‘चपराक’ दिवाळी अंकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचे यंदाचे का. र. मित्र पारितोषिक जाहीर झाले आहे. यंदाच्या दिवाळी अंकासाठी आम्ही जे यशस्वी प्रयोग केले तो एका स्वतंत्र पुस्तकाचा विषय आहे. त्यावर मी स्वतंत्रपणे लिहिनच! आज एक चांगुलपणाची गोष्ट सांगायची आहे. गोष्ट ज्यांची आहे त्यांनाही मी हे सांगितलेलं आवडणार नाही पण याची नोंद घ्यायलाच हवी.
घरकोंडीमुळे बाहेर पडणं अवघड होतं. मार्चपासून आम्ही दिवाळी अंकाची तयारी सुरू केली होती. घराबाहेर पडणं कठीण असल्यानं मी कार्यालयातच ठाण मांडायचा निर्णय घेतला आणि तो अंमलात आणून काम सुरू केलं. कोणत्याही परिस्थितीत 24 ऑक्टोबरला दिवाळी अंकाचं प्रकाशन करायचं हे निश्चित केलं होतं आणि त्यात आम्हाला यश आलंही.
मी कार्यालयात मुक्कामी आलो खरा पण इथं सगळ्याच असुविधा होत्या. सिलेंडरची व्यवस्था असल्याने गरजेपुरते जेवणाचे पदार्थ स्वतःला करता येत होते. स्वयंपाकाचे रोज नवनवे प्रयोग करायचे आणि उरलेल्या वेळात रोज 17-18 तास दिवाळी अंकाचं काम उरकायचं असा माझा दिनक्रम सुरू होता. ‘चपराक’ कार्यालयाबाहेर आंबा, पिंपळ, सीताफळ, पेरू, तगर अशी अनेक झाडं असल्यानं त्यांचा सगळीकडे पालापाचोळा पडला होता. एखादा भूत बंगला वाटावा अशी अवस्था झाली होती. त्यात रोज कपडे धुणं, भांडी घासणं याचा जाम कंटाळा आला होता. एकटेपणा सलत होता तो वेगळाच.
घरकोंडीमुळे सगळेच्या सगळे सहकारी सुटीवर होते. त्यामुळं लेखकांशी बोलणं, विषय ठरवून मजकूर मागवणं, त्याच्या प्रिंट काढणं, डीटीपी करणं, मुद्रितशोधण, अंकाची मांडणी असं सगळं काही एकटाच करत होतो. बाकी टीम आपापल्या घरून जे काही करता येईल ते प्रयत्न करत होती.
एके दिवशी अचानक एक फोन आला. समोरून एक ताई बोलत होत्या. त्यांनी अधिकारानं सांगितलं की, ‘‘तू ताबडतोब राहुल टॉवर्स जवळ ये...’’
राहुल टॉवर्स ‘चपराक’ कार्यालयापासून दोन मिनिटांच्या अंतरावर आहे. तिथपर्यंत जाणं सहज शक्य होतं पण काही संदर्भ लागत नव्हते. तिथं माझ्या ओळखीचं कोणीच नव्हतं. शिवाय, मला असं अरेतुरे करणारे अगदीच हाताच्या बोटावर मोजण्याइतके आहेत.
मी राहुल टॉवर्सच्या गेटजवळ गेलो तर तिथं एक ताई उभ्या होत्या. रूपाली देशमुख हे त्यांचं नाव. त्यांना आमच्या दिलीप कस्तुरेकाकांनी सांगितलं होतं की कार्यालयात मी एकटाच राहतोय. (राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मंडळी अतिशय प्रेमानं असे उद्योग नेहमी करत असतात.) त्यामुळे या ताईंनी माझ्यासाठी सोबत जेवणाचा डबा आणला होता. त्यांनी सांगितलं की ‘‘तू इथे असेपर्यंत रोज माझ्याकडून जेवणाचा डबा न्यायचा.’’
मी त्यांना हे नको म्हणून परोपरीनं समजावून सांगत होतो पण त्या काही ऐकायलाच तयार नव्हत्या. त्यांनी मला दमच भरला की ‘‘रोज डबा न्यायचा, नाहीतर मी तुला आणून देईन.’’
बरं, बाहेरची परिस्थिती मला माहीत होती. अगदी रोज भाज्या मिळणंही कठीण होतं. अशावेळी रोजच्या डब्यात दोन भाज्या, चटणी, कोशिंबीर, न चुकता आमरस, रोज भाताचे नवनवीन प्रकार असं सगळं डब्यात येत होतं. मी त्यांना हे सगळं नको म्हणून सांगितलं पण त्या काही ऐकायलाच तयार नाहीत. शेवटी मी विनंती केली ‘‘तुमचा मान मी राखेन पण रोज फक्त पोळ्या आणि एकच भाजी किंवा चटणी द्या...’’
