प्रभाकर तुंगार हे ‘कलापिनी’ या संस्थेचे संस्थापक सदस्य आहेत. पुण्याच्या सांस्कृतिक, नाट्य आणि साहित्य क्षेत्रात ते ‘अप्पा’ या नावाने सुपरिचित आहेत.
कधी काळी सहकार खात्याच्या मुख्यालयात नोकरी करत असताना त्यांनी शांतीदूत लालबहादूर शास्त्री यांचं छोटेखानी चरित्र लिहिलं. (1966) सरकारी नोकरीत असल्यानं ते छापण्यासाठी वरिष्ठांच्या परवानगीची ते वाट पाहत होते. एकानं सांगितलं, ‘‘बॉस किती खडूस आहेत हे माहिती आहे ना? वेळेचा अपव्यय करू नकोस!’’
हे बॉस म्हणजे तेव्हाचे सहकार आयुक्त श्री. व्ही. सुब्रह्मण्यम! त्यांना मराठीचा गंध असण्याची शक्यता नव्हती. तरीही तुंगारांनी धाडस करायचं ठरवलं. ते त्यांच्याकडे गेले. पुस्तकाच्या लेखनाविषयी सांगून प्रकाशनाची परवानगी मागितली.
बॉस खूश झाले. अस्खलित मराठीत त्यांनी सांगितलं की, ‘‘शास्त्रीजींसारखे प्रामाणिक लोक सध्या आहेत कुठं? अशा चरित्रांची आज खरी गरज आहे. हे पुस्तक लवकर छापा आणि नंतर माझ्याकडे या.’’
तुंगारांना अतिशय आनंद झाला. हा प्रतिसाद अनपेक्षित आणि उत्साहवर्धक होता. मग त्यांनी पुस्तक प्रकाशित केले. त्याची प्रत या ‘साहेबांना’ दिली. ती पाहून ते खूश झाले. हे पुस्तक सर्वांनी विकत घ्यायचे फर्मानच त्यांनी काढले. मग काय! सुब्रह्मण्यम साहेबांच्या गुणग्राहकतेमुळे ती आवृत्ती लगेचच संपली.
त्यानंतर थोडा-थोडका नव्हे तर अठ्ठेचाळीस वर्षांहून अधिक काळ उलटला. हे पुस्तक विस्मरणात गेलं. तुंगारांनी बोलता-बोलता या आठवणी जागवल्या आणि ‘‘हे पुस्तक पुन्हा बाजारात येऊ शकेल का?’’ याची विचारणा आमच्याकडे केली. त्याची एकच प्रत त्यांच्याकडे शिल्लक होती. ती त्यांनी आमच्याकडे दिली.
ती आम्ही वाचली आणि लगेचच प्रकाशनाचा निर्णयही घेतला. पुस्तक आकाराने छोटे असल्याने लगेचच निर्मितीची प्रक्रिया पूर्ण झाली. अठ्ठेचाळीस वर्षानंतर या पुस्तकाची नवी आवृत्ती ‘चपराक’कडून आली.
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न. म. जोशी, श्रीराम पचिंद्रे, मुक्ता टिळक यांच्या उपस्थितीत या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन झाले आणि या पुस्तकाने विक्रीचे उच्चांक केले. ‘चपराक’कडून आलेली नवी आवृत्ती हातोहात संपली.
सिक्किमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील हे प्रभाकर तुंगार यांचे वर्गमित्र! त्यामुळे या पुस्तकाच्या पुढच्या आवृत्तीचे प्रकाशन त्यांच्या हस्ते केले. एका आवृत्तीचे प्रकाशन महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते ‘चपराक साहित्य महोत्सवा’त झाले. पुढची आवृत्ती ज्येष्ठ नेते मोहन धारिया यांच्या अध्यक्षतेखाली प्रकाशित झाली. दुर्देवाने तो धारिया यांचा शेवटचा कार्यक्रम ठरला. अशाप्रकारे या पुस्तकाने अफाट वाचकप्रियता मिळवली. याचे सारे श्रेय लालबहाद्दूर शास्त्री यांच्यासारख्या निस्पृह नेत्याच्या लोकप्रियतेत आणि तुंगार यांच्या साध्यासोप्या भाषाशैलीत आहे.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने तर या पुस्तकावर एक स्पर्धाच घेतली. म्हणजे या पुस्तकावर आधारित एक प्रश्नपत्रिका तयार केली. ती प्रश्नपत्रिका आणि पुस्तकाची एक प्रत प्रतिष्ठानतर्फे सहभागी शाळांना भेट दिली. त्यावर शिक्षकांनी तयारी करून घ्यायची! प्रश्न माहीत असल्याने आणि पुस्तक हाताशी असल्याने विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. शास्त्रीजींचे चरित्र विद्यार्थ्यांपर्यंत जावे इतकाच उद्देश त्यामागे होता. तो तर साध्य झालाच पण आमच्या या पुस्तकाची आणखी एक आवृत्ती हातोहात संपली. हे पुस्तक घेण्यासाठी मुलांची आणि पालकांची अक्षरश: झुंबड उडायची.
