Monday, August 17, 2015

नेमाडेंचा नीचपणा!

‘‘बाबासाहेबांच्या निष्ठेविषयी अजिबात शंका नाही. त्यांच्याविषयी आम्हाला नितांत आदर आहे. मात्र शिवाजी महाराजांबद्दलची आमच्या मनात असलेली प्रतिमा वेगळी आहे. बाबासाहेबांनी शिवाजी महाराजांचे केलेले चित्रण इतिहासाला धरून नाही. त्यामुळे त्यांना ‘महाराष्ट्र भूषण’ देऊ नये,’’ अशी वेडगळ मागणी ज्ञानपीठ विजेते साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी केली आहे. नेमाडे काय बोलतात यावरून आपली संस्कृती निश्‍चितपणे ठरत नाही; मात्र आता त्यांना ‘ज्ञानपीठ’सारखा पुरस्कार मिळाला असल्याने त्यांची दखल घेणे क्रमप्राप्त ठरते. उठसूठ वाट्टेल ती विधाने करून आपल्या बुद्धिमत्तेचे प्रदर्शन घडविण्याची ज्यांना खोड असते त्यापैकी नेमाडे एक आहेत.
पुण्यात ‘मॅजेस्टिक बुक गॅलरी’चे शानदार उद्घाटन झाले. त्यावेळी समीक्षक डॉ. अविनाश सप्रे आणि नेमाडेंच्याच विद्यार्थीनी डॉ. प्राची गुजर पाध्ये यांनी नेमाडे यांची एक अत्यंत निरस, बोजड मुलाखत घेतली. या कंटाळवाण्या (आणि केविलवाण्याही) मुलाखतीत नेमाडे यांनी अशीच उथळ विधाने केली. स्त्री-पुरूष संबंधाविषयी बोलताना त्यांनी पांडव आणि द्रौपदीचे उदाहरण दिले. ते म्हणाले, ‘‘मोकळ्या संबंधाची परंपरा पुरातन आहे. मात्र नंतर काळानुरूप विवाहाची व्याख्या बदलली. आताच्या काळात विवाहीत स्त्री-पुरूषांना नवरा-बायकोशिवाय एक प्रेयसी-प्रियकर असायला अडचण नसावी. सेक्स रेशो बदलल्यास बलात्कार, व्याभिचाराचे प्रकार थांबतील...’’
‘इतकेच नाही तर हजार मुलामागे आठशे मुली असल्याने बलात्कार वाढल्या’चे सांगत ‘लग्नाशिवाय दोन-तीन पुरूषांशी संबंध ठेवण्यातही काही वावगे नसल्या’चे नेमाडे सांगतात. आपला मुद्दा अधिक स्पष्ट करताना त्यांनी एका आदिवासी भागातील संस्कृतीचे उदाहरण दिले. ‘‘तिथे लग्न होतानाच मुलीला दुसरा नवरा, प्रियकर कोण असेल हे सांगता येते आणि समाजाला त्याचे वावडे वाटत नाही. नवर्‍याचे अचानक काही बरेवाईट झाले तर आपली काळजी घेणारा, आपले संरक्षण करणारा पुरूष तयार असावा यासाठीची ही प्रथा आहे,’’ असे नेमाडे म्हणाले. भाषेचा, संस्कृतीचा अभ्यासक म्हणून मिरवणारा हा माणूस नक्की काय संदेश देऊ इच्छितो हे वाचकांनी पडताळून पाहायला हवे.
‘बाबासाहेबांच्या निष्ठेविषयी शंका नाही पण आमच्या मनातील शिवाजी महाराजांची प्रतिमा वेगळी आहे’ असे सांगणार्‍या नेमाडेंनी त्यांच्या मनातील शिवाजी महाराज आधी मांडावेत. तुमच्या मनात काय आहे, यापेक्षा सत्य काय आहे हे बाबासाहेबांनी अभ्यासातून मांडले आहे. ज्यांच्या नसानसात शिवाजी महाराज आहेत त्या वंदनीय बाबासाहेबांविषयी बोलण्याची तुमची लायकी नाही. बाबासाहेबांनी शिवचरित्र घराघरात पोहोचवले आहे. शिवचरित्रावर तुम्ही लिहिलेला एखादा लेखही आम्हास आठवत नाही. त्यामुळे किमान ‘शिवचरित्र आणि बाबासाहेब’ या विषयावर तरी नेमाड्यांसारख्या कुण्या बोजड लेखकाने तारे तोडू नयेत. ‘सगळे आपल्यालाच कळते, असे अधिकारवाणीने कोणी बोलू नये. प्रत्येकाने आपल्या क्षेत्रात बघावे’ असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नेमाडे यांना सुनावले आहे. ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्याचा अधिकार राज्य शासनाचा आहे. त्याविषयी मतमतांतरे असू शकतात; मात्र त्या क्षेत्रातील आपला अभ्यास किती हे तरी टीका करण्यापूर्वी पडताळून पाहायला हवे.
नेमाडे एक कादंबरीकार आहेत. त्यांनी साहित्याविषयी बोलावे. नवे लेखक पुढे येण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी काही करता आले तरी जरूर करावे. कोणत्याही विषयात नाक खुपसून बुद्धिचे प्रदर्शन केल्यास ‘ज्ञानपीठ’सारख्या सन्मानाचाही कचरा होईल.
‘मॅजेस्टिक’च्या कार्यक्रमात मुलाखत घेताना मुलाखतकार नेमाडे कवी म्हणून किती महान आहेत, हेही ठसवू पाहत होते. नेमाडेंनी आजवर सदतीस कविता केल्या; पुढे काव्यलेखन का थांबवले? असे विचारल्यावर नेमाडे म्हणाले, ‘‘मी आणखी पंचवीस कविता केल्यात. प्रत्येक लेखक हा आधी कवी असतो. कवी असल्याशिवाय लेखक होता येत नाही. कविता ही नेणिवेत असते. ती कधीही अश्‍लिल नसते. कविता येत असूनही पोटाच्या-नोकरीच्या मागे लागल्याने कविता न करण्याचा नीचपणा मी केला. डोक्यातील कादंबर्‍या लिहून झाल्यावर मी कवितेेकडे वळणार आहे...’’
मुळात नेमाडेंची एकही कविता रसिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचली नाही. नेमाडपंथातले चारदोन टाळके सोडले तर ते कविता करतात हेही कुणाला माहीत नाही. एकीकडे कविता हा सर्वोत्कृष्ट प्रकार आहे असे म्हणायचे आणि दुसरीकडे (कादंबर्‍या लिहून झाल्या, रॉयल्टी खिशात टाकली की वेळ मिळालाच तर) कविता करेन असे म्हणायचे हा दुटप्पीपणा आहे. ही विसंगती लाजीरवाणी आहे. हा केवळ नेमाड्यांचा ‘नीचपणा’ नसून त्यांना ‘सहन’ करणार्‍या रसिकांचाही ‘निलाजरेपणा’ आहे. ‘कविता करणे सोपे आहे; मात्र तुकाराम-कबीरांसारखे धैर्य नाही’ असेही ते सांगतात. तुकाराम-कबीरांसारखे धैर्य सोडा त्यांच्यासारखा एखादा जरी विचार तुम्ही मराठीला दिला असता तरी मराठी लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचले असते. बाबासाहेब पुरंदरे यांनी अभ्यासपर्वूक शिवचरित्र मांडले आहे. तसे वाहून घेऊन तुम्ही साहित्याची सेवा केली असती, एखादा विषय मांडला असता तर ते मराठी भाषेच्या विकासाच्या दृष्टिने अधिक पोषक ठरले असते.

- घनश्याम पाटील 
संपादक, प्रकाशक 'चपराक' पुणे 
७०५७२९२०९२


Sunday, August 9, 2015

व्यामिश्र अनुभवांची प्रगल्भ कविता


‘चपराक प्रकाशन’ने प्रकाशित केलेल्या विश्‍वास वसेकर लिखित ‘तरी आम्ही मतदार राजे’ या काव्यसंग्रहाचे परीक्षण आजच्या ‘सकाळ’ने ‘सप्तरंग’ पुरवणीत दिले आहे. राजकीय कवितांच्या या संग्रहाचे प्रकाशन घुमान येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, भारत देसडला यांच्या हस्ते करण्यात आले होते.
धन्यवाद ‘सकाळ’.


