वृत्तपत्र हा लोकशाहीचा प्रमुख स्तंभ आहे. या क्षेत्रात काम करणारा पत्रकार हा समाजाचा महत्त्वाचा घटक असतो. अन्याय-अत्याचाराविरूद्ध सातत्याने आवाज उठवणारा हा घटकच दुर्लक्षित राहतो. काळानुरूप बदलत गेलेल्या पत्रकारितेत काही कुप्रथा निर्माण झाल्या असल्या तरी वृत्तपत्रीय लेखनावर अजूनही लोकांचा विश्वास आहे. छापून आलेली बातमी समाजमन घडविण्यात मोठा वाटा उचलते. जीवनाच्या सर्व अंगाना स्पर्श करून जाणार्या पत्रकारांची लेखणी झोपलेल्यांना जागे करते आणि अपप्रवृत्तींना झोपवतेही! म्हणूनच पत्रकारांचे अनुभवविश्वही समृद्ध असते. या क्षेत्राची ओळख करून देणारा आणि पत्रकारिता जीवनाचे विविध रंग उलगडून दाखवणारा कवितासंग्रह म्हणजे ‘कागदी काटे.’ बेळगाव ‘तरूण भारत’चे पुण्यातील संपादकीय प्रमुख प्रशांत चव्हाण यांनी हा अभिनव प्रयोग केलाय. केवळ पत्रकारिता क्षेत्रावरच्याच कवितांचा संग्रह हा मराठीतील बहुधा पहिलाच प्रयोग असावा. एक तपापासून पत्रकारितेत यशस्वीरित्या कार्यरत असलेल्या प्रशांत चव्हाण या संवेदनशील कवीने ही किमया साध्य केलीय.
‘जमत नसेल तुम्हाला जर काही
तर पत्रकार बनण्यास काहीही हरकत नाही’
असं सांगणार्या प्रशांत चव्हाण यांनी या क्षेत्रातील वास्तव अधोरेखित केलं आहे. अत्यंत तटस्थवृत्तीने कार्यरत असलेल्या चव्हाण यांनी पत्रकारितेत वेगवेगळे प्रयोग केले आहेत. नवनवीन मुलांना लिहिते केले आहे. आक्रमक असूनही तितकीच सभ्य आणि सर्वसमावेशक अशी त्यांची शैली आहे. सर्व क्षेत्रांचे वार्तांकन करताना त्यांनी कधीही दुजाभाव, कुणाला झुकते माप किंवा कुणाविषयी आकस बाळगला नाही. किंबहुना ‘विरोधी विचारधारेचे’ही तितक्याच उमदेपणाने स्वागत करणारे प्रशांत चव्हाण निष्ठेने या क्षेत्रात कार्यरत आहेत. म्हणूनच या क्षेत्रातील अपप्रवृत्तीवर ते कवितेच्या माध्यमातून प्रहार करतात. हे सारे धाडसाने आणि स्पष्टपणे मांडण्याचे नैतिक अधिष्ठान त्यांच्याकडे आहे. या क्षेत्रातील त्यांनी कवितेच्या माध्यमातून दाखवलेला आरसा पाहता कुणीही अस्वस्थ होईल. हा कवितासंग्रह पत्रकारितेविषयी मुलभूत विचार करण्यास भाग पाडतो आणि हेच प्रशांत चव्हाण यांच्या लेखणीचे यश म्हणावे लागेल. हे ‘कागदी काटे’ खोचकपणे रूततात; मात्र ते कुणाला ‘शब्दबंबाळ’ करीत नाहीत. तरीही सत्य मात्र नेमकेपणे सांगतात.
‘आम्ही बातमीदार’ ही या संग्रहातील दुसरीच कविता पत्रकारांचे जीवन शब्दबद्ध करते. सदा न कदा बातमीच्याच मागे असलेल्या पत्रकारांची उपासमार कशी होते, ठरलेले बेत आणि योजना यावर ‘पाणी’ कसे पडते, वैकुंठाच्या दिशेनेही कसे ‘आशेने’ पहावे लागते आणि काहीवेळा ‘जाण्यापूर्वी’च कशी बातमी तयार असते, डोक्यावर ‘मेमो’ची टांगती तलवार आणि पोरगी द्यायलाही कुणी बाप होईना तयार, मानाचेच धनी असणार्यांचा कसा वाढणार पगार असे प्रश्न, या क्षेत्राची तोंडओळख प्रशांत चव्हाण यांची कविता करून देते. या क्षेत्रातील प्रत्येकाला या आपल्याच वेदना वाटतील आणि प्रशांत चव्हाण यांच्या लेखणीचे हेच तर वैशिष्ट्य आहे.
इथून तिथून आमच्यावरच, बौद्धिक अत्याचार
आम्हीच आमचे मारेकरी, तक्रार कुठे करणार?
असा रोखठोक सवाल ही कविता करते.
पत्रकारिता हे वेड, की निव्वळ वेडाचा झटका
कुणी काहीही म्हणो, आल्यानंतर येथून ना सुटका...!
हेही सांगायला हा कवी विसरत नाही. ज्यांच्या रक्तातच पत्रकारिता असते ते इतर कसल्याही त्रासाला जुमानत नाहीत, कौटुंबिक आयुष्याची पर्वा करत नाहीत. ‘बातमी’हाच त्यांचा धर्म असतो. या धर्माला जागत ते अहोरात्र धडपडत असतात. दोन-चार रूपये देवून विकत घेतलेला कोणत्याही वृत्तपत्राचा अंक वाचताना वाचकांना तो त्यांच्या हातात येईपर्यंत केवढी यंत्रणा कार्यरत असते याचा अंदाज असतोच असे नाही. त्यामुळे पडद्यामागच्या या कलाकारांचे जीवन काव्यात्म शैलीत मांडण्याचे मोठे काम प्रशांत चव्हाण या धडपड्या पत्रकाराने केले आहे. त्याबद्दल त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच!
केवळ पत्रकारांचे जीवन, या क्षेत्रातील भल्याबुर्या गोष्टी मांडण्यापर्यंतच त्यांची कविता मर्यादित राहत नाही; तर चक्क धोरणात्मक निर्णय, संपादकीय बैठका, मालकशाही, पत्रकार-पोलिसांचे संबंध, क्षेत्र पत्रकारिता (बीट रिपोर्टिंग), भाषा, साहित्य संमेलने, पत्रकारांचे वैयक्तिक आयुष्य या सर्वांवर ही कविता समर्पक भाष्य करते. विशेषतः यातील अभंगसदृश्य रचना मनाचा ठाव घेतात, वाचकांना अंतर्मुख करतात. त्यांचे कार्यालय ‘वैकुंठ स्मशानभूमीजवळ’ असल्याने त्याचेही प्रतिबिंब एका कवितेत उमटले आहे. वृत्तपत्रीय जगाचा आवाका समजून घ्यायचा असेल तर प्रशांत चव्हाण यांच्या ‘कागदी काटे’ला पर्याय नाही.
कसली अभिव्यक्ती, कसले स्वातंत्र्य
अजुनी पारतंत्र्य, सभोवती
अयोग्य ठिकाणी, टीकेचा आसूड
तरी तिळपापड, सत्तांधांचा
स्तंभाचे हक्क, हेच हिरावती
वरून लादती, हक्कभंग
निषेधाचा सूर, कधी हल्लाबोल
सत्य लिहिता तोल, ढासळतो
स्तुतिसुमने अन् गोडाची फोडणी
हवी यांना लेखणी, गुळचट
व्वा रे लोकशाही, निव्वळ आभास
स्तंभच ओलीस, यांच्याकडे
अशी ‘अभिव्यक्ती’ प्रशांत चव्हाण यांनी मांडली आहे. सत्य लिहायला ते कचरत नाहीत. या क्षेत्रातील दुष्प्रवृत्तीकडे ते डोळेझाकही करत नाहीत. म्हणूनच प्रशांत चव्हाण यांचे कागदी काटे ‘काट्याने काटा‘ काढण्याचे काम करतात. जखम बरी व्हायची असेल तर अशा शस्त्रक्रिया तटस्थपणे करायलाच हव्यात. जे काम प्रसारमाध्यमांवर विविध परिसंवाद आयोजित करून, अनेक पुस्तके लिहून, पुरवण्या काढून होणार नाही ते काम प्रशांत चव्हाण यांच्या कविता करतात.
सुप्रसिद्ध कवी अजय कांडर यांनी केलेली पाठराखण, प्रख्यात छायाचित्रकार संदेश भंडारे यांनी कल्पकरित्या साकारलेले मुखपृष्ठ आणि कवीचे शब्दसामर्थ्य यामुळे ‘कागदी काटे’चे संदर्भमूल्य मोठे आहे. कवी प्रशांत चव्हाण यांच्या पुढील साहित्यिक कारकिर्दीस माझ्या अंतःकरणापासून शुभेच्छा!
कागदी काटे
कवी - प्रशांत चव्हाण (9325403220)
प्रकाशक - सहित प्रकाशन, गोवा
पाने - 67, मूल्य - 70
- घनश्याम पाटील, पुणे
७०५७२९२०९२
आपल्या पक्षातून दुसर्या पक्षात गेले तर ते ‘गद्दार’; मग जे दुसर्या पक्षातून आपल्याकडे येतात त्यांचं काय?
‘ते त्यांचं ‘हृदयपरिवर्तन’ होय!’
अशीच काहीशी अवस्था सध्या सर्वत्र निर्माण झालीय. सकाळी ‘राष्ट्रवादी’चा प्रचार करणारा कार्यकर्ता संध्याकाळी ‘भाजप’च्या उमेदवारीचे ‘तिकिट’ घेऊन आलेला असतो. हे सारे आजच्या काळात आश्चर्यकारक नसले तरी नैतिकतेच्या मात्र सर्व मर्यादा ओलांडणारे आहे. पक्षनिष्ठा, श्रद्धा, विचारधारा हे व असे सारे निकष कधीच मातीमोल झाले आहेत. राजकारण म्हणजे पैसा खाण्याचा अड्डा झाल्याने कुणालाच कसली चाड राहिली नाही. आपल्या लोकशाहीप्रधान देशाचं हे दुर्दैवच खरं!
‘पार्टी विथ डिफरंट’ अशी जाहिरात करणार्यांना सांगावेसे वाटते, बाबांनो, वेश्येने पतीव्रता धर्म शिकवू नये! तुम्हाला ज्या काही खटपटी करायच्या आहेत, त्या करा! फक्त आता समाजसेवेचा, राष्ट्रनिष्ठेचा आव आणू नकात! नीतिमत्तेचे धडे आता तुमच्याकडून घ्यायची आम्हाला गरज नाही. ‘देव आला द्यायला आणि पदर नाही घ्यायला’ अशी काहीशी या लोकांची अवस्था झालीय. ज्या पक्षात नरेंद्र मोदी, मनोहर पर्रीकर असे चारित्र्यसंपन्न नेते आहेत त्याच पक्षाची ही साठमारी पाहून कोणत्याही सामान्य माणसाला आत्यंतिक वेदना झाल्यावाचून राहणार नाहीत.
मागे मी एका उमेदवाराचे उदाहरण दिले होते. तो निवडणुकीतील प्रचारसभेत भाषण देत असतो. तो म्हणतो, ‘मित्रांनो, मागच्या खेपेला तुम्ही मला निवडून दिलं त्यायेळी माझ्याकडं काई बी नव्हतं. अंगावरच्या कपड्यानिशी मी गावाकडून आलतो. तुमचे आशीर्वाद मिळाले अन् नगरसेवक झालो. आज मला कशाचीबी कमतरता नाय. दोनशे एकर जमीन हाय, तीन चार बंगले हाईत, गाड्या हाईत. आख्खा पेट्रोल पंप हाय, हॉटेल हाय. तुमच्याकडं रोज पाण्याचा टँकर बी म्याच पाठवतो. म्हणून तुम्हास्नी इनंती हाय, यंदाबी मलेच निवडून द्या. म्हंजी मी आता तुमची कामं करू शकंल... अन् ध्यानात ठेवा, तुम्ही माझ्याबिगर कुणालाबी निवडून दिलं तरी त्याला माझ्याएवढं संमध करण्यात पुढची पाच वर्षे अशीच निघून जातील. त्यामुळं तुम्ही मला अजून एक संधी द्या... आता तर मी तुमची कामं करू शकंल...’
अशीच काहीशी आपली अवस्था झालीय. कालपर्यंत जे गावगुंड म्हणून आपल्याला माहीत होते, ज्यांच्या नावाचाही तिरस्कार वाटत होता ते सारेच्या सारे आज ‘कमळाबाई’ सोबत आहेत. हातातलं घड्याळ काढून त्यांनी कमळाचा पंचा गळ्यात अडकवलाय. ‘अर्ध्या चड्डीतले आणि दंड हातात घेऊन संचलनात सहभागी झालेले’ फोेटोही त्यांनी गावभर लावलेत. याला काय म्हणावे?
लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही. जी कामं आपल्याला वेळेअभावी करता येत नाहीत, ती करावीत म्हणून आपण आपला प्रतिनिधी निवडून देतो. त्यांनी यंत्रणेकडे पाठपुरावा करावा, जनहिताचे, लोककल्याणकारी निर्णय घ्यावेत अशी आपली रास्त अपेक्षा असते. मात्र होतेय उलटेच. हे ‘सेवक’च ‘मालक’ बनू पाहत आहेत. ज्याच्याकडून ‘दान’ घेतलं त्या धन्याला लुबाडण्याचे उद्योग सातत्याने सुरू आहेत. आम्हालाही त्याची ना खंत, ना खेद. दरवर्षी पुन्हा ये रे माझ्या मागल्या...
सातत्याने ‘बौद्धिक’ वर्गात गुंतलेल्या आणि संस्कारांचा टेंभा मिरवणार्या भाजपात कॉंग्रेस-राष्ट्रवादीतले सारे गुंड गोळा झालेत. इतर पक्षातली जी संघटीत गुन्हेगारांची टोळी होती ती सारीच्या सारी आता भाजपमध्ये दाखल झालीय. ज्यांनी भांडारकर इन्स्टिट्यूट फोडली, ज्यांनी दादोजी कोंडदेव यांचा पुतळा लालमहालातून काढून टाकला ते आज भाजपसोबत आहेत. एकेकाळी ‘हुसेनभाई बिफ मार्केट’चे उद्घाटन करणारे गिरीश बापट आज पुण्याचे पालकमंत्री आहेत. ‘देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यात किती शेतकर्यांनी आत्महत्त्या केल्या, किती जनावरे मेली’ याचे पाढे ते जनतेसमोर वाचत आहेत. भारतीय जनता पक्षाचा खरा चेहराच यामुळे पुढे येत आहे.
आमच्या पुणेकरांनी आठ आमदार आणि एक खासदार भाजपचा दिला. ज्यांच्याविरूद्ध हा रोष प्रकट झाला ते सारेच्या सारे आज भाजपमध्ये आहेत. आमदार अनिल भोसले, त्यांच्या पत्नी, बावधनचे दिलीप वेडे, किरण दगडे अशी काही उदाहरणे प्रातिनिधिक म्हणून घेता येतील. बावधन आणि परिसरात गोरख दगडे नावाचा एक उमदा कार्यकर्ता आहे. जेव्हा इथले आमदार, खासदार, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य सर्व काही कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसवाले होते तेव्हापासून हा पठ्ठ्या भाजपचे निस्पृहपणे काम करतोय. हा माणूस मोठ्या मताधिक्याने नगरसेवक होणार असा सगळ्यांचा समज होता. मात्र पुण्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पदाधिकारी असलेला, ज्याची दारूची दुकाने हाच मुख्य धंदा आहे, ज्याने सेना-भाजपला कायम कडवा विरोध केला असा उमेदवार काही दिवस आधी भाजपात आला. पक्षाच्या आणि स्थानिक नेतृत्वाच्या ‘सर्व’ मागण्या मान्य केल्या आणि आज त्याला उमेदवारीही मिळाली. हाच प्रकार कित्येक ठिकाणी घडलाय. त्यामुळे यंदा सर्वत्र भाजपची मोठ्या प्रमाणात वाट लागेल हे सांगायला कुण्या भविष्यवेत्याची गरज नाही.
मुख्यमंत्री रोज प्रचाराच्या आखाड्यात सहभागी होत आहेत. खरेतर घटनात्मकदृष्ट्या विचार केल्यास ते एका राज्याचे प्रमुख आहेत. त्यांना राज्यातील सर्वच लेकरे सारखी. मात्र रोज ते घसा ताणून ताणून भाजपचा प्रचार करत आहेत. भाषण करताना किती घोट पाणी प्यालो हे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना आणि शिवसेनेला सांगत आहेत. हा सारा पोरखेळ पाहून लोक यंदा त्यांना ‘पाणी’ पाजणार हे मात्र नक्की! असे म्हणतात की, माणसाने हजार चुका कराव्यात; मात्र एकच चूक हजारवेळा करू नये! लोकांनी चूक केली. ती पुन्हा घडणार नाही, यासाठी ते प्रयत्नशील आहेत.
निवडणुकीच्या अनुषंगाने यांची ‘नौटंकी’ रोज रोज पहायला मिळत आहे. पुढचे काही दिवस मनोरंजनाचे हे केंद्र सुरूच राहील. आता मात्र आपण सावध व्हायला हवे. आपले एक मत आपल्या परिसराचा, देशाचा चेहरा बदलू शकते. सुशिक्षित, सुसंस्कृत, गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या, जाती-धर्माचे राजकारण न करणार्या, तळागाळातील लोकांशी संबध ठेवून असलेल्या, निर्व्यसनी आणि चारित्र्यसंपन्न उमेदवारालाच निवडून द्या! तुमचे एक मत पुढच्या पिढीच्या भवितव्याची नांदी असणार आहे हे लक्षात ठेवा.
या व्यवस्थेवर चिडलेले आणि मतदानाचे गांभीर्य नसलेले अनेकजण मतदानच करत नाहीत. असेही करू नकात. तुम्ही हतबल न होता योग्य उमेदवाराला मतदान करणे हाच राष्ट्राच्या संपन्नतेचा एक महत्त्वाचा मार्ग आहे. आपल्या शहरातील, गावातील विविध कामांचे नियोजन करणारे, विकासकामे पूर्णत्वास नेणारे आपले लोकप्रतिनिधी कणखर आणि स्वच्छ चारित्र्याचे असायला हवेत. त्यासाठी आपली जबाबदारी मोठी आहे. वर्षानुवर्षे आपण ज्यांच्या नावाने खापर फोडतोय ते सर्वजण आपल्यातूनच निवडून गेलेले आहेत. त्यामुळे त्यांना नावे ठेवण्याऐवजी आपण आपल्यात आधी बदल घडवू आणि परिवर्तनाच्या दिशेने एक पाऊल टाकू. शेवटी एकच सांगावेसे वाटते,
आपण आमदार नाही, खासदार नाही; मात्र ‘समजदार’ आहोत!
ही समज योग्य ठिकाणी दाखवली तर आणि तरच हे चित्र बदलू शकेल!
- घनश्याम पाटील, पुणे
7057292092
डोंबिवली येथे झालेल्या 90व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‘नवोदित लेखन : अपेक्षा आणि आव्हाने’ या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. मनस्विनी लता रवींद्र, प्रशांत आर्वे, रवी कोरडे आणि ‘चपराक’चे संपादक प्रकाशक घनश्याम पाटील यात सहभागी झाले होते. सचिन केतकर या सत्राचे समन्वयक होते. या चर्चासत्रातील घनश्याम पाटील यांचे भाषण खास ‘चपराक’च्या वाचकांसाठी.
सर्वांना नमस्कार!
आज मी ‘चपराक प्रकाशन’चा प्रकाशक, संपादक, लेखक, वाचक, पत्रकार आणि ग्रंथ विक्रेता या सगळ्या भूमिकेतून माझे मनोगत थोडक्यात व्यक्त करणार आहे. खरं तर या परिसंवादासाठी निमंत्रण देणारा पहिला फोन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांचा आला, त्यावेळी मला आश्चर्यच वाटले! कारण मागची पंधरा वर्षे आम्ही ‘चपराक’ हे मासिक, साप्ताहिक आणि प्रकाशन संस्था साहित्यिक निष्ठेने चालवतोय. या क्षेत्रात काम करणार्यांची दखल साहित्य संस्था कधीही घेत नाहीत. इथे फक्त कंपुशाही असते. प्रसिद्धी हे असं एक अन्न आहे की, जे मेल्यावरच मिळतं. त्यामुळं प्रा. मिलिंद जोशी यांनी ‘‘तुम्ही चर्चासत्रात आणि तुमचे सहसंपादक माधव गिर निमंत्रितांच्या कवी संमेलनात निमंत्रित आहात’’ असे सांगितल्यावर आश्चर्य वाटले. म्हणजे साहित्य संस्थात आता ‘परिवर्तन’ घडतेय असे समजायला वाव आहे. असो! मी मुख्य विषयावर येतो.
नवोदितांचे लेखन, त्यांच्यासमोरील आव्हाने याविषयी प्रकाशक या नात्याने मी संक्षिप्त स्वरूपात मांडणार आहे. ठोकळेबाज विचारसरणीचे प्रस्थापित लेखक, प्रकाशकांची मुजोरशाही, समीक्षकांचे दुर्लक्ष आणि नवोदितांना त्यातून आलेला न्युनगंड हे सारेच क्लेशकारक आहे. जुन्या पिढीने नव्या पिढीला ‘विचार’ द्यायचा असतो. नेमका त्याचाच आपल्याकडे दुष्काळ दिसतो. बालकवी ठोंबरे, आचार्य अत्रे, भाऊसाहेब खांडेकर, शिवाजीराव सावंत असे मराठीतील लेखक कमी वयात उत्तमोत्तम लिहित होते. या लेखकांनी प्रयत्नपूर्वक स्वविकास साधला. इतकेच नाही तर यांनी अनेक नवोदितांना पुढे आणले. भाऊसाहेबांनी स्वतःच्या खिशातून पैसे टाकून कुसुमाग्रजांचा ‘विशाखा’ कवितासंग्रह प्रकाशित केला. आचार्य अत्र्यांनी शांता शेळके, अनंत काणेकरांपासून ते सोपानदेव चौधरींपर्यंत अनेक लेखक-कवी पुढे आणले. ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत यांची ‘मृत्युंजय’ ही कादंबरी कोणीही प्रकाशित करायला तयार नव्हते. अनेक प्रकाशकांचे उंबरठे झिजवल्यानंतर त्यांनी त्यातील काही प्रकरणे ग. दि. माडगूळकर यांच्याकडे पाठवली. ती वाचल्यानंतर गदिमांनी ‘कॉन्टिनेंटल’च्या कुलकर्णींना फोन केला आणि सांगितले, ‘‘मुलगी गुणवान आहे. तुम्ही करून घ्यायला हरकत नाही’’ त्यानंतर मृत्युंजयने इतिहास घडविला आणि मराठीला एक सशक्त लेखक मिळाला. ‘एकवेळ माझे साहित्य बाजूला ठेवा पण हे लेखक वाचाच’ अशी या लेखकांची भावना होती. यातच त्यांचे श्रेष्ठत्व सामावलेले आहे. सध्याचे लेखक मात्र संकुचित मानसिकतेतून बाहेर पडायला तयार नाहीत. ते पूर्णतः आत्मकेंद्री तर झालेले आहेतच पण नवोदितांविषयी त्यांच्या मनात असलेला आकस वेळोवेळी दिसून येतो. विशेषतः प्रतिसादशून्यतेचं ग्रहण मराठी साहित्याला लागलंय. नवीन लेखकांनी कितीही सकस, अभ्यासपूर्ण आणि संशोधनपूर्वक लिहिले तरी त्यांना प्रतिसाद द्यायचाच नाही, असा अलिखित नियम त्यांनी केलाय. हे ग्रहण न सुटल्यानेच अनेक उमलते अंकुर फुलण्यापूर्वीच खुडले जात आहेत. त्यामुळे मराठी साहित्यापुढचं सगळ्यात मोठं आव्हान हेच आहे. कुठं ते भाऊसाहेब खांडेकर, कुठं ते अत्रे? आजच्या प्रस्थापित साहित्यिकांत तुम्हाला ते दिसतात का? तर याचं उत्तर दुर्दैवानं अत्यंत निराशाजनक आहे.
यांना प्रतिसादशून्यतेचा रोग जडलाय. नवोदितांनी काहीही लिहू द्या... ते चांगलं असेल किंवा वाईट असेल...! त्याविषयी मतंच मांडायची नाहीत अशी यांची भूमिका! अरे वाईट आहे तर वाईट म्हणा! कौतुक नकात करू; पण प्रतिक्रियाच द्यायची नाही. का? तर त्यांच्यापेक्षा अस्सल साहित्य सध्या मराठीत येतेय....
