Thursday, November 15, 2018

कशासाठी? भुकेसाठी!


एका लेखात मी लिहिलं होतं की, ‘आजच्या राजकारण्यांना भस्म्या झालाय आणि कितीही खाऊनसुद्धा त्यांची भूक भागतच नाही...’
मग मला प्रश्न पडला की ‘भूक’ म्हणजे नेमकं काय? भूक लागणं, भूक भागवणं, भूक मारणं असे अनेक शब्दप्रयोग आपण करत असतो. मग ही ‘भूक’ लागते म्हणजे नेमकं काय होतं? ते सिद्ध कसं करावं?
भूक ही एक पूर्णपणे आवर्ती म्हणजे निश्चित कालावधीनंतर पुन्हा पुन्हा निर्माण होणारी संवेदना आहे. आपण अन्न विकत घेतो, पण भूक कशी विकत घेणार? जठर रिकामं झाल्यावर जी वखवख होते, जाणवते त्यालाच तर भूक म्हणतात. या भुकेसाठी आजवर अनेक युद्धं झाली. प्रचंड क्रौर्य दाखवत माणसं मारली गेली. भूक भागावी म्हणून लोकांनी नको नको ते उद्योग केले. ही भूक नेमकी कशी असते हे मात्र कोणी ठामपणे सांगू शकत नाही. भुकेवर अनेक ग्रंथ लिहिले गेले. अनेक लेखकांनी भुकेचा धर्म, भुकेची संस्कृती यावर लेखन केलं. जगभर भुकेविषयी मोठ्या प्रमाणात संशोधन झालं. ते अजूनही सुरूच आहे. भुकेचा तळ गाठणं मात्र भल्याभल्यांना जमलं नाही.
भुकेची संवेदना भागली नाही तर माणूस अस्वस्थ होतो. त्याला ग्लानी येते. हा अस्वस्थ माणूस पुढे अत्यवस्थ होतो आणि काहीवेळा त्याचा ‘भूकबळी’ही जातो.  इतकं सारं होऊनही भूक काय असते हे मात्र त्याला कळतच नाही. अन्न खाण्याची इच्छा निर्माण होणं आणि त्यावेळी ते चवीनं खाणं याला ‘भूक भागणं’ म्हणतात. ही भूक भागवण्यासाठी माणसानं आजवर जो संघर्ष केला त्याला तोडच नाही.
पूर्वी माणूस भूक भागवण्यासाठी झाडाची पडलेली फळं खायचा. निसर्गाच्या विरूद्ध जाऊन एखादं फळं तोडायचीही त्याची हिंमत व्हायची नाही. त्यानंतर त्यानं शिकारी सुरू केल्या. ते करतानाही त्यांना स्वतःच्या भुकेबरोबरच जो प्राणी ‘शिकार’ होणार आहे त्याचीही चिंता वाटायची. या चिंतेवर भूक विजय मिळवायची. मग तो त्याला मारण्याआधी त्याची माफी मागायचा. त्याची म्हणजे देवाची माफी नव्हे! संबंधित प्राण्याची!! उदा. त्याला एखादं हरीण मारायचं असेल तर तो त्याला मनोभावे नमस्कार करायचा. ‘माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या भुकेसाठी तुझा जीव घेणं मला गरजेचं आहे. त्याशिवाय आम्ही जगू शकत नाही. त्यामुळं आम्हाला माफ कर’ असं म्हणून तो शिकार करायचा व ते मांस खायचा.
त्यानंतर शेतीचा शोध लागला आणि माणूस विचार करू लागला. भुकेच्या गरजेतून त्याची ‘विचार’ करण्याची क्षमता विकसित झाली आणि त्यानं नवनवे प्रयोग सुरू केले. त्यातून अनेक शोध लागले आणि त्याची भूक वाढतच गेली. त्याच्या पारड्यात त्या शोधाचं फळ पडलं. त्यातून त्याचा हव्यास वाढतच गेला. ही भूक कमी होण्याऐवजी त्याच्या महत्त्वाकांक्षा, इच्छा-आकांक्षा वाढत गेल्या. त्याचं समाधान, त्याची तृप्ती या सगळ्या गोष्टी संपुष्टात आल्या. भूक लागणं, ती भागवणं हेच त्याचं चक्र सुरू झालं. भुकेची सवय झाली. ती लागल्यावर कशी भागवावी याचं ज्ञान त्याला मिळालं.