मराठी कवितेच्या प्रांतात 1980 नंतरच्या कालखंडातले विश्‍वास वसेकर हे महत्त्वाचे कवी आहेत. ‘कोरस,’ ‘काळा गुलाब,’ ‘पैगाम,’ ‘शरसंधान’ आणि ‘मालविका’ या कवितासंग्रहांनंतरचा ‘तरी आम्ही मतदारराजे’ हा त्यांचा अलीकडचा राजकीय कवितांचा आगळावेगळा कवितासंग्रह होय. आपली अनुभवाची नाळ, वास्तवाशी जोडून भेदक आणि तिरकस शैलीत त्यांची कविता प्रकटते. मराठीतल्या प्रमाणभाषेतील शब्दांना योग्य जागी ठेवताना जनभाषेतूनही ते कवितेला अर्थवत्ता प्राप्त करून देतात. त्यांचा हिंदी-उर्दू साहित्याचा व्यासंग मराठी कवितेत सहजपणानं प्रकटतो. त्यांची कविता त्यांचे वास्तव अनुभव साकारताना सौंदर्यवादी मन आणि हुन्नरी व्यक्तिमत्त्वही उभं करण्यात यशस्वी झालेली दिसते.
आजच्या शिक्षणव्यवस्थेतील वरवरचा शैक्षणिक देखावा, पोटार्थी सहकार्‍यांवर आपली महात्मता दाखविणारे आणि संस्थाचालकांना खूश करण्यासाठी बोटचेपी भूमिका घेणारे ‘हेडसर’ आहेत. काही सन्माननीय अपवाद वगळता सर्वत्रच ‘पाट्या’ टाकण्याचे काम करणारे आहेत, हेही वास्तव कवी मोठ्या खुबीनं काही कवितात सांगतो. वर्तमानपत्रांतील कोणत्याही भडक बातम्या पाहिल्या, की ‘जांभई’ देणारा वाचक महागाई भत्ता वाढल्याची बातमी वाचून मात्र सुखावतो. आजच्या ‘नोकरशाही’च्या जीवनाचे मर्मच कवी साध्या सोप्या शब्दांत सांगतो. कोणत्याही क्षेत्रात काहीतरी नवं करून दाखविण्याचा हुरूपच हरवलेला असून, त्याची जागा कंटाळा या स्थायिभावाने घेतलेली आहे. कारण चुकारपणाच्या ‘शिक्षा’ आज कुणालाच मिळत नाहीत, ही सार्वजनिक जीवनातली अवस्था कवीला अस्वस्थ करते. स्पर्धा करावी आणि काहीतरी चांगलं उभं करावं, ही ईर्षाच राहिली नसल्याचं शल्य कवीला बोचतं. ‘कर्मचारी,’ ‘व्याख्या’ या कविता उथळ आणि सवंग जीवनव्यवहार सूचित करतात. या संग्रहातल्या काही कविता मुळातून वाचल्या म्हणजे व्यक्ती, समाज, देश आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचा पट मांडणार्‍या वसेकरांच्या विचारांचा आणि कवितेचा अवकाश खूपच मोठा असल्याचं लक्षात येतं.
‘परदेशी किचक,’ ‘रंगाचे रॅगिंग,’ ‘बाप्तिस्मा,’ ‘गोमेचे पाय,’ ‘भुकेचा चिद्विलास,’ ‘आदिमाय भूक,’ ‘मांजरनजर,’ ‘अस्पृश्य भावना,’ ‘बर्फाचा पाऊस,’ ‘प्रश्‍नांचे मोहळ’ आदी प्रतिमांमुळं काव्याशय अधिक अर्थवाही होतो. त्याचप्रमाणे ‘कारवॉ,’ ‘महफिल,’ ‘जिक्र,’ ‘थ्रिल,’ ‘बॉम्ब,’ ‘ऍडव्हान्स,’ ‘मेन्टनन्स,’ ‘रिलॅक्स,’ ‘सिडाऊन,’ ‘ट्रॅजेडी,’ ‘पॅसिव्ह शोषण’ असे हिंदी-इंग्लिश भाषेतल्या शब्दांनी कवीचा अन्य भाषांच्या व्यासंगाबरोबरच त्यांचं औचित्यपूर्ण उपयोजनही कवितेची व्यामिश्रता वाढवितो. वसेकर वास्तवाला परखडपणानं, कधी उपहास; तर कधी विडंबनाच्या माध्यमातून साकारतात. मानवी जीवन सुंदर आणि समाजजीवन निकोप व्हावं, हाच या संग्रहातल्या कवितांचा हेतू आहे.
- डॉ. पंडितराव पवार
 
पुस्तकाचं नाव - तरी आम्ही मतदारराजेकवी
- विश्‍वास वसेकर
प्रकाशक - चपराक प्रकाशन, पुणे.

(020- 24460909, 9226224132)
पृष्ठ - 104 मूल्य - 100 रुपये.



Saturday, August 1, 2015

'चपराक'ची साहित्य भरारी!

आपल्या आवडीच्या लेखकानं कौतुकाची थाप देणं यापेक्षा मोठा आनंद कोणता? तेही ह. मो. मराठे यांच्यासारख्या दिग्गजाची पावती म्हणजे आकाश ठेंगणे वाटण्यासारखी बाब. 8 ऑगस्ट रोजी पुण्यात होणार्‍या ‘चपराक साहित्य महोत्सवा’च्या निमित्ताने मराठे सरांनी सोलापूर आणि मराठवाड्यात अग्रगण्य असलेल्या ‘संचार’ या दैनिकाच्या ‘इंद्रधनू’ पुरवणीत माझ्यावर एक लेख लिहिलाय. आमच्या कामाची ही मला मोठी पावती वाटते. माझे सर्व सहकारी आणि वाचकांचा उदंड प्रतिसाद यामुळे हे शक्य होतेय. सुप्रसिद्ध साहित्यिक आणि संपादक ह. मो. मराठे सर यांचा हा लेख आज प्रकाशित करून ‘संचार’ने आणि प्रशांतजी जोशी यांनी मला मैत्रीदिनाची खास भेट दिली आहे. धन्यवाद! मनःपूर्वक धन्यवाद!! 
पुण्यातील ‘चपराक प्रकाशन’तर्फे येत्या 8 ऑगस्ट रोजी तिसरा ‘चपराक साहित्य महोत्सव’संपन्न होतोय. महाराष्ट्र राज्य भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या अध्यक्षतेखाली आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. सदानंद मोरे यांच्या हस्ते यावेळी तब्बल पंधरा पुस्तकांचे प्रकाशन होत आहे. त्यानिमित्त ‘चपराक प्रकाशन’चे प्रकाशक घनश्याम पाटील यांच्या वाटचालीचा सुप्रसिद्ध साहित्यिक ह. मो. मराठे यांनी घेतलेला आढावा...

