Tuesday, November 13, 2018

दुर्बल ‘सबल’ व्हावेत!


ही गोष्ट आहे दोन तगड्या माणसांची! 
एक प्रतिभेचा जागृत ज्वालामुखी होता; तर दुसरा अतिशय शून्यातून राजकारणात आपलं नाव गोंदवणारा! 
त्याचं झालं असं की, ‘शव हे कवीचे जाळू नका हो, जन्मभरी तो जळतचि होता’ असं सांगणारे लोककवी मनमोहन नातू आजारी पडले. वयानुसार त्यांनी अंथरूण धरलं तरी त्यांची उमेद, त्यांचा स्वाभिमान हा मात्र तसाच होता. ती बातमी तेव्हाच्या एका आघाडीच्या वृत्तपत्रात आली. त्याकाळी वृत्तपत्रात काय छापून यायचं याकडं राजकारण्यांचं बारकाईनं लक्ष असायचं. माहिती, मनोरंजन आणि ज्ञान समाजाला एकाचवेळी देणारी वृत्तपत्रं असल्यानं राजकारण्यांवर त्यांचा अंकुश असायचा. 
तर ही बातमी महाराष्ट्राच्या तेव्हाच्या अर्थमंत्र्यांनी वाचली. त्यांचं मन भरून आलं. डोळे पाझरू लागले. आपल्या आवडत्या कवीचं आपल्याला विस्मरण झालं म्हणून त्यांना उचंबळून आलं. त्यांनी हातातली सर्व कामं बाजूला सारली. मुंबईहून गाड्यांचा ताफा निघाला तो थेट पुण्याकडं. मनमोहनांच्या घरासमोर अर्थमंत्र्यांची लाल दिव्याची गाडी थांबली.
सगळ्यांना आश्चर्य वाटलं. अर्थमंत्र्यांच्या साहित्यप्रेमाचं कौतुकही वाटलं. मंत्रीमहोदय मनमोहनांजवळ गेले. त्यांना त्यावेळी धड बोलता येत नव्हतं की उठून बसता येत नव्हतं. 
अर्थमंत्र्यांनी त्यांची अडचण ओळखली आणि सांगितलं, ‘‘तुम्ही उठू नकात. बोलूही नकात. मी फक्त तुमचे आशीर्वाद घ्यायला आलोय. तुमच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायला आलोय.’’
अर्थमंत्री म्हणाले, ‘‘माझ्या लहानपणी मी तुमच्या कविता आकाशवाणीवरून ऐकायचो. त्या अनेकांना म्हणून दाखवायचो. मी कोर्टात नोकरी केली. राजकारणात आलो. आता अर्थमंत्री आहे. तुमच्या कवितेचा संस्कार माझ्यात रूजलाय. मला तुमच्यापर्यंत पोहोचण्यास उशीर झाला. आज वृत्तपत्रात तुमच्या तब्येतीविषयी वाचले आणि तुम्हाला भेटायला आलोय. माझ्या आवडत्या कवीराजाला मला काहीतरी द्यायची इच्छा आहे. तुम्हाला काय देऊ ते सांगा....’’
त्यावर सगळे शांत झाले. त्यांचा नम्रपणा पाहून भारावूनही गेले. काहींच्या पोटात गोळा आला की हे आता काय मागणार? कदाचित सरकारी कोट्यातून घर मागतील, मुलासाठी नोकरी मागतील, गाडी मागतील किंवा त्यांच्या नावे काही सरकारी कार्यक्रम, उपक्रम सुरू करण्याची इच्छा व्यक्त करतील....
सगळ्यांचं लक्ष मनमोहनांकडं होतं. 
अफाट प्रतिभेचा हा अवलिया अर्थमंत्र्यांकडं पाहत होता. त्याला शब्द फुटत नव्हते. मग त्यांनी खुणेनं सांगितलं की मला कागद-पेन द्या...! ते दिलं गेलं. त्यावर मनमोहन नातू या अफाट प्रतिभेच्या बेफाट माणसानं चार ओळी लिहिल्या. सगळ्यांना वाटलं, त्यांना जे हवंय ते त्यांनी लिखित स्वरूपात मागितलंय. काय लिहिलं असावं त्यावर? सगळेच विचारात पडले.
थरथरत्या हातानं लिहिलेलं ते अक्षर कुणालाही कळत नव्हतं. आजचे आघाडीचे लेखक असलेले डॉ. न. म. जोशी हा तरूण त्यावेळी तिथं होता. त्यांना मनमोहनांचं अक्षर लागायचं. तो कागद अर्थातच त्यांच्याकडं दिला गेला. त्यावर लिहिलं होतं,
मी तर नृपती खाटेवरचा
मला कुणाचं दान नको; 
तुम्हास जर का काही घेणे
देऊन टाकीन मी त्रिभुवने!
खाटेवर असले म्हणून काय झाले? ते तर साहित्यातले राजेच होते. त्यांना आणखी कोण काय देणार? 
या वयातही इतकी निस्पृहता आणि स्वाभिमान हा आजच्या काळात चेष्टेचा विषय ठरावा. या अर्थमंत्र्यांनी पुढे बरीच मजल मारली. ते राज्याचे मुख्यमंत्री झाले. देशाचे गृहमंत्री झाले. कोर्टातला शिपाई ते देशाचे गृहमंत्री असा प्रवास असलेले सोलापूरचे नेते सुशीलकुमार शिंदे यांच्याबाबतची ही सत्य घटना. मनमोहनांना जाऊन आज कितीतरी वर्षे झाली. मात्र सुशीलकुमारच काय तर कोणीही त्यांना उपेक्षेशिवाय काहीच देऊ शकले नाही. युगानुयुगाची अवहेलना वाट्याला आलेला हा कवी अनेकांच्या हृदयात मात्र आजही बेगुमानपणे राज्य करतोय. त्यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर हे वाचा -
राजकीय पुरूषांची कीर्ती
मुळीच मजला मत्सर नाही
आज हुमायू-बाबरपेक्षा
गालिब हृदय वेधित राही!
काळाच्या ओघात कितीतरी हुमायू-बाबर येतील-जातील... समाजाच्या अंतःकरणात मात्र गालिबच ठाण मांडून बसलेला असेल.
असे ‘गालिब’ आज किती आहेत? त्यांच्यातला ‘स्वाभिमान’ जिवंत आहे का? मग त्यांना ‘पुरस्कार वापसी’च्या कुबड्या का बरे घ्याव्या लागतात?
लोकमान्य टिळकांच्या बाबत एक किस्सा सांगितला जातो. त्यावेळी ते मंडालेच्या तुरूंगात होते. इकडं त्यांच्या मुलानं एका परीक्षेत घवघवीत यश मिळवलं. त्यानंतर त्यांनी लोकमान्यांना पत्र लिहिलं. त्यात लिहिलं, ‘‘माझं हे शिक्षण पूर्ण झालंय. आता पुढं काय करू?’’
त्यावर उलटटपाली टिळक लिहितात, ‘‘पुढं काय करायचं हे तुच ठरव! पण जे काही करशील ते सर्वोत्तम कर! भलेही तू चप्पल विकण्याचा व्यवसाय कर... पण लोकांनी म्हटलं पाहिजे, चप्पल घ्यायची तर टिळकांच्या मुलाकडूनच!’’
गुणवत्तेचा, दर्जाचा ध्याय घेणारे असे आज किती लोक आहेत?  समाजाचं नेतृत्व करणार्‍या धुरिणांचं सोडा! आपण आपल्या मुलांना तरी असं स्वातंत्र्य देतो का? त्यांच्यावर अपेक्षांचं ओझं किती प्रमाणात लादतो? त्या पूर्ण झाल्या नाहीत तर कुणाकुणाचं आणि किती नुकसान होतं? ‘जे करशील ते सर्वोत्तम कर’ असं त्याला सांगण्याचं धाडस आपल्यापैकी कितीजण करतात? अगदी एखादं नवं हॉटेल सुरू झालं, तिथल्या पदार्थांची चव भन्नाट असली तरी काही दिवसातच त्याची रया गेलेली असते. एखाद्या लेखकाची एक-दोन पुस्तकं गाजली की तो ओढून-ताणून लिहायला लागतो. त्यासाठी करावे लागणारे अविरत परिश्रम त्याला नको असतात. नाव झालं की काहीही खपवता येतं असा अहंकार वाढतो आणि क्षणात सर्व काही होत्याचं नव्हतं होतं. 
पंडित जवाहरलाल नेहरू हे देशाचे पंतप्रधान होते. त्यांनी महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण यांना फोन केला. त्यांना सांगितलं, ‘‘तुम्हाला केंद्रीय संरक्षणमंत्री पदाची शपथ घ्यायचीय...’’
खरंतर ही वार्ता ऐकून कोणीही हर्षोल्हासित होईल. त्याला त्याच्या आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं वाटेल. इथं मात्र नेमकं उलटं घडलं. क्षणाचाही विलंब न करता यशवंतराव म्हणाले, ‘‘मी बोलून कळवतो.’’
खुद्द देशाचे पंतप्रधान एका प्रादेशिक नेत्याला त्याचं क्षितिज विस्तारण्याची संधी देत होते आणि हे म्हणत होते, ‘‘मी बोलून कळवतो...’’
इतकी मोठी संधी येत असताना आणि खुद्द पंतप्रधान सोबत असताना आणखी कुणाशी बोलायला हवं? नेहरूंनाही हा प्रश्न पडला आणि त्यांनी त्याबाबत विचारणा केली.
यशवंतराव म्हणाले, ‘‘जिने माझ्यासोबत सुख-दुःखात राहण्याचा, मला साथ देण्याचा निश्‍चय केलाय त्या माझ्या अर्धांगिनीला, वेणुबाईला विचारावं लागेल... तिच्या सल्ल्याशिवाय, परवानगीशिवाय मी काहीच करत नाही...’’
नेहरूंनाही आश्चर्य वाटलं. त्यांनी यशवंतरावांच्या या पत्नीप्रेमाचं, स्त्री-पुरूष समानतेचं कौतुक केलं. 
आपल्या बायकोला असा सन्मान देणारे, तिच्या इच्छा-आकांक्षांचा विचार करणारे, तिला प्रेम आणि जिव्हाळ्याबरोबरच योग्य तो आदर देणारे असे किती लोक आज शिल्लक आहेत? 
दुसरे पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांच्याबाबतचाही एक किस्सा सर्वश्रुत आहे.
ते त्यावेळी कॉंग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य होते. दरमहा त्यांना पन्नास रूपये मानधन मिळायचं. त्यात त्यांचं घर चालायचं.
एकदा एक मित्र अचानक त्यांच्याकडं आला. त्यानं सांगितलं की, ‘‘माझ्या बायकोची तब्येत बिघडलीय. तिला डॉक्टरकडं नेणं गरजेचं आहे. शक्य तितकी आर्थिक मदत करा...’’
शास्त्रीजींपुढं प्रश्‍नचिन्ह उभं होतं. आता काय करावं? आपल्याला जेवढं मानधन मिळतं तितक्यात घरखर्च चालतो. शिल्लक अशी काही नव्हतीच. मित्र तर संकटात आहे. त्याला मदत करणं हे आपलं कर्तव्यच आहे. काय बरं करावं? 
ते विचारात असतानाच त्यांच्या पत्नी ललितादेवी घराबाहेर आल्या. त्यांनी या दोन मित्रांमधील संवाद ऐकला होता. ललितादेवींनी क्षणाचाही विलंब न करता त्यांना पन्नास रूपये दिले. मित्र निघून गेला.
शास्त्रीजींना कळत नव्हतं की हे पैसे आले कुठून?
त्यांनी त्याबाबतची विचारणा केली. 
तेव्हा ललिताबाई म्हणाल्या, ‘‘तुम्ही दरमहा तुमचे पन्नास रूपये मानधन मला घरखर्चासाठी देता. दरमहा मी पंचेचाळीस रूपयांत घर भागवते आणि उरलेले पाच रूपये बचत करते. एखाद्याच्या अडचणीला हे पैसे आले नाहीत तर त्यांचा काय उपयोग? म्हणून ते मी त्यांना दिले...’’
शास्त्रीजींना त्यांच्या पत्नीचा अभिमान वाटला. त्यांनी ललिताबाईंचं कौतुक केलं. इतरांची सहवेदना अनुभवण्याइतकी संवेदनशीलता त्यांच्याकडं आहे याचं त्यांना अप्रूप वाटलं. 
ललिताबाई आतल्या खोलीत वळल्या आणि शास्त्रीजींनी कॉंग्रेस वर्किंग कमिटीला पत्र लिहिलं, ‘‘माझं घर दरमहा पंचेचाळीस रूपयात चालतं. पाच रूपये जादा येत असल्यानं माझी पत्नी त्याची बचत करत आहे. असलेला पैसा चलनात असावा आणि गरजेपुरताच पैसा सोबत ठेवावा या विचाराचा मी असल्यानं या महिन्यापासून माझे वाचवलेले पाच रूपये कमी करावेत आणि ते अन्य गरजूंना द्यावेत.’’
सदैव राष्ट्रसेवेसाठी तत्पर असलेल्या अशा देशभक्ताचं हे वागणं आज अनेकांना खुळेपणाचं वाटू शकेल. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ज्याला ‘सद्गुण विकृती’ म्हणायचे ती यापेक्षा वेगळी थोडीच असते? आज असे किती लोक आपल्या आजूबाजूला आहेत बरं? नसतील तर यात दोष कुणाचा? आदर्शाची ही महान परंपरा नेमकं कुणामुळं, कशी आणि का खंडित झाली असावी?
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबतचीही एक छान गोष्ट आहे.
ते आश्रमात होते. त्यावेळी एक गृहस्थ त्यांच्याकडं आले. बापूजींचं सूतकताईचं काम सुरू होतं. ते म्हणाले, ‘‘बापूजी मी एक उद्योजक आहे. भरपूर पैसा कमावला. मुलं मार्गी लागलीत. सारं काही करून झालंय. त्यामुळं आता मला देशसेवा करायचीय. आपण मला मार्गदर्शन करा. मी नेमकं काय करू शकतो?’’
बापूजी म्हणाले, ‘‘माझं हातातलं हे काम पूर्ण होईपर्यंत तुम्ही बसा. मग आपण चर्चा करू!’’
ते गृहस्थ बाजूला जाऊन बसले. गांधीजींचं काम सुरूच होतं. पाच मिनिटं, दहा मिनिटं, अर्धा तास, पाऊण तास...
या महाशयांना अशी कुणाची वाट पाहण्याची सवय नव्हती. त्यामुळं त्यांची अस्वस्थता वाढत चालली होती.
थोड्या वेळानं बापूजी जवळ आले. म्हणाले, ‘‘माफ करा. माझं काम सुरू होतं. आता बोला. काय म्हणालात?’’
ते गृहस्थ म्हणाले, ‘‘मला देशसेवा करायचीय. काहीतरी काम सुचवा.’’
गांधीजी म्हणाले, ‘‘भल्या गृहस्था, मी सुतकताई करत होतो तेव्हा माझं लक्ष तुमच्याकडेच होतं. तुम्ही माझी वाट पाहताना चार वेळा या जागेवरून उठलात. या माठातलं ग्लासभर पाणी घेतलंत. अर्धा ग्लास पाणी तुम्ही प्यालं आणि अर्धा ग्लास टाकून दिला. यापुढं एक काम करा. जेवढी तहान असेल तितकंच पाणी ग्लासात घ्या. इतकं जरी प्रामाणिकपणे केलंत तरी तुमच्या हातून राष्ट्राची खूप मोठी सेवा घडेल. या आता...’’
त्यांचे हे विचार आपण कितीजण आचरणात आणतो? ज्या गोष्टी गरजेच्या नाहीत अशा किती गोष्टी टाळतो? जे सहजशक्य आहे तेही करताना आपण अक्षम्य हलगर्जीपणा, दुर्लक्ष का बरं करतो? आपल्याला आणखी वेगळे आदर्श कसले हवेत?
आता थोडंसं मागं जाऊया. 
तो काळ होता महाभारताचा. 
पांडव वनवासात होते. तहानेनं व्याकुळलेले असताना एका डोहात पाणी आणण्यासाठी एकेकजण जात होते. त्यांना तिथून यक्षाचा आवाज येत होता. काही प्रश्‍न विचारले जात होते. तो आवाज न ऐकल्यावर, त्याच्या प्रश्‍नाला उत्तरं देता न आल्यावर एकेकजण मूर्च्छित होऊन पडत होता. सगळेजण पाणी आणायला जाऊनही एकही परतला नाही म्हणून शेवटी न्यायप्रिय युधिष्ठिर तिकडं गेले. त्यांनाही यक्षाचा आवाज आला. त्यांना विचारलं गेलं, ‘‘जगात सर्वात श्रेष्ठ कोण?’’
युधिष्ठिराकडून उत्तर आलं, ‘‘ब्राह्मण!’’
मग अर्थातच पुढचा प्रश्‍न आला. ‘‘खरा ब्राह्मण कोण?’’
युधिष्ठिरानं सांगितलं, ‘‘जो न्याय, नीतीनं वागतो, ज्याची ज्ञानाची लालसा आहे, ते ज्ञान जो इतरांना देतो, जो धनसंचय करत नाही तो खरा ब्राह्मण.’’
पुढचा प्रश्‍न आला, ‘‘हे गुण एखाद्या ब्राह्मणात नसतील तर?’’
युधिष्ठिरानं क्षणाचाही विलंब न करता सांगितलं, ‘‘मग तो खरा शूद्र!’’
‘‘आणि एखाद्या शूद्रात हे गुण असतील तर?’’
युधिष्ठिर महाराज म्हणाले, ‘‘मग तो शूद्र कसा राहील? तोच खरा ब्राह्मण!’’
या व अशा संवादानंतर यक्ष खूश झाला. त्यानं सांगितलं, ‘‘मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तू योग्य उत्तरं दिल्याबद्दल मी तुझ्या दोन भावाला शुद्धीत आणतो. कुणाला ते तू ठरवं आणि सांग.’’
यक्षाला अर्थातच अपेक्षित होतं की तो सर्वशक्तीमान भीम आणि अर्जुनाला शुद्धीत आणायची विनंती करेल. या लढाईत त्या दोघांची खरी गरज आहे.
युधिष्ठिरांनी सांगितलं, ‘‘आपण नकुल आणि सहदेवाला शुद्धीत आणावं...’’
आता आश्चर्यचकित व्हायची वेळ यक्षाची होती. त्यानं त्याचं कारण विचारलं.
युधिष्ठिर म्हणाले, ‘‘जे दुर्बल आहेत त्यांना आपण उभं करायला हवं. जे सबल आहेत त्यांना थोडा त्रास झाला तरी ते त्यांच्या क्षमतेच्या बळावर उभे राहतील...’’
यक्षानं युधिष्ठिराच्या या समतोल बुद्धीचा मान राखत सर्वांनाच शुद्धीत आणलं.
आज आपली ‘शुद्ध’ जागेवर आहे का? 
दुर्बलांना सबल करण्यासाठी आपण काय करतोय?
राजकीय घोषणाबाजी काय होते? लोककल्याणकारी राज्याच्या नावावर कुणाकुणाला कसे अडवले जाते, नागवले जाते हे आपण पाहतोच आहोत. ‘बळी तो कान पिळी’ असा जणू अलिखित नियमच झालाय. मग दुर्बलांचं काय? त्याच्या सर्वांगीण विकासासाठी नेमकं काय करता येईल?
सध्या आपण सर्व एका अराजकाकडं निघालोय. 
प्रत्येकाला आपलंच दुःख मोठं वाटतंय. 
ते गोंजारताना ना आपल्यात सहवेदना अनुभवण्याची ताकत उरलीय ना आपल्यात विश्वात्मक विचार उरलाय. 
सगळं काही लिहिण्यासाठी, वाचण्यासाठी, बोलण्यासाठी!
आदर्शांचे जे काही मनोरे उभारलेत त्याचे इमले ढसढसा कोसळत आहेत. देव, देश आणि धर्माच्या विरूद्ध वागण्याला प्रतिष्ठा मिळतेय. एकीकडं महासत्तेची स्वप्नं पाहताना दुसरीकडं आपण आपलं जे ‘अस्सल’ आहे तेच निकालात काढायला निघालोय. 
या सगळ्याचा विचार व्हायला हवा. जे परिस्थितीनं आणि विचारानं ‘दुर्बल’ आहेत ते सबल झाले तर आणि तरच हे चित्र पालटू शकेल. ती क्षमता सर्वांत जागृत होवो यासाठी सदिच्छा देतो.
(संचार दिवाळी अंक 2018)

