Wednesday, April 18, 2018

प्रज्ञावंत इतिहास संशोधक डॉ. सदाशिव शिवदे

ही गोष्ट आहे 2006 ची. त्यावेळी आम्ही ‘चपराक’तर्फे उमेश सणस यांची ‘शिवप्रताप’ ही ऐतिहासिक कादंबरी प्रकाशित केली होती. छत्रपती शिवाजीमहाराज आणि अफजलखान यांच्यातील संघर्षावर ही अत्यंत रोमहर्षक कादंबरी आहे. या कादंबरीचे प्रकाशन ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते झाले होते. शिवदिग्विजयाची रोमांचकारी कहाणी म्हणून ती वाचकप्रिय होत होती. या कादंबरीचे पहिले सविस्तर परीक्षण डॉ. सदाशिव शिवदे यांनी केले. ते दैनिक ‘सकाळ’च्या ‘सप्तरंग’ पुरवणीत प्रकाशित झाले. त्यावेळी त्यांच्याशी माझी जुजबी ओळख होती. लेखकाला तर ते ओळखतच नव्हते. 

या परीक्षणानंतर त्यांनी मला घरी भेटायला बोलावले. ‘चपराक’च्या मासिकाविषयीही तोपर्यंत त्यांना पुरेशी कल्पना नव्हती. आमच्या बराच वेळ गप्पा झाल्या. नंतर मी त्यांना ‘चपराक’चे अंक दिले आणि त्यासाठी लेखन करण्याची विनंतीही केली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की ‘चपराक’ हे नाव त्यांना आवडले नाही. मी त्यांच्या मताचा आदर केला आणि बाहेर पडलो. 

रात्री दीडच्या दरम्यान त्यांचा फोन आला. इतक्या उशिरा फोन केल्याबद्दल प्रथम त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि म्हणाले, ‘‘तुम्ही गेल्यापासून मी ‘चपराक’चे अंक वाचतोय. ही फक्त चुकीच्या प्रवृत्तीला ‘चपराक’ नाही; हा तर आई तुळजाभवानीने तुम्हाला दिलेला आशीर्वाद आहे. ‘चपराक’ ही मला आद्याक्षरे वाटली. चतुरस्त्र, परखड, रास्त आणि कर्तव्यदक्ष! गजांतलक्ष्मी कायम तुमच्याकडे पाणी भरेल. या क्षेत्रात तुम्ही खूप यशस्वी व्हाल. ‘चपराक’चा अंक हातात येईपर्यंत नाव विचित्र वाटते; पण एकदा अंक वाचला की वाचणारा प्रेमात पडतो. अशा चपराकीची महाराष्ट्राला नितांत गरज आहे. आजपासून मला तुमच्या परिवाराचा सदस्य म्हणून मान्यता द्या!’’

त्यानंतर त्यांनी अंकावर सविस्तर लेखी अभिप्राय पाठवला. एक मोठा लेखक आमच्या परिवाराचा महत्त्वाचा घटक बनला. पुढे शिवदे सरांशी घनिष्ट संबंध आले. सातत्याने भेटी होऊ लागल्या. आम्ही एकत्र प्रवास केला. ‘आकाशवाणी’ सारख्या माध्यमातून एकत्र कार्यक्रमही केले. ‘चपराक’च्या अनेक कार्यक्रमांना ते अध्यक्ष, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले. ‘चपराक’साठी त्यांनी विपुल लेखन केले. आमच्या काही ग्रंथांना प्रस्तावनाही लिहिल्या. 

डॉ. सदाशिव शिवदे हे मुळचे जावळी तालुक्यातील कुडाळचे. पेशाने गुरांचे डॉक्टर. त्यांच्या आयुष्यात एक घटना घडली आणि ते इतिहास संशोधनाकडे वळले. 

