Monday, February 22, 2021

शिवसेनेची ‘आयडॉलॉजी’ कोणती?


बाळासाहेबांना
अभिप्रेत होतं की शिवसेनेत घराणेशाही राहणार नाही. जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन आम्ही हा पक्ष उभा करू! पण तसं राहिलं नाही. बाळासाहेबानंतर उद्धव आणि त्यांच्यानंतर आदित्य इथपर्यंत शिवसेना बदलली. मराठी माणसाचा स्वाभिमान आणि त्याची अस्मिता हे मुद्दे घेऊन शिवसेनेची स्थापना झाली. मराठी माणूस ठामपणे उभा रहावा यासाठी शिवसेनेची स्थापना करण्यात आली असल्याचं बाळासाहेब ठाकरे यांनी संघटना स्थापनेच्या वेळी सांगितलं होतं.

शिवसेनेचा जन्म झाला आणि मुंबईतला मराठी माणूस कमी होत गेला. शिवसेनेची सत्ता, आर्थिक ताकत वाढत गेली आणि मुंबईतला मराठी माणसाचा टक्का कमालीचा घटला. मराठी माणसाचा एका विशिष्ट टप्प्यापर्यंत उपयोग करून घेतल्यानंतर शिवसेना हिंदुत्त्वाच्या मुद्याच्या मागे लागली. शिवसेनेला स्वतःची कुठलीही नैसर्गिक आयडॉलॉजी नाही. लाटांवर स्वार होणं आणि मलई मिळवणं अशीच त्यांची विचारधारा दिसते. अणीबाणीला पाठिंबा देऊन इंदिरा गांधी यांच्यापुढे डोकं टेकवणार्‍यांनी पुढे सोनिया गांधींना मात्र कडाडून विरोध केला. ही परदेशी आहे, इटालियन आहे, पांढर्‍या पायाची आहे म्हणून त्यांनी सोनिया गांधींवर कायम टिकेचे आसूड ओढले.

आपल्याकडं अजूनही ‘कन्यादान’करायची परंपरा आहे. ज्यावेळी सोनिया गांधी लग्न करून भारतात आल्या त्यावेळी त्या पूर्ण भारतीय झाल्या असं आपल्याला आपली हिंदू संस्कृती आणि हिंदू संस्कार शिकवतात. नेपाळमधून आलेली सीता अयोध्येची युवराज्ञी झाली, महाराणी झाली. अफगाणिस्तानातून आलेली कैकयी अयोध्येची सम्राज्ञी झाली. अफगाणिस्तानच्या गांधार परिसरातून आलेली गांधारी हस्तीनापूरची महाराणी झाली. त्यांचं माहेरचं नाव-आडनाव किंवा देशी-विदेशी असा भेद कोणीही आणि कधीही केला नाही. चंद्रगुप्त मौर्यालाही एका परदेशी राजाने त्याची मुलगी दिली होती पण तिलाही तिच्या परदेशित्वावरून कोणीही हिणवलं नव्हतं. हिंदू संस्कृतीची भाषा बोलायची आणि सोनिया गांधी इटालीयन असल्याचा जप करायचा ही मोठी विसंगती आहे. नवरा गेल्यानंतर सोनिया गांधी माहेरी निघून गेल्या नाहीत. इथल्या मुळात, इथल्या मातीत त्या इतक्या समरस झाल्या की त्यांनी देश सोडला नाही. तरीही त्या ‘परदेशी’ म्हणून त्यांना जंग जंग पछाडण्यात आलं. त्यामुळं शिवसेनेची स्थापनेपासूनची आयडॉलॉजी कोणती हा प्रश्न कायम पडतो.

