Friday, August 21, 2015

अक्षरनिष्ठांची मांदियाळी!

मराठी भाषा, मराठी माणूस, मराठी संस्कृती अजरामर आहे. मराठीला आता राजभाषेचा दर्जा मिळाला असून लवकरच ती अभिजात भाषाही होईल. त्यासाठी अनेकांनी पुढाकार घेऊन जोरदार प्रयत्न केले आहेत. मात्र असे असतानाही ही भाषा संपुष्टात येईल, अशी भीती काही विचारवंत सातत्याने व्यक्त करतात. अनेक ख्यातनाम प्रकाशक मराठी पुस्तके खपत नसल्याच्या आवया देतात, ग्रंथ विक्रेते वाचन संस्कृती कमी होत असल्याचे सांगतात. असे का व्हावे? या परिस्थितीला नेमके जबाबदार कोण आहे? ‘अमृतातेही पैजा जिंके’ अशा शब्दात माऊलींनी ज्या भाषेचा गौरव केला त्या भाषेची आजची अवस्था आहे तरी कशी ? अकरा करोड लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात कितीजण सातत्याने मराठी पुस्तके वाचतात?
या सर्व प्रश्‍नांचा थोडासा अभ्यास केला तरी आपल्या लक्षात येईल की, मराठीत उत्तमोत्तम वाचणारे वाचक सर्वाधिक आहेत. इतर भाषांच्या तुलनेत मराठीत सर्वाधिक साहित्य उपलब्ध आहे. सातत्याने अनेक विषयांवर पुस्तके प्रकाशित होतात आणि त्यांच्या आवृत्यामागून आवृत्या निघतात. ‘नवीन काय प्रकाशित झालेय?’ याचे औत्सुक्य अनेकांना असते. त्यात तरूणाईचा वाटा मोठा आहे. या क्षेत्रात असलेल्या काही बदमाश प्रकाशकांनी असा अपप्रचार चालवला आहे आणि संपूर्ण प्रकाशनविश्‍वाविषयी त्यांनी भाषेला, संस्कृतीला खूप मोठा धोका असल्याचे चित्र निर्माण केले आहे. त्यांच्या अकार्यक्षमतेचे आणि बेअक्कलपणाचे खापर त्यांनी वाचकांवर फोडले आहे. जे वाचक रोखीने पैसे मोजून पुस्तके विकत घेतात त्यांची ही प्रतारणा आहे. ‘वाचनसंस्कृती कमी होतेय’ असा खोटा डोलारा निर्माण करून आपण त्यांच्या विश्‍वासाला तडा देत आहोत.
शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार झपाट्याने झालाय. पूर्वी अशिक्षित, अडाणी लोकाची संख्या तुलनेने अधिक असायची. आता प्रत्येकजण त्याबाबत जागृत झालाय. अनेक महापुरूषांनी शिक्षणाविषयी जे प्रबोधन केले त्याची फळे चाखायला मिळत आहेत. काही जुन्या लोकाचे अपवाद वगळता अशिक्षित माणूस शोधणे अवघड झाले आहे. जगण्याच्या रहाटगाड्यात त्याला काही ना काही वाचण्याशिवाय पर्याय नाही. फरक इतकाच की आपण त्याला गृहीत धरत नाही. आज महाराष्ट्रातून जवळपास पाच हजार नियतकालिके निघतात. त्या प्रत्येकांचा एक ठरलेला वाचकवर्ग आहे. त्यांच्या अंकांचे सातत्यही आहे. अनेकांना सरकारी जाहिराती मिळतात. कोट्यवधी रूपयांचे अर्थकारण केवळ वृत्तपत्रसृष्टीचे आहे. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे अशा मोजक्या दिवशी आपल्याकडील वृत्तपत्रांना सुट्टी असते. त्याच्या दुसर्‍या दिवशीची वाचकांची तगमग, तळमळ अनेकांनी अनुभवली असेल. वृत्तवाहिन्या, समाजमाध्यमे (फेसबुक, ट्विटर) प्रभावी झाली असली तरी वाचकांना रोजचे एखादे वृत्तपत्र तरी लागतेच. तो त्यांच्या जीवनाचाच एक भाग बनलाय.
