Saturday, April 15, 2017

दहशतवाद निर्मिती कारखान्याचे काय?

कुलभूषण जाधव यांना भारतीय हेर असल्याचा व विध्वंसक हालचालींमध्ये सहभागी असल्याचा ठपका ठेवत पाकिस्तानने ताब्यात घेतले. अतिशय गुप्तपणे एकतर्फी खटला चालवला. त्याची भारतीय दुतावासालाही कुणकुण लागू दिली नाही आणि त्यांनी थेट फाशीची शिक्षा सुनावली. कुलभूषण जाधव या मराठी माणसास सोडविण्यासाठी भारत सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असले तरी यानिमित्ताने पाकचे पाप जगासमोर आले आहे. कुलभूषण यांना इराणमधून त्यांनी पाकिस्तानात कसे नेले, खटला कसा चालवला, त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी का देण्यात आली नाही, भारत सरकारला त्याची माहिती का दिली गेली नाही, कुलभूषण हे हेर असल्याचे कसे ठरवले गेले हे व असे सर्वच प्रश्‍न अनुत्तरीत आहेत. पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे सल्लागार सरताझ अझिज यांनीही कुलभूषण जाधव यांच्याविरूद्ध काही ठोस पुरावे नसल्याचे उघडपणे सांगितले आहे.
मुळात कुलभूषण हे इराणमध्ये सातत्याने मराठी बोलत असल्याने त्यांच्यावर संशय बळावल्याचे सांगितले जाते. कोणताही गुप्तहेर इतकी मोठी चूक कधीही करणार नाही. जर त्यांना गुप्तहेर म्हणून पाठवले असते तर ते इतक्या साधेपणे वावरले नसतेच. त्यांच्याकडे भारतीय पारपत्रही नसते आणि त्यांना इतर काही भाषा अवगत असत्या. किंबहुना संशय येऊ नये यासाठी कानाची छिद्रे बुजवण्यापासून त्यांची सुन्ताही केली गेली असती. त्यातही कौटुंबिक जबाबदारी असणार्‍या माणसाला हेर म्हणून पाठवण्याचे धाडस कोणतेही सरकार करणार नाही. कुलभूषण जाधव हे इराणमध्ये त्यांच्या कंपनीच्या कामानिमित्त गेले होते आणि सातत्याने भारताशी, त्यांच्या कुटुंबिय आणि मित्रांशी संपर्क ठेऊन होते. त्यांचा हेर नसल्याचा यापेक्षा मोठा पुरावा कोणता असू शकेल? केवळ द्वेषाच्या भावनेतून सूड उगवण्यासाठी पाकिस्तानने केलेली ही खेळी आहे.
कसाबसारख्या दहशतवाद्याला सुळावर चढवताना आपण लोकशाही मार्गाने त्याला त्याची बाजू मांडण्याची संधी दिली होती. त्याच्यासाठी वकिलही दिला होता. कसाबसारखे क्रूरकर्मे दहशतवादी सातत्याने आपल्याकडे चालून येतात आणि आपण माणुसकी दाखवत त्यांचा संपूर्ण विचार करतो. त्याउलट आपले काही निराधार बांधव चुकून त्यांच्या तावडीत सापडतात आणि त्यांना हाल हाल करून मारले जाते. आपल्याकडील प्रसारमाध्यमे, तथाकथित विचारवंत, अभिनेते अशा अनेकांना पाकिस्तानप्रेमाचा पुळका येतो. त्यातूनच अफजल गुरूसारख्या दहशतवाद्यांना सोडवण्यासाठी गळे काढले जातात. इशरत जहॉं कशी देशभक्त होती याचे पाढे वाचले जातात. रात्री दोन-दोन वाजता न्यायालयात येऊन कामकाज सुरू ठेवले जाते. कुलभूषण यांच्यासारख्या भारतीयाला फाशीची शिक्षा जाहीर झाली असताना यांचे देशप्रेम कुठे जाते?