- घनश्याम पाटील, पुणे
7057292092


Monday, November 12, 2018

अगम्य, अतर्क्य!

एका खेडेगावात एक व्याख्याता तावातावात बोलत होता. त्यानं सांगितलं, ‘‘स्त्री आणि पुरूष ही रथाची दोन चाकं आहेत. ती एकसाथ चालली तरच कुटुंबाचा, संसाराचा गाडा धडपणे चालतो. ही चाकंच आपल्याला समानतेची शिकवण देतात...’’

त्या व्याख्यात्याचं लंबंचौडं भाषण थांबवत एक आजीबाई उठल्या. त्या म्हणाल्या, ‘‘कसली समानता आलीय साहेब? स्त्री-पुरूष ही समानतेची चाकं न्हायीत. रथाची तर न्हायीतच न्हायीत. असलीच तर ती सायकलची चाकं असत्याल. एक फुडं, एक म्हागं... त्यात कसली आलीय समानता? सायकल चालवणारा गडी माणूस! ब्रेक त्याच्या हातात. हॅन्डल त्योच धरतो. त्यो नेयील तिकडं आपसूक जायाचं. ब्रेक मारला की झिज मागच्या चाकाची व्हनार! धावती सायकल आपसूक थांबणार! कॅरिअर म्हागं लावलेलं. म्हणून ओझं असंल तर ती बी मागच्या चाकावर. आपण कुरबुर न करता गुमानं पुरूषांच्या मागोमाग जायाचं...’’

अर्थातच त्या व्याख्यात्याचं भाषण गडबडलं... 

आजीबाईंनी नेमकेपणं समानतेचं सार सांगितलं. स्त्री शिकली. प्रगती झाली. ती स्वावलंबी झाल्यानं अनेक क्षेत्रात तिनं नेत्रदीपक कामगिरी करून दाखवली. देशाच्या पंतप्रधानापासून ते राष्ट्रपती पदापर्यंत स्त्रीनं मजल मारली. असं सारं असूनही काही सन्माननीय अपवाद वगळता ही स्वावलंबी स्त्री आज स्वतंत्र आहे का? तर त्याचं उत्तर नकारात्मकच येईल. कोणी कितीही आव आणला, स्त्रियांच्या प्रगतीचे गोडवे गायले तरी हे वास्तव नाकारता येणार नाही. ‘हृदयी अमृत, नयनी पाणी’ हे चित्र कसं बदलणार? तिच्या हृदयातलं अमृत अवश्य पाझरत रहावं पण डोळ्यात पाणी हवंच का?

आपल्याकडं असमानतेचा पाया इतका भक्कम असताना आपल्यात समानता कशी येणार? स्त्री-पुरूष मैत्री निकोप कशी राहणार? आजच्या जमान्यात स्त्री-पुरूष मैत्री ही गरज आहे, आकर्षण आहे की फॅशन? की यापुढचं आणखी काही नवं नातं रूढ होतंय?

स्त्री म्हणजे जननी! निर्मितीचा आविष्कार! मातृसत्ताक परंपरेचे गोडवे गाणार्‍या आपल्या देशात तीच सर्वाधिक पिडली जाते, नागवली जाते. ‘नर आणि मादी’ या संकल्पनेच्या पुढे आपला गाडा काही जातच नाही. म्हणूनच सारं काही व्यर्थ ठरतं. 

युगानुयुगे या नात्याच्या समानतेसाठी अनेकांची धडपड सुरू आहे. त्यात यश आलंय असं ज्यांना वाटतं ते त्यांचं ‘भासात्मक सत्य’ आहे. काहीवेळा असं सत्य आरशासारखं असतं. त्यात चेहरा बघितल्यावर आपल्याला आपलं प्रतिबिंब दिसतं. आपण खूश होतो. आपलं व्यक्तिमत्त्व कसं आहे याची जाणीव आपल्याला होते. मात्र आरशातील हा चेहरा म्हणजे ‘मिरर’ इमेज असते. तो आपल्याला आपला ‘उलटा’ चेहरा दाखवत असतो आणि आपण तोच सत्य समजून आनंदी राहतो.

असा आनंद कशातही मानता येईल. त्यात गैरही काही नाही! पण म्हणून स्त्री-पुरूष समानता आलीय असं धाडसी विधान मात्र कोणीही करू नये. शहरी भागातल्या, ग्रामीण भागातल्याही स्त्रिया शिकल्यात. त्यांची कमाईही सुरू आहे. अनेकजणी आपापल्या नोकरी-व्यवसायात मग्न आहेत. ‘ठेविले अनंते तैसेही रहावे’ या उक्तीप्रमाणे त्या समाधानी असल्याचा आवही आणतात. घरच्या आणि बाहेरच्या लढाईसाठी सदैव सज्ज असतात. म्हणून काही त्या स्वतंत्र ठरत नाहीत. सुरक्षित राहत नाहीत. जोपर्यंत आपली मानसिकता बदलत नाही तोपर्यंत ही परिस्थिती बदलणार नाही. 

स्त्रियांच्या प्रश्नाबाबत आपण किती जागरूक आहोत हे पाहण्यासाठी एक साधे उदाहरण घेऊ! अनेकजणी प्रवासाला निघाल्यावर कमी पाणी पितात. त्याचे कारण काय? तर रस्त्यात शौचालये नाहीत! जी आहेत ती इतकी अस्वच्छ असतात की इन्फेक्शन आणि अन्य आजारांना निमंत्रणच जणू! जागोजागी महिलांसाठी सुलभ शौचालेयही उपलब्ध नसलेल्या आपल्या देशात ‘स्वच्छ भारत अभियान’ राबवलं जातं. पूर्वी किमान दोन गावात अंतर असायचं. आता शहरीकरणाच्या नादात गावं इतकी जवळ आलीत की रस्त्यात कुठं थांबणंही मुश्किल होऊन जातं. माग एकदा वाचण्यात आलं होतं की, घरोघरी जाऊन मार्केटिंगची कामं करणार्‍या तरण्या-ताठ्या मुलींना शौचालयं उपलब्ध नसल्यानं हॉटेलचा आधार घ्यावा लागतो. एकतर आधीच तुटपुंजं उत्पन्न! त्यात हॉटेलला खाणं परवडत नसल्यानं या मुली शौचालयाची सुविधा असणारं एखादं चांगलं हॉटेल पाहतात. तिथं जाऊन चार-पाच जणी अर्धा-अर्धा चहा घेतात. टॉयलेटचा वापर करून, पुन्हा कमी पाणी पिऊन बाहेर पडतात. केवळ या एका कारणासाठी कमी पाणी प्याल्यानं अनेक मुलींना विविध आजारांनी ग्रासलं आहे. हे असं सगळं भयानक चित्र असताना आपण समानतेवर परिसंवाद ठेवतो. त्यात भाषणं ठोकतो. स्त्री सगळ्या बंधनातून मुक्त झाल्याचं सांगतो. ती स्वतंत्र, स्वावलंबी आणि सुरक्षित असल्याचे ढोल पिटतो. ‘लाज’ नावाचा प्रकार ना आपल्या ढिम्म व्यवस्थेत उरलाय ना आपल्या निर्ढावलेल्या मनात!

स्त्री सन्मानाबाबत एक कहाणी सांगितली जाते. ही गोष्ट आहे आद्य शंकराचार्यांच्या काळातली. म्हणजे झाली असतील त्याला हजार-बाराशे वर्षे! आद्य शंकराचार्य आणि मंडन मिश्र यांच्यात धर्म, संस्कृती, रूढी-परंपरा, वेद यावरून वाद सुरू झाले. थोडावेळ दोघांनी चर्चा केली. एकमेकांचे मुद्दे खोडून काढले पण शंकराचार्यांनी मंडन मिश्र यांना थांबवले. ते म्हणाले, ‘‘आपण भांडतोय खरे! पण आपल्या दोघांत बरोबर कोण हे कसं ठरवणार? याचा न्यायनिवाडा कोण करणार?’’

त्यांच्या या प्रश्नावर मंडन मिश्र म्हणाले, ‘‘माझी पत्नी भारती ही विवेकी आहे. अभ्यासू आहे. तिची सारासार बुद्धी तटस्थ आणि न्यायप्रिय आहे. ती ठरवेल. तिचा निर्णय आपण अंतिम मानू...’’

त्यानंतर आद्य शंकराचार्य आणि मंडन मिश्र यांच्यात दीर्घकाळ चर्चा झाली. वाद-प्रतिवाद झाले. विविध विषयांवर मंथन घडलं. हे सगळं भारती यांनी ऐकलं. सर्व बाजू समजून घेतल्या आणि त्या काळात आपल्या पतीच्या विरूद्ध आणि शंकराचार्यांच्या बाजूनं कौल दिला. शंकराचार्य बरोबर आहेत हे भारती यांनी ठामपणे सांगितलं. 

