महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य असल्याचं सातत्यानं सांगितलं जातं. अनेकजण आपणच कसे पुरोगामी आहोत हे दाखवण्यासाठी धडपडत असतात तर काहींना प्रतिगामी ठरविण्यासाठी काहींचे ‘नको नको ते’ उद्योग सुरू असतात. अशा सगळ्या वातावरणात प्रश्न पडतो की, पुरोगामी कोणाला म्हणावं? खरा पुरोगामी कोण?
या प्रश्नाचं उत्तर तसं खूप सोपं आहे. ज्याचं अन्याय-अत्याचाराविरूद्ध रक्त सळसळतं, उसळून येतं, जुन्या चुकीच्या प्रथा-परंपरा मोडून काढण्याची धमक ज्याच्यात आहे, जे जे विज्ञाननिष्ठ नाही आणि जे समाजासाठी मारक आहे त्याच्याविरूद्ध जो पेटून उठतो तो पुरोगामी! याउलट ज्याला सत्य स्वीकारायचं नसतं, जो आपल्याच चुकीच्या भूमिकेवर आडून राहतो, दुराग्रह बाळगतो तोच कट्टरतावादी आणि खरा प्रतिगामी असतो, खरा दहशतवादी असतो. असा दहशतवाद स्वयंघोषित पुरोगामी वर्तुळात आणि परंपरावादी प्रतिगाम्यात दिसून येतो. यापैकी कोणीही परिवर्तनवादी नसल्यानं नितळतेचा हा प्रवाह दुर्गंधीकडं येऊन ठेपलाय. पुरोगामी परंपरेचं वाटोळं या दोन्ही प्रवृत्तीच्या अनुयायांनी केलंय.
स्वतःच्या फायद्यासाठी सत्तेचं राजकारण करणारे आपले नेते ना पुरोगामी आहेत ना प्रतिगामी! ते आहेत संधीसाधू! ज्यामुळं आपलं भलं होणार त्याप्रमाणं त्यांचं वर्तन असतं. मग अनेक गुंड, पुंड, वस्ताद नि पठ्ठे ते पावन करून घेतात. त्यांच्यासाठी पुरोगामी, प्रतिगामी असं काही नसतं. समोरच्याचं उपयोगितामूल्य त्यांच्या बरोबर ध्यानात येतं. त्यानुसार ते आपले पंटर तयार करतात.
आपण जेव्हा ‘पुरोगामी महाराष्ट्र’ असा शब्दप्रयोग करतो तेव्हा हे लक्षात घ्यायला हवं की त्याच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या युगपुरूषाची छाप आहे. पाच हजार वर्षे जलपर्यटनावर बंदी असताना ज्यांनी स्वतःचं मोठं आरमान उभारलं ते छत्रपती शिवाजीराजे खरे पुरोगामी नेते ठरतात. त्यामुळं महाराजांचं तत्त्वज्ञान, त्यांची शिकवण आचरणात आणणारे जे कोणी असतील ते पुरोगामी! आदिलशाही-मोघलशाहीच्या विरूद्ध आवाज उठवताना ज्यांनी स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवलं ते पुरोगामी. त्यांना अनिष्ठतेविरूद्ध, जुलमी सत्तेविरूद्ध बंड पुकारून हिंदवी स्वराज्य स्थापायचं होतं. त्यामुळं स्वतःच्या घरावर निखारा ठेऊन अहोरात्र रयतेच्या कल्याणाचा विचार करणारे छत्रपती शिवाजीराजे हे खरे पुरोगामी ठरतात.