घनश्याम पाटील याची आणि माझी ओळख तशी अलीकडीलच. झाली असतील  चार पाच वर्षे. या पाच वर्षातल्या गाठीभेटीतून आणि त्याच्याबरोबरच्या गप्पांतून मला त्याच्या व्यक्तिमत्त्वामधले काही गुण ठळकपणे जाणवलेच. तो उत्साहाने उसळणारा तरूण आहे. त्याला खूप काही करायचं आहे. त्याने खूप मोठी स्वप्नं मनात पाहिली आहेत. ती प्रत्यक्षात आणायचीच, या दृष्टीने तो नुसता बोलत बसलेला नाही, तर त्याने त्या दृष्टीने योजना आखल्या आहेत. तो कामाला लागला आहे.
आपल्या ‘साहित्य चपराक’ या मासिकाचा दिवाळी अंक चारशे पानांचा काढायचा असे त्याने ठरवले आहे! चारशे पानं मजकूर! जाहिरातींची पानं वेगळी. हा त्याचा एक विक्रमच ठरेल एवढं नक्की! प्रती? निदान पंचवीस हजार! मला दिवाळी अंकांचं संपादन करण्याचा अनुभव आहे, पण फक्त संपादनाचा. मालकांनी जेवढी पानं मजकूर हवा असं सांगितलं असेल, तेवढा मजकूर जमा करणं हे माझं काम. कागद, छपाई, जाहिराती, मार्केटिंग ही जबाबदारी माझी नाही! पण घनश्यामच्या बाबतीत या सर्व जबाबदार्‍या त्याच्या एकट्याच्याच आहेत! सामान्य वाचकांना कल्पनाही येणार नाही की हे सर्व काम म्हणजे केवढा खटाटोप असतो! अगदी तरूण वयात घनश्यामची ही जबाबदारी पेलायची तयारी झालेली आहे. त्याची ही योजना त्याने यशस्वीपणे अंमलात आणली तर त्याने अगदी अल्पावधीतच नेत्रदीपक यश मिळवलं हे मान्य करावं लागेल.
त्यांच ‘चपराक’ नावाचं साप्ताहिकही आहे. एक साप्ताहिक आणि एक मासिक एवढं त्याने या वयातच सुरू केलं आहे. साप्ताहिकात तो दर आठवड्याला अग्रलेख लिहितो. ते निर्भीड, सडेतोड आणि निर्भयपणे लिहिलेले असतात. ज्यांचं गुणवर्णन श्री. शरद पवार यांची ‘राष्ट्रवादीचे सुविद्य आमदार आणि ओबीसींच्या नेतृत्त्वाचा नवा चेहरा’ असं केलं त्या आमदार जितेंद्र आव्हाडांनी अलीकडेच बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ देण्याच्या मुद्द्यावरून अत्यंत स्फोटक भाषण केलं. त्याच्या बातम्या वर्तमानपत्रात आल्या. ‘पुरस्कार देण्यात आला तर महाराष्ट्र पेटवू’ अशी भाषा आव्हाडांनी वापरली. आव्हाड यांच्या या भाषेवर परखड आणि स्पष्ट टीका करणारा अग्रलेख त्याने अलीकडेच लिहिलाही होता. तो आपल्या साप्ताहिकात छापलाही होता. आमदार आव्हाडांसारख्या मा. शरद पवारांच्या ‘लाडक्या’ नेत्यावर टीका करणं महाराष्ट्रात सोपं उरलेलं नाही. घनश्याम त्याचं ‘चपराक’ साप्ताहिक माझ्याकडे भेटीदाखल पाठवतो. मी ते वाचतो. त्याच्या अग्रलेखातला सडेतोडपणा मी अनेकदा अनुभवला आहे.
अलीकडे घनश्याम पुस्तक प्रकाशनाच्या व्यवसायाकडे वळला आहे. आजपर्यंत त्याने अनेक पुस्तके प्रकाशित केली असून येत्या 8 ऑगस्टला तो आणखी 15 पुस्तकं एकाचवेळी प्रसिद्ध करणार आहे. एकाचवेळी अनेक पुस्तकं प्रसिद्ध करणं हेही सोपं नाही. वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तकं वेगवेगळ्या लेखकांकडून मिळवणं हे पहिलं काम. ती एकाचवेळी छापून मिळण्याची व्यवस्था हे दुसरं काम. त्यासाठी छापखान्याच्या मालकाला आगाऊ बिलाची रक्कम देणं आणि उरलेल्या बिलासाठी क्रेडीट मिळवणं हे तिसरं काम. बातमी यावी यासाठी पंधरा पुस्तकांच्या प्रकाशन समारंभाची आणखी करणं हे पुढलं काम. पाहुणे मिळवणं, हॉल आधीच बुक करणं, समारंभाची सर्व आखणी करणं आणि त्याप्रमाणे समारंभ पार पाडणं हे पुढलं काम! अशी अनेक टप्प्यांवरची कामं पार पाडणं आणि तिही वेळच्यावेळी, यासाठी मॅनेजमेंटचं कौशल्य आवश्यक आहे. ते कौशल्यही घनश्यामने आत्मसात केलं आहे.
घनश्याम मराठवाड्यातल्या एका शेतकरी कुटुंबातून दहावी झाल्यावर पुण्यात आला तो पत्रकारितेच्या ओढीने. ‘संध्या’ या नावाचं कै. वसंतराव काणे यांचं एक सायंदैनिक पुण्यातून प्रकाशित होत असे. तिथं त्याला पत्रकारितेची नोकरी मिळाली. त्याची राहण्याची सोयही वसंतराव काणे यांनी ऑफिसमध्येच केली. नोकरी करीत करीत त्याने बारावी केली आणि सरळ पत्रकारिता सुरू केली. याचा अर्थ स्वत:चं छोटंसं साप्ताहिक सुरू केलं. धीरे-धीरे त्यानं साप्ताहिकाला मासिकाची जोड दिली. मासिकाचे काही हजार वर्गणीदार असणं ही आजच्या काळात अशक्य वाटणारी गोष्ट आहे. हजारोंच्या घरात त्याचा हुकुमी वाचक आहे. तसाच तो हुकुमी ग्राहक आहे. त्याने याआधी प्रसिद्ध केलेल्या पुस्तकांच्या चार-चार, पाच-पाच आवृत्त्या निघाल्याचं तो अभिमानानं सांगतो. त्याचं प्रत्येक पुस्तक घेणारे दहा हजार वाचक मिळाले तरी तो आपल्या पुस्तकांची पहिली आवृत्तीच दहा हजार प्रतींची छापू शकेल आणि तोही एक मराठी प्रकाशन व्यवसायातला कौतुकास्पद असा विक्रमच ठरेल!
