सागर कळसाईत (लेखक) |
‘कॉलेज गेट नाण्याची तिसरी बाजू’ या कादंबरीच्या अभूतपूर्व यशानंतर सागर कळसाईत या तरुणाचे नाव कादंबरी विश्वात ठळकपणे अधोरेखित झाले. मैत्री आणि प्रेम यात गुंतलेल्यांना खिळवून ठेवण्याचे काम ‘कॉलेज गेट’ने केले आणि अल्पावधीतच या कादंबरीच्या तब्बल चार आवृत्त्या प्रकाशित झाल्या. ‘आजचे तरुण काय वाचतात?’ या विषयावर ‘सकाळ’सारख्या आघाडीच्या वृत्तपत्राने एक सर्व्हेक्षण केले. त्यातून तरुणांच्या आवडीची दहा पुस्तके जाहीर केली. प्रकाशक या नात्याने सांगण्यास अत्यानंद होतो की, सुहास शिरवळकरांच्या ‘दुनियादारी’नंतर दुसर्या क्रमांकाला आमच्या सागर कळसाईतची ‘कॉलेज गेट’ ही कादंबरी होती. इतकेच नाही तर त्यावर लवकरच एक चित्रपटही प्रदर्शित होतोय. मराठी तरुणांची वाचनाची अभिरूची वृद्धिंगत करणार्या सागर कळसाईत या तरुण लेखकाविषयी साहित्य सृष्टीकडून प्रचंड अपेक्षा वाढल्या होत्या. जेमतेम पंचविशीत असलेल्या सागरने ही अपेक्षापूर्ती करत नवी कादंबरी मोठ्या ताकतीने वाचकांसमोर आणली आहे. प्रेम, कुटुंब आणि स्वप्नात अडकलेल्या आजच्या तरुणाईचा आलेख त्याने प्रस्तुत ‘लायब्ररी फ्रेंड’ या आपल्या कादंबरीत मांडला आहे.
सागरची भाषा कशी? तर जवळच्या मित्राने हक्काने आपल्याशी चर्चा करावी, वाद घालावेत किंवा पाठीवर धपाटे देत ‘सत्कार’ करावेत अशी! आजच्या तरुण-तरुणींच्या गळ्यातील ताईत बनत, त्यांच्याच शैलीत अभिव्यक्त होत, संवादाच्या कक्षा व्यापक करत सागरची लेखणी प्रवाही राहते. एक अबोल प्रेमकथा मांडताना ‘लायब्ररी फ्रेंड’ आजच्या तरुणाईच्या भावभावनांचे शानदार प्रगटीकरण करते. कधी खुसखुशीत शैलीत तर कधी भावनिक होत तरुणाईच्या मनाचा कानोसा घेते. प्रेम, मैत्री, नातेसंबंध रंगवताना सागर समाजातील वास्तव रेखाटतो. यातील बर्याचश्या घटना, पात्रं हे त्याच्या परिघातलेच असल्याने त्यात जिवंतपणा आला आहे. मैत्रीसाठी जीव ओवाळून टाकणार्या मित्रांचे सुहृदयी वर्णन सागर खुमासदार पद्धतीने करतो. ‘कॉलेज गेट’नंतर लेखकाची मानसिकता, त्यासाठी उपसलेले कष्ट, थोडीफार झालेली फरफट, क्वचित प्रसंगी आलेले नैराश्य, वडिलांनी मनात पेरलेला आशावाद, दोस्तांची साथसंगत, मैत्रीत दुरावा निर्माण होत असताना त्यांचे साधलेले ऐक्य हे सारे काही ‘लायब्ररी फ्रेंड’मध्ये आल्याने रंजनातून प्रबोधन अशा पद्धतीची ही कलाकृती साकार झाली आहे. या कादंबरीत आजच्या तरुणांच्या भावभावनांचे प्रतिबिंब उमटल्याने ही कादंबरी म्हणजे आजच्या काळाचे प्रतिक ठरले आहे.