ही साधारण तीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. पाचगणी जवळच्या हुमगावची. या गावात जत्रा भरली होती. पहिल्या दिवशी छबीना निघाला. दुसर्‍या दिवशी कुस्तीचा आणि तमाशाचा फड रंगला. या फडात एकाने छत्रपती संभाजीराजांचा इतिहास सांगितला. गर्दीतले लोक ऐकत होते. त्यात डॉक्टर सदाशिव शिवदेही होते. तरूण वयातल्या शिवदेंनी महाराजांचे ते चरित्र ऐकले आणि ते अस्वस्थ झाले. ते तो फड अर्धवट सोडून निघाले. कुडाळी नदीवरून जाताना ते बेचैन झाले. राजांचे असे अय्याशी, रंगेल वर्णन त्यांच्या डोक्यातून काही जाईना! मग ते परत फिरले. फडावरील मंडळींची आवराआवर सुरू होती. त्यांनी विचारले, ‘‘मगाशी संभाजीराजांची भूमिका कोणी केली?’’ त्यांनी सांगितले ते त्या तमाशा कंपनीचे मालकच होते. शिवदे त्यांना भेटले आणि रागाच्या भरात त्यांनी त्याच्या कानाखाली जाळ काढला. ‘‘संभाजीराजांचे हे विकृत चित्रण का रंगवता?’’ असे त्यांनी दरडावून विचारले.

त्याने सांगितले, ‘‘साहेब आम्हाला माफ करा. आम्ही वर्षानुवर्षे जे ऐकतोय तेच सादर करतो. महाराजांची आम्हाला खरी माहिती नाही. कुणाचा अभ्यासच नसल्याने आम्हाला पोटासाठी हे ऐकीव लोकांपुढे मांडावं लागतं.’’ त्यावर तेही चमकले. आपल्याला तरी महाराजांचा पूर्ण अभ्यास कुठे आहे, असा विचार करत ते बाहेर पडले. ही घटना मात्र त्यांच्या मनावर कोरली गेली.

सदाशिव शिवदे यांना बालपणापासून कवितांची आवड. अधूनमधून ते वृत्तपत्रातून लिहित असत. गुरांचे डॉक्टर असल्याने शेती, शेतकरी, गुरं हेच त्यांचं विश्‍व. 1995 ला ते सरकारी सेवेतून निवृत्त झाले आणि पुण्यात दाखल झाले. इथे आल्यावर सर्वप्रथम ते अखिल भारतीय इतिहास परिषदेत गेले. ललित साहित्याबरोबरच त्यांनी इतिहासाचा अभ्यास सुरू केला. भरपूर वाचन करणं, असंख्य संदर्भ तपासून पाहणं, भाषेचा अभ्यास करणं यात त्यांनी स्वतःला गाडून घेतलं. शिवाजी विद्यापीठातून त्यांनी एम. ए. मराठी केलं होतंच. पुण्यात त्यांनी इतिहास आणि संस्कृतचा अभ्यास केला. ‘मराठ्यांच्या इतिहासाची संस्कृत साधने’ या विषयावर पीएच. डी. केली. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने तो प्रबंधही प्रकाशित केला.

कोणी न केलेलं काम आपण करायचं असा चंग त्यांनी बांधला. हुमगावची घटना डोक्यातून गेली नव्हतीच. त्यामुळे आधी त्यांनी छत्रपती संभाजीराजांच्या चरित्राचा अभ्यास सुरू केला. त्यातून ‘ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा’ हा संशोधनात्मक ग्रंथ साकार झाला. या चरित्रग्रंथाने छत्रपती संभाजीराजांविषयीचे अनेक गैरसमज दूर सारले. विश्वाास पाटील यांनाही ‘संभाजी’ ही कादंबरी लिहिताना या ग्रंथाचा संदर्भ घ्यावा लागला.
महाभारतात व्यास मुनींनी इतिहासाची जी व्याख्या केलीय तशी व्याख्या जगात आजवर कोणत्याच इतिहासकाराने केली नाही. ते म्हणतात,

इतिहास प्रदीपेन मोहावरणघातिना ।
लोकगर्भगृहं कृत्स्नं यथावत् संप्रकाशितम्॥

याचा अर्थ आहे, ‘‘इतिहास ही राष्ट्राची ज्योत आहे. या ज्योतीने अज्ञानरूपी अंधःकाराचा नाश होऊन आपल्या नगरीचे, पूर्वजांचे व राजाचे सत्य स्वरूप आपल्या नजरेसमोर उभे राहते.’’