ते ऐकून प्रभावित झालेल्या आद्य शंकराचार्यांनी सांगितलं की, ‘‘मी तुमच्या न्यायबुद्धीचा आदर करतो. तुम्ही तुमच्या पतीच्या विरूद्ध तटस्थपणे माझ्या बाजूनं न्याय दिला. एका स्त्रीच्या या विवेकाची पुढच्या पिढीला कल्पना यावी म्हणून वचन देतो की, यापुढे जे कोणी माझ्या म्हणजे शंकराचार्याच्या गादीवर बसतील ते त्यांच्या नावापुढं तुमचं नाव लावतील...’’

तेव्हापासून शंकराचार्यांच्या नावापुढं ‘भारती’ हा शब्द लावलेला असतो. उदा. वरदानंद भारती! 

म्हणजे शंकराचार्यांसाठी सुद्धा ‘न्यायाधीशा’ची भूमिका घेत न्यायनिवाडा करणारी स्त्री आपल्या धर्मात कशी कमी लेखली जाते यावर तावातावात भाषणं ठोकली जातात. त्यासाठी दरवेळी आपल्या सोयीनुसार ‘मनुस्मृती’चा आधार घेतला जातो.

खरंतर मनुस्मृती हा काही आपला धर्मग्रंथ नाही. त्यानुसार आजवर कुणीही राज्यकारभार केला नाही, करू शकणार नाहीत. अगदी पुण्यात पेशवे सत्तेवर असताना जर तिकडं लोकमाता अहिल्यादेवी होळकर न्यायबुद्धीनं राज्य करू शकत असतील तर स्त्रियांनी सत्ताकारण करू नये, असा मनुस्मृतीचा दाखला देण्यात काय अर्थ? 

काळ झपाट्यानं बदलतोय. नाण्याला दोन्ही बाजू असतात. त्याप्रमाणं स्त्रियाही बदलत आहेत. स्त्रियांवरील अन्याय-अत्याचारांविषयी खूप लेखन झालंय. अजूनही होतच राहतं. त्यात ‘बाईची भाईगिरी’ हा विषय मात्र फारसा चर्चेला येत नाही. तो स्वतंत्र लेखाचा, नव्हे पुस्तकाचाच विषय आहे. स्त्रिया सगळ्या क्षेत्रात ज्या हिरिरीनं पुढे येत आहेत ते पाहता त्या गुन्हेगारीच्या क्षेत्रातही कमी नाहीत. जगभरातील कुख्यात स्त्री गुन्हेगारांचा मागोवा घेतला तर तो रंजक आणि तितकाच भेदकही आहे. आईच्या महत्तेचं, तिच्या त्यागाचं वर्णन मोठ्या संख्येनं झालं. ते पाहता, ‘दुधावरी आला बुरा, तिले साय कधी म्हणू नये, जिची ममता आटली तिले माय कधी म्हणू नये...’ हेही आपण लक्षात घ्यायला हवं. ममता आटलेल्या, वात्सल्याची जागा द्वेषानं, सूडानं घेतलेल्या, क्षणिक स्वार्थापोटी वाटेल त्या थराला जाणार्‍या स्त्रिया कमी थोड्याच आहेत?

सध्या ‘मी टू’ ही चळवळ (?) सुरू आहे. त्यात अभिनय आणि पत्रकारितेतील मुली पुढं येऊन त्यांना पुरूषांकडून काय काय सहन करावं लागलं हे धाडसानं सांगत आहेत. कोणतीही मुलगी आपल्या चारित्र्यावर प्रश्‍नचिन्ह निर्माण होईल असं विधान कधी करणार नाही. आजचा काळ पाहता मात्र स्त्रिया किंवा पुरूष काहीही करू शकतात, कोणत्याही पातळीला उतरू शकतात हे वारंवार दिसून आलं आहे. त्यामुळं अशा तथाकथित चळवळीमागं काही षडयंत्र आहे का हेही तपासून पहायला हवं. ‘लग्नाच्या आमिषानं पाच वर्षे बलात्कार,’ ‘नोकरीच्या-बढतीच्या आमिषानं बलात्कार,’ ‘पैशाची-पदाची, संपत्तीची लालसा दाखवून बलात्कार’ या व अशा बातम्या वाचल्या की आश्‍चर्य वाटतं. म्हणजे ही ‘फसवणूक’ ठरू शकेल! पण याला बलात्कार कसं म्हणावं? म्हणजे काम होईपर्यंत ‘ये तू’ आणि इप्सित साध्य झाल्यास किंवा त्यात काही अडचणी निर्माण झाल्यास ‘मी टू’ हे काही खरं नाही. वाटेल ते उद्योग करून ‘मिटवू’ म्हणणार्‍यांत आणि या ‘मी टू’ म्हणणार्‍यांत मग कितीसा फरक उरतो? यातून आपण काय संदेश देतोय हे तपासून पहायला हवं. कोणत्याही अन्याय, अत्याचाराच्या विरूद्ध कधीही आवाज उठवणं हे गरजेचंच आहे. ते धाडसं ‘ती’नं करायलाच हवं. ते करताना अकारण कुणाच्या आयुष्याची रांखरांगोळी मात्र करू नये!

मध्यंतरी काही घटना उघडकीस आल्या. केवळ दणकून पोटगी मिळावी म्हणून काही मुली, स्त्रिया समाजातील ‘गब्बर’ लोकांसोबत लग्न करतात. काही दिवस त्यांच्यासोबत घालवून घटस्फोट मागतात. त्यासाठी वाटेल ते बनाव रचतात. आरोपांच्या फैरी झाडून समोरच्याचं जगणं उद्ध्वस्त करतात. हा लेख लिहित असतानाच परभणीहून एक बातमी येतेय. एका बाईनं तिथल्या एका तरूणाला सतत ‘ब्लॅकमेल’ करून शरीरसंबंध ठेवायला भाग पाडल्यानं आत्महत्या केलीय. म्हणजे आपण नक्की कोणत्या दिशेनं जातोय हे पाहणं गरजेचं आहे. 

सध्या ‘स्वीट डॉल’ हा एक प्रकार काही ठिकाणी दिसून येतोय. परदेशातील अशा खुळचट कल्पना आपल्याकडं झपाट्यानं पसरतात. स्वीट डॉल म्हणजे काय तर आपल्या वडिलांच्या, आजोबांच्या वयाचे जे सधन पुरूष आहेत त्यांना हेरायचं, त्यांच्यासोबत बायकोप्रमाणं वागायचं आणि आपल्या सर्व गरजा पूर्ण करून घ्यायच्या. विसी-बाविशीतल्या मुली पन्नासीच्या पुढच्या ‘श्रीमंत’ माणसांसोबत ‘राहतात’ आणि आर्थिक कमाईसोबतच त्यांची हौस-मौज पूर्ण करून घेतात. अशा मुलींनी ‘मी टू’ चळवळीला पाठिंबा दिला तर दोष कुणाला द्यायचा?

आपली कायदा आणि न्याय व्यवस्थाही नवनवीन आदेश काढत असते. विविध प्रकरणात न्यायनिवाडे करताना जे निर्णय दिले जातात त्यावरून समाजस्वास्थ धोक्यात येतं. ‘समलिंगी संबंधांना मान्यता’ असे निर्णय घेतले गेल्यास ‘तुमचा बाप समलिंगी असता तर तुमचा जन्मही झाला नसता’ असं ठणकावून सांगण्याचं धारिष्ट्य आपल्यात का शिल्लक राहत नाही? 

बरं, स्त्रियांची आणि पुरूषांची विचार करण्याची पद्धतही वेगवेगळी! म्हणजे एखादी स्त्री तिच्या प्रियकराचा विचार करते तेव्हा ‘त्याचा’ हात आपल्या हातात गुंफलाय इथून तिचं स्वप्नं सुरू होतं. इकडं हा पठ्ठ्या जेव्हा तिचा विचार सुरू करतो तेव्हा थेट बेडरूमची कडी लावण्यापासूनच त्याची विचारप्रक्रिया सुरू असते. चित्रातली, चित्रपटातली नग्नता पाहताना अनेकजण सांगतात की, आधी तुमच्या डोळ्यातली नग्नता पहा! तिच्या कपड्यावरून शेरेबाजी करण्याऐवजी तुमची नीतिमत्ता सुधारा! पण या प्रवचनांचा खरंच काही उपयोग होतो का? या सर्वांमुळं बहुतेकांच्या मनातली वासना चाळवली जाते हे सत्य आपण का स्वीकारत नाही? पुरूषांच्या अंडरवेअरची जाहिरात करतानाही इथं स्त्रीच लागते आणि एखाद्या परफ्युममुळं त्याच्याकडं आकर्षित होऊन थेट त्याच्याशी शय्यासोबत करायला तयार असणार्‍या जाहिरातीतही स्त्रीच असते. हा त्यांचा अवमान नाही का? याविरूद्ध कोणत्याही स्त्रीवादी संस्था, संघटना, कार्यकर्त्या कसलाही आवाज का उठवत नाहीत? शनिशिंगणापुरला मंदिरात स्त्रियांना प्रवेश मिळावा म्हणून पेटून उठणार्‍या तृप्ती देसाई इथं का बरं थंडावतात? की अशा कोणत्याही बड्या कंपन्यांच्या उत्पादनाविरूद्ध ब्र ही काढायचं धाडस आपल्या कोणत्याही सामाजिक कार्यकर्त्यांत नाही? 

स्त्री-पुरूष समानतेचा जयघोष करताना आपल्या मनात अहंकारही नको आणि न्यूनगंडही नको! ‘आमच्याकडं स्त्रियांना किती मोकळीक आहे....’ असं सांगणारे पुरूष घरात प्रत्यक्षात कसे वागतात हे आपण सर्वजण जाणतोच. बाकी सोडाच, पण एखाद्यानं प्रेमविवाह केला तर ‘आपण आंतरजातिय प्रेमविवाह केला’ असे ढोल पिटण्यातच तो धन्यता मानतो. काहीजण तर निश्‍चयानं आपापल्या जातीबाहेरील मुलीशी लग्न करून त्याची जाहिरात करत असतात. म्हणजे प्रेमही असं ठरवून, मुलींचे जाती-धर्म पाहून, त्यांना आपल्या जाळ्यात ओढून केलं जातं का? प्रेम कधीही, कुणावरही होऊ शकतं. ते व्यक्त केलं, समोरच्यानं त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला तर दोन मनं एकत्र येतील. तिथं जात-पात, धर्म, वय, शिक्षण असे निकष लावून कसं चालेल? जर मियांबिबी राजी असतील, ते एकमेकांना समजून घेत असतील, त्यांच्या सुख-दुःखात एकरूप होत असतील तर इतरांनी त्यात लुडबूड करण्याचं कारणच काय? समाजानंही हे सारं प्रगल्भपणे स्वीकारायला हवं.

‘स्त्री ही क्षणिक काळची पत्नी आणि अनंत काळची माता असते’ असं म्हणतात ते उगीच नाही. प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या मागे एक स्त्री असते हेही सांगितलं जातं. अनेक ठिकाणी ते अनुभवायलाही येतं. तिचं तरल आणि संवेदनशील मन पुरूषाला उभारी देतं. ती जितकी मायाळू असते तितकीच प्रसंगी ती कणखरही होते. तिच्या निश्चयापुढं मोठमोठे पर्वतही थिटे ठरतील. आमच्या मराठवाड्यात, विदर्भात अनेक शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. खरंतर या सगळ्यात सर्वाधिक ससेहोलपट होते ती घरातल्या स्त्रीची! तिला जे सहन करावं लागतं, जे भोगावं लागतं त्यापुढं पुरूषांचं दुःख निश्चितपणे नगण्य आहे. तरीही कोणत्याही शेतकरी स्त्रीनं कधी आत्महत्या केल्याचं दिसून आलं नाही. ती दुष्काळाशी, समाजाशी, उदासीन प्रशासनाशी झगडत राहते. नवर्‍यानं आत्महत्या केली तरी नेटानं जगते, लेकरा-बाळांना शिक्षण देते. प्रसंगी मोलमजुरी करून आपल्या पाल्याला विविध क्षेत्रात उत्तुंग यश मिळवून देणार्‍या महानायिका आपल्याकडं चिक्कार आहेत. त्यांचा स्वाभिमान, त्यांची जिद्द, चिकाटी, त्यांचे अथांग परिश्रम, त्यांचा संघर्ष हे सारं काही अतुलनीय आहे. त्यामुळं छोट्या-मोठ्या गोष्टींचा बागुलबुवा करून काही स्त्रिया जेव्हा आकांडतांडव करतात तेव्हा आश्चर्य वाटते.

स्त्री कुटुंब जोडते, ती कुटुंब तोडतेही! तिची सगळीच रूपं अतर्क्य, अगम्य. तिचं मन जाणणारा, तिला समजून घेणारा पुरूषही तितकाच दुर्मीळ! ही दोन चाकं कधी फारशी एकत्र येतच नाहीत. 

असं सारं असलं तरी या नात्यात एक गोडवा असतो. स्त्री-पुरूष समानतेचा जागर करताना आपण आधी एकमेकांविषयी आपल्या मनात व्यापक, उत्तुुंग प्रेमभावना ठेवू. एकमेकांकडं माणूस म्हणून बघितलं तरी अनेक समस्या सुटतील. एक तरल, निकोप नातंच समाज सुदृढ ठेऊ शकतं. त्यासाठी आपला विवेक वाढत जावो, मनातील गैरसमजाचं, उच्च-नीचतेच, खोट्या प्रतिष्ठेचं, दिखाव्याचं मळभ दूर होवो याच या निमित्तानं शुभेच्छा! 
(अपेक्षा मासिक दिवाळी 2018)

- घनश्याम पाटील, पुणे 
7057292092


Sunday, November 11, 2018

स्वतःपासूनची सुरूवात महत्त्वाची!

12 जानेवारी 1863! या दिवशी आपल्याकडे बंगालमध्ये नरेंद्र विश्वनाथ दत्त नावाच्या एका महान युगपुरूषाचा जन्म झाला. त्यांच्याबाबतची एक गोष्ट सांगतो. 1880 च्या कालखंडातील ही घटना. हा तरूण त्याच्या गुरूकडे गेला. गुरू कालिकादेवीच्या पूजेत मग्न होते. त्याने गुरूंना वंदन करून सांगितलं, ‘‘गुरूवर्य, सध्या मी खूप अस्वस्थ आहे. माझ्या वडिलांचं निधन झालंय. मला प्रचंड नैराश्य आलंय. हे जग सोडून कुठंतरी दूर निघून जावंसं वाटतं.’’

