Tuesday, September 19, 2017

कृतघ्न नको; कृतज्ञ राहा!


राजकारणात कुणी आपल्या पक्षातून दुसर्‍या पक्षात गेले तर ते ‘गद्दार’ ठरतात आणि दुसर्‍या पक्षातून आपल्या पक्षात आले तर ते त्यांचे ‘हृदयपरिवर्तन’ असते! 

हा नियम खरे तर आता प्रत्येक क्षेत्रात लागू पडतोय. त्यासाठी राजकारणच कशाला हवेय?

माणूस इतका स्वार्थी झालाय की तो प्रत्येक घटनेचा, कृतीचा, निर्णयाचा आपल्याला हवा तसा अर्थ लावून मोकळा होतो. बोलीत आणि करणीत इतकी मोठी दरी निर्माण झालीय की आयुष्य विसंगतीनेच व्यापून गेलेय.

हे सारे लिहिण्याचे कारण म्हणजे गेल्या आठवड्यातील नितेश राणेंचे विधान! 

कोण आहेत हे नितेश राणे?

तर त्यांची स्वतःची अशी काही विशेष ओळख नाही. त्यांचे तीर्थरूप, महाराष्ट्राचे एकेकाळचे मुख्यमंत्री नारायण राणे यांचे ते सु(?)पूत्र! राणे कुटुंबातील सदस्य इतर राजकारण्यांप्रमाणेच अधूनमधून वादग्रस्त विधानं करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करीत असतात. नाहीतर अशा उपटसुंभांना कोण विचारणार?

तर त्याचं झालं असं, की या राणेपुत्रानं, श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना आव्हान दिलंय...! 
काय आव्हान आहे? तर ‘तुम्ही एकटे बाहेर फिरून दाखवा...’

बाबासाहेबांचे सध्या वय आहे, शहाण्णव! 
राणे पितापुत्रांचे वय एकत्र केले तरी ते इतके व्हायचे नाही! असो.

तर या निमित्तानं आम्हाला काही वर्षापूर्वीची एक घटना पुन्हा आठवली.

श्रीपाल सबनीस नावाचे एक गृहस्थ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणुकीला उभे होते. त्यावेळी ‘सनातन’चे वकील असलेल्या पुनाळकरांनी त्यांना सल्ला दिला होता की, ‘‘रोज मॉर्निंग वॉकला जात जा...’’ 

त्यावरून प्रचंड गहजब माजला. निखिल वागळेसारख्या पुरोगामी पत्रकारांनी त्या विधानावर खास ‘शो’ केले. त्यात अनेकांनी पोपटपंची केली. सगळ्यांना म्हणे ती खूप मोठी धमकी वाटली.

ऍड. पुनाळकरांचे म्हणणे होते, ‘‘श्रीपाल सबनीस यांना मी कधी भेटलो नाही. त्यांच्याशी माझा परिचयही नाही, पण ते संमेलनाध्यक्षपदासाठी उभे आहेत. वृत्तपत्रात, वाहिन्यांवर त्यांचा चेहरा बघितला. प्रत्येकवेळी ते खूप गंभीर दिसतात. आमच्या कोकणात पोट साफ होत नसेल तर असे विकार होतात असे मानले जाते. अशावेळी आम्ही सांगतो, ‘जरा मॉर्निंग वॉकला जात जा.’ त्याने अशा व्याधी कमी होतात. पोट साफ झाल्याने पचनक्रिया व्यवस्थित होते. त्याच्याकडे बघून समोरच्याला आनंद मिळणे राहू द्या पण किमान दिवस खराब जात नाही. माणूस ‘मंद आणि मठ्ठ’ वाटत नाही. ते साहित्यक्षेत्रातील महत्त्वाची निवडणूक लढवत असल्याने त्यांना हा प्रेमाचा सल्ला दिला.’’

पण हे विधान कुणाला कळले नाही किंवा पुनाळकरांचा प्रामाणिक उद्देशही कुणी ध्यानात घेतला नाही. जमाते पुरोगामींची फौज रस्त्यावर उतरली. सबनीसांनी ‘सामुहिक मॉर्निंग वॉक’ केले. 
वर ‘इथून पुढे मी रोज ‘सकाळी’ मॉर्निंग वॉकला जाणार’ असेही  विनोदी विधान केले. त्यांचा तो संकल्प किती दिवस टिकला हे माहीत नाही, मात्र त्यावरून प्रसारमाध्यमांनी हा विषय अनेक दिवस चवीने चघळला होता.

