Sunday, March 15, 2020

‘जागर’ समर्थ महासंगमाचा!

उपासनेला दृढ चालवावे । 
भूदेव संताशी सदा नमावे ।
सत्कर्म योगे वय घालवावे । 
सर्वामुखी मंगल बोलवावे ॥
जय जय रघुवीर समर्थ ॥

वेद, उपनिषदं, धर्मग्रंथ वाचणं, साधना, तपश्‍चर्या करणं, देव-देश अन् धर्माच्या रक्षणासाठी प्राण पणाला लावणं हे आजच्या काळात प्रत्येकाला जमेलच असं नाही. ते जमावं अशी अपेक्षा ठेवणंही खुळेपणाचंच! मग हे सारं साध्य करायचं असेल तर काय करावं? त्यासाठी एक ‘समर्थ’ पर्याय आहे. तो प्रवाह ‘चैतन्य’दायी आणि प्रवाही आहे. मनावरचं मळभ, नैराश्येची पुटं दूर करणारा आहे. संसारात राहून भक्तीयोगाचा अर्थ समजावून सांगणारा आहे. मुख्य म्हणजे त्यासाठी आपल्या नित्यक्रमात फार काही बदल करावे लागतील असा तो पर्याय नाही. हा साधा पण आयुष्य बदलून टाकणारा मार्ग म्हणजे श्रीसमर्थ रामदास स्वामींनी घालून दिलेल्या आदर्शांचा अभ्यास करणं, आपल्या जगण्यात त्याचे काही अंश उतरवणं...!

रामदास स्वामी आपल्याला कर्मकांडं शिकवतात का? ते अंधश्रद्धेच्या गर्तेत ढकलतात का? आपला विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन दूर लोटतात का? संसारापासून पळ काढण्याचा सल्ला देतात का? तर त्याचं उत्तर स्पष्टपणे ‘नाही’ असंच आहे. उलट ते सांगतात, आधी प्रपंच करावा नेटका । मग साधावे परमार्थ विवेका ॥

व्यक्तिशः आमच्यावर समर्थ विचारांचा पगडा का आहे? तर त्यांनी ठामपणे सांगितलं की ‘ज्ञानोपासना’ हा भक्तीचाच एक मार्ग आहे. राजकारणही ते बहिष्कृत मानत नाहीत. स्त्रियांना कमी लेखत नाहीत. दुर्बलांचे समर्थन करत नाहीत. कोणत्याही परिस्थितीत विवेकापासून दूर जात नाहीत. जात-धर्म-पंथ भेदाला थारा देत नाहीत, ‘चोवीस तास देव-देव करत बसा’ असा निष्क्रियतेचा सल्ला देत नाहीत. मुख्य हरिकथा निरूपण । दुसरे ते राजकारण। तिसरे ते सावधपणा । सर्वांविषयी ॥ हा जगण्याचा मूलमंत्र मात्र ते देतात. 

त्याकाळातही त्यांच्याकडं प्रचंड ग्रंथसंग्रह होता ही गोष्ट ‘ग्रंथप्रेमी’ म्हणून आम्हाला नेहमीच सुखावते. औरंगजेबानं त्यांचे अनेक मठ उद्ध्वस्त केले. त्यातील अनमोल ग्रंथ जाळून टाकले. तरीही त्यातील साडेचार हजार ग्रंथ आजही धुळ्याच्या ‘समर्थ वाग्देवता’ मंदिरात उपलब्ध आहेत. हे ग्रंथ त्याकाळी कुणाला वाचायला हवे असतील तर समर्थशिष्य स्वहस्ते त्याच्या प्रती लिहून काढून इतरांना देत. ‘समर्थ प्रताप’ या ग्रंथातील सूचीनुसार त्याकाळी त्यांच्याकडं उपलब्ध असलेल्या ग्रंथसागरात विविध जातीधर्माच्या, पंथांच्या 85 ग्रंथकारांचे ग्रंथ होते. त्यात चोखा मेळा, सेना न्हावी यांच्यापासून ते शेख महंमद यांच्यापर्यंत सर्वांच्या ग्रंथांचा समावेश होता. विविध जातीधर्माचे लोक तिथं त्या ग्रंथांचा अभ्यास करायचे याच्या अधिकृत नोंदी मिळतात. सध्याच्या ‘बारामतीश्वरांनी’ त्यांना जगभरातून भेट स्वरूपात मिळालेल्या वस्तुंचं जे भव्य प्रदर्शन मांडलंय इतकं हे काम सोपं नव्हतं. या ग्रंथांच्या अभ्यासासाठी कुणाची परवानगी घ्यावी लागत नव्हती की त्यासाठी कसलं शुल्क भरावं लागत नव्हतं. जे कोणी ‘ज्ञानोपासक’ आहेत त्यांची ज्ञानाची भूक भागविण्यासाठी त्याला ईश्‍वरोपासनेचं अधिष्ठान देण्यात आलं होतं. 

