पक्ष काढला होता. त्यावेळीही सपशेल तोंडावर आपटल्यानंतर त्यांनी हाच प्रयत्न पुन्हा केला आहे. सध्या पुण्या-मुंबईसह काही महत्त्वाच्या महानगरपालिकांच्या निवडणुका तोंडावर आल्याने जनतेचे लक्ष वेधण्यासाठी म्हणून त्यांचे असे केविलवाणे प्रयत्न सुरू आहेत. नवनिर्मितीची क्षमता नसल्याने हे लोक विध्वंसच घडवणार हे पुन्हा पुन्हा त्यांच्या कृत्यातून दिसून येतच आहे. आजवर या लोकांचे भरणपोषण ज्यांनी केले त्यांच्यासाठीही ही मोठी डोकेदुखी झाली आहे. राम गणेश गडकरी यांचा पुतळा त्यांनी काढून टाकल्यानंतर पुण्याचे महापौर प्रशांत जगताप यांनी ‘लवकरच तो त्या ठिकाणी पुन्हा सन्मानपूर्वक बसवण्यात येईल’ असे सांगितले आहे. मुख्य म्हणजे दादोजींचा पुतळा हटवला त्यावेळीही मोहनसिंग राजपाल हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच महापौर होते. जगतापही राष्ट्रवादीचेच आहेत. त्याहीवेळी ‘दादोजींचा पुतळा आठ दिवसाच्या आत पुन्हा बसवण्यात येईल,’ अशी घोषणा राजपालांनी राणा भीमदेवी थाटात केली होती. अजूनही त्याचे काय झाले हे कळले नाही.
राम गणेश गडकरी यांनी ‘राजसंन्यास’ हे नाटक लिहिले. खरेतर ते अपूर्णच होते. त्यातील जिवाजी कलमदाने हे एक खलपात्र आहे. दुष्ट वृत्तीचे हे पात्र शिवाजी महाराजांविषयी चुकीचे बोलते. मुख्य म्हणजे याच पात्राने समर्थ रामदास स्वामी यांचीही निंदानालस्ती केली आहे. गडकरी हे काही इतिहासकार नाहीत. त्यांनी हे चरित्रात्मक लेखन केले नाही. रावणाने रामाचे गोडवे गावेत किंवा अफजलखानाने शिवाजीराजांचे पोवाडे गावेत अशी अपेक्षा ठेवताच येणार नाही. हे खलपात्र ज्या भाषेचा वापर करते ते चूक की बरोबर हा वाद होऊ शकतो. मात्र ‘महाराष्ट्र गीत’ लिहिणारे आणि लक्षवेधी साहित्य संपदा असणारे गडकरी ‘व्हिलन’च होते असा निष्कर्ष काढणे अविवेकी आहे. 1907 साली लिहिलेल्या या नाटकावरून 2017 साली ‘ड्रामा’ करणे हे निव्वळ राजकारण आहे.
चार तरूण कार्यकर्त्यांनी संभाजी उद्यानातून हा पुतळा काढला आणि तो मुठा नदीत फेकून दिला. ही चारही मुले उच्चशिक्षित असून त्यांनी ‘सर्जिकल स्ट्राईक’ केल्याचे संभाजी ब्रिगेडकडून सांगण्यात येत आहे. यांना सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय, याचा पत्ता असणे शक्य नाही. देशभक्ती काय असते हेही यांना सांगून उपयोग नाही. मात्र हे अविचारी, तालिबानी वृत्तीचे, दहशतवादी स्वरूपाचे कृत्य आहे इतकेही कळू नये याचे आश्‍चर्य वाटते. संभाजी ब्रिगेडच्या चिथावणीवरून ज्या तरूणांनी भांडारकर इन्स्टिट्यूटची तोडफोड केली त्यांचे काय हाल झाले हे एकदा मुद्दामहून बघायला हवे. या कुणालाही कसल्याही नोकर्‍या मिळत नाहीत. त्यांना धड व्यवसाय-उद्योग करता येत नाही. कोर्टाच्या तारखा पडल्यानंतर उपस्थित राहण्यासाठी, प्रवासासाठीही यांच्याकडे पैसे नसतात. बाहेरचे सोडा पण कुटुंबातील सदस्यही यांच्याशी परकेपणे वागतात. अशावेळी कोणतेही ‘माफीवीर’, ‘शिवीश्री’ त्यांच्याबाजूने उभे राहत नाहीत. यांची होणारी ससेहोलपट पाहिल्यानंतर असे गुन्हेगारी कृत्य करायला कोणीही धजावणार नाही. तरूणांचा ‘ब्रेन वॉश’ करून राजकारण करणारे मात्र नामानिराळे राहतात.