हे सांगण्याचे कारण म्हणजे त्यावेळीही हे नितेश राणे सबनीसांसाठी रस्त्यावर उतरले होते. त्यांच्या कुमठेकर रस्त्यावरील निवासस्थानी जाऊन त्यांनी सबनीसांना ‘धीर’ दिला होता. ‘पुरोगामी महाराष्ट्रात अशा धमक्या सहन करणार नाही' असे म्हणत त्यांच्यासोबत ‘मॉर्निंग वॉक शो’ही केला होता. सबनीसांनी त्यांच्या सवयीप्रमाणे नितेश यांचा शाल घालून सत्कार केला होता आणि त्यांना ‘मानलेला’ मुलगाही जाहीर केले होते. हेच नितेश राणे आता बाबासाहेबांना एकटे फिरण्याची धमकी देत आहेत आणि सबनीसांसारखे सगळे तथाकथित लेखक त्याविरूद्ध ब्रही काढत नाहीत. जमाते पुरोगामींच्या फळीतील पत्रकारांना यावर चर्चा घडवावी वाटत नाही, कारण बाबासाहेब अशा धमक्यांना भीक घालणार नाहीत. 

बाबासाहेबांवर टीका केल्याने त्यांचे योगदान कमी होणार नाही. शिवचरित्रासाठी समर्पित आयुष्य घालणारे इतके त्यागी दुसरे व्यक्तिमत्त्व दाखवा. बाबासाहेब या वयातही शिवकालच जगतात. त्यांचा तो ध्यास आहे, श्वास आहे. ज्यांना शिवचरित्रावर काही करावेसे वाटते त्यांनी इतके निरोगी आणि समाधानी दीर्घायु जगावे. हे काम व्रत म्हणून स्वीकारावे. बाबासाहेब कुठे कमी पडलेत असे वाटत असेल किंवा त्यांनी काही चुकीचे लिहिलेय असे वाटत असेल तर संशोधनातून, अभ्यासातून ते खोडून काढावे. मात्र त्यासाठी परिश्रम करावे लागतात. त्याला चिंतन लागते. गड, कोट, किल्ले पालथे घालावे लागतात. घरदार सोडून सातत्याने भ्रमंती करावी लागते. डोळ्यात तेल घालून इतिहासाचा अभ्यास करावा लागतो. हजारो-लाखो कागदपत्रे वाचावी लागतात, अभ्यासावी लागतात. त्यासाठी भाषेचाही अभ्यास लागतो. नितेश यांच्यासारख्या कुणालाही बाबासाहेब चुकीचे वाटत असतील तर त्यांनी पोकळ धमक्या देण्याऐवजी हे करून दाखवावे. त्यातून प्रत्येकाला आपली ‘उंची-खोली’ लक्षात येईल. काहीच नाही झाले तर किमान श्रीमंत कोकाटेसारखा ‘विनोदी’ इतिहास तरी लिहावा. ‘शिवाजी’ या नावातच इतकी जादू आहे की त्यांच्याविषयी काहीही काम केले तरी त्या माणसाच्या आयुष्याचे सोनेच होते. नाहीतर कोकाटेसारखी माणसे महाराष्ट्राला कळली तरी असती का?

शिवाजीराजांचा पराक्रम समजून घ्यायचा असेल तर बाबासाहेबांनी एक पायवाट तयार केलीय. भविष्यात त्या वाटेवरून कुणी गेले तर आनंदच आहे. मात्र केवळ टीका-टिपन्नी करून अशा विषयात राजकारण साधता येत नाही. एकेकाळी शिवसेनेसोबत संसार करताना हेच राणे कुटुंबिय बाबासाहेबांना ‘दैवत’ मानत. खुद्द नितेश राणे यांनीच बाबासाहेबांचे ‘आशीर्वाद’ घेतानाचे फोटो ट्विट केले होते. आता त्यांचा घटस्फोट झालाय. आता कॉंग्रेसबरोबरही त्यांचा घरोबा संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.त्यामुळे त्यांना होऊ घातलेल्या नव्या कुटुंबातले नियम, रूढी, परंपरा जपाव्या लागतात. नवर्‍याची खप्पामर्जी होईल असे काहीही करण्यास कोणतीही बायको सहजासहजी धजावत नाही.  ती आवडती असेल, नावडती असेल... पण तिला आपले पातिव्रत्य दाखवून देण्यासाठी धडपड करावीच लागते. नितेश यालाही अपवाद ठरले नाहीत. त्यांच्या तीर्थरूपांची राजकीय ससेहोलपट होत असली, घुसमट चालू असली तरी हा मांडलेला ‘संसार’ तर टिकवायला हवाच! म्हणून तर मग बाबासाहेबांसारख्या तपस्वी माणसांवर काहीबाही बोलण्याचे धाडस करावे लागते. नाहीतर त्यांना त्यांची स्वत:ची योग्यता माहीत नाही असे थोडेच आहे? महाराष्ट्र आणि इथला मराठी माणूस ही अगतिकता समजून घेऊ शकतो.
  
नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबियांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भरभरून दिलेय. दगडाचा देव केल्यानंतर त्याने आपले ‘देवपण’ जपले पाहिजे. इथे हा ‘दगड’च स्वयंभू झाल्याच्या आविर्भावात वावरू लागला आणि म्हणूनच मोठी समस्या निर्माण झाली. दगड तो दगडच! तो निर्मितीच्या कामाला आला तर त्याचे वेगळे महत्त्व असते! इथे मात्र विध्वंसच दिसतो. ज्यांनी निर्मिती करायला हवी ते तोडण्या-मोडण्याची भाषा करू लागतात तेव्हा त्यांचे अस्तित्व संपते. राणे कुटुंबियांचेही तसेच झाले आहे. द्वेषाने पछाडलेल्या मानसिकतेतून ते फक्त आरोप करत सुटले आहेत, धमक्या देत सुटले आहेत.

जाताजाता आचार्य अत्रे यांचे एक विधान सांगावेसे वाटते. अत्रे साहेब म्हणाले होते, ‘‘भविष्यात जर कुणाला माझी समाधी उभारावीशी वाटली, तर त्यावर एक वाक्य हमखास लिहा. हा माणूस अविवेकी असेल, प्रमादशील असेल मात्र हा माणूस कृतघ्न कधीही नव्हता! कारण कृतज्ञता हे मानवी आयुष्याला मिळालेले सर्वात मोठे वरदान आहे आणि कृतघ्नता हा सर्वात मोठा शाप!’’

राणेसाहेब, महाराष्ट्राने तुम्हाला आजवर भरभरून दिले आहे. त्याविषयी तुम्ही कधी कृतज्ञता व्यक्त केल्याचे स्मरत नाही; निदान वाटेल ती विधाने करून कृतघ्नपणा तरी दाखवून देऊ नकात!
- घनश्याम पाटील 
७०५७२९२०९२ 

Monday, September 4, 2017

'जुलूस' आणि महाराष्ट्रभूषण!


अर्चना डावरे या परभणीच्या लेखिका. त्यांचा फोन आला. त्या म्हणाल्या, ‘‘दादा, मला बाबासाहेब पुरंदरे यांना भेटायचंय.’’ त्यांना म्हणालो, ‘‘या, भेटूया.’’

त्या काल पुण्यात आल्या. सोबत त्यांचे पती श्री. गिरीशही होते. आम्ही सर्वजण त्यांच्या घरी गेलो. सगळ्यांची ओळख करून दिली. छान गप्पा झाल्या. 

बाबासाहेेब नुकतेच दिल्लीला जाऊन आले. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. साहजिकच त्या विषयावर चर्चा सुरू झाली. 
ते म्हणाले, ‘‘पंतप्रधानांकडं माझं काहीच काम नव्हतं. मीच त्यांचा भेटीसाठी वेळ घेतला. आम्हाला ‘जाणता राजा’चा प्रयोग दिल्लीत करायचाय. त्यासाठी त्यांनी उपस्थित रहावं अशी विनंती करायची होती. ते त्यांच्या व्यग्रतेतून पाच मिनिटांसाठी आले तरी आनंद होता. भेट झाली. त्यांना निमंत्रण दिलं. त्याबरोबर ते म्हणाले, ‘‘जाणता राजा’चा पहिला प्रयोग 14 एप्रिल 1984 ला झाला होता. त्यासाठी मी अहमदाबादहून पुण्याला आलो होतो. आता तर दिल्लीतल्या दिल्लीत यायचं आहे. नक्की येईन.’’ त्यांनी अस्खलित मराठीत असं बोलल्यावर मी अवाकच झालो. आता 6 फेब्रुवारी 2018 ला दिल्लीत ‘जाणता राजा’चा प्रयोग होतोय.’’

हे सारं ऐकून आम्ही स्तंभित झालो. अर्चनाताई लेखिका. त्यात निवेदिका. त्या गप्प थोडेच बसतील? त्यांनी प्रश्नांची सरबत्तीच सुरू केली. आम्ही शांत! अर्चनाताई म्हणाल्या, ‘‘बाबा, आम्हाला शिवाजीराजे कळले ते तुमच्यामुळं. इतिहास कळला तोही तुमच्यामुळं. आमचं बालपण त्यामुळं संपन्न झालं; पण तुमच्यात इतिहासाची आवड कशी निर्माण झाली?’’