गुरूंनी सांगितलं, ‘‘तुला असं का वाटतं? तू तर एक संन्यस्त वृत्तीचा राष्ट्रप्रेमी तरूण आहेस...! हा विचार तुझ्या मनात का यावा?’’

त्या तरूणानं सांगितलं, ‘‘हे दुःख, या वेदना फक्त माझ्यासाठी नाहीत. मला माझ्या आईच्या वेदना पाहवत नाहीत. बहिणीच्या डोळ्यातले अश्रू अस्वस्थ करतात. त्यातून मी प्रचंड बेचैन झालोय.’’

गुरूंनी सांगितलं, ‘‘ठीक आहे. आत कालिकादेवीच्या समोर जा आणि तुला हवं ते माग. तुझं हे दुःख दूर व्हावं यासाठी कालिकामातेकडं साकडं घाल. ही माता तुला दुःखमुक्त करेल. तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेल.’’

हा तरूण पुढं गेला. डोळे भरून कालिकादेवीला बघितलं. त्याला स्वत्वाचा विसर पडला आणि भारावून जात त्यानं मागणं मागितलं, ‘‘माते, मला ज्ञान दे, वैराग्य दे, भक्ती दे, विवेक दे...’’ 

गुरूंनी विचारलं, ‘‘काय रे! आईचं, बहिणीचं दुःख दूर कर, असं तू देवीला सांगितलंस का?’’

तो म्हणाला, ‘‘मी हे विसरूनच गेलो.’’ 

गुरूंनी सांगितलं, ‘‘पुन्हा आत जा. तुला जे हवं ते माग...’’

पुन्हा हा तरूण आत गेला. कालिकादेवीकडं पाहत त्याच्या तोंडून तेच शब्द बाहेर पडले, ‘‘माते, मला ज्ञान दे, वैराग्य दे, भक्ती दे, विवेक दे...’’ आणि त्यातूनच भगवान रामकृष्ण परमहंसांनी त्याला सांगितलं, ‘‘नरेंद्रा, तुझा जन्म मानवी कल्याणासाठी आहे. तू राष्ट्राला नवा विचार देऊ शकतोस. अनेकांचा उद्धारकर्ता होऊ शकतोस. तू नेहमी स्वतःचा नाही तर समाजाचा, राष्ट्राचाच विचार करशील...’’ आणि आपण सर्वांनी त्यांनी पुढे घालून दिलेला आदर्श बघितलाच आहे. 

सध्या आपल्याकडं तरूणाईच्या संस्कारांचा विषय सातत्यानं चर्चेला येतो. कितीही नावं ठेवली तरी आजचे हे तरूण आपले संस्कार जिवंत ठेवत आहेत, हे खरंय! असं म्हणतात, ज्या राज्यात धान्याअभावी दुष्काळ पडतो तिथली जनावरं मरतात. काहीवेळा माणसंही मरतात! मात्र जिथं संस्कारांचाच दुष्काळ पडतो तिथली मानवताच मरते. त्यामुळे हा संस्कारांचा दुष्काळ पडू नये यासाठी तरूणांनीच पुढं येणं गरजेचं आहे. तसे ते येतही आहेत. 

नाण्याच्या दोन्ही बाजू आपण बघायला हव्यात. ‘आमच्यावेळी असं नव्हतं’ असं म्हटलं की मोठ्या लोकांचा विषय संपतो. तरूणांनी काय केलं पाहिजे हे मात्र कोणी सांगत नाही. त्यांना दुषणं देण्यात, बोल लावण्यात मात्र सगळेच आघाडीवर.

एक गोष्ट सांगतो. एका राजपुत्राची दृष्टी अधू झाली. सूर्यप्रकाशात गेलं की त्याला अस्वस्थ वाटू लागलं. त्याचं भान हरपून तो वाटेल ते चाळे करू लागला. त्यावर खूप उपचार झाले. अनेक वैद्य-हकिमांनी त्याची तपासणी केली. मात्र त्याच्या या आजारावर उपचार काही होत नव्हते. मग एका वैद्यानं राजाला सांगितलं, ‘‘राजपुत्राला आपण फक्त हिरवा रंग दाखवा. अन्य रंग त्यांच्या दृष्टिस पडला तर त्यांना त्रास होतो. सर्वत्र हिरवा रंग असेल तर त्यांना कसलाच धोका नाही, कसला त्रास नाही.’’

तो प्रयोग राजानं करून बघितला. महालात सर्वत्र हिरवे गालीचे अंथरले. भिंतींना हिरवा रंग दिला. पडदेही हिरवेच लावले.. आणि चमत्कार घडला. राजकुमार सामान्य मुलांप्रमाणे वावरू लागला. त्याला होणारा त्रास संपुष्टात आला.

या उपायामुळे राजा मात्र चिंतीत झाला. राजपुत्राला असं चार भिंतीत कोंडून ठेवणं त्याच्या मनाला पटणारं नव्हतं. बाकी सगळे उपाय झाले होते. त्यामुळं दुसरा काही मार्गही दिसेना. आता संपूर्ण राज्य हिरवं करायला हवं. राजानं प्रधानाला विनंती केली. यावर विचारपूर्वक काहीतरी तोडगा काढायला सांगितला. अर्थातच, प्रत्येक कथेतला प्रधान हुशार असतो. तो नवनवीन कृप्त्या लढवतो. हा प्रधानही त्याला अपवाद नव्हता. त्यानं सांगितलं, ‘‘महाराज, यावर उपाय आहे. आपल्याला राज्यभर हिरवा रंग न देताही राजपुत्राला बाहेर नेता येईल. राजपुत्र सर्वत्र आनंदानं फिरू शकतील, बागडू शकतील...’’

राजानं सांगितलं, ‘‘खर्चाची चिंता करू नका. तातडीने उपाय करा...’’

प्रधानानं सांगितलं, ‘‘महाराज यासाठी काहीच खर्च नाही. जेमतेम शंभर-दीडशे रूपयांत काम होईल.’’

सगळेजण आश्‍चर्यचकित झाले. इतक्या कमी पैशात सगळं राज्य हिरवं कसं करावं, हे कुणालाच कळेना.

प्रधान बाहेर गेला आणि त्यानं एक हिरवा चष्मा आणला. तो राजकुमाराच्या डोळ्यावर घालायला सांगितला. आता राजकुमाराला सगळं जग हिरवं दिसू लागलं. त्यासाठी वेगळे असे काहीच प्रयत्न करावे लागले नाहीत.


आपलंही तसंच असतं. प्रत्येक प्रश्‍नावर छोटे-छोटे उपाय असताना आपण नको ते विचार करत बसतो. त्यातून सोप्या गोष्टी अवघड होतात. 

आता आपण ग्रीस देशाकडं वळूया! ग्रीसमध्ये उत्तमोत्तम नाटके व्हायची. ही नाटकं करताना पात्र कुणाचं आहे हे कसं ओळखायचं? म्हणजे राजा कोण, प्रधान कोण, राणी कोण, सेवक कोण हे कसं ओळखायचं? मग त्यासाठी ‘पर्सोने’ तयार केले गेले. पर्सोना म्हणजे मुखवटा. हे मुखवटे सगळ्यांना दिले गेले. हा राजाचा मुखवटा, हा राणीचा मुखवटा, हा प्रधानाचा तर हा शिपायाचा मुखवटा. त्यातून कळायला लागलं की हे पात्र नक्की कुणाचं आहे ते! हा जो ‘पर्सोना’ आहे त्यातूनच पुढं ‘पर्सनॅलिटी’ हा शब्द आला. पर्सनॅलिटी म्हणजे व्यक्तिमत्त्व! आपल्या सगळ्यांना एक व्यक्तिमत्त्व असतं. ते वैचारिक, बौद्धिक तर असतंच पण शारीरिकही असतं. प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या प्रकारचं एक व्यक्तिमत्त्व असतं. एक चेहरा, मुखवटा असतो. आपल्यापैकी प्रत्येकाला एक मुखवटा आहे, व्यक्तिमत्त्वही आहे. त्या व्यक्तिमत्त्वाचा आविष्कार व्यक्त करण्याच्या प्रत्येकाच्या पद्धती मात्र वेगवेगळ्या असतात. त्यातून आपलं व्यक्तिमत्त्व पुढं येतं. त्यातूनच चांगले लेखक, कलाकार भेटतात. राजकारणी भेटतात. प्रत्येक क्षेत्रातील चांगले-वाईट लोक घडतात. प्रत्येकाची घडण्याची-बिघडण्याची रीत न्यारी. ज्याच्या त्याच्या क्षमतेनुसार, कष्टानुसार त्याचं फलित त्याच्या पदरात पडतं. म्हणून आपला ‘पर्सोना’ महत्त्वाचा. चेहरा आणि मुखवटा यातलं अंतर गळून पडलं की माणसाचं व्यक्तिमत्त्व उजळतं. ते अधिक प्रकाशमान होऊन इतरांच्याही आयुष्यात चैतन्य निर्माण करतं. चांगलं व्यक्तिमत्त्व असलेले प्रज्ञावंत, कलावंत पुढे यायला हवेत. त्यावर आपल्या देशाच्या प्रगतीचं मूल्यमापन होईल. आपलं क्षेत्र कोणतंही असेल, आपण कुठलंही काम करत असू, माणूस म्हणून असलेलं ‘चांगुलपण‘च आपल्याला तारून नेणार आहे एवढं लक्षात ठेवायला हवं. असं चांगूलपण हीच तर खरी गौरवाची बाब असते. तेच समाजाचं आणि राष्ट्राचं भूषण असतं. 

आजच्या तरूणाईला सांगावंसं वाटतं, तुम्ही लिहित रहा, वाचत रहा, नाचावंसं वाटतं नाचत रहा, गावंसं वाटतं गात रहा. ज्याला जे जमेल त्यानं ते करावं. क्षमता असूनही काहीच न करणं हा एक मोठा सामाजिक गुन्हा आहे आणि आपण सर्वजण तो सातत्यानं करतोय. गाणं सुंदर गाता येतं पण गात नाही. वेळच नाही आपल्याकडं! छान कविता करता येते पण करत नाही. उत्तम कादंबरी लिहिता येते पण लिहित नाही. मग आपण दोष कुणाला देणार? 

ज्यांच्याकडं निश्‍चित ध्येय आहे, त्या ध्येयाकडं वाटचाल करण्याची ज्यांची जिद्द आहे त्यांच्यात हजार हत्तींचं बळ संचारतं. अत्यंत प्रतिकूलतेतूनही ते विजयाच्या दिशेने घोडदौड करतात. अनेकांत अशी सुप्त शक्ती असते पण ती दिसायला तर हवी ना? त्याची अभिव्यक्ती फार महत्त्वाची आहे. म्हणजे कोणत्या ना कोणत्या माध्यमातून तुम्ही सातत्यानं तुमच्या क्षमता दाखवून द्यायला हव्यात. संस्कार जिवंत ठेवायचं पवित्र कर्तव्य आपण सार्‍यांनी मिळून पार पाडायला हवं. तरूणाई म्हणजे एक जाज्ज्वल्य आविष्कार, जबरदस्त उन्मेष! आपल्यात खूप काही आहे. प्रचंड ऊर्जा आहे. या ऊर्जेचा आपण राष्ट्राच्या भल्यासाठी उपयोग करायला हवा. सध्या हे चित्र दुर्मीळ दिसतंय. 

आपल्या जातीय अस्मिता अत्यंत टोकदार झाल्यात. धर्माधर्मात आपण वाटले गेलोय. देश विकलांग होत चाललाय. म्हणजे आपण हे जातीय मोर्चे पाहतोय. कुणाचा थांगपत्ता कुणाला नाही. सगळ्या विचारधारा... त्याही लादल्या जातात. शब्दशः कुठल्याही विचारधारेला बळी पडू नका. सगळं काही पडताळून पहा आणि मग अनुनय करा. म्हणजे, स्वामीजीच म्हणायचे, ‘‘आपल्या राष्ट्राला बौद्धिक क्षत्रियांची गरज आहे आणि असे क्षत्रिय निर्माण झाले तर शस्त्रास्त्रांची मुळीच कमतरता पडणार नाही.’’ 

तर असे बौद्धिक क्षत्रिय खरोखर निर्माण व्हायला हवेत. म्हणजे धर्म कशात आहे? खरा धर्म कोणता? स्वामीजीच सांगतात, ‘‘धर्म हा मतमतांतरात, धर्मग्रंथात वा शब्दात साठलेला नाही. धर्म म्हणजे आत्मानुभूती, आत्मसाक्षात्कार!’’ स्वतःची ओळख पटणं, स्वतःच्या क्षमतांची जाणीव होणं तो खरा धर्म! स्वतःतल्या क्षमता ओळखायला हव्यात. त्या आणखी विकसित करायला हव्यात आणि त्यातून व्यापक राष्ट्राची जी संकल्पना आहे ती पूर्णत्वास आणायला हवी. म्हणजे अब्दुल कलाम साहेबांनी सांगितलं, ‘‘2020 ला आपला भारत हा महासत्ता असेल.’’ 

अरे, कसा असेल? आपण त्यासाठी निश्‍चित काय करतोय? आपले काय प्रयत्न आहेत? कोण कुठला कन्हैया कुमार उगवतो आणि राष्ट्रविरोधी घोषणा देतो. सैनिकांवर आरोप करतो. देश पेटवतो. त्याचे पडसाद पुण्यासारख्या सांस्कृतिक नगरीतील फर्ग्युसन महाविद्यालयापर्यंत उमटतात. जिग्नेष मेवानी, उमर खालिदसारखे लोक शनिवारवाड्यावर येऊन सभा घेतात. समाजा-समाजात फूट पाडण्यासाठी जो तो तेल ओतत असतो. आपणही त्याच्या आहारी जातो. राजकारणी तर राजकारणच करणार! ते काही संत नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडून काही अपेक्षा ठेवाव्यात असे चित्र नाही. अशावेळी आपली सद्विवेकबुद्धी, आपला विवेक कुठं जातो? आपण कुणाच्याही बोलण्याला बळी पडून आपापसात का भांडत राहतो? हे कसलं भिकार लक्षण आहे? हे सगळं थांबायला हवं. आपली प्रत्येकाची ती नैतिक जबाबदारीच आहे.