तरूण वयातच घनश्यामने वैचारिक प्रगल्भता आणि स्पष्टता प्राप्त केली आहे. याची अनेक उदाहरणं त्याने लिहिलेल्या अग्रलेखांतून सापडतात. त्याने आपल्या निवडक अग्रलेखांची पुस्तके ‘दखलपात्र’ व ‘झुळुक आणि झळा’ या नावाने प्रसिद्ध केली आहेत.
त्यातील काही उदाहरणे बघा...
1) ‘‘एखादी नदी सराईतपणे पोहत पार करताना आम्ही बेभान होतो कारण नदीच्या दुसर्‍या काठावर जाण्याची आमची प्रचंड ओढ असते. कार्ल्याच्या एकवीरा आईच्या किंवा जेजूरीच्या खंडोबाच्या पायर्‍या चढताना आम्ही कधीही थकत नाही कारण मन प्रफुल्लीत करणार्‍या त्या गूढ शक्तीची दृढ आस मनी असते. विविध ग्रंथ वाचताना आम्ही किती पाने उलटली याचे आम्हास यत्किंचितही भान नसते कारण ज्ञानामृत प्राशन करण्याची आमची लालसा असते. यशाचे शिखर पादाक्रांत करताना काही समदुःखी लोकांनी घातलेले घाव आम्हास इजा पोहोचवत नाहीत कारण आमच्या प्रबळ आत्मविश्‍वासाची शक्ती आम्हांस संरक्षण देत असते. मग समाजातल्या तथाकथित थोतांड प्रवृत्तीची पर्वा आम्ही का करावी? दुष्ट विचारांना, चुकीच्या प्रवृत्तींना ‘चपराक’ देण्यासाठीच आमचा जन्म आहे. यासाठी आम्हाला संघटितपणे साथ देणारे आमचे सहकारी आम्हांस ‘घनश्यामा’प्रमाणे वाटतात. शत्रू पक्षाकडून येणारे अनंत अडचणींचे  बाण हृदयावर हळूवारपणे झेलत ते आमचे सारथ्य करीत आहेत. असे सहकारी असताना पराक्रमाची परंपरा कधीही खंडीत होणार नाही, हे त्रिकालाबाधीत सत्य आहे. (दखलपात्र, पान नं. 23)
हे वाचताना वाटते की आचार्य अत्रे, लोकमान्य टिळक किंवा शिवराम महादेव परांजपे यांच्यासारख्या तगड्या संपादकानेच ही आत्मविश्‍वासपूर्ण, जोरकस आणि आव्हानात्मक शैली वापरली असावी. पण ही भाषा आणि शैली तीस वयाच्या घनश्यामची आहे हे पाहून मी तर अगदी थक्क झालो. केवढी ओघवती शैली, केवढा आत्मविश्‍वास आणि पत्रकार म्हणून स्वीकारलेल्या ध्येयपथावरील भावी वाटचालीबद्दलचा केवढा हा आत्मप्रत्यय!
2) प्रत्येक जातीत काही गुणदोष असतात हे मान्य! मात्र त्यामुळे एखाद्या जातीचा टोकाचा द्वेष करणे आणि त्यांच्या ‘कत्तली करा’, त्यांच्या ‘बायका पळवून आणा’ अशा घाणेरड्या वल्गणा करून समाजस्वास्थ्य खराब करणे हे समाजातील वाढत्या अराजकतेचे लक्षण आहे. आजपर्यंतच्या अनेक ऐतिहासिक, सामाजिक. सांस्कृतिक चळवळीत ब्राह्मणांनी दिलेले योगदान दुर्लक्षून चालणार नाही. समाज ‘भटमुक्त’ करण्याचा विडा उचलणार्‍या फुरफुरत्या घोड्यांना आवरले नाही तर त्याचे गंभीर परिणाम आपल्या राष्ट्राला भोगावे लागतील. (दखलपात्र, पान नं. 79)
अगदी तरूण वयातच घनश्यामने ‘हाही’ विषय अग्रलेखासाठी घेण्याचे धाडस दाखवले.
3) पहिल्या सत्रात विरोधी पक्षात असलेल्या शिवसेनेचा आता सत्तेत सहभाग आहे. निवडणुकीपूर्वी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या गैरव्यवहारावर तुटून पडलेल्या भाजपला त्यांनी पाठिंबा दिला आहे. दिल्लीत विमानतळावरून देसाईंचे परत येणे असेल किंवा राज्य मंत्रीमंडळात दिलेली पदे निमूटपणे स्वीकारणे असेल, या सर्व प्रकारात शिवसेनेने अवहेलना, उपेक्षा सहन केली आहे. ही उपेक्षा पदाच्या, सत्तेच्या लालसेपोटी नाही. राज्याचे, देशाचे काहीतरी भले होणार, भ्रष्ट नेत्यांवर कारवाई होणार या आशेवर शिवसेनेने नमते घेत त्यांना प्रामाणिकपणे पाठिंबा दिला आहे. ‘राष्ट्रवादीच्या जीवावर आपण उड्या मारू’ अशा आविर्भावात असलेल्या ‘फडणवीस ऍन्ड कंपनी’ला पवारांनी एका झटक्यात जागेवर आणले आहे. ‘सरकार स्थिर रहावे यासाठी पाठिंबा दिला असला तरी सरकार टिकावेच यासाठीचा मक्ता आपण घेतला नाही’ असे त्यांनी सांगताच यांचे डोळे उघडले. पुन्हा अनंत तडजोडी करत त्यांनी शिवसेनेशी जमवून घेतले. मात्र दिलेल्या शब्दाला जागत त्यांनी आपली आश्‍वासने पाळली नाहीत, तर शिवसेना कोणत्याही क्षणी स्वाभिमानाने सत्तेतून बाहेर पडेल आणि पुन्हा बहुमताने सत्तेत येईल, असे सध्याचे एकंदरीत चित्र आहे.
‘रॉंग नंबर’ लागला तर त्यांना तसे धाडसाने सांगणे हे आता प्रत्येक नागरिकाचेही कर्तव्य आहे. तसे झाले नाही तर सत्तेच्या कैफात असणार्‍यांचे डोळे कदापि उघडणार नाहीत. (झुळूक आणि झळा, पान नं 40)
पंतप्रधान मोदींच्या सरकारकडून अपेक्षाभंग होऊ लागल्याची जाणीव आणि शिवसेना-भाजप संबंधावरचा मार्मिक अभिप्राय.
साहित्य क्षेत्रात अशी धडधडती तोफ म्हणून वाचकांपुढे आलेला घनश्याम उत्तम लेखक आणि म्हणूनच तो प्रकाशक म्हणून इतर लेखकांना योग्य न्याय देऊ शकतो. ‘चपराक’चा हा साहित्य महोत्सव हे त्याचेच प्रतिक आहे. त्याच्या भावी वाटचालीस माझ्या शुभेच्छा!
- ह. मो. मराठे
सुप्रसिद्ध साहित्यिक आणि समाजचिंतक
9423013892