पुतळ्यामुळे कुणाला फार स्फूर्ती मिळते असेही नाही. मात्र आपल्या देशात पुतळ्यांचे ‘फॅड’ आहे. त्यात सर्वाधिक पुतळे राजकारण्यांचे आहेत. काही राज्यात साहित्यिक, विचारवंत,  संतमहात्मे, समाजसुधारक, शास्त्रज्ञांचे पुतळे आहेत; पण त्यामुळे कुणी फार प्रेरणा घेतलीय आणि देशाच्या विकासात भरीव योगदान दिलेय असेही नाही. उलट पुतळ्यांची सुरक्षा, त्यांची विटंबना यामुळे अनेक वाद निर्माण होतात. शिवसागरात तयार करण्यात येणारा शिवरायांचा पुतळा असेल, बाळासाहेब ठाकरे यांचा मुंबईतील पुतळा असेल किंवा आता इंदू मिलमध्ये संकल्पित असलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल... या प्रत्येक पुतळ्यावर, त्या प्रकल्पावर कोट्यवधींची उधळपट्टी करण्यात येते. पैशाचा असा बाजार मांडण्याऐवजी त्या त्या महापुरूषांचे विचार जपण्यासाठी काही करता आले तर अवश्य विचार व्हावा.
इतिहासाची तोडफोड हा तर अनेकांचा जिव्हाळ्याचा विषय झालाय. आपल्याला हवे ते वाक्य घ्यायचे, त्याचे मागचे-पुढचे संदर्भ न लावता त्याचा अर्थ लावायचा आणि श्रद्धास्थानांना तडा देऊन राजकारण पेटवायचे हे इथल्या व्यवस्थेत काहीजणांच्या ‘उपजिविकेचे’ साधन झालेय. उदाहरणच घ्यायचे झाले तर महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेबांच्या ‘राजा शिवछत्रपती’चे घेता येईल. बाबासाहेबांनी लिहिले, ‘बालशिवाजी, दादोजी कोंडदेव आणि आऊसाहेब यांचे गोत्र एकच...’ या वाक्यावरून आऊसाहेबांची बदनामी झाली म्हणून काहींनी महाराष्ट्र पेटवला. ते मूळ वाक्य असे होते, ‘बालशिवाजी, दादोजी कोंडदेव आणि आऊसाहेब यांचे गोत्र एकच... ते म्हणजे सह्याद्री!’ यातील ‘ते म्हणजे सह्याद्री’ हे काढून टाकायचे आणि आपणच आपल्या श्रद्धास्थानांची बदनामी करायची असे निलाजरेपण काहीजण करतात.
गडकरींच्या ‘एकच प्याला’तले तळीराम शोभावेत असे काही लोक कोणत्याही काळात असतात. त्यांना पर्याय नसतो. त्यांच्या विकृत मानसिकतेचा राष्ट्राला मात्र मोठा फटका बसतो. अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त होते. रोजच्या भाकरीचा प्रश्‍न बिकट असताना आपण पुतळ्यासारख्या विषयावरून राजकारण करतोय, राज्य पेटवतोय याचे काहीच सोयरसुतक अशांना नसते. त्यांच्या बोलबच्चनगिरीला बळी पडलेल्यांची मात्र पुढे केविलवाणी अवस्था होते. ‘विचारांची लढाई विचारांनीच लढली पाहिजे’ असे बेंबीच्या देठापासून ओरडून सांगणारे मात्र अशा प्रकारानंतर मूग गिळून गप्प बसतात. त्यांचा ‘निषेध’, ‘प्रतिक्रिया’ हे सर्व काही सोयीस्कर असते.
महापुरूषही काळाच्या रेट्यात कसे दुर्लक्षित राहतात याबाबत रॉय किणीकर यांनी त्यांच्या एका रूबाईत सांगितलेय,
कोरून शिळेवर जन्म मृत्युची वार्ता
जा ठेवा त्या जागेवर पणती आता
वाचेल कुणीतरी होताना उत्खनन
म्हणतील कोण हा? कशास याचे स्मरण?