त्यामुळे राष्ट्राची ही ज्योत काळवंडू नये यासाठी गेल्या वीस वर्षात जे सातत्याने झिजत आहेत, देहाची काडं करत आहेत त्यापैकी डॉ. सदाशिव शिवदे हे आजच्या महाराष्ट्रातलं एक महत्त्वाचं नाव होतं. ‘महाराणी येसूबाई’, ‘रणरागिणी ताराराणी’, ‘दर्याराज कान्होजी आंग्रे’, ‘सेनापती हंबीरराव मोहिते’, ‘शिवपत्नी सईबाई’, ‘छत्रपती राजाराम-महाराणी ताराराणी’ हे संशोधनात्मक ग्रंथ त्यांनी अभ्यासपूर्णरित्या साकारून आपला वैभवशाली इतिहास नव्या पिढीपुढे सशक्तपणे मांडला आहे. ‘परमानन्द् काव्यम्’चा अनुवाद त्यांनी केला. ‘मराठ्यांचे लष्करी प्रशासन’ हा त्यांचा अनुवादित ग्रंथही सर्वांसाठी दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक आहे.  ‘युद्धभूमीवर श्रीशंभूराजे’, ‘स्वराज्याचे पंतप्रधान - मोरोपंत पिंगळे’ हे ग्रंथ इतिहासाच्या अभ्यासकांसाठी संजीवनी देणारे ठरलेत.

15 मे 1915 साली भारत इतिहास संशोधक परिषदेच्या व्यासपीठावर बोलताना लोकमान्य बाळ गंगाधर टिळक म्हणाले होते, ‘‘जर तुमच्या पूर्वजांच्या यशोदुंदुभीचा तुम्हास आदर असेल, जर तुम्ही तुमच्या पूर्वजांच्या रक्तामांसाचे असाल, जर त्यांची स्मृती तुम्हाला कायम ठेवावी वाटत असेल तर तुम्ही इतिहास संशोधनाच्या या कार्यास मदत करा.’’ 

‘केसरी’तील लोकमान्यांचे हे भाषण वाचून प्रभावित झालेल्या डॉ. सदाशिव शिवदे यांनी निवृत्तीनंतर हा वेगळा मार्ग चोखंदळपणे निवडला आणि आज ते या क्षेत्रातील ‘मनोरा’ बनले आहेत. प्रताप दुर्गा महात्म्य (1749), सईदाकेकदी नोंदी नाटकम् (तमिळ नाटकातील ऐतिहासिक उल्लेख), मोरोपंत पिंगळे पंतप्रधान यांच्या वंशजांचा ब्रिटिश सरकारकडे अर्ज, भुईंजकर जाधवराव घराण्यातील एक महजर, तुळजाभवानीची भोपे यांना निजामाने दिलेली पर्शियन सनद, डोंगरगाव-जोरी पाटील घराण्याची हकिकत व महजर यावर त्यांनी संशोधन केले.

अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे सभासद ते अध्यक्ष असा त्यांचा प्रवास आहे. महाराष्ट्रातील युवा इतिहासकारांची त्यांनी एक फळी निर्माण केलीय. वृत्तपत्रातून, विविध नियतकालिकातून सातत्याने लेखन, अनेक इतिहास परिषदांत सहभाग, शोधनिबंध वाचन आणि मार्गदर्शन यामुळे त्यांची सुकीर्ती सर्वत्र पसरलेली आहे. महाराष्ट्रातील अनेक ऐतिहासिक वाडे त्यांनी उजेडात आणले. पुणे सोडून महाराष्ट्रातील शंभर वाड्यांना त्यांनी भेटी दिल्या आणि लेखमाला चालवली. ‘महाराष्ट्रातील ऐतिहासिक वाडे’ हा त्यांचा ग्रंथ दोन खंडात प्रकाशित झालाय. गुरांचे डॉक्टर असल्याने त्यांचे शेती जीवनाशी संबंधित अनुभवविश्व समृद्ध आहे. गुरं कसा लळा लावतात हे त्यांनी अनुभवलं. त्यातूनच त्यांनी ‘माझी गुरं, माझी माणसं’ हा अस्सल ग्रामीण कथासंग्रह लिहिला. तोही वाचकप्रिय ठरला. त्यांनी जी ऐतिहासिक काव्ये लिहिली त्यातील निवडक गीतांची ‘महाराष्ट्राचे महामेरू’ ही सीडीही प्रसिद्ध झाली आहे. मुख्य म्हणजे महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची मानपत्रे त्यांनी अस्सल ऐतिहासिक भाषेत लिहिली आहेत. लवकरच या मानपत्रांचे पुस्तक प्रकाशित करायचा त्यांचा मानस होता. ‘मानपत्र’ हा स्वतंत्र साहित्य प्रकार होऊ शकतो हे केवळ डॉ. सदाशिव शिवदे यांच्यामुळेच महाराष्ट्राला कळले.

