Sunday, March 1, 2015

त्यांना आवरा; यांना सावरा!


एक माणूस सोफ्यावर बसून बायकोला विचारतो की, आज कोणती भाजी केलीय? बायको, काहीच उत्तर देत नाही म्हणून आणखी जवळ जाऊन विचारतो. तरीही प्रतिसाद शून्य. असे करत शेवटी तिच्या अगदी मागे उभा राहतो. बायकोची त्याला चिंता वाटायला लागते. तिला श्रवणयंत्र घेऊन द्यायला हवे, असा विचार करत अगदी जवळ जाऊन पुन्हा विचारतो, ‘‘आज भाजी कुठली केली?’’ तेव्हा बायको त्याच्यावर खेकसते, ‘‘मी तीनवेळा सांगितले की, आज भरलेल्या वांग्याची भाजी केलीय. हाच प्रश्‍न कितीवेळा विचारताय?’’ तेव्हा त्याला लक्षात येते की, श्रवणयंत्राची गरज बायकोला नाही तर आपल्या स्वत:लाच आहे.
महाराष्ट्रात सध्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचेही असेच काहीसे सुरू आहे. भाजपवाले शिवसेनेवर वाट्टेल तसे तोंडसुख घेत आहेत. ‘‘सरकारमध्ये सहभागी असलेली शिवसेना सत्ताधारी आहे की विरोधी?’’ असा खुळचट सवाल राज्याचे कृषीमंत्री असलेल्या एकनाथ खडसे नावाच्या नेत्याने विचारला आहे. शिवसेना आपला मित्रपक्ष आहे की विरोधी हे जनतेपुढे मांडण्याएवढे हे नेते निगरगट्ट झालेत. शिवसेनेच्या सहकार्यानेच यशाची अनेक शिखरे भाजपने पादाक्रांत केली. प्रमोद महाजन, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी इतकेच काय तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही शिवसेनेची ताकत माहिती आहे. म्हणूनच भू-संपादन विधेयकाबाबत शिवसेनेची समजूत काढावी यासाठी नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना ’मातोश्री’वर शिष्टाई करण्यास पाठवले. गडकरी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या काही सूचना स्वीकारून सेना-भाजपमधील तणाव निवळावा यासाठी प्रयत्न केले. दुसरीकडे खडसे मात्र पक्षीय भूमिका विचारात न घेता सातत्याने सेनेवर तुटून पडत आहेत. 
भू-संपादन विधेयकाबाबत समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषणाचा पवित्रा घेतला आहे. ‘वाट्टेल ते करून शेतकर्‍यांच्या जमिनी लाटण्याचा उद्योग चालू देणार नाही’ असे त्यांनी निक्षून सांंगितले आहे. शेतकर्‍यांच्या जमिनी घेताना त्यांना जमिनीच्या किंमतीच्या चारपट रक्कम द्यावी, त्यासाठी सत्तर टक्केहून अधिक शेतकर्‍यांची संमती हवी, संबंधित प्रकल्प पाच वर्षात सुरू झाला नाही तर त्याला न्यायालयात जाता यायला हवे अशा त्यातल्या काही तरतुदी होत्या. मात्र या सर्व तरतुदी रद्द करून मोदी सरकार मनमानी कारभार करत आहे असा आक्षेप शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस यासह देशातील अनेक प्रादेशिक पक्षांनी घेतला आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ अशी भूमिका घेऊन कार्यरत असलेल्या पंतप्रधानांना सहकार्य करण्याची या सर्व प्रादेशिक पक्षांची मानसिकता आहे. तरीही खडसे यांच्यासारखे नेते आपल्या अहंकारापोटी दुधात खडे टाकून आपापसात वैतुष्ट्य निर्माण करत आहेत. कॉंग्रेसच्या कालावधीत अण्णा हजारेंनी उपोषण केल्यानंतर ज्यांना आनंदाच्या उकळ्या फुटायच्या ते सर्वजण मात्र आज चिडीचूप आहेत. 
केंद्र सरकारने जमिनीचे व्यवहार ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बर्‍याच प्रमाणात भ्रष्टाचार आटोक्यात येईल. सातबारा उतारा आणि अन्य जीर्ण झालेल्या कागदपत्रांची डिजीटलायझेशन करण्याचे धाडसी पाऊलही मोदी सरकारने उचललेले आहे. विधायक दृष्टिकोनातून सुरू असलेल्या या कामाला बळ देण्याऐवजी भाजपातील अनेक नेते मात्र अकारण ‘तू तू-मै मै’ करीत आहेत. दिल्लीत अरविंद केजरीवाल यांनी दिलेल्या मोठ्या झटक्यानंतरही त्यातून काही शिकण्याची यांची वृत्ती दिसत नाही. अहंकाराने आणि न्यूनगंडाने पछाडलेली माणसे स्वत:ची आणि राष्ट्राचीही वाट लावतात. भाजपमधील अनेकांचा अहंकार टोकाला गेला आहे तर विरोधक सपाटून मार खाल्ल्याने न्यूनगंडातून सावरायला तयार नाहीत. हे सारे चित्र लोकशाही व्यवस्थेच्या दृष्टिने घातक आणि तितकेच मारक आहे.
