Saturday, February 11, 2017

प्रसारमाध्यमातील ‘कागदी काटे’



वृत्तपत्र हा लोकशाहीचा प्रमुख स्तंभ आहे. या क्षेत्रात काम करणारा पत्रकार हा समाजाचा महत्त्वाचा घटक असतो. अन्याय-अत्याचाराविरूद्ध सातत्याने आवाज उठवणारा हा घटकच दुर्लक्षित राहतो. काळानुरूप बदलत गेलेल्या पत्रकारितेत काही कुप्रथा निर्माण झाल्या असल्या तरी वृत्तपत्रीय लेखनावर अजूनही लोकांचा विश्‍वास आहे. छापून आलेली बातमी समाजमन घडविण्यात मोठा वाटा उचलते. जीवनाच्या सर्व अंगाना स्पर्श करून जाणार्‍या पत्रकारांची लेखणी झोपलेल्यांना जागे करते आणि अपप्रवृत्तींना झोपवतेही! म्हणूनच पत्रकारांचे अनुभवविश्‍वही समृद्ध असते. या क्षेत्राची ओळख करून देणारा आणि पत्रकारिता जीवनाचे विविध रंग उलगडून दाखवणारा कवितासंग्रह म्हणजे ‘कागदी काटे.’ बेळगाव ‘तरूण भारत’चे पुण्यातील संपादकीय प्रमुख प्रशांत चव्हाण यांनी हा अभिनव प्रयोग केलाय. केवळ पत्रकारिता क्षेत्रावरच्याच कवितांचा संग्रह हा मराठीतील बहुधा पहिलाच प्रयोग असावा. एक तपापासून पत्रकारितेत यशस्वीरित्या कार्यरत असलेल्या प्रशांत चव्हाण या संवेदनशील कवीने ही किमया साध्य केलीय.
‘जमत नसेल तुम्हाला जर काही
तर पत्रकार बनण्यास काहीही हरकत नाही’

असं सांगणार्‍या प्रशांत चव्हाण यांनी या क्षेत्रातील वास्तव अधोरेखित केलं आहे. अत्यंत तटस्थवृत्तीने कार्यरत असलेल्या चव्हाण यांनी पत्रकारितेत वेगवेगळे प्रयोग केले आहेत. नवनवीन मुलांना लिहिते केले आहे. आक्रमक असूनही तितकीच सभ्य आणि सर्वसमावेशक अशी त्यांची शैली आहे. सर्व क्षेत्रांचे वार्तांकन करताना त्यांनी कधीही दुजाभाव, कुणाला झुकते माप किंवा कुणाविषयी आकस बाळगला नाही. किंबहुना ‘विरोधी विचारधारेचे’ही तितक्याच उमदेपणाने स्वागत करणारे प्रशांत चव्हाण निष्ठेने या क्षेत्रात कार्यरत आहेत. म्हणूनच या क्षेत्रातील अपप्रवृत्तीवर ते कवितेच्या माध्यमातून प्रहार करतात. हे सारे धाडसाने आणि स्पष्टपणे मांडण्याचे नैतिक अधिष्ठान त्यांच्याकडे आहे. या क्षेत्रातील त्यांनी कवितेच्या माध्यमातून दाखवलेला आरसा पाहता कुणीही अस्वस्थ होईल. हा कवितासंग्रह पत्रकारितेविषयी मुलभूत विचार करण्यास भाग पाडतो आणि हेच प्रशांत चव्हाण यांच्या लेखणीचे यश म्हणावे लागेल. हे ‘कागदी काटे’ खोचकपणे रूततात; मात्र ते कुणाला ‘शब्दबंबाळ’ करीत नाहीत. तरीही सत्य मात्र नेमकेपणे सांगतात.
‘आम्ही बातमीदार’ ही या संग्रहातील दुसरीच कविता पत्रकारांचे जीवन शब्दबद्ध करते. सदा न कदा बातमीच्याच मागे असलेल्या पत्रकारांची उपासमार कशी होते, ठरलेले बेत आणि योजना यावर ‘पाणी’ कसे पडते, वैकुंठाच्या दिशेनेही कसे ‘आशेने’ पहावे लागते आणि काहीवेळा ‘जाण्यापूर्वी’च कशी बातमी तयार असते, डोक्यावर ‘मेमो’ची टांगती तलवार आणि पोरगी द्यायलाही कुणी बाप होईना तयार, मानाचेच धनी असणार्‍यांचा कसा वाढणार पगार असे प्रश्‍न, या क्षेत्राची तोंडओळख प्रशांत चव्हाण यांची कविता करून देते. या क्षेत्रातील प्रत्येकाला या आपल्याच वेदना वाटतील आणि प्रशांत चव्हाण यांच्या लेखणीचे हेच तर वैशिष्ट्य आहे.
इथून तिथून आमच्यावरच, बौद्धिक अत्याचार
आम्हीच आमचे मारेकरी, तक्रार कुठे करणार?


