Wednesday, February 24, 2021

सरकारला शहाणपण कधी येणार?

महाराष्ट्राच्या आणि मराठी भाषेच्या विकासाची पताका भारतभर पसरवणारे संतशिरोमणी नामदेव महाराज! वारकरी संप्रदायाचा पाया भक्कमपणे भरण्यात ज्यांनी खूप मोठं योगदान दिलं त्यांचं नाव महाराष्ट्रातल्या ठाकरे सरकारनं शासकीय जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याच्या कार्यक्रमाच्या यादीतून वगळण्याचा करंटेपणा केला आहे. संत नामदेव हे फक्त महाराष्ट्राचे नाही तर संपूर्ण भारताचे आराध्य संत आहेत. पांडुरंगाच्या सर्वश्रेष्ठ भक्तराजात त्यांचा उल्लेख केला जातो. त्यांच्या कीर्तनात स्वतः विठुमाऊलीही डोलत असत अशी आख्यायिका आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संतशिरोमणी नामदेव महाराज यांनी भागवत संप्रदायाचा पाया भक्कम केला. त्यामुळं या यादीतून विठ्ठलाच्या लाडक्या भक्ताला दूर करणं हा फक्त संत नामदेव महाराजांचा, फक्त संत परंपरेचा अपमान नाही तर तो आपले सर्वांचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाचाही अपमान आहे. या भक्तराजाला अशी वागणूक देणार्‍या मुख्यमंत्र्याला विठ्ठल पुढच्या वेळी त्यांच्या पुजेचा मान देणार नाहीत असं माझ्यासारख्या श्रद्धावान माणसाला वाटतं.

मराठी साहित्याचा एक नम्र अभ्यासक म्हणून मला असं वाटतं की मराठी साहित्य भारतभर नेण्याचं काम संत शिरोमणी नामदेव महाराजांनी केलं. भागवतधर्माची पताका हातात धरणं ही अभिमानाची गोष्ट आहे हे जाती-धर्माच्या पलीकडं जाऊन सांगितलं. संत ज्ञानेश्वरांना समकालीन असलेल्या संत नामदेवांनी माउलींनंतर पन्नास वर्षे भक्तीचा महिमा सांगितला. त्यांचं नाव या यादीतून वगळून प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांची नावं यात घुसडली आहेत. कुणाची नावं घालावीत, कुणाला महापुरूष म्हणून मान्यता द्यावी याबाबत प्रत्येक सत्ताधार्‍याची काही धोरणं असतात. त्यामुळं संत नामदेवांचं नाव या यादीत का घातलं आणि आता ते का वगळलं हे स्पष्ट होणं गरजेचं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यानंतर कधी संधी मिळेल की नाही हे ते स्वतःही ठामपणे सांगू शकणार नाहीत. त्यामुळं त्यांनी त्यांचं स्वतःचं नावही या यादीत आत्ताच घातलं तरी आमची हरकत नाही. पुढच्या सत्ताधार्‍यांना आम्ही ते वगळायला लावू! मात्र संत नामदेवांची ही अशी उपेक्षा का केली हे त्यांनी कोमट पाणी पित जनतेला निदान एखादा व्हिडिओ करून सांगायला हवं.

शिंपी समाज महाराष्ट्रात अल्पसंख्य आहे, तो विरोध करणार नाही, केला तरी आपल्या मताच्या टक्क्यात काही फरक पडणार नाही असं तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाटत नाही ना? तसं असेल तर किमान संत-महात्म्यांना तरी जातीपातीत वाटण्याचे उद्योग करू नका. ते तुम्हाला झेपणारं नाही. ज्यांना स्वतःच्या वडिलांचं स्मारक अजून करता येत नाही त्यांनी आपल्या वडिलांचं-आजोबांचं नाव अशा यादीत घुसवताना काहीतरी अभ्यास केलेलाच असेल. मात्र संत नामदेवांना का वगळलं हे कळायला मार्ग नाही. ‘मराठी माणसाचा स्वाभिमान’ या मुद्द्यावर स्थापन झालेल्या शिवसेनेत आता लाचारांची मोठी फळी तयार होतेय आणि हे व असे सगळे निर्णय हा त्याचाच परिपाक आहे.

