Saturday, July 30, 2016

काळजातील ढगफुटी

एक नेते विधानसभेवर निवडून आले. त्यांनी पार्टी द्यावी असा आग्रह काही पत्रकार मित्रांनी धरला. ते पार्टी टाळायचे. ‘‘बघूया, पैसे जमले की जाऊ,’’ असे सांगून सुटका करून घ्यायचे. शेवटी त्यांनी पत्रकारांना पार्टीला नेलेच. ते म्हणाले, ‘‘मित्रांनो, हवं ते पोटभर जेवा.’’ त्यांनी वेटरला सांगितलं, ‘‘इनको जो जितना चाहिए, वो दे दो।’’ थोड्या वेळात ते उठले. हॉटेलच्या मॅनेजरजवळ गेले आणि पत्रकारांकडे न येता सरळ बाहेर पडले. पत्रकारांना आश्‍चर्य वाटलं. त्यांची जेवणं संपत आली होती. ते आईस्क्रिम वगैरे सांगण्याच्या बेतात होते. तेवढ्यात ते घाईघाईतच आले आणि म्हणाले, ‘‘मित्रांनो माफ करा थोडा उशीर झाला. मध्येच सोडून जावं लागलं.’’
पत्रकारांनी विचारलं ‘‘कशासाठी?’’
ते म्हणाले, ‘‘कशासाठी म्हणजे फार महत्त्वाचं नव्हतं पण जावं लागलं.’’
पत्रकारांनी पुन्हा विचारलं, ‘‘पण कशासाठी?’’
ते म्हणाले, ‘‘त्याचं काय झालं. जेवणाचं बिल किती येईल याचा अंदाज मला येत नव्हता. मेन्यूकार्ड वाचल्यानंतर थोडा अंदाज आला होता. खात्री करावी म्हणून मॅनेजरकडे गेलो. त्यालाच बिलाचा अंदाज विचारला. मग लक्षात आलं की, एवढे पैसे आपल्याकडे नाहीत. चटकन बाहेर पडलो. टॅक्सी केली आणि आमदार निवास गाठलं. एकाकडून हातउसणे घेतले आणि आलोय; पण तुम्ही पोटभर जेवा. काळजी करू नका. आपल्याकडे आता भरपूर पैसे आहेत.’’
नंतर त्यांनी घाईगडबडीत दोन-चार घास खाल्ले. कदाचित त्यांचं टेन्शन वाढलं असावं. आपण अधिक जेवलो तर अधिक बिल वाढेल याची काळजी त्यांना वाटली असावी...
वाचकांच्या एव्हाना हा नेता लक्षात आला असेलच. सध्याच्या बरबटलेल्या काळात इतका प्रामाणिक आणि निर्मळ मनाचा नेता आर. आर. आबांशिवाय दुसरा कोण असू शकेल? हा आणि असे काळजाला भिडणारे कितीतरी किस्से अंत:करणापासून लिहिले आहेत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी. त्यांचे ‘काळजातले आर. आर. आबा’ हे पुस्तक पुण्याच्या सुरेश एजन्सीचे प्रकाशक गुलाबराव कारले यांनी दर्जेदाररित्या प्रकाशित केले आहे.
आपल्याकडे माणसापेक्षा माणसाच्या राखेचा इतिहास पुजण्याचा रिवाज तसा नवीन नाही. आर. आर. पाटील यांच्या मृत्यूनंतर राष्ट्रवादीवालेही त्याला अपवाद ठरले नाहीत. स्वच्छ चारित्र्याचे आबा राष्ट्रवादीवाल्यांना कधी कळलेच नाहीत. राष्ट्रवादीचा एक मोठा नेता हरपला अशी आवई देताना त्यांचा एकही गुण घेतलाय असे वाटत नाही. म्हणूनच सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, राजकीय अभ्यासकांनी, पत्रकारांनी आणि मुख्य म्हणजे ज्यांचा चांगुलपणावर विश्‍वास आहे अशा सर्वांनीच उत्तम कांबळे यांनी लिहिलेले आबांचे हे चरित्र वाचलेच पाहिजे. यातून आर. आर. पाटील आणि उत्तमराव कांबळे या दोघांचेही चरित्र आणि चारित्र्य दिसून येते.