शेतीचा शोध लागल्यावर वेगवेगळे समूह तयार झाले. त्यातून त्यांच्या टोळ्या आल्या. मग सुरक्षिततेच्या भावनेतून त्यांनी एकमेकांना सांभाळून घेणं सुरू केलं. इतरांवर ते संघटितपणे तुटूनही पडू लागले. या टोळ्या नवनवीन शोधाच्या बळावर, त्यांच्या कौशल्यावर जगू लागल्या. मग या गटांच्या जाती झाल्या. आलुतेदार-बलुतेदार पद्धती निर्माण झाल्या. या जातींनाही प्रतिष्ठा मिळू लागली. त्यांच्या त्यांच्या जाती या त्यांच्यासाठी अहंकाराचा, स्वाभिमानाचा विषय झाला. म्हणजे चप्पल चांभारानं तयार करायची, कुणब्यानं शेती करायची, ब्राह्मणानं ज्ञानदान करायचं, ढोरानं जनावरांची कातडी सोलायची, माळ्यानं बागकाम करायचं, वडारानं मुर्तीकाम साकारायचं, मराठ्यानं अनिष्ठतेविरूद्ध लढा द्यायचा आणि सामान्य माणसाला संरक्षण द्यायचं असं त्यांच्या त्यांच्या कामाचं विभाजन झालं. त्यातून त्यांच्या अस्मिता टोकदार झाल्या. आजतर त्या खूपच भयावह वाटतात. केवळ कर्मानुसार, भुकेच्या गरजेनुसार ज्या समुहांनी ज्या जाती स्वीकारल्या होत्या त्यामुळं देश दुभंगला आहे. राजकारण्यांनी त्याला सातत्यानं खतपाणीच घातलं. आज आपल्यासमोर सर्वात मोठी समस्या ही जाती-धर्माची आहे. माणूस एकसंध रहावा, त्याच्या हाताला काम मिळावं, त्याचं साहचर्य वाढावं म्हणूज जी संकल्पना साकारली होती तिच आज त्याच्या मुळावर उठली आहे.
भूक लागल्यावर माणसाला किंवा कोणत्याही सजीव प्राण्याला अन्न लागते. ते वेळेत मिळाले नाही तर तो बिथरतो. उपासमार सुरू झाली की तो भ्रमिष्ट होतो. त्याचा सारासार विवेक संपतो. मग भूक भागवण्यासाठी तो वाटेल ते करतो. क्षुधानाश झाल्यावर अनेक भयगंड वाढतात. एकप्रकारची उद्विग्नता येते. त्यातून शरीराचं आणि मनाचं कुपोषण वाढत जातं. ते माणसाला मारतं. काहीवेळा इतरांना मारायला प्रवृत्त करतं. 
भूक ही संवेदना मनाशी निगडित असते, शरीराशी निगडित असते. तिचा विस्तार संबंधिताच्या महत्त्वाकांक्षेनुसार, गरजेनुसार होत जातो. जी माणसं भुकेसाठी काही दुष्कृत्ये करतात त्यांना आपण जनावरांची उपमा देतो. हा खरं तर जनावरांचा अपमान आणि त्या माणसाचा सन्मान असतो. एखादा वाघ त्याला भूक नसेल तर उगीच शिकार करत नाही. त्याच्या आजूबाजूला कितीही प्राणी असले तरी तो ढुंकूनही बघत नाही. भूक लागली तरच तो शिकारीसाठी बाहेर पडतो. या क्षेत्रातले जाणकार सांगतात की त्याला मिळणार्‍या शिकारीचं प्रमाणही खरंतर खूप कमी असतं. म्हणजे त्यानं वीसवेळा शिकार करण्याचा प्रयत्न केला तर तो त्यात एकदा यशस्वी होतो. जनावरांत बलात्काराचं प्रमाण नगण्य आहे. विशिष्ठ अपवाद वगळता कोणतंही जनावर मादीवर अत्याचार करत नाही. मादी माजावर आली, तिनं स्वतःहून आव्हान दिलं, तिनं परवानगी दिली तरच त्यांच्यात संबंध येतात. भूक आणि मैथुन सोडले तर अनेक प्राण्यांना फार बुद्धिही नसते. तरीही ते अतिरेक करत नाही. माणसानं या सर्व मर्यादा ओलांडल्या. त्याला बुद्धी मिळाली पण त्यानं सातत्यानं त्याचा गैरवापरच केला. अगदी पूर्वी राजे-महाराजे युद्धं जिंकायचे तेव्हा शत्रूपक्षातील स्त्रियांवर त्यांचा डोळा असायचा. छत्रपती शिवरायांसारखा एखादाच राजा असा होऊन गेला की ज्यानं शत्रूंच्या स्त्रियांवर अत्याचार केले नाहीत. उलट त्यांना सन्मानानं परत पाठवलं. असे काही अपवाद सोडले तर माणसानं सातत्यानं वर्चस्ववादी प्रवृत्तीच बाळगली. त्याची भूक काही संपता संपली नाही, संपणार नाही.
