Saturday, August 1, 2015

'चपराक'ची साहित्य भरारी!

आपल्या आवडीच्या लेखकानं कौतुकाची थाप देणं यापेक्षा मोठा आनंद कोणता? तेही ह. मो. मराठे यांच्यासारख्या दिग्गजाची पावती म्हणजे आकाश ठेंगणे वाटण्यासारखी बाब. 8 ऑगस्ट रोजी पुण्यात होणार्‍या ‘चपराक साहित्य महोत्सवा’च्या निमित्ताने मराठे सरांनी सोलापूर आणि मराठवाड्यात अग्रगण्य असलेल्या ‘संचार’ या दैनिकाच्या ‘इंद्रधनू’ पुरवणीत माझ्यावर एक लेख लिहिलाय. आमच्या कामाची ही मला मोठी पावती वाटते. माझे सर्व सहकारी आणि वाचकांचा उदंड प्रतिसाद यामुळे हे शक्य होतेय. सुप्रसिद्ध साहित्यिक आणि संपादक ह. मो. मराठे सर यांचा हा लेख आज प्रकाशित करून ‘संचार’ने आणि प्रशांतजी जोशी यांनी मला मैत्रीदिनाची खास भेट दिली आहे. धन्यवाद! मनःपूर्वक धन्यवाद!! 
पुण्यातील ‘चपराक प्रकाशन’तर्फे येत्या 8 ऑगस्ट रोजी तिसरा ‘चपराक साहित्य महोत्सव’संपन्न होतोय. महाराष्ट्र राज्य भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या अध्यक्षतेखाली आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. सदानंद मोरे यांच्या हस्ते यावेळी तब्बल पंधरा पुस्तकांचे प्रकाशन होत आहे. त्यानिमित्त ‘चपराक प्रकाशन’चे प्रकाशक घनश्याम पाटील यांच्या वाटचालीचा सुप्रसिद्ध साहित्यिक ह. मो. मराठे यांनी घेतलेला आढावा...

घनश्याम पाटील याची आणि माझी ओळख तशी अलीकडीलच. झाली असतील  चार पाच वर्षे. या पाच वर्षातल्या गाठीभेटीतून आणि त्याच्याबरोबरच्या गप्पांतून मला त्याच्या व्यक्तिमत्त्वामधले काही गुण ठळकपणे जाणवलेच. तो उत्साहाने उसळणारा तरूण आहे. त्याला खूप काही करायचं आहे. त्याने खूप मोठी स्वप्नं मनात पाहिली आहेत. ती प्रत्यक्षात आणायचीच, या दृष्टीने तो नुसता बोलत बसलेला नाही, तर त्याने त्या दृष्टीने योजना आखल्या आहेत. तो कामाला लागला आहे.
आपल्या ‘साहित्य चपराक’ या मासिकाचा दिवाळी अंक चारशे पानांचा काढायचा असे त्याने ठरवले आहे! चारशे पानं मजकूर! जाहिरातींची पानं वेगळी. हा त्याचा एक विक्रमच ठरेल एवढं नक्की! प्रती? निदान पंचवीस हजार! मला दिवाळी अंकांचं संपादन करण्याचा अनुभव आहे, पण फक्त संपादनाचा. मालकांनी जेवढी पानं मजकूर हवा असं सांगितलं असेल, तेवढा मजकूर जमा करणं हे माझं काम. कागद, छपाई, जाहिराती, मार्केटिंग ही जबाबदारी माझी नाही! पण घनश्यामच्या बाबतीत या सर्व जबाबदार्‍या त्याच्या एकट्याच्याच आहेत! सामान्य वाचकांना कल्पनाही येणार नाही की हे सर्व काम म्हणजे केवढा खटाटोप असतो! अगदी तरूण वयात घनश्यामची ही जबाबदारी पेलायची तयारी झालेली आहे. त्याची ही योजना त्याने यशस्वीपणे अंमलात आणली तर त्याने अगदी अल्पावधीतच नेत्रदीपक यश मिळवलं हे मान्य करावं लागेल.
