Thursday, April 16, 2020

कोरोनाच्या लढाईतील देवाचं काम


आपल्या देशाची अखंडता टिकून राहण्यात सगळ्यात मोठा वाटा कशाचा असेल तर तो आहे आपल्या संस्कृतीत आणि माणूस म्हणून असलेल्या चांगुलपणात. आपल्याकडे गरीब-श्रीमंतीची दरी आहे, जात-धर्मातील संघर्ष आहे, प्रथापरंपरांचं जोखड आहे, विविध समूहांच्या टोकदार अस्मिता आहेत, विविध विचारधारांचा झापडबंदपणा आहे. हे सगळं खरं असलं तरी आपल्या श्रद्धा प्रबळ आहेत, आपल्या भावभावना सच्च्या आहेत, इतरांच्या व्यथा-वेदना समजून घेण्याची उपजत वृत्ती आहे. म्हणूनच आपलं चांगुलपण टिकून आहे, देश टिकून आहे, त्यातून मानवता टिकून आहे. आपल्या राष्ट्रावर अनेक आक्रमणे झाली, संघर्ष झाले, नैसर्गिक आपत्ती आल्या, आजारांच्या साथी आल्या. तरीही आपण टिकून आहोत, ठाम आहोत, जगाचं नेतृत्व करण्याची क्षमता बाळगून आहोत. सध्या कोरोनामुळं जगातील प्रत्येकाचा जगण्याचा संघर्ष सुरू असताना माणसामाणसातील अंतर कमी होतंय. 'सोशल डिस्टन्स' राखताना आपण मनानं जवळ येतोय आणि ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. जगभर मोठ्या प्रमाणात जे सकारात्मक प्रयोग सुरू आहेत त्याची सर्वत्र दखल घेतली जात आहेच. भविष्यातही घेतली जाईल. आज आपण आपल्या आजूबाजूला छोट्या स्वरूपात सुरू असलेल्या काही चांगल्या प्रयोगाकडे बघूया. अर्थात हे सगळे विधायक उपक्रम मांडायचे तर एक जाडजूड ग्रंथ होईल पण आपण काही प्रातिनिधिक उदाहरणं बघूया. मानवता जिवंत ठेवणाऱ्या या सगळ्या घटना आपलं मनोधैर्य वाढवायला मदत करतील. 

सध्याच्या परिस्थितीचा विचार करता सरकारी यंत्रणा युद्धपातळीवर सर्वतोपरी मदत करत आहे. सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून अव्याहतपणे कार्यरत असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो' असं म्हणत प्रत्येकाला धीर दिला आहे. शिवथाळीच्या माध्यमातून कोणीही उपाशी राहू नये यासाठी ते प्रयत्नशील आहेत. इतर राज्यातील आपल्याकडं अडकलेल्या कर्मचाऱ्यांची त्यांनी सगळी व्यवस्था केलीय. सातत्यानं जनतेशी संपर्क साधून ते करत असलेल्या कार्याची माहिती देत आहेत. 

आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि मंत्रीमंडळातील सर्वच नेते उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करत आहेत. उद्धवसाहेबांनी या परिस्थितीवर मात करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील निवृत्त अधिकारी, सैनिक, डॉक्टर, नर्स आदींनी या सेवा कार्यात सहभागी होण्याचं आवाहन केलं. त्याला प्रतिसाद देत डोंबिवलीच्या महापौर विनिता माने यांनी एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. विनिताताई पूर्वी नर्स होत्या. सध्या महापौर आहेत. हे पद फक्त मिरवण्यासाठी नसतं तर जनतेची सेवा करण्यासाठी असतं याचं भान त्यांना आहे. त्यामुळं मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांनी महापौरपदाची झुल, सगळा दिखाऊपणा बाजूला सारत डोंबिवली महानगरपालिकेच्या रुग्णालयात नर्स म्हणून कोरोनाग्रस्तांची सेवा सुरू केली आहे. त्यांच्या या मातृहृदयी सेवाकार्याची भविष्यात योग्य ती नोंद नक्की घेतली जाईल.

अशा आपत्तीच्या काळात आपला दातृत्वभाव दाखवत अनेकजण मदतीसाठी पुढे येत आहेत. रतन टाटा यांच्यासारख्या माणसातल्या देवानं थोडेथोडके नव्हे तर तब्बल पंधराशे कोटी रुपये कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी दिले. आपल्या विविध देवस्थानांच्या विरुद्ध अनेकांकडून कायम राळ उडवली जात असली तरी यावेळी बहुतेक तीर्थक्षेत्रांनी यथायोग्य मदतीचा हात पुढं केला. सोलापुरातील आराध्या अजय कडू या दुसरीतील विद्यार्थीनीनं आपला जन्मदिवस साजरा करणं रद्द करून ती मदत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिली. उद्धव ठाकरे यांनी आराध्याचं जाहीर कौतुक करत तिला आशीर्वाद दिले. बीड येथील पाच वर्षाच्या पार्थ पाटील आणि जयदत्त पाटील यांनीही त्यांच्या वाढदिवसाठी जमवलेली रक्कम धनंजय मुंडे यांच्याकडं सुपूर्त केली. या बालचमुंची ही सजगता अनेकांचे डोळे उघडणारी आहे. पुणे महानगरपालिकेचे सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांचा नुकताच 56 वा वाढदिवस झाला. 56 वर्षाच्या आयुष्यातील रोजचा एक रुपया याप्रमाणं त्यांनी 20464 रुपयांचा धनादेश आयुक्तांकडं मदत म्हणून दिला. प्रशांत दामले यांच्यासारख्या कलावंतानं कला क्षेत्रातील अनेक गरजूंना सढळ हातांनी मदत केली. आजूबाजूची अशी असंख्य उदाहरणं पाहता माणुसकीवरील विश्वास दृढ होतो.