विविध गावात रामायण, महाभारत, दासबोध, हरीविजय, भागवत, ज्ञानेश्‍वरी अशा ग्रंथांचे सामूहिक पारायण चाललेले असते. आध्यात्मिक ग्रंथांवर अनेक वाचक आजही तुटून पडतात. ती पुन्हा पुन्हा वाचतात. शक्य तितके समजून घेतात. काही मशीदीत नियमितपणे कुराणपठण होते तसेच अनेक ठिकाणी गीतेचे रोजचे वाचन होते. शेतीविषयक, कृषीविषयक, महिलांविषयक, आरोग्यविषयक, इतकेच नाही तर गुन्हेगारीविषयी नियमितपणे वाचणारेही अनेक वाचक आहेत. प्रत्येकाची अभिरूची वेगळी. आपापल्या क्षेत्रानुसार ज्ञान मिळवण्याचे मार्ग वेगळे; मात्र वाचक वाचतात आणि त्यांना आणखी दर्जेदार साहित्य देण्यात आपण कमी पडतो!!
आज फक्त पुण्यासारख्या सांस्कृतिक महानगरीचा विचार केला तर या शहरातून रोज सरासरी वीस पुस्तके प्रकाशित होतात. म्हणजे वर्षाकाठी पुणे शहरातून प्रकाशित होणार्‍या पुस्तकांची संख्या हजारोंच्या घरात आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून येणारे साहित्य वेगळेच. चरित्र, आत्मचरित्र, माहितीविषयक पुस्तके, अभ्यासक्रमांची, स्पर्धा परीक्षांची पुस्तके, पाककृतींची पुस्तके यांना तर चांगली मागणी आहेच पण ललित साहित्यालाही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. कथा, कविता, लेखसंग्रह यांची मागणी वाढतच चालली आहे. ग्रंथालयात नियमित जाऊन वाचणारे वाचक आहेतच पण स्वतः पुस्तके विकत घेऊन वाचणारे, इतरांना पुस्तके विकत घेऊन भेट देणारे कमी नाहीत. अशा वाचकांमुळेच मराठी प्रकाशनविश्‍व तग धरून आहे.
या सगळ्या प्रक्रियेत आपले प्रकाशक आणि लेखक मात्र कमी पडतात. वाचकांची अभिरूची लक्षात घेऊन गुणात्मकदृष्ट्या सर्वोत्तम पुस्तके प्रकाशित करणे आणि पुन्हा ती वाचकांपर्यंत पोहोचविणे हे त्यांचे काम आहे. मात्र यासाठी ना प्रकाशक काही विशेष परिश्रम घेतात ना लेखक! ‘सध्या वाचतंय कोण?’ असं म्हटलं की यांची जबाबदारी संपली! आधुनिक तंत्रज्ञान हाताशी आल्याने मुले पुस्तकांकडे वळत नाहीत, असा अजब तर्क या समदुःखी आणि निष्क्रिय लोकानी लावलाय. ‘पुस्तक कोणी वाचत नाही, वाचनसंस्कृती लयास गेलीय’ असे म्हणणारे त्यांच्या इतिहासाचे पोवाडे गाताना मात्र अजिबात थकत नाहीत. ‘आम्ही रस्त्यावर बसून पुस्तके विकायचो, सुरूवातीला आम्ही घरोघर जाऊन पुस्तके विकली, एका छोट्या टपरीवजा दुकानापासून आमची सुरूवात झाली’ असे अभिमानाने सांगणार्‍यांची आज अनेक शहरात भरपूर संपत्ती आहे. त्यांची स्वतःची टोलेजंग घरं आहेत, त्यांच्याकडे अत्याधुनिक गाड्या आहेत, सर्व ऐषोआराम त्यांच्या पायाशी लोळण घेतोय. यामागे अर्थातच त्यांचे अफाट परिश्रम आहेत. मात्र कोणी वाचतच नसेल तर त्यांनी हे सारे कोणाच्या जीवावर केले? ‘कोणी वाचत नाही,’ असे म्हणून ते त्यांच्या प्रगतीस हातभार ठरलेल्या वाचकांचा अवमानच करत आहेत.
