सुप्रसिद्ध साहित्यिक आणि इतिहास लेखक डॉ. सदाशिव शिवदे यांनी माझ्या 'दखलपात्र' या पुस्तकाचे केलेले परीक्षण
प्राचार्य श्रीपाल सबनीस, भाई वैद्य, सुधीर गाडगीळ, श्रीराम पचिंद्रे, प्रदीप नणंदकर यांच्या उपस्थितीत पहिल्या आवृत्तीचे प्रकाशन. |
श्री समर्थ रामदास म्हणतात,
आता असो हे बोलणे। विवेकी तोचि हे जाणे।
पूर्वपक्ष लागे उडवणे। एरवी अनुर्वाच।
आपल्या वाणीत सदैव चपखलपणा, परखड विचार घेऊन आपल्या लेखणीने अनेकांना अंतर्मुख व्हायला लावणार्या घनश्याम पाटील यांच्या ‘चपराक’ या साप्ताहिक आणि मासिकातील अग्रलेखांचा संग्रह म्हणजे ‘दखलपात्र‘! ही एक अपूर्व अशी ग्रंथनिर्मिती असल्याचा प्रत्यय त्यांच्या शब्दाशब्दातून येतो आणि विवेक जागृत होऊन वाचकांनाही अनुर्वाच असा प्रत्यय आल्यावाचून राहत नाही. संपादक तरूण, तडफदार, हरहुन्नरी असून सूक्ष्म निरीक्षण, निश्चय वचनी बाण्याचे, ‘मागे एक पुढे एक, बोले एक, करी एक’ किंवा ‘ज्ञान बोलोन करीन स्वार्थ’ अशी वृत्ती न ठेवणारे, परखडपणे आपले विचार मांडणारे, केवळ शब्दांची कचाटे न करता समाजजागृतीचे कार्य करणारे आहेत. त्यांचे कार्य केवळ स्वतःच्या संतुष्टीसाठी नसून निश्चितपणे इतरांच्या भल्यासाठी आहे. तो कर्ममार्ग आहे, ज्ञानमार्ग आहे आणि योगमार्गही आहे. म्हणूनच त्यांच्या प्रभावी लेखनाची दखल महाराष्ट्रधर्मी माणूस घेतल्यावाचून राहणार नाही.
लेखक खर्या अर्थाने बंडखोर आहे. त्याच्यात लोकमान्यांचा ‘केसरी‘, आचार्य अत्र्यांचा ‘मराठा’ आणि आगरकरांचा ‘सुधारक’ आहे. त्यांच्याच शब्दात सांगावयाचे झाल्यास, ‘आम्ही अनिष्ठतेचा खात्मा करण्यासाठी लढण्याची मर्दुमकी दाखवू. ही क्रांती घडविण्याचा आम्ही विडा उचलला आहे.’(ही लढाई जिंकलीच पाहिजे) सध्या ‘मी आणि माझे’ एवढाच संस्कार समाजात उरला आहे, याची खंत लेखकाला विदीर्ण करते. जागतिकीकरणाच्या अफाट अशा सत्यापुढे उभे राहिल्यावर या देशात रामराज्य निर्माण होण्याचा आशावाद ‘भय इथले संपत नाही’ असे कोणी म्हणू नये, याची जाणीव करून देतो. ज्या शिवछत्रपतींनी ‘राष्ट्रप्रेमाविषयी प्रबळ भावना’ असा भक्कम ‘महाराष्ट्र धर्म’ निर्माण केला त्याचे चरित्र सार्या विश्वात पोचावे मात्र त्यांच्या नावाने राजकारण होऊ नये, असे लेखकाला मनोमन वाटते. स्त्रियांचा सन्मान हा नव्या युगाचा झंकार असून तिच्यावर होणारे अत्याचार हा हिंदू संस्कृतीला काळीमा आहे, हे व्यक्त करताना लेखकाचे मन फार हळूवार होते.
आदरणीय अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाबद्दल लेखकाला आदर आहे. ‘राष्ट्रीय अस्मितेचे प्रतिक’ म्हणून अण्णांचा गौरव करताना त्यांचे अपरिपक्व वैचारिक स्वरूप मात्र स्पष्टपणे मांडताना संपादक घनश्याम पाटील मागेपुढे पाहत नाहीत.
