Saturday, April 1, 2017

मुजोरपणाला चपराक

 घनश्याम पाटील  
 
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मराठवाड्यात एक सभा होती. त्यावेळी एका शिवसैनिकानं जोरकस भाषण दिलं. बाळासाहेबांना ते आवडलं. त्यांच्या स्वभाववैशिष्ट्याप्रमाणं लगेच त्यांनी त्याला शिवसेनेचं एक महत्त्वाचं पद दिलं. त्यानंतर हा शिवसैनिक उमरगा विधानसभा मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आला. किल्लारी येथील शेतकरी सहकारी साखर कारखान्याची कॉंग्रेसची राजवट त्याने उलथून लावली आणि तो अध्यक्ष झाला. आमदारकीनंतर खासदार होण्याचे भाग्यही त्यांना लाभले. मुळात हा माणूस शिक्षण क्षेत्रातला! प्राध्यापकी करणारा! त्यामुळे ‘सर’ या नावानेच त्यांची ख्याती! एअर इंडियाच्या एका अधिकार्‍याला मारहाण केल्यामुळे ते सध्या चर्चेत आले आहेत. रवींद्र गायकवाड असं या नेत्याचं नाव! अधिकार्‍याला केवळ बदडणेच नव्हे तर हातातील शिवबंधन दाखवत आपण कोणाला घाबरत नाही या अविर्भावात त्यांनी संबंधित अधिकार्‍याला चप्पलने नव्हे तर सँडलने पंचवीस वेळा मारल्याचे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले. त्यावरून सर्व विमान कंपन्यांनी त्यांच्या विमान प्रवासावर बंदी आणली आहे.
जबाबदार लोकप्रतिनिधीने विमान अधिकार्‍यालाच काय तर कुणालाही मारणे गैर आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करणे हे प्रत्येकाचेच कर्तव्य आहे; मात्र हे का घडले याचाही विचार केला पाहिजे. गायकवाडांच्या कृत्याचा निषेध करताना त्यांची कारकिर्द कलंकित करणे योग्य नाही. रवींद्र गायकवाड जसे प्राध्यापक होते तसेच प्रवचनकारही होते. अध्यात्मात आणि कृषी संस्कृतीत रमणारा हा माणूस! उमरग्यातील त्यांच्या घराजवळ एका बाजूला मस्जिद आहे तर दुसर्‍या बाजूला दर्गा! सगळ्यांशी त्यांचे सामंजस्याचे संबंध आहेत. येथील मुस्लीम बांधवांच्या सर्व सुखदु:खात, कार्यक्रमात, उपक्रमात ते सहभागी होतात. मुस्लीम बांधवही त्यांना सर्व प्रकारचे सहकार्य करतात. हा कट्टर शिवसैनिक म्हणूनच धार्मिक ऐक्याचे प्रतीक आहे.
संबंधित विमान कंपनीत त्या अधिकार्‍याने मुजोरपणा केल्याचे वास्तव पुढे येत आहे. तेथील हवाईसुंदरीने प्रसारमाध्यम प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की ‘‘खासदार रवींद्र गायकवाड यांचे वर्तन इतर सहप्रवाशांप्रमाणेच सभ्यतेचे होते. आमच्या अधिकार्‍यांनीच त्यांच्याशी मग्रुरी केली. त्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तरे न देता ‘साले को अंदर ले के मारते है, इसे छुडाने यहॉं कोई नहीं आयेगा’ असे म्हटले. त्यावरून त्यांनी त्या अधिकार्‍याला यथेच्छ बदडले’’
गायकवाड मुळात शिवसैनिक, त्यात मराठवाड्यातले! असा उर्मटपणा कुणी करत असेल तर त्याला सोलपटून काढणे हा इथल्या मातीचाच गुणधर्म. ‘जर माझ्या शिवसैनिकांनी बाबरी पाडली असेल तर  मला त्यांचा अभिमानच वाटेल’ असे सांगणारे बाळासाहेब यावेळी आठवतात. आज ते असते तर खासदार रवींद्र गायकवाड यांना त्यांनी सन्मानाने ‘मातोश्री’वर बोलवून कौतुकाची थाप दिली असती. नेभळटपणा म्हणजेच सभ्यपणा नव्हे, हे शिवसैनिकांना चांगलेच कळते. रवींद्र गावकवाडांनी ते कृतीतून दाखवून दिले इतकेच.
