|
सुभाष कुदळे (लेखक) |
जाणारे जातील येणार्यांनी यावे
या चषकामधले मद्य चमकते प्यावे
क्षणभंगुर सगळे त्यावर नंतर बोलू
ही मैफिल मित्रा सदा पाहिजे चालू...
रमेश गोविंद वैद्य यांच्या रूबाया मी कार्यालयात बसून वाचत होतो. माझे सहकारी ऐकत होते. मध्येच सुभाष कुदळे यांनी मला थांबवले. ते म्हणाले, ‘‘जाणारा गेला. माझ्या आयुष्यात फार मोठी पोकळी निर्माण झालीय. ही मैफिल फार काळ चालू राहिल असे मला वाटत नाही...’’
हृदयात चर्र झाले! आमचे सर्वांचे लाडके राजाभाऊ परदेशी आम्हाला सोडून गेले होते. त्यांची आणि कुदळे सरांची बालपणापासूनची गट्टी. दोघेही पुणे महानगरपालिकेच्या परिवहन महामंडळात कामाला. वास्तव्यही शेजारी शेजारीच. कुदळे आणि परदेशी म्हणजे ‘दो हंसो का जोडा’. कुठेही गेले तरी दोघंही एकत्रच जाणार!
आम्ही घुमानच्या संमेलनाची तयारी करत होतो. त्या दिवशी दुपारी बाराच्या दरम्यान राजाभाऊ एकटेच कार्यालयात आले. मला म्हणाले, ‘‘सुभाषच्या पुस्तकाचे डीटीपी झालेले स्क्रीप्ट द्या. तुम्ही घुमानहून येईपर्यंत मी वाचून घेतो.’’ माझ्या सहकार्याने त्यांना प्रिंटस् दिल्या. ते घेऊन ते कुदळेंच्या घरी गेले. दोघेजण थोडावेळ क्रिकेट पाहत होते. साडेतीनच्या दरम्यान कुदळेंच्या घरून ते बाहेर पडले आणि चार वाजता अचानक त्यांना फोन आला की, ‘राजाभाऊ गेले...’ साश्रू नयनांनी त्यांनी आम्हाला फोन केला. तीन-चार तासापूर्वी भेटून गेलेला माणूस असा अचानक जातो हे सत्य पचवणे अवघड होते. मात्र नियतीपुढे कुणाचे काय चालणार?
त्यानंतर सुभाष कुदळे सर खंगत गेले. त्यांचा एकटेपणा सहजपणे कुणालाही जाणवायचा. ‘चपराक’च्या कार्यालयात आल्यानंतर त्यांचे डोळे आपोआप पाणवायचे. आम्हीही अस्वस्थ व्हायचो आणि आज सकाळी फोन आला की, ‘‘अण्णा गेले.’’ हा आमच्यासाठी धक्काच आहे. ‘चपराक’चे एक महत्त्वाचे लेखक गेल्याने आम्ही शोकसागरात आहोत.
तेव्हा ‘चपराक’चे कार्यालय काळ्या हौदाजवळ होते. प्रकाश खानविलकर, राजाभाऊ परदेशी, सुभाष कुदळे ही पीएमटीतील मंडळी ‘चपराक’मध्ये सातत्याने लिहायची. एकदा राजाभाऊ आणि कुदळे सर आमच्याकडे आले आणि त्यांनी गंभीरपणे मला सांगितले, ‘‘मी ‘समईची वात’ आणि ‘दंगल’ या कादंबर्या लिहिल्या. ‘प्रितीची ओंजळ’ हा काव्यसंग्रह आहे. मात्र कुणी फारसे वाचत नाही. लेखक म्हणून माझी वाढ संपलीय का? तुम्ही संपादक आहात. न्याय करा...’’
मी त्यांची पुस्तके ठेऊन घेतली. त्याची धाटणी लक्षात आली होती. त्याच्या पुढच्या भेटीत मी त्यांना सांगितले, ‘‘तुम्ही आता निवृत्त झाला आहात. आजोबांच्या भूमिकेत आहात. आता त्याच नात्याने बालसाहित्य लिहा. तुमची पुस्तके मी छापतो. ती वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवतो.’’
‘बालसाहित्य लिहिणे जमेल का?’ अशी शंका त्यांच्या मनात होती. त्यांना म्हणालो, ‘‘आजोबा म्हणून पुढच्या पिढीला अंतःकरणापासून जे सांगावेसे वाटते ते सांगा. बिनधास्त लिहा. पुस्तकाची आणि विक्रीची चिंता करू नकात. ती माझी जबाबदारी. तुम्ही फक्त लिहा.’’ राजाभाऊंनीही माझ्या म्हणण्याला पाठिंबा दिला. ते म्हणाले, ‘‘सुभाष तू मनावर घे. लिही. ही पुस्तके खपली नाहीत तर मी विकतो. नुकसान होणार नाही हा माझा शब्द.’’
त्यानंतर काही दिवसातच त्यांनी मला त्यांच्या लेखनाचं बाड आणून दिलं. साध्या, सोप्या, रसाळ भाषेतून त्यांनी संस्काराचे बीज पेरले होते. चिमुकल्यांच्या भावविश्वात आनंद पेरताना ते हरखून गेले होते. त्यांचे आम्ही ‘नवलकथा’ हे बालसाहित्याचे पुस्तक प्रकाशित केले. त्याची आवृत्ती हातोहात गेली. त्यानंतर त्यांचा उत्साह वाढला आणि त्यांनी ‘चार शिलेदार’ ही किशोर कादंबरी लिहिली. तीही आम्ही ‘चपराक’कडून प्रकाशित केली. सर्व वृत्तपत्रांनी त्यांच्या या कसदार लेखनाची दखल घेतली. दूरदर्शनने त्यांची मुलाखत घेतली आणि ती ‘सह्याद्री’ वरून प्रसारितही केली. मग मात्र ते खुलले. सातत्याने लिहू लागले. ‘या चिमण्यांनो परत फिरा रे’ हे पुस्तकही त्यांनी तितक्याच उत्साहात पूर्ण केले.
त्यांच्या पुस्तकासाठी ते माझ्या प्रस्तावना आग्रहपूर्वक घ्यायचे. ‘यांच्यामुळे मी लिहिता झालो, हे नसते तर लेखक म्हणून मी संपलो असतो’ असे प्रत्येक व्यासपीठावरून ते अभिमानाने सांगायचे. मी संकोचायचो. ‘असे सांगू नका’ असे मी त्यांना बजावल्यावर ते सांगायचे, ‘मला समाधान मिळते. सत्य लोकांसमोर आले पाहिजे. तुम्ही वयाने लहान आहात; मात्र मी पुन्हा तुमच्यामुळे उभारी आणि भरारी घेतलीय...’ मीही तिथल्या तिथे तो विषय सोडून द्यायचो.
ज्येष्ठ पत्रकार विनायक लिमये यांनी एकदा ‘चपराक’ कार्यालयात त्यांना सुचवले, ‘‘तुम्ही पीएमटीत होता. आता पीएमटीचा इतिहास लिहा. तुमचे आयुष्यच त्यात गेल्याने त्यात जिवंतपणा येईल.. राजाभाऊ तुम्हाला त्यात मदत करतीलच...’’ हे त्यांनी मनावर घेतले. मात्र त्यात थोडा बदल करून त्यांनी पीएमटीचे चालक आणि वाहक यांच्या सुखदुःखावर आधारित कादंबरी लिहायचा घाट घातला. कात्रज ते निगडी हा बसमार्ग डोळ्यासमोर ठेऊन ‘बस नंबर बेचाळीस’ ही लघुकादंबरी लिहिली. ‘सजग नागरिक मंच’चे विवेक वेलणकर यांची प्रस्तावना त्यासाठी त्यांनी प्रयत्नपूर्वक मिळवली.
महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, डॉ. सदानंद मोरे, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ. श्रीपाल सबनीस अशा मान्यवरांच्या उपस्थित त्यांच्या पुस्तकांची प्रकाशने ‘चपराक’च्या व्यासपीठावर झाली. त्यामुळे ते म्हणायचे, ‘‘माझ्या आयुष्याचे सार्थक झाले.’’ त्यांचे ‘बस नंबर बेचाळीस’ हे पुस्तक शेवटच्या टप्प्यात असतानाच राजाभाऊंनी आम्हा सर्वांचा कायमचा निरोप घेतला. त्यामुळे ते हादरले. ‘आता माझे काय होणार?’ असे ते सातत्याने म्हणायचे. मित्रवियोगाचे दुःख त्यांना कधीच लपवता आले नाही. त्यांची काळजी वाढली होती. पुढे हे पुस्तक प्रकाशित झाले. एका पिशवीत प्रती घेऊन ते प्रत्येक बस डेपोत फिरायचे. अधिकारी, कर्मचार्यांना दाखवायचे. पहिली आवृत्ती त्यांनी अवघ्या पंधरा दिवसात स्वतःच खपवली. ‘हे बघायला राजा असायला हवा होता’ असे ते कित्येकदा म्हणायचे. या पुस्तकाच्या दुसर्या आवृत्तीचे काम आता सुरू आहे. मुखपृष्ठ छापून झालेय. दुसर्या आवृत्तीच्या निमित्ताने त्यांचे मनोगत थोडेसे बदलून आतील पाने छपाईला द्यायची होती... आणि आज ही बातमी आलीय. ‘पराधीन आहे जगती पूत्र मानवाचा’ हे असे दुर्दैवीरित्या कायम सिद्ध होते.
‘‘माझा नातू इंग्रजी माध्यमात आहे. त्याला अजिबात मराठी वाचता आणि बोलता येत नव्हते. मात्र ‘आजोबांचे पुस्तक’ म्हणून तो माझ्याकडून या कथा सतत ऐकायचा. हळूहळू तो वाचायला लागला. आता तो उत्तम मराठी बोलतो आणि मराठी वाचतो देखील. ‘चपराक’मुळे बालसाहित्य लिहू लागलो. मात्र त्यातून माझा नातू मराठी वाचतोय हा माझ्यासाठी सर्वोच्च पुरस्कार आहे’’ असे ते सातत्याने सर्वांना सांगायचे.
काही दिवसापूर्वीच त्यांचे पीएमपीएममधील सहकारी मोहन ननावरे यांचा दूरध्वनी आला. त्यांनी सांगितले, ‘‘कुदळेंना दवाखान्यात दाखल केलेय. प्रकृती स्थिर आहे. ऍन्जीओप्लास्टीची शस्त्रक्रिया व्यवस्थित पार पडलीय.’’
मागच्या आठवड्यात ‘चपराक’चे सलग चार कार्यक्रम झाले. त्या धावपळीत त्यांच्याकडे जायचे जायचे म्हणत तसेच राहून गेले. कालच त्या व्यापातून थोडा निवांत झालो. आमच्या कार्यकारी संपादिका म्हणाल्या, ‘‘उद्या आपण कुदळेंना भेटून येऊ...’’ आणि आज सकाळी सकाळीच फोन आला, ‘‘अण्णा गेले....’’
काय बोलावे? नियतीच्या मनातले कोणीच ओळखू शकत नाही. आपल्या भावनांच्या भळभळत्या जखमा कायम वाहत राहतात. अनेकवेळा रंगवलेल्या मैफली, विविध विषयांवरील चर्चा, सुखदुःखाचे प्रसंग हे सारे सारे फक्त आठवणीतच राहते.
या दुःखातून सावरायचे बळ त्यांच्या घरच्यांना मिळो आणि सुभाष कुदळे सरांच्या आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांच्या स्मृतीस भावपूर्ण आदरांजली!!
- घनश्याम पाटील
संपादक, ‘चपराक’, पुणे
7057292092
‘पुस्तक हेच मस्तक’ किंवा ‘वाचाल तर वाचाल’ अशी अर्थपूर्ण वाक्यं आपण कायम ऐकत असतो. पुस्तकांचं वाचन हे तर आवश्यकच; पण त्याहूनही अत्यावश्यक असतं ते म्हणजे माणसांची मनं वाचणं. राष्ट्रीय-आंतराष्ट्रीय विषयावरील राजकीय विश्लेषक आणि अभ्यासक राजू परूळेकर यांना माणसांची मनं वाचण्याचा असाच छंद जडला. त्यातूनच ई टिव्हीला ‘संवाद’ हा कार्यक्रम सुरू झाला आणि त्यात त्यांनी थोड्या-थोडक्या नव्हे तर तब्बल सव्वा तीन हजार मुलाखती घेतल्या. इतक्या हरहुन्नरी माणसांची व्यक्तिमत्त्वं उलगडून दाखविणं हे सोपं काम नाही. ही किमया परूळेकरांनी साध्य केली. त्यातील ‘भारतरत्न’ बनण्याची योग्यता असलेल्या माणसांच्या मुलाखतींची पुस्तकं प्रकाशित करण्याचा घाट त्यांनी घातला आहे. या मालिकेतील ‘ते आणि मी’ हे पुस्तक ‘नवचैतन्य प्रकाशन’च्या सुप्रिया मराठे यांनी देखण्या स्वरूपात प्रकाशित केले आहे. या मुलाखतींवरील साधारण सहाशे पुस्तके प्रकाशित होतील असा परूळेकरांचा आशावाद आहे. (तो मूर्त रूपात आल्यास दर्जेदार मराठी साहित्यात मोठी भर पडेल.)
राजू परूळेकर हे नाव महाराष्ट्राच्या पत्रकारितेत आदराने घेतले जाते. या माणसाने अनेकांना बोलते केले, लिहिते केले. असंख्य वादळे झेलूनही ते कधी डगमगले नाहीत. आव्हानांना धीरोदात्तपणे सामोर्या जाणार्या परूळेकरांनी आजच्या पत्रकारांसाठी आदर्शांचे मनोरे उभारले. परूळेकर म्हणतात, ‘‘बर्याचवेळा आपण प्रश्नांची उत्तरे शोधत राहतो; पण संपूर्ण आयुष्याचा प्रवास पूर्ण झाला तरी उत्तरे काही मिळत नाहीत. प्रश्नांची उत्तरे नसतातच मुळी. आपण प्रश्न शोधायला विसरतो.’’
‘मुलाखत घेणं ही एक कला आहे. ते शास्त्र, तंत्र किंवा मंत्र अजिबात नाही’ हे ठासून सांगतानाच या पुस्तकाद्वारे त्यांनी त्यांचे विधान सिद्धही केले आहे. आपल्या सभोवताली अनेक ‘भारतरत्न’ आणि ’महाहिरो’आहेत. ज्यांना आपण ओळखलेलंच नाही. अशांची ओळख या पुस्तकाद्वारे करून देण्याचा प्रयत्न राजू परूळेकर यांनी यशस्वीरित्या केला आहे. विजय तेंडुलकर, योद्धा शेतकरी शरद जोशी, गिरीश कर्नाड, प्रसिद्ध कथालेखिका सानिया, डॉ. अभय बंग, डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. रविंद्र कोल्हे यांच्या प्रेरणादायी मुलाखती या पुस्तकात आहेत. मुख्य म्हणजे शेवटी त्यांनी ’सेल्फ प्रोटे्रट’ही दिलं आहे. (साहित्यसूचीच्या दिवाळी अंकात आलेली राजू परूळेकर यांची ही मुलाखत म्हणजे जेवणानंतरची स्वीट डिशच!) त्यामुळं या पुस्तकाचं पान न पान वाचनीय आणि शब्द न शब्द मननीय झाला आहे. विजय तेंडुलकर यांची अत्यंत प्रगल्भ मुलाखत, त्यांचा जीवनपट उलगडून दाखवतेच; पण ’विजय तेंडुलकर : एका प्रश्नाचा शोध’ हा या पुस्तकातील परूळेकरांचा लेखही प्रत्येकाने वाचायलाच हवा असा आहे.
चांगलं लिहिणं आणि ते सातत्याने लिहिणं याविषयी बोलताना तेंडुलकर म्हणतात, ‘कुणीही लेखक हा मधून मधून चांगलं लिहितो. सातत्याने चांगलं लिहिणारा लेखक अजून मला भेटायचा आहे’ तेंडुलकरांसारखी पर्वतप्राय व्यक्तिमत्त्वं समजून घेण्याासाठी अशी पुस्तकं वाचायलाच हवीत. केवळ ‘गरज’ म्हणून आणि प्रसंग निभावून नेण्यासाठी विविध साहित्यप्रकार ताकतीनं हाताळणारे तेंडुलकर येथे भेटतात.‘तेंडुलकरपूर्व’ आणि ‘तेंडुलकरोत्तर’ अशी रेषा आखण्यास भाग पाडणारा हा महालेखक; मात्र ‘आमच्यावर कोण प्रेम करणार?’ ही पहिली कथा त्यांनी केवळ दिवाळी अंकाची गरज म्हणून लिहिली. व्यंकटेश माडगूळकरांनी ऐनवेळी कथा लिहायला नकार दिल्यानंतर संपादक श्री. रा. बिवलकर यांनी त्यांना चक्क एका खोलीत कोंडलं आणि ‘कथा लिहून झाल्याशिवाय सुटका होणार नाही’ असं सांगितलं.