शिवसेना भाजपबरोबर, आरपीआय, काँग्रेस किंवा राष्ट्रवादीबरोबर मधुचंद्र साजरा करू शकते. मुंबईतल्या कामगार क्षेत्रातील कम्युनिस्टांचा विरोध थांबवण्यासाठी काँगे्रसनेच ही विंग सुरू केलीय अशीही चर्चा उघडपणे व्हायची. वसंतराव नाईक त्यावेळी मुख्यमंत्री होते. त्यामुळे शिवसेनेला ‘वसंतसेना’ म्हटलं जायचं. ही काँग्रेसची वेगळी विंग होती की कम्युनिस्टांना थोपवण्यासाठी शिवसेनेच्या लढाईला काँग्रेसनं बळ दिलं यावर अनेकांची मतमतांतरं आहेत. शिवसेनेच्या स्थापनेपासून आजवर अनेकांनी सेनेचा फक्त वापरच करून घेतलाय. त्यात इंदिरा गांधी, वसंतराव नाईक, भाजप किंवा शरद पवार असतील. शिवसेनेबाबत ‘वापरा आणि फेकुन द्या’ हेच या व अशा अनेकांनी वेळोवळी दाखवून दिलेय. शिवसेनेने कधीच कोणती ठाम भूमिका घेतली नाही. बाकी सगळे सोडा ते कायम ज्या छत्रपती शिवाजीमहाराजांचा जयजयकार करतात त्या छत्रपतींच्या जन्मतारखेबाबतही शिवसेनेची काही भूमिका नाही. तिथीनुसारच शिवजयंती साजरी करणार अशी डरकाळी फोडणार्‍या उद्धव ठाकरेंना सत्तेत आल्यावर 19 फेब्रुवारीला ट्विटरवरून शुभेच्छा द्याव्या लागल्या.

मराठी माणसाला मोठं करण्याचं स्वप्न बघत हा पक्ष स्थापन झाला आणि तरूणांची एक मोठी फळी या पक्षाबरोबर उभी राहिली. मात्र या तरूणाईकडे सपशेल दुर्लक्ष करत सेनेने ठराविक घराणे मोठी केली. शिवसेनेने महाराष्ट्राला आजवर काय दिले? शरद पवारांनी निदान फळक्रांती केली. संरक्षण मंत्री असताना सैन्य दलात त्यांनी प्रथमच मुलींना सामावून घेतलं. शिवसेनेच्या नावावर असं कोणतं काम आहे का? मराठी माणसाचा सन्मान करण्याऐवजी अनेकदा शिवसेनेकडून त्यांचा उपमर्दच केला गेलाय. मग ते नानासाहेब गोरे असतील, मृृणालताई गोरे असतील, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी असतील किंवा पु. ल. देशपांडे असतील! मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी उभ्या राहिलेल्या या संघटनेने अनेक अमराठी माणसांनाच राज्यसभेवर पाठवले. एकीकडे पाकिस्तानवर कडवट टीका करायची आणि दुसरीकडे जावेद मियाला मातोश्रीवर बोलवून ‘तू सिक्सर किती छान मारलास!’ म्हणून त्याच्या दाढीला तूप लावत बसायचं.

संघाच्या हिंदुत्त्ववादामागे काही विचार आहेत. सावरकरांच्या हिंदुत्त्वाची काही व्याख्या आहे. तसे शिवसेनेच्या हिंदुत्त्वाचे निकष त्यांनी जाहीर करायला हवेत. त्या-त्या दिवशी त्यांना वाटेल तसे त्यांचे हिंदुत्त्व. कधी मुस्लिमांचा टोकाचा द्वेष करायचा तर कधी सलमान खान गणपतीची पूजा करतो म्हणून त्याला जवळ करायचे. मराठवाड्यापासून विदर्भापर्यंत आणि कोकणापासून मुंबईपर्यंत तरूणाईची एक फौज शिवसेनेच्या पाठिमागे उभी राहिली. या सगळ्यात मराठी माणूस आहे तिथेच राहिला मात्र सेनाप्रमुखांचं घर सत्तेत जाऊन पोहचलं. दादा कोंडके यांच्या हक्कासाठी शिवसेना एकदा लढली होती. नंतर कोणत्या मराठी माणसाबरोबर ते उभे राहिले? हे आता त्यांनी सांगण्याची आवश्यकता आहे.