देश प्रगतीच्या दिशेने पाऊले टाकतोय असे वाटत असतानाच महाराष्ट्राची मात्र पुरती धुळधाण उडाली आहे. देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे अशा नेत्यांचा अपवाद वगळता सत्ताधारी नेते फारसे गंभीर दिसत नाहीत. केवळ अपघाताने आणि कॉंग्रेसविरोधी लाटेने मिळालेल्या या संधीने ते बिथरले आहेत. पंतप्रधान या नात्याने मोदी उत्तमोत्तम निर्णय घेत असताना यांचा कलगीतुरा थांबायला तयार नाही. आर. आर. आबांच्या   अकाली निधनाने राष्ट्रवादी कॉंग्रेस हादरली आहे. राष्ट्रवादीतील स्वच्छ चारित्र्याचे आणि समाजमान्य नेतृत्व म्हणून आबांकडे पाहिले जायचेे. भुजबळ, अजित पवार, तटकरे, जितेंद्र आव्हाड, पद्मसिंह पाटील या नेत्यांची नकारात्मक प्रतिमा तयार झाली आहे. त्यातून पक्षाला बाहेर काढणे आणि राष्ट्रवादीने जनहिताची भूमिका घेणे हा आता एक कल्पनेचाच भाग बनून गेलाय. 
दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमकतेचा उसना आव आणतेय. ‘जिथे अन्याय दिसेल तिथे लाथा मारा’ असा आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिलाय. जनतेने अशा लाथा घालायच्या ठरवल्या तर मनसेला युपी-बिहारी लोकाप्रमाणे पळ काढावा लागेल. ‘‘आम्ही पुढे कशी वाटचाल करायची यासाठी आम्हाला कोणी बाळकडू देण्याची आवश्यकता नाही, कारण ते बाळासाहेबांच्या सोबत राहून मी प्रत्यक्ष अनुभवले आहे,’’ असे विधान राज ठाकरे यांनी केले आहे. अपयशातून, न्यूनगंडातून अशी दर्पोक्ती करणे स्वाभाविकच आहे. ‘‘निवडणुकीनंतर मी एकेकाची औकात दाखवतो’’ असे सांगणार्‍या राज यांचा गर्व अजूनही उतरलेला दिसत नाही. कोणत्याही परिस्थितीत मनसेची शिवसेनेशी तुलना होऊ शकत नाही, हे न कळण्याएवढे राज ठाकरे दुधखुळे नाहीत. पक्ष कार्यकर्त्यांत, नेत्यात, पदाधिकार्‍यात आत्मविश्‍वास निर्माण व्हावा यासाठी पक्षप्रमुखांनी धीरोदात्त भूमिका घ्यायलाच हवी. मात्र ते करताना इतरांचा द्वेष केल्यास काय होते ते भारतीय लोकशाहीत अनेकदा सिद्ध झाले आहे. ‘निवडून आल्यानंतर नरेंद्र मोदी यांना माझे खासदार पाठिंबा देतील’ असे सांगणार्‍या राज ठाकरे यांनी मोदींना तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात याचे भान ठेवा, असे सांगण्याचा अधिकार तरी उरतो का? ही नैतिकता तूर्तास तरी राज ठाकरे यांच्याजवळ दिसत नाही. 
मोदींच्या निमित्ताने मारवाडी, गुजराथ्यांवर आगपाखड करण्याऐवजी आपण आता व्यापक आणि सर्वसमावेशक भूमिका घ्यायला हवी. विधायक आणि सकारात्मक निर्णयाचे मोठ्या मनाने स्वागत करायला हवे. या मातीतल्या पक्षांना बळकटी द्यायला हवी. केंद्र आणि राज्य यांच्यात समन्वय साधणार्‍या नेत्यांच्या पाठीशी उभे रहायला हवे. हे काम शिवसेनेशिवाय अन्य कुणी करताना दिसत नाही. शिवसेनेने त्यांचा स्वाभिमानी बाणा टिकवत, दूरदृष्टितून घेतलेले निर्णय राज्यहिताचे आहेत. आपल्या शहराच्या, राज्याच्या विकासासाठी यापुढे प्रत्येक नागरिकाने पुढाकार घ्यायला हवा. तशी दक्षता घेतली गेली तर आणि तरच महाराष्ट्र देशापुढे काहीतरी वेगळा आदर्श निर्माण करू शकेल.  
- घनश्याम पाटील 

संपादक, प्रकाशक 'चपराक' पुणे 
७०५७२९२०९२
Follow Me : @EditorChaprak

No comments:

Post a Comment