‘वाचनसंस्कृती कमी होतेय’, अशी आवई काही प्रकाशक जाणिवपूर्वक सातत्याने उठवतात. ही वस्तुस्थिती नाहीये. म्हणजे आम्ही जवळपास सव्वाशे पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यातली पन्नास-साठ लेखक मंडळी तरूण आहेत. त्यांची पहिलीच पुस्तके असूनही त्या पुस्तकांच्या अनेक आवृत्त्या निघाल्यात. आमच्या मासिकाचे सहा राज्यात सभासद आहेत. अगदी दोन उदाहरणं घ्यायची तर माझ्यासमोर सागर कळसाईत आणि निलेश सूर्यवंशी बसले आहेत. सागरने वयाच्या बावीसाव्या वर्षी ‘कॉलेज गेट’ ही कादंबरी लिहिली. जवळपास पन्नासएक प्रकाशकांनी त्याला नकार दिला. ती कादंबरी आम्ही ‘चपराक’कडून प्रकाशित केली. मागच्या तीन वर्षात त्याच्या पाच आवृत्त्या झाल्यात आणि त्याच्यावर आता चित्रपट येतोय. निलेश सूर्यवंशीचेही असेच. निलेश सूर्यवंशीने 2009 ला कादंबरी लिहिली. अनेक प्रकाशकांचे उंबरठे झिजवले. कोणीही ती प्रकाशित करायला तयार नव्हते. त्यानंतर त्यानं ठरवलं की, ‘मी लिहिणारच नाही... माझं जर कोणी छापणारच नाही तर लिहून उपयोग काय?’ मध्यंतरी सोलापूरला महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या जुळे सोलापूर शाखेचा आमच्या दिवाळी अंकाला प्रथम पुरस्कार मिळाला. त्यावेळी आम्ही गेलेलो असताना ‘दिव्य मराठी’ने अँकर स्टोरी केली. त्यात आम्ही सांगितलं की, ‘नवोदितांना आम्ही प्राधान्याने व्यासपीठ देतोय.’ निलेश सूर्यवंशी माझ्या संपर्कात आले. त्यांची ‘आभाळ फटकलं’ ही कादंबरी परवाच 19 जानेवारीला आम्ही समारंभपूर्वक प्रकाशित केली.
मावळते अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्याविषयी मी ‘कुत्र्याला खीर पचली नाही’ असा जळजळीत अग्रलेख केला. त्यावर ‘नवाकाळ’सारख्या वृत्तपत्राने पहिल्या पानावर मुख्य बातमी करून माझा अग्रलेख पुनर्मुद्रित केला. त्यांनी तब्बल तीन पानं त्यासाठी मला दिली होती. इतर काही वृत्तपत्रांनी माझ्या अग्रलेखांवर अग्रलेख केले. वृत्तवाहिन्यांवर चर्चा झाल्या. सबनीसांनी मात्र त्यावर काहीही प्रतिक्रिया दिली नाही. कारण ते देऊच शकत नाहीत. मी जे लिहिलं होतं त्यातला शब्द न शब्द खरा होता. पूर्वीचे लेखक नवोदितांना पुढं आणायचे. हे सर्व लेखक त्यासाठी काय करतात? श्रीपाल सबनीस असतील, सदानंद मोरे असतील किंवा आत्ताचे अध्यक्ष अक्षयकुमार काळे असतील! यांनी मराठीला किती नवे लेखक दिले याचे मूल्यमापन केले तर हातात काय येणार? साहित्यबाह्य विषयांवरून कायम वादग्रस्त विधाने करायची आणि चर्चेत राहायचे हेही आजच्या साहित्यापुढील मोठे आव्हान आहे. यातून आपण मराठीचा विकास कसा साधणार? प्रतिसादशून्यतेबरोबरच सबनीसांसारख्या लेखक म्हणून मिरवणार्यांची वैफल्यग्रस्तता यानेही आजच्या साहित्याचे मोठे नुकसान केले आहे.
प्रकाशकांचं काय चाललं आहे? जे केवळ अनुवादित पुस्तकं प्रकाशित करतात त्यांना प्रकाशक म्हणायचं का? लेखकांकडून पैसे घेऊन तुम्ही पुस्तकं छापता, त्यांना प्रकाशक म्हणायचं का? यात लेखकांचा तर उतावळेपणा दिसून येतोच पण ग्रंथव्यवहारामध्ये नक्की काय चालतं? आमच्या ‘चपराक’च्या फेब्रुवारीच्या अंकात ज्येष्ठ प्रकाशक आणि प्रकाशक परिषदेचे कार्याध्यक्ष अनिल कुलकर्णी यांचा एक अत्यंत सुंदर लेख आहे. ते याठिकाणी आलेले आहेत. त्यांचा हा लेख प्रकाशन क्षेत्राचा बुरखा फाडणारा आहे. तो आपण जरूर वाचला पाहिजे.
आपल्याकडे लिखाण हे कॉर्पोरेट होत नाहीये. एखाद्या कॉर्पोरेट कंपनीचा मालक हा तिशीतला-पस्तीशीतला असू शकतो; मात्र मराठीमध्ये एकाही वृत्तपत्राचा मुख्य संपादक तिशीतला का असू नये? मी वयाच्या सतराव्या वर्षी ‘चपराक’हे मासिक पुणे शहरातून सुरू केलं. का सुरू केलं? तर मला नवोदितांसाठी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून द्यायचं होतं!
सध्या लेखकांची आर्थिक फसवणूक केली जाते. वीस- वीस वर्षे लिहिणारे लेखकही यांच्यासाठी नवोदितच असतात. का? तर त्यांच्या नावावर एकही पुस्तक नसते, मग या लेखकांकडून पैसे उधळण्याचा धंदा बिनधास्तपणे केला जातो. प्रसिध्दीच्या मागे लागलेले लेखकही या प्रकाराला बळी पडतात. दुर्दैवाने आज परिस्थिती अशी आहे की, नवोदित लेखक प्रकाशकांकडे गेले तर प्रकाशक ती संहिता वाचण्यासाठी सुद्धा पैसे घेतात. हा अनुभव आपल्यापैकी अनेकांनी घेतला असेल. पाच-सहा महिने ती संहिता जशास तशी ठेवतात. त्यावरची धुळही झटकली जात नाही. ती संहिता तशीच परत दिली जाते. ही लेखकांची फसवणूक नाहीये का? ह्याविषयी कोण बोलणार? दुसरीकडे लेखक!! म्हणजे मला अनेकजण भेटतात!! म्हणे ‘सर, काल रात्री मी पंचवीस कविता केल्या...’ काय कारखाना आहे? अरे करताय काय नक्की तुम्ही? तुमची दिशा कोणती? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण गंभीरपणे सोडवली तरच ग्रंथव्यवहार पुढे जाऊ शकेल, असं मला वाटतं. प्रकाशकांच्या बाबत दुर्दैवाने सातत्याने नकारात्मक प्रतिमाच पुढे येत असताना अनेक प्रकाशक चांगल्या पद्धतीनेही काम करत आहेत. सगळंच हातातून गेलं नाही, त्यामुळे निराश होण्याचं कारण नाही.
मराठीत हजारो प्रकाशन संस्था आहेत, असं सांगितलं जातं. आहेत! नोंदणीकृत हजारो संस्था आहेत. त्यातल्या किती प्रकाशन संस्था ललित आणि वैचारिक साहित्य प्रकाशित करतात? जेमतेम तीस-चाळीस! यात सातत्यानं दर्जेदार पुस्तकं प्रकाशित करणारे प्रकाशक किती? पंधरा-वीस-पंचवीस! ‘चपराक’चा आम्ही शंभर-दोनशे पानांचा नाही तर पाचशे पानांचा दिवाळी अंक प्रकाशित करतो. तोही संपूर्ण रंगीत. सहा राज्यातले सव्वाशे लेखक त्यात सहभागी होतात. यंदाच्या दिवाळी अंकाच्या 32 हजार प्रती विकण्याचा, काऊंटर सेलचा आम्ही विक्रम केलाय. ही जर वस्तुस्थिती आहे तर ‘वाचक नाहीत’ असं आपण कसं म्हणू शकतो?
समीक्षक नवोदितांकडे नेहमी दुर्लक्ष करतात. नवोदितांची दखल घ्यायचीच नाही. वृत्तपत्रांचेही तसेच! नवोदितांच्या पुस्तकांची परीक्षणे छापायचीच नाहीत. यातून आपण बाहेर पडायला हवं? मग काय करायचं? आम्ही आमचाच पर्याय उपलब्ध करून दिला. प्रकाशकाने प्रस्तावना लिहू नये, असा एक प्रघात आहे म्हणे! ते आम्ही खोडून काढलं. मी जवळपास पंचेचाळीस पुस्तकांना प्रस्तावना लिहिल्या. आमचे उपसंपादक माधव गिर उत्तम प्रस्तावना लिहितात. कार्यकारी संपादिका शुभांगी गिरमे, उपसंपादिका चंद्रलेखा बेलसरे अशी समीक्षकांची फळीच्या फळीच आम्ही उभी केली. ‘कमी तिथं आम्ही’ आणि ‘उपेक्षित ते अपेक्षित’ हे सूत्र ठेवलं आणि आज मराठीला चांगले लेखक मिळाले. आपल्याला नवोदित-प्रस्थापित असा भेद करायचाय की गुणात्मक दर्जा बघायचाय? म्हणजे एखाद्या लेखकाला नवोदित म्हणून नाकारायचं? अरे, पु. ल. देशपांड्यांची पहिली कथा कोणी छापली नसती तर ते पुढे आलेच नसते. आचार्य अत्र्यांचा पहिला लेख कुणी छापला नसता तर ते पुढे आलेच नसते. त्यामुळं नवोदित-प्रस्थापित हे ग्रहण सुटणं ही काळाची गरज आहे. त्यासाठी प्रकाशकांनी पुढाकार घ्यायला हवा. वृत्तपत्रांच्या संपादकांनी आणखी गंभीरपणे पुढाकार घ्यायला हवा. साहित्य संस्थांची परिस्थितीही फारशी वेगळी नाहीये. म्हणजे मिलिंद जोशी नेहमीच म्हणतात, ‘कोणतीच भूमिका न घेणं हीच एक सध्याच्या साहित्यिकांची भूमिका आहे.’ पण सुदैवानं त्यांचं हे विधान त्यांनीच खोडून काढलं आहे. भूमिका घेणारे कार्याध्यक्ष म्हणून मिलिंद जोशी यांच्यासारखं एक तरूण नेतृत्व साहित्याला मिळालेलं आहे. त्यामुळे आपल्याला आणखी चांगल्या अपेक्षा ठेवता येतील.
आपल्यापुढं तंत्रज्ञानाचं एक मोठं आव्हान आहे. आजचे लेखक व्हाटस्ऍप, फेसबूक अशा समाजमाध्यमांवर इतका वेळ घालवतात की, लेखणीशी त्यांची नाळ तुटते की काय? अशी भीती मला वाटतेय. ठीक आहे, फेसबूक, व्हाटस्ऍप, ब्लॉग ही समाजमाध्यमं निश्चितपणे गरजेची आहेत. त्यामुळं लोकांपर्यंत पोहोचता येतं. पेनने लिहिणारे लेखक कमी होत चाललेत. जे आतून येतं, ज्याला आपण ‘अंतर्स्फूर्ती’ म्हणतो ते कागदावर टिपायला हवं. लेखकांनी सातत्याने दर्जेदार लिहायला हवं.
इतरांचं लिखाण न वाचणं ही देखील आपल्या पुढील एक मोठी समस्या आहे. इतरांचं सोडा, लेखक स्वतःचेही लेखन तटस्थपणे वाचत नाहीत. त्यांना प्रसिद्धिची एवढी घाई झालेली असते. ‘प्रसिद्धीची घाई, सिद्धी संपवत जाई‘ असं म्हणतात. म्हणजे एखादी संहिता प्रकाशक म्हणून जेव्हा माझ्याकडे येते तेव्हा लेखक प्रचंड आग्रह करतात. ‘हे तुम्ही प्रकाशित कराच. यावर वाचकांच्या उड्या पडतील, हे पुस्तक हातोहात जाईल’ असे ते सांगत असतात. ते स्वतःच्या कोशात इतके मशगुल असतात की त्यांना वाटते आपण म्हणजे बरनॉड शॉच! अरे भल्या गृहस्थांनो, तुम्ही जे लिहिताय ते पुन्हा पुन्हा वाचा. त्यावर संस्कार करा. मग ते प्रकाशकांकडे द्या! म्हणजे आत्ताच मी सांगितलं, आमचा दिवाळी अंक पाचशे पानांचा निघतो. यंदाच्या दिवाळी अंकासाठी आमच्याकडे तब्बल साडेपाच हजार कविता आल्या. त्यातल्या शंभरएक आम्ही प्रकाशित केल्या. मग इतर कवितांत गुणात्मक दर्जा नव्हता का? इतक्या कविता काळजीपूर्वक वाचाव्या लागतात. ते वाचणं म्हणजे एक दिव्यच असतं. त्यातल्या दीडएक हजार कविता सर्वोत्तम होत्या; मात्र जागेअभावी आम्हाला त्या घेता आल्या नाहीत. मग त्यांना वाटतं आम्हाला कुठं व्यासपीठच मिळत नाही, आमची कुणी दखलच घेत नाही. तर मित्रांनो, असं नसतं! निराश होऊ नकात! जे काही सर्वोत्तम आहे ते सातत्यानं वाचकांना द्या! खूप चांगला प्रतिसाद मिळेल. आधुनिक तंत्रज्ञानाचाही पुरेपूर वापर करा. फक्त त्याच्या आहारी जाऊ नकात. आता प्रा. क्षितिज पाटुकले याठिकाणी आलेत. ‘साहित्यसेतू’ नावाची संस्था ते चालवतात. एक करोड वाचक जोडण्याचं त्यांचं ध्येय आहे. अशी स्वप्नं हवीत.