या पुस्तकात समावेश असणारी सर्वच ‘बाप’माणसं आहेत. त्यामुळे प्रत्येक मुलाखत एखाद्याचं आयुष्य घडवायला पुरेशी! ‘साहित्य म्हणजे विरंगुळ्याबरोबर येणारा उपदेश असा समज पक्का होत गेला. ज्या दोन-तीन लेखकांनी हा समज पुसून टाकला त्यात तेंडुलकर बिनीचे होते’ असे परूळेकर सांगतात. ‘जगताना भूमिका घेऊन त्यासाठी लढणं आणि त्यासाठी ती भूमिका जगणं या दोन वेगळ्या व एकाचवेळी निभावण्यासाठी अत्यंत कठीण गोष्टी आहेत’ हे तेंडुलकर खूप सुक्ष्मपणे सूचित करतात, असे निरीक्षण नोंदवतानाच ‘शिवसेना व जनसंघ प्रतिगामी होता म्हणून त्यांनी तेंडुलकरांना विरोध केला व समाजवादी व कम्युनिस्ट पुरोगामी होते म्हणून त्यांनी तेंडुलकरांना पाठिंबा दिला असं मानणं ही घोर फसवणूक होय’ असे मत परूळेकरांनी या पुस्तकात स्पष्टपणे नोंदवलं आहे. ‘मला लहानपणापासून स्वातंत्र्याची तहान आहे’ असं सांगणार्या शरद जोशी यांची मुलाखत खूप काही सांगून जाते. किंबहूना ‘ज्यांनी सामान्य शेतकर्याला योद्धा बनविलं आणि सामान्य शेतकरी स्त्रीला लक्ष्मी बनविलं त्या शेतकरी संघटनेच्या आत्म्यास...’ अशा शब्दात परूळेकरांनी शरद जोशी यांना हे पुस्तक कृतज्ञतापूर्वक अर्पण केलं आहे. एडिसनने दिव्याचा शोध लावून काय मिळवलं? काहीच नाही मिळवलं. त्याच्यामुळे प्रकाश सगळ्या लोकांना मिळाला असं शरद जोशी सांगतात. ‘इंडिया-भारत’ची कल्पना मांडणार्या शरद जोशी यांनी ‘गरिबांच्या नावाने भीक मागण्याचा धंदा ते हिंदुस्थानातले मोठमोठे डिप्लोमॅटसुद्धा करत आहेत. याची शिसारी त्याहीवेळी आली होती’ असं सांगितलं आहे. स्विर्त्झलँडमधील ऐशोआरामी नोकरी सोडून चाकणमध्ये शेती करणारे शरद जोशी म्हणतात, ‘कोेणत्याही पुस्तकाच्या दुकानात गेलं आणि एखादं पुस्तक आवडलं तर ते घेताना पुस्तक वळवून त्याची किंमत पडताळून पाहण्याची आवश्यकता पडता कामा नये. हे पुस्तक मला आवडलं, हे मला घ्यायचं आहे, संपला विषय.’
आपल्याकडे सध्या देशाच्या लोकसंख्येइतकीच सल्लागारांची संख्या झालीय. जो तो उठतो आणि सल्ले देत सुटतो. म्हणूनच शरद जोशी म्हणतात, ‘कोणाही माणसाचा शेतीविषयी सल्ला घेण्याआधी त्याने निदान सहा महिने तरी शेतीवर आपलं पोट भरलं आहे का ते बघा. जो मनुष्य मंत्र्यांच्या पगारावर जगतो आणि शेतकर्यांविषयी गोष्टी करतो त्याला शेतीचं दु:ख समजणे शक्य नाही.’ जोशी यांच्यासारख्या अफाट ताकतीचा महानायक या मुलाखतीतून उलगडतो. ‘माझी स्वत:ची आत्मविश्वासावर निष्ठा आहे की, कोणताही प्रश्न सुटत नसेल तर तो प्रश्न सोडविण्यासाठी पुस्तक वाचण्यापेक्षा त्या परिस्थितीत आपण स्वत:ला ठेवल्यास त्यामध्ये काय रहस्य आहे याचा उलगडा निश्चित होतो’ असा महामंत्र त्यांनी या मुलाखतीतून दिलाय. म्हणूनच ते सांगतात की, ‘मी पुस्तकांपेक्षा शेतकर्यांकडून अधिक शिकत गेलो’
शेतीतून दारिद्य्र का निघतं याचं चिंतन करून, जाणीवपूर्वक शेतकरी बनून शरद जोशींनी कामाला सुरूवात केली. शेतीत त्यांना आपटी बसली; मात्र चावडीवर सर्वच शेतकरी झालेल्या नफ्याच्या बढाया मारायचे. अपयश पदरी आल्यानं न राहवून शेतकर्यांना विचारलं की, ‘तुम्ही शेती नक्की कशी करता? त्यात तुम्हाला एवढा नफा कसा झाला?’ त्यावर एका म्हातार्याने त्यांना बाजूला घेतले आणि म्हणाला, ‘साहेब, हे सगळे थापा मारतात. हे जर का असं चावडीवर बोलले नाहीत तर त्यांच्या मुलींची लग्न ठरणार नाहीत म्हणून ते खोटं बोलतात. तुम्ही म्हणताय तेच खरं आहे. आपण जे कष्ट करतो, खर्च करतो त्यामानाने आपल्या हातामध्ये पैसा येत नाही.’ हे विदारक वास्तव लक्षात घेऊन त्यांनी शेतकरी संघटनेची स्थापना केली. ऊसाला तीनशे रूपये भाव मिळाल्यानंतरही एक बाई त्यांना सांगते, ‘मालक दारू पिऊन येतात. मला फक्त मार पडतो. त्यापेक्षा ऊसाला भाव मिळाला नसता तर फार चांगलं झालं असतं. शेतकर्याच्या घरची बाई सुखी होईल का?’ असा अंतर्मुख करणारा सवाल तिने उपस्थित केल्याने शरद जोशी यांनी ‘लक्ष्मीमुक्ती आंदोलन’ आणि ‘महिला संघटन’उभं केलं. शेतामध्ये गळणार्या घामाच्या शंभर थेंबांपैकी साठ थेंब जर बाईचे असतील तर तिला प्रत्यक्ष काय मिळणार?, निदान रोजगार हमीमध्ये पाट्या टाकणार्या बाई इतका दर तरी तिला द्याल की नाही? असा खडा सवाल शरद जोशी यांनी या पुस्तकाद्वारे केला आहे.
भामरागड येथील आदीवासींसाठी आख्खं आयुष्य समर्पित करणार्या पद्मश्री डॉ. प्रकाश आणि डॉ.मंदा आमटे यांची मुलाखत वाचताना अंगावर शहारे येतात. मन रोमांचित होतं. ‘देवमाणूस’ याच शब्दात त्यांच्या कार्याचं वर्णन करावं लागेल. कोणतीही साधने नसताना उघड्यावरच होणार्या शस्त्रक्रिया, प्रारंभी रूग्णांची उपचारासाठी यायची टाळाटाळ, पशू-पक्षी आणि प्राण्यांशी आमटे दांपत्याने केलेली मैत्री, सरकारी अनास्था, त्यातूनही फुलविलेलं नंदनवन हे सारेच मुळातून वाचण्यासारखे आहे. या मुलाखती घेताना राजू परूळेकर यांचं कौशल्य आणि अभ्यास पूर्णपणे पणाला लागला असावं. ज्यांच्या मुलाखती आहेत ते आणि मुलाखतकार आपल्या समोरच बसले आहेत आणि एकमेकांशी संवाद साधत आहेत असं हे पुस्तक वाचताना कायम जाणवत राहतं.