ज्येष्ठ पत्रकार सुधाकर जोशी यांनी या पुस्तकाचा ‘इंग्रजी’ तर चंद्रलेखा बेलसरे यांनी ‘हिंदी’ अनुवाद केलाय. या दोन्ही भाषेतही हे पुस्तक ‘चपराक’तर्फे लवकरच उपलब्ध करून देतोय.
अठ्ठेचाळीस वर्षांच्या कालावधीनंतर एखादे पुस्तक पुन्हा प्रकाशित होणे आणि त्याने वाचकांच्या मनावर गारुड घालणे ही नक्कीच मोठी गोष्ट आहे. एक प्रकाशक या नात्याने याचा मला अतिशय आनंद होतो. मराठी ग्रंथ प्रकाशन व्यवहारात असे प्रयोग व्हायला हवेत. जुन्या संस्कारशील साहित्याचा ठेवा नव्या रुपात प्रकाशित केल्यास वाचकांची त्याला आजही मोठी पसंती मिळते हे प्रभाकर तुंगार यांच्या ‘शांतीदूत लालबहाद्दूर शास्त्री’ या पुस्तकाने सिद्ध केले आहे.
प्रभाकर तुंगार यांच्यासारखी साधी-भोळी माणसं हेच तर आपल्या शहराचं खरं वैभव आहे. त्यांचे वडील पाली, अर्धमागधी आणि संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक होते. त्याकाळी घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर तुंगारांच्या घरी येत. पाली भाषेबाबत त्यांना काहीही शंका असतील तर त्याचं निरसन करून घेत. डॉ. आंबेडकरांचं तुंगारांच्या वडिलांना आलेलं हस्तलिखित पत्रही त्यांच्याकडं आहे. जाताजाता याबाबतचा एक किस्सा आवर्जून सांगावासा वाटतो.
डॉ. न. म. जोशी त्यावेळी पुण्यात वृत्तपत्र वाटपाचं काम करीत. डॉ. आंबेडकर तुंगारांना भेटायला त्यांच्या घरी येतात हे कळल्यावर त्यांनी त्यांच्याकडं आंबेडकरांची भेट घालून देण्याचा लकडा लावला. एकदा आंबेडकर तुंगारांच्या घरी आले होते. त्यावेळी न. म. जोशी वृत्तपत्र टाकायला आले होते. तुंगारांनी त्यांची ओळख आंबेडकरांना करून दिली. त्यावेळी आंबेडकरांनी त्यांच्याकडून काही वृत्तपत्रं विकत घेतली. त्याचे पैसेही दिले. ते पैसे वृत्तपत्रांच्या किंमतीपेक्षा जास्त होते. जोशी सरांनी ते पैसे घेण्यास नकार दिला. त्यावेळी ते म्हणाले, ‘‘हे पैसे घे आणि यातून एखादे पुस्तक विकत घे...’’
अशा संस्कारशील वातावरणात आणि थोरामोठ्यांच्या सहवासात वाढलेल्या प्रभाकर तुंगारांना लालबहाद्दूर शास्त्री यांच्यासारखं निस्पृह व्यक्तिमत्त्व खुणावत असेल तर ते स्वाभाविक आहे. त्यामुळं तुंगारांनी हे पुस्तक नेमकेपणे आणि साध्या-सोप्या शैलीत लिहिलं आहे. म्हणूनच विद्यार्थी आणि पालकांनी या पुस्तकाला प्रचंड प्रतिसाद दिला. आता या पुस्तकाची हिंदी आणि इंग्रजी आवृत्ती ‘चपराक’कडून प्रकाशित होत असल्यानं ते आणखी सर्वदूर पोहोचणार आहे. शास्त्रीजींसारख्या शांतीदूताची देशाला आज खरी गरज आहे. किमान त्यांचं चरित्र आणि चारित्र्य समजून घेणं हे तरी आपलं कर्तव्य आहे आणि हे पुस्तक त्याचीच पायाभरणी करणारं आहे.
(दैनिक 'पुण्य नगरी', २ सप्टेंबर २०१८)
- घनश्याम पाटील
7057292092
खूप सुंदर परीक्षण...।
ReplyDeleteकाही कलाकृती अशा असतात, केव्हा बघाव्या तेव्हा जिवंत वाटतात. छान दखल...
ReplyDelete