Sunday, July 5, 2015

तपोभूमी नाशिक

‘चपराक प्रकाशन’तर्फे युवा पत्रकार रमेश पडवळ लिखित ‘तपोभूमी नाशिक’ या पुस्तकाचे लोकार्पण गुरूवार, दि. 9 जुलै 2015 रोजी नाशिक येथे समारंभपूर्वक होत आहे. नाशिक शहर आणि जिल्ह्याचा सर्वांगिण आढावा या पुस्तकात घेतला आहे. अतिशय अभ्यासपूर्वक, साध्यासोप्या भाषेत पडवळ यांनी या पुस्तकाची मांडणी केली आहे. ‘चपराक’चे हे 66 वे पुस्तक आहे. त्यासाठी मी लिहिलेली प्रस्तावना.
- घनश्याम पाटील, संपादक ‘चपराक’



मर्यादापुरूषोत्तम प्रभू श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेले नाशिक हे शहर म्हणजे हिंदू धर्माचा बालेकिल्ला. या शहराला मोठी परंपरा आहे. अनेक ऋषिमुनी, साधुसंत, महंत, राजेमहाराजे यांनी या भूमित विजयाच्या गुढ्या उभारल्या  आणि ही तपोभूमी ठरली. शौर्य आणि विद्वत्तेचा, आध्यात्माचा, कलाकौशल्याचा, राजकारणाचा मानदंड ठरणार्‍या या शहराचा आरसा नाशिक येथील युवा पत्रकार रमेश पडवळ यांनी वाचकांसमोर धरला आहे. या आरशात दिसणारा लख्ख चेहरा नाशिकच्या पुढच्या वाटचालीसाठी मोलाचा ठरणारा आहे. इतिहासाची माहिती देताना, वर्तमान अचूकपणे टिपताना पडवळ यांनी नाशिकची भविष्यातली वाटचाल कशी असावी, हेही डोळसपणे सुचवले आहे. एका शहराचे मूल्यमापन करताना इथल्या संस्कृतीचा, लोकजीवनाचा, प्रथापरंपरांचा, विविध क्षेत्रातील घटनांचा तटस्थपणे मागोवा घेताना पडवळ यांची लेखणी गौरवास पात्र ठरली आहे. एका धडपड्या पत्रकाराने या शहराची दिशा आणि दशा लेखणीद्वारे मांडण्यात मोठा वाटा उचलला आहे, याबद्दल प्रथम त्यांचे अभिनंदन करतो.
पंधरा प्रकरणामधून पडवळ यांनी नाशिक शहर आणि जिल्ह्याचा उलगडा केला आहे. श्रद्धेचा सोहळा असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे नाशिकची ‘साधुग्राम’ अशी वेगळी ओळख आहे. हे इतके साधू या मेळ्यात करतात तरी काय? असा प्रश्‍न अनेकांना पडत असेल! तर यात साधुंचे विचारमंथन होते, प्रत्येक आखाड्यात तत्त्वज्ञान, संख्याशास्त्रज्ञ, अध्यात्म आणि धर्म या शाखांचे अभ्यासक असतात, हे पडवळांनी मांडले आहे. संस्कृती, संस्कार, भक्ती, प्रार्थना, जगण्याच्या पद्धती, सेवाव्रत यावर सखोल  चर्चा होत असल्याचे  सत्य त्यांनी सांगितले आहे. अनेक साधू मात्र याठिकाणी ‘नको ते’ उद्योग करतात, गोदावरीचे पावित्र्य धोक्यात आणतात याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. पर्यावरणाबाबत दक्ष असलेल्या लेखकाने हे पुस्तक ‘गोदामाईच्या स्वच्छतेसाठी श्रमणार्‍या हातांना’ अर्पण करून त्याबाबतचे गांभीर्य दाखवून दिले आहे. त्यामुळे इथे येणार्‍या साधुंनीही याबाबत भान बाळगून गोदावरीच्या स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे. योग्य यंत्रणेकडून त्याबाबत त्यांचे प्रबोधन झाले पाहिजे.