तुमच्या प्रत्येक पुस्तकाचं ई-बुक हे व्हायलाच हवं. ही काळाची गरज आहे. मल्याळममध्ये एक संस्था आहे. त्या संस्थेच्या पदाधिकार्यांनी सुरूवातीला काही पैसे उभे केले. एकत्र येऊन त्यांनी मल्याळम साहित्याचा विचार केला आणि ठरवले, मल्याळी भाषेत जेवढं साहित्य येतं त्याचा इंग्रजीत अनुवाद करायचा आणि जागतिक स्तरावर ते साहित्य उपलब्ध करून द्यायचं. हा त्यांचा भाषेसाठीचा एक आदर्श प्रकल्प आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय. मराठीत इतर भाषेतलं साहित्य मोठ्या प्रमाणात येतंय. काही प्रकाशक गब्बर होत आहेत. आपले मराठी साहित्य मात्र इतर भाषेत जाताना दिसत नाही. त्यामुळे ‘चपराक’चा प्रकाशक या नात्याने मी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून एक घोषणा आनंदपूर्वक करतोय की, ‘आमच्या चपराकडून जी काही पुस्तके प्रकाशित होत आहेत त्या सर्वांचा इंग्रजी अनुवाद आम्ही वाचकांना उपलब्ध करून देऊ.’ आपलं साहित्य जागतिक भाषेत जायला हवं. इतर भारतीय आणि जागतिक भाषेतील साहित्य मराठीत यायला हवं. फक्त इंग्रजी पुस्तकांचा अनुवाद करणं, इमारतीच्या इमारती उभारणं, आलीशान गाड्या घेणं म्हणजे प्रकाशन क्षेत्राचं यश नाही, हे ठासून सांगायची वेळ आता आलीय.
संवाद, संघर्ष, सांस्कृतिक अनुबंध, साहित्यिक संचित असे शब्द आपण मागचे वर्षभर सातत्याने ऐकतोय. मराठीत एकाही पुस्तकाची पहिली आवृत्ती दहा हजार प्रतींची निघू नये? हे आपलं केवढं मोठं दुर्भाग्य! अकरा करोडचा महाराष्ट्र! त्यात पुस्तकांची आवृत्ती निघते हजार प्रतींची! तीही खपायला किमान पाच-सहा वर्षे सहजपणे जातात. तर हे कशाचं लक्षण आहे? महाराष्ट्रातले साखर कारखाने वेगवेगळे कार्यक्रम घेतात. तिथं मग तमाशापासून ते अखंड हरिनाम सप्ताहापर्यंत सगळे उद्योग होतात. का बरं त्यांनी उत्तमोत्तम पुस्तकं छापू नयेत? किंवा चांगली पुस्तकं विकत घेऊन ती सभासदांना वाटू नयेत?
महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाकडून नवोदित लेखकांच्या कलाकृतीला अनुदान दिलं जातं. ज्या लेखकांना हे अनुदान दिलं जातं, दिलं गेलं त्यापैकी किती लेखक आज यशस्वी आहेत? पन्नास प्रती छापायच्या... त्यांचं बील मंजूर करून घ्यायचं... दोघांनी ते पैसे वाटून घ्यायचे असा धंदा सर्रासपणे चाललेला असतो. लेखकही स्वतःचे पैसे टाकून पुस्तकं छापतात. हौस मिरवण्याची! दुसरं काय? मग त्यानं हजार प्रती छापल्या तर पन्नास-शंभर-दोनशे प्रती मित्रांना, नातेवाईकांना भेट म्हणून वाटायच्या आणि उरलेल्या प्रती मग सत्तर ते ऐंशी टक्के कमिशनने ग्रंथालयांना, विक्रेत्यांना द्यायच्या. ग्रंथपालही शंभर टक्के रकमेचं बील घेतात. त्यांना 50-50, 60-60, 70-70 टक्के कमिशन मिळते. असं जर असेल तर मराठीत चांगली पुस्तकं कशी येणार? या सगळ्या आव्हानांचा आपण विचार केला पाहिजे. या खर्या समस्या आहेत.
प्रामुख्यानं तरूणांनी लिहितं राहिलं पाहिजे. आपलं भवितव्य उज्ज्वल आहे. मगाशी जॉर्ज बरनॉड शॉचं उदाहरण सांगितलं. शॉ साहेब उत्तमोत्तम लिहायचे आणि लिहिल्यानंतर त्यांची कलाकृती ते चक्क विक्रीला काढायचे. प्रकाशकांकडे लिलाव करायचे कादंबरीचा! ‘ही कादंबरी मी एवढ्या डॉलरला देईन, ती तेवढ्या डॉलरला देईन...’ त्यांना ‘न्युयॉर्क टाइम्स’च्या एका पत्रकारानं विचारलं, ‘‘शॉ साहेब, तुम्ही जगातले एवढे मोठे लेखक आहात. हे असं लिलाव करून कादंबरी विकणं योग्य आहे का?’’ त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर अतिशय मार्मिक आहे. ते म्हणाले, ‘‘भल्या गृहस्था, जेव्हा मी कोणतीही कादंबरी लिहित असतो तेव्हा मी फक्त लेखक असतो. त्यासाठी मी जास्तीत जास्त संदर्भ गोळा करतो. मी पूर्ण अभ्यास करतो. माझं दिवसरात्र चिंतन सुरू असतं! पण त्या कादंबरीला जेव्हा मी शेवटचा पूर्णविराम देतो तेव्हा मी त्या कलाकृतीचा विक्रेता झालेलो असतो; कारण माझं पोट त्यावर अवलंबून आहे.’’
मराठीमध्ये लिखाण हे उदरनिर्वाहाचं साधन होऊ शकतं का?
तर निश्चितपणे होऊ शकतं! खूप चांगले अनुभव आहेत माझे. तुम्ही लिहित रहा. चांगल्या लेखनाला सध्या प्रचंड प्रतिसाद मिळतोय. तुमचे लेखन प्रिंट, ऑडिओ, व्हिडीओ अशा सगळ्या माध्यमांतून, ई-बुक लोकांपर्यंत येऊ द्यात! एक मोठं मार्केट आपल्यापुढं उपलब्ध आहे. सुदैवाने आमची पिढी खूप बदल पाहतेय. जागतिकीकरण आहे. आपण नोटबंदीचा काळ बघितला. काळा पैसा सगळा बाहेर येतोय. उत्तमोत्तम विषय आहेत. हे आपण कुणीही चांगल्या पद्धतीने मांडत नाहीये. लेखकांचं अनुभवविश्व समृद्ध असताना, लिहिण्याच्या क्षमता असताना न लिहिणं हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे. तो गुन्हा आपण सातत्यानं करतोय. माळीणसारखी एवढी मोठी दुर्घटना घडते. गावच्या गाव उद्ध्वस्त होतं. त्यावर मराठीत एक चांगलं पुस्तक येऊ नये? आज तुम्ही जे काही लिहिताय तो उद्याचा इतिहास आहे. तो इतिहास आपणच निर्माण करायला हवा. वाचकांना जास्तीत जास्त चांगलं साहित्य द्यायला हवं. कथा, कविता, ललित, वैचारिक, चरित्र, आत्मचरित्र सगळ्या प्रकारची पुस्तकं मोठ्या प्रमाणात यायला हवीत. वाचकांनीही ती विकत घ्यायला हवीत. घर घेताना घराची रचना चार चार वेळा विचार करून आपण करतो. इथं माझं बेडरूम असावं, इथं माझं देवघर असावं.... पण घरामध्ये जोपर्यंत पुस्तकाचा कोपरा कुठं असावा याचं आपण नियोजन करणार नाही तोपर्यंत मराठीला चांगले दिवस येतील असं मला वाटत नाही. त्या दृष्टिनं प्रयत्न व्हायला हवेत. कुठल्याही कार्यक्रमाला फुले, बुके देण्यापेक्षा तुम्ही पुस्तकं विकत घ्या, पुस्तकं भेट द्या! लग्न, मुंज, वाढदिवस कुठल्याही प्रसंगी जर चांगली पुस्तकं तुम्ही लोकांना दिलीत, प्रत्येक मराठी माणसानं कुठल्याही किमान दोन मासिकांची वर्गणी भरली तरी मासिकं जगू शकतात. सत्य सांगण्याचं काम सध्या फक्त छोटी वृत्तपत्रं करताहेत. मित्रांनो, मोठ्या वृत्तपत्रात आज लिहिलेला अग्रलेख दुसर्या दिवशी माघार घ्यावा लागतो, ही शोकांतिका आहे. ‘शोकसत्ता’ होतेय सगळी! तर ही शोकसत्ता थांबवायला हवी.
आधीच्या परिसंवादात एकानं सांगितलं, नवोदित लेखकांचं हे कर्तव्य आहे, ही आपल्या पुढील आव्हानं आहेत, या आपल्या पुढील समस्या आहेत म्हणून मी बोलतोय. बाबासाहेब पुरंदर्यांचा विषय निघाला. महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवाजी महाराज घराघरात पोहोचवले. त्यांना करावं तितकं वंदन कमी आहे. त्यांचं एक वाक्य फक्त घेतलं गेलं. ‘दादोजी कोंडदेव, आऊसाहेब आणि बालशिवाजी यांचं गोत्र एकच...’ हे वाक्य घेऊन राडा केला गेला. महाराष्ट्र पेटवला. भांडारकरसारखी इन्स्टिट्यूट फोडली गेली. ते पूर्ण वाक्य काय होतं? ‘दादोजी कोंडदेव, आऊसाहेब आणि बालशिवाजी यांचं गोत्र एकच, ते म्हणजे सह्याद्री!’
‘ते म्हणजे सह्याद्री’ हे काढायचं आणि हवा तसा अर्थ घेऊन भांडत रहायचं. हा खोटेपणा आजच्या लेखकांनी लेखणीच्या माध्यमातून पुढे आणला तर समाज आणखी निकोप होऊ शकेल. वैचारिक क्रांती घडू शकेल. जगण्याचं बळ आपल्याला त्यातून मिळू शकेल. हे सगळं साध्य होईल! प्रकाशक म्हणून खरंतर खूप काही बोलायचंय; पण वेळेची मर्यादा त्यांनी घालून दिलीय. त्यामुळं फार काही बोलत नाही. आपण सगळ्यांनी ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द संपवतो.
जय हिंद, जय महाराष्ट्र!!
- घनश्याम पाटील
संपादक प्रकाशक 'चपराक', पुणे
७०५७२९२०९२
साहित्य व पत्रकारितेचे क्षेत्र विलक्षण आहे. प्रगल्भ व विचारी माणूस घडवण्यात जर सर्वात जास्त हातभार लागत असेल तर तो साहित्यातून होणार्या जीवनदर्शनाने आणि तटस्थ पत्रकारितेतून होणार्या समाजदर्शनाने. यातून भाषाही समृद्ध होत जाते हे वेगळेच! छपाईची आधुनिक कला भारतात आली तेव्हापासून विविध रुपांनी साहित्य-पत्रकारिता फोफावत आहे; पण मराठीच्या बाबतीत ती बहरत आहे असे चित्र क्वचित दिसते. आपले साहित्य हे प्रस्थापितांच्या अथवा त्यांच्या कंपुतील मांदियाळीत अडकले आहे; तर पत्रकारिता ‘शुद्ध’ आहे असा आरोप खुद्द पत्रकारही करणार नाहीत, असे दुर्दैवी वास्तव आहे. अशा स्थितीत मराठवाड्यातून एक मिसरुडही न फुटलेला घनश्याम पाटील नावाचा, कसलीही पूर्वपिठिका नसलेला तरुण पुण्यात येतो, एका वर्तमानपत्रात नोकरी मिळवतो आणि काही वर्षात स्वत:चे साप्ताहिक, मासिक आणि चक्क ग्रंथ प्रकाशनाचीही यशस्वी मुहूर्तमेढ रोवतो हा चमत्कार तर खराच; पण खरा चमत्कार आहे तो पत्रकारितेत आज दुर्मीळ झालेली अत्रे, शि. म. परांजपे, खाडीलकर आदींची परखड, तटस्थ शैली आणि समाजाप्रत असलेली तळमळ आणि तरीही भविष्याचा ध्यास व स्वप्नाळूपणा याचा वेधक संगम घनश्याम पाटील यांच्यात आहे हे सुरुवातीलाच नमूद करताना मला आनंद वाटतोय.