या कादंबरीतील प्रमुख पात्र असलेला मानव हा अस्मितावर नकळतपणे जीव ओवाळून टाकतो. त्याची स्वप्नप्रेमिका असलेली अस्मिता लायब्ररीत केवळ दूरदर्शनाने त्याची प्रेरणा बनते. पुस्तक लिहायची सुरुवात करण्यासाठी, संपलेल्या महाविद्यालयीन जीवनाची अनुभूती घेण्यासाठी मित्रांच्याच महत्प्रयासाने लायब्ररीत बसण्याची परवानगी मानव घेतो; मात्र प्रयत्नपूर्वक रोज दोन-तीन पानांच्या पुढे त्याची गाडी जात नाही. त्यातून नैराश्य येत असतानाच समोर बसलेली अस्मिता तिच्या मैत्रिणीला सांगते, ‘‘सचिन तेंडुलकरला सेंच्युरी करण्यासाठी पहिल्या रनाने सुरुवात करावी लागते.’’ नाजूक आवाजात मैत्रिणीला दिलेला सल्ला मानव स्वत:साठी म्हणून स्वीकारतो. प्रेम तर दूरच मात्र साधी मैत्रीही नसताना ती मानवची ‘शक्तिस्थान’ बनते. सहजपणे तिने इतरांशी साधलेले संवाद मानवच्या कानावर पडतात आणि त्यातून तो स्वत:ची दिशा ठरवत जातो. अस्मितावर ‘लव्ह ऍट फस्ट साईट’ असे प्रेम करणारा मानव ग्रंथपालाविषयी मात्र ‘हेट ऍट फस्ट साईट’ म्हणतो. त्यातच त्या ग्रंथपालाच्या प्रेमभंगाची कहाणीही सुरसपणे रंगवतो. एमबीए होऊनही नोकरी न करता पूर्णवेळ लेखन केल्याने जवळचे मित्र मानवला शिव्या घालतात; मात्र तो वडिलांची समजूत घालतो की या पुस्तकानंतर मी नोकरी करेन. आपला मित्र उमेश याला याबाबतची भूमिका सांगताना मानव प्रतिप्रश्न करतो, ‘एकाचवेळी दोन सशांच्या मागे धावणार्या शिकार्याला एकतरी ससा मिळेल का वेड्या?’
आपल्या समाजाला लागलेली जातीव्यवस्थेची कीड आरडी आणि दीक्षा यांच्या वाट्याला येते. ‘हे लग्न झाले तर मुलीच्या जीवाला धोका आहे’, अशी थाप एक ज्योतिषी मारतो आणि त्यात या जोडप्याची ससेहोलपट होते. अभिसह मानव या प्रवृत्तीवर घाव घालण्यासाठी प्रयत्नशील असतो. आजच्या समाजव्यवस्थेत अपरिहार्य ठरलेले हे दुर्दैवी वास्तव ठळकपणे अधोरेखित करताना लेखकाने प्रेमकथेच्या माध्यमातून कठोर प्रहार केले आहेत.
एमबीएनंतर सर्व मित्रांना जोडून ठेवण्यासाठी मानवला अनेक क्लृप्त्या सुचतात. त्यातून तो काही उद्योग करतो. सुरूवातीला गणपतीच्या मूर्ती विकण्याचा प्रयत्न ते करतात. त्यासाठी प्रत्येकजण पॉकेटमनी काढतो आणि सर्वजण मिळून खास पेणहून गणपती मूर्ती आणतात. वारजेत दुकान लावून त्या विकण्याचा प्रयत्न करतात. त्यांचे हे प्रयत्न मुळातून वाचण्यासारखे आहेत. समाजातील विविध प्रवृत्तींची झलक त्यातून दिसून येतेे. व्यवस्थापनशास्त्राचे पदवीधर असलेल्या या तरुणांना मात्र गणेशमूर्ती विकण्याच्या व्यवसायात आपटी खावी लागते. त्यात प्रयत्न करूनही पदरात अपयश पडल्याने वाचकांना जसे वाईट वाटते तसेच लेखकाने ते अपयश ज्या शैलीत सांगितले आहे ते वाचताना पुरेपूर रंजनही होते. ‘माणूस फक्त वेगवेगळ्या मूर्ती बनवतो. आकार बदलला की देवाचे नावही बदलते’ इतके शहाणपण या घाट्याच्या व्यवसायातून येते. ‘रंग देत असणार्या मूर्तीमध्ये देव आहे की मूर्तीकार स्वत: मन लावून करत असलेल्या कामामध्ये?’ असा तर्कशुद्ध विचारही लेखकाने मांडला आहे. पेणहून गणेशमूर्ती आणताना रस्त्यात पोलीस यांची गाडी अडवितात. त्यांच्या वाहनात मूर्तीशिवाय आणखी काही नाही ना हे तपासून पाहतात. या प्रकाराने झोपमोड झाल्याने माऊली मानवजवळ पोलिसांना शिव्या घालतो. तेव्हा मानव त्याला म्हणतो, ‘अच्छा... तुझी दोन-अडीच तासांची झोप मोडली! साल्या, ते पूर्ण रात्र आपल्याच सुरक्षिततेसाठी जागतात ना?’ आजच्या तरुणाईचे हे सामाजिक भान सागर कळसाईत या हरहुन्नरी लेखकाने अचूकपणे नोंदविले आहे.