आचार्य विनोबा भावे आणि महात्मा गांधींच्या संस्कारात वाढल्यामुळे डॉक्टर झाल्यानंतर धारणीपासून चाळीस किलोमीटर चालत जाऊन बैरागड या गावातील लोकांची सेवा करण्यासाठी तिथेच जाऊन राहणार्या डॉ. रविंद्र कोल्हे यांची मुलाखत या पुस्तकात आहे. एक रूपया कन्सल्टन्सी फी आकारणारे डॉ. कोल्हे यांनाही प्रचंड संघर्ष करावा लागला. डॉ. रविंद्र आणि डॉ. स्मिता कोल्हे यांच्या आयुष्याचा प्रवास उत्कटतेने उलगडून दाखविल्याने हे पुस्तक प्रेरणेचा झरा बनलं आहे. गडचिरोलीतील ‘सेवाग्राम’मध्ये काम करणारे डॉ. अभय आणि डॉ.राणी बंग यांचं आयुष्यही दीपस्तंभाप्रमाणंच.
ज्यांनी आपल्या असामान्य प्रतिभेने स्वत:च्या नावाचं युग निर्माण केलं ते सुप्रसिद्ध नाटककार, दिग्दर्शक, भाषणकार, टीकाकार आणि अभिनेते गिरीश कर्नाड यांची आणि मराठी साहित्य विश्वात आपल्या स्वतंत्र शैलीने स्वत:चं स्थान निर्माण करणार्या प्रसिद्ध कथालेखिका सानिया यांच्या जीवनप्रवासातील अनेक बारकावे परूळेकरांनी नेमकेपणे टिपले आहेत. मुळात या पुस्तकात समाविष्ट करण्यात आलेल्या सर्वच मुलाखती उत्तुंगतेचा साक्षात्कार घडविणार्या आहेत. त्यातून ज्ञानाची, प्रेरणेची, संघर्षाची, अचाट कर्तृत्वाची, मानवी सुख-दु:खांची बेटं परूळेकरांनी उभारलीत. अत्यंत खडतर परिस्थितीतून समाजापुढे विधायकतेचा, सकारात्मक आदर्शांचा ठेवा ठेवणार्या या ’माणसांच्या यशोगाथे’च्या निर्मितीबद्दल राजू परूळेकर यांचे अभिनंदन. प्रत्येकाने वाचावं, आचरणात आणावं आणि स्वत:च्या आयुष्यात परिवर्तनाच्या दिशेने पाऊल टाकावं अशा ऊर्जेचा स्त्रोत म्हणजे ‘ते आणि मी’ हे पुस्तक आहे हे मात्र नक्की!
‘ते आणि मी’
लेखक - राजू परूळेकर
प्रकाशक - नवचैतन्य प्रकाशन, मुंबई (9869027399)
पाने-207, किंमत 210/-
घनश्याम पाटील
7057292092
हिंदुत्वासाठी अखंडपणे शेवटच्या श्वासापर्यंत धडधडणारी तोफ म्हणजे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे! मराठी टक्का कसा घसरतोय आणि प्रत्येक महत्त्वाच्या ठिकाणी अमराठी लोकांनी कसा उच्छाद मांडलाय याची सातत्याने यादी दिल्यानंतर दादांनी म्हणजेच प्रबोधनकार ठाकरे यांनी बाळासाहेबांना विचारले, ‘‘आणखी किती काळ फक्त याद्याच देणार? यांच्यासाठी एखादी संघटना, पक्ष काढणार की नाही?’’ आणि या सवालातूनच 19 जून 1966 ला शिवसेना ही मराठी माणसांची संघटना स्थापन झाली. अवघ्या दहा ते पंधरा कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत एका छोट्याशा खोलीत शिवसेनेच्या स्थापनेचा नारळ फोडला गेला आणि बघता-बघता हा इवलासा वेलू अखंड अशा सिंधूत रूपांतरीत झाला. या शिवसेनेने आपली पन्नाशी पूर्ण केली असली तरी त्याचे तारूण्य चिरकाळ टिकणारे आहे.
‘कॉंग्रेसने अनेक शिक्षणसंस्था स्थापन केल्या. साखरकारखाने काढले. दूध संस्था काढल्या; शिवसेनेने नेमके काय केले?’ असा एक पुळचट सवाल काही समदु:खी लोकांकडून केला जातो. शिवसेनेने काय केले? याचे मूल्यमापन व्हायचे तेव्हा होईलच; मात्र शिवसेनेने मराठी माणसाचा स्वाभिमान जागवला हे मात्र सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे. मुंबईसह महाराष्ट्रात मराठी माणसाचे अस्तित्त्व टिकवून ठेवण्यात शिवसेनेचा वाटा सर्वाधिक आहे.
भारतीय राजकारणात आपली छाप पाडणारा शिवसेना हा एकमेव बलाढ्य प्रादेशिक पक्ष आहे. बाळासाहेब काय बोलायचे किंवा ‘सामना’त कोणत्या विषयावर अग्रलेख होतोय याकडे दिल्लीश्वरांचे कायम लक्ष असायचे. 1989 साली सुरू झालेले सामना हे एकमेव वृत्तपत्र आहे की ज्याच्या अग्रलेखावरून देशभर विविध माध्यमातून कायम नरम-गरम बातम्या होतात. मराठी माणसासाठी आणि हिंदुत्वासाठी शिवसेनेने कायम आक्रमक भूमिका घेतली. ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करणार्या शिवसेनेने कधीही जातीवाद केेला नाही. त्यामुळेच शिवसेनेत सर्वच जातीधर्माचे लोक नेतृत्व करताना दिसतात. ‘किंगमेकर‘ असलेल्या बाळासाहेबांनी तळागाळातून आलेल्या अनेक नेत्यांना ‘चेहरा’ दिला आणि हेच बाळासाहेबांचे मोठेपण ठरावे.
आपल्याकडे लेच्यापेच्या भूमिका घेणार्या सुमार नेत्यांची वाणवा नाही. ज्यावेळी बाबरी मस्जीद पाडली गेली त्यावेळी असंख्य कार्यकर्त्यांचे अटकसत्र सुरू होते. केंद्र सरकार सुडाचे राजकारण करत असतानाच मातोश्रीवरून बाळासाहेबांची डरकाळी देशाने ऐकली. ‘‘बाबरी मस्जीद पाडण्यात जर माझ्या शिवसैनिकाने पुढाकार घेतला असेल तर मला त्यांचा अभिमानच वाटतो.’’ सर्व पक्षांनी हात वर करून कार्यकर्त्यांना वार्यावर सोडलेले असताना बाळासाहेबांची ही भूमिका सकारात्मक ठरली. कोणत्याही परिणामांचा विचार न करता विचारांचा परिणाम घडविणारे बाळासाहेबांसारखे नेते विरळाच. ‘मराठी माणूस’ हा बाळासाहेबांच्या कायम केंद्रस्थानी राहिलेला आहे. सत्ता हे त्यांचे ध्येय कधीच नव्हते. म्हणूनच बाळासाहेबांनी अनेकांच्या आयुष्यात नंदनवन फुलवले. कमजोर लोकांच्यात स्वाभिमान जागवून प्राण फुंकले. शिवसेना ही तरूणांना पेटवणारी एक आग आहे हे कायम कृतीतून दाखवून दिले.
युतीच्या काळात ‘गाव तिथे एसटी’, ‘झुणका भाकर केंद्र’ असे लोककल्याणकारी उपक्रम केवळ आणि केवळ शिवसेनेनेच राबवले. भारतीय जनता पक्ष सेनेपुढे कायमच फिका पडलेला असायचा. महाराष्ट्रात भाजपला कवडीचीही किंमत नसताना बाळासाहेबांनी त्यांना डोक्यावर घेऊन खरा महाराष्ट्र दाखवला. वाजपेयी सरकारच्या काळात शिवसेनेच्या खासदारांची संख्या लक्षवेधी असूनही शिवसेनेकडे मंत्रीपदे मात्र नगण्यच होती. बाळासाहेबांनी कधीही त्याचा बागुलबुवा केला नाही. स्वर्गीय प्रमोद महाजन, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, गोपीनाथराव मुंडे अशा नेत्यांनी युती अभेद्य ठेवली; मात्र सध्या काही निष्प्रभ घोडे अकारण फुरफुरत आहेत. सेनेला सातत्याने कमी लेखण्याचे उद्योग भाजपकडून सुरू आहेत.
शिवसेनेच्या पाठिंब्यावरच सरकार स्थापन झाल्यानंतर शरद पवार यांच्यासारख्या बुजूर्ग नेत्याने मध्यावधी निवडणुकांचे संकेत दिलेच होते. कमळाबाई कुंकू एकाचे लावते आणि मधुचंद्र दुसर्यासोबतच साजरा करते हे एव्हाना मराठी माणसापासून लपून राहिलेले नाही. महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या अनेक करंटेपणाकडे दुर्लक्ष करत काम सुरूच ठेवले आहे. ‘अति तेथे माती’ असे झाल्यास मात्र सेना कोणत्याही क्षणी सत्तेतून बाहेर पडेल आणि ‘जाणत्या’ नेत्याचे बोल खरे ठरतील.