गडकरींचा पुतळा काढल्याने थोडेसे विस्मृतीत गेलेले त्यांचे साहित्य पुन्हा चर्चेत आले आहे. जे ‘राजसंन्यास’ फार कुणी वाचले नव्हते ते यानिमित्ताने पुन्हा घराघरात पोहोचले आहे. गडकरींच्या नाटकावरून ‘ड्रामा’ करणार्‍यांचे हे यश आहे की अपयश आहे हे त्यांचे त्यांनीच पडताळून पहावे.
-घनश्याम पाटील, पुणे
7057292092

Wednesday, January 4, 2017

ही तर मेकॉलेचीच अवलाद!

मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा

असे महन्मंगल काव्य लिहिणारे राम गणेश गडकरी आज पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पुण्यासारख्या महानगरातून यापूर्वी दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवण्यात आला होता. आज संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा काढून टाकून पुणे शहराचा ‘सिरीया’ झालाय हे काही अपप्रवृत्तींनी दाखवून दिले आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद, अखिल भारतीय चित्रपट महामंडळ, पुण्यातील साहित्यिक, कलावंत, प्रकाशक यांनी तातडीने एकत्र येऊन या प्रवृत्तींचा निषेध केला आहे. संभाजी ब्रिगेडचे संघटनेतून राजकीय पक्षात रूपांतर झाल्यानंतर असे प्रकार घडणे अपेक्षित असले तरी ते अत्यंत दुर्दैवी आहे. महाराष्ट्रावरील हा सांस्कृतिक बलात्कार तमाम मराठी माणसांनी एकत्र येऊन थांबवायला हवा.
‘विचारांची लढाई विचाराने लढायला हवी’, हे गुळगुळीत वाक्य बेंबीच्या देठापासून ओरडून सांगणार्‍यांची तालिबानी वृत्तीच यातून दिसून येते. उपलब्ध असलेल्या साधनांच्या आधारे इतिहास, नाटके, कथा-कादंबर्‍या लिहिल्या जातात. मुळात हे लिखाण करणारे सर्वजण इतिहास संशोधक असतातच असे नाही. त्यामुळे प्रत्येकाच्या कलाकृतीत काहीना काही आक्षेपार्ह असे असतेच. वाचकांची त्या त्यावेळची मानसिकता आणि बदलत्या काळानुसार ते लेखन कोणाला आवडते तर कोणाला आवडत नाही. राम गणेश गडकरी यांनी त्या काळात लिहिलेले ‘राजसंन्यास’ हे नाटक तसे अपुरेच राहिले. या नाटकातील जिवाजी कलमदाने या पात्राने शिवाजी राजांची बदनामी केल्याचे आत्ता म्हणजे शंभरहून अधिक वर्षांनी काही जणांना उमजले. कुठून ना कुठून महापुरूषांची वादग्रस्त विधाने शोधायची आणि त्यावरून खल करत रहायचा हा काही समदु:खी लोकांचा उद्योगच होऊन बसलाय. जिवाजी कलमदाने हे पात्र या नाटकात देहू या पात्राजवळ फुशारकी मारताना छत्रपती शिवरायांविषयी वाईट बोलते. किंबहुना या जिवाजीने समर्थ रामदास स्वामींची यथेच्छ नालस्ती केली आहे. शिवरायांच्या कर्तृत्वावर संशय घेताना तो रामदास स्वामी यांच्याविषयी वाटेल ते तारे तोडतो. मुळात हे खलपात्र भ्रष्ट आहे. त्याच्याकडून चांगल्याची अपेक्षा कशा ठेवता येतील? रावणाने रामाची महती गावी किंवा अफजलखानाने शिवरायांचे पोवाडे गावेत अशी अपेक्षा ठेवणे मुर्खपणाचे नाही का?
‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकावरूनही आत्तापर्यंत झालेली झुंडशाही आपण बघितलेली आहेच. विजय तेंडुलकर यांच्या ‘घाशीराम कोतवाल’वरून राडा झाला. आता ‘राजसंन्यास’ या अर्धवट नाटकातील एका पात्राच्या संवादाने अकारण महाराष्ट्र पेटवला जात आहे. कोणत्याही साहित्य कृतीतून आपल्याला हवा तितका भाग सोयीस्करपणे घेतल्यास रामायण, महाभारत अशा महाकाव्यावरूनही राष्ट्र पेटवले जाऊ शकते.
संभाजी उद्यानातून राम गणेश गडकरींचा पुतळा हटवल्याने ते नाट्यरसिकांच्या आणि वाचकांच्या हृदयातून मुळीच जाणार नाहीत. देशातील सर्वच साहित्यिकांचे, विचारवंतांचे, शास्त्रज्ञांचे पुतळे काढून टाकावेत आणि केवळ राजकारण्यांचे पुतळे देशभर लावावेत, अशी अपेक्षा यानिमित्ताने साहित्य आणि नाट्यक्षेत्रातील दिग्गजांनी अतिशय हताशपणे व्यक्त केली. देशभर अनेक छोट्या-मोठ्या राजकीय नेत्यांचे पुतळे असताना त्यांचे विचार समाजमनावर प्रभाव पाडून गेेलेत असे म्हणता येणार नाही.
पुतळे उभारून स्फूर्ती कधी मिळते का?
सरावाचे झाल्यावर नजर तरी वळते का?