गणेशमूर्ती विक्रीच्या ठिकाणी अनेक लोक मूर्तींचा भाव करतात; मात्र त्यांना ती जागा उपलब्ध करून देणारा पुढारी जेव्हा त्याच्या फौजफाट्यासह येतो तेव्हा तो राजकीय आविर्भावात सांगतो, ‘आम्ही देवाच्या मूर्तीची किंमत करत नाही.’ अनपेक्षितपणे मानवचे आई-वडिलही या दुकानात येऊन मूर्ती मागतात. तेव्हा मानवचा सहकारी त्यांना, ‘तुम्हाला सवलतीच्या दरात मूर्ती देतो काका’ असे म्हणतो. त्यावर तेही म्हणतात, ‘मला सवलत नको.’ वडिलांचा आवाज ऐकून मानव हर्षोल्हासित होतो. तेव्हा एमजे म्हणतो, ‘बघ ना, त्या आधारस्तंभानेही सवलत मागितली नव्हती आणि बाबांनीही सवलत नाकारली. त्या राजकारण्याने दिलेल्या पैशामागे त्याचा दिखाऊपणा होता. तर बाबांच्या सवलत नाकारण्यामागे त्यांचं प्रेम होतं. भलेही आपण राजकारण्याच्या मूर्तीमागे जरा जास्तच पैसे कमावले पण आई-वडिलांच्या प्रेमामुळे झालेला नफा अनमोल आहे यार.’
गणेशमूर्ती विक्रीतून नुकसान सहन करावे लागल्यानंतर सगळेजण थोडे नाराज होतात; मात्र मानव आशावाद सोडत नाही. कॉलेजमध्ये आल्यानंतर अस्मिताच्या हातात चॉकलेट बॉक्स पाहून त्याला हॅण्डमेड चॉकलेटच्या व्यवसायाची कल्पना सुचते. मुंबईतील मित्रमैत्रिणींना गाठून तो ती कला अवगत करतो. त्यासाठी हे मित्रमंडळ कामाला लागते. त्यातही ते सडकून मार खातात. दुसर्या व्यवसायातही अपयश आल्याने काही मित्र साथ सोडतात. मात्र मैत्रीचा धागा बळकट ठेवण्यासाठी प्रयत्नशील असलेला मानव कच खात नाही. पराभवाने डगमगत नाही.
एका कंपनीकडून 25 लाखाचे गिफ्ट मिळणार म्हणून तो मित्रांच्या नकळत 25 हजार रुपये त्या कंपनीच्या खात्यावर भरतो. त्यातून झालेली फसवणूक लक्षात आल्यानंतर मित्रही यथेच्छ धुलाई करून धडपड्या मानवचा ‘सत्कार’ करतात. या फसवणुकीची तक्रार द्यायला गेल्यानंतर पोलिसही त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यांप्रमाणे त्यांना हुसकावून लावतात. ‘चक्रीवादळाने निसर्गात कितीही थैमान घातलं तरीही माणसाला जास्त दु:ख होत नसेल. जिव्हारी लागतं ते आपलं घर बरखास्त झाल्यावर! इथे चक्रीवादळही मी स्वत:च होतो आणि घरही स्वत:च्या स्वप्नांचं होतं’ अशी प्रांजळ कबुली देत आजची तरुणाई कोणकोणत्या आमिषाला बळी पडते, कशी भरकटत जाते, संकटाच्या काळातही आपली नीतिमत्ता कशी टिकवून ठेवते हे सारे ‘लायब्ररी फ्रेंड’मध्ये यथार्थपणे रेखाटण्यात आले आहे.
