Thursday, January 10, 2019

साहित्यिक दहशतवाद घातक


साहित्य संमेलन आणि वाद हे समीकरण आता नवीन राहिले नाही. दरवेळी काहीतरी खुसपट काढायचे आणि वादाची ठिणगी पडताच त्याचा वणवा कसा होईल याची दक्षता घ्यायची हा काही समदुःखी लोकांचा धंदाच होवून बसला आहे. या सगळ्यात प्रसारमाध्यमेही न्यायाधीशाच्या भूमिकेत जातात आणि मग हे वाद मिटण्याऐवजी आणखी चिघळत जातात. यंदा अरूणाताई ढेरे यांच्यासारख्या सिद्धहस्त लेखिकेची निवड सर्वानुमते संमेलनाध्यक्षपदी झाल्याने हे संमेलन वादाशिवाय होणार असे वाटत होते. मात्र काहींनी आपल्या कद्रू मनोवृत्तीचे दर्शन घडवत यंदा काही खेळ्या केल्या आणि उद्घाटकावरून यवतमाळला होणारे हे संमेलन चर्चेत आले. 

नयनतारा सहगल या इंग्रजी लेखिकेचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात काय काम? या मुद्यावरून या वादाला सुरूवात झाली. त्यानंतर त्या पंडित नेहरूंच्या भाची आहेत आणि नरेंद्र मोदी सरकारच्या विरूद्ध एल्गार पुकारत साहित्य अकादमीच्या पुरस्कार वापसीची सुरूवात त्यांनी केली होती हे कळल्यावर याला राजकीय रंग चढला. त्यातही त्यांनी त्यांचे भाषण आयोजकांकडे पाठवल्यावर त्यांची गोची झाली आणि त्यांना दिलेले निमंत्रण मागे घेण्याची नामुष्की ओढवली.

कोणत्याही भाषेतील लेखकाला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर येण्यास मज्जाव करणे हा अविवेक आहे. हे अखिल भारतीय संमेलन असल्याने सर्व भाषा भगिणीतील सौहार्द वाढण्याच्या दृष्टिने उलट हे अत्यावश्यक आहे. गेल्या काही काळातला विचार केल्यास घुमान येथे झालेल्या साहित्य संमेलनाने याबाबत स्तुत्य पायंडा पाडला आहेे. आजवर इतर प्रांतातील अनेक लेखक साहित्य संमेलनात सहभागी झालेले आहेत आणि त्यामुळे मराठी भाषेची पताका सर्वत्र डौलात फडकण्यात मदतच झाली आहे. पुण्याच्या साहित्य संमेलनात अमिताभ बच्चन यांच्यासारख्या अमराठी महानायकाला बोलावण्यात ज्यांनी पुढाकार घेतला तेही सहगल यांच्या ‘इंग्रजी लेखिका’ असण्यावरून टीकाटिपण्णी करत आहेत. त्यामुळे नयनतारा सहगल यांच्यासारख्या लेखिकेला नकार कोणी दिला यावरून चर्चा करतानाच त्यांना बोलवण्याचा निर्णय कोणाचा होता हेही तपासून पाहिले पाहिजे. आयोजकांचा आणि साहित्याचा अर्थाअर्थी दुरान्वयानेही संबंध नसताना ही खेळी नेमकी कोणी खेळली? यामागे काही ‘व्यापक कटाचा’ भाग होता का? हे पडताळून पाहणे अगत्याचे आहे.

सहगल यांचे साहित्यात फार काही मोठे योगदान आहे अशातलाही भाग नाही. त्या इथे येवून काय बोलणार याचा अंदाज बांधणेही अवघड नव्हते. त्या काही साहित्यिक मार्गदर्शन करतील आणि त्यामुळे साहित्य व्यवहाराला काही वेगळी दिशा मिळेल अशी अपेक्षा ठेवणे निव्वळ खुळेपणाचे होते. मग त्यांना साहित्य संमेलनाला उद्घाटक म्हणून का बोलावले आणि पुन्हा नकार देण्याचा करंटेपणा का केला हे स्पष्ट झालेच पाहिजे. या सगळ्या प्रकारामुळे आपल्या भाषेची आणि संस्कृतीची लक्तरे वेशीला टांगली जात आहेत.