त्यांच ‘चपराक’ नावाचं साप्ताहिकही आहे. एक साप्ताहिक आणि एक मासिक एवढं त्याने या वयातच सुरू केलं आहे. साप्ताहिकात तो दर आठवड्याला अग्रलेख लिहितो. ते निर्भीड, सडेतोड आणि निर्भयपणे लिहिलेले असतात. ज्यांचं गुणवर्णन श्री. शरद पवार यांची ‘राष्ट्रवादीचे सुविद्य आमदार आणि ओबीसींच्या नेतृत्त्वाचा नवा चेहरा’ असं केलं त्या आमदार जितेंद्र आव्हाडांनी अलीकडेच बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ देण्याच्या मुद्द्यावरून अत्यंत स्फोटक भाषण केलं. त्याच्या बातम्या वर्तमानपत्रात आल्या. ‘पुरस्कार देण्यात आला तर महाराष्ट्र पेटवू’ अशी भाषा आव्हाडांनी वापरली. आव्हाड यांच्या या भाषेवर परखड आणि स्पष्ट टीका करणारा अग्रलेख त्याने अलीकडेच लिहिलाही होता. तो आपल्या साप्ताहिकात छापलाही होता. आमदार आव्हाडांसारख्या मा. शरद पवारांच्या ‘लाडक्या’ नेत्यावर टीका करणं महाराष्ट्रात सोपं उरलेलं नाही. घनश्याम त्याचं ‘चपराक’ साप्ताहिक माझ्याकडे भेटीदाखल पाठवतो. मी ते वाचतो. त्याच्या अग्रलेखातला सडेतोडपणा मी अनेकदा अनुभवला आहे.
अलीकडे घनश्याम पुस्तक प्रकाशनाच्या व्यवसायाकडे वळला आहे. आजपर्यंत त्याने अनेक पुस्तके प्रकाशित केली असून येत्या 8 ऑगस्टला तो आणखी 15 पुस्तकं एकाचवेळी प्रसिद्ध करणार आहे. एकाचवेळी अनेक पुस्तकं प्रसिद्ध करणं हेही सोपं नाही. वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तकं वेगवेगळ्या लेखकांकडून मिळवणं हे पहिलं काम. ती एकाचवेळी छापून मिळण्याची व्यवस्था हे दुसरं काम. त्यासाठी छापखान्याच्या मालकाला आगाऊ बिलाची रक्कम देणं आणि उरलेल्या बिलासाठी क्रेडीट मिळवणं हे तिसरं काम. बातमी यावी यासाठी पंधरा पुस्तकांच्या प्रकाशन समारंभाची आणखी करणं हे पुढलं काम. पाहुणे मिळवणं, हॉल आधीच बुक करणं, समारंभाची सर्व आखणी करणं आणि त्याप्रमाणे समारंभ पार पाडणं हे पुढलं काम! अशी अनेक टप्प्यांवरची कामं पार पाडणं आणि तिही वेळच्यावेळी, यासाठी मॅनेजमेंटचं कौशल्य आवश्यक आहे. ते कौशल्यही घनश्यामने आत्मसात केलं आहे.