मराठी साहित्याचा वाचकवर्ग कमी झालाय हे त्यांना मान्य नाही, हे ते कृतीतूनच सिद्ध करुन देतात. दरवर्षी ‘चपराक साहित्य महोत्सव’ भरवणारे व त्यात 15-20 नव्या-जुन्या साहित्यिक/कवींची पुस्तके आनंद सोहोळ्यात प्रकाशित करणारे सध्या ते एकमेव प्रकाशक असावेत. तरुणाईची स्पंदने टिपणारे सागर कळसाईतसारखे नवप्रतिभाशाली लेखक असोत की निलेश सूर्यवंशींसारखे एकदम नवीन... इतर अनेक प्रकाशकांनी चक्क नाकारलेले नवप्रतिभावंत असोत, पाटील यांनी व्यावसायिक गणिते न मांडता त्यांची पुस्तके प्रकाशित केलीत. सध्या कवितांच्या प्रकाशनाला वाईट दिवस आलेत असे म्हटले जाते... कारण म्हणे कविता आणि त्याही विकत घेऊन कोण वाचणार? पण हाही कुतर्क घनश्याम पाटील यांनी खोटा ठरवत झपाट्याने कवितासंग्रह प्रसिद्ध केलेत. खरे म्हणजे ‘चपराक’ हे नवकवी/साहित्यिकांचे एक रम्य साहित्यकेंद्र बनले आहे ही बाब मराठी साहित्य विश्वासाठी एक दिलासादायक बाब आहे. प्रकाशकाला अनंत अडचणींचा, लेखकांच्या विक्षिप्तपणाचा सामना करावा लागतो हे मला माहीत आहे; पण पाटलांनी आपल्या स्थिरचित्ताने या स्थिती हाताळल्याचे मी पाहिले आहे.
मराठीवरची खरी माया हे यामागील एक कारण असावे. घुमान येथील साहित्य संमेलनावर इतर सर्व प्रकाशकांनी बहिष्कार घातलेला असताना, ‘आफ्रिकेच्या जंगलात जरी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले तरी तिथे आम्ही जाणार आणि ‘चपराक’चे ग्रंथदालन उभारणार’ असे जाहीरपणे सांगणारे घनश्याम पाटीलच होते. गेल्या वर्षी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष काहीतरी बरळले तर त्यांचाही समाचार घ्यायला त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. खरे तर हे अध्यक्ष त्यांना ‘मानसपुत्र’ मानायचे; पण पाटलांनी साहित्य निष्ठेसमोर त्यांचीही पत्रास ठेवली नाही. ते एकीकडे प्रकाशक जरुर आहेत पण ते त्याचवेळेस पत्रकारही आहेत, याचे भान त्यांच्या कृती व वक्तव्यात असते हे मी जवळून पाहिले आहे. खरे तर मी माणुसघाण्या माणूस... पण हातावरच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच मित्रांशी मी नित्य संपर्कात असतो व आवर्जून भेटतो... त्यात घनश्याम पाटील आहेत. उत्साहाचा, स्वप्नांचा नि स्वप्नपूर्तीसाठी अखंड खळाळणारा हा झरा आहे. मैत्रीची सीमा कोठे सरते आणि पत्रकारितेची सजग वाट कोठे सुरु होते हे त्यांना चांगले समजते. त्यामुळे मित्रांवरही लेखणीचा आसूड उगारायला त्यांनी कधी मागेपुढे पाहिलेले नाही.
साप्ताहिक ‘चपराक‘ हे सर्व क्षेत्रातील ताज्या घडामोडींचा वेध घेते; पण त्याची शोभा पाटलांचे अग्रलेख वाढवतात. त्यांच्या अग्रलेखांची पुस्तके झाली, आवृत्त्याही निघाल्या. मला वाटते, हे त्यांचे संपादकीय यश नसून त्यांच्यातील सत्यनिष्ठा व सर्जनशील टीकाकाराच्या वृत्तीचे हे यश आहे.
‘साहित्य चपराक’ हे मासिक नावाप्रमाणेच साहित्य-समाजजीवनाशी निगडित लेखन प्रसिद्ध करते. मला भावणारी बाब अशी की पाटलांची व्यक्तिगत विचारधारा कोणतीही असो, तिच्याशी प्रामाणिक राहत असतानाही अन्य विचारधारांच्या साहित्याला त्यांनी कधी त्याज्य मानत डावलले नाही. ‘चपराक’च्या प्रकाशनांचे ते वैशिष्ट्यच आहे. खरे तर माझे काही लेखन त्यांनी प्रकाशित करावे हे इतरांना एक आश्चर्यच वाटते कारण आमच्या विचारधारा या तशा विरोधी व संघर्षाच्या आहेत! पण हे वैचारिक मतभेद ना प्रकाशनात आडवे आले ना मैत्रीत! मी आयुष्यात असंख्य ढोंगी, दुटप्पी आणि भाट साहित्यिक/प्रकाशकांच्या अनुभवातून गेलो आहे. त्याचा खेद नाही. उलट त्यांच्या पार्श्वभूमिवर घनश्याम पाटील हा मराठी साहित्य व विचारविश्वात एक आशादायी किरण वाटतो.
‘चपराक’ हे अजून खुपच तरुण प्रकाशन आहे. त्यात तारुण्याचा असतो तसा झंझावात आहे. अलंघ्य क्षितिजे लांघायची उमेद आहे. किमान एक लाख पंचवार्षिक सदस्य बनवायचे स्वप्न आहे; तसेच नवनवे साहित्य मिळवून प्रकाशित करत रहायचे व्रत आहे. मराठी साहित्यात जे आजकाल नेहमी मरगळलेले, निराशाजनक बोलण्याचे वातावरण असते त्यात ही एक सुखद, दिलासादायक झुळूक आहे. ही झुळूक वादळवार्यात बदलत या सर्वच मळभाला हटवेल ही आशा आहे.
- संजय सोनवणी
सुप्रसिद्ध साहित्यिक आणि संशोधक
9860991205
देशपातळीवर महाराष्ट्राचा आवाज बुलंद करणारा लोकनेता अशी ज्यांची ख्याती आहे ते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना अलीकडेच पद्मविभूषण जाहीर झाला, याचा आनंद राज्यातील प्रत्येक मराठी माणसाला झाला आहे.
देशातील
बलाढ्य नेत्यांपैकी एक असलेल्या पवारांचे कर्तृत्व आणि त्यांचा दबदबा
सर्वश्रूत आहे. आपले दुर्दैव हे की, या लोकनेत्याच्या कार्यकर्तृत्वाची
म्हणावी तशी दखल आपण घेतली नाही. असा नेता जर कोणत्याही पाश्चात्य
राष्ट्रात असता तर जागतिक राजकारणातले ते एक महत्त्वाचे नाव असते. तब्बल 45
वर्षे अव्याहतपणे कार्यरत असलेल्या आणि ‘जाणता राजा’ अशी बिरूदावली सार्थ
ठरविणार्या शरदराव पवार यांच्याविषयी एव्हाना शे-पाचशे पुस्तके तरी यायला
हवी होती; मात्र वर्तमानाचे तर्कसुसंगत वर्णन करत, त्यांच्या आयुष्याचा पट
उलगडून दाखवत, तटस्थपणे लेखन करण्याचे कार्य आपले लेखक आणि साहित्यातील
संशोधक करत नाहीत.
10 जून 1999 ला त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची
स्थापना केली. अटलबिहारी वाजपेयी असोत की, नरेंद्र मोदी! हे सारे नेते
‘बारामती पॅटर्न’चे कौतुक करत पवारांचे गोडवे गातात; मात्र वेळोवेळी पाय
खेचण्याच्या वृत्तीने महाराष्ट्राने या अफाट क्षमतेच्या नेत्यावर अन्यायच
केला आहे.
काही दिवसापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मी पवारांचे
बोट धरूनच राजकारणात आलोय’ असे जाहीर सभेत सांगितले होते. आता शरद पवार
यांना ‘पद्मविभूषण’ मिळाल्याने मराठी अस्मितेचा गौरवच झाला आहे.
त्यांच्यावर असंख्य आरोप झाले. आरोप करणारे त्यामुळे मोठे झाले; मात्र पवार
साहेब कधी डगमगले नाहीत. अत्यंत दूरदृष्टीने त्यांनी सतत कार्यरत राहून
इतिहास निर्माण केला आहे.
‘पद्मविभूषण’ जाहीर झाल्यानंतर त्यांनी ‘हा
सामुहिक कष्टाचा सन्मान’ असल्याचे सांगत स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची
आणि आईची आठवण जागवली. ‘माझ्या घरात पद्म पुरस्कार मिळवणारा मी तिसरा आहे.
एका आईच्या तीन मुलांना हा पुरस्कार मिळणे ही अभिमानाची बाब आहे. माझे बंधू
अप्पासाहेब पवार आणि प्रतापराव पवार यांना यापूर्वी पद्मश्रीने गौरविण्यात
आले. आता मला पद्मविभूषण पुरस्कार मिळाल्याने आई संतुष्ट झाली असती’ अशी
भावना त्यांनी व्यक्त केली. जगाच्या राजकारणावर लक्ष ठेवून असलेल्या या
महानेत्याची कुटुंबवत्सलताच यातून दिसून येते.
शरद पवार यांच्यावर आजवर
अनेक आरोप झाले. राज्यात आणि देशात कोणताही मोठा घोटाळा झाला, कोणताही मोठा
प्रकल्प आला की त्यासोबत त्यांचे नाव जोडले जायचे. ‘पवारांवर टीका केली की
आपल्याला मोठे होता येते’ हे अनेकांना उमगले होते. त्यामुळेच त्यांच्यावर
अनेकांनी वाटेल तसे तोंडसुख घेतले. ‘या सर्व आरोपांचा तुम्हाला त्रास होत
नाही का?’ असे विचारले असता त्यांनी मजेशीर उत्तर दिले होते. ते म्हणाले,
‘‘जोपर्यंत लोक म्हणणार नाहीत की, किल्लारीचा भूकंप तुमच्यामुळे झालाय
तोपर्यंत मला चिंता करण्याचे काही कारण नाही.’’
शरद पवार यांचे
महाराष्ट्राच्या राजकारणातील योगदान कोणीही नाकारणार नाही. सर्व विषयांचा
अभ्यास असलेला आणि तळागाळातील लोकांशी संपर्क असलेला असा दुसरा नेता दिसणार
नाही. पत्रकार या नात्याने त्यांना जवळून ऐकता आले. त्यांच्यावर आम्ही
अनेक विशेषांक केले. आम्ही प्रकाशित केलेल्या ‘शिवप्रताप’ या ऐतिहासिक
कादंबरीचे प्रकाशनही त्यांच्या हस्ते झाले. या नेत्याची जादू सांगण्यासाठी
‘शिवप्रताप’च्या प्रकाशनाचा एक किस्सा आवर्जून सांगावासा वाटतो.
‘शिवप्रताप’
ही ‘चपराक’ने प्रकाशित केलेली पहिली कादंबरी. एका दैनिकाने या कादंबरीची
प्रकाशनपूर्व माहिती दिली. त्यातील रामदास स्वामींचा उल्लेख वाचून काही
संघटनांनी ‘ही कादंबरी प्रकाशित करू देणार नाही’ अशी आक्रमक भूमिका घेतली.
त्यावरून आम्हाला धमक्याही आल्या. लेखक उमेश सणस यांची ही पहिलीच कलाकृती
आणि प्रकाशक म्हणून आमचीही ही पहिलीच कादंबरी. ‘काय करावे?’ हा प्रश्न
असतानाच आम्हाला पवार साहेबांची आठवण झाली. आम्ही सर्वजण त्यांना भेटलो आणि
या कादंबरीचे त्यांच्या हस्ते प्रकाशन करण्याची इच्छा बोलून दाखवली.
‘छत्रपती शिवाजीराजांवर अनेक पुस्तके असताना तुम्ही यात काय मांडलेय?’ असा
सवाल त्यांनी केला. ‘शिवाजीराजे आणि अफजलखान यांच्या भेटीवर आणि
प्रतापगडाच्या पराक्रमावर ही शिवदिग्वीजयाची रोमांचकारी कलाकृती आहे’ असे
सांगताच त्यांनी ती ठेऊन घेतली आणि ‘कळवतो’ असे सांगितले. दुसर्याच दिवशी
त्यांनी निरोप दिला की, ‘‘साधेपणाने कार्यक्रम घ्या. बारामती हॉस्टेलच्या
सभागृहातही याचे प्रकाशन होऊ शकेल.’’ मग 1 एप्रिल 2006 रोजी त्यांच्या
हस्ते ‘शिवप्रताप’चे प्रकाशन झाले आणि ही कादंबरी तुफानी गेली. मराठी
साहित्यात या कादंबरीने अनेक विक्रम निर्माण केले. या कादंबरीला विरोध
करणारे नंतर कुठे गेले हे अजूनही आम्हाला कळले नाही. त्यांच्या नावाचा असा
दबदबा आहे.