Monday, July 27, 2015

अक्षरम् परम: ब्रह्म...!

‘वाचाल तर वाचाल’ किंवा ‘पुस्तक हेच मस्तक’ अशा म्हणी आपण बालपणापासून ऐकत आलोय. शेतकरी, कष्टकरी किंवा श्रमिक यांच्या आयुष्यावर प्रचंड प्रमाणात साहित्य लिहिले जाते. मात्र त्याचा त्यांना स्वत:च्या विकासासाठी काय फायदा होतो असाही एक मतप्रवाह आहे. वाचून जर क्रांती झाली असती तर गीता, कुराण, बायबल वाचून लोक सुधारले नसते काय? रामायण, महाभारतापासून त्यांनी काही बोध घेतला नसता काय? असाही प्रश्‍न उपस्थित केला जातो. दरवर्षी सर्व भारतीय भाषात हजारो पुस्तके प्रकाशित होतात. ही पुस्तके वाचणार्‍यांचे नक्की भवितव्य काय? शालेय-महाविद्यालयीन आणि आपापल्या क्षेत्रातील अभ्यासाशिवाय मुले, तरूण काय वाचतात आणि त्यांना त्यांच्या जीवनात या वाचनाचा काही उपयोग होतो काय?
‘ज्या दिवशी देवळाकडे जाणारी पाऊले ग्रंथालयाकडे वळतील त्यादिवशी समाजाची योग्य दिशेने वाटचाल सुरू झाली असे म्हणता येईल,’ असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले. ‘कोणत्याही देशातील तरूणांच्या ओठावर कोणती गाणी आहेत ते मला सांगा म्हणजे मी त्या देशाचे भवितव्य सांगतो,’ असे स्वामी विवेकानंद सांगायचे. म्हणजे समाज काय वाचतो, त्या समाजातील विचारवंत काय बोलतात, काय लिहितात हे पाहणे सामाजिक आरोग्याच्या दृष्टिने महत्त्वाचे असते.
‘शब्द हे शस्त्र आहेत, त्यामुळे ते जपून वापरावेत’ अशी शिकवण आपल्याला कायम देण्यात येते. हे शस्त्र तयार करण्याचे कारखाने मात्र पुरेसे ताकतीने धडधडत नाहीत. हे शस्त्र चालवावे कसे याचेही ज्ञान आजच्या तरूणाईला दिले जात नाही. त्यामुळे शब्दरूपी शस्त्रं गंजत चालली आहेत. त्यांची धार बोधट झालीय. साहित्य असेल किंवा पत्रकारिता असेल गुळगुळीत कागदावरील बुळबुळीत मजकुरामुळे वाचकांचे ना धड मनोरंजन होते, ना त्यांना पुरेशी माहिती मिळते. खून, मारामारी, बलात्कार, अपहरण, दरोडे, अपघात नट-नट्यांची लफडी अशा नकारात्मक बातम्यांनीच वृत्तपत्रांचे रकाने खचाखच भरलेले असतात. नकारात्मक बातम्या प्राधान्याने द्यायची मानसिकता आपल्याकडे दुर्दैवाने रूजली आहे. त्यात सकारात्मकतेचा पोत हरवला आहे.
महाराष्ट्राचा विचार करता दरवर्षी हजारो अनुवादीत पुस्तके आपल्याकडे प्रकाशित होतात आणि ती मोठ्या संख्येने खपतात. परदेशी विचारवंतांची, लेखकांची पुस्तके मराठीत ज्या संख्येने येतात, तसे मराठीतील साहित्य अन्य जागतिक भाषात जाताना दिसत नाही याची कारणे शोधण्याची वेळ येऊन ठेपली आहे. कन्नडमधील एस. एल. भैरप्पांच्या कादंबर्‍यावर मराठीत उड्या पडतात. सुधा मुर्तींची अनुवादीत पुस्तके आपल्याकडे खपतात. मात्र आपल्याकडील साहित्य त्याप्रमाणात तिकडे जाताना दिसत नाही. मराठी लेखकांचे जीवनानुभव समृद्ध असूनही नवीन लिहिणारे लेखक जागतिक स्तरावर सर्वमान्य होत नाहीत. चेतन भगतसारख्या तरूण लेखकाची ‘हाफ गर्लफ्रेन्ड’ कादंबरी प्रकाशित होते आणि पहिल्याच आवृत्तीच्या सत्तर लाख प्रती आरक्षित होतात हे आपण पाहिले आहे. अकरा करोडची लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात एकही प्रकाशक एकाही लेखकाची, त्याच्या कोणत्याही कलाकृतीची 10 हजाराची आवृत्तीही प्रकाशित करू शकत नाही हे मायमराठीचे दुर्दैव आहे. वाचनसंस्कृती कमी होत चालली अशी बोंब मारणारे प्रकाशक मराठीत सकस साहित्य यावे यादृष्टिने काय प्रयत्न करतात आणि आपल्याकडील लेखक त्याला नेमका कसा प्रतिसाद देतात हे पाहिले तर सारेच चिंताजनक वाटते.
मराठी चित्रपटानेही सध्या कात टाकली आहे. मात्र कथा सशक्त असेल तर निर्मिती अशक्त आणि निर्मिती सशक्त तर कथानक अशक्त असा काहीसा खेळ सुरू आहे. त्यातूनही काही चांगले चित्रपट प्रेक्षकांच्या नशिबी येतात. आमच्या रितेश देशमुखच्या ’लय भारी’ या चित्रपटाच्या केवळ जाहिरातीचे जितके बजेट होते तितके बजेट संपूर्ण मराठी प्रकाशनविश्‍वाचे वर्षभराचेही नसते. एखादी चांगली कलाकृती वाचकांपर्यंत जावी यासाठी लेखक आणि प्रकाशक नेमके कोणते कष्ट घेतात? त्या पुस्तकाच्या जाहिरातीसाठी आपली काय तरतूद असते?  वाचकांपर्यंत पुस्तक प्रभावीपणे पोहचविण्यासाठी आपण नेमके काय करतो?
सुदैवाने मराठीतील आघाडीची वृत्तपत्रे रविवार पुरवणीत पुस्तक परिचय देतात. एका पुरवणीत सरासरी चार ते पाच पुस्तकांचा अल्पपरिचय  येतो. म्हणजे वर्षातील 52 आठवड्यात जेमतेम दोनशे-सव्वादोनशे पुस्तकांची ओळख एक वृत्तपत्र करून देते. इतकी पुस्तके तर वर्षाला ‘चपराक’कडूनच प्रकाशित होत आहेत. हजारोंच्या संख्येने पुस्तके प्रकाशित होत असताना ती वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी दुसरी कुठलीच यंत्रणा दिसत नाही. मराठीतील बहुतांश मासिकेही मरणासन्न अवस्थेत आहेत. त्यांचे दारिद्र्य ना लेखकांना सुखी करू शकते, ना पुस्तकांना!
अशा सर्व परिस्थितीत ‘धंद्यापेक्षा धर्म महत्त्वाचा’ ही आचार्य अत्रे यांची शिकवण ध्यानात ठेवून आम्ही मराठीत नवनवीन प्रयोग सुरू केले. ‘चपराक’सारखे प्रभावी वृत्तसाप्ताहिक, ‘साहित्य चपराक’ हे दर्जेदार मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’च्या माध्यमातून उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित केल्याने अल्पावधितच ‘चपराक’चा इवलासा वेलू  गगनावरी गेला आहे. ‘लाख बोलक्याहूनि थोर, एकचि माझा कर्तबगार’ ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची शिकवण अंगिकारत आम्ही मराठी साहित्य विश्‍वात वेगवेगळे प्रयोग सुरू केले. चतुरस्त्र, परखड, रास्त आणि कर्तव्यदक्ष ही आद्याक्षरे घेऊन संवाद आणि संघर्ष या भूमिकेतून ‘चपराक’ची वाटचाल सुरू आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील लेखकांना ‘चपराक’हे हक्काचे व्यासपीठ वाटते. देशविदेशातील मराठी वाचकांपर्यंत आम्ही प्रभावीपणे पोहोचलो आहोत. अनेक लेखकांची पहिलीच पुस्तके ‘चपराक’ने प्रकाशित केली आणि त्यांच्या आवृत्यामागून आवृत्या निघत आहेत. त्यांची प्रस्थापित लेखकांत गणना केली जात आहे.
मासिकाच्या आणि साप्ताहिकाच्या माध्यमातून वेगवेगळे विषय धाडसाने हाताळल्याने मराठी भाषा, मराठी वाचक जिवंत आहे, हे आम्ही अनेकवेळा कृतीशिलतेतून दाखवून दिले आहे. ‘चपराक’ला सुरूवातीला अनुल्लेखाने डावलणारे अनेक डुढ्ढाचार्य आज ‘चपराक’मध्ये लिहिण्याची संधी मिळावी म्हणून धडपडतात. नव्याजुन्या लेखकांचा सुरेख संगम साधत आम्ही अनेक पुस्तके प्रकाशित केली. त्याचे प्रमाण झपाट्याने वाढल्याने एकाचवेळी अनेक पुस्तके प्रकाशित करण्याचा संकल्प सोडला. ‘चपराक साहित्य महोत्सव’ हा अभिनव उपक्रम त्यासाठी सुरू केला. विविध साहित्य प्रकारातील आणि विविध लेखकांची पुस्तके एकाचवेळी एकाच व्यासपीठावर प्रकाशित केल्याने लेखकांचा उत्साह वाढला. या समूह पुस्तक प्रकाशनामुळे वाचकांनाही सकस साहित्य उपलब्ध झाले.
8 ऑगस्ट 2014 रोजी ‘चपराक’चा पहिला साहित्य महोत्सव पार पडला. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. प्र. चिं. शेजवलकर, सुप्रसिद्ध समीक्षक प्राचार्य डॉ. श्रीपाल सबनीस, महाराष्ट्रातील नामवंत वक्ते आणि लेखक प्रा. मिलिंद जोशी पहिल्या महोत्सवासाठी उपस्थित होते. पुण्यातील श्रमिक पत्रकार भवनात पार पडलेल्या या महोत्सवात एकाचवेळी सहा पुस्तके प्रकाशित झाली. त्यानंतर 11 फेब्रुवारी 2015 रोजी साने गुरूजी स्मारक सभागृहात महाराष्ट्र भूषण श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या अध्यक्षतेखाली ‘चपराक’चा दुसरा साहित्य महोत्सव संपन्न झाला. त्यात तब्बल एक डझन पुस्तके प्रकाशित झाली. सुप्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ, कादंबरीकार उमेश सणस, पत्रकार विनायक लिमये त्यासाठी पाहुणे म्हणून उपस्थित होते. यंदा शनिवार दि. 8 ऑगस्ट 2015 रोजी ‘चपराक’चा तिसरा साहित्य महोत्सव पार पडत असून त्यात 15 पुस्तके प्रकाशित होत आहेत. महाराष्ट्र राज्य भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. सदानंद मोरे हे या साहित्य उत्सवासाठी उपस्थित असणार आहेत.
‘अक्षरम् परम: ब्रह्म, ज्योतिरूपम् सनातनम्’ याप्रमाणे आम्ही अक्षरांनाच परम् ब्रह्म मानून त्यांची पूजा घालत आहोत. मराठी वाचले जात नाही अशी आरोळी देण्याऐवजी, लेखक आणि वाचकांची टवाळखोरी करण्याऐवजी आम्ही मराठीतील सकस आणि दर्जेदार साहित्य आपल्यासमोर घेऊन येत आहोत. वाचक आमच्या या प्रयत्नांचे नेहमीप्रमाणे निश्‍चितच स्वागत करतील. ‘चपराक‘च्या आगामी साहित्य महोत्सवाद्वारेही नवनवीन लेखक पुढे आणण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.
- घनश्याम पाटील 
संपादक, प्रकाशक 'चपराक' पुणे 
७०५७२९२०९२


Tuesday, July 21, 2015

व्यक्तिवर नव्हे तर प्रवृत्तीवर घणाघाती वार म्हणजे ‘झुळूक आणि झळा’