सिंहस्थातील विविध आखाडे, त्यांच्या निर्मितीचा इतिहास, त्यांचे कार्य, परंपरा, विधी याचा प्रगल्भ अभ्यास या ग्रंथात दिसून येतो. आध्यात्मिक वारसा जपण्याबरोबरच ‘धार्मिक अर्थशास्त्र प्रवाहीत करणारे शहर’ अशी नाशिकची नवी ओळख झाल्याचा निष्कर्ष पडवळ काढतात. मात्र तरीही हा सोहळा केवळ ‘संधीसाधुंचा’ आहे हे त्यांना मान्य नाही. नाशिक ही महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील एक प्रमुख पावनभूमी असल्याचे भान त्यांना आहे. म्हणूनच या शहराविषयी वाटणारी सार्थकता आणि अभिमानाची ओतप्रोत भावना त्यांच्या शब्दाशब्दातून दिसून येते. नाशिकच्या कला, साहित्य आणि संस्कृतीचा समृद्ध आणि वैभवशाली आलेख मांडण्यात रमेश पडवळ यशस्वी ठरले आहेत. नाशिकमध्ये ज्ञानोपासनेचे केंद्र होण्याची क्षमता असल्याचे मार्केंडेय ऋषिंनी म्हटले होते. ही क्षमता सिद्धीस येऊ लागल्याचे पडवळ सप्रमाण दाखवून देतात.
शरीरापासून आत्मा आणि गाडीपासून इंजिन जसे वेगळे करता येत नाही, तसेच नाशिकपासून मंदिरे वेगळी करता येत नाहीत. ‘मंदिरांचे शहर’ अशी नाशिकची ओळख सर्वश्रुत आहे. प्राचीन काळापासूनचे मंदिरांचे दाखले देताना पडवळ त्याचे बारकावे समजावून सांगतात, त्यांची सविस्तर माहिती देतात. औरंगजेबासारख्या जुलमी क्रुरकर्त्याने त्याकाळी नाशिकमधील पंचवीस मंदिरे पाडली होती. मात्र तरीही आज विविध मंदिरे हीच नाशिकची आभूषणे आहेत. रामाबरोबरच इथे रावणाचे आणि भारतातील एकमेव असणारे छत्रपती शिवरायांचेही मंदिर आहे. नाशिकमधील ही मंदिरे, त्यांच्या आवारातील कुंडे यांचे जिवंत चित्र वाचकांच्या डोळ्यांसमोर पडवळांनी उभे केले आहे. सध्याच्या विज्ञानयुगात मंदिरांचे काय काम? असा प्रश्‍न काहीजण उपस्थित करतात. मात्र आजही देव, धर्म यामुळे लोकांचे संघटन होते, त्यांच्यात जवळीकता आणि स्नेहभाव साधला जातो, त्यांच्या अढळ श्रद्धा विविध संकटातून बाहेर पडण्यासाठी त्यांना बळ देतात, यानिमित्ताने पर्यटन होते आणि आपला समृद्ध वारसा जपला, जोपासला जातो हे ध्यानात घ्यायला हवे.
