Wednesday, July 8, 2015

उर्जादायी भक्तीसोहळा

 
विठोबा, ज्ञानोबा, तुकोबा, शिवबा आणि सह्याद्री हे महाराष्ट्राचे पंचप्राण! मराठी माणसाचे आध्यात्मिक वैभव ठरणारी, सामान्य माणसांत श्रद्धा जागवणारी, त्यांच्यात विश्‍वास निर्माण करणारी आणि भक्तीमार्गातून जगण्याचा आधार ठरणारी पंढरीची वारी वर्षानुवर्षे सुरूच आहे. कोणीही निमंत्रण न देता, ठरलेल्या वेळी, ठरलेल्या मार्गाने, ठराविक ठिकाणी पोहोचणारे वारकरी हे जागतिक व्यवस्थापन तज्ज्ञांसाठी मोठे आश्‍चर्य आहे. ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’चा जयघोष करत आपापल्या दिंड्या घेऊन या आनंदसोहळ्यात, भक्तीसोहळ्यात सहभागी होणारे वारकरी मराठी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत.
ज्ञान आणि भक्ती मार्गाने, एका समान ध्येयाने एकत्र येणारे वारकरी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक प्रवाहाचे पाईक आहेत. विठू माऊलीच्या दर्शनाची आस असलेले असंख्य वारकरी एकत्र येतात आणि आपल्या संतांनी घालून दिलेल्या आदर्श परंपरांचे जतन करतात. वैष्णवांचा हा महामेळावा भक्तीमार्गात तल्लीन झालेला असतो. या काळात त्यांना कोणत्याही विवंचनेचे भान नसते. असंख्य अडचणींना पुरून उरत ते भगवंतप्रेमाची अनुभूती घेतात. आपल्या जीवनमरणाच्या प्रश्‍नांवर मात करण्याची ऊर्जा वारकरी बांधवांत वारीमुळे निर्माण होते.
गावागावातील भाविक वारीला जायचे म्हणून जोरदार तयारी करतात. मे महिन्यातच त्यांची शेतीची मशागत पूर्ण झालेली असते. आषाढी वारीचे वेध लागताच पुढच्या कामांचे त्यांचे नियोजन युद्धपातळीवर सुरू होते. वारीच्या आधी पाऊस अपेक्षित असल्याने त्यादृष्टिने बळीराजाची तयारी सुरू होते. जिथे पाऊस झाला तिथे पेरणी पूर्ण होते. जिथे पावसाने दगा दिला तिथे कुटुंबातील इतर सदस्यांवर, मित्रांवर पेरणीची जबाबदारी सोपवली जाते. कशाचीही पर्वा न करता निश्‍चिंतपणे आणि भक्तीरसात ओतप्रोत न्हालेला वारकरी टाळ, मृदुंग घेऊन दिंडीत सहभागी होतो. सर्वकाही ‘त्याच्या’वर सोपवून तो बिनघोर राहतो.
मानवता धर्माची शिकवण देणार्‍या संतांनी वारीच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या, छोट्या छोट्या गावातील सामान्य माणसांचे संघटन केले. त्यांच्यात जवळीकता साधावी, स्नेहभावना निर्माण व्हावी, धर्म आणि आध्यात्माच्या माध्यमातून श्रद्धा बळकट व्हाव्यात यासाठीचे स्फुल्लींग चेतवले. जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या घराण्यात त्यांच्या आठ पिढ्या आधीपासून म्हणजे विश्‍वंभरबाबांपासून वारीची परंपरा होती, असे सांगितले जाते. तुकोबारांयाचे वडील बोल्होबा यांनी चाळीस वर्षे पंढरीची वारी केल्याचे संत महिपतीबाबा महाराज ताहाराबादकर सांगतात. ‘चाळीस वर्षे ते भवसरी, केली पंढरीची वारी’ अशी नोंद त्यांनी केली आहे. मुघलांची नोकरी झुगारून देत 252 संतांची काव्यात्मक चरित्रे लिहिणार्‍या महिपतींनी वारीचे महत्त्व चांगल्या प्रकारे उलगडून दाखवले आहे. तुकाराम महाराजांनी वैकुंठाला जाईपर्यंत कधी वारी चुकवली नाही. नित्यनेमाने वारीला जाणे आणि कीर्तनसेवा पार पाडणे हे त्यांचे व्रत होते. महाराष्ट्रातील तमाम मराठी भाविकांनी हा वारसा जपला आहे. वर्षानुवर्षे वारीला जाणारे भाविक म्हणूनच अनेकांना प्रेरणा देतात. चालताही न येणारे जख्खड लोक किंवा गंभीर आजाराशी सामना करणारे वारकरी सुद्धा कशाचीही पर्वा न करता भक्तीची पताका आपल्या खांद्यावर डौलाने आणि अभिमानाने फडकावतात.