एअर इंडिया म्हणजे इतर खासगी कंपन्यांपुढे डबडेच! वातानुकुलीत वोल्वोपुढे लाल डबडे दिसावे तशी यांची गत! सातत्याने सरकारी मदत घेतल्याने ही कंपनी अजूनही श्‍वास घेतेय. मुळात, सरकारी सेवेतील अधिकार्‍यानेच काय तर कोणत्याही अस्थापनातील कोणत्याही व्यक्तिने प्रत्येकाला चांगली सेवा देणे हे त्यांचे कर्तव्यच आहे. किंबहुना तसा कायदाही आहे; मात्र त्या कायद्याचे उल्लंघन करीत प्रवाशांशी जी अरेरावी केली जाते तीही निषेधार्ह आहे. रवी गायकवाड यांनी अधिकार्‍याला मारणे जितके चुकीचे आहे त्याहून मोठा गुन्हा या मस्तवाल कर्मचार्‍याने केलाय. शिवाय त्यांच्या विमान प्रवासावर बंदी आणून मराठी अस्मितेचाही अवमान केलाय. गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याऐवजी त्यांना जी वागणूक दिली गेली ती म्हणूनच निंदनीय आहे. बड्या उद्योजकांसाठी पायघड्या घालणारे हे लोक मराठीचा सातत्याने द्वेषच करताना दिसतात. लातूरचे खासदार डॉ. सुनिल गायकवाड यांनाही केवळ त्यांच्या ‘गायकवाड’ या मराठी आडनावामुळे तीन तास विमानतळावर थांबवून ठेवण्यात आले आणि त्यांची सखोल चौकशी करण्यात आली. अनेक गुंड, पुंड, वस्ताद आणि पठ्ठे कायम राजरोसपणे विमानप्रवास करत असताना, अनेक अवैध पदार्थांची तस्करी करत असताना, विजय मल्ल्या, दाऊद इब्राहिम सारखे लोक देश सोडून पळून जात असताना त्यांच्याकडे कोणीही लक्ष देत नाही; मात्र येथील खासदाराला विमान प्रवासापासून वंचित ठेवण्यात येते, ही खरी लोकशाहीची चेष्ठा आहे.
आमदार असताना उमरग्याहून मुंबईला एसटी महामंडळाच्या बसने जाणारे रवींद्र गायकवाड अतिशय साधेपणाने जगतात. दिखावा, डामडौल त्यांच्या स्वभावात नाही. उस्मानाबादमधील डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या साम्राज्याला त्यांनी तडा दिलाय. शरद पवार यांचे नातेवाईक असलेल्या पाटलांचे वर्चस्व झुगारून देणार्‍या रवी गावकवाड यांच्याविषयी म्हणूनच अनेकांच्या मनात आकस आहे. ते अनेकांना दूरध्वनीवर उपलब्ध होत नाहीत अशी तक्रार करत उस्मानाबाद जिल्ह्यात ‘नॉट रिचेबल’ असे त्यांचे नामकरणही करण्यात आले आहे. मागच्या निवडणुकीत ‘खासदार दाखवा आणि हजार रूपये मिळवा’ असाही प्रचार त्यांच्याविरूद्ध करण्यात आला. मात्र मोदी लाटेतही या सर्वांना पुरून उरत ते यशस्वी ठरले आहेत. त्यांच्यावर केलेले आरोप खरे असते तर या वातावरणात त्यांना हे यश मिळाले नसते.
खरेतर एअर इंडिया ही घाट्यातील कंपनी चालवणे हे काही सरकारचे काम नाही. टाटा सारख्या उद्योजकाने सरकारला याविषयी यापूर्वीच सुनावले आहे. समाजवादाच्या नावाने गळे काढताना हे व असे सर्व उद्योग खासगी करायला हवेत. सगळ्या सरकारी सुविधा घ्यायच्या, शासनाकडून अर्थिक मदत घेऊन तूट भरून काढायची आणि लोकप्रतिनिधींना प्रवासास मज्जाव करायचा हे कशाचे लक्षण? मराठमोळ्या शिवसैनिक खासदाराने संसदेत हा प्रश्‍न उपस्थित केला. कामकाज सुरू असतानाच लोकप्रतिनिधीला दिली गेली जाणारी वागणूक म्हणूनच खटकते. रवींद्र गायकवाड यांनी सँडलने पंचवीस वेळा संबंधिताला मारले याची कबुलीही त्यांनी जाहीरपणे दिली. मग त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याऐवजी त्यांच्या प्रवासावर निर्बंध लादणे योग्य नाही.
सर्वात वाईट म्हणजे या घटनेनंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी दाखवलेला उथळपणा आणि उताविळपणा! ‘चप्पलमार खासदार’ अशा शब्दात त्यांची हेटाळणी करताना माध्यम प्रतिनिधी विशेषत: वृत्तवाहिन्या त्यांची सूडभावना दाखवून देत होत्या. हातात बुम घेऊन विमानतळावर थांबलेले प्रतिनिधी त्यांना न्यायाधीशासारखे वाटत होते. यांनीच बातम्या करायच्या, यांनीच न्यायनिवाडा करायचा आणि यांनीच शिक्षाही देऊन मोकळे व्हायचे. वा रे लोकशाही! आणीबाणी प्रमाणेच पुन्हा जर प्रसार माध्यमांवर निर्बंध लादले गेले तर हे पोटभरू बातमीदारच त्याला जबाबदार असतील.
