Monday, July 17, 2017

भय इथले संपत नाही!



आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि प्रगतीची दारे सर्वांसाठी खुली झाली. ज्या स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, या लढ्यात जे हुतात्मे ठरले, त्यांनी राष्ट्रहिताचे जे स्वप्न बघितले, ते पूर्ण होईल असेच सर्वांना वाटते. मात्र आमच्या राज्यकर्त्यांनी हा विश्वास खोटा ठरवला. पारतंत्र्याच्या बेड्या निखळून पडल्या असल्या तरी आम्ही आज पूर्णपणे गुलाम आहोत. ‘भय इथले संपत नाही’ हे वास्तव कोण नाकारणार? 

जहाल आणि मवाळ गटाच्या देशवासीयांनी ब्रिटिश राजवट उलथवून लावली. अनंत अडचणींचा सामना करत, प्रचंड हालअपेष्ठा सहन करत इंग्रजांना हुसकावूल लावले. 15 ऑगष्ट 1947 ला ‘युनियन जॅक’ उतरवला गेला आणि लाल किल्ल्यावर तिरंगा ध्वज डौलाने फडकू लागला. तेव्हा आम्हाला मुक्त झाल्यासारखे वाटले; मात्र आजची देशाची परिस्थिती पाहता वाटते की, ती तर फक्त ‘जामिनावर’ची सुटका होती. आजही आम्ही खितपतच पडलोय. राज्यकर्ते कोणीही असले तरी या जुलूमात भरडला जातोय तो सामान्य माणूसच!  
  
स्वातंत्र्याची प्रौढी मिरवताना आजही आमच्या देशात शिक्षितांपेक्षा अशिक्षितांचेच प्रमाण मोठे आहे. पूर्वी दरोडे पडायचे, लुटालूट व्हायची;  पण आजच्या राजकारण्यांची संघटित गुन्हेगारांची जी टोळी आहे त्यापेक्षा ते क्रौर्य नक्कीच कमी होते. पूर्वी गुरूकुल शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून गुरू शिष्य परंपरा जपत शिष्यांचा सर्वांगीण विकास घडायचा. आज ‘डोनेशन’च्या नावावर लाखो रूपये देऊनही फक्त यंत्रवत विद्यार्थी तयार होत आहेत. एखाद्या विषयाचा अभ्यास करून नोकरी-व्यवसायाच्या शोधात वणवण भटकत आहेत. दूरचित्रवाणी वाहिन्यांनी तर अक्षरशः जीवनच बेसूर करून टाकलेय, अन्नाचे ढीग उभारलेत, मात्र ते बेचव आहेत. अंगप्रदर्शन करतानाच इतके किळसवाणे प्रकार पहावे लागतात की, स्वतःचीच स्वतःला लाज वाटावी. आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट, प्रत्येक भावना चव्हाट्यावर आणून त्याचा बाजार मांडताना कोणालाच वैषम्य वाटत नाही. प्रभू श्रीरामचंद्र आणि सीतामाईंचा वारसा सांगणार्‍या देशात ‘आपले किती बॉयफ्रेंड आहेत’ हे मोठ्या चवीने सांगणार्‍या युवती पाहून आश्‍चर्य वाटते.

देव-धर्म, नीती-अनीति, चांगले-वाईट या व अशा गोष्टी मान्य करू नकात! कोणत्याही धर्मग्रंथाविषयी, साधू-संतांविषयी, देव या संकल्पनेविषयी आदर बाळगू नकात; पण एक ‘चांगला माणूस’ म्हणून जगण्याचे सौजन्य तरी तुम्ही दाखवणार की नाही? 

व्यभिचारामुळे अनेक गंभीर रोग जडताहेत. सत्ता आणि संपत्तीच्या हव्यासापायी मानसिक स्वास्थ्य हरवतेय. व्यसनाच्या आहारी जाऊन आयुष्याची राखरांगोळी होतेय. खोटे बोलून, विश्वासघात करून सुखाची झोप हरवतेय. मग हे सारे करायचे कशासाठी? आपल्या हव्यासापोटी होणारे अधःपतन आपल्याच डोळ्यांनी आपण बघायचे का?
  