घरकोंडीमुळं बाहेर पडणं अवघड झालं आहे. ज्यांचं हातावरचं पोट आहे त्यांना एकवेळचं जेवण मिळणंही कठीण झालंय. अशावेळी मदतीसाठी कोणी पुढं सरकलं नाही तरच नवल.  अनेकांनी अक्षरशः अन्नछत्र उघडल्याप्रमाणं यात योगदान दिलंय. पुण्यातील वंदे मातरम संघटना, सरहद काश्मीरी संघटना आणि गुरू गौतमी मेडिकल रिसर्च सेंटरच्या वतीनं गरजूंना भोजनाची व्यवस्था केली जातेय. श्रमिक वर्गासह परगावातील विद्यार्थ्यांची त्यामुळं मोठी सोय झाली. बुधवार पेठेतील देवदासी भगिनींना अन्नदान करून त्यांनी जो आदर्श निर्माण केला त्याला तोड नाही. सरहद संस्थेच्या संजय नहार यांनी पडद्याआड राहत जे निर्माण केलंय ते पाहता महाराष्ट्रानं त्यांच्याबद्दल कायम कृतज्ञ रहायला हवं.

सोलापूरच्या बाळे भागातील अनेक गरजूंना अन्नधान्याची गरज होती. त्यांच्या चुली बंद पडल्या होत्या. अशावेळी लोणार गल्ली येथील शिवशक्ती बहुउद्देशीय समाजसेवी संस्थेच्या बिज्जू प्रधाने यांनी पुढाकार घेतला. त्यांनी 'एक घास तुम्हालाही' हा उपक्रम राबवत एक हजारहुन अधिक लोकाना मदतीचा हात दिला. भीम नगर, साठे नगर, खडक गल्ली, राहुल नगर, लक्ष्मी नगर, पाटील नगर, चांभार गल्ली येथील कोणीही उपाशी राहू नये यासाठी प्रधाने कुटुंबीय पुढं सरसावलं. नाशिक जिल्ह्यातील एका शेतकरी बांधवानं तर त्याचा एक एकर गहू आसपासच्या गरजू कामगार स्त्रियांना वाटून टाकला. 

हा लेख लिहीत असतानाच साप्ताहिक 'विवेक'च्या रवींद्र गोळे यांची एक पोस्ट वाचण्यात आली. रवीदादांनी रेशनचं धान्य आणलं. इतकं धान्य घरात लागणार नसल्यानं ते गरजूंना द्यायचा त्यांचा विचार होता. 'घाई करू नका' असा सल्ला पत्नीनं दिला. थोड्या वेळात एक परप्रांतीय संडास साफ करण्याचे पैसे न्यायला आला. गोळे वहिनींनी त्याची विचारपूस केली. त्यानं सांगितलं कामही बंद आहे आणि चुलही. ते चार-पाच कर्मचारी एका खोलीत बंद होते. वहिनींनी ते धान्य त्याला देऊन टाकलं. 'भीक आणि भूक यांना धर्म नसतो' असंही त्यांनी सांगितलं. आपण कोणी फार मोठे दाते नाही मात्र माणूस आहोत, अशी भावना त्या व्यक्त करतात. या भावनेवरच तर आपला समाज तग धरून आहे. सरकारी पातळीवर जी मदत केली जातेय, दिली जातेय त्याची नोंद होईल पण सामान्य माणूस अशा पद्धतीनं त्याच्या घासातला घास इतरांना देतोय हे चित्र फार सुखद आहे.

