Sunday, November 11, 2018

स्वतःपासूनची सुरूवात महत्त्वाची!

12 जानेवारी 1863! या दिवशी आपल्याकडे बंगालमध्ये नरेंद्र विश्वनाथ दत्त नावाच्या एका महान युगपुरूषाचा जन्म झाला. त्यांच्याबाबतची एक गोष्ट सांगतो. 1880 च्या कालखंडातील ही घटना. हा तरूण त्याच्या गुरूकडे गेला. गुरू कालिकादेवीच्या पूजेत मग्न होते. त्याने गुरूंना वंदन करून सांगितलं, ‘‘गुरूवर्य, सध्या मी खूप अस्वस्थ आहे. माझ्या वडिलांचं निधन झालंय. मला प्रचंड नैराश्य आलंय. हे जग सोडून कुठंतरी दूर निघून जावंसं वाटतं.’’

गुरूंनी सांगितलं, ‘‘तुला असं का वाटतं? तू तर एक संन्यस्त वृत्तीचा राष्ट्रप्रेमी तरूण आहेस...! हा विचार तुझ्या मनात का यावा?’’

त्या तरूणानं सांगितलं, ‘‘हे दुःख, या वेदना फक्त माझ्यासाठी नाहीत. मला माझ्या आईच्या वेदना पाहवत नाहीत. बहिणीच्या डोळ्यातले अश्रू अस्वस्थ करतात. त्यातून मी प्रचंड बेचैन झालोय.’’

गुरूंनी सांगितलं, ‘‘ठीक आहे. आत कालिकादेवीच्या समोर जा आणि तुला हवं ते माग. तुझं हे दुःख दूर व्हावं यासाठी कालिकामातेकडं साकडं घाल. ही माता तुला दुःखमुक्त करेल. तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेल.’’

हा तरूण पुढं गेला. डोळे भरून कालिकादेवीला बघितलं. त्याला स्वत्वाचा विसर पडला आणि भारावून जात त्यानं मागणं मागितलं, ‘‘माते, मला ज्ञान दे, वैराग्य दे, भक्ती दे, विवेक दे...’’ 

गुरूंनी विचारलं, ‘‘काय रे! आईचं, बहिणीचं दुःख दूर कर, असं तू देवीला सांगितलंस का?’’

तो म्हणाला, ‘‘मी हे विसरूनच गेलो.’’ 

गुरूंनी सांगितलं, ‘‘पुन्हा आत जा. तुला जे हवं ते माग...’’

पुन्हा हा तरूण आत गेला. कालिकादेवीकडं पाहत त्याच्या तोंडून तेच शब्द बाहेर पडले, ‘‘माते, मला ज्ञान दे, वैराग्य दे, भक्ती दे, विवेक दे...’’ आणि त्यातूनच भगवान रामकृष्ण परमहंसांनी त्याला सांगितलं, ‘‘नरेंद्रा, तुझा जन्म मानवी कल्याणासाठी आहे. तू राष्ट्राला नवा विचार देऊ शकतोस. अनेकांचा उद्धारकर्ता होऊ शकतोस. तू नेहमी स्वतःचा नाही तर समाजाचा, राष्ट्राचाच विचार करशील...’’ आणि आपण सर्वांनी त्यांनी पुढे घालून दिलेला आदर्श बघितलाच आहे. 

सध्या आपल्याकडं तरूणाईच्या संस्कारांचा विषय सातत्यानं चर्चेला येतो. कितीही नावं ठेवली तरी आजचे हे तरूण आपले संस्कार जिवंत ठेवत आहेत, हे खरंय! असं म्हणतात, ज्या राज्यात धान्याअभावी दुष्काळ पडतो तिथली जनावरं मरतात. काहीवेळा माणसंही मरतात! मात्र जिथं संस्कारांचाच दुष्काळ पडतो तिथली मानवताच मरते. त्यामुळे हा संस्कारांचा दुष्काळ पडू नये यासाठी तरूणांनीच पुढं येणं गरजेचं आहे. तसे ते येतही आहेत. 

