Monday, July 27, 2015

अक्षरम् परम: ब्रह्म...!

‘वाचाल तर वाचाल’ किंवा ‘पुस्तक हेच मस्तक’ अशा म्हणी आपण बालपणापासून ऐकत आलोय. शेतकरी, कष्टकरी किंवा श्रमिक यांच्या आयुष्यावर प्रचंड प्रमाणात साहित्य लिहिले जाते. मात्र त्याचा त्यांना स्वत:च्या विकासासाठी काय फायदा होतो असाही एक मतप्रवाह आहे. वाचून जर क्रांती झाली असती तर गीता, कुराण, बायबल वाचून लोक सुधारले नसते काय? रामायण, महाभारतापासून त्यांनी काही बोध घेतला नसता काय? असाही प्रश्‍न उपस्थित केला जातो. दरवर्षी सर्व भारतीय भाषात हजारो पुस्तके प्रकाशित होतात. ही पुस्तके वाचणार्‍यांचे नक्की भवितव्य काय? शालेय-महाविद्यालयीन आणि आपापल्या क्षेत्रातील अभ्यासाशिवाय मुले, तरूण काय वाचतात आणि त्यांना त्यांच्या जीवनात या वाचनाचा काही उपयोग होतो काय?
‘ज्या दिवशी देवळाकडे जाणारी पाऊले ग्रंथालयाकडे वळतील त्यादिवशी समाजाची योग्य दिशेने वाटचाल सुरू झाली असे म्हणता येईल,’ असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले. ‘कोणत्याही देशातील तरूणांच्या ओठावर कोणती गाणी आहेत ते मला सांगा म्हणजे मी त्या देशाचे भवितव्य सांगतो,’ असे स्वामी विवेकानंद सांगायचे. म्हणजे समाज काय वाचतो, त्या समाजातील विचारवंत काय बोलतात, काय लिहितात हे पाहणे सामाजिक आरोग्याच्या दृष्टिने महत्त्वाचे असते.
‘शब्द हे शस्त्र आहेत, त्यामुळे ते जपून वापरावेत’ अशी शिकवण आपल्याला कायम देण्यात येते. हे शस्त्र तयार करण्याचे कारखाने मात्र पुरेसे ताकतीने धडधडत नाहीत. हे शस्त्र चालवावे कसे याचेही ज्ञान आजच्या तरूणाईला दिले जात नाही. त्यामुळे शब्दरूपी शस्त्रं गंजत चालली आहेत. त्यांची धार बोधट झालीय. साहित्य असेल किंवा पत्रकारिता असेल गुळगुळीत कागदावरील बुळबुळीत मजकुरामुळे वाचकांचे ना धड मनोरंजन होते, ना त्यांना पुरेशी माहिती मिळते. खून, मारामारी, बलात्कार, अपहरण, दरोडे, अपघात नट-नट्यांची लफडी अशा नकारात्मक बातम्यांनीच वृत्तपत्रांचे रकाने खचाखच भरलेले असतात. नकारात्मक बातम्या प्राधान्याने द्यायची मानसिकता आपल्याकडे दुर्दैवाने रूजली आहे. त्यात सकारात्मकतेचा पोत हरवला आहे.