साहित्य संमेलने बंद करा, असा एक मतप्रवाह गेल्या काही वर्षात सुरू आहे. हा म्हणजे ‘संधीवाचून ब्रह्मचारी’ अशातला प्रकार आहे. या संमेलनाला एक मोठी परंपरा आहे आणि भाषेच्या अस्तित्वाच्या, सन्मानाच्या दृष्टीने हा सोहळा साहित्यप्रेमींत चांगलाच रूजला, रूळला आहे. या निमित्ताने दरवर्षी साहित्यिक मंथन घडते,  साहित्यातीन चैतन्य बहरते आणि खळाळते राहते. या प्रेरणा अनेकांसाठी स्फूर्तिदायी ठरतात. हे संमेलन आणखी सर्वसमावेशक कसे होईल, प्रतिभावंतांचा सहभाग या संमेलनात कसा वाढेल, ते अधिकाधिक वाचकाभिमुख कसे होईल यादृष्टीने बरेच काम करता येण्यासारखे आहे आणि ते सुरूही आहे. त्यामुळे साहित्य संमेलनाविषयी असलेली नकारात्मकता दूर सारून प्रत्येकाने यात योगदान दिले पाहिजे. पंढरीची वारी ज्याप्रमाणे असंख्य वारकर्‍यांना जगण्याचं बळ देते त्याचप्रमाणे साहित्य संमेलन बौद्धिक क्षेत्रातील माणसांना प्रवाही ठेवते.

ह. भ. प. बंडातात्या कर्‍हाडकर यांच्या विरोधामुळे यापूर्वी महाबळेश्‍वर येथील संमेलन अध्यक्षाविना पार पडले. आनंद यादव आणि त्यांचे प्रकाशक ‘मेहता’ यांनी जाहीर माफी मागितली. यादवांनी त्यांची ‘संतसूर्य तुकाराम’ ही कादंबरी मागे घेतली त्यावेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने गळे काढणारे कुठे होते? चिपळूणच्या संमेलनात व्यासपीठावर परशुरामाची प्रतिमा लावल्याने ती बदलायला लावणारे आज गळे काढत आहेत. ठाण्याचे संमेलन दादोजी कोंडदेव स्टेडियमवर होतेय म्हणून त्याला विरोध झाला होता. आपल्याकडे राजकारणात जाहीर केलेल्या उमेदवार्‍या रद्द होतात, आज लिहिलेला अग्रलेख दुसर्‍या दिवशी माघारी घेतला जातो, एखाद्या विषयावर ठेवलेली चर्चा ऐनवेळी रद्द केली जाते किंवा संबधितांच्या मताला अनुकूल नसलेले पाहुणे बदलले जातात; मग उद्घाटक बदलले तर सामान्य रसिकाला त्रास होण्यासारखे काहीच नाही. माघार घेणे हा आपल्या संस्कृतीचा भाग नसल्याने त्यात जे कोणी दोषी असतील त्यांचा निषेध जरूर करावा परंतु यानिमित्ताने संमेलनावर बहिष्कार टाकण्याची भाषा अत्यंत गैर आहे. 

महत्त्वाचे म्हणजे "अरूणा ढेरे यांना दुर्गा भागवत होण्याची संधी आहे' असे म्हणत त्यांच्यावर मानसिक दबाव आणणे हे कोणत्या संस्कृतीचे लक्षण आहे? हा लेख प्रकाशित होईपर्यंत त्यांनी त्यांची भूमिका जाहीर केलेली असेल किंवा त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा त्या या विषयावर बोलतील, लिहितील! मात्र त्यांनी निषेध नोंदवलाच पाहिजे म्हणून त्यांना भंडावून सोडणे हा साहित्यिक दहशतवाद नाही काय? गेल्या काही वर्षात खुज्या वृत्तीच्या संमेलनाध्यक्षांमुळे संमेलनाची रया गेलीय असा आरोप करणार्‍यांना अरूणाताई यांच्यासारख्या व्यासंगी कवयित्रीचा, प्रतिभावान लेखिकेचा सन्मान करणेही शक्य होऊ नये? हे सगळेच आपल्या व्यवस्थेला न शोभणारे आणि लाज आणणारे आहे.

अरूणा ढेरे या संमेलनाध्यक्ष आहेत. त्यामुळे जे कोणी त्यांच्यावर दोषारोप करीत आहेत किंवा अप्रत्यक्षरित्या वेठीस धरत आहेत त्यांनी त्यांची यत्ता तपासून पाहणे गरजेचे आहे. गेल्या काही काळात संमेलनाध्यक्षांनी प्रत्येक विषयावर त्यांची मते मांडायलाच हवीत असा एक नवीन प्रघात सुरू झालाय. मराठी भाषा, साहित्य, संस्कृती, समीक्षा यादृष्टीने हे वाईट आहे. ‘नरेंद्र मोदी सीमेवर कशाला बोंबलत फिरतोय? त्याला कुठून, कशी गोळी घुसेल हेही कळणार नाही’ असे विधान करून यापूर्वी एक संमेलनाध्यक्ष चर्चेत आलेच होते. मागच्या संमेलनातही ‘राजा तू चुकतोस’ असे म्हणत तेव्हाच्या संमेलनाध्यक्षांनी स्वतःची पाठ थोपटून घेतली. या सर्व साहित्यबाह्य विषयात साहित्याचा आत्माच हरवत चालला आहे. कधी प्रकाशक परिषदेचा बहिष्कार, कधी खाण्या-पिण्याच्या पदार्थावरून वाद, कधी साहित्यिक सहभागावरून मतभिन्नता, अध्यक्षांच्या निवडीवरून नाराजी या व अशा सगळ्या प्रकारात भाषेच्या विकासाकडे सगळ्यांचेच अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. साहित्यातले पुढारी त्यांच्या उंचीला साजेशी विधाने करून या परंपरेला गालबोट लावण्यात आणखी पुढाकार घेतात.

