मुंबईसह अखंड महाराष्ट्राचे सेनानी सेनापती बापट यांच्या या ओळी! सेनापती बापट, आचार्य अत्रे अशा धुरिणांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून मुंबईसह महाराष्ट्राची निर्मिती झाली. ‘महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठे’ असे म्हणणारे यशवंतराव चव्हाण स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले आणि अखंड महाराष्ट्राचा मंगलकलश त्यांनी वाजत गाजत आणला. त्यावेळी आचार्य अत्रे यांच्यासारख्या या लढ्यातील प्रमुख सेनानीला साधे बोलवायचे सौजन्यही तेव्हाच्या नेतृत्वाने दाखवले नाही. 1 मे 1960 नंतर आता 2017 पर्यंत महाराष्ट्र ज्या स्थित्यंतरातून जातोय त्यामुळेच ते पाहणे मोठे मनोरंजक आहे.महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले
मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले
खरा वीर वैरी पराधीनतेचा
महाराष्ट्र आधार या भारताचा!
‘हे राज्य मराठ्यांचे की मराठीचे?’ असा सवाल ग. त्र्यं. माडखोलकरांनी यशवंतराव चव्हाण यांना केला. त्यावेळी त्यांनी हे राज्य ‘मराठी’चेच असल्याचे सांगितले होते. त्यांच्यानंतर ‘मराठा’ नेते अशीच प्रतिमा असलेल्या ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दीर्घकाळ महाराष्ट्राचे नेतृत्व केले. प्रारंभीच्या काळात यशवंतरावांचा सुसंस्कृतपणा पवारांनी घेतला; मात्र पुढे पुढे त्यांची दिशा बदलत गेली. अफाट महत्त्वाकांक्षेने ग्रासलेल्या या नेत्याने देशाच्या राजकारणात आपली छाप उमटवली; पण राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय स्तरावर त्यांना विश्वासार्हता निर्माण करता आली नाही. त्यांच्या जवळपासही फिरकू शकणार नाही अशी अनेकांची गत असतानाही शरद पवार काळाच्या कसोटीवर पिछाडीवर पडले. अन्यथा त्यांच्या रूपाने महाराष्ट्राला पहिला पंतप्रधान मिळाला असता; पण ते होणे नव्हते!
यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर झालेल्या मुख्यमंत्र्यांनी आपापल्या परीने महाराष्ट्राचा गाडा हाकला! पण अनेक ‘खुरट्या’ नेत्यांनी महाराष्ट्राला बरेचसे मागे नेले. नारायण राणे, अशोक चव्हाण अशांची ‘आदर्श’ कारकिर्द आपण बघितली आहेच. वसंतदादा पाटील यांच्यासारखा साधा नेता या राज्याचे कधीकाळी नेतृत्व करायचा ही गोष्ट आता अविश्वसनीय वाटावी इतकी राजकारणाची पातळी घसरली आहे.
महाराष्ट्रासाठी या सर्व नेत्यांनी, सत्ताधार्यांनी जे काही बरेवाईट करायचे ते केले! पण आज महाराष्ट्राची नेमकी काय गत आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरणारे आहे. सर्व समाजातील वाढलेला कट्टरतावाद, जातीय अस्मितेचे ओंगळवाणे प्रदर्शन, शेतकर्यांच्या आत्महत्या, श्रमाची प्रतिष्ठा धुळीस मिळणे, प्रामाणिक आणि कर्तबगार लोकांवर आणि त्यांच्या गुणवत्तेवर केलेला अन्याय, स्त्रियांवरील अत्याचार, वाढती गुन्हेगारी, अजूनही मुलभूत सेवासुविधांपासून अनेकजण कोसो मैल दूर असणे, शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राचेही बाजारीकरण, बेरोजगारी, गुन्हेगारी, वाढती महागाई, या सर्वांतून निर्माण झालेली असुरक्षितता या व अशा असंख्य गोष्टींमुळे महाराष्ट्र ‘महान राष्ट्र’ होऊ शकले नाही.
मुलगी झाली म्हणून तिला विष खाऊ घालून मारणारा बाप आणि आपल्या लग्नासाठी बापाकडे पैसे नाहीत, तो कर्जबाजारी असल्याने अजून त्याच्या दुःखात भर नको म्हणून आत्महत्या करणारी मुलगी हे दुर्दैवी चित्र अजूनही महाराष्ट्रात आहे. त्यातून मार्ग कसा काढायचा यासाठी काही गंभीर प्रयत्न होताना दिसत नाहीत. या सगळ्या परिस्थितीला कंटाळलेल्या जनतेने देशाप्रमाणेच महाराष्ट्रातही मोठे परिवर्तन घडवले. कॉंग्रेसची राजवट जाऊन भाजपचे सरकार स्थिरावले आहे. हे परिवर्तन मात्र केवळ ‘खांदेपालट’ इतक्याच स्वरूपाचे होते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘कॉंग्रेस मुक्त भारत’ची घोषणा दिली होती. प्रत्यक्षात आज मात्र ‘कॉंग्रेसयुक्त भाजप’ अशी परिस्थिती निर्माण झालीय. निवडणुकीच्या आधी चार-दोन दिवस भाजपमध्ये दाखल झालेले अनेकजण आज सत्तेत आहेत. म्हणूनच एकीकडे योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशमध्ये धडाकेबाज निर्णय घेऊन आपली कृतीशिलता दाखवून देत असताना इथले सरकार मात्र ढीम्म आहे. विरोधकांना वेगवेगळ्या प्रकारे धमकावून पक्षात सामावून घेतल्याची चर्चा सर्वत्र जोरकसपणे सुरू आहे. ‘इनकमिंग फ्री’ ही पद्धत इतक्या टोकाला गेली की विचारता सोय नाही.