‘वेदांचा तो अर्थ आम्हासिच ठावे’ असं ठणकावून सांगणारे तुकाराम महाराज खरे पुरोगामी ठरतात तर त्याचवेळी मंबाजी भट, सालो-मालो प्रतिगामी ठरतात. भगवत्गीतेचं तत्त्वज्ञान मराठीत आणणारे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पुरोगामी ठरतात तर त्याचवेळी त्यांना धर्मबहिष्कृत करणारे आळंदी-पैठणचे ब्राह्मण प्रतिगामी ठरतात. मोघल-आदिलशहांची चाकरी करणारे घोरपडे-सावंत कधीही पुरोगामी ठरू शकत नाहीत. त्यामुळं प्रत्येक काळात या दोन्ही प्रवृत्तीतला संघर्ष अटळ असतो. एकंदरीत संत ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज यांना डोक्यावर घेऊन नाचणारा, त्यांचा वारसा पुढं चालवणारा प्रत्येकजण पुरोगामी. एकीकडं फुले, शाहू, आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि दुसरीकडं आपल्याच बहुजन समाजातील बांधवांना अंधारात ठेवायचं, त्यांचा राजकारणासाठी उपयोग करून घ्यायचा आणि आपली दुकानदारी जोरात सुरू ठेवायची असा बेगडी संधीसाधूपणा गेली कित्येक वर्षे महाराष्ट्रात सुरू असल्यानंच पुरोगामी ही शिवी झालीय. एखादी ओवी जेव्हा शिवीत रूपांतरीत होते तेव्हा तो समाज अधःपतनाला गेलाच म्हणून समजा. जर आपलं महाराष्ट्र राज्य खरंच ‘पुरोगामी’ असतं तर आजची ही असली चालू असलेली ‘मेगाभरती’ करावी लागली असती का?
सुशीलकुमार शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री असताना ‘हिंदू दहशतवाद’ ही कल्पना मांडली होती. पंढरीच्या विठ्ठलानंतर ज्ञानोबा आणि तुकोबाला देव माणणारा आपला समाज. तो कधीही दहशवादी असू शकत नाही. पूर्वी अशी काही विधानं केली की दलित, आदिवासी, मुस्लिम बांधवांपैकी काहीजण खूश व्हायचे. आता त्यांनाही त्यातला फोलपणा कळलाय. त्यामुळं ते अशा विधानांना बळी पडत नाहीत. कॉंग्रेसचं इतकं पानिपत झाल्यावर तरी त्यांना ही गोष्ट नक्कीच उमगली असेल. टोकाचा कट्टरतावाद जपणारे मुस्लिम, ख्रिश्चन हेही पुरोगामी असू शकत नाहीत. उलट कट्टरतावाद नेहमी दहशतवादाकडं जातो. अनेकांची क्षमा मागून मला यानिमित्तानं माझं निरीक्षण नोंदवासं वाटतं. ते असं की, हिंदू हा कधीही दहशतवादी असू शकत नाही! तो सच्चा पुरोगामी असणंही दुरापस्त झालंय. त्यामुळं तो ना पुरोगामी, ना प्रतिगामी! तो असलाच तर फक्त आणि फक्त ‘वेडगळ’ असू शकतो. त्याला ना आपल्या आदर्श संस्कृतीची चाड, ना नव्याचा ध्यास, ना परिवर्तनाची आस! विविध राजकारण्यांच्या मागं सैरभैर झालेले बहुसंख्य हिंदू बघितले की याची खात्री पटते. अर्थात याला काही अपवाद आहेत पण त्यांचं प्रमाण अंत्यत अत्यल्पच! ज्ञानेश्वर-तुकारामांची शिकवण रक्तात भिनलेला हिंदू उदारमतवादी असला तरी त्याला काळाची आव्हानं ओळखता येत नाहीत हे कटू वास्तव आहे.
ज्या महात्मा फुल्यांनी टिळक-आगरकरांना जामिन देऊन सोडवून आणलं त्याच फुल्यांच्या मृत्युनंतर केसरी, मराठा, सुधारकमधून मात्र फारसं काही लिहून आलं नाही. राष्ट्रपिता महात्मा फुले यांचे विचार आजच्या स्वयंघोषित पुरोगाम्यांसाठी केवळ दुकानदारीपुरतेच उरलेत हेही समाजवास्तव आहे.
आज पक्ष कोणताही असला तरी नेत्यांच्या पाया पडायचा काळ आहे. त्यांचे जोडे उचलायलाही आपले नेते मागंपुढं पाहत नाहीत. मात्र याच हुजरेगिरी करणार्या आजच्या नेत्यात स्वाभिमान जागृत करावा यासाठी पूर्वसुरींनी जे प्रयत्न केले त्याला तोड नाही. दुर्दैवानं ते सगळं वाया गेलं असंच म्हणावं लागेल. आपल्या राज्याची पुरोगामी राज्य अशी ओळख असली तरी त्यात तथ्यांश नाही हेच खरं!