आपल्याकडील नसरूद्दिन शहा, जतीन देसाई, बरखा दत्त, सुधींद्र कुलकर्णी, मणिशंकर अय्यर अशी मंडळी पाकिस्तानची हस्तक आहेत की काय असे वाटण्याइतपत पाकिस्तानधार्जिणे आहेत. जनमत तयार करण्यात अशा तथाकथित विचारवंतांचा प्रभाव नक्कीच असतो. कुलभूषण जाधव हे हेर होते की नाही, याचा कोणताही पुरावा पाकिस्तानकडे नाही; मात्र ते एक भारतीय आहेत आणि निवृत्त अधिकारी आहेत हे सत्य महत्त्वाचे आहे. त्यामुळेच त्यांना सोडविण्यासाठी संपूर्ण भारतीयांनी आवाज उठवला पाहिजे. 1990 साली पाकिस्तानात बंदी झालेल्या सरबजित सिंगला वाचवण्यात आपल्याला अपयश आले. आता कुलभूषण जाधव यांच्याबाबत मात्र आपण संघटित व्हायला हवे. केंद्र सरकारने पाकिस्तानवरील आंतरराष्ट्रीय दबाव वाढवला पाहिजे.
अनेक राष्ट्रे संरक्षण, परराष्ट्र धोरण यात आपल्यापेक्षा कितीतरी पुढे आहेत. रवींद्र कौशिक या पाकिस्तानातील बंदी असलेल्या आणि पुढे खंगून, टीबीने मेलेल्या आपल्या एका हेराने पत्राद्वारे विचारले होते की, ‘भारत जैसे बडे मुल्क के लिए काम करने का यही अंजाम होता है क्या?’ खरंतर ज्यावेळी ते गुप्तहेर म्हणून काम सुरू करतात त्यावेळी त्यांचे वैयक्तिक आयुष्य संपलेले असते. सापडल्यास ‘राष्ट्रद्रोही’ असाच शिक्का त्यांना मिरवावा लागतो. शत्रू राष्ट्राकडून दिला जाणारा प्रचंड त्रास, वेदना सहन करताना आपले देशबांधव आणि सरकारही त्यांना ‘आपले’ म्हणून स्वीकारत नाही. पाकिस्तानसारखे पापराष्ट्र तर आपल्या कोणत्याही कारणाने कैद केलेल्या नागरिकास हाल हाल करून मारते. इतक्या गंभीर आरोपांवरून ताब्यात घेतलेल्याबाबत त्यामुळेच तुरूंगातील कैद्यांच्या अंतर्गत मारामारीत मरण पावला किंवा त्याला वेड लागल्याने आम्ही तुमच्या ताब्यात देऊ शकत नाही, अशी उत्तरे ऐकावी लागतात.
आपल्याला पाकिस्तानपासून जेवढा धोका आहे त्याहून जास्त धोका आपल्याकडील बेगडी लोकांचा आहे. त्यात ‘पुरोगामी विचारवंत’ म्हणून मिरवणारे जसे आघाडीवर आहेत तसेच ‘देशभक्ती’चे बिरूद लावून मिरवणारेही! ‘माझ्या बापाला पाकिस्तानने नाही तर युद्धाने मारले’ असा टाहो फोडणारी गुरमेहर कौर आणि तिची पाठराखण करणारे आता कोणत्या बिळात दडून बसलेत? करण जोहर, शाहरूख खान यांच्यासोबत काम करणार्‍या पाकिस्तानी कलाकारांचा पुळका येणारे आता कुठं गेले? कुलभूषण जाधव यांच्या बदल्यात अशांना पाकिस्तानात पाठवायला काय हरकत आहे?
आपल्याकडे जातीधर्मासाठी आपण एकत्र येतो; मात्र राष्ट्रभक्तीसाठी कधी एकत्र येताना दिसत नाही. खैरलांजीच्या घटनेनंतर रस्त्यावर उतरणार्‍यांची संख्या पाहता कुलभूषण जाधव यांच्या पाठिशी कोणीच दिसत नाही. मराठा मोर्चासाठी रस्त्यावर उतरून मूक निदर्शने करणारे कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी काहीच करत नाहीत. कुलभूषण जाधव यांचे वडील भारतीय पोलीस दलात होते. त्यांचा मुलगा देशाच्या नौदलात कार्यरत होता. 2002 मध्येच भारतीय नौदलातून निवृत्ती घेतल्यानंतर त्याने स्वतःचा उद्योग सुरू केला आणि पाकिस्तानने इराणमधून त्यांचे अपहरण करून खोटा खटला चालवला, असे स्पष्टपणे दिसून येत आहे. कुलभूषण यांच्या मुंबईतील निवासस्थानी लॉन्ड्रीचे काम करणार्‍या एका मुलाने सांगितले की, मला उच्च शिक्षित करण्याचे काम कुलभूषण यांनी केले. त्यांच्या घरी रात्री माझ्यासाठी जेवणाचे ताट वाढून ठेवलेले असायचे. घरच्या सदस्यांप्रमाणे त्यांनी माझी सर्वप्रकारची  काळजी घेतली. त्यांचे प्रोत्साहन आणि त्यांचे सहकार्य यामुळेच मी शिक्षण घेऊ शकलो आणि स्वतःच्या पायावर उभे राहू शकलो...