महाराष्ट्रात भाजप ‘जलयुक्त शिवार’सारख्या प्रभावी योजना राबवत आहे. याचवेळी ‘शिवजलक्रांती’ही जोरात सुरू आहे. श्रेयवादात अडकलेले भाजप नेते त्यावरून राजकारण करत असतानाच शेतकर्यांना मोठ्या प्रमाणात मदत, सामुदायिक विवाह सोहळे, विविध प्रकारची आरोग्य शिबिरे अशी विधायक कामांची जंत्री सेनेकडून सुरूच आहे. युती तुटल्यानंतर सेनेचे बारा वाजणार असे मनसुबे तेव्हाच्या आघाडीतील कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने आणि एकेकाळी मित्रपक्ष असलेल्या भाजपने रंगवले होते. शिवसेनेच्या झंझावातापुढे हे सगळे अंदाज खोटे ठरले आणि शिवसेनेने महाराष्ट्रात मोठी बाजी मारली. नरेंद्र मोदी यांच्या वावटळीतही सेना भक्कमपणे तग धरून आहे.
उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यात काहीजण अकारण तुलना करतात. उद्धव यांच्या नेतृत्वावर शंका उपस्थित करणार्यांना त्यांनी कायम कानफाडले आहे. छगन भुजबळ आणि नारायण राणे यांच्यासारखे नेते सेनेनेच घडवले. तरीही त्यांनी शिवसेनेशी फितुरी करत कॉंग्रेसशी हातमिळवणी केली. या गद्दारांचा सेनेवर यत्किंचितही परिणाम झाला नाही. 2005 ला राज ठाकरे यांनी घरभेदीपणा करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. त्यावेळी बाळासाहेबांनी ‘या चिमण्यांनो परत फिरा रे’ असे भावनिक आवाहन केले होते; मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही. इतके होऊनही शिवसेना अभेद्यच आहे.
महाराष्ट्राबाहेर उत्तरप्रदेश, बिहार, राजस्थान, दिल्ली इतकेच काय तर जम्मू काश्मीरमध्येही शिवसेनेचे कार्य आहे. यातील अनेक ठिकाणी पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका आणि महानगरपालिकेत शिवसैनिक प्रतिनिधीत्व करतात. अमराठी भागात भूमिपुत्रांच्या न्यायहक्कासाठी लढणारा शिवसेना हा एकमेव पक्ष आहे. त्या-त्या राज्यातील भूमिपुत्रांना योग्य त्या संधी मिळायलाच हव्यात अशी शिवसेनेची भूमिका आहे. हिंदुत्व आणि मराठी माणूस हा त्यांचा श्वास आहे. म्हणूनच भाजपला आणि पर्यायाने हिंदुत्वाला फटका बसायला नको या प्रांजळ हेतूने शिवसेनेने वेगळे अस्तित्त्व असूनही परराज्यात अनेक ठिकाणी निवडणुकांचे राजकारण केले नाही. उद्धव ठाकरे आणि पुढची पिढी म्हणजेच आदित्य ठाकरे यांच्यात त्या क्षमता आहेत. लोकांच्या अडचणी त्यांना कळतात. आदित्य ठाकरे या तरूणाची सामाजिक प्रश्नांची समज आणि त्याचा आवाका निश्चितच मोठा आहे. त्यामुळे भविष्यात शिवसेनेची प्रादेशिकतेची वस्त्रे गळून पडतील आणि हा राष्ट्रीय पक्ष म्हणून लोकमान्य ठरेल असे वाटते.
‘मला मारणारे मेले, मी अजून ठणठणीत आहे’ असे आचार्य अत्रे यांनी त्यांच्या तत्कालीन विरोधकांना ठणकावून सांगितले होते. त्याचप्रमाणे शिवसेनेला संपवण्याचा विडा उचलणार्यांचे नामोनिशाण मिटले आहे. ज्यांनी राज्याचे नेतृत्व केले ते कणकवलीतल्या एखाद्या किडूकमिडूक ग्रामपंचायतीचे सरपंचही होऊ शकणार नाहीत अशी व्यवस्था नियतीने केली आहे. मराठी माणसांच्या भवितव्यात मोलाचा वाटा उचलणारी मराठमोळी शिवसेना इथल्या दर्याखोर्यातून, पर्वत रांगातून, नद्या नाल्यातून इतकेच काय मराठी माणसांच्या नसानसातून प्रवाहीपणे वाहत राहील. शिवसेनेने मागच्या पन्नास वर्षात मराठी माणसासाठी आणि मुंबईसह अखंड महाराष्ट्र रहावा यासाठी जे कार्य केले आहे त्याबद्दल महाराष्ट्र कायम त्यांच्या ऋणात असेल.
- घनश्याम पाटील
संपादक, 'चपराक', पुणे
७०५७२९२०९२
जात ही संकल्पना कालबाह्य ठरत
असतानाच फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव घेत ब्राह्मण समाजाला सतत टिकेचे
लक्ष्य करण्यात येत आहे. ब्राह्मणांना झोडपणे, त्यांच्यावर हल्ले करणे,
त्यांना त्रास देणे म्हणजेच पुरोगामित्वाचे प्रतिक असा गृह काही
समाजकंटकांनी करून घेतलेला दिसतोय. ‘जातीने ब्राह्मण’ असणं हा गुन्हा आहे
की काय, असेच आता अनेकांना वाटू लागले आहे. जातीजातीत तेढ आणि द्वेषाचे
राजकारण करून सामाजिक वातावरण दूषित करणार्यांना आवरणे हे आता
राज्यकर्त्यांसमोरील मोठे आव्हान आहे.
प्रत्येक जातीत काही गुणदोष असतात
हे मान्य! मात्र त्यामुळे एखाद्या जातीचा टोकाचा द्वेष करणे आणि त्यांच्या
‘कत्तली करा’, त्यांच्या ‘बायका पळवून आणा’ अशा घाणेरड्या वल्गना करून
समाजस्वास्थ्य खराब करणे हे समाजातील वाढत्या अराजकतेचे लक्षण आहे.
आजपर्यंतच्या अनेक ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक चळवळीत ब्राह्मणांनी
दिलेले योगदान दुर्लक्षून चालणार नाही. समाज ‘भटमुक्त’ करण्याचा विडा
उचलणार्या फुरफुरत्या घोड्यांना आवरले नाही तर त्याचे गंभीर परिणाम आपल्या
राष्ट्राला भोगावे लागतील.
गांधीहत्येनंतर देशात ब्राह्मणविरोधी लाट
निर्माण झाली. अनेकांच्या कत्तली झाल्या, घरे जाळली गेली. त्यावेळी
ब्राह्मण समाज शेतीपासून दुरावला गेला. आज त्याचे परिणाम दिसून येत आहेत.
ब्राह्मणांची संख्यात्मक वाढ कमी होणं हे कशाचं द्योतक आहे? 1948 नंतर ज्या
गावात ब्राह्मण राहिले तेथील शिक्षणाचं प्रमाण चांगलं आहे, हे कोण
नाकारणार? त्यांच्या घरी वृत्तपत्रे यायची. बहुजन आणि मराठा समाजातील बांधव
ते वाचण्याचा प्रयत्न करायची. ब्राह्मण समाजातील मुलं शिक्षणासाठी
बाहेरगावी जायला लागली. समाजातील इतर बांधवांनीही त्यांचे अनुकरण करून
आपल्या मुलांना शिक्षणासाठी बाहेर पाठवले. मात्र त्यानंतर होत गेलेले
सामाजिक बदल मन व्यथित करणारे आहेत.