छत्रपती शिवाजी महाराज हे अत्यंत विवेकशील व प्रज्ञावंत असल्यामुळे त्यांचे अत्यंत विश्वासू चिटणीस बाळाजी आवजी यांचा वंश त्यांच्या कारकिर्दीत वर आला. रियासतकार सरदेसाई यांनी लिहिले आहे -
‘‘शिवाजी महाराजांच्या राज्य स्थापनेत पेशवा मोरोपंत किंवा सेनापती प्रतापराव गुजर यांजप्रमाणे, किंबहुना त्यांच्याहून जास्त बाळाजी आवजी चिटणीस यांचा उपयोग झाला आहे. 32 वर्षे शिवाजी महाराजांचा हा विश्वासू लेखक असल्यामुळे तो त्यांचा केवळ द्वितीय अंतःकरण होता असे म्हटले तरी चालेल.’’
बाळाजी आवजी चिटणीसांचे सुपूत्र खंडो बल्लाळ चिटणीस या व्यक्तीचे कर्तृत्व हे मराठेशाहीच्या स्थैर्यास कारणीभूत आहे. त्यामुळेच बाळाजी आवजी चिटणीस चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ‘स्वामीनिष्ठ खंडो बल्लाळ चिटणीस’ पुरस्कार दिला जातो. गेल्यावर्षी तो डॉ. सदाशिव शिवदे यांना प्रदान करण्यात आला. यानिमित्त एका सच्च्या इतिहासकाराचा गौरव झाला. संभाजीराजांचे कर्तृत्व संशोधनातून वाचकांपुढे आणणार्‍या डॉ. शिवदे यांची कामगिरी मोलाची आहे. संभाजीराजांवर त्यांनी आजवर 750 हून अधिक व्याख्याने दिली असून शेवटपर्यंत त्यांचे अग्निहोत्र सुरूच होते. पत्नीच्या निधनानंतर खचून न जाता ते अव्याहतपणे कार्यरत होते. पूर्वी घरी गेल्यावर मायी जसे स्वागत करायच्या त्यात शिवदे सरांनी कधीही खंड पडू दिला नाही. म्हणूनच त्यांच्याकडे माणसांचा राबता असायचा.

इतिहास संशोधनाचे कार्य कसे असावे? असे विचारल्यावर डॉ. सदाशिव शिवदे काश्मीरचे कवी कल्हण यांच्या भाषेत सांगायचे,

श्लाणघ्यः स एव गुणवान्रागद्वेषबहिष्कृतः ।
भूतार्थकथने यस्स स्थेयस्येव सरस्वती ॥

(ज्याची वाणी राग-द्वेषांपासून अलिप्त होऊन ऐतिहासिक घटनांचे वर्णन करण्याच्या कामी दृढ राहते (कुठेही पक्षपात करीत नाही) तोच गुणवान पुरूष (अर्थात इतिहासलेखक) प्रशंसनीय समजावा.)

आजच्या वातावरणात इतिहास संशोधन म्हणजे मोठी शिक्षा वाटावी असे चित्र आहे. या द्वेषमूलक वातावरणात डॉ. शिवदे यांच्यासारखे अभ्यासक ठामपणे भूमिका मांडत होते. नवनवीन संशोधन पुढे आणत होते. म्हणूनच त्यांच्या या कार्याचे मोल शब्दातित आहे. 

मध्यंतरी मी फेसबुकला एक पोस्ट टाकली होती. ‘‘वा. सी. बेंद्रे यांच्यानंतर संभाजीराजांना जर कोणी खरा न्याय दिला असेल तर तो डॉक्टर सदाशिव शिवद्यांनी! बाकी विश्वास पाटलांसारख्या लेखकांनी यू ट्यूबसारख्या माध्यमांसाठी मनोरंजक ‘क्लिप’चे लेखन करावे.’’