एकीकडे वाचक नाहीत, अशी आवई उठवली जात असताना दुसरीकडे प्रकाशक मिळत नाहीत म्हणून अनेक नवोदित लेखक परेशान आहेत. जर प्रकाशितच होत नाही तर लिहावे कशासाठी? असा त्यांना प्रश्‍न पडतो. यातूनच अनेकांना नैराश्य येते.
पुण्यात आल्यानंतर आम्ही पत्रकारिता सुरू केली. चुकीच्या प्रवृत्तीला आणि विविध क्षेत्रातील समाजद्रोह्यांना धाडसाने ‘चपराक’ देणे सुरू ठेवले. त्यासाठी कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी मागे हटायचे नाही, असा निश्‍चय केला. त्यातून अनेक समस्या मांडल्या. ढोंगी व्यक्ती आणि संस्थांवर कठोर प्रहार केले. सद्गुणांची पूजा बांधली. हे करताना लक्षात आले की, मराठीत अनेक उदयोन्मुख लेखक प्रसिद्धीसाठी धडपडत आहेत. जात, धर्म, प्रांत अशा क्षुल्लक गोष्टींवरून त्यांच्या प्रतिभेला नाकारण्याचे, गुणवत्ता डावलण्याचे पाप सुरू आहे. काही नामवंत प्रकाशन संस्था कंपुगिरीत अडकून पडल्यात. त्यावेळी मात्र आम्हाला स्वस्थ बसवले नाही आणि आम्ही वैविध्यपूर्ण विषयांवरील वाचनीय आणि दर्जेदार पुस्तके प्रकाशित करण्याचा चंग बांधला. त्यातून ‘चपराक प्रकाशन’ची मुहूर्तमेढ रोवली गेली.
सुरूवातीला अनेकांना आमचा हा ‘पोरकटपणा’ वाटला. हे काम येर्‍यागबाळ्याचे नाही, असेही त्यांनी बोलून दाखवले. मात्र हे काम खरेच ‘येर्‍यागबाळ्याचे’ नाही हे आम्हास ठाऊक होते म्हणूनच आम्ही या क्षेत्रात उतरलो. अनेक लुंग्यासुंग्यांनी हे पवित्र क्षेत्र अकारण बदनाम केले आहे. प्रकाशन क्षेत्राचा देदीप्यमान इतिहास दुर्लक्षून काहींनी त्याची दुकानदारी सुरू केली होती. त्यामुळे आम्ही काहीतरी नवे, वेगळे करण्याचा चंग बांधला. त्यातून कथा, कविता, कादंबरी, ललित, वैचारिक, ऐतिहासिक, चरित्र, आत्मचरित्र, शैक्षणिक, आध्यात्मिक अशी सर्व विषयांवरील पुस्तके प्रकाशित करण्याचा धडाका सुरू ठेवला. सध्याच्या काळात ‘पुस्तके खपत नाहीत’ अशी ओरड असतानाच ‘चपराक’ची मात्र एकामागोमाग एक पुस्तके आणि त्यांच्या आवृत्त्यावर आवृत्या प्रकाशित होऊ लागल्या. अनेकांना त्याचा अचंबा वाटला. अनेकांना कौतुक वाटले. अनेकांची पोटदुखी वाढली. मात्र अशा कुणाकडेही लक्ष न देता ‘चांगले ते स्वीकारायचे आणि वाईट ते अव्हेरायचे’ असे आम्ही ठरवले. ‘संवाद आणि संघर्ष’ हे संस्थेचे सूत्र ठेवले. कधी कुणापुढे लाचारी केली नाही की कधी शब्द फिरवून माघार घेतली नाही. त्यामुळे वाचकांची विश्‍वासार्हता मिळवली. ‘सामान्य माणसाचा उंचावलेला स्वर’  हेच संस्थेचे घोषवाक्य केले आणि तोच आमच्या जगण्याचा मूलमंत्रही आहे.
