Saturday, July 16, 2016

शंभरीच्या तरूणाची लेखनगाथा

‘वय देहाला असतं मनाला नाही. मनानं तरूण असणारी माणसं कधीच वृद्ध होत नाहीत. जीवन सुरेल आहे, आपल्याला ते सुरात गाता आलं पाहिजे. जग सुंदर आहे, डोळ्यात जीव ओतून ते पाहता आलं पाहिजे. नाविन्याच्या खिडक्या उघड्या ठेवून जगत गेलं की जगण्याचं कधी ओझ होतं नाही...’
असं कोण म्हणतयं? तर वयाच्या शंभरीच्या उंबरठ्यावर असलेले दुर्गानंद गायतोंडे! कोण हे गायतोंडे? तर ते लेखक आहेत. 29 मार्च 1919 चा त्यांचा जन्म. जन्मस्थळ हुबळी. कराची आणि मुंबईतून त्यांनी एम. ए., एल. एल. बी. केलं. केंद्र सरकारमध्ये वरिष्ठ पदावर नोकरी केली. ब्रिटिश, डच आणि अमेरिका येथील आंतरराष्ट्रीय कंपन्यात  बर्‍याच वरच्या हुद्यावर त्यांनी नोकरी केली. त्यानिमित्त नागपूर, सिमला, दिल्ली, मुंबई, कोलकत्ता आणि दुर्गापूर येथे त्यांचे वास्तव्य होते. 1980 ला ते निवृत्त झाले. निवृत्तीनंतर शांत बसतील ते गायतोंडे कसले. त्यांनी देशातल्या अनेक कंपन्यात व्यवस्थापक आणि कामगारांसाठी कार्यशाळा घेतल्या. त्याकाळात त्यांनी अनेक इंग्रजी पुस्तके लिहिली. वयाच्या नव्वदीनंतर त्यांना मराठी पुस्तके लिहिण्याची प्रेरणा झाली. मग त्यांनी लेखन, समाजकार्य, गरीब विद्यार्थ्यांना शिकवण आणि आर्थिक मदत, अध्यात्म क्षेत्रात संशोधन चालू ठेवले. या आदर्श कर्मयोग्याची वयाच्या नव्वदीनंतर मराठीतील चौदा पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
विषयांची विविधता, अभ्यासपूर्ण लेखन आणि थेट भिडणारी भाषा हे त्यांच्या लेखनाचे वेगळेपण. म्हणूनच ‘वय देहाला असतं, मनाला नाही’ असं ते ठामपणे सांगू शकतात. साहित्यात वय, जात, धर्म, प्रांत असे निकष नसतात. ते असूही नयेत; मात्र दुर्दैवाने असे घटक प्रकाशन क्षेत्रात आल्याने हे क्षेत्र काळवंडत चाललं आहे. अशा परिस्थितीत दुर्गानंद गायतोंडे यांच्यासारख्या लेखकांचा आदर्श नवोदितांनी घ्यायला हवा.
गायतोंडे यांच्या पुस्तकांच्या शीर्षकावरूनही त्यांच्या लेखन सामर्थ्याचे वैविध्य सहजपणे ध्यानात येईल. ‘सुंदरा मनामध्ये भरली,’ ‘आभास’, ‘विनोदाच्या फुलझड्या’, ‘गूढ’, ‘कवडसे’, ‘पराधीन आहे पुत्र मानवाचा’, ‘ओंकारमय व्हा’, ‘भावलेल्या व्यक्ती’, ‘थरार’, ‘अंतरीच्या नानाकळा’, ‘पुनर्जन्मा ऐक तुझी कहाणी’, ‘येरा गबाळ्याचे काम नोहे’ ही त्यांची काही पुस्तके! हा सर्व संच पुण्यातील ‘उत्कर्ष प्रकाशन’च्या सुधाकर जोशी यांनी आत्मियतेने प्रकाशित केला आहे. गायतोंडे यांच्यासारखे ज्येष्ठ आणि अनुभवी लेखक व ‘उत्कर्ष’सारखी मान्यवर प्रकाशन संस्था यामुळे मराठीत सकस साहित्याची भर पडली आहे.
गायतोंडे म्हणतात, ‘मी संशोधनाचा भोक्ता आहे. आपल्याकडे सर्व शास्त्रात आणि विज्ञानात सतत संशोधन चालू असतं; पण अध्यात्मात तसं काही दिसून येत नाही. एखादा अपवाद असेलही; पण त्याने जे काही निष्कर्ष काढले असतील ते माझ्या वाचनात आले नाहीत.’
‘‘सत्ययुगात हनुमानाची अनेक देवळे आणि हजारो भक्त होते. द्वापारयुगात देवही कमी झाले आणि भक्तही कमी झाले आणि आता कलियुगात तर कहरच झाला. नावापुरतीच देवळं उरली आणि नावापुरतेच भक्त राहिले आहेत. परवा रात्री तर एक चोवीस वर्षांची मुलगी देवळात आली आणि मला म्हणाली, हाय हनु!’’ अशी हनुमानाची आत्मनिवेदनात्मक दंतकथा सांगत गायतोंडे यांनी समाज किती बदलला आहे. हे दाखवून दिले आहे. त्यातूनच त्यांनी ‘पुनर्जन्मा, ऐक तुझी कहाणी’ आणि ‘संशोधनात्मक ओंकारमय व्हा’ ही पुस्तके लिहिली. त्यांनी 56 प्रश्‍नांची उत्तरे 35 व्यक्तिंकडून घेतली आणि त्याचे निष्कर्ष त्यांच्या पुस्तकात दिले आहेत. ‘वयानुसार डोळे साथ देत नसले तरी ही ‘ओम’ची श्रद्धा आहे’ असे त्यांना वाटते.