 भुकेसाठी माणूस अनेकांच्या जिवावर उठत असताना जगभर असंख्य लोक एकवेळच्या खाण्यासाठी मोताद आहेत. त्यांची ही तडफड पाहून आपल्या मनात कालवाकालव होईल. मग या भुकेचा बाजार मांडला जातो. त्यांची भूक भागवण्यासाठी त्यांना आमिषं दाखवली जातात. त्यातून संहार घडतो. ‘हंगर इकॉनॉमी’ जगावर राज्य करतेय. आपली भूक भागवण्यासाठी माणूस इतरांवर अन्याय-अत्याचार करतो. भूक भागवण्यासाठी तो इतरांच्या अन्यायाला बळीही पडतो. काहीही करून भूक भागली पाहिजे असा त्याचा पवित्रा असतो. आपली आणि आपल्या कुटुंबियांची भूक भागावी यासाठी सामान्य माणसाची धडपड असते. 
ही भूक भागणार नाही अशी असुरक्षिततेची भावना निर्माण झाली की तो नवनवीन मार्ग निवडतो. त्यातून त्याची भूक वाढतच जाते. या भुकेच्या भयातून जगभर धर्मसंस्कृती बळावली. अक्षरशः मुजोर झाली. त्यातून ‘टेंपल इकॉनॉमी’ची दहशत निर्माण झाली. जगभरात अनेक चर्च प्रतिसरकार चालवतात. मस्जिदीतून त्या समुदायाची सूत्रं हलतात. मंदिरातून नको ते उद्योग केले जातात. आपल्या महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर मध्यंतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेच होते की, ‘राज्यसत्तेपेक्षा धर्मसत्ता श्रेष्ठ आहे.’ त्यांच्या या विधानावर गहजब माजवला गेला; पण हे वैश्विक सत्य आहे. अमेरिकेसारख्या महासत्ता असलेल्या देशात त्यांचा पोप राष्ट्राच्या निर्णयावर परिणाम होईल इतकी शक्ती स्वतःजवळ बाळगतो. विविध चर्चच्या माध्यमातून धर्मांतरासाठी जे पैसे वापरले जातात त्यात कित्येक राष्ट्रातील भुकेची समस्या कायम निकाली निघू शकते. यावर संबंधितांनी विचार केला नसेल असे नाही पण ही समस्या संपली तर त्यांचे महत्त्व संपले. जोपर्यंत भूक अस्तित्वात आहे तोपर्यंत भीती आहे. ही भीती असेपर्यंत कोणत्याही राज्यसत्तेला, धर्मसत्तेला भय नाही. भय आणि भूक यावर जगाची धोरणं ठरतात.
भूक लागली की गरज पडते ती अन्नाची! मग अर्थातच ‘फूड इंडस्ट्री’ प्रबळ ठरते. अन्न तयार करण्यासाठीचे धान्य पिकवतो तो शेतकरी! या शेतकर्‍याची मात्र भूक भागेल इतकंही त्याच्या वाट्याला येत नाही. त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग, अन्नपदार्थ विकणारे हॉटेल्स हे मात्र अर्थसत्तेचे केंद्रबिंदू आहेत. 
मध्यंतरी वाचले होते की आपल्या खाण्याची आवड निर्माण करण्यात काही जागतिक संघटना पुढाकार घेतात. म्हणजे मुलांनी गोड चॉकलेट खायला हवीत, त्यांच्या प्रत्येक खाऊमधून त्यांच्या पोटात जास्तीत जास्त ‘शुगर’ जायला हवी, त्यांना कमीत कमी प्रथिने मिळून ते त्या सवयीचे गुलाम व्हावेत यासाठी ही लॉबी काम करते. मग अनेकांचे वजन वाढते. लठ्ठपणा येतो. विविध आजार जडतात. मधुमेह तर जवळपास प्रत्येकाचीच पाठ पुरवतोय. असे आजार नाहीत असा माणूस मिळणे दुर्मीळ झालेय. प्रत्येक खाद्यपदार्थात भेसळ केली जाते. त्यात तात्कालिक फायदा व्हावा ही अपेक्षा तर असतेच पण माणूस