राज्यस्तरीय युवा नाट्य-साहित्य संमेलनाच्या नावाखाली माकडचाळे; लाखोंचा चुराडा
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या बारामती शाखेच्या वतीने तिसरे राज्यस्तरीय युवा नाट्य-साहित्य संंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या संमेलनात एक-दोन स्थानिक कलाकारांच्या एकांकिका वगळता दुसरे काहीच झाले नाही. पाहुण्यांना यायला उशीर झाला म्हणून वेळ मारून नेण्यासाठी एका कलाकाराने मिमिक्रीच्या नावाखाली नुसतेच माकडचाळे केल्याचे पहायला मिळाले.
नाट्य क्षेत्रातील अभिराम भडकमकर हे त्या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात ते नाट्य-साहित्यावर कमी आणि व्यवसाय प्रशिक्षणावरच जास्त बोलले. व्यवसाय निष्ठेने करावा, नैतिकतेने करावा, कल्पकतेने करावा या विषयी भडकमकर भरभरून बोलले. मात्र नाट्यसाहित्य कसे लिहावे, त्याचे नियम काय, संवाद लेखन कसे असावे, नेपथ्य कसे असावे यावर मात्र त्यांनी चकार शब्दही काढला नाही.
या राज्यस्तरीय युवा नाट्य-साहित्य संमेलनाला रंगभूमीवरील एकही कलाकार उपस्थित नव्हता, हे दुर्दैवच. येथील काही तुरळक युवकांशी संवाद साधण्यास एकाही नाट्यलेखकाची उपस्थिती नव्हती. कार्यकारिणी सदस्यांची व्याख्याने आयोजित करून 'मसाप’ने या युवा नाट्यसाहित्य संमेलनाची बोळवण केली.
चित्रपट आणि साहित्य या विषयावर बोलताना राज काझी यांनी तर साहित्यातील गुणवत्तेचा मुद्दा बाजूला ठेऊन मार्केटींगलाच महत्त्व असल्याचे ठासून सांगितले. त्यामुळे युवा नाट्य-साहित्य संमेलन भरकटल्याचे पहायला मिळाले.
समारोपाचे प्रमुख पाहुणे असलेल्या ज्येष्ठ नाट्यकर्मी मोहन जोशी यांनीही कार्यक्रमाला दांडी मारली. संमेलनाचे सभामंडप तीनही बाजूंनी पडद्यांनी बंदिस्त असल्यामुळे जे काही जेमतेम श्रोते होते. मात्र उकाड्याने ते हैैराण झाले. कसलेही पूर्वनियोजन नसलेले हे युवा नाट्य-साहित्य संमेलन घाईघाईने उरकण्याचा अट्टहास 'मसाप’ने का केला असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
(साप्ताहिक चपराक २३ मार्च २०१५)
No comments:
Post a Comment