प्रा. डॉ. राजेंद्र थोरात यांचा 'मराठी संस्कृती' हा व्हाट्सऍपचा एक समूह आहे. त्यावर सुधाकर शेलार यांनी सर्वांनी मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करायची संकल्पना मांडली. सुधाकर शेलार, राहुल पाटील, तुषार चांदवडकर, आनंद काटीकर, विजय केसकर अशा सर्वांनी त्यासाठी पुढाकार घेतला आणि बघताबघता 75 हजार रुपये जमा झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं निमित्त साधत हा मदतनिधी कोरोनाच्या लढाईसाठी देण्यात आला. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून ते अनेक संस्था संघटनापर्यंत सर्वजण यावेळीही नेटानं कामाला लागलेत. आपली सरकारी यंत्रणा, आरोग्य यंत्रणा, पोलीस, अन्य सरकारी कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, प्रसारमाध्यमं हे सर्वजण यावेळी जे काम करत आहेत त्यालाच तर 'देवाचं काम' म्हणतात. कोरोनाच्या काळात चांगुलपणावरील श्रद्धा वृद्धिंगत करणारी असंख्य उदाहरणं दिसून आली. त्यातल्या कित्येक घटना काळाच्या ओघात पुढे यायच्या नाहीत पण म्हणून त्यांचं महत्त्वही कमी होणार नाही. या घरकोंडीत माणूस किती हतबल असतो हे जसं दिसून आलं तसंच तो एकमेकांची किती काळजी घेतो हेही दिसून आलं. आपण एकटे नाही, आपल्यासोबत आपला समाज आहे, आपलं सरकार आहे, आपल्यावर प्रेम करणारी, आपली काळजी करणारी माणसं आहेत, इथली भक्कम यंत्रणा आपल्यासोबत आहे हे ठळकपणे अधोरेखित झालं. ही जागतिक समस्या आपल्याला अगतिक करू शकली नाही हे आपल्या राष्ट्राचं यश आहे. भविष्यात आपापल्या क्षेत्रात नव्या जोशात उभं राहण्याचं बळ यातूनच आपल्याला मिळणार आहे. हा एकोपा, हे सामंजस्य टिकून रहावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि शेवटी रमेश गोविंद वैद्य यांच्या चार ओळी सांगून आपला निरोप घेतो.

पाप आणि पुण्य यांचा दूर ठेवा ताजवा
किर्रर अंधारी प्रकाश देण्या पुरेसा एक काजवा
अंतराळी उंच जावो प्रीतीची ही आरती
माणसाने माणसाला ओळखावे आणखी!

-घनश्याम पाटील, पुणे
7057292092

14 comments:

  1. मस्त।
    अडचणीच्या काळात माणसातील माणुसकीचे दर्शन झाले।

    शोधिसी मानवा, राऊळी मंदिरी।
    नांदतो देव हा, आपुल्या अंतरी।।

    ReplyDelete
  2. संकटातच माणुसकी उजळून निघते हेच खरे

    ReplyDelete
  3. निगेटिव्ह बातम्या ऐकून माणुसकी उरली नाहि अस भासत होत. फक्त बोटवर मोजण्याएतक्या बातम्या प्रसिद्ध झाल्या , पण माणुसकीच्या कडेवर देश सुरक्षित आहे हे वाचून बर वाटल.

    ReplyDelete
  4. खरोखरच देवाचं आणि प्रेरणादायी काम!
    साथी हाथ बढाना साथी रे!
    अतिशय सुंदर लेख!अभिनंदन!!

    ReplyDelete
  5. 'कोरोना' ही आपत्ती ठरली, तशीच ती मानवतेला सादही! माणसांमधील लपलेल्या देवांना जागृत करणारी ती एक संधीही झाली. संपूर्ण देशाचा विचार जाऊ द्या, आपल्या राज्यातच असंख्य नागरिकांना उपाशी झोपू न देण्याची जबाबदारी अनेकांनी शिरावर घेतली. अनेक संस्था, व्यक्तींनी रात्रंदिवस सजग राहून समाजातील अशा गरजू व्यक्तींना आवश्यक दैनंदिन सुविधा पुरवल्या. या सर्वांच्या परोपकारी कार्यावर प्रकाश टाकण्याचे व त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्याचे महत्त्वाचे काम तुम्ही या लेखाद्वारे केलेत.त्याबद्दल तुमचे आभार मानतो.💐👌

    ReplyDelete
  6. छान लेख... कोरोनाच्या या संकटात माणुसकीचा हा झरा सर्वत्र वाहतांना दिसतोय.

    ReplyDelete
  7. छान लेख .
    बाळा पवार संगमनेर।

    ReplyDelete
  8. प्रेरक लेख, आपणही कोरोनासाठी काहीतरी करायला हवं अशी ऊर्जा हा लेख वाचल्यावर तयार झाली आहे, मस्त

    ReplyDelete
  9. माणुसकीचे दर्शन खूपच छान।सकारात्मक लेख।मानसिक बळ देणारा।
    भारतीय असल्याचा अभिमान वाटतोय।

    ReplyDelete
  10. अप्रतिम... लेख वाचून माणुसकीच दर्शन झालं...देणाऱ्याने देत जावे , घेणाऱ्याने घेत जावे...घेता घेता एक दिवस , देणाऱ्याचे हात घ्यावे...

    ReplyDelete
  11. अतिशय उत्कृष्ट.शब्दाच्या पलीकडे.धन्यवाद

    ReplyDelete
  12. समाजातील देवमंडळींची चांगली ओळख करुन देण्याचे मोठे काम तुम्ही केले. आपल्या धर्मात तेहतीस कोटी देव आहेत म्हणतात त्याचा प्रत्यय आता येत आहे. सर्व देवमंडळींना त्रिवार प्रणाम !!!

    ReplyDelete
  13. चांगल्याला चांगलं म्हणणं हे चांगल्या मनाचं लक्षण आहे.. सुंदर लेख..👌👌 संकटाच्या कळताच माणसाच्या माणुसकीचा कस लागत असतो..

    ReplyDelete