अनेक लेखकांची अनेक पुस्तके प्रकाशित करत असतानाच मागच्या वर्षी ‘चपराक साहित्य महोत्सवा‘ची संकल्पना पुढे आली. त्यावेळी आम्ही धाडसाने एकाचवेळी सहा पुस्तके प्रकाशित केली. तो दिवस होता 8 ऑगस्ट 2014. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. प्र. चिं. शेजवलकर सर, समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस, सुप्रसिद्ध साहित्यिक आणि वक्ते प्रा. मिलिंद जोशी यांची त्यासाठी प्रमुख उपस्थिती होती. अवघ्या काही महिन्यात आम्ही दुसर्‍या ‘चपराक साहित्य महोत्सवा’चे आयोजन केले. 11 फेब्रुवारी 2015. या कार्यक्रमासाठी ‘महाराष्ट्र भूषण’ शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, नामवंत निवेदक आणि पत्रकार सुधीर गाडगीळ, ज्येष्ठ पत्रकार विनायक लिमये, कादंबरीकार उमेश सणस आदी उपस्थित होते. यावेळी पुस्तकाचा आकडा एक डझनावर गेला. शिवाय अधूनमधून वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तकांची प्रकाशनं सुरूच आहेत. आचार्य अत्रे यांच्या लेखणीचा वारसा चालवणारे पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्या ‘कोंबडं झाकणार्‍या म्हातारीची गोष्ट’ या पुस्तकाचे प्रकाशन ‘चपराक’ ने केले. महाराष्ट्रातील ख्यातनाम वकील उज्ज्वल निकम या कार्यक्रमासाठी आवर्जून आले. रमेश पडवळलिखित ‘तपोभूमी नाशिक’ या पुस्तकाचे लोकार्पण कुंभमेळ्याच्या पार्श्‍वभूमीवर नाशिक शहरात केले.
दरम्यान, घुमान येथील 88 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर प्रकाशक परिषदेने बहिष्कार टाकला. आचार्य अत्रे यांच्या शिकवणीनुसार हा धर्म आहे, धंदा नाही! त्यामुळे आम्ही हा बहिष्कार मोडून काढला. ‘चपराक’च्या सर्व सदस्यांसह आम्ही घुमानला गेलो आणि आयोजक व प्रकाशक यांच्यातील ही कोंडी यशस्वीपणे फोडली. ‘आफ्रिकेच्या जंगलात जरी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले आणि तिथे मराठी वाचक असतील तर आम्ही आमच्या सहकार्‍यांसह तिथे नक्की जाऊ’ अशी भूमिका आम्ही घेतली आणि त्याला उदंड प्रतिसाद मिळाला.
याच महिन्यात, म्हणजे 8 ऑगस्ट 2015 रोजी ‘चपराक’चा तिसरा साहित्य महोत्सव संपन्न झाला. यात एकदोन नव्हे तर तब्बल पंधरा पुस्तके आम्ही प्रकाशित केली. तिही महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील लेखकांची आणि वैविध्यपर्णू साहित्यप्रकारातील! या सर्वच्या सर्व पुस्तकांची मनोहारी मुखपृष्ठे साकारली ते आमचे सन्मित्र समीर नेर्लेकर यांनी! या पुस्तकांचे वैविध्य तरी पहा! ते डोळसपणे बघितल्यावर कोणाची हिंमत आहे वाचनसंस्कृती नष्ट होतेय, असे म्हणण्याची!