आपण ही वस्तुस्थिती नाकारू शकत नाही. मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, मोडी या भाषा, लिपींचा अभ्यास, तर्कशुद्ध विवेचन, पुराव्यासह मांडणी, स्पष्ट भूमिका यामुळे ते इतरांपेक्षा वेगळे ठरतात. 

सेवानिवृतीनंतर अविरत ध्यास घेऊन इतिहासाची ज्योत तेवत ठेवणारे डॉ. सदाशिव शिवदे हे खरे आजच्या पिढीचे आदर्श आहेत. त्यांच्या जाण्याने व्यक्तिशः माझे मोठे नुकसान झाले आहे. खरंतर मी त्यांच्या नातवंडाच्या वयाचा! पण त्यांनी माझ्याशी ‘मैत्री’ केली. ‘चपराक’साठी त्यांनी अनेकांना लिहिते केले. नवनवीन लेखकांना ते आमच्याकडे आवर्जून पाठवायचे. सर्वत्र ‘चपराक’विषयी भरभरून बोलायचे. सातत्याने फोन करून चर्चा करायचे. भेटायला बोलवायचे. त्यांनी मोडी लिपीत लफ्फेदार सही करून मला भेट दिलेली अनेक पुस्तके माझ्या संग्रहात आहेत.

मध्यंतरी त्यांच्यावर एक छोटीशी शस्त्रक्रिया झाली. त्यावेळी त्यांचा फोन आला की ‘‘आधी भेटायला या..’’ नेमके त्याचवेळी माझी आईही रुग्णालयात दाखल होती. प्रथमच त्यांनी बोलवूनही भेटायला गेलो नाही. त्यामुळे पुन्हा आता आमची भेट होणारच नाही ही कल्पनाही करवत नाही. 

डॉ. सदाशिव शिवदे यांच्यासारखे प्रज्ञावंत संशोधक त्यांच्या अभ्यासातून, कृतीशील विचारातून कायम जिवंत राहतात. त्यांच्या अनेक स्मृती आमच्याकडे आहेत आणि त्या आम्हाला प्रेरणा देत राहतील. एक अफाट ताकतीचा व्यासंगी इतिहासकार काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांना भावपूर्ण आदरांजली.
- घनश्याम पाटील 
संपादक, प्रकाशक 'चपराक' पुणे 
७०५७२९२०९२ 

Sunday, April 1, 2018

जोशींचा श्री-पाद!



     आपल्याकडे अखिल भारतीय साहित्य महामंडळ नावाची एक संस्था आहे. या संस्थेचं काम काय? तर नको तिथं लुडबुड करत राहणं आणि साहित्यिक व्यासपीठावरून मिरवून घेणं. याचं अध्यक्षपदही ‘फिरतं’ असतं. म्हणजे पुणे, मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद इकडं तीन-तीन वर्षासाठी हे पद दिलं जातं. तिथल्या घटक संस्थांचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष महामंडळाचे अध्यक्ष होतात. म्हणजे हे त्या द्रौपदीसारखं! तिला पाच नवर्‍यांसोबत संसार करावा लागायचा. या महामंडळाचे बदलते अध्यक्ष तीन-तीन वर्षे कारभार पाहतात. देशाच्या राजकारणात राष्ट्रपतींचं जे स्थान असतं तेच स्थान साहित्य संस्थात महामंडळाच्या अध्यक्षांचं असतं. फक्त रबरी शिक्का! नाही म्हणायला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनात यांना थोडंफार डोकावता येतं पण ते तितक्यापुरंतच! इतर वेळी यांना कुणी विचारत नाही.