खरा पुरोगामीपणा बघायचा तर कोल्हापूरकडं बघावं. छत्रपती शाहू महाराजांनी पुराणोक्त संस्कार नाकारले. वेदोक्त संस्कार का नाही? असा सवाल त्यांनी केला. ते शक्य नाहीत हे तेव्हाच्या व्यवस्थेनं सांगितल्यावर मग त्यांनी असले तकलादू संस्कारच नाकारले. ते ब्राह्मणविरोधी असल्याचा अपप्रचार काहीजण करतात; मात्र त्यात सत्य नसल्याचं कुणाही अभ्यासकाच्या सहजपणे लक्षात येईल. दिनानाथ मंगेशकर नावाचा कुणी चांगला गातो हे कळल्यावर कोल्हापूरकरांनी त्यांना आश्रय दिला. प्रबोधनाचा वारसा जपणार्यांना त्यांनी प्रेस चालू करून दिले. इतकी मदत करूनही ते कर्जबाजारी झाले, त्यांनी प्रेस विकून टाकले पण त्यांना महाराजांनी जाब विचारला नाही. छत्रपती शाहू महाराजांनी कधीही, कोणत्याही कलावंताची जात बघितली नाही, धर्म बघितला नाही. गुणीजणांना त्यांनी योग्य ती मदत सातत्यानं केली. आज त्यांच्या नावानं राजकारण करणारे मात्र जात आणि धर्म याबाहेर पडायला अजूनही तयार नाहीत. त्यातून पेशवाईचे आरोप होतात. पगडी आणि पागोट्याचं राजकारण होतं.
एका दलितानं हॉटेल सुरू केलं तर त्याच्याकडं लोकानी जावं म्हणून शाहू महाराज त्याच्या हॉटेलवर चहा प्यायला गेले. भीमराव आंबेडकर नावाचा एक तरूण शिकून, पदवी घेऊन आलाय हे कळल्यावर त्याच्या चाळीत जाऊन त्यांनी त्याला कडकडून मिठी मारली. लोकमान्य टिळकासारखे तेव्हाचे धुरीण जर महाराजांच्या पाठिशी उभे राहिले असते तर आजचं महाराष्ट्राचं चित्र खूप वेगळं राहिलं असतं. छत्रपती शाहू महाराजांचं जगणं आणि वागणं हे खरं पुरोगामी होतं. अशा लोकनेत्याच्या प्रतिक्षेत महाराष्ट्र अजूनही आहे. तो शोध काही संपत नाही. महाराष्ट्र शाहू महाराजांविषयी, कोल्हापूर संस्थानविषयी कायम कृतज्ञ आहे पण त्यांना अपेक्षित असलेला समाज घडविण्यात आपले पुढचे सगळे नेते कमी पडले.
जाणता राजा म्हणून मिरवणार्या नेत्याचे तट्टू आणि सतत फुले, शाहू, आंबेडकरांच्या नावाचा जप करणारे आपले भुक्कड विचारवंत यांनी इथला पुरोगामीपणा संपवला. आपल्या नेत्याची विचारसरणी पुढं न्यायची या धोरणानं दिवसरात्र एक करणारे आंधळे उपासक हे खरे पुरोगामीपणाचे मारेकरी आहेत. म्हणूनच कॉमे्रड पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाचा प्रचार केला जातो पण हमीदभाई दलवाईंचं ‘भारतीय मुसलमान’ हे पुस्तक आपल्याला पचत नाही. हिंदुंच्या श्रद्धांस्थानांना तडे देताना अन्य धर्मातील रूढी-परंपरा मात्र हेतुपरस्सर दुर्लक्षिल्या जातात. शोषण हीच वृत्ती ज्या धर्माच्या केंद्रस्थानी आहे त्या धर्माची चिकित्सा जरूर व्हावी पण ती करताना सर्वसमावेशकता न ठेवता केवळ हिंदुंवरच आघात करावेत हे आजच्या पुरोगाम्यांचं तर्क आहे. थोडक्यात, जो ब्राह्मणांना झोडपतो तोच पुरोगामी इतकी ही संकल्पना या सर्वांनी खुजी करून ठेवलीय.