त्यांना उपेक्षितांचं जगणं कळलं होतं. वंचितांचं अर्थशास्त्र कळलं होतं. स्वराज्याची आणि त्याच्या अस्तित्वाची किंमत ठाऊक होती. भक्ती आणि शक्तीची महती ज्ञात होती. मातृशक्तीची अगाध लीला त्यांनी हेरली होती. वेणाबाईसारख्या बालविधवेला अनुग्रह देणं, तिला कीर्तनाच्या कलेत तरबेज करणं, इतरांना अनुग्रह देण्याचे अधिकार देणं आणि मिरजच्या मठाच्या मठपती बनवणं यातून त्यांची स्त्री-पुरूष समानतेची दृष्टी दिसून येते. समर्थांच्या निर्वाणानंतर त्यांच्या शिष्या असलेल्या अक्कास्वामींनी समर्थ संप्रदायाचं नेतृत्व केलं. महत्त्वाचं म्हणजे वेणाबाईंना ‘वेणास्वामी’, अक्काबाईंना ‘अक्कास्वामी’ असं विशेषणही त्या काळापासून लावण्यात येतंय. ‘मातृशक्तीला स्वामित्वाचा अधिकार देणारे समर्थ’ हेच तर खर्‍या पुरोगामित्वाचे मानदंड आहेत. ‘स्त्रियांना आम्ही 33 टक्के आरक्षण दिले’, ‘स्त्री-पुरूष समानतेची शिकवण आम्हीच दिली’ असा वृथा अहंकार बाळगणार्‍यांनी समर्थ चरित्राचा अभ्यास केल्यास त्यांचा अहंकार आणि न्यूनगंड दूर होण्याची शक्यता आहे. 

थोडक्यात काय तर समर्थांनी सर्वप्रकारचा संकुचितपणा दूर सारला. ‘चिंता करितो विश्‍वाची’ असं आपल्या बालवयात सांगणार्‍या समर्थांनी आपल्या सततच्या चिंतनातून समाजाला व्यापक दृष्टी दिली. शारीरिक आणि मानसिक सुदृढतेचं दुसरं नाव म्हणजेच समर्थ रामदास स्वामी! सर्वप्रकारच्या समानतेचा, समरसतेचा बुलंद आवाज म्हणजे रामदास स्वामी!! म्हणूनच ते काळाच्या प्रवाहात अभेद्य राहतात. कोणत्याही परिस्थितीत त्यांचे विचार कालबाह्य होत नाहीत. जगण्याला दिशा देण्याचं काम ते अव्याहतपणे करतात. आजच्या कट्टरतावादाच्या काळात तर कधी नव्हे इतकी त्यांच्या विचार-आचारांची, आचरणाची गरज आहे. 

प्रभू श्रीरामचंद्रांनी समर्थांना अनुग्रह देऊन चारशे वर्षे उलटली. त्यानिमित्त पुण्यातील चैतन्य ज्ञानपीठानं मराठवाड्यातील श्रीसमर्थ जांब या समर्थांच्या जन्मगावी समर्थसंगमाचं आयोजन केलं. त्याची माहिती वाचकांना व्हावी, त्याची अनुभूती मिळावी या उद्देशानं हा अंक या उपक्रमाला समर्पित करत आहोत. 