     सध्या नागपूरचे श्रीपाद भालचंद्र जोशी या साहित्य महामंडळाचे अध्यक्ष आहेत. जोशींचं चरित्र आणि चारित्र्य स्वच्छ आहे. राहणीमान साधं आहे. सगळ्यात मिळून मिसळून असतात. दलित, वंचित, उपेक्षित, शोषित वर्गासाठी त्यांच्या मनात कळवळा आहे. ‘जोशी’ असूनही त्यांनी बहुजनांसाठी योगदान दिलंय. श्रीपाद जोशी काय किंवा आमचे पत्रकार मित्र प्रसन्न जोशी काय! या लोकांनी सातत्यानं सर्वसमावेशक भूमिका घेतलीय! पण यांचं ‘जोशी’ आडनाव मध्ये येतं. अनेकांना ते खुपतं. तरीही ही मंडळी निराश झाली नाहीत. त्यांचं काम त्यांनी सुरूच ठेवलंय. असं जरी असलं तरी काहीवेळा खुर्चिचं पाणी लागतंच असं म्हणतात. श्रीपाद जोशी यांच्याबाबतही असंच काहीसं झालं असावं. सध्या गडी लयीच बेफाट सुटलाय. वाटेल ती विधानं करणं आणि चर्चेत राहणं हा यांचा धंदा झालाय.

     नागपूरमध्ये विदर्भ साहित्य संघाच्या सभागृहात नुकताच एक बहुभाषिक मेळावा झाला. या मेळाव्यात किती भाषिक आले होते माहीत नाही पण उपस्थिती जेमतेमच! त्यामुळं जोशींचा पारा चढला. तो राग त्यांनी मराठी प्राध्यापकांवर काढला. ते म्हणाले, ‘‘मराठी भाषेसंदर्भात परिसंवाद, चर्चासत्र वारंवार होतात पण मराठीचे प्राध्यापक तिकडे फिरकत नाहीत. मराठी भाषेबद्दल त्यांना आत्मियता राहिली नसून लाख-दीड लाख रूपये पगार मिळत असल्यामुळे गरजा संपलेल्या आहेत. त्यांचे पगार तीस-चाळीस हजारांवर आणले तर हे सगळे मराठी भाषेच्या प्रचारासाठी कंबर कसतील...’’

     जोशी प्राध्यापकांच्या पगारावर घसरल्याने तीव्र नापसंती व्यक्त केली जात आहे. प्राध्यापकांना पगार शिकवण्याचा मिळतो की साहित्यिक कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचा? अशा कार्यक्रमांना त्यांनी उपस्थित रहावं ही अपेक्षा आहे की दंडक? विविध महाविद्यालयांनी, शिक्षणसंस्थांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना साहित्य संस्थांचे पदाधिकारी मानधन न घेता उपस्थित राहतात का? बरं, ते राहू द्या! प्राध्यापकांच्या उपस्थितीचं नंतर बघू... या अशा भुक्कड साहित्य संस्थांचे जे सभासद आहेत ते तरी या कार्यक्रमाला येतात का? किमान या कार्यक्रमांची माहिती सदस्यांपर्यंत तरी जाते का? त्यांच्याच संस्थांचे साहित्यिक असलेले किंवा म्हणवून घेणारे सदस्य जर अशा कार्यक्रमांना येत नसतील तर यांनी प्राध्यापकांकडून का अपेक्षा ठेवाव्यात? प्राध्यापकांच्या बौद्धिक विकासासाठी, त्यांच्या साहित्यिक अभिरूचीसाठी साहित्य महामंडळाने आजवर काही उपक्रम राबवलेत का? मग केवळ ते तुमच्या कार्यक्रमाला येत नाहीत म्हणून त्यांचे पगार कमी करा असे फर्मान काढण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?

     श्रीपाद जोशी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष झाल्यापासून महामंडळाच्या कोषासाठी अनेकांकडे पदर पसरत आहेत. दहा रूपयांपासून कितीही रक्कम मदत म्हणून द्या, अशी गळ घालत आहेत. त्यांच्या आवाहनाला प्राध्यापकांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नसावा! म्हणून तर हा पोटशूळ नाही ना? नाहीतर यांच्या पगारावर घसरण्याचं काय कारण? 

     ते म्हणतात, ‘‘मी दहा घटक संस्थांचा ‘क्षीण’ अध्यक्ष आहे. मला कोणतेच अधिकार नाहीत!’’ असं जर आहे तर मग अशी विधानं का करता? तुम्हाला तुमचे अधिकार मिळावेत यासाठी संघर्ष करण्याची गरज आहे. सातत्यानं मागणी होऊनही अखिल भारतीय साहित्य संमेलन सर्वसमावेशक होत नाही. साहित्य संस्थांच्या सदस्यांनाही संमेलनात मतदानाचा अधिकार मिळत नाही. महामंडळानं जे उपक्रम प्रयत्नपूर्वक तडीस नेले ते रसिक-वाचकांपर्यंत पोहचवता येत नाहीत. मग तुम्ही असे तारे का तोडताय? 