महाराष्ट्राचा विचार करता दरवर्षी हजारो अनुवादीत पुस्तके आपल्याकडे प्रकाशित होतात आणि ती मोठ्या संख्येने खपतात. परदेशी विचारवंतांची, लेखकांची पुस्तके मराठीत ज्या संख्येने येतात, तसे मराठीतील साहित्य अन्य जागतिक भाषात जाताना दिसत नाही याची कारणे शोधण्याची वेळ येऊन ठेपली आहे. कन्नडमधील एस. एल. भैरप्पांच्या कादंबर्‍यावर मराठीत उड्या पडतात. सुधा मुर्तींची अनुवादीत पुस्तके आपल्याकडे खपतात. मात्र आपल्याकडील साहित्य त्याप्रमाणात तिकडे जाताना दिसत नाही. मराठी लेखकांचे जीवनानुभव समृद्ध असूनही नवीन लिहिणारे लेखक जागतिक स्तरावर सर्वमान्य होत नाहीत. चेतन भगतसारख्या तरूण लेखकाची ‘हाफ गर्लफ्रेन्ड’ कादंबरी प्रकाशित होते आणि पहिल्याच आवृत्तीच्या सत्तर लाख प्रती आरक्षित होतात हे आपण पाहिले आहे. अकरा करोडची लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात एकही प्रकाशक एकाही लेखकाची, त्याच्या कोणत्याही कलाकृतीची 10 हजाराची आवृत्तीही प्रकाशित करू शकत नाही हे मायमराठीचे दुर्दैव आहे. वाचनसंस्कृती कमी होत चालली अशी बोंब मारणारे प्रकाशक मराठीत सकस साहित्य यावे यादृष्टिने काय प्रयत्न करतात आणि आपल्याकडील लेखक त्याला नेमका कसा प्रतिसाद देतात हे पाहिले तर सारेच चिंताजनक वाटते.
मराठी चित्रपटानेही सध्या कात टाकली आहे. मात्र कथा सशक्त असेल तर निर्मिती अशक्त आणि निर्मिती सशक्त तर कथानक अशक्त असा काहीसा खेळ सुरू आहे. त्यातूनही काही चांगले चित्रपट प्रेक्षकांच्या नशिबी येतात. आमच्या रितेश देशमुखच्या ’लय भारी’ या चित्रपटाच्या केवळ जाहिरातीचे जितके बजेट होते तितके बजेट संपूर्ण मराठी प्रकाशनविश्‍वाचे वर्षभराचेही नसते. एखादी चांगली कलाकृती वाचकांपर्यंत जावी यासाठी लेखक आणि प्रकाशक नेमके कोणते कष्ट घेतात? त्या पुस्तकाच्या जाहिरातीसाठी आपली काय तरतूद असते?  वाचकांपर्यंत पुस्तक प्रभावीपणे पोहचविण्यासाठी आपण नेमके काय करतो?
सुदैवाने मराठीतील आघाडीची वृत्तपत्रे रविवार पुरवणीत पुस्तक परिचय देतात. एका पुरवणीत सरासरी चार ते पाच पुस्तकांचा अल्पपरिचय  येतो. म्हणजे वर्षातील 52 आठवड्यात जेमतेम दोनशे-सव्वादोनशे पुस्तकांची ओळख एक वृत्तपत्र करून देते. इतकी पुस्तके तर वर्षाला ‘चपराक’कडूनच प्रकाशित होत आहेत. हजारोंच्या संख्येने पुस्तके प्रकाशित होत असताना ती वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी दुसरी कुठलीच यंत्रणा दिसत नाही. मराठीतील बहुतांश मासिकेही मरणासन्न अवस्थेत आहेत. त्यांचे दारिद्र्य ना लेखकांना सुखी करू शकते, ना पुस्तकांना!
अशा सर्व परिस्थितीत ‘धंद्यापेक्षा धर्म महत्त्वाचा’ ही आचार्य अत्रे यांची शिकवण ध्यानात ठेवून आम्ही मराठीत नवनवीन प्रयोग सुरू केले. ‘चपराक’सारखे प्रभावी वृत्तसाप्ताहिक, ‘साहित्य चपराक’ हे दर्जेदार मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’च्या माध्यमातून उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित केल्याने अल्पावधितच ‘चपराक’चा इवलासा वेलू  गगनावरी गेला आहे. ‘लाख बोलक्याहूनि थोर, एकचि माझा कर्तबगार’ ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची शिकवण अंगिकारत आम्ही मराठी साहित्य विश्‍वात वेगवेगळे प्रयोग सुरू केले. चतुरस्त्र, परखड, रास्त आणि कर्तव्यदक्ष ही आद्याक्षरे घेऊन संवाद आणि संघर्ष या भूमिकेतून ‘चपराक’ची वाटचाल सुरू आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील लेखकांना ‘चपराक’हे हक्काचे व्यासपीठ वाटते. देशविदेशातील मराठी वाचकांपर्यंत आम्ही प्रभावीपणे पोहोचलो आहोत. अनेक लेखकांची पहिलीच पुस्तके ‘चपराक’ने प्रकाशित केली आणि त्यांच्या आवृत्यामागून आवृत्या निघत आहेत. त्यांची प्रस्थापित लेखकांत गणना केली जात आहे.