जास्तीत जास्त असहाय्य कसा होईल, त्याला शारीरिक दौर्बल्य कसे येईल, विविध आजार त्याचा पिच्छा कसा पुरवतील, तो परिस्थितीपुढं हतबल कसा होईल इकडं या कंपन्यांचं लक्ष असतं. त्यातून वैद्यकिय व्यवसाय उभा राहिला. औषधोपचार पुरविणार्‍या कंपन्यांनी त्यांचे ग्राहक तयार केले. त्यांचं जाळं जगभर विखुरलं. आज ‘हेल्थ इंडस्ट्री’ जगावर राज्य करतेय. साधी ऍसिडीटी झाली तरी अँजिओप्लास्टी करणारी रूग्णालयं कमी नाहीत. अशावेळी रूग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना प्रचंड घाबरविण्यात येतं. काही बोलावं तर जिवाशी खेळ. म्हणून यांचं फावतं. या सगळ्याचं मूळ खाण्यात आहे. खाण्याचा संबंध भुकेशी येतो.
खाण्यावर कुणाचंच नियंत्रण राहिलं नाही. पूर्वी आपण सकाळी आणि संध्याकाळी असे दोन वेळाच खायचो. जाता-येता ‘चरणं’ आपल्या जुन्या पिढीला माहीत नव्हतं. आपली ती आवड प्रयत्नपूर्वक विकसित केली गेली. खाण्याच्या चुकीच्या सवयी लावल्या गेल्या. काहीजण जगण्यासाठी खातात! अनेकजण खाण्यासाठीच जगतात. मग सगळ्या आजारांना निमंत्रण मिळणं स्वाभाविक आहे. जिभेचे चोचले पुरवणं आणि जिभेवर ताबा न ठेवणं यामुळं अनेकजण आयुष्यातून उठलेत. त्यांच्याकडं बघूनही आपण काही बोध घेत नाही. अकारण बोलत सुटतो. खात सुटतो...
डॉ. श्रीकांत जिचकार यांनी यावर मोठा अभ्यास केला होता. त्यांनी सांगितलं की, दिवसात दोनच वेळा जेवत जा! त्याही वेळा निश्‍चित ठेवा. म्हणजे सकाळी नऊ आणि रात्री नऊ असे दोनदा जेवत असाल तर त्या 55 मिनिटांत जे खावेसे वाटेल ते खा! उदा. नऊची वेळ ठरली असेल, सव्वानऊ पर्यंत जेवण झाले आणि थोड्या वेळात पुन्हा तुम्हाला काही खावे वाटले तर 55 मिनिटांच्या आत खा. एकदा एक घास खाल्ला की शरीरात इन्शुलिन तयार होते. ते 55 मिनिट असते. तोपर्यंत जे वाटेल ते खा. त्यानंतर मात्र दोन जेवणात पुरेसे अंतर ठेवा. पुन्हा रात्रीच्या जेवणात पुढची 55 मिनिटं! इतकं साधं सूत्र ठेवल्यानं अनेकांचे आजार पळाले. ज्यांना मधुमेह आहे तोही आटोक्यात आला. डॉ. जिचकार यांच्यानंतर मराठवाड्यातील डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी हा विचार जगभर पोहोचवला. त्यांचे अनुयायी सर्वत्र आहेत. त्यांनी आरोग्यविषयक, आहारविषयक जी तत्त्वं घालून दिलीत ती मानणारी आणि त्याचा फायदा लक्षात आलेली असंख्य माणसं आहेत. 
जशी खाण्याची भूक असते तशी सत्ता, पद, पैसा, प्रतिष्ठा याचीही भूक असते. मग त्यासाठी आपण वाटेल ते करायला तयार होतो. बायकांच्या मनाची भूक भागत नाही. पुरूषांची शरीराची भूक भागत नाही. त्यातून अन्याय-अत्याचाराची मालिका घडते. पैशांचे व्यवहार येतात. फसवणूक केली जाते, नागवणूक केली जाते. अडवणूक केली जाते. वर्चस्व गाजवले जाते. धमकावले जाते. फायदा करून घेतला जातो. गैरफायदा घेतला होतो. त्यासाठी प्रसंगी कायदा विकत घेतला जातो, विकला जातो. हे सगळं भुकेतून घडतं. भूक माणसाला स्वस्थ बसूच देत नाही. जिभेचे चोचले पुरवण्यासाठी, शरीराची गरज भागवण्यासाठी, मनाचे समाधान करून घेण्यासाठी, इच्छा-आकांक्षांचे मनोरे उभारण्यासाठी काहीही, म्हणजे अगदी काहीही केले जाते. त्यावर कुणाचेच निर्बंध राहत नाहीत. 
