Friday, April 17, 2020

चोर सोडून संन्याशाला फाशी



'अफवा पसरवू नका' असं सातत्यानं सांगणाऱ्या एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या पत्रकार राहुल कुलकर्णी यांना अफवा पसरविण्याच्याच आरोपावरून अटक झाली. त्यानंतर त्यांची जामीनावर सुटका झाली असली तरी 'सगळ्यात मोठी बातमी,' 'ब्रेकिंग न्यूज,' 'सर्वप्रथम आम्ही,' 'सबसे तेज' अशा टॅगलाईन देत स्वतःची विश्वासार्हता धोक्यात आणणाऱ्या दृकश्राव्य माध्यमांना ही सणसणीत चपराक आहे. 

राहुल कुलकर्णी यांना उस्मानाबाद येथून अंगावरच्या कपड्यावर उचलण्यात आलं. त्यावेळी त्यांना त्यांची औषधंही सोबत घेऊ देण्यात आली नाहीत असा दावा त्यांच्या पत्नीनं केलाय. कोरोनासारख्या आजाराच्या विळख्यातून बाहेर पडण्याचे आपले सर्वांचे जोरदार प्रयत्न सुरू असतानाच राहुल यांना उस्मानाबाद येथून मुंबईत आणण्यात आलं. त्यांनी दिलेली बातमी चूक की बरोबर? त्याचा कितपत परिणाम झाला याची  चर्चा होऊ शकते. मात्र एखाद्या पत्रकाराला अशाप्रकारे जेव्हा अटक केली जाते तेव्हा संपूर्ण यंत्रणाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभी राहते. कायद्याच्या कामात अडथळे न आणणं हे प्रत्येक सुशिक्षित माणसाचं कर्तव्य असतं. त्यामुळं राहुल हे स्वतःदेखील तपासयंत्रणांना सहकार्यच करतील पण यानिमित्त कुण्याही विचारी माणसाला काही प्रश्न स्वाभाविकपणे पडतात आणि त्याची चर्चाही व्हायलाच हवी. 

रेल्वेच्या एका अंतर्गत पत्राचा हवाला देत राहुल यांनी गाड्या सुरू होण्याबाबतची बातमी दिली होती. त्यानंतर दोनच तासांनी अशा कोणत्याही गाड्या सुरू होणार नसल्याची दुसरी बातमी त्यांनी दिली आणि ती दिवसभर  चालवली. एका मराठी वाहिनीवरील ही बातमी पाहून जवळपास तीन हजार अमराठी परप्रांतीय बांद्रा स्टेशनवर आल्याचं सांगण्यात आलं. संचारबंदीच्या काळात हे तीन हजार लोक बाहेर पडले कसे आणि एकत्र जमले कसे हेही पाहावं लागेल. राहुल यांना तातडीनं अटक करणारे त्यांच्यावर कोणती कारवाई करतील हेही स्पष्ट होईलच. मुख्य म्हणजे 'राहुल यांची बातमी काहीही चुकीची नव्हती' असा निर्वाळा संजय राऊत यांनी त्यांच्या अग्रलेखातून दिलाय. ज्या वृत्तपत्रासाठी ते अग्रलेख लिहितात त्या 'सामना'च्या संपादक मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मीताई ठाकरे आहेत. 'इतकी वर्षे पत्रकारितेत उगीच झक मारली असे वाटू लागले आहे' इतक्या स्पष्ट शब्दात राऊत यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यामुळं या प्रकरणात 'चोर सोडून संन्याशाला फाशी' अशातला प्रकार असल्याचं सांगितलं जातं.