     डोंबिवलीच्या साहित्य संमेलनात हेच जोशी म्हणाले होते की, ‘‘साहित्य संमेलनात प्रकाशकांनी पुस्तक विक्रीची अपेक्षा ठेवू नये. हे केवळ प्रदर्शन असते. त्यामुळे प्रकाशकांनी एक-एक प्रत आणावी, ती दाखवावी आणि परत न्यावी...’’ अरे फोकणीच्या, हे जर फक्त ‘प्रदर्शन’ आहे तर ‘ग्रंथ विक्री आणि प्रदर्शन’ असे सांगून आमच्यासारख्या प्रकाशकांकडून ग्रंथ दालनाचं अवाच्या सव्वा भाडं कशाला घेता? केवळ तुमच्या तुंबड्या भरायच्या? आमच्याकडून जमलेल्या पैशातून तुम्ही पंचतारांकित हॉटेलात वास्तव्य करायचे, सगळ्या प्रकारच्या गरजा पूर्ण करून घ्याायच्या, प्रसंगी आयोजकांना मेटाकुटीला आणायचे आणि वर अशी विधानं करायची? जनाची नाही तर किमान मनाची तरी ठेवा रे!

     श्रीपाद जोशी यांनी मराठीच्या प्राध्यापकांच्या घसरत चाललेल्या सांस्कृतिक अभिरूचीविषयी, त्यांच्या राजकीय सहभागाविषयी, विद्यार्थ्यांवर विविध विचारधारा लादण्याविषयी, त्यांनी हातात घेतलेल्या संशोधन कार्याविषयी, पीएच.डीच्या बाजाराविषयी, पैसे भरून भरती झालेल्या प्राध्यापकांविषयी, त्यांच्या वाचनाविषयी, लेखनाविषयी काही भाष्य केलं असतं तर त्यावर एकवेळ चर्चा होऊ शकली असती. इथं मात्र ते थेट त्यांच्या पगारावरच जातात आणि कोणत्याही परिस्थितीत त्याचं समर्थन करता येणार नाही. अशा कुण्या जोश्यानं सांगितलं म्हणून प्राध्यापकांचे पगारही कमी होणार नाहीत. तो अधिकार अशा लोकांकडं नाही; पण यातून त्यांची द्वेषमूलक भूमिका मात्र दिसून येते.

     आज प्राध्यापकांना कितीतरी अशैक्षणिक कामं करावी लागतात. ‘रात्र थोडी आणि सोंगं फार’ अशी त्यांची अवस्था झालीय. विविध कमिट्या, सांस्कृतिक कार्यक्रम, साहित्यिक कार्यक्रम यात ते व्यग्र असतातच. केवळ साहित्य महामंडळासारख्या संस्थाकडं ते फिरकत नाहीत म्हणून त्यांचं साहित्यिक योगदान दुर्लक्षित करता येणार नाही. अनेक ठिकाणी तर महाविद्यालयं राजकीय नेत्यांच्या नेतृत्वाखाली चालतात आणि त्या त्या नेत्यासाठी प्राध्यापकांना सगळी कामं सोडून जीवाचं रान करावं लागतं. हे चित्र थांबवण्यासाठी जोशीबुवांकडं काही योजना आहेत का? विनाअनुदानीत तत्त्वावरील प्राध्यापकांची अवस्था तर ‘भीक नको, कुत्रा आवर’ अशी झालीय. त्यांच्या पोटापाण्यासाठी महामंडळ काही करू शकेल का? 