भाग्यवंत लाचारांना दिसे मीच नंगा
घेउनी न झालो आलो म्हणून मी लफंगा


असं गझलसम्राट सुरेश भट म्हणायचे. म्हणजे तुमच्यासमोर जे लाचार नाहीत ते सगळे लफंगे का?

वारकर्‍यांचं एक वेगळं योगदान आहे, वेगळं अधिष्ठान आहे. संतपरंपरेचा फायदा हिंदवी स्वराज्यासाठीही झालाय हे साधार आणि सप्रमाण न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी दाखवून दिलंय. त्यामुळं संतांचं महत्त्व आणि संतांच्या कार्याचं वेगळेपण अधोरेखित केलं जात असताना, महाराष्ट्र या संतपरंपरेमुळं इतरांपेक्षा वेगळा कसा आहे हे माहीत असताना संतशिरोमणींना तुम्ही दूर सारता? एवढी कसली तुम्हाला मस्ती आलीय? एवढा कसला अहंकार आहे? का संत नामदेवांचं नाव वगळलं? प्रारंभी उल्लेखल्याप्रमाणे संत नामदेव आणि अल्पसंख्य असलेला सहिष्णु शिंपी समाज तुम्हाला क्षमा करेल पण पांडुरंग आता त्याच्या दारात तुम्हाला उभा करेल का? सत्तेचा उन्माद काय असतो हे तुमच्या वागण्यातून दिसून येतंय.

संत शिरोमणी नामदेव महाराजांचं हे 750 वं जयंती वर्ष आहे. शासकीय पातळीवर संत नामदेव महाराजांविषयी जागृती करणारे उपक्रम राबवणं अपेक्षित असताना सरकारनं हा करंटेपणा केला आहे. या गोष्टीचा करावा तितका निषेध थोडाच आहे. या पार्श्वभूमिवर संतसेवेत आमचा खारीचा वाटा म्हणून यंदा माझे सन्मित्र ह. भ. प. सचिन पवार यांच्या पुढाकारातून ‘चपराक प्रकाशन’ आणि ‘वारकरी दर्पण’च्या माध्यमातून आम्ही एक दिवसीय संतशिरोमणी नामदेव महाराज साहित्य महोत्सव घेणार आहोत. त्यात संत नामदेव महाराजांविषयी, त्यांच्या साहित्याविषयी चर्चासत्रं आणि नामदेव महाराजांवरच कीर्तन होईल. त्यावेळी त्यांच्यावरील काही पुस्तकंही ‘चपराक’कडून प्रकाशित होतील.

संत नामदेवांचं सगळ्यात मोठं योगदान म्हणजे ते मानवतावादी संत आहेत. भारतभर पोहोचलेले ते पहिले सहिष्णुतावादी संत आहेत. पंजाबपर्यंत जाऊन घुमानमध्ये त्यांनी स्वतःला सिद्ध केलं. गुरूग्रंथसाहिबात त्यांना सन्मानाचं स्थान मिळालं. उद्धव ठाकरे, अजित पवार आणि त्यांच्या मंत्रीमंडळानं एक गोष्ट विसरू नये की सत्ता ही सर्वकाळ कुणाकडंही नसते. कधीतरी तुमची, तुमच्या घराण्याची सत्ता जाईल. एकदा विजयनगरचं साम्राज्य बघून या. तिथं मातीचे ढिगारेच दिसतील. रोमन साम्राज्यही ओस पडलंय. त्यामुळं तुम्ही जर तुमचं असंच वर्तन ठेवलं तर तुमचं साम्राज्य संपल्यावर तुमच्या पूर्वजांच्या जयंत्या सोडा त्यांचे फोटो लावायलाही कोणी शिल्लक राहणार नाही. इतका भुक्कडपणा सत्ताधार्‍यांना न शोभणारा आहे.