कादंबरी लिहिण्यासाठी म्हणून मानव कॉलेजच्या लायब्ररीत नियमितपणे जात असतो. ते पाहून काही मित्र उमेशला सांगतात की, ‘मानवला अस्मितापासून दूर राहायला सांग.’ कारण त्याच कॉलेजमधील सुजित मागच्या काही वर्षांपासून अस्मिताच्या मागे असतो. उमेशकडून हा निरोप मिळताच मानव प्रेमवीराच्या आविर्भावात सुजितला दम भरायला त्याच्याकडे जातो; मात्र आपल्यापेक्षा धष्टपुष्ट, उंचेल्या, गोर्यापान सुजितला पाहून तो सांगतो की, ‘तू माझा कॉम्पिटेटर आहेस.’ सुजितही ते हसण्यावारी घेतो आणि हे दोघेही अस्मिताला पटवण्याच्या मागे लागतात. सुजित आणि मानव दोघेही अस्मिताला ‘लाईक’ करतात आणि दोघेही एकत्रच वावरतात याचे उमेशला आश्चर्य वाटते. तेव्हा सुजित खिलाडूवृत्ती दाखवत म्हणतो, ‘मुलीसाठी दोस्तीत कुस्ती नाय!’
धडधडणार्या प्रत्येक हृदयाला या कादंबरीत कुठे ना कुठे आपल्या मनाच्या भावना दिसून येतील. शहरी भागात राहूनही साडी नेसण्याची हौस असणारी साक्षी शेवटपर्यंत खिळवून ठेवते. त्यातूनच समाजातील आजचे प्रश्न लेखकाने ठामपणे मांडले आहेत. ‘जनरेशन गॅप’ समजून घेतली तरी ही कादंबरी प्रेम आणि मैत्री या दोन्ही आघाड्यांवर अव्वल ठरते. सागर कळसाईत याने आजूबाजूच्या घटनांचे निरीक्षण करून त्या शब्दबद्ध करताना लेखणीचा सुंदर आविष्कार घडविला आहे.
एखादा तरुण लेखक लिहायला लागतो तेव्हा साहित्यातील ठोकळेबाज विचारसरणीच्या धेंडांकडून आणि प्रकाशन संस्थांकडून येणारे भलेबुरे अनुभवही या कादंबरीत आले आहेत. ‘फक्त पुस्तकात अखंड डुबून राहणार्या लोकांसाठी नाही तर सर्वसाधारण माणसांनाही वाचता येईल, वाचताना मजा घेता येईल आणि त्यातून एखादा विचार देता येईल’ अशी कलाकृती घडविण्याचे लेखकाचे स्वप्न असते. या कादंबरीद्वारे ते पूर्णत्वास आले आहे. ‘जेव्हा माणूस स्वत:च्याच मनाशी वैर घेतो ना, तेव्हा त्याला सोपी गोष्ट करणेही खूप अवघड होऊन जाते आणि तेच जर आपण स्वत:शी मैत्री केली तर अशक्य वाटणारी स्वप्नेसुद्धा आपण पूर्ण करू शकतो,’ असा प्रेरणादायी विचार मानवचे बाबा त्याला देतात आणि मानव ताळ्यावर येतो. ‘मी तुझ्यासोबत आहे. आपण दोघे मिळून स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करूयात,’ असा आवाज त्याला त्याचे हृदय देते आणि ही कादंबरी सशक्तपणे फुलत जाते. ‘सरळ झाड असले की पहिली कुर्हाड त्याच्यावर पडते. वाकड्या झाडांना कोणी तोडत नाही’ अशी अनेक चिंतनसूत्रे जागोजागी प्रभावीपणे या कादंबरीत मांडली आहेत.
आजच्या तरुणाईची प्रातिनिधीक भावना मांडताना, आजच्या तरुणाईची घुसमट व्यक्त करताना सागर कळसाईत याने या कादंबरीला सर्वोच्च स्थानावर नेले आहे. ‘दुनियादारी’, ‘शाळा’, ‘कॉलेज गेट’ अशा तरुणाईवरील कादंबर्यांच्या परंपरेत ‘लायब्ररी फ्रेंड फॉलो युवर हार्ट’ या कादंबरीने भर पडली आहे. भविष्यात कादंबरी क्षेत्रात सागर कळसाईत हे नाव विद्युल्लतेप्रमाणे तळपत राहील असा आशावाद व्यक्त करत सागर कळसाईत याला पुढील लेखनासाठी अंत:करणपूर्वक शुभेच्छा देतो!
घनश्याम पाटील
संपादक, प्रकाशक ‘चपराक’ पुणे
मो. 70572 92092
अप्रतिम प्रस्तावना!
ReplyDeleteप्रस्तावना वाचताना कादंबरी कधी हाती पडणार याची उत्कंठा शिगेला पोहचली आहे !