लोकशाही व्यवस्थेने आपल्याला स्वातंत्र्य दिले असेलही; पण पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण करताना आपण आपले ‘स्वत्व’ विसरतोय. मेंढ्याच्या कळपात राहून सिंहसुद्धा मेंढपाळाच्या मागे गुमाने जातोय.
अद्भूत कलाकौशल्य आणि अफाट सामर्थ्य असलेली आजची तरूणाई भरकटतेय का? क्षणिक मोहापायी अक्कल गहाण ठेवणार्‍यांचा हा देश नाही. या राष्ट्रात संस्कृतीचा पाया भक्कम आहे. मग वाढती गुन्हेगारी, भ्रष्टाचार, महागाई यामुळे आम्ही का त्रासलोय? एखाद्या उघड्या नागड्या बाईने मदमस्त ठुमके घ्यावेत यासाठी संबंधित घटक कोट्यवधी रूपये मोजत आहेत आणि आमच्या खिशातून त्याची वसुलीही करत आहेत. 

आपल्या देशात अपघातात मरणार्‍या तरूणांची संख्या पाहून भल्या-भल्यांना भोवळ येईल. मनाने कमजोर होत चाललेले तरूण आत्महत्येचा पर्याय का स्वीकारतात? हे अपयश कुणाचे? याची नैतिक जबाबदारी कुणी स्वीकारेल किंवा स्वीकारणार नाही! मात्र आपले काय? ही अराजकता, हे भय पाहून आपल्या धमन्यातील रक्त का उसळत नाही? 

जागतिकीकरणाच्या रेट्यात एकीकडे सर्व आधुनिक साधने, सोयी-सुविधा, प्रगत तंत्रज्ञान, माहितीचे जाळे आपल्यासाठी खुले झाले आहे; तर दुसरीकडे याच सर्व गोष्टींच्या दुष्परिणामामुळे आम्ही खिळखिळे होत चाललोय. आजच्या परिस्थितीत सत्यवादी राजा हरिश्चंद्र नसेलही; पण म्हणून आम्ही आमचे चांगुलपण का सोडावे? जग जिंकण्याची उमेद आणि तितकी क्षमता असणारे आमच्याकडे कमी का आहेत?

व्यापारी मनोवृत्तीच्या राजकारणी दलालांकडे दुर्लक्ष करून आपण आपली गुणवत्ता सिद्ध करावी. श्रमाला प्रतिष्ठा मिळवून द्यावी. जे चांगले आहे ते स्वीकारावे आणि जे चुकीचे आहे ते धिक्कारावे. ब्रिटिश लोक म्हणतात की, ‘‘एकवेळ आमच्या शत्रूला आम्ही आमचे साम्राज्य देऊ पण आमचा विल्यम शेक्सपिअर आणि आमचे क्रिकेट आमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही.’’ 

ज्यांनी आपल्यावर दीडशेहून अधिक वर्षे राज्य केले त्यांच्या या विचारधारेचा अभ्यास करावा. आपल्या मातीतले खेळ, आपल्या मातीतले कलाकार यांना सन्मान द्यावा. प्रत्येक गोष्टीचा सारासार विचार करून काय चांगले आणि काय वाईट ते ठरवावे. ‘भय इथले संपत नाही’ असे म्हणण्यास कोणीही धजावणार नाही, असे राष्ट्र निर्माण करण्याचा संकल्प आपण करूयात. या संकल्पसिद्धीसाठी लागणारे मूलतत्त्व आपल्या संस्कृतीत ठासून भरले आहे, हे आपणास थोड्याशा अभ्यासानेही लक्षात येईल.

