मुंबईला परतताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर याना त्यांच्या एका मित्रासह सातारा रोड स्टेशनला जावे लागले. त्यावेळी त्यांचा चेहरा एकदम गोरामोरा झाला. एके ठिकाणी त्यांनी टांगा थांबवला आणि खाली उतरून ते एका मैदानात शिरले. अचानक ते व्याकुळ होऊन रडू लागले. मित्राला काय झाले काहीच कळेना. थोडा दुःखभार कमी झाल्यावर ते म्हणाले, "इथे माझ्या आईच्या अस्थी आहेत. तिने आम्हा सर्व भावंडांसाठी खूप खस्ता खाल्ल्या. या पलीकडच्या पडक्या वाड्यात आम्ही राहत होतो. काही दिवस आमची आई व भावंडे खडी फोडून मोलमजुरी करीत होती. मी या रानात लहानपणी खूप खेळलो. माझी आई व बाबा मी किती शिकलो हे पाहण्यास जगले नाहीत. मी फार दुर्देवी आहे," अशी हेलावून टाकणारी एक आठवण डॉ. माधवराव पोतदार यांनी त्यांच्या 'डॉ. आंबेडकरांचे सखे सोबती' या पुस्तकात नोंदवली आहे.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, अमर शेख, द. ना. गव्हाणकर यांचा विपुल सहवास लाभलेल्या डॉ. माधवराव पोतदार यांची शंभरहून अधिक पुस्तके प्रकाशित आहेत. महाड येथील वास्तव्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनेक मित्रांशी, सहकाऱ्यांशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. त्यातूनच त्यांनी हे संशोधनात्मक लेखन केल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनेक अपरिचित पैलू यात मांडण्यात आले आहेत.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनशिल्प कोरणारे त्यांचे वडील सुभेदार रामजी आंबेडकर यांच्यावर या पुस्तकात पहिलेच प्रकरण आहे. "आपले वडील धार्मिक स्वभावाचे होते. त्यांच्यामुळेच माझा धार्मिक पिंड घडला. हिंदू धर्मातून बौद्ध धर्मात जायचे ठरले ते त्यांच्यामुळेच" असे डॉ. बाबासाहेब त्यांच्या मित्राला म्हणजे वामनराव गोडबोले यांना सांगतात आणि "रामदासांचे श्लोक मला मिळतील का?" असा असा प्रश्नही विचारतात. रामदास स्वामी ब्राह्मण होते म्हणून त्यांनी त्यांचा धिक्कार केला नाही तसाच समर्थांच्या प्रगाढ ज्ञानाचाही केला नाही, ते ज्ञानाचे पूजक होते आणि मनाने सश्रद्ध होते हेच यातून सिद्ध होते.
बाबासाहेबांची प्राणप्रिय पत्नी रमाबाई आंबेडकर यांना बाबासाहेबांनी विलायतेतून पैसे मागताच रमाबाई बेभान झाल्या. त्यांनी धुणीभांडी केली, झाडलोट केली, शेण थापले, डोक्यावर गोवऱ्या घेऊन त्या विकल्या आणि त्यांना पैसे पाठवले. शिक्षणासाठी ते पैसे अगदी वेळेत मिळाल्यावर बाबासाहेब त्यांना पत्रातून लिहितात, "रमा, मला क्षमा कर! मी घरी आलो की तुझ्या हाताला तेल लावून देईन. तू पाठवलेले पैसे वेळेवर मिळाले. मला तुझा अभिमान वाटला. पत्नी असावी तर अशी! आयुष्याला साथ देणारी!"
ही कर्मयोगिनी त्यांना सोडून गेल्यावर मात्र ते अत्यंत अस्वस्थ झाले. तिच्यावरील उत्कट प्रेमामुळे त्यांनी रमाबाईंचे अंत्यसंस्कार हिंदू पद्धतीने त्यांच्या मुलाच्या हातून केले. याविषयी लिहिताना डॉ. पोतदार म्हणतात, "ते राजगृहात गाद्यागिरद्यावर लोळत होते पण पत्नीच्या फाटक्या लुगड्याचा त्यांना जराही विसर पडला नव्हता."