राजघराण्यातील अनेक मंडळी, काही राजकारणी, उद्योजक, खेळाडू, अभिनेते-अभिनेत्री, कलावंत... थोडक्यात विविध क्षेत्रातील धनाड्य मंडळींची भूक काही संपत नाही. मग ते कोणत्याही थराला जातात. त्यातून मानवी-अमानवी कृत्यं घडतात. ‘नरडीचा घोट घेणं’ हा वाक्प्रचार तंतोतंत लागू पडतो. माणसं मारली जातात. काही हकनाक मरतात. तरीही त्यांची क्षुधाशांती होत नाही. भूक माणसाला काहीही करायला भाग पाडते. त्यात सध्या श्रमापेक्षा प्रेमाला जास्त प्रतिष्ठा मिळतेय. ते प्रेमही खरंच असेल असं नाही. किमान तसं दाखवलं जातं. जो कष्ट करतो तो उपाशी राहणं, त्याची भूक न भागणं हे आपल्या समाजाचं मुर्दाडपण आहे. त्याउलट आपली ‘हवी ती’ भूक भागवण्यासाठी माणसांना वेठीस धरणं, त्यांच्याकडून वाटेल ते करून घेणं हा अनेकजण त्यांचा धर्मच समजतात.
चार ठुमके घेतल्यानंतर एखाद्या नाचणारीला लाखो रूपये मिळतात. त्याला कलेचं, साधनेचं आवरण घातलं जातं. त्याउलट दिवसभर मोलमजुरी करून, काबाडकष्ट करून कुटुंबियांचं एकवेळचं जेवणही भागत नसल्यानं असंतोष वाढत जातो. त्यातून विषमता पसरते. द्वेष वाढतो. माणसाचा सैतान होतो. या परिस्थितीतूनच अनेक गुन्हेगारांचा जन्म झालाय. हत्याकांडं घडलीत. दहशतवादी निर्माण झालेत. नक्क्षली फोफावत गेलेत. या सगळ्यांच्या भुकेचा बाजार मांडण्यात राजकारणी पटाईत असतात. ते बरोबर त्याचा फायदा घेतात. जगद्गुरू संत तुकाराम महाराज म्हणतात,
भुके नाही अन्न
मेल्यावरी पिंडदान
हे तो चाळवाचाळवी
केली आपणाची जेवी! 
स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी माणूस इतरांच्या भुकेचा आधार घेतो. त्याला रूढी, परंपरा, संस्कृतीचं कोंदण लावतो. ज्याची भूक भागलीय ते तृप्त होत नाहीत. कारण भूक ही चिरंतन अवस्था नाही. उलट त्याची भूक वाढतच जाते. मग इतरांच्या भुकेचा तो विचारच करत नाही. 
भूक लागल्यानंतर आपण जे खातो त्यापासून आपल्याला ऊर्जा मिळते. ती आपल्याला तंदुरूस्त ठेवते! पण भूक भागल्यानंतरही जे खावंसं वाटतं त्यामुळं खरे प्रश्न सुरू होतात. मग ते आरोग्याचे असोत वा मनाचे! काहीवेळा भूक नसते पण भुकेचा भास होतो.  पोट भरलेलं असतानाही एखादा अन्नपदार्थ पाहून तो खाण्याची इच्छा होणं, एखाद्या चित्रपटातील, चित्रातील भाव पाहून आपल्या मनात तशी इच्छा निर्माण होणं हे ‘हंगर सिग्नल’ असतात. ही  भूक शारीरिक असेल, लैंगिक असेल! त्यावेळी ती भावना पूर्ण करायलाच हवी असं अजिबात नाही. भुकेच्या वेळी योग्य तेच आणि योग्य प्रमाणात खाणं महत्त्वाचं असतं. 
जगात कोणीही उपाशी राहू नये, त्याची भूक भागावी, त्याच्या भुकेला दोन घास मिळावेत, तो तृप्त व्हावा, त्याच्या भुकेचा हव्यास वाढू नये आणि त्याला काही कमीही पडू नये! असं झालं तर चराचरातील चैतन्य बहरून येईल. भुकेच्या वेळात तो त्याला आवडेल ते, पचेल ते खाऊ शकेल आणि भुकेमुळे कोणीही उपाशी राहणार नाही, तो आपल्यासाठी सुदिन! हजारो वर्षाच्या संघर्षानंतर का होईना पण तो दिवस यावा हीच यानिमित्ताने प्रार्थना! 
(सोलापूर व्हिजन, दिवाळी अंक 2018)

