Saturday, July 16, 2016

राष्ट्रवादीची ‘रसिक’ता!

विविध क्षेत्रात आपल्या कार्यकतृत्वाने समाजासाठी दीपस्तंभ ठरलेल्या पूजनीय आणि ऋषितुल्य व्यक्तिंच्या कार्याचा वसा नवीन पिढीसमोर यावा, यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने गुरूजन गौरव सोहळ्याचे आयोजन करते. यंदाच्या ‘गुरूजन’ सोहळ्यासाठी त्यांनी सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर, ज्येष्ठ शल्यविशारद डॉ. शरद हर्डीकर, कायदेतज्ज्ञ भास्करराव आव्हाड आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ‘गुटखाकिंग’ रसिकलाल धारिवाल यांची निवड केली आहे. या सगळ्या मान्यवरात धारिवालांचे नाव घुसडल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पुण्याच्या साहित्य संमेलनात ‘गुटखावाल्याची देणगी नको’ म्हणून धारिवालांचे वीस लाख रूपये परत करण्यात आले होते. त्याच शहरात त्यांचा ‘गुरूजन’ म्हणून सत्कार होणे क्लेशकारक आहे.
आपल्या ‘कार्यकतृत्वाने’ विख्यात असलेले पुण्यातील नेते आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक दीपक मानकर हे या सोहळ्याचे आयोजक आहेत. लोकसभा निवडणुकांच्या काळात राष्ट्रवादी कॉंग्रेस म्हणजेच एनसीपी ही ‘नॅशनल करप्ट पार्टी’ असल्याची टीका नरेंद्र मोदी यांनी केली होती. मोदी यांच्या या विधानातील सत्यता अनेकवेळा सिद्ध होऊनही पुण्यासारख्या सांस्कृतिक नगरीत या पक्षाचे प्राबल्य आहे याला काय म्हणावे? श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्रभूषण जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीचे म्होरके असलेले शरदराव पवार यांनी त्यांच्यावर टीका केली होती. मुळात बाबासाहेब इतिहास संशोधक, अभ्यासक अथवा शिवशाहीर नाहीत असे राष्ट्रवादीवाले बेंबीच्या देठापासून ओरडत सांगत असतात. याच बाबासाहेबांचाही यापूर्वी राष्ट्रवादीने अशाच गुरूपौर्णिमेनिमित्तच्या सोहळ्यात ‘गुरूजन’ म्हणून सत्कार केलेला आहे. यापूर्वी बाबासाहेबांसह ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, संगणकतज्ज्ञ विजय भटकर, क्रिकेटपटू चंदू बोर्डे, दाजीकाका गाडगीळ यांचा गौरव राष्ट्रवादीने केला आहे. यातील प्रत्येक व्यक्ती त्यांच्या-त्यांच्या क्षेत्रात हिमालयाच्या उंचीची! त्या जोडीला आता रसिकलाल धारिवाल यांच्यासारख्या गुटखाकिंगचे नाव जोडल्याने राष्ट्रवादीची मूळ प्रवृत्तीच दिसून येते.
कोणी कोणता व्यवसाय करावा याला आपल्याकडे बंधने नसली तरी ‘माणिकचंद’सारख्या गुटख्याने अनेकांच्या आयुष्याचे मातेरे केले आहे. ज्या पक्षाचे स्थानिक नेते या सोहळ्याचे आयोजन करत आहेत त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षांना म्हणजेच शरद पवार यांनाही या गुटख्याचा मोठा फटका बसला आहे. दिवसभरच्या व्यग्रतेत अनेकवेळा हा गुटखा चघळण्याची सवय असल्याने त्यांना तोंडाचा कॅन्सर झाला. सुदैवाने योग्य उपचार झाल्याने कॅन्सरमुळे माणूस ‘कॅन्सल’ होत नाही हे त्यांच्याबाबत दिसून आले; मात्र दुर्दैव हे की याच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून आपल्या कार्यकतृत्वाची प्रामाणिक छाप उमटविणारे आर. आर. तथा आबा पाटील यांचा कॅन्सरने बळी घेतला. असे सगळे असताना एखाद्या ‘गुटखाकिंग’चा ‘गुरू’ म्हणून सत्कार करणे हे कुणालाही न पचणारे आहे.