आबांची आणि उत्तम कांबळे यांची जवळपास चाळीस वर्षांची मैत्री. कांबळे लिहितात, ‘माझं दारिद्र्य वाटून घेणारे, माझं दु:ख वाटून घेणारे, माझं कष्ट वाटून घेणारे, माझ्या घामाचे कौतुक करणारे आणि लिहायला, बोलायला साधेपणानं पण स्वाभिमानानं जगायला शिकवणारे मित्र म्हणजे आबा. त्यांच्याविषयी लिहिताना आठवांची ढगफुटी झाली.’
या ढगफुटीत कांबळे यांच्या काळजातले आबा तर दिसतातच; पण आबांचे काळीजही तितक्याच ताकतीने वाचकांसमोर येते. शालेय जीवनात उत्तम कांबळे यांना मदत म्हणून त्यांच्यासोबत रोजंदारीने जाणारे आबा, महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत पराभव पचवणारे आबा, दारिद्र्याच्या मगरमिठीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणारे आबा, एकाहून एक गब्बर शत्रू असताना यश खेचून आणणारे आबा, अंजनीपासून मंत्रालयापर्यंत आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणारे आबा, व्यसनमुक्तीपासून ते संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानापर्यंत विविध चळवळीत अग्रेसर असणारे आबा, धनदांडग्यांचा विरोध झुगारून देत डान्सबार बंदीसारखे निर्णय घेणारे आबा, गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागाचे पालकमंत्री झालेले आबा ही सगळी रूपे वाचताना त्यांच्या आठवणीने गलबलून येते.
सध्याच्या नेत्यांची विशेषत: राष्ट्रवादीवाल्यांची कोटीच्या कोटी उड्डाणांची चर्चा माध्यमातून सुरूच असते. त्यात आर. आर. आबांच्या झेडपीच्या निवडणुकीचा किस्सा वाचताना कुणालाही शांतीदूत लालबहाद्दूर शास्त्रींची आठवण येईल. आबांचे पोलीस खात्यात असलेले सख्खे भाऊ राजाराम यांनी कांबळे यांना सांगितलेला एक किस्सा या पुस्तकात आला आहे. आजच्या काळातील राजकारणाचे चित्र पाहता कुणालाही त्याचे आश्‍चर्य वाटेल. त्याचं झालं असं, झेडपीची निवडणूक लढण्याचं ठरलं तेव्हा आबा गांधी होस्टेलमध्ये राहत होते. ही बातमी सांगण्यासाठी ते सायकलीवरूनच शांतीनिकेतनमध्ये आले. तिथे राजाराम अकरावी-बारावीत शिकत होते. आबा त्यांना म्हणाले, ‘‘हे बघ राजाराम, सावळजमध्ये झेडपीसाठी मी निवडणूक लढवावी असा खूप दबाव येतोय. दादांकडून (वसंत दादा) निरोप येतोय. काय करूया?’’ राजाराम चटकन म्हणाले, ‘‘आबा आपण निवडणूक लढवू शकणार नाही.’’ आबांनी त्याचं कारण विचारल्यावर राजाराम म्हणतात, ‘‘अरे दादा, ग्रामपंचायतीत आपली थकबाकी आहे. ती भरल्याशिवाय नो ऑब्जेक्शन मिळत नाही.’’ आबांनी ‘थकबाकी किती आहे’ असे विचारले.