उमरग्यातील रवींद्र गायकवाड यांच्या घरी गेलेल्या एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने त्यांच्या दोन कुत्र्यांवर कार्यक्रम केला. ‘खासदार साहेब तर आपल्याला भेटू शकले नाहीत. उद्या गुढीपाडव्यानिमित्त कदाचित घरी येतील. तोपर्यंत त्यांच्या या दोन विदेशी पाहुण्यांना भेटूया. तेही खासदार घरी परतण्याच्या प्रतिक्षेत आहेत.’ असे म्हणत या प्रतिनिधीने ही कुत्री कोणत्या जातीची आहेत, कुठून आणली, किती रूपयांना आणली, ती खातात काय, त्यांना हा प्रदेश मानवतो का, ती भुंकतात का, चावतात का, खासदारावर किती प्रेम करतात हे व असे प्रश्‍न संबंधितांना विचारून रसिकांना आपल्या ‘विद्वत्ते’चे दर्शन घडवले. खासदार रवींद्र गायकवाड यांनी विमान अधिकार्‍याला सँडलने मारले. ते चूक की बरोबर याबाबत मतभेद असू शकतात; मात्र अशा बातम्या पाहताना आपल्या हातात हंटर असावा आणि तो पत्रकार आपल्या समोर असावा असे माझ्यासारख्या सहनशील प्रेक्षकाला नेहमी वाटते.
सध्या देश बदलतोय. नव्या राजकीय पर्वाची नांदी झालीय. ‘जुने जाऊ द्या मरणालागुनि, गाडुनि किंवा पुरूनि टाका’ या कवितेप्रमाणे नवी व्यवस्था गुन्हेगारी, दहशत, भ्रष्टाचार, महागाई संपवू पाहतेय. त्यांचे हात बळकट करायला हवेत. अर्थात सरकारमध्येही अनेक भ्रष्ट नेते नक्की आहेत. देशाचा गाडा चालवताना ‘उडदामाजी काळे गोरे’ होणारच. चुकीच्या गोष्टींना विरोध करत आपल्याला एकेक पाऊल पुढे टाकायचे आहे. त्यामुळेच इथल्या प्रसारमाध्यमांची जबाबदारीही मोठी आहे. सबसे तेज, उघडा डोळे बघा नीट अशी घोषवाक्ये करताना कुणीही पत्रकारितेच्या मूळ तत्त्वांना तीलांजली देऊ नये. रवींद्र गायकवाड यांच्या निमित्ताने सरकारी यंत्रणेतील असे अनेक प्रश्‍न चव्हाट्यावर आले आहेत. त्याचा सोक्षमोक्ष लावायला हवा. दुष्काळाच्या खाईत मराठवाडा होरपळत असताना रवींद्र गायकवाड यांनी व्यवस्थेविरूद्धचे बंड पुकारले आहे. ‘गुंडगिरी’ म्हणत त्यांच्यावर टिकास्त्र सोडायचे की ‘मुजोरपणाला चपराक’ म्हणून त्यांचे समर्थन करायचे हे ज्याने त्याने ठरवावे. तूर्तास अशा सर्व यंत्रणातील गैरव्यवहार, त्यांची सेवा, कर्मचारी अधिकार्‍यांकडून दिली जाणारी वागणूक हे सारे बदलायला हवे आणि लोकांनाही त्यांच्याविषयी आस्था वाटावी असे आम्हास वाटते.  

- घनश्याम पाटील
7057292092


7 comments:

  1. परखड आणि परखडच.......

    ReplyDelete
  2. घनःशामजी,
    बेधडक लिहलंय.
    पत्रकार हा साक्षेपी असावा व त्याने खटकलेल्या बाबींवर आक्षेप घ्यायलाच हवा.
    व्वा भावलं !

    ReplyDelete
  3. राजकारणी जर मूजोरीपणाने वागले व काम व्यवस्थित केले नाही तर त्यांना पण चपलाने मारावे का !

    ReplyDelete
  4. झाल ते दोन्ही बाजूनी चूकीच पण बंदी हा पर्याय चुकीची आहे व त्या प्रश्नाचे निराकरण झाले पाहीजे

    ReplyDelete
  5. आपला हा लेख खरोखरच विचार करायला लावणारा आहे.

    ReplyDelete
  6. परखड आणि स्पष्ट लिखाण.. वाह सर मस्तच लिहलेय👍

    ReplyDelete
  7. खरोखर योग्य ते योग्य व अयोगय लिहिनयाची पन ताकद लागते.

    ReplyDelete