1970-75 च्या दरम्यान शासकीय सेवा,
बँका, एलआयसी, शिक्षण संस्था, न्यायालय अशा ठिकाणी नोकर्या करणारे
ब्राह्मण साधारण सत्तर टक्के होते. नव्वदच्या दशकात हाच आकडा अक्षरशः वीस
ते पंचवीस टक्क्यांपर्यंत खाली आला. सरकारच्या उदासीन धोरणांमुळे
ब्राह्मणांनी नोकर्या सोडल्या आणि अतिशय जिद्दीने, चिकाटीने विविध
उद्योगधंद्यात यश मिळवले. गुणवत्तेच्या बळावर यश मिळू शकते आणि ते टिकू
शकते यावर विश्वास असल्याने त्यांनी शक्य होतील ते उद्योग केले. अगदी
हॉटेल चालविण्यापासून तेे केशकर्तनालयापर्यंत कोणताही व्यवसाय आपल्याला
वर्ज्य नाही, हे त्यांनी कृतितून दाखवून दिले. आज कोल्हापुरात अभ्यंकरांची
चप्पल प्रसिद्ध होते किंवा डी. एस. कुलकर्णी यांच्यासारखा यशस्वी उद्योजक
बहुजन समाज पक्षाकडून निवडणुक लढवतो यावरून ब्राह्मण समाजाने कष्ट करताना
कोणताही व्यवसाय अथवा पर्याय निषिद्ध मानला नाही, हे सिद्ध होते.
ब्राह्मण
समाज शासकीय नोकर्यांपासून दूर गेला आणि भ्रष्टाचाराचे प्रमाण लक्ष्यवेधी
वाढले, असा जर निष्कर्ष कोणी काढला तर आश्चर्य वाटू नये. न्यायालयातील
ब्राह्मण आणि जंगम (स्वामी) आज कुठे गेले? या व्यवस्थेने त्यांना कसे
सामावून घेतले? जातीचे राजकारण करणार्या काहींनी इथलं सामाजिक, सांस्कृतिक
वातावरण अशा पद्धतीनं विकसित केलं की त्यांना बाहेर पडण्यावाचून गत्यंतर
राहिले नाही. प्रत्येक व्यवसायात ब्राह्मणांनी आपली कर्तबगारी दाखवून
दिली. किर्लोस्कर, कल्याणी, गरवारे, डी.एस.के. हे उद्योजक संघर्षातून पुढे
आले.
स्वतःच्या ताकतीवर उद्योगधंदे करणार्यांसाठी इथल्या व्यवस्थेने
कोणती धोरणे आखली? ‘इथे नकोच, इथे आपल्याला न्याय मिळणार नाही’ अशी भावना
निर्माण झाल्याने अनेकांनी देश सोडला. विविध नामवंत कंपन्यात व्यवस्थापकीय
पदावरच्या नोकर्या मिळवून स्वतःच्या कुटुंबाची प्रगती साधली. देशाविषयी
त्यांना काही वाटत नव्हते, अशातला भाग नाही. मात्र ‘इथल्यापेक्षा तिथं
सुरक्षित’ असं वाटल्याने पुण्या-मुंबईसारख्या शहरातील अनेक कुटुंबे परदेशात
स्थायिक झाली. यातूनच आर्थिक सुबत्ता असलेली पिढी निर्माण झाली; पण या
मातीशी असलेली नाळ तुटत चालल्याने समाजाला ब्राह्मणांच्या कर्तबगारीचा लाभ
घेता आला नाही.
आजही ब्राह्मण समाजातील अनेक मान्यवर वेगवेगळ्या
क्षेत्रात कार्यरत आहेत. या द्वेषाच्या आणि सुडाच्या राजकारणात ते
नाईलाजाने महाराष्ट्र सोडून गेले तर राज्याच्या प्रगतीस खिळ बसू शकेल, हे
वास्तव आहे. आज सांस्कृतिक आणि वृत्तपत्र क्षेत्राचा विचार केला तरी बहुतेक
माध्यमांत मारवाडी मालक आहेत आणि ब्राह्मण संपादक आहेत. समाज घडविणारे
बहुतेक साहित्यिक ब्राह्मण आहेत. हा मक्ता ब्राह्मणांकडेच नाही; सर्व
क्षेत्रात सर्व जातीधर्मातील लोक पुढारलेले आहेत; मात्र ब्राह्मणद्वेषातून
वैयक्तिक स्वार्थाचे राजकारण करणारे समाजात फूट पाडत आहेत.
आज
राज्यातील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप, शिवसेना, मनसे,
आर.पी.आय., बहुजन समाज पक्ष अशा सर्व विचारधारांच्या सर्व पक्षात ब्राह्मण
लोक सामावलेले आहेत. मात्र काकासाहेब गाडगीळ आणि वसंतराव साठे यांच्यानंतर
महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजाचे राजकीय नेतृत्व खर्याअर्थी संपले असे
वाटते.
महाराष्ट्रातील दूरदृष्टीचे नेते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी
ब्राह्मणांची क्षमता ओळखली होती. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी,
महादेवशास्त्री जोशी यांना सांस्कृतिक क्षेत्रात पुरेशी संधी देऊन त्यांनी
ही बाब कृतितून दाखवून दिली होती. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात ब्राह्मणांनी
मोलाचं योगदान दिल, गुणवत्तापूर्ण दलित साहित्याचं कौतुक ब्राह्मणांनी
केलं, स्त्रियांसाठी चळवळी त्यांनीच उभारल्या, शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार
करण्यात पुढाकार घेतला, श्री. म. माट्यांसारख्या व्यक्तिने तर जातीची
बंधने केव्हाच झुगारून दिली होती! हे सर्व करताना ब्राह्मणांनी आपण
‘ब्राह्मण’ आहोत, असा बागुलबुवा कधीही केला नाही. किंबहुना ‘जात’ हा विचार
त्यांच्या मनासही शिवला नाही. मात्र तरीही आज ब्राह्मणद्वेषाचे राजकारण
करण्यात येत आहे.
प्रारंभी उल्लेख केल्याप्रमाणे प्रत्येक जातीत भलेबुरे
असणारच पण त्याचे खापर आजच्या ब्राह्मण समाजावर फोडून जातीच्या राजकारणाला
खतपाणी घालणार्यांना आवरावे. हा लेख ब्राह्मणांची थोरवी गाण्यासाठी,
त्यांची बाजू घेण्यासाठी किंवा कुणाला तरी विरोध करण्यासाठी नाही; मात्र
दादोजी कोंडदेवांचे प्रकरण असेल किंवा सध्याचे अखिल भारतीय मराठी साहित्य
संमेलनाच्या अध्यक्षपदाचे उमेदवार ह. मो. मराठे असतील; अशा निमित्ताने
ब्राह्मण समाजाला सातत्याने डिवचल्याने त्यांच्या मनात असुरक्षिततेची,
भीतीची भावना निर्माण झाली आहे. स्वसंरक्षणासाठी म्हणून या समाजाने काही
भूमिका घेतली तर त्यात राज्याचेच अहित आहे, या वास्तवाचा विसर पडू नये!
- घनश्याम पाटील
संपादक, 'चपराक', पुणे
७०५७२९२०९२
|
सागर कळसाईत (लेखक) |
सागर कळसाईत हा आजचा आघाडीचा युवा लेखक आहे. वयाच्या अवघ्या बावीसाव्या
वर्षी त्याने ‘कॉलेज गेट’ ही कादंबरी लिहिली. ‘चपराक’ने प्रकाशित केलेल्या
या कादंबरीच्या तीन वर्षात पाच आवृत्या प्रकाशित झाल्या आहेत आणि लवकरच या
कादंबरीवर आधारित एक चित्रपटही येतोय. सागरची ‘लायब्ररी फ्रेंड’ ही नवी
कादंबरी येत्या मंगळवार, दि. 21 जून रोजी पुण्यातील श्रमिक पत्रकार भवनात
समारंभपूर्वक प्रकाशित होत आहे. ‘चपराक’चे प्रकाशक घनश्याम पाटील यांचीच या
कादंबरीला प्रस्तावना असून ती खास ‘महानगर’च्या वाचकांसाठी. या
कादंबरीसाठी संपर्क : 020-24460909/7057292092
‘कॉलेज गेट नाण्याची
तिसरी बाजू’ या कादंबरीच्या अभूतपूर्व यशानंतर सागर कळसाईत या तरुणाचे नाव
कादंबरी विश्वात ठळकपणे अधोरेखित झाले. मैत्री आणि प्रेम यात
गुंतलेल्यांना खिळवून ठेवण्याचे काम ‘कॉलेज गेट’ने केले आणि अल्पावधीतच या
कादंबरीच्या तब्बल चार आवृत्त्या प्रकाशित झाल्या. ‘आजचे तरुण काय वाचतात?’
या विषयावर ‘सकाळ’सारख्या आघाडीच्या वृत्तपत्राने एक सर्व्हेक्षण केले.