नाण्याच्या दोन्ही बाजू आपण बघायला हव्यात. ‘आमच्यावेळी असं नव्हतं’ असं म्हटलं की मोठ्या लोकांचा विषय संपतो. तरूणांनी काय केलं पाहिजे हे मात्र कोणी सांगत नाही. त्यांना दुषणं देण्यात, बोल लावण्यात मात्र सगळेच आघाडीवर.

एक गोष्ट सांगतो. एका राजपुत्राची दृष्टी अधू झाली. सूर्यप्रकाशात गेलं की त्याला अस्वस्थ वाटू लागलं. त्याचं भान हरपून तो वाटेल ते चाळे करू लागला. त्यावर खूप उपचार झाले. अनेक वैद्य-हकिमांनी त्याची तपासणी केली. मात्र त्याच्या या आजारावर उपचार काही होत नव्हते. मग एका वैद्यानं राजाला सांगितलं, ‘‘राजपुत्राला आपण फक्त हिरवा रंग दाखवा. अन्य रंग त्यांच्या दृष्टिस पडला तर त्यांना त्रास होतो. सर्वत्र हिरवा रंग असेल तर त्यांना कसलाच धोका नाही, कसला त्रास नाही.’’

तो प्रयोग राजानं करून बघितला. महालात सर्वत्र हिरवे गालीचे अंथरले. भिंतींना हिरवा रंग दिला. पडदेही हिरवेच लावले.. आणि चमत्कार घडला. राजकुमार सामान्य मुलांप्रमाणे वावरू लागला. त्याला होणारा त्रास संपुष्टात आला.

या उपायामुळे राजा मात्र चिंतीत झाला. राजपुत्राला असं चार भिंतीत कोंडून ठेवणं त्याच्या मनाला पटणारं नव्हतं. बाकी सगळे उपाय झाले होते. त्यामुळं दुसरा काही मार्गही दिसेना. आता संपूर्ण राज्य हिरवं करायला हवं. राजानं प्रधानाला विनंती केली. यावर विचारपूर्वक काहीतरी तोडगा काढायला सांगितला. अर्थातच, प्रत्येक कथेतला प्रधान हुशार असतो. तो नवनवीन कृप्त्या लढवतो. हा प्रधानही त्याला अपवाद नव्हता. त्यानं सांगितलं, ‘‘महाराज, यावर उपाय आहे. आपल्याला राज्यभर हिरवा रंग न देताही राजपुत्राला बाहेर नेता येईल. राजपुत्र सर्वत्र आनंदानं फिरू शकतील, बागडू शकतील...’’

राजानं सांगितलं, ‘‘खर्चाची चिंता करू नका. तातडीने उपाय करा...’’

प्रधानानं सांगितलं, ‘‘महाराज यासाठी काहीच खर्च नाही. जेमतेम शंभर-दीडशे रूपयांत काम होईल.’’

सगळेजण आश्‍चर्यचकित झाले. इतक्या कमी पैशात सगळं राज्य हिरवं कसं करावं, हे कुणालाच कळेना.

प्रधान बाहेर गेला आणि त्यानं एक हिरवा चष्मा आणला. तो राजकुमाराच्या डोळ्यावर घालायला सांगितला. आता राजकुमाराला सगळं जग हिरवं दिसू लागलं. त्यासाठी वेगळे असे काहीच प्रयत्न करावे लागले नाहीत.


आपलंही तसंच असतं. प्रत्येक प्रश्‍नावर छोटे-छोटे उपाय असताना आपण नको ते विचार करत बसतो. त्यातून सोप्या गोष्टी अवघड होतात. 