माझं ऐकतील तर त्या रूपालीताई कसल्या? त्यांनी सांगितलं ‘‘तुझ्या ताईसोबतही तू असाच संकोचानं वागतोस का? मला काही अडचण आलीच तर मी कळवेन पण तू रोज माझ्या हातचं खायचंच! हे तुझ्यासाठी नाही, तर अशा वातावरणातही न खचता तू जे काम करतो आहेस त्यासाठी आहे. ती आमची, समाजाची गरज आहे. लॉकडाऊननंतर चांगलं साहित्य आलं नाही तर ते समाजाचं नुकसान आहे. मी ते होऊ देणार नाही...’’
त्यांचं बोलणं ऐकून माझ्या अंगात एक अनोखा उत्साह संचारला. त्याचं फलित म्हणजे यंदाचा ‘चपराक’चा दिवाळी अंक आहे.
एखादं विधायक काम उभं करायचं असेल तर समाज परमेश्वराच्या रूपानं असा उभा राहतो. कदाचित अनेकांना आज ही गोष्ट तितकी महत्त्वाची वाटणार नाही. त्या काळाचा विचार केला तर थोडाफार अंदाज येऊ शकेल. रूपालीताई देशमुख यांच्यासारख्या माझ्यावर अमर्याद आणि निस्वार्थ प्रेम करणार्या अनेक तायड्या सुदैवानं मला मिळाल्यात. त्या सर्वजणीविषयी कृतज्ञता व्यक्त करायला माझ्याकडं शब्द नाहीत.
- घनश्याम पाटील
7057292092
शब्द नाहीत.
ReplyDeleteवेड्या बहिणीची ही वेडी माया!
खरंच हे असं वेडं व निरागास फक्त ताईच करु शकते. नशिबवान आहात. असे आपुलकीचे अदृश्य हात तुम्हाला तुमचे कार्य करण्यास मदत करतात हे वाचून डोळे पाणावले. तुम्हाला ह्या गोष्टींची जाणीव आहे. ह्यातच सगळे आले.
ReplyDeleteफारच छान..
ReplyDeleteअगदी बरोबर
ReplyDeleteव्वा.! खूपच मर्मस्पर्शी लिहिलंय.
ReplyDeleteरूपालीताईला मानाचा मुजरा!
अंतर्मूख करणारी, शब्दांत न मावणारी साधी गोष्ट!
ReplyDeleteसर तुसी ग्रेट हो .ताई तुम्हाला एक जोरात सल्यूट.डोळे पाणावले
Deleteखूपच छान 💐💐
ReplyDeleteरूपालिताईंचे कौतुक शब्दात करणे अवघड आहे. दर्जेदार दिवाळी अंकामागे आणि अंक खमंग,खुसखुशीत होण्यामागे त्यांचाही खारीचा वाटा आहे! अगदी त्यांच्या डब्यासारखा!!
ReplyDeleteकाळाच्या खाणाखुणा ओळखून जी माणसं आपल्यापेक्षा
ReplyDeleteदहा पावलं पुढे चालून भविष्याचा वेध घेतात त्यांना खरोखरच देवत्व प्राप्त झालेले असते असे मी मानतो.
रुपालीताईच्या रुपाने आपल्या बाबतीत हेच घडले.
रुपालीताईस व आपणास मनापासून सलाम.व आपल्या दिवाळी अंकास पुरस्कार मिळाल्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन.
Wadewale Shankar
ReplyDeleteयातून तू, तुझी अडचण उभी राहिली, पण ती सोडवायला जीव धोक्यात घालून उभी राहणारी रूपालीताई पूर्ण उभी नाही राहिली.. तिचं व्यक्तिचित्र व्हायला हवं होतं..
ReplyDeleteअशी निरपेक्ष प्रेम करणारी माणसे मिळणे हेही भाग्यच
ReplyDeleteअतिशय लोभसवाणे व्यक्तिमत्त्व तुम्ही थोड्याच शब्दात उभे केले आहे. जगात चांगली माणसे आहेत याचा अश्या प्रसंगातून विश्वास वाटायला लागतो.
ReplyDeleteअतिशय उत्साही मनमिळावू आणि प्रेमळ असलेले व्यक्तिमत्व... रूपाली देशमुख. जो कोणी त्यांच्या संपर्कात येतो तो कधीही त्यांना विसरत नाही त्यांच्या कार्याचा हा झालेला सत्कार आवडला इतरही बऱ्याच क्षेत्रात त्या कार्यरत असतात त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
ReplyDelete