असा रोखठोक सवाल ही कविता करते.

पत्रकारिता हे वेड, की निव्वळ वेडाचा झटका
कुणी काहीही म्हणो, आल्यानंतर येथून ना सुटका...!

हेही सांगायला हा कवी विसरत नाही. ज्यांच्या रक्तातच पत्रकारिता असते ते इतर कसल्याही त्रासाला जुमानत नाहीत, कौटुंबिक आयुष्याची पर्वा करत नाहीत. ‘बातमी’हाच त्यांचा धर्म असतो. या धर्माला जागत ते अहोरात्र धडपडत असतात. दोन-चार  रूपये देवून विकत घेतलेला कोणत्याही वृत्तपत्राचा अंक वाचताना वाचकांना तो त्यांच्या हातात येईपर्यंत केवढी यंत्रणा कार्यरत असते याचा अंदाज असतोच असे नाही. त्यामुळे पडद्यामागच्या या कलाकारांचे जीवन काव्यात्म शैलीत मांडण्याचे मोठे काम प्रशांत चव्हाण या धडपड्या पत्रकाराने केले आहे. त्याबद्दल त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच!
केवळ पत्रकारांचे जीवन, या क्षेत्रातील भल्याबुर्‍या गोष्टी मांडण्यापर्यंतच त्यांची कविता मर्यादित राहत नाही; तर चक्क धोरणात्मक निर्णय, संपादकीय बैठका, मालकशाही, पत्रकार-पोलिसांचे संबंध, क्षेत्र पत्रकारिता (बीट रिपोर्टिंग), भाषा, साहित्य संमेलने, पत्रकारांचे वैयक्तिक आयुष्य या सर्वांवर ही कविता समर्पक भाष्य करते. विशेषतः यातील अभंगसदृश्य रचना मनाचा ठाव घेतात, वाचकांना अंतर्मुख करतात. त्यांचे कार्यालय ‘वैकुंठ स्मशानभूमीजवळ’ असल्याने त्याचेही प्रतिबिंब एका कवितेत उमटले आहे. वृत्तपत्रीय जगाचा आवाका समजून घ्यायचा असेल तर प्रशांत चव्हाण यांच्या ‘कागदी काटे’ला पर्याय नाही.
कसली अभिव्यक्ती, कसले स्वातंत्र्य
अजुनी पारतंत्र्य, सभोवती
अयोग्य ठिकाणी, टीकेचा आसूड
तरी तिळपापड, सत्तांधांचा
स्तंभाचे हक्क, हेच हिरावती
वरून लादती, हक्कभंग
निषेधाचा सूर, कधी हल्लाबोल
सत्य लिहिता तोल, ढासळतो

स्तुतिसुमने अन् गोडाची फोडणी
हवी यांना लेखणी, गुळचट
व्वा रे लोकशाही, निव्वळ आभास
स्तंभच ओलीस, यांच्याकडे

अशी ‘अभिव्यक्ती’ प्रशांत चव्हाण यांनी मांडली आहे. सत्य लिहायला ते कचरत नाहीत. या क्षेत्रातील दुष्प्रवृत्तीकडे ते डोळेझाकही करत नाहीत. म्हणूनच प्रशांत चव्हाण यांचे कागदी काटे ‘काट्याने काटा‘ काढण्याचे काम करतात. जखम बरी व्हायची असेल तर अशा शस्त्रक्रिया तटस्थपणे करायलाच हव्यात. जे काम प्रसारमाध्यमांवर विविध परिसंवाद आयोजित करून, अनेक पुस्तके लिहून, पुरवण्या काढून होणार नाही ते काम प्रशांत चव्हाण यांच्या कविता करतात.
सुप्रसिद्ध कवी अजय कांडर यांनी केलेली पाठराखण, प्रख्यात छायाचित्रकार संदेश भंडारे यांनी कल्पकरित्या साकारलेले मुखपृष्ठ आणि कवीचे शब्दसामर्थ्य यामुळे ‘कागदी काटे’चे संदर्भमूल्य मोठे आहे. कवी प्रशांत चव्हाण यांच्या पुढील साहित्यिक कारकिर्दीस माझ्या अंतःकरणापासून शुभेच्छा!
कागदी काटे
कवी - प्रशांत चव्हाण (9325403220)
प्रकाशक - सहित प्रकाशन, गोवा
पाने - 67, मूल्य - 70

- घनश्याम पाटील, पुणे 
७०५७२९२०९२



2 comments:

  1. बहोत बढिया!
    काट्याने काटा, जबरदस्त!

    ReplyDelete
  2. सुंदरच..... पत्रकार कवीमनाचे असतातच...खुप खुप शुभेच्छा.

    ReplyDelete