सध्या सगळ्या क्षेत्रांचं बाजारीकरण झालंय. हे बाजारीकरण थांबायलाच हवं. म्हणजे मी अनेक ठिकाणी फिरत असतो. बरेचजण मला विचारतात, ‘‘तुमचे आईवडिल तुमच्याकडेच राहतात का?’’ मी सांगतो, ‘‘नाही, मी माझ्या आईवडिलांकडे राहतो.’’ स्वतःचे कुटुंब, आईवडील यांचीही आपण पर्वा करत नाही आणि जगाशी संपर्क वाढवायला निघालोय. मग ‘‘भाजी बिघडलीय’’ असं नवर्‍यानं सांगितलं तर बायको म्हणणारच, ‘‘असं कसं, याच भाजीच्या इमेजला मला फेसबुकवर 300 लाईक आणि 102 कमेंट आल्यात. अनेकांच्या तोंडाला पाणीही सुटलंय...’’ 

घरात काय चाललंय, आजुबाजूला काय चाललंय, गावात काय चाललंय हे माहीत नसतं आणि आपल्या जगभरच्या चर्चा सुरू असतात. ट्रम्पनं असं करावं, नरेंद्र मोदींनी हे केलं, योगी आदित्यनाथ हे करताहेत, ममता बॅनर्जी ते करताहेत! अरे, आता तू काय करतोस हे जास्त महत्त्वाचे आहे. म्हणजे आपलं पडणारं प्रत्येक पाऊल विकासाच्या दृष्टिनं जायला हवं. आपण आधी ‘माणूस‘ म्हणून संपन्न व्हायला हवं. त्यासाठी आपले मुळात काय प्रयत्न आहेत? 

सगळ्यात मोठं ज्ञानकेंद्र कोणतं? तर विद्यापीठ! महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यापीठांच्या फक्त कुलगुरूंची नावं तरी आपल्याला माहीत असतात का? मुळीच नसतात कारण आपल्याला त्याची गरजच वाटत नाही. पूर्वी ऋषी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचे.  ज्ञान द्यायचे. आजचे कुलगुरू, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक नेमकं काय करतात? विद्यार्थ्यांच्या मनावर आणि जीवनावर त्यांचा कसा प्रभाव पडतो? त्यातून काही साध्य होतं का? शाळा-महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना फक्त माहिती मिळते की ज्ञान?  मग ही शोकांतिका नाही का? यादृष्टिने काही विचार होणार का? आपली ज्ञानकेंद्रच दुर्लक्षित आहेत... इंग्लंडसारख्या राष्ट्रात तुम्ही गेलात तर ते सांगतील, ‘एकवेळ आम्ही आमचं साम्राज्य देऊन टाकू; पण आमचा शेक्सपिअर आणि आमचं क्रिकेट आम्ही कुणालाच देणार नाही...’ याला म्हणतात अस्मिता! आपली भाषा, आपली संस्कृती, आपले खेळ यासाठी आपण काय करतोय? इथले मराठमोळे खेळ जिवंत रहावेत यासाठी कोणी काही प्रयत्न करतंय का? क्रिकेटवर तुम्ही जरूर प्रेम करा पण कबड्डीची काय अवस्था आहे हेही बघा. आपल्या खेळाडूंची, इथल्या मातीतल्या कलावंतांची काय उपेक्षा आहे ती बघा. आपलं टॅलेंट आपणच ओळखायला हवं. आपल्यातल्या क्षमता जास्तीत जास्त विकसित व्हायला हव्यात. एक चांगलं राष्ट्र, एक चांगलं राज्य, एक चांगलं गाव आणि एक चांगलं कुटुंब निर्माण व्हायला हवं. अर्थात याची सुरूवात आपल्यापासून, आपल्या कुटुंबापासून व्हायला हवी. मला खात्री आहे, आपण नक्कीच या दृष्टिनं एक पाऊल पुढं टाकू. आपण जे काही उत्तमोत्तम करू तेच सत्य आणि चिरंतन असणार आहे. ‘राष्ट्र’ ही संकल्पना खूप व्यापक असते. ती आपण सातत्यानं समजून घेऊ! सुरूवात स्वतःपासून करू!

भारत हा असा एक देश आहे जिथे सध्या सर्वाधिक तरूणांचं प्रमाण आहे. ‘तरूणांचा देश’ अशी आपल्या राष्ट्राची ओळख आहे आणि इथली आदर्श संस्कृती आपणा सर्वांना माहीतच आहे. आपण कितीजण रोज किमान दहा मिनिट व्यायाम करतो? म्हणजे श्‍वासोच्छ्वास आपण कुणाला विचारून करतो का? तो ठरवून करत नाही तर ती एक नैसर्गिक क्रिया आहे. तसंच रोज व्यायाम ही सुद्धा एक गरज आहे. रोज किमान अर्धा तास अवांतर वाचन ही गरज आहे. याच्याकडेच आपण दुर्लक्ष करतो. सगळ्या जगाचा ठेका माझ्याकडेच आहे, मलाच जग सुधारायचंय अशा आविर्भावात आपण असताना आपण स्वचिंतन करत नाही. स्वविकास साधत नाही. स्वतःकडं आपण लक्षच देत नाही, ही शोकांतिका आहे. ती थांबवायला हवी. 
(पुढारी दिवाळी 2018)

- घनश्याम पाटील
संपादक, ‘चपराक’, पुणे
7057292092

‘राहिलेलं’ राहूच द्या!

ज्यानं खूप काही उभं केलंय, सोसलंय, अनुभवलंय त्याचं बरंच काही करायचं राहून जातं! कारण त्याची स्वप्नं, त्याची ध्येयं, त्याचं क्षितिज सगळं काही अवाढव्य असतं. माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या आयुष्याचा परिघ असून असून केवढा? इवलंसं आयुष्य! त्यात काय करणार आणि काय राहणार? तरीही ‘राहून गेलेल्या गोष्टीं’ची विचारणा होतेच...! कोणी एकदम असं काही विचारलं की आयुष्याचं सिंहावलोकन सुरू होतं. काय राहून गेलंय याचा शोध घेताना काय काय करामती केल्यात याही डोळ्यासमोर येतात आणि मग गंमत वाटते. असो. आज फक्त राहिलेल्या गोष्टीच सांगायच्यात.

मराठवाड्यातल्या चाकूर तालुक्यातलं हिंप्पळनेर हे माझं गाव. गाव तसं छोटसंच पण आडवळणाचं. सातवीत असताना ते सोडावं लागलं. त्यानंतर आयुष्याची दिशाच बदलली. संघर्षाशिवाय काही मिळत नाही, हे परिस्थितीनुरूप बसणार्‍या चटक्यांनी शिकवलं होतं. त्यामुळं भविष्यात काय करायचंय हे त्या नकळत्या वयातच ठरलं होतं.

हिंप्पळनेरला असताना घराजवळ असलेल्या विठ्ठल-रूकमाई मंदिरातील काकडआरतीच्या आवाजानं जाग यायची. मग ‘मंजन’ घेऊन दात घासायचे, चपलात पाय ढकलायचे आणि रानाकडं पळत निघायचं. पाच-सहा किलोमीटर पळत गेल्यावर कधी विहिरीत किंवा कधी डोहात मस्तपैकी पोहायचं. त्यानंतर रानातले ताजे अंजीर, बोरं, चारं, बिब्याची फुलं, जांब (पुणेरी भाषेत पेरू), मक्याची कणसं, कोवळ्या काकड्या, भुईमुगाच्या शेंगा, उडदाच्या-मुगाच्या शेंगा, ऊस असं काहीतरी घ्यायचं आणि ते खात सावकाश घर गाठायचं. घरी आल्याआल्या चुलीवरची गरमागरम भाकरी दुधात चुरायची आणि शेंगदाणा चटणीसोबत हादडायची. त्यानंतर शाळा. आमच्या गावाजवळ असलेल्या हणमंतजवळगा या गावाजवळ असलेले वीर हनुमान विद्यालय हे चार-पाच किलोमीटर अंतरावर! अर्थात तिथपर्यंत चालतच जायचं आणि चालतच यायचं. सुटीच्या दिवशी रानातील माळवं (भाजीपाला) काढायचा आणि आठवडी बाजारात विकायचा. सगळं काही सुरळीत चाललं होतं. त्याचवेळी आमची जमीन गावकीच्या भांडणात गेली. क्षणार्धात सगळं होत्याचं नव्हतं झालं. निसर्गाच्या कुशीत वावरताना अचानक घाव बसला आणि गावाची नाळच तुटली. अजूनही हे बंध जोडता आले नाहीत. गावातलं ते मनसोक्त जगणं राहूनच गेलं. गावात काही कटू अनुभव नक्की आले. त्यामुळं मन विटलं... पण चांगुलपणाची शिदोरीही भक्कम होती. मायेच्या पदरात घेणारं गाव तुटलं ते तुटलंच!

त्यावेळची एक गंमत सांगाविशी वाटते. तेव्हा श्रीकृष्णा, रामायण या मालिकांनी सर्वांनाच भुरळ घातली होती. मीही त्याला अपवाद नव्हतो. जंगलात, डोंगरात जाऊन जप-तप केलं की देवबाप्पा प्रसन्न होतो आणि मागेल तो वर देतो हे त्यामुळं ठाऊक होतं. मग काय! एकेदिवशी जवळच्या डोंगरावर गेलो. चालून थकल्यावर डोंगराच्या सपाट भागावरील एक मोठा दगड पकडला. त्यावर बैठक मारून रामनामाचा जप सुरू केला. ‘श्रीराम जयराम जयजयराम’च्या घोषात घशाला कोरड पडली. अन्न-पाण्याचा विषयच नव्हता. मग मनातल्या मनात जप सुरू केला. त्यात तल्लीन झालो. सांच्यापार झाली, काळोख दाटला तरी घरी न आल्यानं सगळे परेशान! मग झाली शोधाशोध सुरू. नको नको त्या चर्चा. त्यावेळी मुलं पळविणारी टोळी सक्रिय होती म्हणे! सगळा गाव धुंडाळून झाल्यावर पोलिसांकडं तक्रार द्यायची ठरलं. काहींनी तर ‘नदी, डोह, विहिर इकडंही शोध घ्या’ असं सुचवलं. मग आईची रडारड. वडिलांचं उद्वेगानं चिडणं... तेवढ्यात एका गुराख्यानं सांगितलं, ‘‘मी बंटीभैय्याला माळावर जाताना बघितलं...’’

आता मात्र सगळ्यांनाच धस्स झालं! गावकर्‍यांनी कंदील घेतले आणि सगळे डोंगराच्या दिशेनं निघाले. वरपर्यंत आल्यावर बघतात तर काय, एका मोठ्या धोंड्यावर बसून एक ‘दगड’ रामनामाचा जप करत होता... मग कशा पद्धतीनं जोरदार स्वागत झालं असेल आणि कसली भारी वरात निघाली असेल हे वेगळं सांगायला हवंय का? पण मिसुरडंही न फुटलेल्या वयात साधना पूर्ण करून परमेश्‍वराकडून वरदान मागून घेणं राहूनच गेलं...

त्यानंतर नारंगवाडी गाठली. ही वाडी उमरगा तालुक्यात येते. भूकंपग्रस्त भाग. सास्तूर आणि किल्लारी या दोन महत्त्वाच्या भूकंपकेंद्रांचा मध्यबिंदू म्हणजे नारंगवाडी. तिथल्या भारत शिक्षण संस्थेच्या जयराम विद्यालयात आठवीला प्रवेश घेतला. इथलं वातावरण मात्र एकदम वेगळं होतं. आपण घर सोडून, गाव सोडून इथं आलोय याची जाणीव होती. शिवाय झालेल्या अन्यायाचा बदला घ्यायचं भूत मानगुटावर घट्ट बसलं होतं. मग कराटेचं प्रशिक्षण सुरू झालं. कधी नव्हे तो जोरदार अभ्यास सुरू झाला. अवांतर विषयांवरील वाचन झपाट्यानं वाढवलं. कुटुंबाला हातभार लावायचा म्हणून रोज पहाटे वृत्तपत्र विक्री सुरू केली. सायकलवर घरोघरी जायचं आणि पेपर टाकायचे हा दिनक्रम सुरू झाला. त्यातून माणसं कळू लागली. जगरहाटी समजली. बरे-वाईट अनुभव आले. 

या नारंगवाडीत आठवीच्या वर्गात असताना प्रारंभी मी वाचकपत्रं लिहायला सुरूवात केली. नंतर कविता, लेख, कथा छापून यायला लागल्या. गाव आणि परिसरातील छोट्या-मोठ्या बातम्या पाठवू लागल्यानं ‘तरूण भारत‘सारख्या दैनिकानं त्यांचा ‘वार्ताहर’ म्हणून जबाबदारी दिली. आपण लिहिलेलं साहित्य, आपल्या बातम्या नावासह छापून येत आहेत आणि तो अंक आपणच घरोघर वाटप करतोय याचा आनंद असायचा. सुरूवातीला काही काळ वाटायचं, परिस्थितीनं आपल्यावर ही वेळ आणलीय. विशेषतः मैत्रिणींच्या घरी पेपर टाकताना संकोचल्यासारखं व्हायचं. मात्र त्यात आपलं नाव छापून येतंंय म्हटल्यावर मग तोच अभिमानाचा विषय झाला.  या परिसरातील जमीन एकदम भुसभुशीत, काळीशार! इथं थोडी जागा घ्यावी, रानातच शेड उभारून रहावं, जनावरं पाळावीत, छान शेती करत आनंदानं जगावं असं वाटायचं! पण ते शक्य नव्हतं. ही सगळी स्वप्नं स्वप्नच राहिली. असं मस्तमौला जगणं राहूनच गेलं. 

पुढं किल्लारीतील महाराष्ट्र महाविद्यालयात दाखल झालो. तेव्हा नव्या किल्लारीत मुख्य बसस्थानकाजवळ ‘पाटील न्यूजपेपर एजन्सी’ची सुरूवात केली. स्थानिक विषयांवर जोरदार हल्लाबोल करायचा, शाब्दिक फटकेबाजी करताना कुणाचाच मुलाहिजा राखायचा नाही या वृत्तीमुळं अनेक वाद आणि वितंडवाद ओढवून घेतले. नवनव्या जबाबदार्‍या पेलल्या. हरतर्‍हेच्या आव्हानांना सामोरा गेलो. हे सगळं करताना बालपण कसं सरलं ते कळलंच नाही. सगळ्यांसोबत खेळायला जाणं, मौजमजा करणं, मोठ्यांकडून कोडकौतुक करून घेणं असलं काही वाट्याला आलं नाही. आपण भले आणि आपले काम भले असाच खाक्या! घरातील आणि नात्यातील ‘मोठ्यां’नाही माझ्या या सर्व उचापत्यांचं कौतुक वाटायचं. आज यशाचे नवनवीन उच्चांक गाठताना, व्यावसायिक विक्रम रचनाता लक्षात येतंय की, अरेच्चा! आपण तर बालपण जगलोच नाही. परिस्थितीच्या ओझ्यानं असेल किंवा महत्त्वाकांक्षेच्या ध्येयवादानं असेल पण बालपण अनुभवणंच राहून गेलं... आयुष्यातली ही महत्त्वाची वर्षे नियतीनं माझ्या आयुष्यातून बहुधा वजा केली असावीत असंच आता वाटतंय.