आता हतबलपणे असं सुचवावंसं वाटतं की सगळ्या राष्ट्रपुरूषांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या रद्द करा. ज्या दिवशी ज्यांची जयंती असेल त्या दिवशी शासकीय आणि खासगी कार्यालयात त्यांच्यावर प्रेम असणार्‍या सर्वांनी चार तास जास्त काम करावं. प्रबोधनकार ठाकरे किंवा बाळासाहेब ठाकरे यांच्यावर किंवा कोणत्याही राष्ट्रपुरूषांवर प्रेम असणार्‍या त्यांच्या अनुयायांनी चार तास जास्त काम करावं. अर्थात याचीही कुणावर सक्ती करू नये. मुख्यमंत्र्यासह सर्व आमदारांनी आणि राज्याच्या मुख्य सचिवांपासून ते ग्रामपंचायतीच्या शिपायापर्यंत सर्वांनी त्यांच्या त्यांच्या आवडत्या महापुरूषांच्या जयंतीनिमित्त किमान त्या एक दिवसाचा त्यांचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीला द्यावा.

राष्ट्रपुरूषांबद्दल प्रेम दाखवण्याची पद्धत कोणती? तर त्यांचा विचार पुढं नेणं... ते तर कोणीही करताना दिसत नाही. या उपक्रमामुळं निदान काही चांगल्या योजना पुढं जातील. समजा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असेल तर त्यांच्या सर्व चाहत्यांनी त्यांचं ग्रंथप्रेम लक्षात घेऊन त्या दिवशी अधिकाधिक वाचन करावं. ज्यांना शक्य असेल त्यांनी त्यांचं मा. बाबासाहेबांवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी अधिकाधिक पुस्तकं विकत घ्यावीत आणि ती गरजू ग्रंथालयांना, वाचकांना भेट द्यावीत. महापुरूषांची जयंती अशा पद्धतीनं साजरी करण्याची सवय समाजाला लावली गेली तर ठाकरे सरकारप्रमाणे असा करंटेपणा भविष्यात कोणी करू शकणार नाही आणि कुणाच्या जयंत्या साजर्‍या करायच्या यावरून राजकीय पक्षात मतभेद राहणार नाहीत.

लग्नाच्या अक्षता पडण्याच्या अगोदरच घटस्फोटाची केस चालवायला घेण्याचा उद्योग ठाकरे सरकार सातत्यानं करत आहे. हा धंदा त्यांनी आता बंद करावा. ज्या तत्परतेनं संत नामदेव महाराजांचं नाव वगळलं तशा तत्परतेनं संजय राठोडसारख्या नेत्यांकडं लक्ष द्या. लोकशाहीत आर्टिकल 14 प्रमाणे सत्तेतले लोक जसा उन्माद करतात त्याप्रमाणेच पाचशे दुचाकी घेऊन गजा मारणेंना रॅली काढण्याचा अधिकार आहे. अशा लोकात आणि सध्याच्या सत्ताधार्‍यांत काही फरक असेल तर तो निव्वळ योगायोग आहे.

संत शिरोमणी नामदेव महाराजांबाबतचा हा प्रकार नेमका का घडला याचं स्पष्टीकरण देऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची माफी मागायला हवी. नामदेवांचं नाव वगळून तुम्ही संतपरंपरेच्या पहिल्या पायरीला हात घातलाय. तुम्हाला मिळालेली ही शिकवण कुणाची हे सांगताना आणि आधीची परंपरा नष्ट करून, मोडीत काढून नवी परंपरा निर्माण करण्याचे निकष काय हेही सांगायला हवं.

राजकारणी जर अशा पद्धतीनं काम करणार असतील तर उद्या निश्चितपणे छत्रपती शिवाजी महाराजांचं, महात्मा फुले, राजर्षि शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर अशा कुणाचीही नावं राष्ट्रपुरूषांच्या यादीत दिसणार नाहीत. ते व्हायचं नसेल तर या सत्ताधार्‍यांना आणि समाज म्हणून आपल्यालाही आता थोडंफार शहाणपण यायला हवं.
- घनश्याम पाटील
7057292092



16 comments:

  1. फार छान चपराक लावली दादा

    ReplyDelete
  2. सणसणीत चपराक!👌👍💐💐💐

    ReplyDelete
    Replies
    1. खरंय! अगदी परखड आणि सत्य.छानच

      Delete
  3. दखलपात्र.. निश्चितच..
    विनाशकाले विपरीत बुद्धी..
    बाळासाहेब आणि त्यांचे प्खर हिंदुत्ववादी विचार कशाच्या नादात शिवसेनेने सोडले हे आता सर्वांना कळतय.
    संत शिरोमणी नामदेवांचे नाव वगळुन महाराष्ट्रात संत परंपरेचा.. समस्त सांप्रदायाचा अपमान सत्तेचा मद चढलेल्या राजकीय सत्त्ताधार्यांनी केला आहे. हा फक्त शिंपी समाजाचा अपमान आहे असे संकुचित जातियवादी समिकरण सरकार भलेही मांडो..पण हा समस्त संत समुदाय..वैष्णव.. भागवत..भगवंताचा आणि हिंदू समाजाचा अपमान आहे हे आपण लक्षात घ्यावे.. आज नामदेव उद्या तुकाराम.. परवा ज्ञानेश्वर.. मग काय शिंपी.. मराठा.. ब्राम्हण समाजाने आळीपाळीने विरोध करायला जायच..
    सर परखडपणाला अजून धार येऊद्या.. संपूर्ण समाज.. पंढरीच्या पांडुरंगाचे पाईक संपूर्ण वैष्णव.. भागवत.. सर्व समाज बांधवांनी यासाठी आवाज उठवावा..
    उद्धवा अजब तुझे सरकार.. म्हणत शिंपेतरांनी बघ्याची भुमिका घेऊन चालणार नाही..
    चपराक खरोखर लावायला हवी..

    🙏🙏

    ReplyDelete
    Replies
    1. खरंच स्त्तेचा उद्दामपणा, व घराणेशाहीची टिमकी मिरवतायात.

      Delete
  4. विनाशकाले विपरीत बुध्दी...
    एक वेळ त्यांना संत माफ करतील मात्र जनता माफ करणार नाही!

    ReplyDelete
  5. विनाश कालीन विपरीत बुद्धी

    ReplyDelete
  6. अतिशय परखड विचार,उद्दाम राजकीय नेत्यांना चपराक

    ReplyDelete
  7. सणसणीत चपराक दिलीत

    ReplyDelete
  8. खूप छान लेख सर

    ReplyDelete
  9. सर्वसमावेशक लेख आहे.
    आपण एक छान पर्याय सुचवला आहे, ज्यादिवशी कुणाची जयंती असेल त्यादिवशी चार तास अधिक काम करायचे... उपयुक्त सूचना आहे.

    ReplyDelete
  10. रमेश वाघFebruary 24, 2021 at 11:05 PM

    झणझणीत अंजन घालणारा लेख

    ReplyDelete
  11. सत्तेसाठी,स्वार्थासाठी लाचारी आणि निर्लज्ज पणाचा कळस झाला.संत महात्मे सुद्धा आपल्या लेखी अदखल झाले,याची भरभरून किंमत ठाकरे सरकारला मोजावी लागेलच यात शंकाच नाही

    ReplyDelete
  12. अतिशय खालच्या दर्जाचं राजकारण हे सरकार करत आहे. डोकं यांचं असलं तरी त्यातली बुद्धी मात्र वेगळ्या व्यक्तीची घुसडली गेली आहे. यांचा बोलविता धनी वेगळा आहे, हेही सर्वांना चांगलं माहीत झालंय. यांनी घेतलेल्या निर्णयामुळे हे यांच्या स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेताहेत, हेही यांना कळत नाही का? अगदी योग्य भाषेत तुम्ही यांना चपराक देऊन सुनावलं आहे. दादा, संत नामदेवांच्या कार्याबद्दल कोणाही वारकरीच नव्हे तर मराठी माणसाला सदैव अभिमानच वाटत राहणार आहे. मात्र राज्यकर्त्यांच्या अहंकाराने या सार्थ अभिमानाला ठेच पोहोचली आहे. हा अहंकार तुम्ही योग्य शब्दांत ठेचून काढला आहे. धन्यवाद!

    ReplyDelete