2014 ते 2019 पर्यंत भाजपने त्यांची केवढी फरफट केली? अशी ससेहोलपट सहन करणार्‍या शिवसेनेने खिशात राजीनामे घेऊन पाच वर्षे भाजपबरोबर संसार केला. राम मंदिराचा प्रश्न, मथुरेचा प्रश्न किंवा अफजलखानाच्या कबरीचा प्रश्न असेल... शिवसेनेकडे स्वतःची कोणतीही आयडॉलॉजी नाही. शिवरायांचं हिंदुत्त्व हे हिंदवी स्वराज्य स्थापन करणारं सर्वसमावेशक हिंदुत्त्व होतं. ते सावरकरांच्या हिंदुत्त्वापेक्षा खूप मोठं होतं. संघाच्या हिंदुत्त्वापेक्षा तर फारच मोठं होतं आणि शिवसेनेच्या हिंदुत्त्वाचा आणि महाराजांच्या सर्वव्यापी हिंदुत्त्वाचा मात्र दुरान्वयानंही संबंध नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणं, आदित्य ठाकरे यांच्याकडे राज्याची सूत्रं देणं हेच तुमचं ध्येय आहे का? काँग्रेसवाले किमान म्हणतात की ‘आम्हाला धर्मनिरपेक्ष समाज निर्माण करायचाय.’ अनेक हिंदुत्त्ववादी पक्ष म्हणतात ‘आम्हाला हिंदुराष्ट्र स्थापन करायचंय.’ शिवसेना केवळ अडचणीत आल्यावर ‘मराठी माणूस अडचणीत’ आल्याचे सांगते. अर्णव गोसावी तुमच्याविरूद्ध बोलू लागल्यावर, कंगना रानौतने तुम्हाला सळो की पळो करून सोडल्यावर तुम्हाला मराठी अस्मिता संकटात असल्याची जाणीव होते. मराठी माणूस नेमका तुम्हाला कशाला हवाय? तुमचा जयजयकार करायला? मराठी माणसाला शिवसेनेनं वडापावशिवाय दिलंच काय? मुंबई महानगरपालिका इतकी वर्षे हातात असताना शिवसनेनं किती मराठी उद्योजक घडवले?

मुंबईत अनेक सोसायट्यात फक्त गुजराती माणसांना, मुस्लिम माणसालाच फ्लॅट मिळतो. शिवसेना सत्तेत असतानाही हे चालूच राहतं. ‘केम छो वरळी?’ म्हणून तुम्ही तुमचे जाहिरात फलक लावण्यापर्यंत तुमची मजल गेलीय. तुमचे मतदारसंघ बदलले की  तुमच्या भूमिका बदलतात. मराठी माणसाच्या हातात दगड द्यायचा आणि अमराठी लोकाना मोठ्या संधी उपलब्ध करून द्यायच्या हे कसलं लक्षण म्हणावं? हातात फाफडा घेऊन गुजराती माणसाच्या मागं असं किती काळ फाफडत पळाल?

शिवसेना त्यांच्या स्वतःच्या नेत्यांनाही मोठं होऊ देत नाही. आज शिवसेनेत राऊतांशिवाय भूमिका मांडायला कोणीच नाही. राऊत ‘बोरूबहाद्दर’ आहेत. त्यांच्याच भाषेत बोलायचं तर राऊत हे ‘बाळाजी आवजी चिटणीस’ आहेत. त्यांनी फक्त पत्रं लिहावीत. तलवार गाजवायला हंबीरराव मोहिते, पंतप्रधान मोरोपंत पिंगळे, नरवीर तानाजी मालुसरे हवेत. तुम्ही अनिल परबांना कोपर्‍यात ठेवता, एकनाथ शिंदेंना बाजूला ठेवता, भाईगिरी करणार्‍या रामदास कदमांना दुर्लक्षित ठेवता, कामगार सेनेत योगदान देणार्‍या रघुनाथ कुचिकांनाही कुजवता. किमान दाखवण्यापुरता तरी एखादा चांगला चेहरा शिवसेनेकडं आहे काय? उद्धव ठाकरे यांचे एखादंतरी अभ्यासपूर्ण भाषण कधी गाजलंय का? बाळासाहेबांनी अनेकांवर वेळोेवेळी केलेली टीका तरी लक्षात आहे. आता ज्याला त्याला त्याचं त्याचं कार्यक्षेत्र देऊन ‘कार्पोरेट बिझनेस’ सुरू आहे. तुम्ही जर लोकशाही मानत नाही आणि ठोकशाहीवर विश्वास ठेवता तर तुम्हाला लोकशाही मार्गाची सत्ता हवी कशाला?