पुढं पुण्यात आलो. पुणे शहर आणि जिल्ह्यातील ‘संध्या’ या पहिल्या सायंदैनिकात काम करण्याची संधी मिळाली. तेव्हा वय होतं सोळा! काम करत करत शिकावं म्हणून टिळक रस्त्यावरून जवळच असलेल्या ‘गरवारे महाविद्यालयात’ बारावीच्या कला शाखेसाठी प्रवेश घेतला. तेव्हा मी पुणे महानगरपालिकेचं वार्तांकन करायचो. ‘संध्या’चा अग्रलेख लिहायची जबाबदारीही माझ्याकडं आली होती. त्यामुळं आत्मविश्‍वास दुणावला होता. त्याचकाळी ‘पत्रकारितेतील भीष्माचार्य’ अशी ओळख असलेल्या दैनिक संध्याचे संस्थापक संपादक वसंतराव तथा तात्या काणे यांनी संध्या हे दैनिक पिंपरीतील कांबळे नावाच्या एका गृहस्थास विकले. नव्या व्यवस्थापनाशी माझं काही जुळलं नाही आणि मी तिथून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. ‘वयाने कमी, पुण्यातील नाही आणि अजून शिक्षणही पूर्ण नाही’ म्हणून इतर वृत्तपत्रांनी कामाची संधी काही दिली नाही. एखादा मासा पाण्याबाहेर राहू शकेल काय? अगदी तशीच माझी तडफड सुरू झाली आणि मग त्या उद्रेकातून मी स्वतःचीच संस्था सुरू करण्याचा घाट घातला. वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी ‘मालक, मुद्रक, प्रकाशक आणि संपादक’ असं बिरूद माझ्या नावामागं लागलं. मग सगळ्यांच्या अपेक्षा कैकपटींनी वाढल्या आणि एका नव्या अध्यायाची सुरूवात झाली.

एकीकडं संपादक, लेखक आणि प्रकाशक म्हणून लौकिक मिळत होता तर दुसरीकडं मोरपंखी दिवसांची चाहूलही स्वस्थ बसू देत नव्हती. बेभान होऊन प्रियतमेसोबत पतंगप्रीती करावी असं या वयात कुणाला बरं वाटणार नाही? आपलं वय आपल्या हातून काही प्रमाद घडवून आणतं. दुर्मीळात दुर्मीळ अपवाद वगळला तर हा निसर्गनियमच आहे. मी  अपवाद नव्हतो, हे काय वेगळं सांगायला हवं? मीही एका पुणेरी छोकरीच्या प्रेमात पडलो. पुण्यातल्याच पोट्ट्या या! आमचं बिनसलं आणि माझ्या लक्षात आलं की, भाऊ हे आपलं काम नाही. मुळात कुटुंबासाठी आपण वेळच देऊ शकत नाही तर कुणाचं आयुष्य का बरबाद करा? आपल्या समाजात बाबा आमटेंची कमतरता नाही, त्यांची ‘साधना’ बनायला मात्र आजकालच्या मुली तयार नसतात. मग त्या विषयाला मी कायमचा पूर्णविराम दिला. अविवाहीत रहायचा निर्णय पक्का केला आणि माझ्या कामाचा रथ अजून जोरात दामटला. त्या निर्णयाचं आज समाधान वाटतंय. लग्न करणं, मुलांचं संगोपन, त्यांचे लाडप्यार ही सगळी स्वप्नं मी बघितली होती पण त्या सगळ्यांचा ‘खेळखंडोबा’ होऊन बसला. जबाबदार्‍यांच्या ओझ्यांनी जसं बालपण गेलं तसं परिस्थितीच्या प्रवाहात तारूण्यही संपत आलंय. आईवडिलांची काळजी घेणं, त्यांच्यावर जिवापाड प्रेम करणं, त्यांना हवं-नको ते बघणं हे सोडलं तर कुटुंबाच्या, परिवाराच्या अन्य जबाबदार्‍या माझ्यावर पडल्या नाहीत. त्यामुळं हे असले सगळे ‘उद्योग’ करणं राहूनच गेलं...

‘करून दाखवलं’ या सदरातली काम विचाराल तर ती ढिगभर होतील. ‘करायची कामं’ विचाराल तर मग पर्वतच! त्याच्यापुढं राहून गेलेल्या गोष्टी नगण्यच! म्हणून त्याचं वैषम्य वाटत नाही. 

श्री, म्हणजे श्रीराम हा माझा सख्खा छोटा भाऊ! त्याच्या लग्नाला जाण्याइतका वेळही माझ्याकडं नव्हता. माझ्या व्यवसायाची ही हतबलता आहे. चुलत भाऊ-बहिणी, आते-मावस भाऊ-बहिणी ही तर फारच दूरची गोष्ट. बाहेर खंडीभर माणसं जोडलीत. अवतीभोवती माणसांचाच सागर असतो. मात्र आईवडील सोडले तर बाकी रक्ताच्या कुठल्याच नात्याशी कसलेच पाश राहिले नाहीत. त्यामुळं गर्विष्ठ, अहंकारी, कूपमंडूक, एकलकोंडा अशी माझ्याविषयी मतं बनणं यात नवल नाही. पहाटे साडेतीनला सुरू झालेला माझा दिवस रात्री अकरा-साडेअकराला संपतो तर मग हे सगळं कसं सांभाळणार? प्रत्येकांचे रूसवे-फुगवे कसे काढणार? नातेवाईकांच्या सुख-दुःखात सहभागी कसा होणार? त्यामुळं सगळ्यांविषयी हृदयात व्यापक, उदात्त भावना असून, प्रेमाचा सागर ओथंबून वाहत असूनही या सर्वांपासून दूर लोटला गेलो. या सगळ्यांसोबत ‘जगणं’ राहूनच गेलं की!

आम्हा मराठवाड्यातल्या लोकांवर भूकंपानं एक उपकार केलाय. कितीही मोठं संकट आलं तरी आम्हाला ते कस्पटासमान वाटतं. मृत्युचं तांडव बघितलंय आम्ही! या वेदनेपेक्षा मोठी भळभळती जखम अजून कोणती असू शकते? त्यामुळं कितीही संकटं आली, प्रतिकूल परिस्थिती उद्भवली, काही कारणानं होत्याचं नव्हतं झालं तरी आम्ही खचत नाही, डगमगत नाही. पुन्हा नव्यानं तितक्याच जोमात, दमदारपणे सुरूवात करतो. ‘चार द्यायचे आणि चार घ्यायचे’ इतकं साधं सूत्र! मग कसलाच त्रास होत नाही. कितीही गोष्टी राहून गेल्या तरी नवनवीन आव्हानं आम्हाला खुणावत राहतात. म्हणूनच वैयक्तिक आयुष्याची राखरांगोळी झाली तरी मी त्यावर आनंदानं तुळशीपत्र ठेऊ शकलो. जे घडणारच नाही त्याचा शोक का बाळगावा? 

साहित्य, ग्रंथ प्रकाशन आणि पत्रकारिता क्षेत्रातील खूप मोठी स्वप्नं मी बघितलीत. ती सगळीच पूर्ण होतील असं अजिबात नाही! पण मोठी स्वप्नं पाहणं आणि ती पूर्णत्वास आणण्यासाठी धडपडणं हे मला माझं प्राथमिक कर्तव्य वाटतं. मराठी भाषेला आलेली मरगळ दूर करण्यासाठी, या क्षेत्रातील नकारात्मकता हटवण्यासाठी, प्रतिभावंतांना त्यांची हक्काची दालनं उभी करून देण्यासाठी कुणी ‘मसीहा’ येणार नाही. त्यासाठी आपल्यालाच पुढाकार घ्यावा लागेल. जे काही चांगलं घडेल ते आपणच घडवू. जे काही चुकीचं आहे ते आपणच थोपवू! भलेही हे करताना हजार चुका करू पण एकच चूक हजारवेळा होणार नाही याचीही काळजी घेऊ! युगपुरूष स्वामी विवेकानंदांना त्यांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी शंभर युवकांची गरज होती. कशावरून त्या शंभरातला मी एक नसेन? मग माझ्यावरील जबाबदारी किती पटीनं वाढली असेल याचा विचार करा मित्रांनो! 

हास्य, विरोध आणि स्वीकृती अशा परिवर्तनाच्या तीन प्रमुख पातळ्या असतात. आम्ही लढत होतो, पडत होतो. त्यावर अनेकजण हसत होते. त्यांना डोईजड जाईल असे वाटल्यावर प्राणपणानं विरोधही करत होते. त्या कशालाच न जुमानता, काय कमावले, काय गमावले याचा हिशोब न ठेवता आम्ही आमची ध्येयमार्गानुयात्रा सुरूच ठेवली. त्यामुळं हा विरोधही आम्ही हसत-हसत मोडून काढला. ती अवस्थाही  पूर्णत्वाच्या दिशेनं जात आहे. त्यामुळं आता आमची पुढची वाटचाल अधिक वेगानं होईल. म्हणूनच ‘करायच्या राहून गेलेल्या गोष्टीं’चे तपशील मनात आणि हृदयात साठवत पुढच्या मोहिमेसाठी आम्ही सज्ज आहोत. 

आजवर अनेक गोष्टी केल्या आहेत. करण्यासारखी चिक्कार कामं डोळ्यासमोर आहेत. काहीवेळा पानगळ झाली तरी नव्यानं फुटणार्‍या पालवीची चाहूल सातत्यानं जाणवते. म्हणून ‘राहून गेलेल्या गोष्टी’पेक्षा ‘करायच्या गोष्टी’ मला जास्त महत्त्वाच्या वाटतात. कोणीतरी म्हटलं आहे की, गाडीची समोरची काच मोठी असते आणि मागचा रस्ता दाखवणारा आरसा मात्र इवलासा! त्यामुळं मागून कोणी ठोकू नये यासाठी भूतकाळावर आरशाद्वारे लक्ष जरूर असावं पण लांबचा पल्ला गाठण्यासाठी समोरच्या काचेतून दूरवर पहावं... रस्त्यावरील खाचखळगे, छोटे-मोठे अपघात, आलेल्या तांत्रिक अडचणी, क्वचित प्रसंगी जाणवलेला शिणवटा या सर्वांवर यशस्वी मात करत प्रवाशानं पुढे पुढे जायला हवं. मीही तेच तर करतोय. चालकानं गाडी चालवायची असते. प्रवासी त्यांचं इच्छित स्थळ आलं की उतरतात. चालकानं त्याची तमा बाळगू नये! अर्थात, ही गाडी चालवताना काहीजण इंजिनाप्रमाणं घट्ट चिकटूनही राहतात. त्यांची समर्थ साथ आपल्याला पुढे जाण्यासाठी ऊर्जा देत असते. असे इंजिनाप्रमाणे जोडलेले अनेक मित्र, सहकारी मला प्रेरणा देतात, जगण्याचं बळ देतात. त्यामुळंच राहून गेलेल्या गोष्टी मांडणं माझ्यासाठी जिकिरीचं आहे. काही प्रश्‍न सोडले की सुटतात! अगदी त्याच न्यायानं राहून गेलेल्या काही गोष्टी तशाच राहू द्याव्यात! त्यातच सगळ्यांचं भलं असतं.
(साहित्य स्वानंद दिवाळी 2018)

- घनश्याम पाटील, पुणे 
7057292092

Sunday, September 2, 2018

शांतीदूत!