हे पुस्तक म्हणजे नाशिकचा फक्त आध्यात्मिक वारसा सांगणारे नाही. या शहराच्या प्रत्येक शाखांचे, प्रत्येक मूळांचे दर्शन पडवळ यांनी समर्थपणे घडवले आहे. नाशिकच्या जडणघडणीतील पेशव्यांचे योगदान, 1783 नंतरचे होळकरांचे प्रस्थ, त्यांनी चांदवड येथे नाणी पाडणारी सुरू केलेली टाकसाळ हे सर्व वाचताना जसे प्रत्येक नाशिककराला अभिमान वाटेल तसाच तो महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी बांधवासही वाटेल. ‘शिवशाहीपासून पेशवाईपर्यंतचा काळ म्हणजे नाशिकच्या जीवनातील चैतन्याने नटलेले सोनेरी पान. पेशवाईच्या अस्ताबरोबरच नाशिकचा स्वातंत्र्यसूर्यही अस्तास गेला’ हे पडवळ यांचे निरीक्षण आजच्या राज्यकर्त्यांनी विचारात घ्यायला हवे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘स्मार्ट सिटी’ आणि ‘गंगा विकासा’ची मोहिम राबवत असताना नाशिककरांना मात्र या शहराच्या सामर्थ्याचा विसर पडला आहे की काय, असे आपसूक वाटते. सर्वच राजकीय पक्ष गोदाविकासाचा नारा देत असताना, इतका समृद्ध आणि सशक्त वारसा असताना सामान्य नाशिककरांना मात्र विकासाच्या वांझोट्या स्वप्नरंजनात रमावे लागते.
असे असले तरी नाशिक ही शूरांची भूमी आहे. सशस्त्र क्रांतीची मशाल या शहरात कायम धगधगत राहिली. प्रभू श्रीरामापासून ते स्वातंत्र्यवीर श्री श्री श्री विनायक दामोदर सावरकर यांच्यापर्यंत जुलमी साम्राज्य उलथवून लावण्याचे महत्कार्य या नगरीने केले असल्याची जाणीव लेखकाला आहे. त्यामुळे तो या व्यवस्थेवर भाष्य करत नाही. जे आहे ते मात्र ठामपणे आणि प्रामाणिकपणे दाखवून देतो. आपल्या सामर्थ्याची जाणीव करून देण्याचे, समाजमनाला दृष्टी देण्याचे, त्यांच्या डोळ्यांसमोरील जळमटं पुसण्याचे कार्य मात्र रमेश पडवळ या हरहुन्नरी पत्रकाराने केले आहे.
नाशिकमध्ये ज्या घटना घडल्या त्याचे पडसाद सर्वदूर उमटले. राज्याला आणि देशाला विशिष्ट दिशा देण्याचे महत्कार्य या भूूमीने केले. त्याचे अनेक दाखले या पुस्तकात आढळून येतात. गंगापूर रस्त्यावरील मल्हार खाणीत पोहताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीव गेला असता, मात्र कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी त्यांना प्रयत्नांची शिकस्त करून वाचवले. दादासाहेबांनी महाडपासून ते काळाराम मंदिर प्रवेशापर्यंतच्या प्रत्येक सत्याग्रहात ठिणगीचे काम केले. अस्पृश्यता निर्मूलन लढ्यातील त्यांच्या कार्याची दखल घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांना प्रोत्साहित केले. ही घटना आजही अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. असायला हवी. ‘भावड्या किसन महार’ ही ओळख पुसून ‘भाऊराव कृष्णराव गायकवाड’ असे गौरवांकित झालेले दादासाहेब हे महाडचे पहिले सत्याग्रही आहेत.
या पुस्तकात नाशिकमधील स्थळांची, व्यक्तिंची माहिती मिळते तशीच प्रमुख घटनांचीही उजळणी होते. दुसर्‍या परिषदेत ‘चवदार तळ्याचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने सत्याग्रह तहकूब करावा’ असा ठराव डॉ. आंबेडकरांनी मांडला. मात्र दादासाहेबांचा निर्धार ठाम होता. त्यांनी कोणत्याही परिस्थितीत माघार घ्यायची नाही असे ठरवले आणि सत्याग्रह सुरू ठेवला. त्यासाठी डॉ. आंबेडकरांनी मतदान घेण्याचा आग्रह धरला. तो मान्य करत मतदान घेण्यात आले. त्यात दादासाहेबांनी बाजी मारल्याने आंबेडकरांपुढे पर्याय राहिला नाही.