यापूर्वी यवतमाळला झालेल्या संमेलनाचे अध्यक्ष गदिमा होते. त्याला यशवंतराव चव्हाण यांच्यासारखा साहित्यप्रेमी नेता उपस्थित होता. गदिमांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त होणार्‍या या संमेलनाच्या अध्यक्षपदी अरूणाताई ढेरे आहेत ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. 

काही सन्माननीय अपवाद वगळता साहित्य संमेलनाचे आयोजक, स्वागताध्यक्ष यांचा साहित्याशी काहीही संबंध नसतो. ते त्यांची प्रतिमा उंचावण्याच्या दृष्टीने काम करत असतात. शिवाय या संमेलनाला राजकीय पाठबळ आणि पुरेशा प्रमाणात पोटबळही लाभते. त्यामुळे संमेलनात राजकीय सहभाग नको, असे म्हणणे गैरलागू आहे. ज्यांना साहित्याचा पुळका येतो त्यांनी हे लक्षात घ्यावे की यापूर्वी एकदाच नव्हे तर अनेकदा शरद पवारांची साहित्य संमेलनातील भाषणे अध्यक्षांपेक्षाही जास्त प्रभावी ठरलेली आहेत. राजकारण हा सध्या प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. अगदी घरातही आपण ते टाळू शकत नाही. त्यामुळे साहित्य संमेलनात राजकारण आणि पुढार्‍यांचा वावर टाळता येणे शक्य नाही. हे सर्व पुढारीही मराठीच आहेत आणि मराठी माणसांचेच प्रतिनिधित्व करत आहेत. त्यामुळे त्यांना दूर ठेवा, असा गळा काढणारे टिकोजीराव ढोेंगी आहेत. 

साहित्यिकांनी त्यांच्या विचारधारा, गटतट याच्या पुढे जाणे गरजेचे आहे. त्यासाठी ‘जुने जाऊ द्या मरणालागुनि, गाडून किंवा पुरून टाका’ असे जर नव्या पिढीला वाटू लागले तर ते प्रस्थापितांचे मोठे अपशय असणार आहे. त्यांनी संकोचित भूमिका घेणे सोडून व्यापक दृष्टी बाळगणे आणि नवोदितांना प्रोत्साहन देणे, ही परंपरा समृद्ध करणे हेच त्यांच्या आणि साहित्यविश्‍वाच्या दृष्टीनेही भल्याचे आहे.
- घनश्याम पाटील
पुणे 
7057292092
( दैनिक 'पुढारी' संपादकीय पान)

16 comments:

  1. रोखठोक चपराक ! धन्यवाद . नयनतारा यांची राजकीय पुण्याई किंवा वारसा यामुळे निमंत्रित केले असावे पण मराठी साहित्याला वा वाचकांना त्यांचा काही फायदा नाही. बोलवायलाच नको होते

    ReplyDelete

  2. आपला हा लेख समतोल आहे.तरीही तो एका वर्गाची भूमिका/भावना समजून घेत नाही असे दिसते.
    (मी हे खालील मांडणीद्वारे प्रतिपादन करतो.)

    मला सहानुभूतीने महिला म्हणून अध्यक्ष करीत असाल तर मी अध्यक्ष होणार नाही असं महामंडळाच्या पदाधिकारी मंडळींना अरुणाताईंनी कळवलं होतं....मी माणूस आहे तेव्हां स्त्री-पुरुष असा भेद मुळी मला उपरोक्त विषयी मान्यच नाही अशी भूमिका घेणार्या अध्यक्षताई यांचे कडून नयनतारा यांच्या विषयीच्या अवमानकारक वागणूकी संदर्भात मत व्यक्त करावं असं जनसान्यानां आणि संवेदनशील अशा कोणालाही वाटणं स्वाभाविकच आहे.पण त्यांनी अर्थात मा.संमेनाध्यक्षा अरुणाताईंनी केव्हां/ कधी/ कसे/ कुठे...प्रतिक्रिया द्यावी हा त्यांचा वैयक्तिक भाग आहे.घाईत नसली तरी थोडं थांबून त्यांनी बोललं पाहीजे असं मला वाटतं.