बाळासाहेबांनी 1999 पर्यंत जे नेते दिले त्यावर आजची शिवसेना उभी आहे. आदित्य ठाकरेंचा अपवाद वगळता शिवसेनेनं कोणते नवे नेते तयार केले? कोणते वक्ते शिवसेनेच्या माध्यमातून उभे राहिलेत? कोणते उद्योजक तुम्ही तयार केलेत? किती पतसंस्था-सहकारी बँका तुम्ही उभ्या केल्या? किती मराठी प्रकाशकांना-लेखकांना आधार दिला? छत्रपती शिवाजी महाराजांचं एक सर्वंकश आणि सर्वव्यापी चरित्र तयार करून ते जगभर पोहोचवावं असं तुम्हाला कधी वाटलं का? शिवाजीमहाराजांचं नाव वापरून तुम्ही हा पक्ष चालवता म्हणून या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायला हवीत.

प्रबोधनकारांची विचारधारा वेगळी, बाळासाहेबांची विचारधारा वेगळी, उद्धव ठाकरे यांचा आणि विचारधारेचा काही संबधच नाही. पुढच्या पिढीत आदित्य ठाकरे मात्र फिल्म  सीटी, पार्ट्या, नाईट लाईफबद्दल स्वतःची विचारधारा मांडत आहेत.  2014 ते 2019 दरम्यान अजित पवार म्हणाले होते, ‘‘ह्ये माझ्या पार्थएवढं पोर. त्याला धड मिशाही फुटल्या नाहीत. ज्यांनी शिवसेनेत आख्खं आयुष्य घातलंय असे चंद्रकांत खैरेसारखे अनेक ज्येष्ठ नेते व्यासपीठावर त्याच्या पाया पडतात. स्वाभिमानाची भाषा बोलणार्‍यांनी असं इतकं लाचार होऊ नये...’’

शेतकर्‍यांसाठी, कामगारांसाठी, मराठी भाषेसाठी शिवसेनेनं काय केलं याचं उत्तर मिळायला हवं. निदान एखादं मराठी वैद्यकीय महाविद्यालय सुरू केलं असतं तरी त्याची दखल घेता आली असती. मुंबईतला मराठी टक्का इतका कमी झालेला असूनही शिवसेना शांतच आहे. काँग्रेसचं विसर्जन करायचं की नाही यावर चर्चा होऊ शकते; शिवसेनेचं मात्र आता विसर्जन करण्याची वेळ आलेली आहे असं वाटतं.
- घनश्याम पाटील
7057292092

17 comments:

  1. बारीकसारीक गोष्टींचा आढावा घेतला आहे.
    अत्यंत अभ्यासपूर्ण आणि समतोल साधणारा लेख आहे.

    ReplyDelete
  2. जबरदस्त... झणझणीत!
    देधडक बेधडक लेख!

    ReplyDelete
  3. अगदी खरं आहे. . .भुजबळसाहेब राजजी राणेजी गणेश नाईक असे अनेकजण सोडून गेले याची कारणमीमांसाही व्हावी.

    ReplyDelete
  4. एकदम सडेतोड लिहलय पाटील सर!👍👌💐💐💐💐💐

    ReplyDelete
  5. चपखल तरीही संयमित !

    ReplyDelete
  6. परखड पण रास्त....जबरदस्त लेख

    ReplyDelete
  7. एखादा प्रकल्प सुरू करून रोजगार उपलब्ध करणे व विकास करणे याऐवजी तो बंद पाडण्याची धमकी देऊन खंडणी उकळण्यासाठी बाळ ठाकरे यांनी हा तथाकथित राजकिय पक्ष काढला. एक मराठी मासिक काढून पाचशे कोटी रुपये संपत्ती कमवता येते यावर विश्वास ठेवण्यासाठी बेअक्कल मनुष्यच हवा

    ReplyDelete
  8. अगदीच परखडआणि तटस्थ मांडणी

    ReplyDelete
  9. सर्व बाजूने सखोल विचार मांडला आहे, खरंच शिवसेनेला आता अंतर्मन तपासून पाहण्याची वेळ आली आहे, अभ्यासपूर्ण लेख

    ReplyDelete
  10. चपराक ला रास्त असं...

    ReplyDelete
  11. शिवसेना या घराणेशाही जोपासणार्या आणि मराठी संस्कृती मोडीत काढणारा झुंडीबद्दल एवढं बोलणं ही लायकीच नाही शिवसेनेची !