आपल्याला मारहान होईल, आपल्या आणि आपल्या कुटुंबियांच्या जीवाला धोकाला आहे, ज्यांच्यासोबत काम करतोय त्या राजकारण्यांची खप्पामर्जी होईल, त्यांच्याकडून पदरात पडणारे लाभ मिळणार नाहीत, मान-सन्मानाच्या जागा डावलल्या जातील या अपरिहार्यतेतून आजचे अनेक पुरोगामी कायम तटस्थ असतात. त्यांनी सत्तेशी जमवून घेताना सत्याशी फारकत घेतलीय. अंदमानच्या विश्व मराठी साहित्य संमेलनात सुप्रसिद्ध विचारवंत शेषराव मोरे यांनी ‘पुरोगामी दहशतवाद’ ही संकल्पना मांडल्यावर म्हणूनच अनेकांना हादरा बसला. कॉम्रेड पानसरे यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर आपल्या शिरावर आपलंच धड असावं! पण आजचे अनेक पुरोगामी नेते आणि विचारवंत इतरांच्याच मेंदुनं चालतात. स्वयंप्रज्ञेचा अभाव आणि समाजाविषयी, गोरगरिबांविषयी व्यापक कळवळा हरवलाय. आपण कसे श्रेष्ठ आहोत हे दाखवण्याच्या अहंकारापोटी पुरोगामी चळवळ लयाला गेलीय.
मध्यंतरी लेखक संजय सोनवणी म्हणाले होते, ‘‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हीच खरी पुरोगामी संघटना आहे.’’
त्यांच्या या विधानावर मी डोळे विस्फारले. त्यावेळी ते म्हणाले, ‘‘संघाचे आजचे सरसंघचालक आजच्या समस्यांवर, आजच्या प्रश्नांवर सातत्यानं बोलतात. ते कधीही डॉ. हेडगेवार, गोळवलकर गुरूजी किंवा त्यांच्या अन्य नेत्यांवर फारसे बोलत नाहीत. आरोग्य, शिक्षण, मदत आणि पुनर्वसन अशा क्षेत्रात ते जगभर काम करत आहेत. त्यांच्याकडं आयुष्यभर निरपेक्षपणे खपणार्या स्वयंसेवकांची पिढीच्या पिढी आहे. याउलट पुरोगामी म्हणवून घेणारे अनेक नेते फुले, शाहू, आंबेडकर, गांधी आणि नेहरू याबाहेर पडत नाहीत. आजच्या प्रश्नांवर बोलत नाहीत. त्यांना निष्ठावान माणसं घडवता आली नाहीत. जो पुरोगामी आहे त्याला काळाबरोबर चालता आलं पाहिजे. हे सर्व निकष लावले तर संघच खरा पुरोगामी ठरतो.’’
आज आपले अनेक लेखक, पत्रकार, विचारंवत आपण किती पुरोगामी आहोत हे दाखविण्यासाठी धडपडत असतात. यांनी पुरोगामी-प्रतिगामी असणं महत्त्वाचं आहे की सत्य मांडणं, समाजाला जागरूक करणं, नव्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे? मुळात प्रश्न पडणं, चिकित्सा करणं हे पुरोगामित्वाचं लक्षण असताना यांच्याविषयी कोणीही काहीही प्रश्न उपस्थित केले की यांना ते झोंबतात. समोरच्याची कुतूहलवृत्ती मारून टाकणं, त्याची जिज्ञासा संपवणं आणि ते करताना आपणच कसे भारी आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करणं इथंच पुरोगामीपणा संपतो. प्रतिगामी हिंसेचं समर्थन करतात तर पुरोगामी वैचारिक संघर्ष करतात असाही एक दिखावा या मंडळींनी निर्माण केलाय. त्यात किती विरोधाभास आहे हे वेळोवळेच्या अनेक घटनांनी आजवर दाखवून दिलेलं आहेच.
महाराष्ट्राच्या चार भागात चार सच्चे पुरोगामी नेते पैदा झाले तर आपण सर्वांसाठी आदर्श आणि दिशादर्शक असू शकू. मागच्या आदर्शांचा वारसा पुढं नेणं आणि स्वतःच्या प्रतिभेच्या, कर्तृत्वाच्या जोरावर त्यात भर घालणं याला पुरोगामीपणा म्हणतात. तो आदर्शही ज्ञानेश्वर माऊलींनीच घालून दिलाय. आपला धर्मग्रंथ म्हणून सर्वमान्य असलेली भगवतगीता सांगते, जेव्हा जेव्हा समाजाला ग्लानी येईल, समाजावर मोठं संकट येईल त्यावेळी सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांचा नाश करण्यासाठी मी नक्की जन्म घेईल.