बाबासाहेबांचे अतिशय निकटवर्ती म्हणजे गंगाधर नीळकंठ सहस्त्रबुद्धे. ते बापूसाहेब नावाने ओळखले जात. बाबासाहेबांनी कधीही त्यांचा एकही शब्द अव्हेरला नाही. बापूसाहेब सहस्त्रबुद्धे आणि अनंतराव चित्रे हे दोन 'आगरकरी ब्राह्मण' डॉक्टरांच्या वैचारिक प्रवासातील मोठे साक्षीदार होते. बाबासाहेबांनी मनुस्मृती स्वतः न जाळता बापूसाहेबांच्या हातून एकेक पान होमकुंडात टाकले. त्यांनी स्वतः मनुस्मृती का जाळली नाही यावर भाष्य करताना डॉ. पोतदार लिहितात, बाबासाहेबांना मनुस्मृतीतील ब्रा ह्मण श्रेष्ठता, वर्णश्रेष्ठता याचे दहन ब्राह्मणांच्याच हातून करायचे होते. हे एकप्रकारचे सनातनी वृत्तीला दिलेले उत्तर होते. त्यातली दुसरी बाजू म्हणजे मनुस्मृती हा ज्ञानग्रंथ होता याची जाणीव त्यांना होती. त्यामुळे आपल्याच हाताने मनुस्मृतीला चूड लावणे त्यांना योग्य वाटले नसावे.
डॉ. बाबासाहेबांचे खास साथी आर. बी. मोरे यांच्याविषयी लिहिताना डॉ. आंबेडकर म्हणतात, "ज्या थोड्या व्यक्तीमुळे मी राजकारणात प्रवेश केला त्यातील एक म्हणजे हे मोरे." एक स्वार्थत्यागी आणि प्रामाणिक अनुयायी म्हणून बाबासाहेबांच्या परिवारात त्यांना मानाचे स्थान होते.
बाबासाहेबांच्या वाचनाचे साथी असलेले शां. शं. रेगे सर हेही असेच अफलातून व्यक्तिमत्त्व. सिद्धार्थ कॉलेजचं ग्रंथालय त्यांनी समृद्ध केलं. वाचनाची जबरदस्त भूक असलेल्या अशा महापुरुषाला हवे ते पुस्तक वेळीच उपलब्ध करून द्यायची तत्परता त्यांनी जपली. बाबासाहेबांची वाचनाची भूक शमविणे यासाठी त्यांनी त्यांचे आयुष्य वाहून घेतले.
बाबासाहेबांच्या कार्यात बापूसाहेब सहस्त्रबुद्धे, अनंत चित्रे यांच्याप्रमाणेच यशवंत परांजपे, सदाशिव बल्लाळ गोवंडे, हरी गणेश पटवर्धन, देवराव नाईक अशा अनेक 'ब्राह्मण' साथींचा सहभाग होता. याविषयी डॉ. पोतदार लिहितात, "डॉक्टरांचा लढा समतेचा होता. तो विषमतेविरुद्ध होता. त्यामुळे बाबासाहेब अस्पृश्यांनाच घेऊन लढले हा गैरसमज आहे."
देवराव नाईक यांची भूमिका समतावादी होती. ते म्हणायचे, "ब्राह्मणातला अहंकार हाच अनेक अनर्थांना कारणीभूत ठरला आहे."
देवरावांनी 'ब्राह्मण-ब्राह्मणेतर' हे पाक्षिक सुरु केले होते. त्याच्या पहिल्याच अंकात त्यांनी लिहिले होते, "पेशवाईच्या काळात ज्यांचा छळ झाला त्या गोवर्धन ब्राह्मण जातीचे आपण! केवळ ब्राह्मण जातीत जन्मला म्हणून भ्रष्ट ब्राह्मण इतर जातीतील कोणाहीपेक्षा श्रेष्ठ ही काही ब्राह्मणांची प्रवृत्ती जितकी आत्मघातकी आहे तितकीच 'ब्राह्मण ब्राह्मण तेवढा हरामखोर' ही काही ब्राह्मणेतरांनी पत्करलेली वृत्तीही आत्मघातकी व ऐक्य घातकीही आहे."
असे अनेक ब्राह्मण साथी असलेल्या आंबेडकरांचा विरोध ब्राह्मणांना नव्हता तर 'ब्राह्मण्याला' होता हे आजही समजून घेणे म्हणूनच गरजेचे आहे.
मैत्रीचा व कृतीचा चमत्कार असलेले सुरबानाना टिपणीस हेही त्यांचे खास मित्र होते. "सुरबा टिपणीस महाडला असताना तुम्ही मंडळी माझ्याकडे कशाला येता? तो तुम्हाला निश्चित न्याय मिळवून देईल" असे बाबासाहेब म्हणायचे.
