अंतरंगात घर करणा-या अंतरीच्या कविता - स्वप्निल पोरे
'अंतरीच्या कविता' हा कवी संजय ऐलवाड यांचा पहिलाच कविता संग्रह!
नवथरपणाच्या खुणा ब-याच कवींच्या पहिल्या संग्रहात हमखास दिसतात; पण संजय ऐलवाड
यांचा 'अंतरीच्या कविता' हा संग्रह याला अपवाद आहे. यात काव्य रचनेतील नवथरपणा नाही
पण शब्दांचा ताजेपणा आहे. त्यात काळजाला भिडणारे वास्तव आहे.
अस्सल मराठी बाजाची कविता आजकाल दुर्मिळ झाली आहे. 'अंतरीच्या कविता' मधून
ख-याखु-या मराठी बाजाची कविता रसिकांना भेटते. मराठी भाषेत लिहिली गेलेली प्रत्येक
कलाकृती 'मराठी' असतेच असे नाही. म्हणायला मराठी भाषा, पण कसदार पणापासून कोसो
योजने दूर! शब्दांची कृतिम सजावट आणि त्या सजावटीसाठी धडपड करताना कलाकृतीतून हरवून
गेलेला आत्मा! 'अंतरीच्या कविता' त्या पार्श्वभूमीवर मराठी भाषेच्या अस्सल
सौंदर्याचे दर्शन घडवतात. ऐलवाड यांची कविता मातीमधून रुजून आलेली कविता आहे.
म्हणूनच या कवितेचे तरारुन आलेले पाते अनोख्या हिरवाईचा अनुभव देते.
ही कविता मातीची महती गाते, मातीची वेदना सांगते. भूमिपुत्रांची अर्थात
शेतक-यांची व्यथा मांडते.
काळ गेला दुष्काळात
ह्रदयी हुंदका दाटतो
हा आक्रोश कवींच्या शब्दामधून उमटतो पण तो मांडतानाही कविने शब्दांचा संयम
राखला आहे. आक्रंदनाला आक्रस्ताळेपणाचे रूप येणार नाही, याची काळजी घेतली आहे.
तोंड वासली जमीन
कळ पोटात दाटली
काळीकुट्ट ढग बघून
माती गालात हसली!
असे कवी सहजपणे लिहून जातो. त्यावेळी मातीशी असलेले त्यांचे ऋणानुबंध उलगडतात.
'पीक सुकल्या रानात, कशी वाचावी गाथा?' हा या कवीचा सवाल अंतर्मुख करणारा आहे.
ग्रामीण जीवन शेतीशी जोडले गेले आहे आणि शेती आकाशाच्या कृपेवर! पाऊस झाला तर ठीक;
नाहीतर दुष्काळाचे भेसूर संकट. शेतक-याच्या वाट्याला मग कायमच अनिश्चितता!
ते दाहक चित्र 'अंतरीच्या कविता ' मधील अनेक रचनामधून सजीवपणे उमटते आणि
काव्यरसिक अस्वस्थ होतात.
ढगालाही होती जाण
काळ्या भू-या ढेकळांची
पाणी कृतिम, काडी भिजेना गवताची
अशी व्यथा जीवनाची
बेईमानी बेईमानी
फांदी राखते आजही
लोंबणा-याशी इमानी
या 'व्यथा'
कवितेतील ओळी म्हणजे जणू कृषी संस्कृतीचा लख्ख आरसा. 'तुझ्या विना पावसा'
ही कविता देखील शेतक-याच्या मनातील आर्त सांगून जाणारी आहे.
असा पाहू नको अंत
जीव कंठात दाटला
तुझ्याविना रे पावसा
गाव गावातून उठला
असे कविने लिहिले आहे. गाव गावातून उठला, यापेक्षा अधिक परिणामकारक भाष्य
कुठले असू शकेल? अवघ्या तीन शब्दात कवी ते करून जातो, यातच ऐलवाड यांच्या कवितेची
ताकद दिसते. 'अंतरीच्या कविता' विविध विषयांवरील आहेत. कधी कवी सामाजिक वास्तव
अधोरेखित करीत 'आजचा राम', 'बदल' या कविता लिहून जातो, त्याच क्षमतेने 'विरह' सारखी
कविता लिहित आत्ममग्नतेत हरवून जातो. कविता कधी एकांगी असू शकत नाही. कवितेचे
क्षितिज सागराला कवेत घेणारे असते. ठराविक विषयात कविता अडकून पडली तर कवितेचा खरा
अर्थ साध्य होत नाही. हे भान सुदैवाने संजय ऐलवाड यांना आहे. त्यामुळे
काव्यक्षेत्रात मोठी मजल गाठण्याच्या सर्व शक्यता 'अंतरीच्या कविता' मध्ये दिसतात.
ऐलवाड यांच्या अभिव्यक्तीत नैसर्गिक सहजता आहे. या सहजतेमुळे ती मनाला भावते. 'मनात
तरंगणारे कोरडे ढगही, भरायला लागतात हळूहळू …' ही तरलता त्यांच्या कवितेचे वैशिष्ठय
आहे. कठोर वास्तव मांडताना देखील ती तरलता हरवत नाही, हे उल्लेखनीय! कवितेची लय या
कविला सापडली आहे. 'जाऊ नको दूर सई, जवळ जरा थांब गं' अशा त्यांच्या ओळी म्हणजे जणू
लयींचे मुर्तीमंत रूप! ते रूप वेधक आहेच, शिवाय ते ऐलवाड यांच्या काव्यरचनांना आणखी
प्रगल्भ करते. संजय ऐलवाड यांच्या 'अंतरीच्या कविता' केवळ भोलताल जिवंत करतात असे
नाही, तर मनाचा गाभाराही जिवंत करतात. आनंद, दु;ख, व्यथा, वेदना अशा भावछटांचे रंग
घेवून आलेले त्यांचे शब्द त्यांच्या कवितेचे इंद्रधनु खुलवतात. 'अंतरीच्या कविता'
वाचकांच्या अंतरंगात घर करतील यात शंका नाही!
- स्वप्निल पोरे,
वृत्त संपादक, केसरी, पुणे
'अंतरीच्या कविता'
कवी : संजय ऐलवाड
प्रकाशन : चपराक प्रकाशन, पुणे
संपर्क ९२२ ६२२ ४१ ३२