त्यातून तरुणांच्या आवडीची दहा पुस्तके जाहीर केली. प्रकाशक या नात्याने
सांगण्यास अत्यानंद होतो की, सुहास शिरवळकरांच्या ‘दुनियादारी’नंतर
दुसर्या क्रमांकाला आमच्या सागर कळसाईतची ‘कॉलेज गेट’ ही कादंबरी होती.
इतकेच नाही तर त्यावर लवकरच एक चित्रपटही प्रदर्शित होतोय. मराठी तरुणांची
वाचनाची अभिरूची वृद्धिंगत करणार्या सागर कळसाईत या तरुण लेखकाविषयी
साहित्य सृष्टीकडून प्रचंड अपेक्षा वाढल्या होत्या. जेमतेम पंचविशीत
असलेल्या सागरने ही अपेक्षापूर्ती करत नवी कादंबरी मोठ्या ताकतीने
वाचकांसमोर आणली आहे. प्रेम, कुटुंब आणि स्वप्नात अडकलेल्या आजच्या
तरुणाईचा आलेख त्याने प्रस्तुत ‘लायब्ररी फ्रेंड’ या आपल्या कादंबरीत
मांडला आहे.
सागरची भाषा कशी? तर जवळच्या मित्राने हक्काने आपल्याशी
चर्चा करावी, वाद घालावेत किंवा पाठीवर धपाटे देत ‘सत्कार’ करावेत अशी!
आजच्या तरुण-तरुणींच्या गळ्यातील ताईत बनत, त्यांच्याच शैलीत अभिव्यक्त
होत, संवादाच्या कक्षा व्यापक करत सागरची लेखणी प्रवाही राहते. एक अबोल
प्रेमकथा मांडताना ‘लायब्ररी फ्रेंड’ आजच्या तरुणाईच्या भावभावनांचे शानदार
प्रगटीकरण करते. कधी खुसखुशीत शैलीत तर कधी भावनिक होत तरुणाईच्या मनाचा
कानोसा घेते. प्रेम, मैत्री, नातेसंबंध रंगवताना सागर समाजातील वास्तव
रेखाटतो. यातील बर्याचश्या घटना, पात्रं हे त्याच्या परिघातलेच असल्याने
त्यात जिवंतपणा आला आहे. मैत्रीसाठी जीव ओवाळून टाकणार्या मित्रांचे
सुहृदयी वर्णन सागर खुमासदार पद्धतीने करतो. ‘कॉलेज गेट’नंतर लेखकाची
मानसिकता, त्यासाठी उपसलेले कष्ट, थोडीफार झालेली फरफट, क्वचित प्रसंगी
आलेले नैराश्य, वडिलांनी मनात पेरलेला आशावाद, दोस्तांची साथसंगत, मैत्रीत
दुरावा निर्माण होत असताना त्यांचे साधलेले ऐक्य हे सारे काही ‘लायब्ररी
फ्रेंड’मध्ये आल्याने रंजनातून प्रबोधन अशा पद्धतीची ही कलाकृती साकार झाली
आहे. या कादंबरीत आजच्या तरुणांच्या भावभावनांचे प्रतिबिंब उमटल्याने ही
कादंबरी म्हणजे आजच्या काळाचे प्रतिक ठरले आहे.
या कादंबरीतील प्रमुख
पात्र असलेला मानव हा अस्मितावर नकळतपणे जीव ओवाळून टाकतो. त्याची
स्वप्नप्रेमिका असलेली अस्मिता लायब्ररीत केवळ दूरदर्शनाने त्याची प्रेरणा
बनते. पुस्तक लिहायची सुरुवात करण्यासाठी, संपलेल्या महाविद्यालयीन जीवनाची
अनुभूती घेण्यासाठी मित्रांच्याच महत्प्रयासाने लायब्ररीत बसण्याची
परवानगी मानव घेतो; मात्र प्रयत्नपूर्वक रोज दोन-तीन पानांच्या पुढे त्याची
गाडी जात नाही. त्यातून नैराश्य येत असतानाच समोर बसलेली अस्मिता तिच्या
मैत्रिणीला सांगते, ‘‘सचिन तेंडुलकरला सेंच्युरी करण्यासाठी पहिल्या रनाने
सुरुवात करावी लागते.’’ नाजूक आवाजात मैत्रिणीला दिलेला सल्ला मानव
स्वत:साठी म्हणून स्वीकारतो. प्रेम तर दूरच मात्र साधी मैत्रीही नसताना ती
मानवची ‘शक्तिस्थान’ बनते. सहजपणे तिने इतरांशी साधलेले संवाद मानवच्या
कानावर पडतात आणि त्यातून तो स्वत:ची दिशा ठरवत जातो. अस्मितावर ‘लव्ह ऍट
फस्ट साईट’ असे प्रेम करणारा मानव ग्रंथपालाविषयी मात्र ‘हेट ऍट फस्ट साईट’
म्हणतो. त्यातच त्या ग्रंथपालाच्या प्रेमभंगाची कहाणीही सुरसपणे रंगवतो.
एमबीए होऊनही नोकरी न करता पूर्णवेळ लेखन केल्याने जवळचे मित्र मानवला
शिव्या घालतात; मात्र तो वडिलांची समजूत घालतो की या पुस्तकानंतर मी नोकरी
करेन. आपला मित्र उमेश याला याबाबतची भूमिका सांगताना मानव प्रतिप्रश्न
करतो, ‘एकाचवेळी दोन सशांच्या मागे धावणार्या शिकार्याला एकतरी ससा मिळेल
का वेड्या?’
आपल्या समाजाला लागलेली जातीव्यवस्थेची कीड आरडी आणि
दीक्षा यांच्या वाट्याला येते. ‘हे लग्न झाले तर मुलीच्या जीवाला धोका
आहे’, अशी थाप एक ज्योतिषी मारतो आणि त्यात या जोडप्याची ससेहोलपट होते.
अभिसह मानव या प्रवृत्तीवर घाव घालण्यासाठी प्रयत्नशील असतो. आजच्या
समाजव्यवस्थेत अपरिहार्य ठरलेले हे दुर्दैवी वास्तव ठळकपणे अधोरेखित करताना
लेखकाने प्रेमकथेच्या माध्यमातून कठोर प्रहार केले आहेत.
एमबीएनंतर
सर्व मित्रांना जोडून ठेवण्यासाठी मानवला अनेक क्लृप्त्या सुचतात. त्यातून
तो काही उद्योग करतो. सुरूवातीला गणपतीच्या मूर्ती विकण्याचा प्रयत्न ते
करतात. त्यासाठी प्रत्येकजण पॉकेटमनी काढतो आणि सर्वजण मिळून खास पेणहून
गणपती मूर्ती आणतात. वारजेत दुकान लावून त्या विकण्याचा प्रयत्न करतात.
त्यांचे हे प्रयत्न मुळातून वाचण्यासारखे आहेत. समाजातील विविध
प्रवृत्तींची झलक त्यातून दिसून येतेे. व्यवस्थापनशास्त्राचे पदवीधर
असलेल्या या तरुणांना मात्र गणेशमूर्ती विकण्याच्या व्यवसायात आपटी खावी
लागते. त्यात प्रयत्न करूनही पदरात अपयश पडल्याने वाचकांना जसे वाईट वाटते
तसेच लेखकाने ते अपयश ज्या शैलीत सांगितले आहे ते वाचताना पुरेपूर रंजनही
होते. ‘माणूस फक्त वेगवेगळ्या मूर्ती बनवतो. आकार बदलला की देवाचे नावही
बदलते’ इतके शहाणपण या घाट्याच्या व्यवसायातून येते. ‘रंग देत असणार्या
मूर्तीमध्ये देव आहे की मूर्तीकार स्वत: मन लावून करत असलेल्या कामामध्ये?’
असा तर्कशुद्ध विचारही लेखकाने मांडला आहे. पेणहून गणेशमूर्ती आणताना
रस्त्यात पोलीस यांची गाडी अडवितात. त्यांच्या वाहनात मूर्तीशिवाय आणखी
काही नाही ना हे तपासून पाहतात. या प्रकाराने झोपमोड झाल्याने माऊली
मानवजवळ पोलिसांना शिव्या घालतो. तेव्हा मानव त्याला म्हणतो, ‘अच्छा...
तुझी दोन-अडीच तासांची झोप मोडली! साल्या, ते पूर्ण रात्र आपल्याच
सुरक्षिततेसाठी जागतात ना?’ आजच्या तरुणाईचे हे सामाजिक भान सागर कळसाईत या
हरहुन्नरी लेखकाने अचूकपणे नोंदविले आहे.