‘‘किती? अरे तेवीस रूपये थकबाकी आहे. कशी भरणार ती? पैसे कुठंयत आपल्याकडं?’’ राजारामानी प्रतिप्रश्‍न केला. आबा शांतपणे म्हणाले, ‘‘ज्यांनी उभं करण्याचा आग्रह धरला आहे. ते भरू शकतात. तो काही खूप मोठा विषय नाही. विषय वेगळाच आहे. मी जर राजकारणात उतरलो तर नोकरीधंदा काही करू शकणार नाही. राजकारणात मी काही मिळवायला निघालो नाही. घरी कमवणारं कोणी नाही. बाबाही हयात नाहीत. मी राजकारणात उतरलो तर घर सांभाळण्याची जबाबदारी तुम्ही सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. मला त्यात गृहीत धरू नये. माझ्याकडून तुम्हाला काहीच मिळणार नाही. घर सांभाळायचं तर राजकारणात उतरता येणार नाही. राजकारणात उतरायचं तर मला काही कमावता येणार नाही. विषय गंभीर आहे म्हणून तुला इथं आणलं आहे.’’
यातून आबांच्या चारित्र्याची कल्पना सहजपणे येते. महत्त्वाचे म्हणजे म. द. हातकणंगलेकर सर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व्हावेत यासाठी आबांची तळमळ आणि त्यांनी केलेली प्रचंड धडपड या पुस्तकात आली आहे. मुंबईहून हेलिकॉप्टरनं निघताना उत्तम कांबळे यांच्यासाठीि स्वत: आबांनी केलेला चहा, मदंना काहीही करून साहित्य संमेलनाध्यक्ष कराच अशी घातलेली गळ यातून त्यांची गुरूभक्ती दिसून येते. सांगलीच्या साहित्य संमेलनात, सगळ्यांचा कडवा विरोध झुगारून देत उत्तम कांबळे यांच्यासारख्या प्रगल्भ संपादकास आणि दिलदार मित्रास दिलेले स्वागताध्यक्ष पद यावरही कांबळेंनी प्रकाश टाकलाय. एकंदरीत साहित्य संमेलन निवडणुकीत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या राजकीय हस्तक्षेप कसा होतो याची थोडक्यात झलकच या पुस्तकातून दिसून येते. केवळ आर. आर. पाटील यांच्यासारखा अत्यंत प्रामाणिक नेता प्रतिभावंत संमेलनाध्यक्ष व्हावा यासाठी धडपडत असतो.
हे पुस्तक वाचायला घेतल्यानंतर वाचक ते खाली ठेवणार नाहीत. हृदयाला भिडणारे प्रसंग, ओघवती भाषा, आबांसारखं व्यक्तिमत्त्व उलगडून दाखवताना थेट काळजातून आलेले शब्द हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. सुप्रसिद्ध चित्रकार रविमुकुल यांनी या पुस्तकाचे मुखपृष्ठ साकारले असून प्रकाशकांनी पुस्तकात आबांच्या काही रंगीत चित्रांचाही समावेश केला आहे. उत्तम कांबळे आणि आर. आर. पाटील यांच्या मैत्रिचा सुगंध या पुस्तकातून दरवळतोच; मात्र वाचकांना अंतर्मुखही करतो.

प्रकाशक : सुरेश एजन्सी, पुणे (020-24470790)
पाने : 87
मूल्य : 120

- घनश्याम पाटील 
संपादक, प्रकाशक 'चपराक' पुणे 
७०५७२९२०९२

4 comments:

  1. भावस्पर्शी रसग्रहण.नितांत सुंदर.

    ReplyDelete
  2. भावस्पर्शी रसग्रहण.नितांत सुंदर.

    ReplyDelete
  3. राजकारण्यांना न कळलेला राजकारणी..... आर आर आबा.....पुस्तकाचा दरवळ सुंदर रितीने वाचकांसमोर आपण आणलाय...... धन्यवाद आणि शुभेच्छा.....

    ReplyDelete
  4. kolhapurat kuthe milel he pustak??

    ReplyDelete