भगवान श्रीकृष्णाचं हे तत्त्वज्ञान पचवताना त्यांचे शिषोत्तम असलेले संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज कृष्णाच्याही पुढं गेलेत. त्यांनी जे पसायदान मागितलं त्यात दुरितांचे तिमिर जाओ अशी प्रार्थना केलीय. खळांची व्यंकटी सांडताना त्यांची सत्कर्मी रती वाढो असं ते म्हणतात. ज्याला जे हवं ते मिळो अशी प्रार्थना करताना त्यांनी गीतेप्रमाणं दुष्टांचा नाश करण्याची भाषा केली नाही तर त्यांचा दुष्टपणा संपावा अशी प्रार्थना केलीय. संपूर्ण आयुष्य गीतेवर भाष्य करण्यात घालवताना गीतेची कुठंही अप्रतिष्ठा न होऊ देता त्याच्याही खूप पुढं जाऊन असं पसायदान मांडणं यालाच तर खरा पुरोगामीपणा म्हणतात. म्हणूनच माऊलींचं पसायदान जगभर मान्यता पावलं.
सध्याचा काळ पाहता दुष्ट लोक आणि त्यांचा दुष्टपणा संपणार नाही हे सत्य आपण स्वीकारायलाच हवं. मात्र किमान त्यांचा दुष्टपणा कमी व्हावा इतकी प्रार्थना तर आपण नक्कीच करू शकतो. पुरोगामी म्हणवणार्या आपण सर्वांनी हा निश्चय केला तरी समाजात अनेक सकारात्मक बदल दिसून येतील. ते दिसावेत हीच यानिमित्तानं प्रार्थना.
- घनश्याम पाटील, पुणे
7057292092
दैनिक ‘पुढारी’ बहार पुरवणी - 24 नोव्हेंबर 2019
खूपच सुंदर झालाय लेख. कायम संग्रही ठेवावा असा.जबरदस्त, जोरदार, जिंदाबाद💐
ReplyDeleteमला आवडलेले काही विचार येथे मुददाम उद्धृत करतो
1.एकीकडं फुले, शाहू, आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि दुसरीकडं आपल्याच बहुजन समाजातील बांधवांना अंधारात ठेवायचं, त्यांचा राजकारणासाठी उपयोग करून घ्यायचा आणि आपली दुकानदारी जोरात सुरू ठेवायची असा बेगडी संधीसाधूपणा गेली कित्येक वर्षे महाराष्ट्रात सुरू असल्यानंच पुरोगामी ही शिवी झालीय. एखादी ओवी जेव्हा शिवीत रूपांतरीत होते तेव्हा तो समाज अधःपतनाला गेलाच म्हणून समजा
2.हिंदू हा कधीही दहशतवादी असू शकत नाही! तो सच्चा पुरोगामी असणंही दुरापस्त झालंय. त्यामुळं तो ना पुरोगामी, ना प्रतिगामी! तो असलाच तर फक्त आणि फक्त ‘वेडगळ’ असू शकतो. त्याला ना आपल्या आदर्श संस्कृतीची चाड, ना नव्याचा ध्यास, ना परिवर्तनाची आस! विविध राजकारण्यांच्या मागं सैरभैर झालेले बहुसंख्य हिंदू बघितले की याची खात्री पटते. अर्थात याला काही अपवाद आहेत पण त्यांचं प्रमाण अंत्यत अत्यल्पच! ज्ञानेश्वर-तुकारामांची शिकवण रक्तात भिनलेला हिंदू उदारमतवादी असला तरी त्याला काळाची आव्हानं ओळखता येत नाहीत हे कटू वास्तव आहे
3.आपल्या नेत्याची विचारसरणी पुढं न्यायची या धोरणानं दिवसरात्र एक करणारे आंधळे उपासक हे खरे पुरोगामीपणाचे मारेकरी आहेत. म्हणूनच कॉमे्रड पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाचा प्रचार केला जातो पण हमीदभाई दलवाईंचं ‘भारतीय मुसलमान’ हे पुस्तक आपल्याला पचत नाही. हिंदुंच्या श्रद्धांस्थानांना तडे देताना अन्य धर्मातील रूढी-परंपरा मात्र हेतुपरस्सर दुर्लक्षिल्या जातात. शोषण हीच वृत्ती ज्या धर्माच्या केंद्रस्थानी आहे त्या धर्माची चिकित्सा जरूर व्हावी पण ती करताना सर्वसमावेशकता न ठेवता केवळ हिंदुंवरच आघात करावेत हे आजच्या पुरोगाम्यांचं तर्क आहे. थोडक्यात, जो ब्राह्मणांना झोडपतो तोच पुरोगामी इतकी ही संकल्पना या सर्वांनी खुजी करून ठेवलीय.