पट्टेवाल्याची नोकरी करणारा बघता बघता एक मोठा राजकारणी होतो आणि वाढत वाढत देशाचा गृहमंत्री होतो. अशा नेत्याची अतिशय अल्प शब्दात मनोरंजक पण नेमकी अशी कथा ‘एक पट्टेवाला’ या अग्रलेखाद्वारे लेखकाने समाजापुढे उभी केली आहे. ‘भांडकुदळ अप्रिया’ या लेखातून अत्यंत चपखल व परखडपणे सुप्रियाताई सुळे यांच्या राजकारणाचा वेध घेताना लेखकाने त्यांना मार्गदर्शनच केले आहे, असे म्हणावे लागेल. नामदार आर. आर. पाटील यांच्यासारख्या किंवा लक्ष्मण ढोबळे यांच्यासारख्या मंत्र्यांना कडाडून फटकारे मारताना घनश्याम पाटील आपली साहित्यातली ‘पाटीलकी’ तर सिद्ध करतातच पण विलासराव देशमुख यांच्यावर ‘राजकारणातला सुपरस्टार गेला’ असा मृत्युलेख लिहून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून आपल्या विनयशील स्वभावाचे दर्शनही घडवितात.
प्रत्येकाने मरणाचे स्मरण ठेवले पाहिजे हे सांगतानाच लेखकाने ब्राह्मण समाजाने देशासाठी सर्व क्षेत्रात केलेल्या कामगिरीची जाणीव करून देऊन ‘जातीद्वेष म्हणजे राष्ट्रोद्धार नव्हे’ हे छानपणे पटवून दिले आहे. प्रकाशन व्यवसायातील प्रवृत्ती, लेखकांची अवहेलना, विके्रत्यांची, वाचकांची गळचेपी या गोष्टी किती ‘दखलपात्र’ आहेत, हे सांगताना मराठी माणसाने संघटित होऊन अशा प्रवृत्ती मोडून काढाव्यात, असे कळकळीचे आवाहन केले आहे. देशाला आज बौद्धिक क्षत्रियांची गरज आहे. मला काय त्याचे ही प्रवृत्ती आता सोडायलाच हवी. साहित्य संमेलनाचे पावित्र्य जपावे, संमेलन ही जत्रा नसून साहित्य जागृतीचा उत्सव आहे यासंबधीचे लेखकाचे विचार ‘आता असो हे बोलणे। अधिकारपरत्वे घेणे। शिंपीमधील मुक्त उणे। म्हणू नये!’ अशा पद्धतीने खुसखुशीत भाषेत आहेत.
अतिशय धारदार शब्दात त्यांनी ‘महापालिकेने केलेला खून’, ‘भक्षक नकोत, रक्षक हवेत’, ‘जागते रहो’, ‘उन्हे बाजार दिखाया’, ‘बोलतील, हसतील अन् गाडतीलही’,‘धारदार दुर्गंधी’, ‘कराड मास्तरांचा अमर होण्याचा अट्टाहास’, ‘अजब तुझे सरकार’, ‘होयबांच्या गर्दीतला नेता’, ‘यांना आवरा, त्यांना सावरा’ हे व असे अग्रलेख लिहिले आहेत. घनश्याम पाटील यांनी आपली लेखणीरूपी समशेर अशी काही चालवली आहे की, त्यांस युक्तीवंत, गुणवंत, बुद्धिवंत की बहुधारिष्ट्यवंत म्हणू? एक मात्र खरे हे सद्विद्येचे, विवेकाचे, संतोषरूपाचे, विमळ ज्ञानाचे लक्षण आहे. आम्ही मात्र वरील शब्दातून ‘दखलपात्र’ ची दखल घेत आहोत.
लेखकाने आपल्या ग्रंथाचा अखेरचा अध्याय श्रीमत् भगवतगीतेतील व्यास मुनींच्या गूढ प्रतिभेतून साकारलेल्या भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या चैतन्य संवादातून सुख-दुःख, लाभ-अलाभ, यश-अपयश या गोष्टींचा विचार करत नाही. ‘आपण यां उचिता। स्वधर्मे राहाटतां। जें पावें तें निवांत्ता। साहोनि जावे।’ अशी स्थिती प्राप्त करून मनाचा प्रचंड निर्धार करून झुंजत राहणार्या लेखकाची प्रतिभा सहजच श्रीमंत झाल्यावाचून कशी राहील? निर्भिड पत्रकारिता ही आजच्या काळात दुर्मिळ झाली आहे. अशावेळी अगदी तरूण वयातच ’पोचटामध्ये घनवट। घनवटी उडी पोचट। तैसा शब्द हा फलगत।’ अशा भावनेने आजच्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी लेखकाने जो संदेश दिला आहे तोच याठिकाणी उद्धृत करणे योग्य ठरेल...
‘परिस्थितीशी चार हात करताना वस्तुस्थिती समजून घेऊन लढत राहणे केव्हाही शहाणपणाचे ठरते. फळाची अपेक्षा न करता कर्म करीत रहा, असे गीता सांगते; पण सत्कर्माचे फळ मिळतेच मिळते. मग भलेही त्याला थोडा उशीर होईल पण फलप्राप्ती होतेच यावर आमचा विश्वास आहे. मनाचा पक्का निश्चय केल्यास सहजगत्या दोष घडत नाहीत. त्यामुळे निश्चयाने युद्धास आरंभ करणेच हिताचे ठरते.’