प्रभाकर तुंगार हे ‘कलापिनी’ या संस्थेचे संस्थापक सदस्य आहेत. पुण्याच्या सांस्कृतिक, नाट्य आणि साहित्य क्षेत्रात ते ‘अप्पा’ या नावाने सुपरिचित आहेत.
कधी काळी सहकार खात्याच्या मुख्यालयात नोकरी करत असताना त्यांनी शांतीदूत लालबहादूर शास्त्री यांचं छोटेखानी चरित्र लिहिलं. (1966) सरकारी नोकरीत असल्यानं ते छापण्यासाठी वरिष्ठांच्या परवानगीची ते वाट पाहत होते. एकानं सांगितलं, ‘‘बॉस किती खडूस आहेत हे माहिती आहे ना? वेळेचा अपव्यय करू नकोस!’’
हे बॉस म्हणजे तेव्हाचे सहकार आयुक्त श्री. व्ही. सुब्रह्मण्यम! त्यांना मराठीचा गंध असण्याची शक्यता नव्हती. तरीही तुंगारांनी धाडस करायचं ठरवलं. ते त्यांच्याकडे गेले. पुस्तकाच्या लेखनाविषयी सांगून प्रकाशनाची परवानगी मागितली.
बॉस खूश झाले. अस्खलित मराठीत त्यांनी सांगितलं की, ‘‘शास्त्रीजींसारखे प्रामाणिक लोक सध्या आहेत कुठं? अशा चरित्रांची आज खरी गरज आहे. हे पुस्तक लवकर छापा आणि नंतर माझ्याकडे या.’’
तुंगारांना अतिशय आनंद झाला. हा प्रतिसाद अनपेक्षित आणि उत्साहवर्धक होता. मग त्यांनी पुस्तक प्रकाशित केले. त्याची प्रत या ‘साहेबांना’ दिली. ती पाहून ते खूश झाले. हे पुस्तक सर्वांनी विकत घ्यायचे फर्मानच त्यांनी काढले. मग काय! सुब्रह्मण्यम साहेबांच्या गुणग्राहकतेमुळे ती आवृत्ती लगेचच संपली.
त्यानंतर थोडा-थोडका नव्हे तर अठ्ठेचाळीस वर्षांहून अधिक काळ उलटला. हे पुस्तक विस्मरणात गेलं. तुंगारांनी बोलता-बोलता या आठवणी जागवल्या आणि ‘‘हे पुस्तक पुन्हा बाजारात येऊ शकेल का?’’ याची विचारणा आमच्याकडे केली. त्याची एकच प्रत त्यांच्याकडे शिल्लक होती. ती त्यांनी आमच्याकडे दिली.
ती आम्ही वाचली आणि लगेचच प्रकाशनाचा निर्णयही घेतला. पुस्तक आकाराने छोटे असल्याने लगेचच निर्मितीची प्रक्रिया पूर्ण झाली. अठ्ठेचाळीस वर्षानंतर या पुस्तकाची नवी आवृत्ती ‘चपराक’कडून आली.
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न. म. जोशी, श्रीराम पचिंद्रे, मुक्ता टिळक यांच्या उपस्थितीत या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन झाले आणि या पुस्तकाने विक्रीचे उच्चांक केले. ‘चपराक’कडून आलेली नवी आवृत्ती हातोहात संपली.
सिक्किमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील हे प्रभाकर तुंगार यांचे वर्गमित्र! त्यामुळे या पुस्तकाच्या पुढच्या आवृत्तीचे प्रकाशन त्यांच्या हस्ते केले. एका आवृत्तीचे प्रकाशन महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते ‘चपराक साहित्य महोत्सवा’त झाले. पुढची आवृत्ती ज्येष्ठ नेते मोहन धारिया यांच्या अध्यक्षतेखाली प्रकाशित झाली. दुर्देवाने तो धारिया यांचा शेवटचा कार्यक्रम ठरला. अशाप्रकारे या पुस्तकाने अफाट वाचकप्रियता मिळवली. याचे सारे श्रेय लालबहाद्दूर शास्त्री यांच्यासारख्या निस्पृह नेत्याच्या लोकप्रियतेत आणि तुंगार यांच्या साध्यासोप्या भाषाशैलीत आहे.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने तर या पुस्तकावर एक स्पर्धाच घेतली. म्हणजे या पुस्तकावर आधारित एक प्रश्नपत्रिका तयार केली. ती प्रश्नपत्रिका आणि पुस्तकाची एक प्रत प्रतिष्ठानतर्फे सहभागी शाळांना भेट दिली. त्यावर शिक्षकांनी तयारी करून घ्यायची! प्रश्न माहीत असल्याने आणि पुस्तक हाताशी असल्याने विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. शास्त्रीजींचे चरित्र विद्यार्थ्यांपर्यंत जावे इतकाच उद्देश त्यामागे होता. तो तर साध्य झालाच पण आमच्या या पुस्तकाची आणखी एक आवृत्ती हातोहात संपली. हे पुस्तक घेण्यासाठी मुलांची आणि पालकांची अक्षरश: झुंबड उडायची.
ज्येष्ठ पत्रकार सुधाकर जोशी यांनी या पुस्तकाचा ‘इंग्रजी’ तर चंद्रलेखा बेलसरे यांनी ‘हिंदी’ अनुवाद केलाय. या दोन्ही भाषेतही हे पुस्तक ‘चपराक’तर्फे लवकरच उपलब्ध करून देतोय.
अठ्ठेचाळीस वर्षांच्या कालावधीनंतर एखादे पुस्तक पुन्हा प्रकाशित होणे आणि त्याने वाचकांच्या मनावर गारुड घालणे ही नक्कीच मोठी गोष्ट आहे. एक प्रकाशक या नात्याने याचा मला अतिशय आनंद होतो. मराठी ग्रंथ प्रकाशन व्यवहारात असे प्रयोग व्हायला हवेत. जुन्या संस्कारशील साहित्याचा ठेवा नव्या रुपात प्रकाशित केल्यास वाचकांची त्याला आजही मोठी पसंती मिळते हे प्रभाकर तुंगार यांच्या ‘शांतीदूत लालबहाद्दूर शास्त्री’ या पुस्तकाने सिद्ध केले आहे.
प्रभाकर तुंगार यांच्यासारखी साधी-भोळी माणसं हेच तर आपल्या शहराचं खरं वैभव आहे. त्यांचे वडील पाली, अर्धमागधी आणि संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक होते. त्याकाळी घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर तुंगारांच्या घरी येत. पाली भाषेबाबत त्यांना काहीही शंका असतील तर त्याचं निरसन करून घेत. डॉ. आंबेडकरांचं तुंगारांच्या वडिलांना आलेलं हस्तलिखित पत्रही त्यांच्याकडं आहे. जाताजाता याबाबतचा एक किस्सा आवर्जून सांगावासा वाटतो.
डॉ. न. म. जोशी त्यावेळी पुण्यात वृत्तपत्र वाटपाचं काम करीत. डॉ. आंबेडकर तुंगारांना भेटायला त्यांच्या घरी येतात हे कळल्यावर त्यांनी त्यांच्याकडं आंबेडकरांची भेट घालून देण्याचा लकडा लावला. एकदा आंबेडकर तुंगारांच्या घरी आले होते. त्यावेळी न. म. जोशी वृत्तपत्र टाकायला आले होते. तुंगारांनी त्यांची ओळख आंबेडकरांना करून दिली. त्यावेळी आंबेडकरांनी त्यांच्याकडून काही वृत्तपत्रं विकत घेतली. त्याचे पैसेही दिले. ते पैसे वृत्तपत्रांच्या किंमतीपेक्षा जास्त होते. जोशी सरांनी ते पैसे घेण्यास नकार दिला. त्यावेळी ते म्हणाले, ‘‘हे पैसे घे आणि यातून एखादे पुस्तक विकत घे...’’
अशा संस्कारशील वातावरणात आणि थोरामोठ्यांच्या सहवासात वाढलेल्या प्रभाकर तुंगारांना लालबहाद्दूर शास्त्री यांच्यासारखं निस्पृह व्यक्तिमत्त्व खुणावत असेल तर ते स्वाभाविक आहे. त्यामुळं तुंगारांनी हे पुस्तक नेमकेपणे आणि साध्या-सोप्या शैलीत लिहिलं आहे. म्हणूनच विद्यार्थी आणि पालकांनी या पुस्तकाला प्रचंड प्रतिसाद दिला. आता या पुस्तकाची हिंदी आणि इंग्रजी आवृत्ती ‘चपराक’कडून प्रकाशित होत असल्यानं ते आणखी सर्वदूर पोहोचणार आहे. शास्त्रीजींसारख्या शांतीदूताची देशाला आज खरी गरज आहे. किमान त्यांचं चरित्र आणि चारित्र्य समजून घेणं हे तरी आपलं कर्तव्य आहे आणि हे पुस्तक त्याचीच पायाभरणी करणारं आहे.
(दैनिक 'पुण्य नगरी', २ सप्टेंबर २०१८)
- घनश्याम पाटील
7057292092
Attachments area

Monday, August 20, 2018

कॉलेज गेट



पुण्यातलं मराठवाडा मित्रमंडळ महाविद्यालय; म्हणजेच आपलं एमएमसीसी! इथं व्यवस्थापन शास्त्र पदवीचं शिक्षण घेणारे काही तरूण-तरूणी! त्यातील बहुतेक ग्रामीण भागातून आलेले. स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं स्वप्न रंगवताना वर्तमानात मात्र ते वेगळ्याच विश्‍वात रमत होते. साधारणतः महाविद्यालयीन जीवनात जी हुल्लडबाजी करणं अपेक्षित असतं ते सगळं या पोरा-पोरींनी केलं. वाद घातले, मारामार्‍या केल्या, मैत्री निभावली, लफडी केली, खरंखुरं प्रेम केलं, हौसमौज केली आणि जमलाच तर थोडाफार अभ्यासही केला. हे सगळं करताना स्वतःचा प्रामाणिकपणा आणि माणुसकी मात्र सोडली नाही.

एखाद्या चित्रपटात दाखवतात तसे इथेही दोन ग्रुप होते. दोन्हीही ग्रुप एकमेकांना पाण्यात पाहत. त्यातल्या एका ग्रुपनं ट्रॅडिशनल डेला चक्क महाभारतातलं पात्र साकारलं. ते पाहून दुसरा ग्रुप बेचैन झाला. यापेक्षा भारी आपल्याला काय करता येईल यावर डोकेफोड झाली. मग महाभारताला आव्हान देऊ शकेल असं काही करायचं असेल तर त्यांच्यापुढं अर्थातच एक आणि एकच पर्याय होता. तो कोणता हे वेगळं सांगावं लागेल का? भीम, अर्जुन, कृष्ण या कुणाहीपेक्षा मराठी माणसाला ज्याची भुरळ पडते असं एकमेव व्यक्तिमत्त्व म्हणजे युगपुरूष छत्रपती शिवाजीराजांचं! 

ठरलं तर मग! त्यातल्याच एका राजबिंड्या तरूणानं शिवाजी महाराज साकारावेत यासाठी सगळ्यांनी लकडा लावला. त्याचा दबाव आल्यानं तो पठ्ठ्या काही तयार होईना. मग अशावेळी एक नायक लागतो. तो तत्परतेनं पुढं आला. त्या नायकाचं खरंखुरं नाव सागर कळसाईत! या उमद्या तरूणानं त्याच्या दोस्ताला शिवाजीमहाराजांची भूमिका करण्यासाठी पटवलं. आता कुणालाही पटवायचं तर काही आश्‍वासनं द्यावी लागतात. काही आमिषं दाखवावी लागतात. सागरनं सांगितलं, ‘‘मित्रा, तुझं व्यक्तिमत्त्व भारदस्त आहे. समोरच्या ग्रुपवाल्यांची जिरवायची तर तुच महाराजांची भूमिका केली पाहिजे. माझ्या शब्दासाठी हे कर! त्याबदल्यात भविष्यात तू सांगशील ते एक काम मी करेन. तो शब्द माझ्याकडं उधार राहिला.’’

आता इतक्या मिनतवार्‍या केल्यावर तोही तयार झाला. 

त्यानं राजांची भूमिका केली. सगळ्या कॉलेजमध्ये हवाच हवा. मग काय? सगळे खूश! 

काळाच्या रेट्यात सगळ्यांचं शिक्षण पूर्ण झालं. आता सगळे जगरहाटीला सामोरे जाणार! आपापल्या नोकर्‍या, व्यवसाय, कुटुंबकबीला यात गुरफटणार! हे कॉलेजचं गेट आपल्या सगळ्यांसाठी बंद होणार... सगळेच भावविभोर झाले. या दरम्यान केलेली दंगामस्ती, एकमेकांची काढलेली खोड, जीवापाड केलेलं प्रेम, वसतीगृहातील साहचर्य, महाविद्यालयाच्या व्यवस्थापन विभागातील सर्वांशी निर्माण झालेले संबंध, रेक्टरपासून पहारेकर्‍यांपर्यंत आणि वर्गशिक्षकांपासून प्राचार्यापर्यंत सर्वांशीस निर्माण झालेले ऋणानुबंध...! कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये बसून सर्वजण या दरम्यानच्या आठवणी जागवू लागले. भविष्यातही ‘ही दोस्ती तुटायची नाय’ असं सांगू लागले.

हे सर्व चालू असतानाच ज्यानं सागरच्या आग्रहावरून शिवाजीराजांची भूमिका केली होती तो पुढं आला. त्यानं सांगितलं, ‘‘साग्या, माझा शब्द तुझ्याकडे उधार आहे. आता कर्जफेड कर...’’ कुणालाच काही कळेना. तो काय मागणार?

मग त्यानं व्याकूळ होत सांगितलं, ‘‘कॉलेज लाईफनंतरही आपण सर्वजण एकत्र राहू असं काहीतरी कर...’’
आता आली का पंचाईत? हे कसं करता येईल? सागरनं तर शब्द दिला होता. तो विचारात पडला.

विचार, निर्णय आणि कृती या परिवर्तनाच्या तीन प्रमुख पातळ्या असतात. सागरनं विचार केला. कष्टपूर्वक, प्रयत्नपूर्वक आणि प्रामाणिकपणे तो विचार अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आणि तशी कृतीही केली. ही कृती महाराष्ट्रातल्या तरूणांना वेड लावून गेली. मरगळलेल्या मराठी साहित्याला या कृतीनं ऊर्जा दिली. 

या सगळ्यांना एकत्र बांधुन ठेवायचं तर कॉलेज लाईफचे हे दिवस शब्दबद्ध करणं गरजेचं होतं. वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षी सागरनं हे आव्हान स्वीकारलं आणि सगळे अनुभव जशास तसे उतरवले. प्रत्येकाचं आयुष्य म्हणजे एक कादंबरी असते. इथं तर अनुभवाचा खजिनाच होता. त्यानं तो कादंबरीद्वारे शब्दांकित केला. त्याला शीर्षक दिलं, ‘कॉलेज गेट-नाण्याची तिसरी बाजू.’

या कादंबरीनं अनेक विक्रम केले. प्रत्येकाला ही आपलीच कथा वाटते. बघता-बघता या कादंबरीच्या पाच आवृत्या झाल्या. आज नाशिकच्या आयएमए सभागृहात या कादंबरीची सहावी आवृत्ती सन्मानपूर्वक प्रकाशित होतेय. बाबुराव भोर यांच्याच्यासारख्या रत्नपारखी चित्रपट निर्मात्यानं या कादंबरीवर चित्रपट निर्मितीचं काम सुरू केलंय. सागरच्या या प्रयत्नाला दाद देत बाबुराव भोर यांनी ही कलाकृती जिवंत केलीय. आता या कादंबरीवर चित्रपट येतोय.

मध्यंतरी महाराष्ट्रातल्या एका सर्वात मोठ्या दैनिकानं एक सर्वेक्षण केलं होतं. वेगवेगळ्या महाविद्यालयात जाऊन त्यांनी तरूणांच्या आवडत्या पुस्तकांसंबंधी विचारणा केली. ती यादी त्यांच्या सर्व आवृत्त्यांना पहिल्या पानांवर प्रकाशित केली. त्यांनी प्रकाशित केलेल्या ‘टॉप टेन’ पुस्तकात पहिल्या क्रमांकावर शिरवळकरांची ‘दुनियादारी’ होती. दुसर्‍या क्रमांकावर ‘शाळा’  तर तिसर्‍या क्रमांकावर आमच्या सागरची ‘कॉलेज गेट.’ महाराष्ट्रातील बहुतेक वृत्तपत्रांनी, वृत्तवाहिन्यांनी या कादंबरीची प्रचंड दखल घेतली. साहित्य संमेलनात, पुस्तक विक्रेत्यांकडे या कादंबरीची मागणी वाढली. राज्यभरातून ‘कॉलेज गेट’चा चाहता वर्ग निर्माण झाला. 
प्रकाशक असूनही सागरच्या आग्रहाखातर या कादंबरीला मीच प्रस्तावना लिहिली होती. त्यात मी म्हटलं होतं, ‘‘एखाद्या रसिकप्रिय चित्रपटाला शोभेल असे सशक्त कथानक या कलाकृतीला निश्‍चितपणे लाभले आहे. महाविद्यालयीन जीवनातील विविध वृत्ती आणि प्रवृत्तींचा चिकित्सक उलगडा करणारी, शब्दाशब्दाला उत्सुकता वाढवणारी आणि मैत्रीच्या नात्याचे चिरंतन मूल्य ताकदीने सिद्ध करणारी ही कलाकृती आहे.’’
सुदैवानं आज हे सारं काही खरं ठरलंय. आजचे तरूण लिहित नाहीत, वाचत नाहीत अशा सगळ्या अंधश्रद्धा या कादंबरीनं खोडून काढल्यात. सागरच्या कसदार लेखणीचं हे यश आहे. ‘चपराक’ने प्रकाशित केलेल्या सर्वोत्कृष्ट पुस्तकांपैकी ही एक कादंबरी आहे. किंबहुना तमाम युवकांच्या मनात आणि हृदयात ‘चपराक’चं नाव पोहोचवण्यात या कादंबरीचं योगदान मोठं आहे. सागरचं संवादी लेखन, स्वभावातील नम्रता आणि मृदुता यामुळं तसाही तो सगळ्यांच्या हृदयावर राज्य करतो. दोन व्यक्तींची तुलना अनाठायी असते असं माझं मत असलं तरी आज सांगावंसं वाटतं की, सागर कळसाईत हा मराठीतला चेतन भगत आहे. 