घनश्याम मराठवाड्यातल्या एका शेतकरी कुटुंबातून दहावी झाल्यावर पुण्यात आला तो पत्रकारितेच्या ओढीने. ‘संध्या’ या नावाचं कै. वसंतराव काणे यांचं एक सायंदैनिक पुण्यातून प्रकाशित होत असे. तिथं त्याला पत्रकारितेची नोकरी मिळाली. त्याची राहण्याची सोयही वसंतराव काणे यांनी ऑफिसमध्येच केली. नोकरी करीत करीत त्याने बारावी केली आणि सरळ पत्रकारिता सुरू केली. याचा अर्थ स्वत:चं छोटंसं साप्ताहिक सुरू केलं. धीरे-धीरे त्यानं साप्ताहिकाला मासिकाची जोड दिली. मासिकाचे काही हजार वर्गणीदार असणं ही आजच्या काळात अशक्य वाटणारी गोष्ट आहे. हजारोंच्या घरात त्याचा हुकुमी वाचक आहे. तसाच तो हुकुमी ग्राहक आहे. त्याने याआधी प्रसिद्ध केलेल्या पुस्तकांच्या चार-चार, पाच-पाच आवृत्त्या निघाल्याचं तो अभिमानानं सांगतो. त्याचं प्रत्येक पुस्तक घेणारे दहा हजार वाचक मिळाले तरी तो आपल्या पुस्तकांची पहिली आवृत्तीच दहा हजार प्रतींची छापू शकेल आणि तोही एक मराठी प्रकाशन व्यवसायातला कौतुकास्पद असा विक्रमच ठरेल!
तरूण वयातच घनश्यामने वैचारिक प्रगल्भता आणि स्पष्टता प्राप्त केली आहे. याची अनेक उदाहरणं त्याने लिहिलेल्या अग्रलेखांतून सापडतात. त्याने आपल्या निवडक अग्रलेखांची पुस्तके ‘दखलपात्र’ व ‘झुळुक आणि झळा’ या नावाने प्रसिद्ध केली आहेत.
त्यातील काही उदाहरणे बघा...
1) ‘‘एखादी नदी सराईतपणे पोहत पार करताना आम्ही बेभान होतो कारण नदीच्या दुसर्‍या काठावर जाण्याची आमची प्रचंड ओढ असते. कार्ल्याच्या एकवीरा आईच्या किंवा जेजूरीच्या खंडोबाच्या पायर्‍या चढताना आम्ही कधीही थकत नाही कारण मन प्रफुल्लीत करणार्‍या त्या गूढ शक्तीची दृढ आस मनी असते. विविध ग्रंथ वाचताना आम्ही किती पाने उलटली याचे आम्हास यत्किंचितही भान नसते कारण ज्ञानामृत प्राशन करण्याची आमची लालसा असते. यशाचे शिखर पादाक्रांत करताना काही समदुःखी लोकांनी घातलेले घाव आम्हास इजा पोहोचवत नाहीत कारण आमच्या प्रबळ आत्मविश्‍वासाची शक्ती आम्हांस संरक्षण देत असते. मग समाजातल्या तथाकथित थोतांड प्रवृत्तीची पर्वा आम्ही का करावी? दुष्ट विचारांना, चुकीच्या प्रवृत्तींना ‘चपराक’ देण्यासाठीच आमचा जन्म आहे. यासाठी आम्हाला संघटितपणे साथ देणारे आमचे सहकारी आम्हांस ‘घनश्यामा’प्रमाणे वाटतात. शत्रू पक्षाकडून येणारे अनंत अडचणींचे  बाण हृदयावर हळूवारपणे झेलत ते आमचे सारथ्य करीत आहेत. असे सहकारी असताना पराक्रमाची परंपरा कधीही खंडीत होणार नाही, हे त्रिकालाबाधीत सत्य आहे. (दखलपात्र, पान नं. 23)
हे वाचताना वाटते की आचार्य अत्रे, लोकमान्य टिळक किंवा शिवराम महादेव परांजपे यांच्यासारख्या तगड्या संपादकानेच ही आत्मविश्‍वासपूर्ण, जोरकस आणि आव्हानात्मक शैली वापरली असावी. पण ही भाषा आणि शैली तीस वयाच्या घनश्यामची आहे हे पाहून मी तर अगदी थक्क झालो. केवढी ओघवती शैली, केवढा आत्मविश्‍वास आणि पत्रकार म्हणून स्वीकारलेल्या ध्येयपथावरील भावी वाटचालीबद्दलचा केवढा हा आत्मप्रत्यय!