शरद पवार यांचे मित्र धनाजीराव जाधव यांनी त्यांच्याबाबतच्या
काही आठवणी आम्हाला सांगितल्या. ते म्हणाले, ‘‘त्यावेळी शरदची परिस्थिती
खूपच नाजूक होती. पुण्यात शुक्रवार पेठेत ही सारी भावंडे एका छोट्या खोलीत
रहायची. आमचा मित्र विठ्ठल मणियार याने आग्रह धरला की आपण मुंबई बघायला
जाऊ. त्यापूर्वी शरदसह आम्ही कोणीही मुंबई बघितली नव्हती. सर्वजण तयार
असताना शरद एकटाच सोबत येत नव्हता. त्याची आर्थिक अडचण होती हे कळल्यावर
विठ्ठलने सांगितले की, मी माझ्याकडून सगळ्यांना घेऊन जातोय. मग खूप आग्रह
केल्यावर तो तयार झाला पण त्याने तीन अटी घातल्या. ‘तुम्ही मला मुंबईचे
विमानतळ, मुंबईचा समुद्र आणि मुंबईचे मंत्रालय दाखवणार असाल तरच मी सोबत
येतो.’ विमानतळ आणि समुद्र या गोष्टी आम्हाला सहज शक्य होत्या. मंत्रालयाचे
काय करायचे म्हणून विठ्ठलने त्याच्या वडिलांना सांगितले. मुलांना मंत्रालय
बघावेसे वाटते म्हणून तेही खुश झाले. त्यांनी दारवटकर जगताप नावाच्या एका
आमदारकडून मंत्रालयाच्या प्रेक्षक गॅलरीचे पास मिळवले. आम्ही विमानतळावर
गेलो, समुद्र बघितला आणि मंत्रालयात गेलो. तिथे गेल्यावर आमदारांच्या
कंटाळवाण्या चर्चा ऐकून आम्हालाही आळस येत होता. मग आम्ही आपापसात बोलत
होतो. तिथल्या सुरक्षा रक्षकाने आम्हाला तीन-चार वेळा सांगितले की इथे बोलू
नकात. आम्ही थोडावेळ शांत बसायचो आणि पुन्हा गप्पा सुरू. नंतर त्या
सुरक्षा रक्षकाने सांगितले की, आता तुम्ही बोललात तर मला तुम्हाला बाहेर
काढावे लागेल... ते ऐकून शरद ताडकन उठला आणि म्हणाला, ‘‘तुम्ही काय आम्हाला
बाहेर काढताय? आम्हीच निघतो. आता मी या वास्तुत येणार नाही! आणि आलोच तर
इथे न बसता समोर आमदारात बसून चर्चा करेन!’’ कॉलेज जीवनातील त्याची ही
महत्त्वाकांक्षा पाहून आम्ही सगळेच थक्क झालो...’’
शरद पवारांनी अनेक
नेते घडवले. स्थानिक स्वराज्य संस्थात महिलांना आरक्षण मिळावे यासाठी
पुढाकार घेतला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा मुक्त विद्यापीठाच्या
नामांतरावेळी सत्तेचीही पर्वा केली नाही. कच्छच्या भूकंपावेळी अटलजींनी
त्यांना मदत आणि पुनर्वसनाच्या कामासाठी बोलवले होते. किल्लारी परिसरातील
52 गावांचे पुनर्वसन करताना त्यांनी जी तत्परता दाखवली त्याची ही फळे होती.
‘विदेशी बाई पंतप्रधानपदी नको’ म्हणून त्यांनी वेगळी चूल थाटली.
महाराष्ट्राच्या, देशाच्या राजकारणात भरीव योगदान दिले. महाराष्ट्राचे
मुख्यमंत्री, केंद्रीय संरक्षण मंत्री, कृषी मंत्री अशा सगळ्या भूमिकांतून
त्यांनी लोकहिताचे कल्याणकारी निर्णय घेतले. कबड्डीपासून किक्रेट
असोसिएशनपर्यंत आणि रयत शिक्षण संस्थेपासून अनेक शिक्षणसंस्थांपर्यंत
त्यांनी त्यांचा ठसा उमटवला. नाट्य परिषद असेल किंवा साहित्य संस्था असतील
शरद पवार मदत करण्यात सदैव तत्त्पर असतात. अनेक कलावंतांना त्यांच्यामुळे
अस्तित्व लाभलेय.
प्रत्येक प्रश्नाची उत्तम जाण, सामाजिक भान, सभ्य
आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व, कलावंतांचा गौरव आणि संयमित भाषा यामुळे ते
इतरांपेक्षा वेगळे ठरतात. आजही सकाळी सहाच्या आत आंघोळ, व्यायाम उरकून
जगभरातील महत्त्वाची वृत्तपत्रे वाचत बसणारे आणि सकाळी सहा पासून रात्री
बारापर्यंत लोकांच्या अडीअडचणी समजून घेणारे, त्या सोडविण्यासाठी सतत
प्रयत्नशील असणारे हे दुर्मीळात दुर्मीळ नेतृत्व आहे.
भ्रष्टाचारापासून
ते जातीय राजकारणापर्यंत त्यांच्यावर अनेक आरोप झाले. त्या कशालाही न
जुमानता शरद पवार नावाचे हे अग्निहोत्र सतत धगधगत आहे. म्हणूनच
निवडणुकीच्या काळात ‘एनसीपी म्हणजे नॅशनलिस्ट करप्ट पार्टी’ अशी टीका
करणारे मोदी आज ‘त्यांचे बोट धरून राजकारण शिकलो’ असे सांगतात आणि
त्यांच्याच कारकिर्दीत त्यांना ‘पद्मविभूषण’ देऊनही गौरवितात. दुर्दैवाने
आपल्याकडे माणसांपेक्षा माणसांच्या राखेचा इतिहास पुजण्याचा रिवाज नवा
नाही. त्यामुळेच या जबरदस्त नेत्यावर आपण अन्याय केलाय. देशाचे नेतृत्व
करण्याची अफाट क्षमता असलेले शरद पवार भविष्यात किमान राष्ट्रपती व्हावेत
असे अनेकांना वाटते. त्यांना ‘पद्मविभूषण’सारखा सन्मान प्राप्त झाल्याने
मोदी सरकारकडूनही त्यांच्या कामगिरीवर शिक्कामोर्तब झाले आहे. ‘जाणता राजा’
अशी बिरूदावली सार्थ ठरविणार्या या लोकनेत्यास आमच्या मनःपूर्वक
शुभेच्छा!
- घनश्याम पाटील, पुणे
7057292092
भाऊ तोरसेकर हे गेली पन्नासएक वर्षे मराठी पत्रकारितेत कार्यरत आहेत.
आचार्य अत्रे यांच्या ‘मराठा’मधून त्यांच्या पत्रकारितेला प्रारंभ झाला.
महाराष्ट्रातील एक सडेतोड व परखड राजकीय विश्लेषक म्हणून त्यांची ओळख आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील राजेंद्र व्होरा आणि सुहास पळशीकर या
दोन ‘विद्वान’ प्राध्यापकांनी ‘महाराष्ट्रातील सत्तांतर’ हे पुस्तक
लिहिले. शब्दाशब्दाला चुकीचे संदर्भ देऊन त्यांनी वाचकांची दिशाभूल केली.
‘ग्रंथाली’सारख्या बड्या प्रकाशन संस्थेने या पुस्तकाचा धंदाही उत्तम केला.
केवळ शरद पवारांची तळी उचलण्यासाठी पळशीकरांसारख्या प्राध्यापकांनी या
पुस्तकात जी खटपट, लटपट केली ती केविलवाणी आहे. त्यामुळेच यातील सत्य
मांडण्याच्या उद्देशाने भाऊंनी अतिशय मुद्देसूदपणे, पुराव्यासह
‘महाराष्ट्रातील सत्तांतर’ची, व्होरा-पळशीकर या दांभिक आणि ढोंगी
प्राध्यापकांची आणि एकंदरीत वैचारिक भ्रष्टतेची केलेली चिकित्सा म्हणजे
‘कोंबडं झाकणार्या म्हातारीची गोष्ट.’ पत्रकारितेचे विद्यार्थी,
राजकीय-सामाजिक कार्यकर्ते-नेते, सत्याची चाड असणारे अभ्यासक आणि ज्या
कुणाला महाराष्ट्राचा खरा इतिहास जाणून घ्यायचाय त्या प्रत्येकाने भाऊंचे
‘कोंबडं झाकणार्या म्हातारीची गोष्ट’ हे पुस्तक वाचायलाच हवे.
‘अभिनव
वाचक चळवळ’ अशी बिरूदावली मिरवणार्या ‘ग्रंथाली’ने साहित्यप्रेमी,
ग्रंथप्रेमी वाचकांना चक्क ‘गिर्हाईक’ केले आहे. भाऊ लिहितात, ‘झटपट
पुस्तकांचे प्रकाशन करणारे आणि वारेमाप कमाई करणारे प्रकाशक भारतात वा
मराठी भाषेत कमी नाहीत; परंतु वाचकांचा विश्वास संपादन केल्यावर ब्रँडचा
माल म्हणून त्याच्या गळ्यात भेसळीचा, दुय्यम दर्जाचा माल बांधण्याचा धंदा
मराठीत बहुधा आजवर कुठल्या प्रकाशनाने केला नाही. अगदी ‘धंदा’ म्हणून
प्रकाशन व्यवसाय करणार्या कंपन्या देखील असा फ्रॉड, भेसळीचा माल विकत
असल्याचा निदान मराठीत अनुभव नाही. असे असताना केवळ ‘वाचकांचीच चळवळ’
म्हणून उदयास आलेल्या ‘ग्रंथाली’ने वडापाव, भाजीपाव, झुणका-भाकर, बर्गर,
पिझ्झा स्टाईलने ग्रंथाचा धंदा करावा काय? कसदार, दर्जेदार, गुणवान,
अभिरूचीपूर्ण पुस्तकांचा हवाला देऊन ‘अभिनव वाचक चळवळ‘ म्हणवून घेणार्या
‘ग्रंथाली’ने राज्यात सत्तांतर होताच वाचकांच्या मनातील उत्कंठा, कुतूहल,
उत्सुकतेचा लाभ उठवण्यासाठीच ‘महाराष्ट्रातील सत्तांतर’ हे झटपट खपणारे
पुस्तक काढून वाचकांची घोर फसवणूक करावी काय?’
सुहास पळशीकर हे ‘राजकीय
अभ्यासक’ म्हणून सगळीकडे मिरवत असतात. मात्र त्यांनी त्यांच्या या पुस्तकात
धादांत खोट्या, न घडलेल्या घटना बिनधास्तपणे घुसडल्या आहेत. त्यात अभ्यास,
संशोधन, सत्य किंवा कारणमीमांसेचा लवलेशही नाही. यातील खोटेपणा, चुकीचे
संदर्भ, घटना, बनावट गोष्टी यांची यादीच भाऊंनी तयार केली आणि ती
ग्रंथालीचे प्रकाशक दिनकर गांगल यांच्याकडे दिली. ‘पुढच्या आवृत्तीत
दुरूस्त करू’ असे सांगत त्यांनी वेळ मारून नेली, पण त्या पुस्तकाच्या अनेक
आवृत्त्या प्रकाशित होऊनही चूक सुधारली नाही. उलट ‘तुमचेही एखादे पुस्तक
प्रकाशित करू’ असे लांच्छनास्पद आमिष ग्रंथालीने दाखवले. या पुस्तकाच्या
लेखकांनीही ‘या दिवसात असे स्पष्टपणे, सडतोडपणे, निर्भिडपणे एखाद्या
लेखनाची चिकित्सा होणे किती दुरापास्त झाले आहे, हे आपण सर्वजण जाणतोच.
म्हणून तुमचे मनःपूर्वक आभार मानणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. ज्या
वैचारिक संस्कृतीचा आग्रह आपण सर्वजण धरतो आहोत, त्याचा तुमचे पत्र म्हणजे
एक परिपाठच आहे, असे म्हटले तरी वावगे होणार नाही. तुमची आमची यापूर्वीच
ओळख झाली असती तर किती बरे झाले असते! हे पुस्तक आम्ही तुम्हाला प्रकाशित
होण्यापूर्वीच दाखवले असते. परंतु असे होणे नव्हते. असो. तुम्ही सहा पाने
भरून तुम्हाला खटकणार्या व तुम्हाला न पटणार्या मुद्यांची जंत्री दिली
आहे. ते पडताळून पाहणे, त्याबाबत आमचे काय म्हणणे आहे हे ठरविणे यास काही
दिवस लागतील. म्हणून आम्हाला पत्र मिळाल्या मिळाल्या हे प्राथमिक उत्तर
तुम्हाला पाठवित आहोत. आम्ही तुमच्या पत्राची गंभीरपूर्वक दखल घेत आहोत व
लवकरच त्यास योग्य ते उत्तर आम्ही तुम्हाला पाठवू’ असे पत्र भाऊंना पाठवले.
19 ऑगस्ट 1997 ला हे पत्र त्यांनी लिहिले. त्यानंतर या पुस्तकाच्या
अनेक आवृत्या झाल्या. लेखक आणि प्रकाशकांनी रग्गड पैसा कमावला. मात्र
त्यांच्या या धंद्यासाठी ते चुकीचा इतिहास मांडत आहेत. हे पुस्तक
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘संदर्भ पुस्तक’ म्हणून वापरले जाते.