परवाच पुण्यासारख्या सांस्कृतिक नगरीतील एक बातमी वाचली. धर्मा लोखंडे आणि शीतल लोखंडे हे एक अंध दाम्पत्य. तीन वर्षापूर्वी त्यांना एक गोंडस मुलगी झाली. ती डोळस आहे. मात्र समाजातील अंधपणा त्या निष्पाप जिवाने अजून बघितला नाही. तिचे नाव समृद्धी! या अंध दाम्पत्याच्या या पोटी ‘समृद्धी’ आल्याने आपल्या ‘भिकार’ समाजाचे रूप पुन्हा एकदा उघडे पडले. कोणीतरी लोखंडे कुटुंबियांचा एक फोटो काढला. त्याखाली मजकूर टाकला की, ‘समृद्धी ही लहान मुलगी पिंपरीमधील अजमेरा वसाहत येथे दिसली आहे. मात्र ज्या दाम्पत्याकडे ही मुलगी आहे ते म्हणतात की, मुलगी आमची आहे. ही गोष्ट पटण्यासारखी नाही. हा फोटो इतर ग्रुपमध्ये पाठवा. काय माहीत, कोणाची चिमुरडी असेल त्यांना पुन्हा भेटेल...’

हा संदेश आणि फोटो महाराष्ट्रभर वायू वेगाने पोहोचला. त्यामुळे या अंध दाम्पत्याला प्रचंड त्रास सहन करावा लागला. जिथे जिथे हे अंध जोडपे दिसेल तिथे तिथे लोकानी यांना सळो की पळो करून सोडले. त्यांचे जगणे कठीण केले. त्यांचे कळकट मळकट कपडे बघून त्यांच्यावर संशय घेतला जातो. ही त्यांचीच मुलगी आहे हे त्यांना सिद्ध करत बसावे लागते. धर्माची आई, त्यांचे शेजारी सर्वजण त्यांची करूण कहाणी सांगतात, मात्र त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही. ही आपल्या समाजाची शोकांतिका! 

जगण्या मरण्याशी संबधित असंख्य विषय असताना आपण अशा गोष्टींचे भांडवल करतो. गोरगरीबांना अकारण छळतो. ही मानसिकता अजूनही जात नाही हे केवढे मोठे दुभार्र्ग्य! इतके सारे असूनही आपल्या गोष्टी मात्र महासत्तेच्या! अशाने आपला देश कसा महासत्ता होईल? 

देश स्वातंत्र्य होऊन इतकी वर्षे झाली तरीही आपल्याला अजूनही अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांसाठी संघर्ष करावा लागतो. रस्ते, वीज आणि पाणी या समस्या अजूनही सुटत नाहीत. शैक्षणिक क्रांती घडूनही बेरोजगारीचा प्रश्न सुटत नाही. खाकी आणि खादीच्या अनेक ‘प्रतापांमुळे’ अजूनही गुन्हेगारी आटोक्यात येत नाही. उलट हे सारे काही वाढतच चाललेय. एकीकडे शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचे दुर्दैवी सत्र सुरूच आहे. दुसरीकडे राजकारणी नावाची जमात त्यांच्यावर कायम अन्यायच करतेय. वर ‘लोककल्याणकारी’ राज्य कसे आहे याचाही डांगोरा पिटला जातो. त्याहून वाईट समाजाच्याच एका घटकाचे वाटते. त्याची याला कसलीच खंत वाटत नाही. एक असा मोठा वर्ग आहे की त्याने कधीच शेतीत पाऊल टाकले नाही. शिक्षण संपवून नोकरीला लागलेल्या एका पिढीला अजूनही गाय दूध कशी देते, पेरणी कशी केली जाते, नांगरणी-कोळपणी हे काय प्रकार आहेत, गहू-ज्वारीचे पिक कसे येते, भात लागवड कशी केली जाते या कशाचाच गंध नाही. रानात धारं धरणे काय असते हे त्यांना  पुस्तकात वाचूनही माहीत नाही. त्यांची नाळ इथल्या मातीशी कशी जोडली जाणार? त्यांना फक्त उत्तम शिक्षण घेणे आणि सर्व सुखे उपभोगणे हेच माहीत. गलेलठ्ठ पगाराची नोकरी करावी, दारात परदेशी बनावटीची गाडी असावी, एखादी गोरी-गोमटी पोरगी आयुष्यात यावी इतकीच त्यांची स्वप्ने आहेत. बाकी कशाशीही त्यांना देणेघेणे नाही. 
म्हणूनच भय इथले संपत नाही! 