गणेशमूर्ती विक्रीच्या ठिकाणी
अनेक लोक मूर्तींचा भाव करतात; मात्र त्यांना ती जागा उपलब्ध करून देणारा
पुढारी जेव्हा त्याच्या फौजफाट्यासह येतो तेव्हा तो राजकीय आविर्भावात
सांगतो, ‘आम्ही देवाच्या मूर्तीची किंमत करत नाही.’ अनपेक्षितपणे मानवचे
आई-वडिलही या दुकानात येऊन मूर्ती मागतात. तेव्हा मानवचा सहकारी त्यांना,
‘तुम्हाला सवलतीच्या दरात मूर्ती देतो काका’ असे म्हणतो. त्यावर तेही
म्हणतात, ‘मला सवलत नको.’ वडिलांचा आवाज ऐकून मानव हर्षोल्हासित होतो.
तेव्हा एमजे म्हणतो, ‘बघ ना, त्या आधारस्तंभानेही सवलत मागितली नव्हती आणि
बाबांनीही सवलत नाकारली. त्या राजकारण्याने दिलेल्या पैशामागे त्याचा
दिखाऊपणा होता. तर बाबांच्या सवलत नाकारण्यामागे त्यांचं प्रेम होतं. भलेही
आपण राजकारण्याच्या मूर्तीमागे जरा जास्तच पैसे कमावले पण आई-वडिलांच्या
प्रेमामुळे झालेला नफा अनमोल आहे यार.’
गणेशमूर्ती विक्रीतून नुकसान सहन
करावे लागल्यानंतर सगळेजण थोडे नाराज होतात; मात्र मानव आशावाद सोडत नाही.
कॉलेजमध्ये आल्यानंतर अस्मिताच्या हातात चॉकलेट बॉक्स पाहून त्याला
हॅण्डमेड चॉकलेटच्या व्यवसायाची कल्पना सुचते. मुंबईतील मित्रमैत्रिणींना
गाठून तो ती कला अवगत करतो. त्यासाठी हे मित्रमंडळ कामाला लागते. त्यातही
ते सडकून मार खातात. दुसर्या व्यवसायातही अपयश आल्याने काही मित्र साथ
सोडतात. मात्र मैत्रीचा धागा बळकट ठेवण्यासाठी प्रयत्नशील असलेला मानव कच
खात नाही. पराभवाने डगमगत नाही.
एका कंपनीकडून 25 लाखाचे गिफ्ट मिळणार
म्हणून तो मित्रांच्या नकळत 25 हजार रुपये त्या कंपनीच्या खात्यावर भरतो.
त्यातून झालेली फसवणूक लक्षात आल्यानंतर मित्रही यथेच्छ धुलाई करून धडपड्या
मानवचा ‘सत्कार’ करतात. या फसवणुकीची तक्रार द्यायला गेल्यानंतर पोलिसही
त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यांप्रमाणे त्यांना हुसकावून लावतात.
‘चक्रीवादळाने निसर्गात कितीही थैमान घातलं तरीही माणसाला जास्त दु:ख होत
नसेल. जिव्हारी लागतं ते आपलं घर बरखास्त झाल्यावर! इथे चक्रीवादळही मी
स्वत:च होतो आणि घरही स्वत:च्या स्वप्नांचं होतं’ अशी प्रांजळ कबुली देत
आजची तरुणाई कोणकोणत्या आमिषाला बळी पडते, कशी भरकटत जाते, संकटाच्या
काळातही आपली नीतिमत्ता कशी टिकवून ठेवते हे सारे ‘लायब्ररी फ्रेंड’मध्ये
यथार्थपणे रेखाटण्यात आले आहे.
कादंबरी लिहिण्यासाठी म्हणून मानव
कॉलेजच्या लायब्ररीत नियमितपणे जात असतो. ते पाहून काही मित्र उमेशला
सांगतात की, ‘मानवला अस्मितापासून दूर राहायला सांग.’ कारण त्याच कॉलेजमधील
सुजित मागच्या काही वर्षांपासून अस्मिताच्या मागे असतो. उमेशकडून हा निरोप
मिळताच मानव प्रेमवीराच्या आविर्भावात सुजितला दम भरायला त्याच्याकडे
जातो; मात्र आपल्यापेक्षा धष्टपुष्ट, उंचेल्या, गोर्यापान सुजितला पाहून
तो सांगतो की, ‘तू माझा कॉम्पिटेटर आहेस.’ सुजितही ते हसण्यावारी घेतो आणि
हे दोघेही अस्मिताला पटवण्याच्या मागे लागतात. सुजित आणि मानव दोघेही
अस्मिताला ‘लाईक’ करतात आणि दोघेही एकत्रच वावरतात याचे उमेशला आश्चर्य
वाटते. तेव्हा सुजित खिलाडूवृत्ती दाखवत म्हणतो, ‘मुलीसाठी दोस्तीत कुस्ती
नाय!’
धडधडणार्या प्रत्येक हृदयाला या कादंबरीत कुठे ना कुठे आपल्या
मनाच्या भावना दिसून येतील. शहरी भागात राहूनही साडी नेसण्याची हौस असणारी
साक्षी शेवटपर्यंत खिळवून ठेवते. त्यातूनच समाजातील आजचे प्रश्न लेखकाने
ठामपणे मांडले आहेत. ‘जनरेशन गॅप’ समजून घेतली तरी ही कादंबरी प्रेम आणि
मैत्री या दोन्ही आघाड्यांवर अव्वल ठरते. सागर कळसाईत याने आजूबाजूच्या
घटनांचे निरीक्षण करून त्या शब्दबद्ध करताना लेखणीचा सुंदर आविष्कार घडविला
आहे.
एखादा तरुण लेखक लिहायला लागतो तेव्हा साहित्यातील ठोकळेबाज
विचारसरणीच्या धेंडांकडून आणि प्रकाशन संस्थांकडून येणारे भलेबुरे अनुभवही
या कादंबरीत आले आहेत. ‘फक्त पुस्तकात अखंड डुबून राहणार्या लोकांसाठी
नाही तर सर्वसाधारण माणसांनाही वाचता येईल, वाचताना मजा घेता येईल आणि
त्यातून एखादा विचार देता येईल’ अशी कलाकृती घडविण्याचे लेखकाचे स्वप्न
असते. या कादंबरीद्वारे ते पूर्णत्वास आले आहे. ‘जेव्हा माणूस स्वत:च्याच
मनाशी वैर घेतो ना, तेव्हा त्याला सोपी गोष्ट करणेही खूप अवघड होऊन जाते
आणि तेच जर आपण स्वत:शी मैत्री केली तर अशक्य वाटणारी स्वप्नेसुद्धा आपण
पूर्ण करू शकतो,’ असा प्रेरणादायी विचार मानवचे बाबा त्याला देतात आणि मानव
ताळ्यावर येतो. ‘मी तुझ्यासोबत आहे. आपण दोघे मिळून स्वप्न पूर्ण करण्याचा
प्रयत्न करूयात,’ असा आवाज त्याला त्याचे हृदय देते आणि ही कादंबरी
सशक्तपणे फुलत जाते. ‘सरळ झाड असले की पहिली कुर्हाड त्याच्यावर पडते.
वाकड्या झाडांना कोणी तोडत नाही’ अशी अनेक चिंतनसूत्रे जागोजागी प्रभावीपणे
या कादंबरीत मांडली आहेत.
आजच्या तरुणाईची प्रातिनिधीक भावना मांडताना,
आजच्या तरुणाईची घुसमट व्यक्त करताना सागर कळसाईत याने या कादंबरीला
सर्वोच्च स्थानावर नेले आहे. ‘दुनियादारी’, ‘शाळा’, ‘कॉलेज गेट’ अशा
तरुणाईवरील कादंबर्यांच्या परंपरेत ‘लायब्ररी फ्रेंड फॉलो युवर हार्ट’ या
कादंबरीने भर पडली आहे. भविष्यात कादंबरी क्षेत्रात सागर कळसाईत हे नाव
विद्युल्लतेप्रमाणे तळपत राहील असा आशावाद व्यक्त करत सागर कळसाईत याला
पुढील लेखनासाठी अंत:करणपूर्वक शुभेच्छा देतो!
घनश्याम पाटील
संपादक, प्रकाशक ‘चपराक’ पुणे
मो. 70572 92092