अतिशय सडेतोड आणि सर्वांगसुंदर लेख
ReplyDeleteदादा सलाम तुमच्या विचारांना... आज दिवसभरात चार ते पाच वेळा हा लेख वाचला... खूप आवडला.. प्रत्येक आवर्तनानंतर अधिकच उमगत गेला..
ReplyDeleteस्वतःला पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या टेंभ्यांनी आपले विचार आणि वर्तन अभ्यासण्याची गरज आहे. हे स्वयंघोषित आणि भोंदू पुरोगामी महाराष्ट्रात 'वैचारिक प्रदूषण' पसरवण्याचं काम करताहेत. ते अत्यंत घातक आहे.
दादा सलाम तुमच्या विचारांना... आज दिवसभरात चार ते पाच वेळा हा लेख वाचला... खूप आवडला.. प्रत्येक आवर्तनानंतर अधिकच उमगत गेला..
ReplyDeleteस्वतःला पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या टेंभ्यांनी आपले विचार आणि वर्तन अभ्यासण्याची गरज आहे. हे स्वयंघोषित आणि भोंदू पुरोगामी महाराष्ट्रात 'वैचारिक प्रदूषण' पसरवण्याचं काम करताहेत. ते अत्यंत घातक आहे.
फार चिंतनशिल ....
ReplyDeleteलेख वाचून अगदी डोक्याला झिणझिण्या आल्या . तुमचा लेख नेहमीच झोप उडवणारी असते आणि विचार करायला प्रवृत्त करणारा असतो . " पुरोगामी" शब्दाचा नव्याने अर्थ आज समजला .लेख शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट व्हायला हवा असे वाटते .....
This comment has been removed by the author.
ReplyDeleteखूप छान विचार मांडलेत सर....
ReplyDeleteअभ्यासपूर्ण लेख
संग्रही करण्यास योग्य लेख..
बऱ्याच लोकांना पुरोगामी हाच शब्द आठवतो , पण त्याचा भाऊबंद प्रतिगामी आठवतच नाही.... विचारलं तर हा शब्दच माहित नाही म्हणतात..!!!
सर , धन्यवाद ... आपले चांगले विचार अभ्यासायला मिळाले.
अप्रतिम लेख!👌सद्य राजकीय,सामाजिक,सांकृतिक,परिस्थिती ऐतिहासिक व वर्तमानातील संदर्भ देत तथाकथित प्रतिगामी व पुरोगामी यांच्यातील दांभिक द्वंद्व व त्यामुळे होणारी नैतिक अधःपतन करणारी उलथापालथ याची चपखल चिकित्सा सरजी आपण केलीत.... खरचं! सर्वांना झणझणीतअंजन घालणारा हा वैचारिक लेखप्रपंच!..from प्र.द.उगले पाटील.🌾🌺
ReplyDeleteहा लेख म्हणजे स्वतःला पुरोगामी म्हणणाऱ्यांना व समजणारयांना डोळ्यात जळजळीत अंजन आहे, याला मी एक छान शोध निबंधच म्हणेल, मस्त, आवडला लेख.
ReplyDeleteतुम्ही खूप सुंदर लिहितात सर असं वाटतं वाचत रहावं सत्य राजकीय परिस्थिती आज वाचयला मिळाली खूप छान असेच तुमचे लिखाण आम्हाला वाचयला मिळत राहो.तुमचा दिवाळी अंक ही सुंदर आहे त्यातला मला आवडलेला लेख नियती डाॅ विजय केसकर यांचा किती सुंदर लिहिला आहे... घट्ट मैत्री चिऊताईशी एवढया मोठया दुखातून ती बाहेर पडली. तिचा एकटेपणा नाहीसा झाला. खरंच खूप काही शिकण्यासारखं. तुमचे पुस्तक मला वाचयला नक्कीच आवडेल. आता ती उत्सुकता वाढली वाचण्याची
ReplyDelete