भाईशेठ वडके हेही बाबासाहेबांचे एक महत्त्वाचे साथी. दुर्देवाने त्यांचा उजवा हात निकामी झाला व तो कापावा लागला. त्यांच्याबाबतची एक छान आठवण पोतदारांनी या पुस्तकात दिली आहे. चवदार लढ्यात ज्यांचा सहभाग होता त्यांचा बाबासाहेबांच्या सोबत एकत्रित फोटो काढायचे ठरले. त्यासाठी सर्वजण गांधी टॉकीजजवळ एकत्र जमले. बाबासाहेबांच्या लक्षात आले की यात भाई वडके नाहीत. त्यांनी छायाचित्रण थांबवले. भाईशेठविना फोटो निघणार नाही असे त्यांनी सांगितले. दुसऱ्या दिवशी 'महत्त्वाच्या कामासाठी भेटून जा' असा निरोप भाईंना दिला आणि मग सर्वांचा एकत्र फोटो काढला. आपल्या कार्यकर्त्यावर असे विलक्षण प्रेम ते करीत.
या पुस्तकातील महत्त्वाचा लेख म्हणजे बाबासाहेबांच्या सावली झालेल्या त्यांच्या पत्नी माईसाहेब आंबेडकर. बाबासाहेबांनी विझत्या प्राणज्योतीशी स्वतःची तुलना केलीय. या ज्योतीला तेवत ठेवण्याचे श्रेय त्यांनी माईना दिलेय. माईंचे शारदा हे नाव बदलून त्यांनी सविता हे नाव ठेवले. त्यातून त्यांनी माईंची तेजस्विता कबूल केली. बाबासाहेबांच्या जीवनातील अंधारलेली जीवनसाथी म्हणून त्यांच्या जीवनात प्रवेश करून माईंनी सवितेची म्हणजेच सूर्याची तेजस्विता प्रत्ययास आणून दिली आहे. हा लेख वाचताना वाचकांचे डोळे आपोआप पाणावतात. बाबासाहेबांना मिळालेला 'भारतरत्न' पुरस्कार स्वीकारण्याची कृतार्थ संधी माईंना मिळाली.
लोकमान्य टिळक यांचा विरोध उलटवून लावतानाच त्यांचे पुत्र श्रीधरपंत यांच्याशी मात्र त्यांचे घरोब्याचे संबंध होते. श्रीधरपंतांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना समर्थ साथ दिली. त्यांनी सनातन्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करताना शेवटचे पत्रही बाबासाहेबांनाच लिहिले. श्रीधरपंत टिळक यांच्या आत्महत्येने बाबासाहेबांच्या हृदयाला जखम झाली होती.
वैचारिक संवादासाठी जवळ गेलेले ग. त्र्यं. माडखोलकर यांच्याविषयीचा लेखही मस्त झालाय. बाबासाहेब भाऊसाहेबांना म्हणाले होते, "तुम्ही सगळे सवर्ण हिंदू मला अस्पृश्यांचा पुढारी समजता. माझ्याकडचे जे कार्यकर्ते आहेत त्यात मात्र तुम्हाला माझ्या जमातीचे फार लोक दिसणार नाहीत. कायस्थ प्रभू आणि ब्राह्मणच जास्त दिसतील. माझी भाषा आणि विचार ब्राह्मणांना लवकर समजतात आणि तो माझ्याशी चटकन समरस होतो."
प्रबोधनकार ठाकरे, पुढारीकार डॉ. ग. गो. जाधव, वामनराव गोडबोले, ना. ना. पाटील, आर. बी. मोरे, बाबासाहेबांवर श्रद्धा ठेवणारे अण्णासाहेब ललिंगकर यांच्यावरील लेखही वाचनीय आहेत. ललिंगकर यांना त्यांनी 'खान्देशचा वाघ' हा किताब दिला तर ललिंगकरांनी त्यांच्या मुलाचे नाव बाबासाहेबांच्या नावावरून 'जयभीम' असेच ठेवले. सुदाम गेनू या त्यांच्या सातवीपास नोकराला त्यांनी फक्त पगारच दिला नाही तर त्याचे बचतपत्रही काढून दिले.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करताना त्यांच्या निवडक स्नेहीजणांची ओळख व्हावी म्हणून डॉ. माधवराव पोतदार यांच्या या पुस्तकाची ही थोडक्यात ओळख करून दिली. ग्रंथ हेच गुरु मानणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वाला वंदन!
- घनश्याम पाटील, पुणे
७०५७२९२०९२
दैनिक 'पुण्य नगरी'
१४ एप्रिल २०२०