    ReplyDelete
  3. नेहमीप्रमाणे सर्व बाजूंनी विचार करणारा, विचार करायला लावणारा लेख आहे. आपणास ज्या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत ती प्रश्नं योग्यच आहेत. अ. भा. सा. संमेलन आणि वादविवाद ही परंपरा यावर्षीही पाळल्या गेली हेही तितकेच खरे आहे.

    ReplyDelete
  4. छान लिहिले आहे सर ! परखड आणि सडेतोड भाषेत सत्य मांडले आहे.

    ReplyDelete
  5. आजच्या परिस्थितीतला महत्वाचा लेख... मान्यवर साहित्यिकांनी संयम बाळगायला हवा.. पण जे संयम दाखवताहेत त्यांच्यावर 'बोटचेपे' पणाचा आरोप होतोय...!!

    ReplyDelete
  6. सगळ्यावर सडेतोड व परखडपणे हल्लाबोल केला आहे, मस्त सर

    ReplyDelete
  7. आपण अगदी योग्य असे मतप्रदर्शन लिखाणातून केले आहे.एखाद्या गोष्टींचा निषेध करा तो ही योग्य मार्गांनी. संमेलनावर बहिष्कार टाकणे,हे ही योग्य नाही.अप्रत्यक्षपणे अध्यक्षांवर दबाव आणणेही अतिशय अयोग्य.

    ReplyDelete
  8. आपण अतिशय समतोल विचार मांडले आहेत. मायबोलीच्या प्रचार आणि प्रसारासाठी​ प्रत्येकाने​ अत्यंत जबाबदारीने वागायला व बोलायला/लिहायला हवे. अध्यक्षांवर दबाव आणि संमेलनावर बहिष्कार हे अनुचितच.

    ReplyDelete
  9. आपण अतिशय समतोल विचार मांडले आहेत. मायबोलीच्या प्रचार आणि प्रसारासाठी​ प्रत्येकाने​ अत्यंत जबाबदारीने वागायला व बोलायला/लिहायला हवे. अध्यक्षांवर दबाव आणि संमेलनावर बहिष्कार हे अनुचितच.

    ReplyDelete
  10. ग्रेट ! तुमची मते ऐकून खुप आनंद झाला. संमेलनात चाललेल्या गैरप्रकारावरून तुम्हींसर्वानी मिळून जर असाच आवाज उठवला तर या पुढची सर्व संमेलने साहित्याने भरभरून होतील ही आशा जागृत झाली आहे. धन्यवाद .

    ReplyDelete
  11. सुस्पष्ट विश्लेषण, आवडले.

    ReplyDelete
  12. उत्तम संतुलन आणि परखड मांडणी! आजच्या माध्यम गोंगाटाच्या काळात प्रत्येक जण बोलतोय. यामुळे काही वेळा सांस्कृतिक यादवीसदृश्य परिस्थिती निर्माण होते. यामुळे साऱ्यांनी सर्व विषयांवर व्यक्त होऊ नये,असे वाटते. मौनातूनही बरेच व्यक्त होता येते. बाकी आपले फटकारे अप्रतिमच ! मनापासून अभिनंदन !!

    ReplyDelete
  13. चांगला लेख! मुद्दे विचारात घेण्यासारखेच. साहित्य मानवी जीवनाचा वेध घेतं त्यामुळे कुठल्याही क्षेत्रातल्या व्यक्तींना त्यापासून बाजूला काढणंं हे सुसंस्कृततेचं लक्षण ठरत नाही. सर्वसमावेशक विचारसरणीच्या साहित्यिकांचा समाजावर वरचष्मा असावा, संकुचित विचारसरणीच्या लोकांचा नव्हे, हे साहित्यिकांनी ओळखून कुणापुढे झुकायचं किंवा झुकायचं नाही हे ठरवण्याइतका नैतिक धाक स्वत:त बाळगावा. संमेलनाध्यक्ष अरुणा ढेरे यांच्यात ते सामर्थ्य निश्चितच आहे! ( संमेलनाध्यक्ष म्हणून ढेरे यांचं भाषण ऐकायचं राहिलंय पण त्यांच्या सर्वसमावेशक भूमिकेविषयी खात्री आहे!)

    ReplyDelete
  14. साहित्यविश्वाला अंतर्मुख करणारा अप्रतिम लेख...अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळपेची थांबणे हे जितके महत्त्वाचे तितकेच प्रस्थापितांनी नवोदितांना प्रोत्साहन देणे तेही तितकेच महत्त्वाचे आहे.

    ReplyDelete
  15. साहित्यविश्वाला अंतर्मुख करणारा अप्रतिम लेख...अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळपेची थांबणे हे जितके महत्त्वाचे तितकेच प्रस्थापितांनी नवोदितांना प्रोत्साहन देणे तेही तितकेच महत्त्वाचे आहे.

    ReplyDelete