अग्रलेखांचा ग्रंथ करून घनश्याम पाटील यांनी ‘उत्तिष्ठत जागृत‘ हा बहुमोलाचा संदेश देऊन आपल्या पत्रकारितेचे सार्थक केले आहे. इतिहास संशोधनात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक बाबींचा समावेश असतो. आजच्या सामाजिक घटना हा उद्याचा इतिहास असतो. इतिहास ही राष्ट्राची ज्योत समजली जाते. तिच्याद्वारे समाजाला अंधारातून प्रकाशाकडे जाता येते. या ग्रंथातून तोच दीपस्तंभ समाजापुढे घनश्याम पाटील यांनी उभा केला आहे यात शंका नाही. त्याचे मूल्य अपूर्व आहे. पत्रकारितेच्या अभ्यासाला एक संदर्भ ग्रंथ म्हणून त्याचा निश्चितच उपयोग होईल, यात सुतराम संदेह नाही. श्री. घनश्याम पाटील यांना आमच्या शुभेच्छा!
द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन करताना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे. |
- डॉ. सदाशिव शिवदे
(पूर्वप्रसिद्धी : दैनिक 'ऐक्य' सातारा )
रुद्रभॆरवी शॆलीचा अविष्कार म्हणजे दखलपात्र आग्रलेख .......
ReplyDeleteसाहित्यिक तथा प्रकाशक घनश्याम पाटील यांचे संपादकीय लेखाचा संग्रह दखलपात्र आजच वाचून काढला.प्रचंड जीगीषेचा उर्जास्त्रोत असलेला आग्रलेख संग्रह दखलपात्र यात पल्लेदार भाषेचा शब्दफेक आणि स्वत्वाची जाणीव यामुळे वाचकात आत्मभान जागर्त होते. अलोकिक भाषा प्रभुत्व लाभलेल्या शिवरायांची साक्ष पटवते, विषयाची सहजता हि खास आदा म्हणजे एका निर्मल मनाची एक सुंदर भावविभोर अभिव्यक्ती दखलपात्र....
सहजतेतून प्रचंड धग बाहेर पडते. त्यामुळे वाचक आतून बाहेरून सोलून निघतो. शब्दाशब्दात तारुण्याचा ओझ एकवटला असल्याने एक वेगळी अनुभूती मिळत असल्याने वाक्यावाक्यात अंगावर शहारे उभे राहतात .लाजवाब प्रशानोतरे आणि मंगलमय दीपोत्सव हा या आग्रलेखाचा प्राण आहे. या प्राणसह रामायणातील कॆयकॆयीचे सुंदर उदात्तीकरण केले आहे.यासाठी मनमोहून घेणारी कथा मांडली आहे.आजपर्यंत असे संदर्भ वाचण्यात आलेले नव्हते. हे या लिखाणाचे वेगळे वैशिष्ट्य मानता येईल.विधायक विचारांचे जाग्रत संभाषण सत्याच्या कसोटीवर उतरत असल्याने मनोज्ञ सत्य दर्शनाचा आविष्कार घडतो. द्यूत, मदिरा,हिंसा, नारीसंग इत्यादी प्रसंग कलियुगाचे पदर घेऊन आपली वैचारिकतेची साक्ष पटवतात.लोक हितेशीभाष्य हे या संग्रहाचा प्रधान हेतू मानता येईल.
सारस्वत हा अंतर्बाह्य उघडा आसतो पण इतरांना श्रीमंती बहाल करीत आसतो. लोक कवी मनमोहन हा कुठल्या वेदिव्ररिल गीत आहे. जे कि , अख्खा शिवभारत काव्यात उभा केला. नक्कीच तो स्वर्गातील उल्पीचा गन्धाळलेला मोगरा असला पाहिजे. तेंव्हाच कुठे अमर गीताचा तेजस्वी पुंजका हाती लागतो.या शिवाय प्रकृती ,संस्कृती,विकृती या विषयची सुंदर व्याख्या केली आहे. हे विशेष भाव मानता येईल.