1931 साली स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदुंना बजावले, ‘‘अस्पृश्य हे तुमचे बंधू आहेत. आपण सारे एकाच धर्मात जन्म घेतलेले लोक आहोत. तेव्हा त्यांना आता मंदिरात घेतल्याशिवाय तुम्हाला तरणोपाय नाही.’’ हिंदू महासभेच्या डॉ. कृष्णराव मुंजे यांनीही पत्र लिहून दादासाहेबांना पाठिंबा दर्शविला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी मंदिर प्रवेशासाठी उपोषणाची तयारी केली होती. यावेळी उसळलेल्या दंगलीत एका वृद्धाला वाचवताना तेव्हा विद्यार्थी दशेत असलेले कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जखमी झाले होते.
13 ऑक्टोबर 1935 रोजी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या सल्ल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी येवला परिषद बोलवली. यावेळी ते म्हणाले होते, ‘‘अस्पृश्य जातीत जन्मलो हा माझा अपराध नाही पण मरताना मात्र मी हिंदू म्हणून मरणार नाही.’’ त्यानंतर तब्बल 21 वर्षानंतर म्हणजे 14 ऑक्टोबर 1956 साली बाबासाहेबांनी नागपूरात बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. त्यांच्या या ऐतिहासिक निर्णयाचे बीज नाशिकमध्ये, येवल्यात रोवले गेले होते. म्हणूनच नाशिकने बौद्ध धर्माला नव्याने जन्म दिल्याचे वास्तव लेखक रमेश पडवळ अधोरेखित करतात. ते स्वीकारणे सांस्कृतिक परिभाषेत अपरिहार्य ठरते.
यातील एक काळीकुट्ट बाजू म्हणजे नाशिकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या खूनाचाही कट करण्यात आला होता. बाबाराव सावरकर यांनी डॉ. कुर्तकोटी शंकराचार्य यांना सांगितले होते की, ‘‘बाबासाहेबांचा आचारी माझ्या ओळखीचा आहे. त्याच्यासाठी पाचशे रूपये दिले तर तो त्यांच्या जेवणात विष कालवून त्यांना ठार मारेन.’’ मात्र डॉ. कुर्तकोटी शंकराचार्य यांनी बाबारावांना तिथल्या तिथे झापडत विचारले की, ‘‘तुम्ही असा विचार तरी कसा करू शकता? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी माझ्या मनात आदरभावना आहे. त्यांचे कार्य मोठेच आहे. त्यांना मारणे हा मोठा अविचार आणि कधीही भरून न येणारे नुकसान ठरेल.’’ शंकराचार्यांनी बाबारावांचा हा कट सहजी उधळून लावल्याने मोठा अनर्थ टळला.
या सर्व घटनांची सुयोग्य मांडणी करून पडवळ म्हणतात, ‘‘पुढे अस्पृश्यांना मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह करावाच लागला नाही कारण हा काळाराम आणि त्याचा हिंदू धर्मच दलितांनी नाकारला...’’
या ग्रंथात नाशिक शहरातील अनेक महत्त्वपूर्ण घटनांचा, प्रसंगांचा उहापोह करण्यात आला आहे. या शहराची महत्ती समजून घेण्यासाठी त्या मुळातून वाचणे गरजेचे आहे. 1952 साली कॉंग्रेसचे 56 वे अधिवेशन नाशिकच्या गांधी मैदानात झाले. त्यावेळी संत गाडगेबाबांनी स्वतःच्या हातात खराटा घेऊन संपूर्ण मैदान झाडून काढले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्याने आता यापुढे जनतेवर अन्याय होणार नाही, त्यांना मुक्तपणे, निर्भयपणे जगता येईल असा उदात्त दृष्टिकोन गाडगेबाबांचा होता. त्याचचेळी नाशिकात झालेल्या एका कीर्तनात त्यांनी सांगितले होते की, ‘‘माणसानं माणसाला कमी लेखावं यासारखा दुसरा अधर्म नाही...’’