राज्यात नुकत्याच काही महत्त्वाच्या महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या. पुण्यासारख्या शहरात एका मताचा भाव होता पाच ते आठ हजार रूपये! कोणी कितीही संतपणाचा आव आणला तरी ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. त्यातही कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडून जे भाजपमध्ये आले त्यांच्यावर त्यांच्यासोबत असलेल्या अन्य तीन सहकारी उमेदवारांच्या प्रचाराचीही जबाबदारी देण्यात आली होती. म्हणजे एका मतदारसंघात कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादीमधून आयात केलेला एक उमेदवार असेल तर त्याने त्यांच्यासोबत असलेल्या तीन भाजपायींचा पूर्ण खर्च करायचा. अशापद्धतीने पैशाचा पाऊस पाडल्याने अनेक ठिकाणी अनपेक्षित निकाल आले आहेत.
मध्यंतरी मराठा मूक मोर्चाची हवा जोरात होती. कोपर्डीतील अत्याचारित मुलीला न्याय मिळावा या मागणीपासून सुरू झालेला हा मोर्चा मराठा आरक्षणापर्यंत आला. यातून साध्य काय झाले हे अजून तरी दिसून येत नाही; पण यामुळे अनेक जातीत असुरक्षिततेची भावना निर्माण झालीय हे मात्र नक्की! सर्वच जातीत वाढलेला कमालीचा कट्टरतावाद हे आपल्या राष्ट्राला लागलेले मोठे ग्रहण आहे. या मराठा मोर्चानंतर दलित आणि इतर बांधवांचे प्रतिमोर्चेही निघाले. प्रकाश आंबेडकरांसारख्या नेत्याने असे प्रतिमोर्चे काढू नयेत असे आवाहन केले होते; अर्थात नेहमीप्रमाणे त्यांना कोणी जुमानले नाही. ‘हम भी किसी से कम नही’ हे दाखवून देण्याची अहमहमीका सर्वच जातीत निर्माण झालीय. त्यातूनच जातीजातींत दुफळी निर्माण झाली आहे.
‘मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले’ असे सेनापती बापटांनी सांगितले होते. मात्र हा ‘मराठा’ त्यांना ‘मराठी’ या न्यायाने अपेक्षित होता. जो कोणी महाराष्ट्रात राहतो तो ‘मराठा’ इतकी त्यांची साधी सोपी व्याख्या होती. आपण मात्र ‘मराठा’ हा शब्दच जातीयवाचक करून टाकला. अशोक चव्हाणांनी ‘आदर्श‘ हा शब्द जसा बदनाम केला तसेच काहीसे ‘मराठा’चे झाले आहे. ‘महाराष्ट्रगीत’ लिहिणार्या राम गणेश गडकरी यांचा पुतळाही आता महाराष्ट्रात, तेही पुण्यासारख्या शहरात सुरक्षित नाही यातच सारे काही आले.
संभाजी ब्रिगेडसारख्या काही संस्थांनी मराठ्यांना पुढे करत टोकाचा जातीय द्वेष निर्माण केला. ‘ब्राह्मणांना मारा, कापा, त्यांच्या बायका पळवून आणा’ इथपासूनची भाषा पुरूषोत्तम खेडेकर नावाच्या या संघटनेच्या टोळीप्रमुखाने केली. राष्ट्रद्रोहापासूनचे अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल झाले. जातीजातीत सूडभावना निर्माण करण्याचे काम यांनी नेटाने केले. वेळ आल्यावर मात्र न्यायालयात माफी मागून ‘मी नाही त्यातली कडी लावा आतली’ अशी भूमिका घेतली. संस्काराचा टेंभा मिरवणार्या भाजपसारख्या पक्षानेही मग अशा सगळ्या प्याद्यांचा पुरेपूर वापर करून घेतला. त्यातूनच संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकार्यांनाग भाजपमधून उमेदवारी मिळाली. हेच शिवीश्री खेडेकर उगवत्या सूर्याला नमस्कार करावा याप्रमाणे आता भाजपची भलावण करताना दिसतात. ‘मराठा मोर्चा हा मराठ्यांचा सर्वात अविवेकी निर्णय होता’, ‘ब्राह्मण समाजात सगळेच वाईट नसतात’, ‘मुख्यमंत्री ब्राह्मण असले तरी कर्तबगारीच्या पातळीवर त्यांचा हात कुणी धरू शकत नाही’, ‘शरद पवार हे कट्टर जातीयवादी नेते आहेत’ अशी विधाने खेडेकरांनी सुरू केली आहेत. सरड्यालाही लाज वाटावी इतके रंग ही माणसे बदलतात.
सेनापती बापट यांनी दिलेला महत्त्वाचा संदेश म्हणजे ‘खरा वीर वैरी पराधीनतेचा!’ आपल्याला नेमका याचाच विसर पडत चाललाय. पराधीनता रक्तात भिनलीय. स्वावलंबन हरवलेय. त्यामुळेच नवी ऊर्जा निर्माण होताना दिसत नाही. पराधीनतेच्या मानसिकतेतून आपण पराभवाच्या दिशेने वाटचाल करतोय. हा पराभव आपल्या संस्कारांचा आहे. आदर्शांचा आहे. मूल्यात्मकतेचा आहे. ज्यावर राष्ट्र उभे राहते तो कणखर माणूस नैराश्याने ग्रासत चाललाय. त्यातून बाहेर पडायचे तर ही पराधीनता दूर सारायला हवी. स्वार्थ साधताना स्व-अर्थ ध्यानात घ्यायला हवा. तो ज्याला कळेल तोच भविष्यात यशस्वी होईल! अन्यथा ये रे माझ्या मागल्या आहेच!
- घनश्याम पाटील, 7057292092