ते हसले. म्हणाले, ‘‘माझ्या वडिलांमुळं. त्यांनी आम्हाला ही समज दिली. अभ्यासाची दृष्टी दिली.’’

नंतर त्यांनी त्या आठवणी जागवल्या. ते बोलत होते. आम्ही नेहमीप्रमाणं मंत्रमुग्ध.

‘‘आता वयाच्या 96 व्या वर्षी काय बोलणार? पण नव्या पिढीत अभ्यासाची दृष्टी विकसित झाली पाहिजे. आमचा ऐतिहासिक चित्रांचा प्रकल्प सुरू आहे. त्यातली 106 चित्रं तयार झालीत. आम्ही आता चित्रमय शिवकाल साकारत आहोत. त्यातून तरी नवी पिढी इतिहासाकडं आकर्षित होईल.’’

सोबतचे सारेजण ऐकत होते. अर्चनाताई अधूनमधून काही प्रश्न विचारून त्यांना बोलतं करत होत्या. त्यांनी खास परभणीहून आणलेली शाल त्यांच्या अंगावर चढवली. ते खुश झाले. शाल पाहत म्हणाले, ‘‘फार सुंदर आहे...’’ नंतर अर्चनाताईंनी त्यांचा ‘जुलूस’ हा कथासंग्रह त्यांना भेट दिला. मागच्या ‘चपराक साहित्य महोत्सवा’त आम्हीच तो प्रकाशित केलाय. मी त्यांना म्हणालो, ‘‘आणखी एक प्रत घ्या आणि त्यावर त्यांची स्वाक्षरी घ्या.’’  ‘जुलूस’ची दुसरी प्रत त्यांच्या हातात दिली. त्यावर त्यांनी मोडी लिपित सही केली. सगळे खूश!

थोडावेळ चौफेर गप्पा झाल्यावर आम्ही त्यांचा निरोप घेतला. सगळेजण भारावलेल्या अवस्थेत. या वयातही त्यांचा उत्साह, इतिहासाचं प्रेम, शिवमय जगणं, नवोदितांची आस्थेनं दखल आणि महत्त्वाचं म्हणजे तल्लख स्मरणशक्ती... सगळंच अचंबित करणारं!

आम्ही बाहेर पडलो. त्यांच्या घराजवळील एक छोटंसं हॉटेल. तिथं आमच्या गप्पा सुरू झाल्या. आमच्यासोबत नगरचे लेखक सदानंद भणगे हेही होते. त्यांचीही पुस्तकं ‘चपराक’नंच केलेली. बाबासाहेबांना भेटायचं म्हणून त्यांनाही अतीव आनंद झालेला. शिवाय अर्चनाताईंच्या ‘जुलूस’ची प्रस्तावनाही आम्ही त्यांच्याकडून आग्रहानं लिहून घेतलेली.
आमच्या गप्पा सुरू असतानाच मला बाबासाहेबांचा फोन आला. जेमतेम 15 मिनिटांपूर्वीच त्यांच्या घरातून बाहेर पडलो होतो. त्यांनी विचारलं, ‘‘कुठे आहात? जवळपास असाल तर परत पाच मिनिटांसाठी येऊ शकाल का?’’

त्यांना म्हणालो, ‘‘आम्ही सगळेच तुमच्या घराबाहेर आहोत. आलोच.’’

पुन्हा आमचा ताफा त्यांच्या घराकडं वळला. सगळ्यांच्याच मनात विचारचक्र सुरू झालं. त्यांनी परत का बोलावलं असावं? 

आत जाताच त्यांनी अर्चनाताईंना जवळ बोलावलं. ते म्हणाले, ‘‘मी आता ‘जुलूस’ची प्रस्तावना आणि तुमची ‘जुलूस’ ही शीर्षककथा वाचली. त्यावर मला काही बोलायचं आहे...’’

अर्चनाताई भांबावून गेलेल्या.

बाबासाहेब म्हणाले, ‘‘ही कथा सुंदर झालीय. यातील हिंदी आणि उर्दू शब्द तुम्हाला कसे सुचले?’’

ताई म्हणाल्या, ‘‘माझे वडील हैद्राबाद मुक्ती संग्रामात होते. आमच्याकडे मराठी बोलतानाही हे शब्द सहजपणे येतात. त्यामुळे वापरले.’’