'बाहेर गर्दी करू नका, जसे आहात तसेच घरात रहा' असं आवाहन सातत्यानं करण्यात येतंय. कोरोनाविरुद्धच्या लढाईतलं हे एक महत्त्वाचं पाऊल आहे. मात्र तरीही अनेकजण 'मला काय होतंय?' या अहंकारात बाहेर गर्दी करत आहेत. पोलिसांनी त्यांना प्रसाद देऊनही अनेकांत सुधारणा होत नाही. त्यामुळं सामाजिक आरोग्याचा विचार करून काही कठोर पावलं उचलावी लागतात. या सगळ्यात प्रसारमाध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. खरा कळीचा मुद्दा इथूनच सुरू झाला. मुद्रित माध्यमं आणि दृकश्राव्य माध्यमं यांच्यातली धुसफूस नवी नाही. निखिल वागळे यांच्यासारख्या काहींनी अत्यंत आक्रस्ताळेपणा करत, आरडाओरडा करत, अगदी समोरच्या व्यक्तीच्या तावातावानं अंगावर जात कार्यक्रम करण्याची कुप्रथा पाडली. त्यातून अल्पावधीतच या माध्यमाची विश्वासार्हता संपुष्टात आली. अनेकांनी अशा चर्चा पाहणं बंद केलं. काहींच्या तो फक्त मनोरंजनाचा विषय राहिला. दुसरीकडं मुद्रित माध्यमांची विश्वासार्हता यांच्या तुलनेत टिकून आहे. या परिस्थितीत राहुल कुलकर्णी यांनी सर्वप्रथम 'वृत्तपत्राच्या कागदातून कोरोना पसरतो' अशी अफवा पसरविल्याचं सांगितलं जातं. त्यामुळं अनेक वृत्तपत्रं बंद करावी लागली. विक्रेत्यांच्या मनात भीती निर्माण झाल्यानं त्यांनी ती विकण्यास नकार दिला आणि अनेक वृत्तपत्र बंद ठेवावी लागली. यात कित्येकांच्या पोटावर पाय पडला. बंद पडलेले छापखाने पुन्हा सुरू करताना ती यंत्रंही मोठा खर्च काढणार आहेत आणि हा सगळा एका 'फेक न्यूज'चा प्रताप आहे.

काही गोष्टी खटकत असूनही खरंतर राहुल कुलकर्णी यांच्याविषयी मला नेहमी अभिमान वाटतो. पुण्या-मुंबईचा पत्रकारितेचा केंद्रबिंदू त्यांनी ग्रामीण महाराष्ट्राकडं, प्रामुख्यानं मराठवाड्याकडं वळवला. पूर्वी व्यंकटेश चपळगावकर हेही याच वाहिनीसाठी अशीच मेहनत घ्यायचे. शरद पवार माढ्यातून निवडणूक लढवत होते तेव्हा त्यांच्या वार्तांकनाला जाताना चपळगावकर यांचा अपघात झाला आणि दुर्देवानं ते त्यातच गेले. त्यांच्यानंतरचा आश्वासक चेहरा म्हणून राहुल यांच्याकडं पाहता येईल. अतिशय मोकळ्याढाकळ्या शैलीत पण अभ्यासूपणे ते ज्याप्रमाणं प्रत्येकाला भिडतात ते पाहता त्यांचं कौतुकच वाटतं. एबीपी माझाला 'बीजेपी माझा' म्हणणं किंवा राजीव खांडेकरांना 'पवारांचे हस्तक' ठरवणं म्हणूनच हे या वाहिनीसाठी अन्यायकारक होईल. राहुल यांच्यासारखे अनेकजण दिवसरात्र एक करत प्रचंड कष्ट उपसत असतात म्हणून ढिम्म व्यवस्था हलत असते. मग राहूल यांना नेमकी अटक का झाली याचाही विचार करायला हवा. 

'गंगाधर ही शक्तिमान था' हे आत्ता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगण्याची वेळ नाही. तरीही त्यांच्यासोबतचे नेते त्यांच्या पाठीत कधीही खंजीर खुपसू शकतात. 'रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा' असं उद्धव ठाकरे यांचं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे. मात्र याच गाण्यातली 'गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा' ही पुढची ओळ त्यांनी लक्षात ठेवायला हवी. मुळातच कलावंत असल्यानं कसलेही छक्केपंजे ते करत नाहीत, खोटेपणा त्यांना चालत नाही, मात्र आजचं राजकारण याच्याच पायावर उभं आहे. त्यामुळं राहुल कुलकर्णी हे फक्त निमित्त असलं तरी या प्रकरणाच्या मुळाशी त्यांनी जायलाच हवं. 

वाधवान कुटुंबीयांचा भंडाफोड राहुल यांनी केला आणि गृहमंत्री अनिल देशमुख अडचणीत आले. गृहनिर्माण मंत्री असलेल्या जितेंद्र आव्हाड यांनी अनंत करमुसे या तरुणाला आपल्या बंगल्यावर बोलवून घेऊन त्यांच्या टग्याकरवी त्याला मारहाण केली. सत्तेची नशा चढल्यानंतर नेते कसे रंग बदलतात हे अशा प्रकरणातून दिसून येतं. राहुल यांच्यासारखे पत्रकार हे सगळं आक्रमकपणे मांडत होते आणि या सगळ्या प्रकारांकडून लक्ष वळवण्यासाठी त्यांना अटक करण्यात आल्याचं बोललं जातं. सरकार किती कडक भूमिका घेते हेही यातून दाखवण्याचा प्रयत्न असू शकतो.