अशा आशयाची एक वास्तववादी कविता आपणा सर्वांना ज्ञात आहेच; मात्र महापुरूषांचे असे पुतळे काढून आपण आपल्या श्रद्धास्थानांना तडा देतोय. ज्यांच्या साम्राज्यात सूर्य कधीच मावळत नव्हता अशा ब्रिटीश सल्तनतचीही गडकरींना हात लावायची हिंमत झाली नव्हती. किंबहुना गडकरींनी त्यांच्या अजरामर साहित्यातून समाजाला एक नवी दिशा दिली. त्यांच्या ‘एकच प्याला’तील तळीरामाचे वारसदार आज महाराष्ट्रात अकारण हैदोस घालत आहेत. राम गणेश गडकरी यांनी मराठी भाषेसाठी जे योगदान दिले, त्याला तोड नाही.
‘जरिपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकची देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा’

असे म्हणणार्‍या गडकरींचा भगवा आजचा नव्हता. मराठी साहित्याचा विजयध्वज ठरणारा तो भगवा कुण्या एका पक्षाचा, कुण्या एका विचारधारेचा नव्हता.
‘अंजनकांचन करवंदीच्या काटेरी देशा
बकुळ फुलांच्या प्राजक्ताच्या दळदारी देशा’

असे गर्जून सांगणार्‍या गडकरींच्याबाबत आजच्या दरिद्री लोकांनी जे कारस्थान केले ते निश्‍चितच निंदणीय आहे. मराठी साहित्य, भाषा, संस्कृती यांच्याशी कसलेच देणे-घेणे नसलेल्या नीच लोकांचे हे काम आहे. लॉर्ड मेकॉले या ब्रिटीश शिक्षणतज्ज्ञाने त्यावेळी सांगितले होते की, ‘‘हिंदुस्तान हा सुजलाम् सुफलाम् देश आहे. या देशातून सोन्याचा धूर निघतो. इथल्या गुरूकुल शिक्षणपद्धतीमुळे इथली पिढी संस्कारशील आहे. देव, देश आणि धर्मासाठी जीव ओवाळून टाकणारे हे लोक प्रचंड श्रद्धावान आहेत. त्यामुळे त्यांच्यावर राज्य करणे आपल्याला कदापि शक्य होणार नाही. बंदुकीच्या जोरावर हिंदुस्तान आपल्याला जिंकता येणार नाही. या देशावर राज्य गाजवायचे असेल तर इथली गुरूकुल शिक्षण पद्धत आधी नष्ट करा, यांच्या श्रद्धास्थानांना तडा द्या. यांची श्रद्धा कमकुवत झाली तरच ते डळमळीत होतील आणि त्यांच्यावर आपल्याला राज्य गाजवता येईल.’’ लॉर्ड मेकॉलेची औलाद शोभणार्‍यांनी त्यांच्या विचारांची अंमलबजावणी सुरूच ठेवली आहे. लालमहालातून दादोजी कोंडदेवांंचा पुतळा काढणे असेल किंवा आज संभाजी उद्यानातून राम गणेश गडकरींचा पुतळा काढणे असेल यातून मेकॉलेचीच वृत्ती दिसून येते.