आता आपण ग्रीस देशाकडं वळूया! ग्रीसमध्ये उत्तमोत्तम नाटके व्हायची. ही नाटकं करताना पात्र कुणाचं आहे हे कसं ओळखायचं? म्हणजे राजा कोण, प्रधान कोण, राणी कोण, सेवक कोण हे कसं ओळखायचं? मग त्यासाठी ‘पर्सोने’ तयार केले गेले. पर्सोना म्हणजे मुखवटा. हे मुखवटे सगळ्यांना दिले गेले. हा राजाचा मुखवटा, हा राणीचा मुखवटा, हा प्रधानाचा तर हा शिपायाचा मुखवटा. त्यातून कळायला लागलं की हे पात्र नक्की कुणाचं आहे ते! हा जो ‘पर्सोना’ आहे त्यातूनच पुढं ‘पर्सनॅलिटी’ हा शब्द आला. पर्सनॅलिटी म्हणजे व्यक्तिमत्त्व! आपल्या सगळ्यांना एक व्यक्तिमत्त्व असतं. ते वैचारिक, बौद्धिक तर असतंच पण शारीरिकही असतं. प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या प्रकारचं एक व्यक्तिमत्त्व असतं. एक चेहरा, मुखवटा असतो. आपल्यापैकी प्रत्येकाला एक मुखवटा आहे, व्यक्तिमत्त्वही आहे. त्या व्यक्तिमत्त्वाचा आविष्कार व्यक्त करण्याच्या प्रत्येकाच्या पद्धती मात्र वेगवेगळ्या असतात. त्यातून आपलं व्यक्तिमत्त्व पुढं येतं. त्यातूनच चांगले लेखक, कलाकार भेटतात. राजकारणी भेटतात. प्रत्येक क्षेत्रातील चांगले-वाईट लोक घडतात. प्रत्येकाची घडण्याची-बिघडण्याची रीत न्यारी. ज्याच्या त्याच्या क्षमतेनुसार, कष्टानुसार त्याचं फलित त्याच्या पदरात पडतं. म्हणून आपला ‘पर्सोना’ महत्त्वाचा. चेहरा आणि मुखवटा यातलं अंतर गळून पडलं की माणसाचं व्यक्तिमत्त्व उजळतं. ते अधिक प्रकाशमान होऊन इतरांच्याही आयुष्यात चैतन्य निर्माण करतं. चांगलं व्यक्तिमत्त्व असलेले प्रज्ञावंत, कलावंत पुढे यायला हवेत. त्यावर आपल्या देशाच्या प्रगतीचं मूल्यमापन होईल. आपलं क्षेत्र कोणतंही असेल, आपण कुठलंही काम करत असू, माणूस म्हणून असलेलं ‘चांगुलपण‘च आपल्याला तारून नेणार आहे एवढं लक्षात ठेवायला हवं. असं चांगूलपण हीच तर खरी गौरवाची बाब असते. तेच समाजाचं आणि राष्ट्राचं भूषण असतं. 

आजच्या तरूणाईला सांगावंसं वाटतं, तुम्ही लिहित रहा, वाचत रहा, नाचावंसं वाटतं नाचत रहा, गावंसं वाटतं गात रहा. ज्याला जे जमेल त्यानं ते करावं. क्षमता असूनही काहीच न करणं हा एक मोठा सामाजिक गुन्हा आहे आणि आपण सर्वजण तो सातत्यानं करतोय. गाणं सुंदर गाता येतं पण गात नाही. वेळच नाही आपल्याकडं! छान कविता करता येते पण करत नाही. उत्तम कादंबरी लिहिता येते पण लिहित नाही. मग आपण दोष कुणाला देणार? 

ज्यांच्याकडं निश्‍चित ध्येय आहे, त्या ध्येयाकडं वाटचाल करण्याची ज्यांची जिद्द आहे त्यांच्यात हजार हत्तींचं बळ संचारतं. अत्यंत प्रतिकूलतेतूनही ते विजयाच्या दिशेने घोडदौड करतात. अनेकांत अशी सुप्त शक्ती असते पण ती दिसायला तर हवी ना? त्याची अभिव्यक्ती फार महत्त्वाची आहे. म्हणजे कोणत्या ना कोणत्या माध्यमातून तुम्ही सातत्यानं तुमच्या क्षमता दाखवून द्यायला हव्यात. संस्कार जिवंत ठेवायचं पवित्र कर्तव्य आपण सार्‍यांनी मिळून पार पाडायला हवं. तरूणाई म्हणजे एक जाज्ज्वल्य आविष्कार, जबरदस्त उन्मेष! आपल्यात खूप काही आहे. प्रचंड ऊर्जा आहे. या ऊर्जेचा आपण राष्ट्राच्या भल्यासाठी उपयोग करायला हवा. सध्या हे चित्र दुर्मीळ दिसतंय. 