केवळ पवारांची खुशमस्करी करायची आणि शिवसेना व बाळासाहेब ठाकरे यांना
‘टार्गेंट’ करायचे यासाठी लिहिलेल्या या पुस्तकामुळे राज्यशास्त्राच्या
विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. भाऊंनी या पुस्तकाचा प्रतिवाद करणारे
‘कोंबडं झाकणार्या म्हातारीची गोष्ट’ हे पुस्तक लिहिले, विशेष सरकारी
वकील उज्ज्वल निकम यांच्या हस्ते त्याचे प्रकाशन झाले; मात्र तरीही
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने वा संबंधितांनी त्याची म्हणावी तशी दखल
घेतली नाही. शिवसेनेची अकारण होणारी बदनामी पुराव्यासह पुस्तकरूपात
मांडूनही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे किंवा अन्य शिवसैनिकही गप्प का,
तेही कळायला मार्ग नाही. वास्तविक केवळ हितसंबंध जोपासण्यासाठी सुहास
पळशीकरांसारख्या प्राध्यापकाने जो लाळघोटेपणे केला त्याबद्दल त्यांना गंभीर
शिक्षा व्हायला हवी आणि त्यांच्या पुस्तकावर बंदीही यायला हवी. जागतिक
दर्जाचे विद्यापीठ असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात असे
अशास्त्रीय, चुकीची मांडणी करणारे, शब्दाशब्दाला खोटे संदर्भ देणारे पुस्तक
‘संदर्भ’ म्हणून वापरले जाणे हे आपणा सर्वांचे मोठे अपयश म्हणावे लागेल.
‘महाराष्ट्राचे
सत्तांतर’मधील चुकीची आणि परस्परविरोधी माहिती असलेले मुद्दे भाऊंनी
तपशीलवार दिलेत. इतकेच नाही तर त्यातील नेमके सत्य काय होते हेही त्यांनी
दिलेय. त्यामुळे राजकीय अभ्यासकांनी हे वाचलेच पाहिजे. चुकीच्या, धडधडीत
खोट्या माहितीचा भाऊ तोरसेकर यांनी पद्धतशीर पंचनामा केलाय. ही वैचारिक
भ्रष्टतेची चिकित्सा झाली असली तरी रोग अजून पूर्णपणे बरा झाला नाही.
पळशीकरांनी बेलाशक खोट्या घटना, न घडलेले प्रसंग आणि अस्तित्वात नसलेल्या
गोष्टींचे उल्लेख व संदर्भ त्यांच्या पुस्तकात दिले आहेत. ही माहिती
त्यांनी कुठून, कशी मिळवली आणि ती कोणत्या हेतूने वापरली याचा खुलासा होणे
गरजेचे आहे. गेली वीस-बावीस वर्षे आपले राज्यशास्त्राचे विद्यार्थी हा
चुकीचा इतिहास गिरवत आहेत. ‘तपशीलाला फारसा अर्थ नाही, हा आमचा ‘थिसीस’
आहे, तपशील दुय्यम आहे, त्यात चुका, गफलत असल्याने बिघडत नाही’ असे
निर्लज्जपणे सांगणार्या पळशीकरांवर खरेतर फौजदारी गुन्हे दाखल व्हायला
हवेत. भाऊ तोरसेकर यांनी त्यांचे बेगडीपण पुराव्यासह पुढे आणले आहे.
चोरांना पकडण्यासाठी भाऊ सर्वांना जागे करत आहेत; मात्र आपण सुस्तावलोय.
इथली व्यवस्था, यंत्रणा, कायदा या वैचारिक भ्रष्टतेची दखल घेत नसेल तर आता
शिवसेनेने पुढाकार घेऊन त्यांची बदनामी थांबवायला हवी आणि सत्यही पुढे
आणायला हवे. मागच्या सत्तांतराच्या वेळी हा इतिहास लिहिला गेला. आता
अठरा-वीस वर्षाने पुन्हा सत्तांतर घडले तरी तोच चुकीचा इतिहास आपण गिरवत
आहोत. यातील ‘चोर’ ते उघडपणे मान्यही करत आहेत. तरी त्यांना ‘शिक्षा’
देण्याऐवजी आपण त्यांचा ‘गौरव’च करतोय. शिवाय हे अनेक वृत्तवाहिन्यांवरून,
वृत्तपत्रांतून प्रामाणिकपणाचे डोस पाजत असतात. हे म्हणजे ‘वेश्येने
पतीव्रता धर्म’ शिकवण्यासारखे आहे. म्हातारी कोंबडं झाकून ठेवण्याचा कितीही
प्रयत्न करत असली तरी सत्य फार काळ लपून राहत नाही हेच खरे! भाऊंनी या
सत्यावर प्रकाश टाकला आणि प्रकाशक या नात्याने आम्हाला ‘चपराक’च्या
माध्यमातून तो वाचकांसमोर आणता आला. आता वाचकांनीच संबंधितांना योग्य तो
धडा शिकवायला हवा!
कोंबडं झाकणार्या म्हातारीची गोष्ट
‘चपराक प्रकाशन,’ पुणे (7057292092)
पाने - 148, मूल्य - 150 रूपये
(महत्त्वाचे
- डोंबिवली येथे येत्या 3 ते 5 फेब्रुवारी दरम्यान होणार्या अखिल भारतीय
मराठी साहित्य संमेलनात भाऊंचे हे पुस्तक ‘चपराक’च्या बी 53 आणि 54 या
ग्रंथदालनात अवघ्या शंभर रूपयात मिळेल.)
माझे 'अक्षर ऐवज' हे तिसरे पुस्तक पुण्यात नुकतेच 'चपराक साहित्य महोत्सवा'त प्रकाशित झाले. यापूर्वी 'दखलपात्र' आणि 'झुळूक आणि झळा' या पुस्तकांना आपण उत्तम प्रतिसाद दिला, त्याबद्दल धन्यवाद. 'अक्षर ऐवज' हा निवडक पुस्तक परीक्षणांचा संग्रह आहे. या पुस्तकाला नाशिक येथील ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक संजय वाघ यांनी लिहिलेली ही प्रस्तावना... अवश्य वाचा, अभिप्राय कळवा.
या पुस्तकासाठी संपर्क : 'चपराक प्रकाशन', पुणे
०२०-२४४६०९०९ / ७०५७२९२०९२
काळ बदलला तसा माणसांच्या जगण्याचा ट्रेंडही बदलत चालला आहे. काळाशी स्पर्धा करताना किंवा त्याच्या वेगाशी नाते सांगताना मनुष्यप्राणी पायाला भिंगरी लावून सैराटपणे धावतो आहे, यात्रेतील एखाद्या बिथरलेल्या वारूप्रमाणे. या धावण्याच्या नादात कौटुंबिक ओलावा आटत चालला आहे. नात्यातील स्नेहाची, आपुलकीची वीण उसवत चालली आहे. संस्कारांचा धागा तुटत चालला आहे. जमीन-जुमला, संपत्ती व प्रमोशनचा टप्पा गाठण्याच्या दलदलीत त्याचे जगणे स्वैराचारी आणि आत्मप्रौढी बनत चालले आहे. परिणामी माणूस माणसापासून दुरावतो आहे. परस्परांविषयीचा आकस, द्वेषबुद्धिने त्याच्या माणूसपणावर कब्जा मिळविला आहे. त्यामुळे सत्याला सत्य आणि चांगल्याला चांगले म्हणण्याची दानत लोप पावत चालली असल्याच्या विरोधी अशा सांस्कृतिक पर्यावरणात पत्रकार, संपादक व लेखक घनश्याम पाटील यांचा ‘अक्षर ऐवज’ कमालीचा आशादायी वाटतो.
‘भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणू काठी’ या वृत्तीने वाटचाल करणारा हा युवा संपादक-प्रकाशक ओठावर मिसरूडही न फुटलेल्या वयापासून ‘शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जनलोका’ म्हणत मोठ्या निष्ठेने अक्षरपुजा करीत आला आहे. वृत्तपत्र व प्रकाशन ही मुळात भांडवलदारांच्या मक्तेदारीची क्षेत्रे हे ठाऊक असताना आणि खिशात दमडी नसताना एक कोवळ्या वयाचा मुलगा उराशी स्वप्न बाळगून विद्येच्या माहेरघरी येतो, वाचनसंस्कृती जिवंत ठेवण्यासाठी तारूण्य पणाला लावतो ही सारी निस्पृह त्यागाची आणि साहित्यावरील आपल्या असीम निष्ठेचीच निदर्शके मानायला हवीत. ‘सच्चाईचे गुनगाण आणि बुराईवर शब्दप्रहार’ ही त्यांची खासीयत. त्यामुळे कोणाही हौश्या-गवश्यांचे लांगुलचालन करण्याचा शौक घनश्याम पाटील यांना कधी नव्हताच. म्हणूनच या ‘अक्षर ऐवजा’त त्याचे कोठेही दर्शन घडत नाही. त्यांनी या ‘अक्षर ऐवजा’साठी महाराष्ट्रातील असे पंचवीस प्रतिभावंत हुडकून काढले की, ज्यांच्या साहित्यात विचार आहे आणि त्या विचारांना चिंतनाची किनार लाभलेली आहे. ज्यांना समाजातील बिघडलेल्या सांस्कृतिक आरोग्यावर अक्षर उपाय सुचवायचा आहे, ज्यांना समाजातील अप्रिय गोष्टींवर शब्दांचा आसूड ओढायचा आहे, ज्यांना गुज मनीचे सकळ जनाला सांगायचे आहे, ज्यांना प्रेरणादायी बेटांची ओळख अवघ्या महाराष्ट्राला करून द्यायची आहे, ज्यांना मनोरंजनातून प्रबोधनाची वात प्रज्वलित करायची आहे अशा पंचवीस साहित्यकृतींची शब्दमाळ त्यांनी कल्पकतेने या ग्रंथात ओवलेली आहे. पंचवीस शब्दपुजकांच्या साहित्यकृतींची, त्यातील सौंदर्यस्थळांची वाचकांना ओळख व्हावी या एकमात्र प्रांजळ हेतूने, मोठ्या आत्मीयतेने आणि सहृदयतेने घनश्याम पाटील यांनी हा ‘अक्षर ऐवज’ वाचकांच्या दरबारात रिता केला आहे. कोणी एखादा या ऐवजाला प्रस्तावनांचे बिरूद लावेल, कोण पुस्तक परीक्षण, रसग्रहण म्हणेल तर काही साहित्य समीक्षेची विशेषणेही लावतील. ‘जो जे वांछिल, तो ते लाहो’ या संतवचनाप्रमाणे या ग्रंथाकडे जो ज्या नजरेने पाहिल, त्या प्रकारचे रूप त्याच्या दृष्टिपथास पडेल. एक मात्र खरे की, या ग्रंथाला उपरोक्त प्रत्येक चौकटीत तंतोतंत आणि घट्ट बसविण्याची शब्दकिमया पाटील यांनी या ऐवजात साधली आहे. यामागे वाचनसंस्कृतीला खतपाणी घालण्याचा आणि लिहित्या हातांना सांस्कृतिक महाराष्ट्रातील भुसभुशीत मातीत अक्षरांचे वाण रूजविण्यासाठी ‘पेर्ते व्हा’ असे सांगणारी शाबासकीची आश्वासक थाप जरूर दिसेल. सभोवताली निंदकांची मुजोर वस्ती सुखैनैव नांदत असतानाच्या बजबजपुर्यात चांगल्याला चांगले म्हणायला मोठे धाडस आणि मनाचा मोठेपणा लागतो, तो घनश्याम पाटील यांच्या ठायी ठासून भरलेला आहे, म्हणूनच ही अक्षर चळवळ समृद्ध होताना दिसते आहे.