यंदाच्या ‘चपराक साहित्य महोत्सवा’त सुप्रसिद्ध साहित्यिक आणि संशोधक संजय सोनवणी यांचे ‘भाषेचे मूळ’ हे अभ्यासपूर्ण पुस्तक आम्ही प्रकाशित केले. साहित्याचा डोलाराच भाषेवर अवलंबून असतो. त्यामुळे ही भाषा कशी निर्माण झाली याविषयी ज्याला जिज्ञासा आहे त्याने हे पुस्तक जरूर वाचावे. या महोत्सवास ज्येष्ठ लेखक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे उपस्थित होते. लेखकांच्या दृष्टिने आणि आमच्यासाठीही हा दुग्धशर्करा योगच होता. सदानंद मोरे सरांनी ‘भाषेचे मूळ’ची ताकत उलगडून दाखवताना सांगितले की, ‘‘एखाद्या बॉम्बमध्ये ठासून दारूगोळा भरलेला असतो. तो आकाराने छोटा असला तरी त्याचा परिणाम साधला जातोच. त्याप्रमाणे संजय सोनवणी यांनी लिहिलेल्या या छोटेखानी पुस्तकाचे आहे. आकाराने हे पुस्तक लहान आहे; मात्र त्याची मांडणी इतकी प्रभावी झालीय की वाचकांना त्यातून नवी दृष्टी मिळेल.’’ एका जाणकाराने इतक्या नेमकेपणाने या पुस्तकाविषयी सांगितले. आम्ही आणखी काय लिहावे?
या पंधरा पुस्तकात तीन चरित्रात्मक पुस्तकांचा समावेश आहे. समाजाच्या जडणघडणीत त्यांचा वाटा मोठा आहे. ‘चपराक’च्या ज्येष्ठ उपसंपादिका सौ. चंद्रलेखा बेलसरे यांनी महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या जीवन आणि चरित्राचा प्रभावी वेध घेत त्यांचे ‘लोकनायक’ हे चरित्र लिहिले आहे. महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्याविषयीची माहिती वाचताना प्रत्येकजण भारावून जाईल. ज्यांच्या कर्तृत्वामुळे आपली मान उंचावेल असे उत्तुंग व्यक्तिमत्त्व. हे पुस्तक वाचून आपल्या इतिहासाच्या सुवर्णपानांना उजाळा मिळेल.
दुसरे चरित्र आहे ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे! विदर्भातील तुकडोजींनी जगाला मानवतेचा संदेश दिला. ‘या भारतात बंधुभाव नित्य वसू दे’ अशी प्रार्थना करणारे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणजे कलीयुगातील दिशायंत्रच. त्यांची ‘ग्रामगीता’ आजही आपल्याला दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करते. समाजातील वाढती अराजकता ध्यानात घेता तुकडोजींचे हे चरित्र वाचणे आपल्यासाठी हितकारक ठरेल. राष्ट्रसंतांच्या विचारधारेचे तंतोतंत पालन करणारे ‘चपराक परिवारा’चे भाई काका, अर्थात विनोद श्रावणजी पंचभाई यांनी हे चरित्र लिहिले आहे. त्यांच्या वडिलांना तुकडोजी महाराजांचा प्रत्यक्ष सहवास लाभला. त्यामुळे या घराण्यावर त्यांचे आशीर्वाद सदैव आहेत. त्यातूनच या पुस्तकाची अत्यंत श्रद्धाभावाने निर्मिती झाली आहे. संस्काराचा अनमोल ठेवा देणारे हे पुस्तक आहे.
तिसरे चरित्रात्मक पुस्तक आहे ते संभाजीनगर येथील लेखक नागेश शेवाळकर-पांडे यांचे. त्यांनी एक धगधगता अंगार मांडला आहे. ज्यांच्या नावाशिवाय महाराष्ट्राचे राजकारण पूर्णत्वास जाऊ शकत नाही, ज्यांनी आपले मराठीपण टिकवून ठेवले, ज्यांनी आपल्यात एक अद्भूत चैतन्य जागवले त्या हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चरित्र शेवाळकरांनी मांडले आहे. ‘चपराक‘ने आजवर अनेक चरित्रात्मक पुस्तके प्रकाशित केली; मात्र पत्रकारितेच्या क्षेत्रात आणि वैयक्तिक आयुष्यात ज्यांचा आदर्श आम्ही डोळ्यांसमोर ठेवतो त्या महामानवावरचे हे पुस्तक प्रकाशित करण्याचा आनंद काही औरच होता.