आपल्या जातीय अस्मिता अत्यंत टोकदार झाल्यात. धर्माधर्मात आपण वाटले गेलोय. देश विकलांग होत चाललाय. म्हणजे आपण हे जातीय मोर्चे पाहतोय. कुणाचा थांगपत्ता कुणाला नाही. सगळ्या विचारधारा... त्याही लादल्या जातात. शब्दशः कुठल्याही विचारधारेला बळी पडू नका. सगळं काही पडताळून पहा आणि मग अनुनय करा. म्हणजे, स्वामीजीच म्हणायचे, ‘‘आपल्या राष्ट्राला बौद्धिक क्षत्रियांची गरज आहे आणि असे क्षत्रिय निर्माण झाले तर शस्त्रास्त्रांची मुळीच कमतरता पडणार नाही.’’ 

तर असे बौद्धिक क्षत्रिय खरोखर निर्माण व्हायला हवेत. म्हणजे धर्म कशात आहे? खरा धर्म कोणता? स्वामीजीच सांगतात, ‘‘धर्म हा मतमतांतरात, धर्मग्रंथात वा शब्दात साठलेला नाही. धर्म म्हणजे आत्मानुभूती, आत्मसाक्षात्कार!’’ स्वतःची ओळख पटणं, स्वतःच्या क्षमतांची जाणीव होणं तो खरा धर्म! स्वतःतल्या क्षमता ओळखायला हव्यात. त्या आणखी विकसित करायला हव्यात आणि त्यातून व्यापक राष्ट्राची जी संकल्पना आहे ती पूर्णत्वास आणायला हवी. म्हणजे अब्दुल कलाम साहेबांनी सांगितलं, ‘‘2020 ला आपला भारत हा महासत्ता असेल.’’ 

अरे, कसा असेल? आपण त्यासाठी निश्‍चित काय करतोय? आपले काय प्रयत्न आहेत? कोण कुठला कन्हैया कुमार उगवतो आणि राष्ट्रविरोधी घोषणा देतो. सैनिकांवर आरोप करतो. देश पेटवतो. त्याचे पडसाद पुण्यासारख्या सांस्कृतिक नगरीतील फर्ग्युसन महाविद्यालयापर्यंत उमटतात. जिग्नेष मेवानी, उमर खालिदसारखे लोक शनिवारवाड्यावर येऊन सभा घेतात. समाजा-समाजात फूट पाडण्यासाठी जो तो तेल ओतत असतो. आपणही त्याच्या आहारी जातो. राजकारणी तर राजकारणच करणार! ते काही संत नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडून काही अपेक्षा ठेवाव्यात असे चित्र नाही. अशावेळी आपली सद्विवेकबुद्धी, आपला विवेक कुठं जातो? आपण कुणाच्याही बोलण्याला बळी पडून आपापसात का भांडत राहतो? हे कसलं भिकार लक्षण आहे? हे सगळं थांबायला हवं. आपली प्रत्येकाची ती नैतिक जबाबदारीच आहे.

सध्या सगळ्या क्षेत्रांचं बाजारीकरण झालंय. हे बाजारीकरण थांबायलाच हवं. म्हणजे मी अनेक ठिकाणी फिरत असतो. बरेचजण मला विचारतात, ‘‘तुमचे आईवडिल तुमच्याकडेच राहतात का?’’ मी सांगतो, ‘‘नाही, मी माझ्या आईवडिलांकडे राहतो.’’ स्वतःचे कुटुंब, आईवडील यांचीही आपण पर्वा करत नाही आणि जगाशी संपर्क वाढवायला निघालोय. मग ‘‘भाजी बिघडलीय’’ असं नवर्‍यानं सांगितलं तर बायको म्हणणारच, ‘‘असं कसं, याच भाजीच्या इमेजला मला फेसबुकवर 300 लाईक आणि 102 कमेंट आल्यात. अनेकांच्या तोंडाला पाणीही सुटलंय...’’ 

घरात काय चाललंय, आजुबाजूला काय चाललंय, गावात काय चाललंय हे माहीत नसतं आणि आपल्या जगभरच्या चर्चा सुरू असतात. ट्रम्पनं असं करावं, नरेंद्र मोदींनी हे केलं, योगी आदित्यनाथ हे करताहेत, ममता बॅनर्जी ते करताहेत! अरे, आता तू काय करतोस हे जास्त महत्त्वाचे आहे. म्हणजे आपलं पडणारं प्रत्येक पाऊल विकासाच्या दृष्टिनं जायला हवं. आपण आधी ‘माणूस‘ म्हणून संपन्न व्हायला हवं. त्यासाठी आपले मुळात काय प्रयत्न आहेत? 