गुटख्यासारख्या व्यसनामुळे अनेक गंभीर आजार होऊ शकतात आणि प्रसंगी त्यात जीवही जाऊ शकतो इतकी अक्कल रसिकलाल धारिवाल यांच्यासारख्या लोकांकडे बघून येते; म्हणूनही त्यांची या गौरव सोहळ्यासाठी निवड केली असावी. हा ‘बोध’ देणारे धारिवाल राष्ट्रवादीसाठीच नव्हे तर समाजासाठीही गुरूच म्हणावे लागतील!! राष्ट्रवादी भ्रष्टवादी झालाय (किंवा सुरूवातीपासूनच आहे) हे सत्य कुणापासूनही लपून राहिलेले नाही. छगन भुजबळ, अजित पवार, सुनिल तटकरे, धनंजय मुंडे अशा नेत्यांकडे बघितल्यास त्याची प्रचिती यावी. महाराष्ट्रातील ‘पॉवर’फूल पक्ष म्हणून अनेकजण राष्ट्रवादीकडे बघतात. त्यामुळे अशा धनदांडग्यांचा गुरूही ‘गब्बर’च असायला हवा. रसिकलाल धारिवाल यांच्या गौरवाने ही बाब अधोरेखित झाली आहे.
यशवंतराव चव्हाणांसारख्या लोकनेत्यासोबत आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात करणार्‍या शरद पवार यांनी साबरमती आणि बारामती या दोन्ही संस्कृतींचा परिचय वारंवार घडवून दिला आहे. ‘मुँह में राम बगल में छुरी’ अशा प्रवृत्तीच्या मंडळींचाच या पक्षात भरणा आहे. सत्तेत असताना आणि नंतरही अनेक ठिकाणी, अनेक प्रकरणात राष्ट्रवादीची भ्रष्टवादी वृत्ती दिसून आलेली आहे. विजय मल्ल्या, शशी थरूर अशा लोकांची मैत्री एकेकाळी अभिमानाने मिरवणारे शरद पवार रसिकलाल धारिवालसारख्या गुटखाकिंगवर कौतुकाचा वर्षाव करताना कचरणार नाहीत. जितेंद्र आव्हाड यांच्यासारखे काही ‘सुविद्य’ आमदार त्यांची तळी उचलायला सोबत आहेतच.
पुणे ही सांस्कृतिक नगरी आहे. विद्येचे माहेर घर असा या शहराचा लौकिक आहे. राजकीय उलथापालथी, घोटाळे, भ्रष्टाचार, अरेरावी, दादागिरी, जुलूमशाही हे सगळे सगळ्याच पक्षात थोड्याफार प्रमाणात चालते; मात्र आपण सांस्कृतिक क्षेत्रात किती भरीव योगदान देतोय हे दाखविण्यासाठी साहित्य संमेलनात लूडबूड करणे, साहित्य संस्थांच्या कारभारात दखल घालणे, सांस्कृतिकतेच्या नावावर माणिकचंदच्या रसिकलाल धारिवाल यांचा ‘गुरू’ म्हणून गौरव करणे हे सारेच या शहराच्या प्रतिमेला कलंकित करणारे आहे. भटकर, माशेलकर, पुरंदरे यांच्या बरोबरीने धारिवालचा इतिहास गिरवावा लागणे यापेक्षा शरमेची बाब कोणती असू शकते?
अशा अनेक कारनाम्यांमुळे देशात आणि राज्यात राष्ट्रवादी आणि त्यांच्या मित्रपक्षांना धूळ चाखावी लागली आहे. या नैराश्येतून शरद पवार यांच्यासारखे जबाबदार नेतेही सुटले नाहीत. हातची सत्ता गेल्यानंतर वेळोवेळी त्यांनी जी बालिश विधाने केली ती उभ्या महाराष्ट्राने पाहिलेलीच आहेत. त्यांच्याच संस्कारात वाढणारे शहरातील नेते त्यांचाच कित्ता गिरवत अशा कार्यक्रमांचे आयोजन करत आहेत. ‘कॉंग्रेसमुक्त भारत’ हे मोदींचे स्वप्न पूर्ण होईल की नाही हे आम्हास ठाऊक नाही; पण राष्ट्रवादीच्या अशा अनेक ‘पराक्रमा’मुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष मात्र बुडण्याच्या मार्गावर आहे हे या सर्वातून लख्खपणे दिसून येत आहे. 

-घनश्याम पाटील 
संपादक 'चपराक', पुणे 
७०५७२९२०९२

4 comments:

  1. सडेतोड व सामाजिक जाणीव जपणारा लेख!

    ReplyDelete
  2. बालिशपणाचा कळसच आहे आणि तेच तुम्ही समाजासमोर मांडता याचा आम्हाला गर्व आहे... शुभेच्छा धन्यवाद ..छान

    ReplyDelete
  3. बालिशपणाचा कळसच आहे आणि तेच तुम्ही समाजासमोर मांडता याचा आम्हाला गर्व आहे... शुभेच्छा धन्यवाद ..छान

    ReplyDelete
  4. परखड व स्पष्ट लेख . खरंच जागृतीची गरज आहे .

    ReplyDelete