प्रसारमाध्यमं अनेक गोष्टीत आततायीपणा करतात हे तर खरंच. अगदी छोट्या गोष्टीही ते 'आत्ताची सर्वात मोठी बातमी' असं किंचाळत परत परत सांगत असतात. या बातम्या ज्यांच्याकडून मिळतात ती साधनंही अनेकदा दुय्यम असतात. त्यातून भलेभले आयुष्यातून उठल्याची उदाहरणंही आहेत. कसलीच खातरजमा न करता अशा ज्या बातम्या दिल्या जातात त्यामुळं अनेकांचं मोठं नुकसान होतं. 

या अनुषंगानं माझ्याबाबत नुकताच घडलेला एक अनुभव नोंदवावासा वाटतो. 8 फेब्रुवारी 2020 रोजी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मी आणि ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्यानं एक तक्रार दिली. तक्रारकर्त्यानं त्या तक्रार अर्जावर 'तातडीचे आणि गोपनीय' असं स्पष्ट लिहिलं होतं. मात्र काही मिनिटातच सर्व वाहिन्यांवर याची ब्रेकिंग न्यूज झाली. 'पुण्यात पत्रकाराविरुद्ध गुन्हा' म्हणून त्याचा विपर्यास केला गेला. 

त्यावेळी मी माझ्या सहकाऱ्यासोबत एका प्रकल्पावर काम करत बसलो होतो आणि ही बातमी येऊन धडकली. सगळ्यांचे अचानक फोन सुरू झाल्यानं आम्ही बातमी बघितली आणि हसावं की रडावं तेच कळत नव्हतं. 'ठाकरे सरकार उलथवून लावायचा प्रयत्न आणि शरद पवार यांच्या हत्येचा कट' असा गंभीर आरोप आमच्याविरुद्ध होता. गंमत म्हणजे एकाही वाहिनीनं याबाबत आमची प्रतिक्रिया न घेता हल्लाबोल केला. त्यानंतर माझ्या आणि भाऊंच्या मागं पोलिसांचा ससेमिरा लागला. आम्ही दोघंही त्याला धाडसानं सामोरे गेलो. या प्रकरणात काहीच दम नाही, हे ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यापासून अनेकांनी आम्हाला सांगितलं. खूप चौकशी करून पोलीस अधिकारी थकले आणि त्यांनीही सांगितलं की, "केवळ व्यवस्थेचा रेटा म्हणून आम्हाला तपास करावा लागतोय. यात तुमची काहीच चूक दिसत नाही मात्र लोकशाहीत पोलीस सत्ताधाऱ्यांचा गुलाम असतो..."

त्यांच्या गुलामीमुळं आमचा वेळ गेला, मनस्ताप झाला आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे यंत्रणा वेठीस धरली गेली. हे सगळं त्या एका तक्रारीमुळं झालं नाही तर एका फडतूस तक्रार अर्जावरून दृकश्राव्य माध्यमांनी ज्या बातम्या चालवल्या त्यामुळं झालं. या प्रकरणात आम्ही निर्दोष आहोत असा अहवाल पोलिसांनी देऊनही याची बातमी मात्र कोणीच केली नाही. उलट मला आणि भाऊंना जीवे मारण्याच्या जाहीर धमक्या आल्या. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर राहुल कुलकर्णी यांना अटक हा फक्त राजकारणाचा फार्स बनून राहतो. 

राहुल चूक की बरोबर हे आपली न्यायव्यवस्था ठरवेल. त्यांची बरी-वाईट शैली लक्षात घेतली तरी एका पत्रकारावर अन्याय होऊ नये असंच मला वाटतं. दिल्लीत उत्तरप्रदेशचे लाखो कामगार रस्त्यावर आले होते. त्यावेळी अरविंद केजरीवाल आणि योगी आदित्यनाथ यांच्यासारखे विळ्याभोपळ्याचे सख्य असलेले दोन मुख्यमंत्री एकत्र आले. योगी यांनी युपीवरून एक हजार बस दिल्लीला पाठवल्या आणि या लोकाना परत आणले. केजरीवाल यांच्या मदतीनं उरलेल्यांची व्यवस्था तिथंच केली. हे आपल्या सत्ताधाऱ्यांना जमलं नाही. त्यामुळं असं सगळं नैराश्य बाहेर पडत आहे. 