सगळ्यात मोठं ज्ञानकेंद्र कोणतं? तर विद्यापीठ! महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यापीठांच्या फक्त कुलगुरूंची नावं तरी आपल्याला माहीत असतात का? मुळीच नसतात कारण आपल्याला त्याची गरजच वाटत नाही. पूर्वी ऋषी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचे.  ज्ञान द्यायचे. आजचे कुलगुरू, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक नेमकं काय करतात? विद्यार्थ्यांच्या मनावर आणि जीवनावर त्यांचा कसा प्रभाव पडतो? त्यातून काही साध्य होतं का? शाळा-महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना फक्त माहिती मिळते की ज्ञान?  मग ही शोकांतिका नाही का? यादृष्टिने काही विचार होणार का? आपली ज्ञानकेंद्रच दुर्लक्षित आहेत... इंग्लंडसारख्या राष्ट्रात तुम्ही गेलात तर ते सांगतील, ‘एकवेळ आम्ही आमचं साम्राज्य देऊन टाकू; पण आमचा शेक्सपिअर आणि आमचं क्रिकेट आम्ही कुणालाच देणार नाही...’ याला म्हणतात अस्मिता! आपली भाषा, आपली संस्कृती, आपले खेळ यासाठी आपण काय करतोय? इथले मराठमोळे खेळ जिवंत रहावेत यासाठी कोणी काही प्रयत्न करतंय का? क्रिकेटवर तुम्ही जरूर प्रेम करा पण कबड्डीची काय अवस्था आहे हेही बघा. आपल्या खेळाडूंची, इथल्या मातीतल्या कलावंतांची काय उपेक्षा आहे ती बघा. आपलं टॅलेंट आपणच ओळखायला हवं. आपल्यातल्या क्षमता जास्तीत जास्त विकसित व्हायला हव्यात. एक चांगलं राष्ट्र, एक चांगलं राज्य, एक चांगलं गाव आणि एक चांगलं कुटुंब निर्माण व्हायला हवं. अर्थात याची सुरूवात आपल्यापासून, आपल्या कुटुंबापासून व्हायला हवी. मला खात्री आहे, आपण नक्कीच या दृष्टिनं एक पाऊल पुढं टाकू. आपण जे काही उत्तमोत्तम करू तेच सत्य आणि चिरंतन असणार आहे. ‘राष्ट्र’ ही संकल्पना खूप व्यापक असते. ती आपण सातत्यानं समजून घेऊ! सुरूवात स्वतःपासून करू!

भारत हा असा एक देश आहे जिथे सध्या सर्वाधिक तरूणांचं प्रमाण आहे. ‘तरूणांचा देश’ अशी आपल्या राष्ट्राची ओळख आहे आणि इथली आदर्श संस्कृती आपणा सर्वांना माहीतच आहे. आपण कितीजण रोज किमान दहा मिनिट व्यायाम करतो? म्हणजे श्‍वासोच्छ्वास आपण कुणाला विचारून करतो का? तो ठरवून करत नाही तर ती एक नैसर्गिक क्रिया आहे. तसंच रोज व्यायाम ही सुद्धा एक गरज आहे. रोज किमान अर्धा तास अवांतर वाचन ही गरज आहे. याच्याकडेच आपण दुर्लक्ष करतो. सगळ्या जगाचा ठेका माझ्याकडेच आहे, मलाच जग सुधारायचंय अशा आविर्भावात आपण असताना आपण स्वचिंतन करत नाही. स्वविकास साधत नाही. स्वतःकडं आपण लक्षच देत नाही, ही शोकांतिका आहे. ती थांबवायला हवी. 
(पुढारी दिवाळी 2018)

- घनश्याम पाटील
संपादक, ‘चपराक’, पुणे
7057292092

1 comment:

  1. छान लेख।वाचनीय।पण लक्षात कोण घेतो?

    ReplyDelete