    ReplyDelete
  12. लेख खूप परखड आहे. पण शिवसेनेच्या चुका दाखवताना पवार ,सोनियाला बरे म्हणायच हे काही पटल नाही..
    सिता.. गांधारी.. वगैरे आर्यावर्तातली.. उदाहरण आहेत.. ती नाही पटली...
    पवारांना यापेक्षाही खुप काही करता आल असत.. त्यानी समाजकारण केल असत तर आज जाणता राजा म्हणून घ्यायला आक्षेप .वा उपहास नसता झाला..
    ते कुशल राजकारणी आहेत यात वादच नाही..
    पण राजकारणात समाजाच भल होत नाही.. ते मुठभर लोकांनी स्वतःच्या फायद्याचे.. सोयीचे..केलेले नाटक असते अस मला वाटत.
    आज जे एकत्र सत्तेत आहेत ते काल कट्टर विरोधक होते.. सत्ता ही राजकारण्यांची बटिक आहे आणि ते तिला हव तस भोगतात..
    भरडला जातो तो आता तरी न्याय मिळेल म्हणत मेंढरासारखा मागे धावनारा समाज..
    कळपातील शेवटच जनावर हाकणारा आणि पुढ धावणार वढाळ जनावर रोखणारा गुराखी चतुर हवा. पळणार्या वा गळणार्या जनावरांची कत्तल करणारा कसाई नसावा..
    १३० कोटी मेंढरांना.. कसाई आणि पालनहार यातला फरक कळणार कधी हा मोठा प्रश्न आहे.
    सोईच राजकारण सारेच करतात . पण समाजहिताच ढोंग करत केलेल राजकारण ही निव्वळ धुळफेक .
    असो..
    तुमच्या लेखातून अनेकदा परखडपणे हे बुरखे तुम्ही टराटरा फाडलेत.. आपल्या पुस्तकात ले काही वाक्य दरवळ म्हणून मी स्टेटसला मिरवली आहेत..

    समाजाला सजग करण्यासाठी ईश्वर आपल्या लेखणीला बळ देवो.

    धन्यवाद..
    ��������

    ReplyDelete
  13. लेख खूप परखड आहे. पण शिवसेनेच्या चुका दाखवताना पवार ,सोनियाला बरे म्हणायच हे काही पटल नाही..
    सिता.. गांधारी.. वगैरे आर्यावर्तातली.. उदाहरण आहेत.. ती नाही पटली...
    पवारांना यापेक्षाही खुप काही करता आल असत.. त्यानी समाजकारण केल असत तर आज जाणता राजा म्हणून घ्यायला आक्षेप .वा उपहास नसता झाला..
    ते कुशल राजकारणी आहेत यात वादच नाही..
    पण राजकारणात समाजाच भल होत नाही.. ते मुठभर लोकांनी स्वतःच्या फायद्याचे.. सोयीचे..केलेले नाटक असते अस मला वाटत.
    आज जे एकत्र सत्तेत आहेत ते काल कट्टर विरोधक होते.. सत्ता ही राजकारण्यांची बटिक आहे आणि ते तिला हव तस भोगतात..
    भरडला जातो तो आता तरी न्याय मिळेल म्हणत मेंढरासारखा मागे धावनारा समाज..
    कळपातील शेवटच जनावर हाकणारा आणि पुढ धावणार वढाळ जनावर रोखणारा गुराखी चतुर हवा. पळणार्या वा गळणार्या जनावरांची कत्तल करणारा कसाई नसावा..
    १३० कोटी मेंढरांना.. कसाई आणि पालनहार यातला फरक कळणार कधी हा मोठा प्रश्न आहे.
    सोईच राजकारण सारेच करतात . पण समाजहिताच ढोंग करत केलेल राजकारण ही निव्वळ धुळफेक .
    असो..
    तुमच्या लेखातून अनेकदा परखडपणे हे बुरखे तुम्ही टराटरा फाडलेत.. आपल्या पुस्तकात ले काही वाक्य दरवळ म्हणून मी स्टेटसला मिरवली आहेत..

    समाजाला सजग करण्यासाठी ईश्वर आपल्या लेखणीला बळ देवो.

    धन्यवाद..
    ��������

    ReplyDelete
  14. खूप अभ्यासानंतर असे लिहू शकता

    ReplyDelete
  15. तुम्ही चहा बिस्किटे खाऊन पोट भरीत नाहीत हे तुमच्या लेखनावरून स्पष्ट होते.

    ReplyDelete
  16. शिवसेनेचे अतिशय यथायोग्य विश्लेषण केले आहे.

    ReplyDelete