हे भय जोपर्यंत संपणार नाही, आपण निर्भय होणार नाही, इतरांच्या सुख-दुःखाचा विचार करणार नाही, ‘मला काय त्याचे’ ही वृत्ती सोडून सामान्यांच्या सहवेदना अनुभवणार नाही तोपर्यंत आपण ‘माणूस’ म्हणवून घेण्यास नालायक आहोत. तसेही, या जनावरांच्या बाजारात श्वापदांची कमतरता कधी नव्हतीच मुळी!

- घनश्याम पाटील, पुणे
7057292092

13 comments:

  1. विकृत मनोवृत्ती वाढत चाललीय!

    ReplyDelete
  2. समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा लेख . स्वातंत्र्य मिळाले म्हणजे स्वैराचाराचा परवाना मिळाला असे वाटू लागलेय . स्वातंत्र्य मिळाले पण सत्तर वर्षात आम्ही राष्ट्रीय चारित्र्य घडवू शकलो नाही ही खरी शोकांतिका आहे. ब्रिटीशांनी दीडशे वर्षात या देशातील संपत्तीची जेवढी लूट केली असेल त्याहून कितीतरी जास्त आमच्या सर्वपक्षीय नेत्यांनी फक्त गेल्या सत्तर वर्षात करून दाखवली आहे . अर्थात त्यांना तरी दोष का द्यावा ? भ्रष्ट अन् रोगट मनोवृत्ती जर समाजाच्या हाडीमासी खिळली असेल राज्यकर्ते तिला अपवाद का ठरावेत ? यथा प्रजा तथा राजा हेच लोकशाहीचे कटू असले तरी वास्तव आहेच . म्हणजे बदल व्हायला हवा तो तळापासून. पण तो कोण आणि कसा घडवणार हाच आजच्या घडीचा यक्षप्रश्न आहे |

    ReplyDelete
  3. हृदयद्रावक आणि मन सून्न करणारी घटना...

    ReplyDelete
  4. सामाजिक विकृती वाढत चालली आहे,त्याला जबाबदार ही शिक्षण पद्धती आहे...नीतीमूल्य,जीवनविकास, राष्ट्रप्रेम,धर्म,मानवता ह्या गोष्टीवर श्रद्धा आणि प्रेम व विश्वास निर्माण करणारे शिक्षण द्यायला हवे...

    ReplyDelete
  5. धोका प्रतिक्रियावादांचा हा आपलाच लेख होता तीच योग्य चपराक आहे, खातरजमा न करता ,खिशाला झळ न पोचता समाज सेवा करण्याच्या नादात अशा पोस्ट टाकल्या जातात, चांगलं लिहिलंय तुम्ही

    ReplyDelete
  6. मन विषण्ण करणारा हा लेख आपल्या समजतील अपप्रवृत्तीचा लेखाजोखाच मांडला आहे तुम्हीं सर. लेखणीची ताकद दाखवून दिलीत सर. नक्कीच अशा लिखाणामुळे समाज जागृती होवून क्रांती होऊ शकते ह्यावर माझा तरी विश्वास आहे.

    ReplyDelete
  7. जे जागे आहेत त्यांना ऊठवता येईल पण झोपेचे सोंग घेणाऱ्यांना ऊठवणे तसे महामुश्कीलच .समोर जे चालले आहे ते पाहूणही बघ्यांची भूमिका वाढत चालली आहे . सद्याचे युग गांधारी युग आहे .

    ReplyDelete
  8. अनेक लेखांचा विषय एका लेखात उभा राहिला आहे. चपराक वृत्त समूहाच्या विचारांचा आणि ध्येयाचा गाभा म्हणजे हा लेख आहे. झोपलेल्यांना जाग करणारा, लेखणी चालवणार्यांना लढण्यासाठी बळ देणारा हा लेख आहे. आज देशात, समाजात काय चालले आहे याचा आरसा दाखवणारा हा लेख वेळोवेळी वाचनात ठेवावा असा झाला आहे.

    ReplyDelete
  9. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  10. फारच मर्मावर बोट ठेवले सर आपण या लेखात. कधी कधी असं वाटतं ह्या अशा लोकांना सुशिक्षित म्हणावं तरी कसं.....

    ReplyDelete
  11. अडाण्यांचा बाजार ...

    ReplyDelete
  12. छान लेख आहे

    ReplyDelete
  13. छान लेख आहे

    ReplyDelete