भारतातील बहुतेक लोकांचा जन्म हा कुणाचा तरी अनुयायी होण्यासाठीच झालेला आहे.या वाक्यावर हसावे का रडावे ? ..शिवाय पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा व्येश्येला मणिहार...या गीताचा संदर्भ वेगळी अनुभूती देऊन जातो. त्यासाठी व्वा..सुंदर विवेचन असेच उदगार कुणाच्याही मुखातून बाहेर पडले तर नवल नाही.शेवटी शेवटी सुंदर प्रश्न उपस्तीत करून सामाजिक भान दिले आहे,एकूणच आग्रलेख दखलपात्र आहेत. कारण यात रामायण , महाभारत आहे आणि हेच मानवी जीवन मूल्याशी निगडीत आहे. हे वास्तव मान्यच करावे लागेल.कारण आग्रलेखाची परंपरा केसरी नंतर बंद पडली कि काय ? .. आसे वाटत असताना रुद्रभॆरवी शॆलीचा अविष्कार दखलपात्र आग्रलेखातून घनश्याम पाटीलांनी समर्थपणे दाखून दिले आहे.त्यांच्या लेखणीत तारुण्याचे तीन " त " कार आहेत.... या साहित्य प्रवासास माझ्या मनापासून शुभेछा व अभिष्ठ चिंतन ...............
मराठीचा आलाप म्हणजे : झुळूक आणि झळा.......
ReplyDeleteसाहित्यिक तथा प्रकाशक घनश्याम पाटील यांचे संपादकीय लेखाचा संग्रह '' झुळूक आणि झळा ''आजच वाचून काढला.
विकृतांची विकृत मनोवृत्ती कशी आणि कधी उफाळून येईल हे सांगता येत नाही.कारण सुसाटपणे अराजकतेकडे चाललेला प्रवास एक दिवस सर्वांचाच घात करेल.हे सांगणार तत्वज्ञान म्हणजे घनश्याम पाटील लिखित ''झुळूक आणि झळा'' हा ग्रंथ.
या ग्रंथउत्सवात श्री पाटील यांनी हिंदूचे चार पीठ शृंगेरी, जगन्नाथपुरी,द्वारका आणि कांचीकामकोठी या चार पिठीचेही दर्शन घडविले आहे. आध्यात्म क्षेत्राला अहंकाराने पछाडले असल्याने पीठ, मठाचे वाद न्यायालयात गेल्याचे उद्विग्नपणे नोंदविले आहे. तत्कालीन भटा ब्राम्हणाचाही खरपूस समाचार घेतला आहे. अन्य धर्मियांचे संघटन होते तसे शंकराचार्य मुळे हिंदूचे होते का ? आस खडा सवाल उभा केला आहे.
शिवाय पाश्चात्य राष्ट्राची भलावण करणारे महाभाग हे खरे राष्ट्रद्रोही आहेत. याची जाणीव करून देत शेक्सपियरचा आभ्यास जरूर करावा पण महाकवी कालिदासाचा विसर पडता कामा नये. आशी विचारधारा मांडत मराठी भाषेबद्दल आग्रही असणारेच आजच्या काळात मराठीचे तारणहार ठरू शेक्तील आस आशावाद व्यक्त केला आहे. कारण शारीरिक आजारातून बरे होता येईल पण सांस्कृतिक आजार जडला तर समाज व्यवस्था कोलमडून पडेल आशी भीती व्यक्त केली आहे. बालपण पासून मराठी शिकलेला माणूस अमेरिकेतही यशस्वी जीवन जगू शकतो.हे सोहदारणासह साक्षाकिंत केले आहे.हि उथळ शेरेबाजी नाही तर चिंतनाचा व्यासंग आहे.
मराठीतले संत काव्य , पंत काव्य, तंत काव्य व आधुनिक काव्य अफाट प्रतिभेचे किमयागार आहे आशी वॆचरिक मीमांसा करीत कर्नाटक गाण्यात गेला,गुजराथ खाण्यात गेला आणि महाराष्ट्र पिण्यात गेला आशी बोचरी टीकाही केली.हे सर्व मायमराठीची कस धरण्यासाठी.कारण महाराष्ट्र तुमच्यामुळे नाही तर तुम्ही महाराष्ट्रामुळे आहात.याचाच दुसरा अर्थ मराठी तुमच्या मुळे नाही तर तुम्ही मराठी मुळे आहात.
मराठा समाजातील कांही बांधव चुकीला बळी पडून ब्राम्हण द्वेष करतात, संत रामदासाव्रर तोंड सुख घेतात पण त्यांनी रचलेली आरती सुखकर्ता दु:खहर्ता भक्ती भावाने म्हणतात.याचीही जाणीव करून दिली आहे.एकून काय तर मराठी टिकली पाहिजे, मराठी बोलली पाहिजे, मराठी शिकली पाहिजे याचाच हा सत्संग सोहळा आहे, मराठीचा आलाप यज्ञ आहे आणि हा आलाप छेडणारा लेखक आधुनिक काळातील ज्ञानेश्वर आहे.....
आशा लिखाणास लाख लाख शुभेछा......