‘चैतन्य ज्ञानपीठ’ ही नेहमीच्या पठडीतल्या विद्यापीठासारखी बाजारू संस्था नाही. चैतन्याचे मानवी मनोरे उभे करण्याचं असिधारा व्रत जपणारे आणि सशक्त, समर्थ व बलशाली भारताचं स्वप्न साकारण्यासाठी धडपडणारे कर्तबगार समर्थप्रेमी यासाठी पुढं सरसावले आहेत. त्यांची आचार-विचारांची दिशा सुस्पष्ट आहे. म्हणूनच धार्मिकतेचं अवडंबर न माजवता, समाजसेवेचे बुरखे न पांघरता, व्यापारी मनोवृत्तीचं ओंगळवाणं प्रदर्शन न घडवता ही सर्व मंडळी परोपकार आणि समाजोद्धारासाठी धडपडत आहेत. श्रीसमर्थांच्या विचारांची दिव्य प्रेरणा, समर्थहृदय शंकर देवांचे आदर्श, निर्मळ आणि निकोप वृत्तीच्या कृतिशिलांचं संघटन यामुळं हा रथ वेगात पुढे जाईल याबाबत आमच्या मनात कसलाच किंतू नाही.

जांब येथे झालेल्या समर्थ संगमात अद्रश्य काडसिद्धेश्‍वर स्वामी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी, आचार्य स्वामी गोविंददेव गिरी यांनी अनमोल मागदर्शन केलं. चैतन्य ज्ञानपीठाची पुढची दिशा ठरण्यास हे सारं महत्त्वपूर्ण ठरणारं आहे.

श्रीसमर्थ जांब या गावात या महासंगमाचं आयोजन केल्यानंतर संस्थेचे अध्यक्ष डॉ. करमळकर यांनी गावातील बुद्धविहाराची स्वच्छता केली. तिथल्या सर्व बांधवांना या समर्थ संगमाचं निमंत्रण दिलं. समर्थांनी घालून दिलेल्या सामाजिक एैैक्याचंच हे प्रतीक आहे. त्यामुळंच सर्व समाजबांधवांनी या उपक्रमात आपली वर्णी लावली. 

भारताच्या नकाशाच्या हृदयस्थानी असलेलं हे छोटंसं गाव गुगलच्या नकाशात दिसतं की नाही हे आम्हास माहीत नाही पण आगामी काळात श्रीसमर्थ जांब हे प्रत्येकाचा अभिमानाचा, गौरवाचा केंद्रबिंदू नक्की असेल याची मात्र खात्री वाटते. हा विश्वास सार्थ ठरवणं ही फक्त ‘चैतन्य ज्ञानपीठा’च्या पदाधिकार्‍यांचीच जबाबदारी नाही तर समाज म्हणून आपलंही ते कर्तव्य आहे. याच सामाजिक भानातून डिसेेंबर 2019 च्या अंकानंतर ‘साहित्य चपराक’ मासिकाचा हा अंकही श्रीसमर्थ वंदनेच्या उद्देशानं प्रकाशित करत आहोत. आमच्या परिवाराचे ज्येष्ठ सदस्य आणि समर्थ संगमाच्या आयोजन-नियोजनातील एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व असलेल्या दिलीपराव कस्तुरे काकांचे यामागील परिश्रम आणि त्यांच्या समर्थनिष्ठा अलौकिक आहेत, हे कृतज्ञतापूर्वक नमूद करतो आणि थांबतो.
जय जय रघुवीर समर्थ! 
- घनश्याम पाटील
7057292092

5 comments:

  1. खूपच अप्रतिम!
    जयजय रघुवीर समर्थ!!

    ReplyDelete
  2. घनश्याम पाटील जी.
    समर्थ विचार हे कायमच कालातीत आणि सर्वांनी आचरणात आणायचे आहेत.त्यांनी आयुष्यभर हेच सांगितले आणि त्यांचे ग्रंथ ही हेच सांगतात..जे त्यांचे विचार आचरणात आणतात त्याचं भाल झालंय..बाकीचे ...'कितीयेक जन्मले आणि मेले' या सदरात मोडतात...आपण खूप हृदयस्पर्शी लेखन केला आहे.आपलं कार्य झपाट्याने जनमानसाची नाडी पकडत आहे.आपणास शुभेच्छा...

    ReplyDelete
  3. अतिशय सुंदर लेख.समर्थ रामदास पुरोगामी होते.समाजमनाला योग्य दिशा देणारे होते. त्यांच्या चरित्राचा अभ्यास आजही आपल्याला दीपस्तंभा प्रमाणे आहे.हे सारे विचार वाचायला ठीक आहे पण पचवायला कठीण आहे.ते आपण अतिशय सोपे करून सांगितले.धन्यवाद.

    ReplyDelete