जे झालं ते झालं. राहुल यांच्या बातमीचा परिणाम कितपत झाला, बांद्रा येथून युपीला गाडी नसताना सगळे तिथं का जमले? नेमके एका मस्जिदीपुढं ते एकत्र आले असं सांगितलं जातंय ते खरं आहे का? असल्यास त्याची कारणं कोणती? एकत्र येण्याचे संकेत कोणते? उद्धव ठाकरे यांच्यासोबतचे कुणी गद्दार सहकारी यात आहेत का? हे प्रशासनाचं अपयश आहे का? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं समोर येतीलच पण यापुढं तरी दृकश्राव्य माध्यमांनी सावध होणं गरजेचं आहे. 'हातात बुम आला म्हणून आपण न्यायाधीश होत नाही' इतकं जरी या पत्रकारांना कळलं तरी सध्या पुरेसं आहे.
-घनश्याम पाटील, पुणे
7057292092

17 comments:

  1. अत्यंत विवेकीपणे आपण मांडणी केली आहे.दृकश्राव्य माध्यमांच्या आक्रस्ताळेपणात आपण केलेली चिकित्सक मांडणी सा-यांनाच विचार करावयास लावणारी आहे.

    ReplyDelete
  2. वृत्त वाहिनी दुधारी अस्त्र आहे. "ब्रेकींग न्युज आणि सर्व प्रथम आम्ही बातमी दिली" या स्पर्धेत वृत्त वाहिनी बर्याच वेळा चुकीची माहिती देतात. त्याचा सामान्य लोकांना त्रास होतो. २० दिवसापूर्वी गोव्यात ३५ कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याची ब्रेकिंग न्युज एका वृत्त वाहिनीने देऊन खळबळ उडवून दिली होती. प्रत्यक्षात येथे आजही ७ रूग्ण आहेत. "सर्व प्रथम आमच्या न्युज चेनलवर" या ध्यासाने टीआरपी वाढविण्यासाठी वाट्टेल ती बातमी थोपवली गेली तर विश्वास राहणार कसा?
    या लेखाद्वारे मात्र घनश्याम ने दोन्ही बाजू विचारपूर्वक मांडल्या आहेत. हा समतोलपणा पत्रकारांवरील विश्वास वाढवतो. खूप छान लेख.

    ReplyDelete
  3. चिकित्सक मांडणी

    ReplyDelete
  4. Ha prakar Mhanje vadyache tel vangyavar kadhnyacha aahe.... Very balanced analysis

    ReplyDelete
  5. अगदी समतोल मांडणी.

    ReplyDelete
  6. Reasonable and balanced statement. However I have my own reservations about Rahul Kulkarni. He is equally antiHindu Hindu.

    ReplyDelete
  7. राहुल कुलकर्णी यांच्या पहिल्या बातमीमुळे गर्दी जमली असेल तर त्यानंतर दिवसभर गाडी न सोडण्याची बातमी कोणीच पाहिली नसेल काय?

    ReplyDelete
  8. त्या स्वयंघोषित उ भा नेत्याचा या प्रकरणात मोठा रोल असू शकतो.. राहुल कुलकर्णी शांत संयमित पत्रकारिता करणारा पत्रकार आहे..

    ReplyDelete
  9. त्या स्वयंघोषित उ भा नेत्याचा या प्रकरणात मोठा रोल असू शकतो.. राहुल कुलकर्णी शांत संयमित पत्रकारिता करणारा पत्रकार आहे..

    ReplyDelete
  10. फारच सुंदर लेख ...मित्रा
    किती संयमाने मांडलाय विषय
    आपल्यातला संपादक आणि त्याचे कसब स्पष्ट जाणवते

    ReplyDelete
  11. सडेतोड लेखन,
    अतिशय मुद्देसूद मांडलंय!

    ReplyDelete
  12. राहुल कुलकर्णी व राजीव खांडेकर यांचा न्याय न्यायालय करेनच! सदर बातमी मी पाहिली असून Abp maza प्रथमदर्शनी दोषी असल्याचे दिसून येते.

    ReplyDelete
  13. hello sir.rahul sir is great person,but not all time right in jernalist and electronic news media.

    ReplyDelete
  14. तुम्ही नाण्याच्या दोन्ही बाजू समोर आणल्या.

    ReplyDelete