एकीकडे लिहित्या हातांना बळ देण्याचे काम अशाप्रकारे होत असताना दुसरीकडे लेखनक्षेत्रात पदार्पण करू इच्छिणार्या नवोदितांना नाउमेद करण्याचे पातकही घडत आहे. लिहिलं त्याला फैलावर घेणारी, मार्गदर्शनाचे डोस पाजणारी आणि आरोपीच्या पिंजर्यात उभे करून त्याची पीसे मोकळी करणारी एक समीक्षकांची भोंदू जमात महाराष्ट्रात पद्धतशीरपणे सांस्कृतिक दहशत निर्माण करीत आली आहे. अशा या सांस्कृतिक दहशतवाद्यांमुळे नवी उमेद घेऊन या क्षेत्रात उमलू पाहणार्या कळ्यांचे फूल होण्याआधीच त्या कुस्करल्या जात आहेत. मग ही एकार्थाने साहित्यातील भृणहत्त्याच नव्हे काय? म्हणूनच अशा नतद्रष्टांच्या प्रभावळीत नवोदितांच्या पंखात बळ भरणार्या घनश्याम पाटील यांचा ‘अक्षर ऐवज’ ठसठशीतपणे अधोरेखित झाल्यावाचून राहत नाही. कोणतीच व्यक्ती जन्मतःच परिपूर्ण नसते. बोबडे बोल, रांगणे ही प्राथमिक अवस्थेतील अपरिपक्वता जशी ओघाने येते तशी नवख्या साहित्यातही ते अपरिहार्य आहे. अशावेळी नवोदितांना बोट धरून चालविण्याचा वाटा कोणी उचलत नसेल तर, किमान त्यांच्या नावाने बोटे मोडून त्यांना गर्भगळीत तरी करू नये इतकीच काय ती माफक अपेक्षा असते. पहिल्या प्रयत्नाला योग्य दिशा आणि प्रेरणा मिळाली की त्यातून ऊर्जा घेऊन नवोदितांमधून देखील कसदार साहित्याची निर्मिती घडू शकते, असा सकारात्मक विश्वास अंगी बाणून जे समतोल आणि थोडीशी उभारी देणारी समीक्षा करतात तेच खरे समीक्षक म्हणून अभिनंदनास पात्र ठरतात; परंतु अलीकडचे चित्र फारसे आशादायी दिसत नसले तरी घनश्याम पाटील यांच्यासारखी मोजकी माणसे साहित्यसंसार फुलविण्याच्या प्रवासात सांस्कृतिक कर्तव्यभावना मनाशी बाळगून आपापल्या परिने कार्यरत आहेत आणि हाच खरा साहित्य क्षेत्रातील आशेचा किरण मानायला हवा.
घनश्याम पाटील यांनी आपल्या ‘अक्षर ऐवजा’त त्यांना भावलेल्या पंचवीस साहित्यकृतींचा समावेश केलेला आहे. लेखकांनी जेवढ्या आत्मीयतेने पुस्तकांचे लेखन केले आहे, तेवढ्याच ममत्वाने किंबहुना त्याहून अधिक पोटतिडकीने पाटील यांनी त्या कलाकृतींची उचित शब्दात दखल घेतली आहे. एखाद्या मित्राने गाजलेल्या चित्रपटाच्या कथानकावर मोजून पाच मिनिटांचे सफाईदारपणे भाष्य करावे आणि त्यानंतर एकतर तो चित्रपट पाहण्याची मनात इच्छा जागावी, नाहीतर ते भाष्य ऐकूनच तृप्ततेचा ढेकर द्यावा, अशा रितीनेच पाटील यांनीसुद्धा या ग्रंथातील साहित्यकृतींचा ओघवत्या शैलीत आपुलकीने नेटकेपणाने परामर्श घेतला आहे. मात्र हे करीत असताना या ग्रंथात समाविष्ट प्रत्येक पुस्तकातील सौंदर्यस्थळे त्यांनी जाणीवपूर्वक अचूकपणे अधोरेखित केलेली आहेत. त्यामुळे मूळ कलाकृती वाचण्याचा मोह वाचकांना झाला नाही तरच नवल!
असे म्हणतात सुरूवात चांगली झाली म्हणजे शेवट गोड होतोच. या वाक्याशी पाटील सहमत असल्यामुळे या ग्रंथाच्या मैदानावर असा बॅटस्मन ओपनर म्हणून उतरविला आहे की, ज्यांच्या नावावर असंख्य विक्रम कोरलेले आहेत. पहाडाची छाती आणि कल्पकतेचे विशाल हृदय घेऊन जन्मलेले आचार्य अत्रे म्हणजे मराठी साहित्यशारदेला पडलेले सुखद स्वप्नच. जिवंतपणी आचार्य अत्रे यांच्यासाठी जे करू शकली नाही ते त्यांच्या लेकीने अर्थात शिरीषताई पै यांनी ‘वडिलांच्या सेवेशी’ हा ग्रंथ लिहून अपराधीपणाच्या भावनेतून काहीसे मोकळे होण्याचा मार्ग शोधला आहे. या ग्रंथात अत्रे यांचा सहवास आणि त्यांच्या संदर्भातील कटू-गोड आठवणींना त्यांच्या गुण-दोषासकट मोकळेपणाने उजाळा दिला आहे. यात अत्रे यांची ध्येयनिष्ठा, कुटुंबवत्सलता, त्यांचे प्रेम, त्यांचा राग, त्यांचे श्वानप्रेम, त्यांचा भव्यतेचा ध्यास, ‘मराठा’च्या माध्यमातून आलेले आर्थिक अरिष्ट, संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील त्यांचे नेतृत्व, पती व्यंकटेश पै यांचे जगणे-वागणे, मातेबद्दलच्या कृतज्ञतेच्या आठवणी तर यात आहेतच; शिवाय ‘लिहिले पाहिजे, जे लिहितो त्याहून सुंदर लिहिता आलं पाहिजे’ तसेच ‘पहाडाशी टक्कर देताना पहाड फुटला पाहिजे, डोके फुटता कामा नये’ अशा शब्दात आचार्य अत्रे यांनी दिलेली एक निकोप दृष्टी व खंबीर बाणा शिरीषताईंना अधिक प्रिय वाटायचा. अत्रे आणि त्यांच्या परिवाराचा हा पारदर्शक पट त्यांच्या कुटुंबातीलच सदस्याने उलगडून दाखविल्यामुळे या ग्रंथाला सत्याची झळाळी प्राप्त झालेली आहे.
हास्यचित्रांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकीक मिळविणार्या शि. द. फडणीस यांचे ‘मी आणि हसरी गॅलरी’ च्या माध्यमातून त्यांची पत्नी प्रसिद्ध विनोदी लेखिका शकुंतला फडणीस यांनी आपल्या लाडक्या पतीचे चित्रचरित्रच रेखाटले आहे. यात शिदंचं बालपण आहे, मुंबईतील जे. जे. तील दिवस, सासूबाईंचे भावलेले पदर, शकुंतलाबाईंचे बालपण, त्यांच्या लीना आणि रूपा या दोन्ही लेकी, शिदंचा चित्रप्रवास मराठीतील सकस लेखिका म्हणून परिचित असलेल्या शकुंतलाबाईंनी कधी गंभीर तर कधी नर्मविनोदी अंगाने मांडला आहे. लेखनाऐवजी घर सांभाळण्यात आणि पतीच्या आरोग्याची चिंता वाहायला प्राधान्य देणार्या आदर्श धर्मपत्नीचे रूप या पुस्तकाच्या माध्यमातून समोर येते, तेव्हा शकुंतलाबाईंची छबी वाचकांच्या मनात आदराने अधिक गडद झाल्यावाचून राहत नाही.
छत्रपती संभाजीराजांची कैद ते त्यांचा शिरच्छेद या 39 दिवसांचे अत्यंत यातनादायी चित्र ‘मी मृत्युंजय, मी संभाजी’ या केवळ सव्वाशे पृष्ठांच्या कादंबरीमध्ये प्रभावीपणे साकारून इतिहास संशोधक आणि व्यासंगी लेखक संजय सोनवणी यांनी इतिहास जिवंत आणि धगधगता ठेवण्याचे मोठे ऐतिहासिक कार्य केले आहे. प्रवाही, संवादी आणि ओघवत्या शैलीतील ही कादंबरी वाचली की कोणाही मराठी माणसाचे रक्त खवळल्याशिवाय राहणार नाही. आत्मनिवेदनात्मक शैलीमुळे या कादंबरीचा प्रभाव पडतो आणि एकूणच शोकांतिका वाचकांसमोर घडत असल्याचा प्रत्यय येतो, हेच या कादंबरीच्या यशाचे गमक आहे.
सागर कळसाईत नावाच्या आणि मोजून पंचविशीतल्या युवकाने ‘कॉलेज गेट नाण्याची तिसरी बाजू’ या बहुचर्चित कादंबरीच्या यशानतंर त्याच धाटणीची ‘लायब्ररी फ्रेंड’ ही महाविद्यालयीन युवकांच्या भावविश्वाशी एकरूप होणारी कादंबरी साकारून साहित्याच्या प्रांतात दुसरे दमदार पाऊल टाकले आहे. मैत्री आणि प्रेमात गुंतलेल्या प्रेमवीरांना खिळवून ठेवण्याचे काम ‘कॉलेज गेट’ने केले आहे. सरळ-साध्या, ओघवत्या आणि प्रवाही संवादभाषेच्या कोंदणामुळे आजच्या तरूणांच्या भाव-भावनांचे प्रतिबिंबच त्यात उमटल्याचे जाणवते.
पत्रकार राजू परूळेकर यांनी ई टिव्हीवरील ‘संवाद’ कार्यक्रमांतर्गत विविध क्षेत्रातील मान्यवरांना बोलते केल्याने सांस्कृतिकदृष्ट्या एक वाङमयीन खजिनाच त्यांना गवसला आहे. त्याचेच पुस्तक रूप म्हणजे ‘ते आणि मी’! समाजातील आयडॉल असलेल्या त्या महनीय व्यक्तींपैकी ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर, ‘लहानपणापासून मला स्वातंत्र्याची तहान आहे’ असे सांगणार्या व शेतकर्यांचे पंचप्राण म्हणून उभ्या महाराष्ट्राला परिचित असलेले शरद जोशी, भामरागड येथील आदिवासींसाठी आख्खं आयुष्य समर्पित करणारे पद्मश्री डॉ. प्रकाश व डॉ. मंदा आमटे नावाची ही देवमाणसे, आचार्य विनोबा भावे आणि महात्मा गांधींच्या संस्कारात वाढल्यामुळे धारणीपासून चाळीस किलोमीटर पर्यंतचे अंतर चालत जाऊन बैरागडवासियांची सेवा करण्यासाठी तेथेच मुक्काम ठोकणारे डॉ. रवींद्र कोल्हे, सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक गिरीश कर्नाड, प्रसिद्ध कथालेखिका सानिया अशा उत्तुंग व्यक्तिमत्त्वांच्या मुलाखती समाजाला प्रेरणादायी ठराव्यात अशाच आहेत.
यासह मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांची ‘ऐसी कळवळ्याची जाती’ ही व्यक्तीचित्रे, विनोद श्रा. पंचभाई यांचे मोठा आशय सांगणारे ‘थोडं मनातलं’ हा लेखसंग्रह, संजय वाघ यांचे जित्याजागत्या आदर्शांचे मनोरे उभारणारे ‘गंध माणसांचा’ हे व्यक्तीचित्रण, स्वर्गारोहिणीची ऐतिहासिक, भौगोलिक व पौराणिक माहिती देणारे प्रा. क्षितिज पाटुकले यांचे ‘स्वर्गारोहिणी’हे माहितीपर पुस्तक, नव्वदीनंतर मराठी पुस्तक लेखनाची प्रेरणा घेणार्या दुर्गानंद गायतोंडे यांची लेखनगाथा, प्रसिद्ध सिनेसमीक्षक श्रीपाद ब्रह्मे यांचे ‘फर्स्ट डे, फर्स्ट शो’ हा चित्रपट परीक्षणांचा संग्रह, सच्च्या मैत्रीबद्दल कृतज्ञताभाव व्यक्त करणारे उत्तम कांबळे यांचे ‘काळजातले आर. आर. आबा’,समीर नेर्लेकर यांचा ‘एमरल्ड ग्रीन आणि इतर कथा’ नावाचा कथासंग्रह, शरद पवार यांच्या राजकीय पटाची दखल घेणारे स्वामी विजयकुमार यांचे ‘कर्णधार’, महाविद्यालयीन जीवनातील वृत्ती-प्रवृत्तींचा चिकित्सक उलगडा करणारी सागर कळसाईत यांची ‘लायब्ररी फे्रंड’, दत्ता वायचळ यांचा‘गजरा’ कथासंग्रह, ज्येष्ठ बालसाहित्यिक सुभाष कुदळे यांच्या ‘नवलकथा’ तसेच ज्येष्ठ कवी म. भा. चव्हाण यांचा ‘धर्मशाळा’, ‘चपराक’च्या ज्येष्ठ उपसंपादिका व कवयित्री चंद्रलेखा बेलसरे यांच्या ‘आईपणाच्या कविता’, रमेश जाधव यांचा ‘नाते मनाशी मनाचे’, प्रा. बी. एन. चौधरी यांचा ‘बंधमुक्त’या काव्यसंग्रहांचीही या ग्रंथात उचित आणि आशादायी शब्दात दखल घेतली आहे.
या ‘अक्षर ऐवज’च्या माध्यमातून मराठी साहित्यविश्वात ‘दखलपात्र’ अशी भर पडली आहे. हा ऐवज साहित्यरसिकांसाठी आणि साहित्याक्षरे गिरवू पाहू इच्छिणार्यांसाठी एका वाटाड्याची भूमिका जरूर पार पाडेल, असा विश्वास वाटतो. यानिमित्ताने घनश्याम पाटील यांना साहित्यक्षेत्रातील उज्ज्वल भविष्यासाठी सुयश चिंततो.
- संजय वाघ
99229 04072