इ. स. पूर्व पहिल्या शतकात पहिले स्वातंत्र्यसमर लढणारा गौतमीपुत्र सातकर्णी ते स्वातंत्र्यवीर सावरकरांपर्यंतच्या अनेक जाज्वल्य घडामोडींचा योग्य परामर्ष रमेश पडवळ यांनी घेतला आहे. त्यामुळेच हे पुस्तक केवळ धार्मिक, आध्यात्मिक आणि ऐतिहासिक ठरत नाही तर आपल्याला आपल्या वैभवाची साक्ष पटवून देते. कृतज्ञता हाही नाशिककरांचा मोठा गुण आहे. आजारपणात काही काळ वास्तव्य केलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या आठवणी चिरंतन जपण्यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ प्रभावीपणे कार्यरत आहे.
नाशिक शहराबरोबरच नाशिक जिल्ह्याचीही उचित दखल पडवळ यांनी घेतली आहे. येथील आदिवासी परंपरांपासून प्रत्येकाचा ‘आंखों देखा हाल’ त्यांनी अभ्यासपूर्वक मांडला आहे. नाशिक व जिल्ह्यातील लेण्या, नाशिकमधील स्वातंत्र्यसंग्राम, लोकपरंपरा, प्रतिभावंत, संस्कृतीचे पदर, पर्यटन या सर्व दृष्टीने हे पुस्तक परिपूर्ण ठरले आहे. ह्युएनस्तंगची नाशिक भेटही रमेश पडवळांनी जिवंत करून ठेवली आहे. पत्रकारितेच्या निमित्ताने नाशिकात गेलेले पडवळ कधीचेच नाशिककर बनले आहेत. फिरस्ती वृत्ती आणि चिकित्सक  स्वभाव, हाती घेतलेले कार्य तडीस नेण्याची हातोटी, माणसे जोडण्याचे असलेले कसब यामुळे त्यांनी नाशिकचा धांडोळा चांगल्याप्रकारे घेतला आहे. यापुढे नाशिकविषयी कुणालाही आणि कसलीही माहिती हवी असेल तर या पुस्तकाशिवाय ते केवळ अशक्य होणार आहे. सामान्य वाचकांबरोबरच राजकीय नेत्यांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी हे पुस्तक मोलाचे ठरणारे आहे. विद्यापीठाने हे पुस्तक संदर्भासाठी म्हणून वापरावे, अभ्यासक्रमाला लावावे आणि अनेकांनी त्यावर पीएचडी करावी इतक्या क्षमतेचे नक्कीच झालेले आहे. लेखक म्हणून पडवळ यांचे आणि हे पुस्तक लिहावे यासाठी त्यांना प्रवृत्त करणारे सार्वजनिक वाचनालय नाशिकचे आप्पा पोळ या दोघांचेही अभिनंदन! ग्रंथालय चळवळीतील व्यक्तिंनी तरूणांना अभ्यासाची, लेखनाची दिशा दिल्यास काय घडू शकते ह्याचे हे प्रतिक आहे.
नाशिकविषयीची इतकी दुर्मिळ माहिती वाचताना वाचक भारावून जातील. या देवभूमीची, तपोभूमीची ओढ प्रत्येकाला लागेल. काहीजण आपापल्या शहराचा, गावाचा अभ्यास सुरू करतील. हेच या पुस्तकाचे आणि रमेश पडवळ यांच्या कष्टाचे सार्थक ठरणार आहे. आपल्या पहिल्याच पुस्तकातून मोठे शिवधनुष्य पेलणार्‍या पडवळ यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीस ‘चपराक’ परिवाराच्या शुभेच्छा!
- घनश्याम पाटील
संपादक आणि प्रकाशक, ‘चपराक’, पुणे
7057292092


No comments:

Post a Comment