     एक प्रातिनिधिक उदाहरण द्यावंसं वाटतंय. उदगीर येथील आमचा मित्र प्रा. रामदास केदार! अत्यंत गुणवान कवी, लेखक, समीक्षक! त्याच्या कवितांची दखल दस्तुरखुद्द विंदा करंदीकर, मंगेश पाडगांवकर अशा दिग्गजांनी घेतलीय. विंदा रूग्णालयात असताना म्हणाले होते, ‘‘आता या वयात माझी आई माझ्याजवळ नाही. ती कधीच देवाघरी गेलीय; पण रामदासची ‘मराठवाड्याची आई’माझ्या उशाला आहे. त्यामुळे मी स्वतःला धन्य समजतो.’’ रामदास केदारनं मराठवाड्यातील कवींच्या ‘आई’विषयक कवितांचं संकलन केलं होतं आणि विंदांनी त्याची अशी दखल घेतली होती. हा गुणी लेखक उपेक्षेचं आयुष्य जगतोय. विनाअनुदानीत तत्त्वावर गेली कित्येक वर्षे प्राध्यापक म्हणून काम करतोय. त्याच्या महाविद्यालयातल्या शिपायालाही त्याच्यापेक्षा जास्त पगार मिळतोय... श्रीपाद जोशी यांच्याविषयी काही बोलणार आहेत का?

     मराठीच्या प्राध्यापकांचं अवांतर वाचन, त्यांची साहित्यिक अभिरूची कमी झालीय हे तर खरंच. काही अपवाद वगळता अनेक प्राध्यापकांनी सातत्यानं भाषेचे खूनच केलेत. या लोकांकडं किमान दोन मराठी मासिकं येत नाहीत, यातच सगळं आलं... पण म्हणून त्यांचे पगार काढू नयेत. हा ज्यांचा त्यांचा अधिकार आहे आणि तो आपण मान्य करायला हवा. साहित्य क्षेत्रातील महत्त्वाच्या पदावर असलेल्या ‘गुळाच्या गणपती’ला एवढं भान तरी असावंच असावं! 

     जोशी, तुमचा हा पाद दुर्गंधीयुक्त आहे. यामुळं वातावरण कलुषित होतंय. साहित्य संस्थांविषयी लोकांच्या मनात जिव्हाळा निर्माण होण्याऐवजी ते आणखी दूर जात आहेत. मराठीच्या आणि इतरही प्राध्यापकांनी साहित्य संस्थाकडं, साहित्याकडं फिरकावं असं तुम्हाला खरंच वाटत असेल तर अशी अविवेकी, द्वेषपूर्ण, संकुचित विधानं करू नकात. अजूनही परिस्थिती हाताबाहेर गेली नाही. साहित्य संस्थांची गमावलेली प्रतिष्ठा, त्यांची विश्‍वासार्हता परत मिळवायचं काम तुम्हाला करावं लागणार आहे. गेल्या चाळीस वर्षात अनेकांनी तुमची धडपड बघितलीय. तुमची जातनिरपेक्ष, धर्मनिरपेक्ष भूमिका, तुमच्यातला हाडाचा सच्चा कार्यकर्ता, पत्रकार, कवी वाखाणण्याजोगा आहे. शरद पवारांसारखा महानेताही उतारवयात जशी बेताल विधानं करतो तसं तुमचं होऊ देऊ नकात. तुम्ही साहित्यिक आहात. त्यामुळं आयुष्यभराची साधना असं वाटेल ते बोलून घालवू नकात. 

     मागं श्री-पाल नावाचे एक संमेलनाध्यक्ष म्हणाले होते, ‘‘मोदी तिकडं पाकिस्तानात कशाला बोंबलत फिरतोय?’’ आणखीही बरीचशी आक्रस्ताळी विधानं त्यांनी केली होती. यंदाचे संमेलनाध्यक्ष देशमुख म्हणाले, ‘‘राजा, तू चुकतोस रे...’’ आणि महामंडळाचे अध्यक्ष म्हणतात, ‘‘प्राध्यापकांचे पगार कमी करा...’’ मराठी माणूस हे सगळं अजूनही खपवून घेतोय पण त्याचा अंत पाहू नकात. तुम्ही साहित्यिक आहात तर साहित्यावर बोला. तुमच्यामुळं चार लेखक जरी नव्यानं पुढं आले तर तेच तुमचं ‘सांस्कृतिक संचित’ असणार आहे. तिकडं लक्ष न देता अशी दर्पोक्ती करत राहिलात तर तुम्हाला कुणी ढुंकूनही विचारणार नाही. कितीतरी आले, गेले... त्यातले तुम्ही एक होऊ नकात म्हणजे झाले. सूज्ञास अधिक सांगणे न लगे!!
- घनश्याम पाटील
संपादक, ‘चपराक’, पुणे
7057292092