लेखनातही भवितव्य घडवता येतं हे सिद्ध करणार्‍या सागरची ‘लायब्ररी फे्रंड’ ही दुसरी कादंबरीही ‘चपराक’ने प्रकाशित केली. आता एक मोठा राजकीय पट उलगडून दाखविणारी ‘काशिनाथ-विश्‍वनाथ’ ही कादंबरी लिहिण्यात सागर व्यग्र आहे. बाबुराव भोर यांच्यासारखे समर्थ हात त्याच्या पाठीशी आहेत. ‘चपराक’ परिवाराचा ‘आयडॉल’ म्हणून सागरचं मला नेहमीच कौतुक वाटतं. भविष्यात तो नवनवीन विक्रम नोंदवेल हे वेगळं सांगायला नकोच. त्याच्या लेखनप्रवासाला मित्र म्हणून, प्रकाशक म्हणून माझ्या ‘जी जान से’ शुभेच्छा! 
- घनश्याम पाटील
7057292092

Sunday, August 5, 2018

भरकटलेलं आंदोलन



महाराष्ट्र ही शौर्य आणि पराक्रमांची परंपरा जपणारी भूमी आहे. इथल्या मराठ्यांनी मराठी माणसाचं अस्तित्व टिकवून ठेवलंय. ‘जो मराठी बोलतो तो मराठा’ हे चित्र गेल्या काही काळात संपुष्टात आलं आणि कमालीच्या टोकदार अस्मिता निर्माण झाल्या. अनेकजण जातीपातीच्या जळमटातून बाहेर पडायला तयार नाहीत. ‘कोणताही कट्टरतावाद वाईटच’ ही शिकवण विसरल्यानं माणसामाणसात फूट पाडण्याचे उद्योग सध्या भरात आलेत. 

असं म्हणतात की वाफ फार काळ कोंडून ठेवता येत नाही. ती तशी ठेवली तर स्फोट अटळ असतो. मराठ्यांचंही तसंच झालं. त्यांच्या अनेक न्याय मागण्या गेल्या कित्येक वर्षात प्रलंबित आहेत. त्यामुळं त्यांच्या भावना उफाळून आल्या. सुरूवातीला जे मूक मोर्चे निघाले त्याची दखल न घेतल्यानं आता ठोक मोर्चे सुरू झाले आहेत. त्यातूनच आत्महत्यांसारखं दुर्दैवी सत्रही सुरू झालंय. हे सर्वच अत्यंत क्लेशकारक आणि अनेकांच्या मुळावर उठणारं आहे. राजकारणी या सर्वांचा फायदा घेत आहेत. समाजासमाजात फूट पाडण्याचं त्यांचं कारस्थान सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक दोघंही याचा पुरेपूर लाभ घेत आहेत. मात्र या सर्वात हे आंदोलन त्यांच्या उद्दिष्ठापासून भरकटत चाललंय हे वास्तव आपण समजून घ्यायला हवं. भावनेच्या भरात घेतलेले कोणतेही निर्णय दीर्घकालिक यश मिळवू शकत नाहीत. त्यातून काही तात्पुरते फायदे दिसून येतात पण ते फार काळ टिकत नाहीत. हे न कळण्याइतका आपला समाज दूधखुळा नसला तरी एक मोठा वर्ग याचं राजकारण करण्यात यशस्वी ठरतोय. आपल्या भावनांचा बाजार मांडून त्याला आंदोलनाचं रूप दिलं जात असेल तर त्यातील डाव वेळीच ओळखायला हवेत. ज्या आंदोलनात प्रारंभी राजकारण्यांना कटाक्षानं दूर ठेवण्यात आलं होतं तिथं आज सगळेच राजकारणी दिसत आहेत. इतकंच नाही तर या सर्वांचं नेतृत्व करण्याचं श्रेय घेण्याच्या त्यांच्या खटपटी-लटपटी सुरू आहेत. 

काकासाहेब शिंदे या तरूणानं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जलसमाधी घेतली. निरपराध तरूणांचे असे बळी जाऊन आरक्षण मिळणार नाही. त्यानंतर हे सत्रच सुरू झालंय. आपली व्यवस्था मात्र ढिम्मच आहे. उलटपक्षी यांच्या बलिदानाचं राजकारणच करण्यात येत आहे. आजवर असंख्य शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. त्यांच्या कुटुंबियांचं पुढं काय झालं? शेतकर्‍यांच्या समस्या सुटल्या का? शेतकर्‍यांच्या आत्महत्येमुळं व्यथित होणारे राजकारणी एकेकाळी होते. आता कुणालाच त्याचं सोयरसुतक नाही. काकासाहेब शिंदेंच्या बलिदानाच्या बातम्या झाल्या. त्यांच्यावर अग्रलेख झाले. वृत्तवाहिन्यांनी कार्यक्रम केले. आणखी काही दिवसांनी या बातत्या एखाद्या कॉलमच्या होतील. कुणावरही काहीही परिणाम होणार नाही. त्यामुळं कोणत्याही परिस्थितीत जगायला हवं. आपण संपून प्रश्न संपणारे नाहीत. खरंतर हे सत्य मांडणंही जीवावर आलंय, मात्र यावर बोलायला हवं. आपल्याकडील पोपटपंची करणारे सर्व तथाकथित विद्वान हजार किलो मूग गिळून गप्प आहेत. हरी नरके यांच्यासारखा विचारवंत ‘मराठ्यांना कोणत्याही परिस्थितीत आरक्षण मिळू शकणार नाही, त्यांच्या आर्थिक विकासाच्या योजना राबवायला हव्यात’ हे बेंबीच्या देठापासून ओरडून सांगतोय. मुख्यमंत्री तर ‘काही संघटना वारीत साप सोडणार होत्या’ असे विधान करत आहेत. शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासारखी मंडळी आजवर मराठ्यांना आरक्षण मिळू शकणार नाही असे मत मांडत होत्या. आता तेही या विषयावरून राजकारण करत आहेत. मुख्यमंत्री न्यायव्यवस्थेकडं बोट दाखवत आहेत. 

‘आजवर बहुसंख्य ‘मराठा’ मुख्यमंत्रीच होते. त्यांनी हा प्रश्न का सोडवला नाही?’ असाही सवाल केला जातोय. ‘त्यांनी प्रश्न सोडवला नाही म्हणून तर तुम्हाला निवडून दिले’ असा प्रतिवादही केला जातोय. या सर्वात मूळ प्रश्न मागे पडतो. दलित, अन्य अल्पसंख्यांक यांच्या मनात भीतिचे वातावरण आहे. मराठेही अस्वस्थ आहेत. पुरोगामी टोळके फक्त ब्राह्मणांना झोडपण्यात व्यग्र आहे. या सर्वात समाजाविषयीचा कळवळा कुणाच्याच मनात दिसून येत नाही. तवा तापलाय तर भाकरी भाजून घ्या इतकीच अनेकांची भावना! त्यामुळं प्रश्‍न सुटण्याऐवजी फक्त चिघळत चाललाय.

सध्या लोकप्रतिनिधींच्या घरासमोर आंदोलनं सुरू आहेत. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. त्यांनी मराठा बांधवांचं निवेदन स्वतः स्वीकारलं. त्याच धर्तीवर पुण्यातील कोथरूडच्या आमदार मेधा कुलकर्णी यांच्या घरी आंदोनलनकर्ते गेले. त्यांनी त्यांना कार्यालयात बोलावलं; मात्र हे आंदोलनकर्ते त्यांच्या घरासमोर बसून राहिले. त्यांनी घोषणाबाजी केली. एकानं त्यांच्या गॅलरीत बाटली फेकली. मेधा कुलकर्णी यांचा मुलगा सौरव यानं त्याचा जाब विचारला. त्यातून बाचाबाची झाली आणि पुढं मेधा कुलकर्णी यांनाच धारेवर धरण्यात आलं. त्यांना ‘जातीवादी’ ठरवून समाजमाध्यमावर त्यांच्यावर वाटेल तशी चिखलफेक झाली. अत्यंत अश्‍लाघ्य आणि अश्‍लिल भाषेत त्यांच्यावर टीका झाली. आमदार मेधा कुलकर्णी चूक की बरोबर हा चर्चेचा विषय होऊ शकतो मात्र त्यांच्यावर, त्यांच्या जातीवर आणि स्त्रीत्वावर वाटेल तशी शेरेबाजी करणारे ‘मराठे’ असू शकत नाहीत. ज्या छत्रपती शिवाजीमहाराजांनी प्रत्येक स्त्रीचा आईसमान आदर केला त्याच महाराजांचे नाव घेत एखाद्या स्त्रीवर अशी अश्‍लाघ्य भाषा वापरत टीका केली जात असेल तर हे आंदोलन भरकटलेय हे ठामपणे सांगायलाच हवे. मेधा कुलकर्णी यांचा मुलगा चुकला असेल तर त्याविरूद्धचे पुरावे द्यावेत. झुंडशाहीचे प्रदर्शन करतानाचे आणि तिथे दादागिरी, दडपपशाही करतानाच्या चित्रफिती समाजमाध्यमांवर फिरत आहेत; पण कुलकर्णी यांचा मुलगा सौरव काही चुकीचे बोलतोय याची एकही चित्रफित उपलब्ध असू नये यातच सर्वकाही आले. 

यापूर्वी प्रा. मेधा कुलकर्णी या मराठा आंदोलनात सहभागी होत्या. मराठी बांधवांच्या न्याय हक्कासाठी त्या कायम तत्पर आहेत. याबाबत निर्णय घेण्याचे कोणतेही अधिकार त्यांना नाहीत. त्यामुळं एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून जे करता येईल ते त्या करतच आहेत. असं असताना त्या वारंवार कार्यालयात येऊन चर्चेचं निमंत्रण देत असताना त्यांच्या घरच्यांना डांबून ठेवणं, त्यांच्यावर पाळत ठेवून त्यांना वेठीस धरणं, मुलाला जीवे मारण्याची धमकी देणं यात कसला पराक्रम आलाय? अशा मार्गानं आरक्षण मिळणार आहे का? बरं, यातही संभाजी ब्रिगेडचेच लोक सहभागी होते. म्हणजे केवळ संभाजी ब्रिगेडसारख्या संस्थेचे चार पदाधिकारी म्हणजे सकल मराठा समाज झाला का? एखाद्या स्त्रीविषशी अशी टीकाटिपन्नी करणं मराठा बांधवांना तरी मान्य आहे का? मग पुरूषोत्तम खेडेकर यांच्या विचारात आणि या झुंडशाहीत काय फरक राहिला? आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी एखाद्या समाजाला, एखाद्या लोकप्रतिनिधीला, त्यांच्या कुटुंबियांना वेठीस धरणं कितपत योग्य आहे?

आपल्याकडं पुन्हा एकदा जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी गेली अनेक काळ सुरू आहे. आर्थिक निकषानुसार आरक्षण, ऍट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर थांबवणं यासाठीही अनेकांनी पुढाकार घेतला आहे. हे करताना दलित बांधवांचे हक्कही नाकारता येणार नाहीत. सर्वांना खूश ठेवणं राज्यकर्त्यांनाही शक्य नाही. धनगर, मराठा यांच्या आरक्षणाचे निर्णय त्यामुळंच सत्ताकारणाचा एक भाग बनतात. हे प्रश्न सुटावेत अशी प्रामाणिक इच्छाशक्ती राजकारण्यात दिसत नाही. त्यामुळं समाजात संभ्रमाचं वातावरण निर्माण होतं. एकीकडं जातिअंताची भाषा करताना आपण कट्टर जातीवादी बनलोय. इतर जातींचा उपमर्द करणं, त्यांना कमी लेखणं, आपल्या जातीचा अभिमान बाळगताना इतरांवर तुटून पडणं ही बाब सध्या वाढीस लागलीय. ज्यांना जातीअंत हवाय ते सर्वच आपापल्या जातीचं घोडं पुढं दामटत आहेत. म्हणूनच नवी पिढी या सगळ्या जाळ्यात अलगद अडकतेय. 

वाढती महागाई, बेरोजगारी, गुन्हेगारी हे व असे अनेक गंभीर प्रश्न आपल्यासमोर आहेत. आरोग्य, शिक्षण, मुलभूत सेवा-सुविधा याची वाणवा असताना आपण जातीपातीचं राजकारण करतोय. जातीमुळे अनेकांवर अन्याय होतोय हे तर खरंच! पण तो अन्याय निवारण करण्यासाठी इतर जाती समूहांना जबाबदार धरून त्यांच्यावर आघात करणं हेही योग्य नाही. जसजशा निवडणुका जवळ येतील तसतशी अशा आंदोलनाची धग वाढत जाते आणि निवडणुका संपल्या की पुन्हा सर्व शांत होते हा आजवरचा अनेकवेळचा अनुभव आहे. त्यामुळं आपण आपल्या न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवायला हवा. कायदेशीर मार्गानं जे काही करता येईल ते करायला हवं. मात्र आंदोलनाचा भाग म्हणून स्वतःचा जीव देणं, इतरांना वेठीस धरणं, सामान्य माणसाची गैरसोय करणं हे अस्सल मराठ्यांनाही रूजणारं नाही. खरा मराठा असे पळपुटे मार्ग कधी निवडणारही नाही. त्यामुळं वेळीच सावध होऊन निश्चित दिशा ठरवली नाही तर यातून साध्य तर काही होणारच नाही पण येत्या निवडणुकीनंतर हे केवळ एक ‘भरकटलेलं आंदोलन’ इतकीच त्याची नोंद इतिहासात घेतली जाईल हे कटूसत्य आहे.
- घनश्याम पाटील, पुणे 
7057292092
* या लेखातील आमदार मेधा कुलकर्णी यांच्याशी संबंधित मजकूर वगळून दैनिक 'पुण्य नगरी'ने आज माझ्या 'दखलपात्र' या स्तंभात हा लेख प्रकाशित केला आहे.