त्यांच्या ‘आभास’ या पुस्तकाचे मनोगत तर प्रत्येक नवोदित लेखकाने पुन्हा पुन्हा वाचायला हवे. यात त्यांनी नवशिक्या लेखकांची आणि प्रकाशकांची कथा व व्यथा प्रांजळपणे मांडली आहे. नव्वदीनंतरही मराठी प्रकाशकांचे त्यांना दुर्दैवी अनुभव आले. मराठी भाषेच्या संवर्धनाचा ठेका आपणच घेतलाय अशा अविर्भावात मिरवणार्‍या पुण्या-मुंबईतील प्रकाशकांना दुर्गानंद गायतोंडे यांनी दिलेली ही सणसणीत चपराकच आहे. ‘एक वर्ष बिझी आहोत’,  ‘पु. ल. देशपांड्यांचं पुस्तक हाती घेतलं आहे; नंतर आपलंच घेऊ’,  ‘तुम्ही पुस्तक दिलं होतं हे आठवतचं नाही’,‘या वर्षाचे कॅलेंडर भरले आहे. तुम्ही जानेवारीत येता का?’,  ‘प्रकाशन हा आमचा जोडधंदा आहे. त्यामुळे पैसे दिले तर पुस्तक करू’ ही व अशी सगळी उत्तरे त्यांना वयाच्या नव्वदीनंतर ऐकायला मिळाली. मग त्यांची गाठ पडली ‘उत्कर्ष प्रकाशन’च्या सुधाकर जोशी यांच्याशी. जोशीकाकांनी मात्र प्रकाशकांच्या या उर्मटपणाला अपवाद ठरत गायतोंडे यांची पुस्तके सुबकरित्या प्रकाशित केली आहेत.
‘भावलेल्या व्यक्ती’ या पुस्तकात त्यांची 62 वर्षांची सहचरी मीरा,  राजदूत आप्पासाहेब पंत, महात्मा गांधींच्या निकटच्या सहकारी सुशिला पै, उत्तम आणि मिश्किल शिक्षक बापू प्रभावळकर, परिस्थितीवर मात करणारी शरयु कुंटे, चीफ एक्झिक्युटीव्ह ऑफिसरचा एका बाईने केलेला अंध:पात अमरसिंग, मालकाच्या घरात स्वत:चं बाळंतपण करणारी कुमारिका शेवंता माळी आणि इतर चार जणांचा समावेश केला आहे. ‘कवडसे’ या पुस्तकातही भारताचे न्यायमूर्ती यशवंत चंद्रचुड, कुमार गंधर्वांची पहिली पत्नी भानुमती कोमकल्ली, असंख्य लोकांचे श्रद्धास्थान माताजी निर्मला देवी, सी. पी. आयचे जनरल सेक्रेटरी ए. बी. बर्धन, आंतरराष्ट्रीय कंपनी नीतीचे सर्वेसर्वा एच. प्रॅट आणि इतर चार जणांची ओळख करून दिली आहे.
कथा, रहस्यमय कादंबरी, विनोदी लेख, गूढ लेखन, संशोधनात्मक, अध्यात्मिक, व्यक्तिचित्रणात्मक अशा चौफेर विषयांवर सशक्तपणे लेखणी चालविणार्‍या दुर्गानंद गायतोंडे यांचा पुण्याच्या महापौरांच्या हस्ते सत्कार झाला आहे. शारदा ज्ञानपीठ आणि सिक्कीमच्या राज्यपालांनीही त्यांचा गौरव केला; मात्र इतके मोठे योगदान देऊनही आपल्या राज्यसरकारला त्यांचा विसर पडलेला दिसतोय. फुटकळ लेखकांना अनेक महत्त्वपूर्ण पुरस्कार देऊन गौरविणार्‍या वशिलेबाज सरकारने आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेसारख्या संस्थांनी त्यांची दखल घ्यावी असे वाटते.
दुर्गानंद गायतोंडे यांच्याकडे पाहून व्यक्तिश: मला लोककवी मनमोहन नातू यांची आठवण येते. प्रतिभावंतांची उपेक्षा हा विषय युगानुयुगे चालतच आलेला आहे. त्या प्रवृत्तीला फटकारताना मनमोहन म्हणाले होते, ‘उद्याचा कालिदास अनवाणी पायाने जात असेल; तर त्यात अब्रू त्याची नाही राजा भोजाची जाते.’  शंभरीच्या घरात असलेल्या आणि मुख्य म्हणजे अजूनही लिहिते असलेल्या दुर्गानंद गायतोंडे यांची दखल किमान आपल्याकडील साहित्य संस्थांनी घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि वयाची बंधने झुगारून देत आजही अखंडपणे साहित्यसेवा करत असल्याबद्दल गायतोंडे यांचे अभिनंदन करतो.
(दुर्गानंद गायतोंडे यांच्या सर्व मराठी पुस्तकांसाठी संपर्क ‘उत्कर्ष प्रकाशन’ पुणे-9822410037)

- घनश्याम पाटील 
संपादक, प्रकाशक 'चपराक' पुणे 
७०५७२९२०९२

2 comments:

  1. पाटीलसाहेब गायतोंडे सरांबद्दल व त्यांच्या साहित्यिक योगदानाबद्दल उत्कृष्ट लेखन!

    ReplyDelete
  2. पाटीलसाहेब गायतोंडे सरांबद्दल व त्यांच्या साहित्यिक योगदानाबद्दल उत्कृष्ट लेखन!

    ReplyDelete