मग त्यांनी एकदोन उर्दूमिश्रीत हिंदीतली वाक्यं सांगितली. त्याचा अर्थ विचारला. तो सांगितल्यावर म्हणाले, ‘‘मागच्या तीन महिन्यापासून मला जी चिंता होती त्यातून मी मुक्त होईन. तुम्ही एक काम कराल का? ते तुमच्याकडून 99 टक्के होईल. ‘जाणता राजा’चे आजवर 1200 प्रयोग झालेत. त्यात हिंदीत 200 प्रयोग झालेत. तुम्ही सोप्या भाषेत आणि भाषेचा लहेजा राखत याचे रूपांतर करा.’’

सगळे अवाक! ताई तर भारावूनच गेल्या. केवळ त्यांची एक भेट मिळावी म्हणून त्यांचा अट्टहास चाललेला. इथं तर त्यांनी इतकी मोठी जबाबदारी सोपवली... लगेच बाबासाहेबांनी ‘जाणता राजा’ची एक प्रत त्यांना भेट दिली. त्यातील चारपाच पानांचा अनुवाद करायला सांगितला. अर्चनाताई रात्री परभणीला परतणार असल्यानं तो माझ्यासोबत द्यायला सांगितला. तो कसा वाटतोय यावर पुढची दिशा ठरणार होती. 

‘‘मराठवाड्यात इतके प्रकाशक असताना पुण्यातून पुस्तक प्रकाशित करायची काय गरज?’’ असा प्रश्न त्यांना काहींनी विचारला होता. त्याच पुस्तकानं आज अर्चनाताईंचे आदर्श असलेल्या बाबासाहेबांच्या हृदयात घर केलं होतं. त्यांच्याकडून लेखनाला, भाषेला, आशयाला दाद मिळाली होती. दर्जेदार लेखनाचं आणि ते संबधितांपर्यंत पोहोचवल्याचं असं समाधान असतं...

अर्चनाताईंनी त्यांचं परभणीला परत जाण्याच्या प्रवासाचं आरक्षण रद्द केलं. त्यातील काही भागाचा समर्थ अनुवाद केला. आज (सोमवार) तो घेऊन आम्ही पुन्हा त्यांच्याकडं गेलो. तो त्यांनी वाचला. सगळ्यांच्या मनात धडकी भरली होती. ते मात्र खुश झाले. म्हणाले, ‘‘मी आता हे कावळ्याच्या दृष्टिनं वाचलं. थोड्यावेळानं आस्वादक रसिकाच्या भूमिकेतून वाचेल. हे काम तुमच्या हातून घडेल. त्यासाठी तुम्हाला परत यावं लागेल. काही शब्दांवर आपल्याला चर्चा करावी लागेल...’’ 

लगेच त्यांनी ‘जाणता राजा’च्या हिंदी प्रयोगाची सिडी मागवली. ती आज संध्याकाळी आम्ही सगळेजण ऐकणार आहोत. त्यांचं म्हणणं असं की, अर्चनाताईंची भाषा रसाळ आहे. त्यात मराठवाडी गोडवा आहे. त्या त्याचा हिंदी अनुवाद आणखी ताकदीनं करू शकतील...

एका लेखिकेची केवळ एक कथा वाचून त्यांनी हा केवढा मोठा विश्वास दर्शविला! अर्चनाताई पूर्ण सामर्थ्यासह हा प्रकल्प यशस्वी करतील याविषयी माझ्या मनात अजिबात किंतु नाही.

लेखकानं लिहित राहिलं पाहिजे. तुम्हाला तुमचं साहित्यच यश, कीर्ती, समाधान, पैसा सारं काही मिळवून देईल. त्यासाठी अनेकदा वाट पहावी लागते. संधीनं दरवाजा ठोठावला की तो तुम्ही उघडला पाहिजे. 

अनेकजण नैराश्यानं ग्रासतात. ‘लेखनानं मला काय दिलं?’ म्हणून चिंताक्रांत होतात. कुणाचं नशीब कसं उघडेल हे सांगता येत नाही! पण आपलं लेखन हा आपल्या हौसेचा नाही तर जीवननिष्ठेचा भाग झाला पाहिजे. ते झालं की पुढचं सगळं सोपं होतं. 

तूर्तास मात्र आम्ही ‘जाणता राजा’च्या मराठवाडी शैलीतील उर्दूमिश्रीत हिंदी आवृत्तीची वाट पाहत आहोत.
- घनश्याम पाटील, पुणे 
7057292092