‘कोणतीच भूमिका घ्यायची नाही’, ही एकच भूमिका साहित्यिक आणि विचारवंत इमानेइतबारे पार पाडत असताना साहित्यिक आणि नाट्य क्षेत्रातील दिग्गज आज रस्त्यावर उतरले आहेत, ही त्यातल्या त्यात जमेची बाजू आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, सुप्रसिद्ध नाटककार श्रीनिवास भणगे, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, प्रविण तरडे, महेश मांजरेकर, सुनिल महाजन, डॉ. सतिश देसाई, योगेश सोमण अशा सर्वांनी संभाजी उद्यानात एकत्र येऊन आपला निषेध नोंदवला आहे. ‘यानिमित्ताने राम गणेश गडकरी आजच्या पिढीला माहीत तरी होतील’ , असेही काहीजण सांगत आहेत. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्यापासून अनेक दिग्गजांना घडविणारा गडकरीसारखा हिरा अशापद्धतीने प्रकाशात यावा, हे दुर्दैवी आहे.
आपल्याकडे औरंगजेब कायम चर्चेत राहतो मात्र संस्कृततज्ज्ञ असलेल्या दारा शुकोकडे पूर्ण दुर्लक्ष केले जाते. कुपमंडूक वृत्तीच्या इथल्या विचारवंतांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्यही सोयीस्कर असते. भांडारकर इन्स्टिट्यूटची तोडफोड असेल, दादोजी कोंडदेवांचा पुतळा काढणे असेल किंवा राम गणेश गडकरींचा पुतळा हटवणे असेल या सर्वांतून मेकॉलेची अवलाद पुन्हा कार्यान्वित झाल्याचे दिसून येते. एकीकडे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि देशाचे पंतप्रधान जातीभेद, धर्मभेद करू नका असे तळमळीने सांगत असतानाच आमच्या जातीय अस्मिता अधिक घट्ट होत चालल्यात.
गडकरींचा पुतळा काढून टाकणार्‍यांनीच यापूर्वी महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावरही आक्षेप घेतले होते. वाघ्याचा पुतळाही त्यांनी काढून टाकला होता. सुप्रसिद्ध साहित्यिक आणि संशोधक संजय सोनवणी यांनी त्यांचे हे कारस्थान हाणून पाडले होत. दुर्दैव म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनीच गडकरींचा पुतळा हटविण्यात आला. हा कट चार-दोन दिवसात शिजलेला नाही. संभाजी ब्रिगेडच्या अजेंड्यावर असे अनेक विषय आहेत. त्यातूनच ते वेळोवेळी अनेक विखारी फुत्कार सोडतात. जून 2011 लाच संजय सोनवणी यांनी ‘राम गणेश गडकरींनी शिवरायांची बदनामी केली आहे काय?’ हा लेख त्यांच्या ब्लॉगवर लिहिला होता. या विषयाचे गांभीर्य लक्षात यायला इतकी आठवण पुरेशी आहे.
एकीकडे सामान्य माणसाची रोजची जगण्याची लढाई सुरू असताना दुसरीकडे मात्र जातीय विष पेरणे, श्रद्धास्थानांना तडे देणे हे काम सुरूच आहे. मागच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्यानंतर हा पराभव जिव्हारी लागल्याने, सत्तेची ऊब मिळत नसल्याने काही नेते वेगवेगळ्या संस्था, संघटनांच्या माध्यमातून ही अशी अराजकता माजवत आहेत. सुज्ञ मतदार येणार्‍या निवडणुकांमध्येही अशा विचारधारेला, अशा कृत्यात सहभागी असणार्‍यांना सणसणीत चपराक देईल हे वेगळे सांगायला नको.

- घनश्याम पाटील
संपादक, प्रकाशक, ‘चपराक’
7057292092