झुळूक आणि झळा/घनश्याम पाटील/चपराक प्रकाशन, पुणे
साप्ताहिक ‘चपराक’चे संपादक आणि प्रकाशक घनश्याम पाटील यांचे ‘दखलपात्र’ नंतरचे दखल घेण्यासारखे अग्रलेखसंग्रहाचे हे दुसरे पुस्तक. ‘चपराक’ साप्ताहिकांमध्ये प्रकाशित झालेल्या अग्रलेखांचा संग्रह!
पाटील हे ‘चपराक’चे संपादक. उत्सुकतेपोटी ‘चपराक’ नावामागचा हेतू विचारला असता त्यांनी पुढीलप्रमाणे त्याचा उलगडा केला. च-चतुरस्र, प- परखड, रा-रास्त, क- कर्तव्यदक्ष! आणि या सार्‍या बाबींचा संगम घनश्याम पाटील यांच्या लेखात पहायला मिळतो.
लेखास अनुसरून अशी समर्थक शीर्षके दिली आहेत. प्रखर विचारांच्या झळा आणि हळूवार भावनांची झुळूक असा दोन्हींचा संगम या संग्रहात पहायला मिळतो. ‘झुळूक आणि झळा’ मध्ये विषयवैविध्य आहे. राजकारण, साहित्य, समाजात आजूबाजूला मन हेलावून टाकणार्‍या घटना, चांगले काम करणार्‍या व्यक्ती यांचा समावेश तर आहेच त्याचबरोबर वारंवार वेगवेगळी विसंगत विधाने करून प्रसिद्धीच्या झोतात राहणार्‍यांचा खरपूस समाचारही घेतला आहे. विविध लेखात आपले विचार सडेतोडपणे मांडले आहेत.
लिखाणात अनेक सुंदर सुंदर वाक्येसुद्धा पेरली आहेत व त्याजोगे सुंदर विचारही देण्याचा प्रयत्न केला आहे. उदा. ‘मराठीच्या समृद्धीसाठी आता विचारवंतांची नव्हे तर कृतीशील कर्मविरांची गरज आहे.’ अतिशय ज्वलंत विषयांवर पोटतिडकीने लिहिताना कुठेही संयम सोडलेला नाही. विचारांचे घणघणाती वार/प्रहार केले आहेत, पण संयमाने. ही अतिशय कौतुकाची बाब आहे.
काही लेखांमध्ये अगदी मिश्किलपणे सुरूवात करून लेखात विचारांच्या प्रखरतेबरोबर रंजकताही आणली आहे. ते वाचताच बोचरे हसू येतेच. ‘हरी नावाचा नरके ’मध्ये आजच्या स्वयंघोषित विचारवंतांचा बुरखा फाडताना लेखक म्हणतात, ‘मित्रांनो तुम्ही म्हणता की दारू सोडणं अवघड आहे, पण ते सत्य नाही. मी माझ्या पन्नास वर्षाच्या आयुष्यात तीस वेळा दारू सोडली आहे.’ तसेच विविध लेखांचे शीर्षक वाचतानाही शब्दसामर्थ्य दिसते. उदा.’हलका निस्तेज पाल’,‘नेमाडेंचा बेगडी नेम‘,‘महिला दिन नव्हे दीनचं‘,‘स्वरूप हरवलेले स्वरूपानंद‘.
 अग्रलेखामध्ये केवळ घणघणाती प्रहार केले आहेत असे नव्हे तर मुलींना प्रेरणादायी सल्लेही देतात. लेखकाच्या शब्दात‘तेजपाल‘ प्रकरणाने पत्रकारितेतील मुलींनी घाबरून न जाता, वरिष्ठांच्या दबावाला बळी न पडता अशा प्रवृत्तीच्या विरुद्ध धाडसाने आवाज उठवावा.
मराठी भाषेची परिस्थिती सध्या ‘माझ्या घरी मी पाहुणी’ अशी झाली आहे. याचे वास्तव वर्णन‘माझ्या मातीचे गायन‘ मध्ये केले असून मराठीच्या अधोगतीला आपणच बहुतांशी जबाबदार आहोत हे सांगून मराठीप्रेमाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे. समाजव्यवस्थेवर भाष्य करताना लेखकाने सुंदर विचार मांडला आहे. ‘मराठीच्या मारेकर्‍यांना मारा’ या अग्रलेखातून शारिरीक आजारातून एकवेळ बरे होता येते मात्र सांस्कृतिक आजार जडला तर समाजव्यवस्था कोलमडते.
 विविध लेखांमध्ये महाभारत आणि रामायणामधले दाखले देवून लेखन प्रभावी केले आहे. समाजात आजूबाजूला घडणार्‍या ताज्या घटनांचा आढावा घेत माळीणसारख्या घटना घडल्यावर गणेशोत्सवात खर्च करण्यापेक्षा त्या पीडीतांना मदत करावी हेही सुचवले आहे. तसेच कर्म हीच पूजा मानणार्‍या किंवा आपल्याला दिले ते काम देवाचेच आहे असे समजून कर्तृत्व करणार्‍या संस्थेला प्रकाशझोतात आणले आहे ते‘ देवाचे काम‘मधून!
 मराठी साहित्य संमेलन आणि इंग्रजी शाळा याबाबत परखडपणे विचार ‘नेमाडेंचा बेगडी नेम‘ मध्ये मांडले आहेत. महाराष्ट्रातल्याच नव्हे तर इतर प्रांतातल्याही वास्तव, दाहक, विदारक वस्तुस्थितीचे चित्रण काही अग्रलेखांद्वारे केले आहे. ‘निवडणूक समाज प्रबोधनाची संधी‘ मध्ये हरियाणातील स्त्री-भृण हत्येचे वास्तव मांडले आहे. तेथे निवडणुकीत उमेदवार मत मागायला आला की मतदार म्हणतात, ‘‘आम्हाला विवाहासाठी मुलगी पाहून द्या, तरच आम्ही तुम्हाला आमचे बहुमुल्य मत देऊ.’’ त्यावर लेखक घनश्याम पाटील म्हणतात, ‘‘उद्या तुम्हाला कोणी जर तुमच्या घरातल्या देव्हार्‍यातील देव किंवा पूर्वजांचे   फोटो विकत मागितले तर ते तुम्ही विकणार का? तो तुमच्या श्रद्धेचा अमूल्य ठेवा आहे. मग मत का विकता? तुमच्या एका मतामुळे परिवर्तन घडणारं आहे.’’
उत्कंठा वाढवणारे, विचार करायला प्रवृत्त करणारे, अंतर्मुख करणारे, मार्ग दाखवणारे, दिशादर्शक लेख... याची नक्कीच दखल घेतली जाते आणि एक लेख वाचून संपला की पुढे नवीन विषय त्याचीही उत्सुकता वाढते... वाचकांना हे अग्रलेख नक्कीच भावतील! घनश्याम पाटील यांच्या पुढील लेखन प्रवासास खूप खूप शुभेच्छा!
- झुळूक आणि झळा
लेखक : घनश्याम पाटील
प्रकाशक : चपराक प्रकाशन (020-24460909)
पाने : 148, मूल्य : 150

सुवर्णा अ. जाधव
9819626647

Monday, July 20, 2015

ही ठिणगी घातक!