- घनश्याम पाटील
संपादक, प्रकाशक, ‘चपराक’, पुणे
7057292092

8 comments:

  1. खूप छान लेख ... सर
    भुकेविषयी आपण मांडलेले विचार आणि केलेले भाष्य निश्चितच अनेक प्रश्नांची उत्तरे शोधायला भाग पाडतात.

    ReplyDelete
  2. नेहमीप्रमाणेच अप्रतिम......

    ReplyDelete
  3. नेहमीप्रमाणेच अप्रतिम......

    ReplyDelete
  4. माणसाच्या भुकेच्या विविध प्रकारच्या पातळ्या असू शकतात... अनादिकालापासून चालत आलेल्या भुकेचे गांभीर्य कधीच समाजासमोर आले नव्हतं ते आदरणीय पाटील सरांनी आणले आहे...भूकेच्या मुळापर्यंत पोहोचला हा लेख अनेक पातळ्यांवर वाचकांच्या संवेदना जाग्या करतोय...आपल्या ओघवत्या शैलीत भुकेची अवस्था आणि व्यवस्था मांडली आहे...भूक फक्त पोटाची नाही तर अनेक पातळ्यांवर भूक कशी स्थिरावली आहे...आपल्या आरोग्याशी खेळणाऱ्या विविध प्रकारच्या यंत्रणांना पाटील सरांनी अतिशय अभ्यासपूर्ण मांडले आहे...हा लेख एकदा वाचून वाचनाची भूक भागत नाही हे ही तितकेच खरे आहे....सलाम सर जी आपल्याला समाजाच्या संवेदना जाग्या करणारा हा लेख अप्रतिम आहे.

    ReplyDelete
  5. भूक या विषयावर नेहमीप्रमाणे अभ्यासपूर्ण लेख अभिनंदन।

    ReplyDelete
  6. खूपच अप्रतिम लेख पाटील सर,विवेकबुद्धी गहाण टाकून स्वार्थमूलक काम केल्यामुळे सत्व आणि तेज हरवुन बसलेली व समाजजीवनाला अध:पतित करू पाहणारी मानवी वृत्ती नष्ट होण्यासाठी प्रबोदनवादी विचार...
    प्रा.धनाजी चव्हाण

    ReplyDelete
  7. सावधपणे लिहिलेला लेख...

    ReplyDelete