महाराष्ट्राच्या आणि इतर राज्याच्या गावागावातून येणार्‍या पालख्या आळंदीत एकत्र येतात आणि भक्तीचा पूर वाहू लागतो. साधारण वीस दिवस घर सोडून, शेतीच्या कामाचे नियोजन करून, आवश्यक ती सामुग्री सोबत घेऊन वारकरी या लोकप्रवाहात सहभागी होतात. संसार आणि व्यवहार यातील कोणतेही प्रश्‍न उपस्थित न करता केवळ विठ्ठलाच्या भक्तीची, त्याच्या दर्शनाची भूक भागवण्यासाठी इतकी खटाटोप करणारे, आपल्या भक्तीरसाचे जाज्ज्वल्य दर्शन घडवणारे वारकरी आणि त्यांची दिंडी, त्यांची वारी हे जगातील एक विरळ उदाहरण आहे. हे चैतन्य, हा उत्साह, ही भक्ती, हा त्याग आणि समर्पणाची भावना हेच तर आपले सांस्कृतिक संचित आहे.
पालखी मार्गावर गावागावात वारकर्‍यांचे जल्लोषात स्वागत केले जाते. अन्नदान, कपडे वाटप, फळवाटप, पाणी इथपासून ते त्यांचे हातपाय दाबून देण्यापर्यंत, डोक्याचे केस कापण्यापर्यंतची सेवा केली जाते. माणसामाणसातील अतूट स्नेहाचे, सेवेचे हे मूर्तीमंत उदाहरणच. गणेश मंडळांचे कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते, सामान्य नागरिक  आपापल्या परीने यात खारीचा वाटा उचलतात.
दिंडी मार्गातील लाखोंच्या समुदायामुळे वाहतुकीस येणारे अडथळे, त्यांनी केलेली अस्वच्छता यामुळे काही अपवादात्मक लोक त्यांना दूषणे लावतात. मात्र लाखो लोकांच्या मनात श्रद्धेचे बीज पेरणारी, त्यांना निखळ आनंद देणारी, त्यांचे आयुष्य समृद्ध करणारी, त्यांच्यात संस्कार, भक्तीचे, त्यागाचे, सेवेचे बीज पेरणारी वारी एकमेवाद्वितीय आहे. संत गाडगेबाबा वारीच्या काळात पंढरपुरास जाऊन, हाती खराटा घेऊन स्वच्छता करायचे, चंद्रभागेतील प्रदूषण थांबवायचे हा इतिहास आहे. शिक्षण आणि तंत्रज्ञान आता गावागावात पोहोचलेय. वारकर्‍यांच्या हातात आता मोबाईल, लॅपटॉप आलाय. जगातील ज्ञानाची कवाडे त्याच्यासाठी सताड उघडी आहेत. या विज्ञानयुगातही तो वारीसारख्या भक्तीसोहळ्यात मात्र आनंदाने सहभागी होतोय हे फार महत्त्वाचे आणि दुर्मिळ उदाहरण आहे. या वारकर्‍यांनी आता सामाजिक भान ठेऊन, पर्यावरणाचा विचार करून वागायला हवे. स्वच्छतेच्या दृष्टिने शक्य तितकी काळजी घेतली पाहिजे. आपल्यामुळे पर्यावरणाचा र्‍हास होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. तसे झाले तर अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाचा लौकीक आणखी वाढेल.
नामदेव, तुकाराम, एकनाथांसह सर्व संतांचे अभंग आणि माऊलींच्या ज्ञानेश्‍वरीची एकनएक ओवी शाश्‍वत आहे. त्यातून कसे जगावे आणि कशासाठी जगावे याचे आत्मभान लाभते. विठ्ठल हा गरिबाचा देव आहे. तिरूपती, शिर्डी असे देवस्थानांचे जे आर्थिक प्रवाह आहेत त्यात अजूनतरी पंढरपूरचा समावेश नाही. इथे कसला प्रांतवाद नाही, जातीवाद नाही.. इथे फक्त भक्तीचा मळा फुलतो. याचे पावित्र्य जपणे, ते वृद्धिंगत करणे हे आपल्याच हातात आहे.
- घनश्याम पाटील 

संपादक, प्रकाशक 'चपराक' पुणे 
७०५७२९२०९२


No comments:

Post a Comment