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण जाहीर झाल्यानंतर अनेकांना पोटशूळ उठला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे बोलबच्चन नेते जितेंद्र आव्हाड यांनी तर त्यांच्या वाचाळवीरतेचे प्रदर्शन मांडत जातीय तेढ निर्माण होईल, अशी गंभीर विधाने केली आहेत. भाजपाचे देवेंद्र आणि राष्ट्रवादीचे जितेंद्र यांच्यातील कलगीतुर्‍यामुळे महाराष्ट्रातील अनेक प्रश्‍न मात्र तसेच पडून आहेत. राज्यकर्त्यांनी एकमेकांवर चिखलफेक करताना तारतम्य सोडल्याने महत्त्वाचे विषय बाजूला पडून राजकारणाला कसे रंग दिले जातात, हे सध्या महाराष्ट्र अनुभवतो आहे. पंकजा पालवे यांची चिक्की आणि विनोद तावडे यांची पदवी असे मुद्दे काढून सिंचन घोटाळ्यातील सुनिल तटकरे, अजित पवार, महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील छगन भुजबळ यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात सत्ताधारी आणि विरोधक यशस्वी ठरले आहेत.
मागची काही वर्षे सत्तेत असणारे राष्ट्रवादीचे अनेक नेते सत्ता गेल्याने बिथरले आहेत. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण देण्याला त्यांचा विरोध आहे. या विरोधाचे नक्की कारणही त्यांना सांगता येत नाही. बाबासाहेब केवळ ब्राह्मण आहेत म्हणून त्यांच्यावर टीका सुरू आहे. त्यांच्या लेखनाविषयी ओढूनताणून जे आक्षेप घेण्यात आले आहेत त्या सर्व मुद्यांची चिकित्सा यापूर्वी सुप्रसिद्ध साहित्यिक आणि संशोधक संजय सोनवणी यांनी ‘चपराक’मधून केलेली आहेच. असा रीतसर पंचनामा झाल्यानंतर कोणते मुद्दे मांडावेत हे कळत नसल्याने त्यांनी जातीजातीत तेढ निर्माण होईल, असे उद्योग सुरू केले आहेत.
सांगलीत संभाजी ब्रिगेडच्या पुढाकाराने शिवसन्मान परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात बाबासाहेबांना विरोध करताना  मिरज दंगलीचे सूत्रधार संभाजीराव भिडे गुरूजी असल्याचे आव्हाडांनी सांगितले आणि धुमश्‍चक्री माजली. पुरंदरे-भिडे समर्थक आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांत हाणामारी झाली. माध्यमांना चघळायला आणखी एक नवा विषय मिळाला. मराठा आणि ब्राह्मण या समाजातील तेढ वाढावी यासाठी भडकलेल्या आगीत आणखी तेल ओतले गेले.
आज महाराष्ट्राला छत्रपती शिवाजीराजांची ओळख करून दिली ती बाबासाहेब पुरंदरे या ऋषितुल्य माणसाने! त्यांनी शिवचरित्र देशविदेशात पोहोचवले. बाबासाहेबांना विरोध करणार्‍यांच्या वडील आणि आजोबांना वाचनाची थोडीफार आवड असेल, त्यांना शिवाजीराजांविषयी थोडाफार आदर, जिव्हाळा असेल तर त्यांनी नक्कीच बाबासाहेब समजून घेतले असणार! त्यांच्या ‘जाणता राजा’ने कमाल केली. महाराजांचे कार्य त्यांनी तळागाळात पोहोचविले. गड, किल्ले पालथे घालून, अहोरात्र परिश्रम घेऊन त्यांनी जे शिवसाहित्य लिहिले त्याला तोड नाही. त्यांच्या ‘जाणता राजा’च्या कार्याबद्दल ते महाराष्ट्र भूषणला पात्र ठरतात. त्यांचे चरित्र आणि चारित्र्य अफाट आहे. त्यांनी किती पोवाडे लिहिले, किती कादंबर्‍या लिहिल्या, किती व्याख्याने दिली हे सर्व नंतर पाहू! फक्त ‘जाणता राजा’च्या अभूतपूर्व यशाबद्दलही ते महाराष्ट्र भूषणचे मानकरी ठरतात. त्याशिवाय तटस्थपणे बाबासाहेब समजून घेतले आणि त्यांच्या एकंदर कारकिर्दीचा अभ्यास केला तर त्यांना ‘महाराष्ट्र भूषण’ नाही तर ‘भारतरत्न’ द्यायला हवा, असेच कुणालाही वाटेल.
आव्हाडांसारख्या वाचाळवीरांनी सूर्यावर थुंकल्याने सूर्याचे महत्त्व कमी होणार नाही. त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हवा तसा वापर करत हवे तसे वागावे; मात्र हे करताना त्यांनी जातीय तेढ निर्माण करणे आपल्या राज्याला परवडणारे नाही. त्यांचे म्होरके असलेल्या शरद पवारांचा जातीद्वेष सर्वश्रूत आहे. मात्र त्यांनी किमान काही मर्यादा पाळल्या होत्या. जितेंद्र आव्हाड ही त्यांची फार पुढची विकृत आवृत्ती आहे.
आव्हाड हे या राज्यातील एका जबाबदार पक्षाचे नेते आहेत. लोकांनी त्यांना त्यांचा प्रतिनिधी म्हणून निवडून दिले आहे. मात्र द्वेषमूलक भूमिकेतून त्यांचे तरूणांची टाळकी भडकवण्याचे जे राजकारण सुरू आहे ते आपल्यासाठी मारक आहे. विरोधी पक्षात असल्याने सरकारच्या कोणत्याही निर्णयाला विरोध करणे हा त्यांचा अधिकार आहे. मात्र असा विरोध करताना समाजाला त्याची किंमत मोजायला लागू नये. केवळ ब्राह्मणांना ठोकणे म्हणजेच पुरोगामीत्व, या खुळचट कल्पनेने त्यांची आणि त्यांच्या पक्षाची पुरती वाताहत झाली. केंद्रात आणि राज्यात सपाटून मार खावा लागला. मात्र ‘पडलो तरी नाक वर’या मनोवृत्तीच्या या नेत्यांनी सांस्कृतिक महाराष्ट्राला वेठीस धरले आहे.
‘सांगलीत आग लागली आहे, याचा वणवा मंत्रालयातील सहाव्या मजल्यापर्यंत पोहोचवू. ही मशाल राज्यातल्या घरातघरात पोहोचली पाहिजे’ असे प्रतिपादन एका जबाबदार (की बेजबाबदार) आमदाराने केले आहे. जाळणे, मारणे, तोडणे, फोडणे यातच वाकबगार असलेल्या या समदुःखींनी यापूर्वी भांडारकर प्राच्यविद्या संस्था जाळली. जेम्स लेनसारख्या माथेफिरूची गचांडी पकडण्याची, त्याला फरफटत आणत या प्रकरणाचा जाब विचारण्याची क्षमता नसल्याने त्यांनी आपलाच ऐतिहासिक ठेवा नष्ट केला. मंत्रालयापर्यंत आगीचा ‘भडका’ पसरविणे हेही त्यांच्यासाठी नवीन नाही. सत्तर हजार करोडच्या सिंचन घोटाळ्याचे सत्र सूरू असतानाच महाराष्ट्रात मंत्रालयाला लागलेली आग आपण बघितली आहे. देवेंद्र फडणवीस उसण्या आविर्भावात ‘भ्रष्टाचाराविरूद्धचे गाडीभर पुरावे आणू’ असे म्हणत असले तरी मंत्रालयाला आग लागली तेव्हाच महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त झाला आहे. त्यामुळे देवेंद्र आणि जितेंद्र हे दोघेही हवेचे बुडबुडे फोडत आहेत.
कॉंग्रेसच्या भ्रष्ट कारकिर्दीला वैतागलेल्या जनतेने मोठ्या आशेने परिवर्तन घडवले आहे. काही बिनडोक आणि स्वार्थसाधू नेते त्यांचे गुन्हे लपवण्यासाठी महाराष्ट्राला वेगळ्या दिशेने नेत आहेत. यात समाजातील तथाकथीत विचारवंत आणि पत्रकारही हिरीरीने सहभागी होतात. अन्यथा ‘दाभोलकर-पानसरेंचे खून ब्राह्मणांनीच केले’ असे ठाम आरोप करणार्‍या निखिल वागळेसारख्या चिरकुटावर केव्हाच कारवाई झाली असती. जो तपास आपल्या यंत्रणेला जमला नाही त्याबाबतचे निष्कर्ष निखिल वागळे देत आहेत. अनिरूद्ध जोशी आणि वागळे यांच्यातील एक ऑडिओ क्लिप महाराष्ट्रभर फिरली आहे आणि त्याचे वागळे यांनी अजून तरी खंडण केले नाही. असे सारे असतानाही सत्ताधारी शांत राहतात म्हणजे विरोधकांशी त्यांची मिलीभगत असावी अशी शंका घेण्यास मोठा वाव आहे.
जितेंेद्र आव्हाड यांच्यासारख्या फुरफुरत्या घोड्यांना वेळीच आवरले नाही तर महाराष्ट्रातील वातावरण चिघळण्यास वेळ लागणार नाही. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा तगडा आणि ठाम भूमिका घेणारा नेता आज नाही. महाराष्ट्राचे सांस्कृतिक अधःपतन होत असताना त्यांच्यासारख्या धडधडत्या तोफेच्या स्मृती जागवल्या जात आहेत. जातीवादाला खतपाणी घालणार्‍या आव्हाडांच्या ठिणगीवर वेळीच पाणी पडणे हेच आपल्यासाठी हितकारक ठरणारे आहे. 