2) प्रत्येक जातीत काही गुणदोष असतात हे मान्य! मात्र त्यामुळे एखाद्या जातीचा टोकाचा द्वेष करणे आणि त्यांच्या ‘कत्तली करा’, त्यांच्या ‘बायका पळवून आणा’ अशा घाणेरड्या वल्गणा करून समाजस्वास्थ्य खराब करणे हे समाजातील वाढत्या अराजकतेचे लक्षण आहे. आजपर्यंतच्या अनेक ऐतिहासिक, सामाजिक. सांस्कृतिक चळवळीत ब्राह्मणांनी दिलेले योगदान दुर्लक्षून चालणार नाही. समाज ‘भटमुक्त’ करण्याचा विडा उचलणार्‍या फुरफुरत्या घोड्यांना आवरले नाही तर त्याचे गंभीर परिणाम आपल्या राष्ट्राला भोगावे लागतील. (दखलपात्र, पान नं. 79)
अगदी तरूण वयातच घनश्यामने ‘हाही’ विषय अग्रलेखासाठी घेण्याचे धाडस दाखवले.
3) पहिल्या सत्रात विरोधी पक्षात असलेल्या शिवसेनेचा आता सत्तेत सहभाग आहे. निवडणुकीपूर्वी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या गैरव्यवहारावर तुटून पडलेल्या भाजपला त्यांनी पाठिंबा दिला आहे. दिल्लीत विमानतळावरून देसाईंचे परत येणे असेल किंवा राज्य मंत्रीमंडळात दिलेली पदे निमूटपणे स्वीकारणे असेल, या सर्व प्रकारात शिवसेनेने अवहेलना, उपेक्षा सहन केली आहे. ही उपेक्षा पदाच्या, सत्तेच्या लालसेपोटी नाही. राज्याचे, देशाचे काहीतरी भले होणार, भ्रष्ट नेत्यांवर कारवाई होणार या आशेवर शिवसेनेने नमते घेत त्यांना प्रामाणिकपणे पाठिंबा दिला आहे. ‘राष्ट्रवादीच्या जीवावर आपण उड्या मारू’ अशा आविर्भावात असलेल्या ‘फडणवीस ऍन्ड कंपनी’ला पवारांनी एका झटक्यात जागेवर आणले आहे. ‘सरकार स्थिर रहावे यासाठी पाठिंबा दिला असला तरी सरकार टिकावेच यासाठीचा मक्ता आपण घेतला नाही’ असे त्यांनी सांगताच यांचे डोळे उघडले. पुन्हा अनंत तडजोडी करत त्यांनी शिवसेनेशी जमवून घेतले. मात्र दिलेल्या शब्दाला जागत त्यांनी आपली आश्‍वासने पाळली नाहीत, तर शिवसेना कोणत्याही क्षणी स्वाभिमानाने सत्तेतून बाहेर पडेल आणि पुन्हा बहुमताने सत्तेत येईल, असे सध्याचे एकंदरीत चित्र आहे.
‘रॉंग नंबर’ लागला तर त्यांना तसे धाडसाने सांगणे हे आता प्रत्येक नागरिकाचेही कर्तव्य आहे. तसे झाले नाही तर सत्तेच्या कैफात असणार्‍यांचे डोळे कदापि उघडणार नाहीत. (झुळूक आणि झळा, पान नं 40)
पंतप्रधान मोदींच्या सरकारकडून अपेक्षाभंग होऊ लागल्याची जाणीव आणि शिवसेना-भाजप संबंधावरचा मार्मिक अभिप्राय.
साहित्य क्षेत्रात अशी धडधडती तोफ म्हणून वाचकांपुढे आलेला घनश्याम उत्तम लेखक आणि म्हणूनच तो प्रकाशक म्हणून इतर लेखकांना योग्य न्याय देऊ शकतो. ‘चपराक’चा हा साहित्य महोत्सव हे त्याचेच प्रतिक आहे. त्याच्या भावी वाटचालीस माझ्या शुभेच्छा!
- ह. मो. मराठे
सुप्रसिद्ध साहित्यिक आणि समाजचिंतक
9423013892




No comments:

Post a Comment