अशी कितीतरी उदाहरणे सांगता येतील. पाकिस्तान मात्र आपल्या निरपराध माणसांना कोंडीत पकडून त्यांच्यावर अनन्वीत अत्याचार करत आहे. ‘आपला एक माणूस शत्रूने मारला तर त्याची किमान पन्नास माणसे मारा’ असे सांगणारे चाणक्य यावेळी आठवतात. कारण असे कठोर झाल्याशिवाय हे निर्ढावलेले मस्तवाल लोक जागेवर येणार नाहीत. पाकिस्तानातून भारतात येणार्‍या कोणत्याही खेळाडूवर, कलाकारावर, उद्योजकावर, प्रवाशावर राष्ट्रद्रोहाचे गुन्हे दाखल करणे आपल्याला सहज शक्य आहे. आपल्याकडे मुलभूत असलेली माणुसकी, करूणा, आपली सर्वसमावेशक संस्कृती यामुळे आपल्या उदारमतवादी धोरणाचा फायदा पाकसारखे नापाक घेतात.
पाक म्हणजे पवित्र! पाकिस्तान म्हणजे पवित्र जागा! मात्र या संकल्पनेच्या पूर्णपणे विरूद्ध काम या राष्ट्राने सातत्याने केले आहे. ‘राजकीय धोरण सोडले तर भारत आणि पाकिस्तान येथील सामान्य माणसे फारशी वेगळी नाहीत’, अशी मखलाशी आपल्याकडीलच काही कंटकांकडून सातत्याने केली जाते. त्यातील फोलपणा वेळोवेळी दिसून येतो. तरीही आपण धाडसाने निर्णय घेत नाही.
कसाबला फाशी दिल्यानंतर आम्ही प्रश्‍न उपस्थित केला होता की, ‘कसाब निर्मिती कारखान्याचे काय?’ असे एक नाही तर अनेक कसाब येतील, त्यांना आपण पुराव्यासह फासावर लटकवू; मात्र त्याचा निर्मिती कारखाना सुसाट आहे. तो उद्ध्वस्त केल्याशिवाय शांती प्रस्थापित होणार नाही. पाकप्रेमाचा सातत्याने उबाळा येणारी आपल्याकडील थोतांड मंडळी आणि कुलभूषण जाधव यांना फासावर लटकवण्यासाठी कटकारस्थान रचणारी मंडळी वेगळी नाहीत. त्यांना जागेवर आणले पाहिजे. अफजल गुरू, कसाब यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करणारे, त्यांना देशभक्त ठरवणारे, त्यांच्या शिक्षेत सूट मिळावी यासाठी धडपडणारे, देशभक्तीच्या नावावर खोटे गळे काढणारे, इशरत जहॉंच्या नावाने रूग्णवाहिका चालू करून तिला देशभक्त ठरवणारे आणि सर्जिकल स्ट्राईकनंतर आनंदोत्सव साजरा करणारे हे सगळेच आज एक हजार किलो मूग गिळून गप्प आहेत. अशावेळी सामान्य माणूस संघटित झाला तरच काहीतरी वेगळे घडू शकेल. अन्यथा पाकिस्तान नावाची ही खरूज आपले अंग पोखरल्याशिवाय राहणार नाही. कुलभूषण जाधव हे निरपराध आहेत आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे ते एक भारतीय आहेत, मराठी आहेत म्हणून आपण त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरायलाच हवे!
- घनश्याम पाटील, पुणे
7057292092

1 comment:

  1. खूपच परखड लेख!
    आता रस्त्यावर उतरायलाच हवं!

    ReplyDelete