- घनश्याम पाटील 
संपादक, प्रकाशक 'चपराक' पुणे 
७०५७२९२०९२

Wednesday, July 8, 2015

उर्जादायी भक्तीसोहळा

 
विठोबा, ज्ञानोबा, तुकोबा, शिवबा आणि सह्याद्री हे महाराष्ट्राचे पंचप्राण! मराठी माणसाचे आध्यात्मिक वैभव ठरणारी, सामान्य माणसांत श्रद्धा जागवणारी, त्यांच्यात विश्‍वास निर्माण करणारी आणि भक्तीमार्गातून जगण्याचा आधार ठरणारी पंढरीची वारी वर्षानुवर्षे सुरूच आहे. कोणीही निमंत्रण न देता, ठरलेल्या वेळी, ठरलेल्या मार्गाने, ठराविक ठिकाणी पोहोचणारे वारकरी हे जागतिक व्यवस्थापन तज्ज्ञांसाठी मोठे आश्‍चर्य आहे. ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’चा जयघोष करत आपापल्या दिंड्या घेऊन या आनंदसोहळ्यात, भक्तीसोहळ्यात सहभागी होणारे वारकरी मराठी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत.
ज्ञान आणि भक्ती मार्गाने, एका समान ध्येयाने एकत्र येणारे वारकरी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक प्रवाहाचे पाईक आहेत. विठू माऊलीच्या दर्शनाची आस असलेले असंख्य वारकरी एकत्र येतात आणि आपल्या संतांनी घालून दिलेल्या आदर्श परंपरांचे जतन करतात. वैष्णवांचा हा महामेळावा भक्तीमार्गात तल्लीन झालेला असतो. या काळात त्यांना कोणत्याही विवंचनेचे भान नसते. असंख्य अडचणींना पुरून उरत ते भगवंतप्रेमाची अनुभूती घेतात. आपल्या जीवनमरणाच्या प्रश्‍नांवर मात करण्याची ऊर्जा वारकरी बांधवांत वारीमुळे निर्माण होते.
गावागावातील भाविक वारीला जायचे म्हणून जोरदार तयारी करतात. मे महिन्यातच त्यांची शेतीची मशागत पूर्ण झालेली असते. आषाढी वारीचे वेध लागताच पुढच्या कामांचे त्यांचे नियोजन युद्धपातळीवर सुरू होते. वारीच्या आधी पाऊस अपेक्षित असल्याने त्यादृष्टिने बळीराजाची तयारी सुरू होते. जिथे पाऊस झाला तिथे पेरणी पूर्ण होते. जिथे पावसाने दगा दिला तिथे कुटुंबातील इतर सदस्यांवर, मित्रांवर पेरणीची जबाबदारी सोपवली जाते. कशाचीही पर्वा न करता निश्‍चिंतपणे आणि भक्तीरसात ओतप्रोत न्हालेला वारकरी टाळ, मृदुंग घेऊन दिंडीत सहभागी होतो. सर्वकाही ‘त्याच्या’वर सोपवून तो बिनघोर राहतो.
मानवता धर्माची शिकवण देणार्‍या संतांनी वारीच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या, छोट्या छोट्या गावातील सामान्य माणसांचे संघटन केले. त्यांच्यात जवळीकता साधावी, स्नेहभावना निर्माण व्हावी, धर्म आणि आध्यात्माच्या माध्यमातून श्रद्धा बळकट व्हाव्यात यासाठीचे स्फुल्लींग चेतवले. जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या घराण्यात त्यांच्या आठ पिढ्या आधीपासून म्हणजे विश्‍वंभरबाबांपासून वारीची परंपरा होती, असे सांगितले जाते. तुकोबारांयाचे वडील बोल्होबा यांनी चाळीस वर्षे पंढरीची वारी केल्याचे संत महिपतीबाबा महाराज ताहाराबादकर सांगतात. ‘चाळीस वर्षे ते भवसरी, केली पंढरीची वारी’ अशी नोंद त्यांनी केली आहे. मुघलांची नोकरी झुगारून देत 252 संतांची काव्यात्मक चरित्रे लिहिणार्‍या महिपतींनी वारीचे महत्त्व चांगल्या प्रकारे उलगडून दाखवले आहे. तुकाराम महाराजांनी वैकुंठाला जाईपर्यंत कधी वारी चुकवली नाही. नित्यनेमाने वारीला जाणे आणि कीर्तनसेवा पार पाडणे हे त्यांचे व्रत होते. महाराष्ट्रातील तमाम मराठी भाविकांनी हा वारसा जपला आहे. वर्षानुवर्षे वारीला जाणारे भाविक म्हणूनच अनेकांना प्रेरणा देतात. चालताही न येणारे जख्खड लोक किंवा गंभीर आजाराशी सामना करणारे वारकरी सुद्धा कशाचीही पर्वा न करता भक्तीची पताका आपल्या खांद्यावर डौलाने आणि अभिमानाने फडकावतात.
महाराष्ट्राच्या आणि इतर राज्याच्या गावागावातून येणार्‍या पालख्या आळंदीत एकत्र येतात आणि भक्तीचा पूर वाहू लागतो. साधारण वीस दिवस घर सोडून, शेतीच्या कामाचे नियोजन करून, आवश्यक ती सामुग्री सोबत घेऊन वारकरी या लोकप्रवाहात सहभागी होतात. संसार आणि व्यवहार यातील कोणतेही प्रश्‍न उपस्थित न करता केवळ विठ्ठलाच्या भक्तीची, त्याच्या दर्शनाची भूक भागवण्यासाठी इतकी खटाटोप करणारे, आपल्या भक्तीरसाचे जाज्ज्वल्य दर्शन घडवणारे वारकरी आणि त्यांची दिंडी, त्यांची वारी हे जगातील एक विरळ उदाहरण आहे. हे चैतन्य, हा उत्साह, ही भक्ती, हा त्याग आणि समर्पणाची भावना हेच तर आपले सांस्कृतिक संचित आहे.
पालखी मार्गावर गावागावात वारकर्‍यांचे जल्लोषात स्वागत केले जाते. अन्नदान, कपडे वाटप, फळवाटप, पाणी इथपासून ते त्यांचे हातपाय दाबून देण्यापर्यंत, डोक्याचे केस कापण्यापर्यंतची सेवा केली जाते. माणसामाणसातील अतूट स्नेहाचे, सेवेचे हे मूर्तीमंत उदाहरणच. गणेश मंडळांचे कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते, सामान्य नागरिक  आपापल्या परीने यात खारीचा वाटा उचलतात.
दिंडी मार्गातील लाखोंच्या समुदायामुळे वाहतुकीस येणारे अडथळे, त्यांनी केलेली अस्वच्छता यामुळे काही अपवादात्मक लोक त्यांना दूषणे लावतात. मात्र लाखो लोकांच्या मनात श्रद्धेचे बीज पेरणारी, त्यांना निखळ आनंद देणारी, त्यांचे आयुष्य समृद्ध करणारी, त्यांच्यात संस्कार, भक्तीचे, त्यागाचे, सेवेचे बीज पेरणारी वारी एकमेवाद्वितीय आहे. संत गाडगेबाबा वारीच्या काळात पंढरपुरास जाऊन, हाती खराटा घेऊन स्वच्छता करायचे, चंद्रभागेतील प्रदूषण थांबवायचे हा इतिहास आहे. शिक्षण आणि तंत्रज्ञान आता गावागावात पोहोचलेय. वारकर्‍यांच्या हातात आता मोबाईल, लॅपटॉप आलाय. जगातील ज्ञानाची कवाडे त्याच्यासाठी सताड उघडी आहेत. या विज्ञानयुगातही तो वारीसारख्या भक्तीसोहळ्यात मात्र आनंदाने सहभागी होतोय हे फार महत्त्वाचे आणि दुर्मिळ उदाहरण आहे. या वारकर्‍यांनी आता सामाजिक भान ठेऊन, पर्यावरणाचा विचार करून वागायला हवे. स्वच्छतेच्या दृष्टिने शक्य तितकी काळजी घेतली पाहिजे. आपल्यामुळे पर्यावरणाचा र्‍हास होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. तसे झाले तर अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाचा लौकीक आणखी वाढेल.
नामदेव, तुकाराम, एकनाथांसह सर्व संतांचे अभंग आणि माऊलींच्या ज्ञानेश्‍वरीची एकनएक ओवी शाश्‍वत आहे. त्यातून कसे जगावे आणि कशासाठी जगावे याचे आत्मभान लाभते. विठ्ठल हा गरिबाचा देव आहे. तिरूपती, शिर्डी असे देवस्थानांचे जे आर्थिक प्रवाह आहेत त्यात अजूनतरी पंढरपूरचा समावेश नाही. इथे कसला प्रांतवाद नाही, जातीवाद नाही.. इथे फक्त भक्तीचा मळा फुलतो. याचे पावित्र्य जपणे, ते वृद्धिंगत करणे हे आपल्याच हातात आहे.
- घनश्याम पाटील 

संपादक, प्रकाशक 'चपराक' पुणे 
७०५७२९२०९२