मासिकाच्या आणि साप्ताहिकाच्या माध्यमातून वेगवेगळे विषय धाडसाने हाताळल्याने मराठी भाषा, मराठी वाचक जिवंत आहे, हे आम्ही अनेकवेळा कृतीशिलतेतून दाखवून दिले आहे. ‘चपराक’ला सुरूवातीला अनुल्लेखाने डावलणारे अनेक डुढ्ढाचार्य आज ‘चपराक’मध्ये लिहिण्याची संधी मिळावी म्हणून धडपडतात. नव्याजुन्या लेखकांचा सुरेख संगम साधत आम्ही अनेक पुस्तके प्रकाशित केली. त्याचे प्रमाण झपाट्याने वाढल्याने एकाचवेळी अनेक पुस्तके प्रकाशित करण्याचा संकल्प सोडला. ‘चपराक साहित्य महोत्सव’ हा अभिनव उपक्रम त्यासाठी सुरू केला. विविध साहित्य प्रकारातील आणि विविध लेखकांची पुस्तके एकाचवेळी एकाच व्यासपीठावर प्रकाशित केल्याने लेखकांचा उत्साह वाढला. या समूह पुस्तक प्रकाशनामुळे वाचकांनाही सकस साहित्य उपलब्ध झाले.
8 ऑगस्ट 2014 रोजी ‘चपराक’चा पहिला साहित्य महोत्सव पार पडला. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. प्र. चिं. शेजवलकर, सुप्रसिद्ध समीक्षक प्राचार्य डॉ. श्रीपाल सबनीस, महाराष्ट्रातील नामवंत वक्ते आणि लेखक प्रा. मिलिंद जोशी पहिल्या महोत्सवासाठी उपस्थित होते. पुण्यातील श्रमिक पत्रकार भवनात पार पडलेल्या या महोत्सवात एकाचवेळी सहा पुस्तके प्रकाशित झाली. त्यानंतर 11 फेब्रुवारी 2015 रोजी साने गुरूजी स्मारक सभागृहात महाराष्ट्र भूषण श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या अध्यक्षतेखाली ‘चपराक’चा दुसरा साहित्य महोत्सव संपन्न झाला. त्यात तब्बल एक डझन पुस्तके प्रकाशित झाली. सुप्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ, कादंबरीकार उमेश सणस, पत्रकार विनायक लिमये त्यासाठी पाहुणे म्हणून उपस्थित होते. यंदा शनिवार दि. 8 ऑगस्ट 2015 रोजी ‘चपराक’चा तिसरा साहित्य महोत्सव पार पडत असून त्यात 15 पुस्तके प्रकाशित होत आहेत. महाराष्ट्र राज्य भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. सदानंद मोरे हे या साहित्य उत्सवासाठी उपस्थित असणार आहेत.
‘अक्षरम् परम: ब्रह्म, ज्योतिरूपम् सनातनम्’ याप्रमाणे आम्ही अक्षरांनाच परम् ब्रह्म मानून त्यांची पूजा घालत आहोत. मराठी वाचले जात नाही अशी आरोळी देण्याऐवजी, लेखक आणि वाचकांची टवाळखोरी करण्याऐवजी आम्ही मराठीतील सकस आणि दर्जेदार साहित्य आपल्यासमोर घेऊन येत आहोत. वाचक आमच्या या प्रयत्नांचे नेहमीप्रमाणे निश्‍चितच स्वागत करतील. ‘चपराक‘च्या आगामी साहित्य महोत्सवाद्वारेही नवनवीन लेखक पुढे आणण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.
- घनश्याम पाटील 
संपादक, प्रकाशक 'चपराक' पुणे 
७०५७२९२०९२


No comments:

Post a Comment