सुभाष कुदळे हे ‘चपराक परिवाराचे‘च एक लेखक. यापूर्वी त्यांची ‘नवलकथा’, ‘चार शिलेदार’ ही पुस्तके ‘चपराक’ने प्रकाशित केली. ते पुणे महानगरपालिका वाहन व्यवहार समितीतून निवृत्त झाले. पीएमपीएमएलचे वाहक आणि चालक यांच्याविषयी अनेक गैरसमज आहेत. त्यांना प्रवाशांकडून कायम वाईट वागणूक मिळते. तरीही ते आपली सेवा चोखपणे बजावतात. त्यांच्याविषयी अनेक प्रकारचे अपप्रचार करूनही ते इमानेइतबारे कार्यरत राहतात. त्यामुळे या संस्थेची, त्याच्या कर्मचार्‍यांची सकारात्मक बाजू पुढे आणण्याचे मोठे कार्य सुभाष कुदळे यांच्यासारख्या संवेदनशील लेखकाने केले आहे.
दत्तात्रय वायचळ हे सरकारी खात्यातील कर्मचारी. त्यांनी त्यांच्या रोजच्या जीवनातील घटना डोळसपणे टिपल्या आणि त्यातूनच ‘गजरा’ या कथासंग्रहाची निर्मिती झाली. सामान्य वाचकांसह आपल्या सरकारी खात्यातील लोकही साहित्याबाबत किती जागरूक आहेत, याचे हे उदाहरण.
सदानंद भणगे हे नावही महाराष्ट्राला नवीन नाही. यापूर्वी त्यांची तब्बल पंचवीस पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ‘खुलजा सिम सिम’ हा त्यांचा धमाल विनोदी कथांचा संग्रह यापूर्वी ‘चपराक’ने प्रकाशित केला. त्याच्या घवघवीत यशानंतर मागच्या साहित्य महोत्सवात ‘ओविली फुले मोकळी’ हे त्यांचे पुस्तक प्रकाशित झाले आणि या तिसर्‍या साहित्य महोत्सवात त्यांचे ‘पाषाणगंध’ हे दोन अंकी नाटक प्रकाशित झाले आहे. जुना वाडा विकण्यावरून भावाभावात होणारे मानसिक द्वंद आणि त्याचा सुखात्म शेवट यामुळे हे नाटक वाचनीय तर झाले आहेच पण ते आपली संस्कृती जतन करण्यास हातभार लावते.
स्वप्निल कुलकर्णी हा पंढरपूर येथील धडाडीचा लेखक. आपल्या उदरनिर्वाहासाठी म्हणून नोकरी करत असतानाच त्याने समाजाचे चिंतन केले. अनेक प्रश्‍न, सामान्यांच्या वेदना लेखणीतून मांडल्या. त्यांच्या लेखांचे ‘कवडसे’ हे पुस्तक या महोत्सवात प्रकाशित झाले. पंढरपूरप्रमाणेच तुळजापूर या तीर्थक्षेत्रातीलही एका लेखकाचा यावेळी सहभाग आहे. महादेव तुप्पे हे त्यांचे नाव. पेशाने शिक्षक. अव्वल दर्जाचे बुद्धिबळपट्टू! शालेय जीवनात आणि स्पर्धा परीक्षांत मुले गणित विषयात मागे राहतात, हे निरीक्षण त्यांच्या नजरेतून सुटले नाही. त्यामुळे त्यांनी अनेक क्लृप्त्या देऊन ‘झटपट गणित’ हे पुस्तक लिहिले. या पुस्तकामुळे कितीही ‘ढ’ असलेल्या विद्यार्थ्याचीही गणित विषयाची भीती दूर होण्यास मदत होणार आहे.
समीर नेर्लेकर हे एक उत्तम कलावंत आहेत. ते जसे चित्रकार आहेत तसेच कवी आहेत, लेखक आहेत. पहिल्या ‘चपराक साहित्य महोत्सवा’त त्यांचा ‘एमरल्ड ग्रीन’ हा लघुकथासंग्रह प्रकाशित झाला. त्याला वाचकांची उत्तम पसंती मिळाली. या महोत्सवात त्यांचे एक वेगळ्या धाटणीचे पुस्तक प्रकाशित झाले. पुस्तकाच्या शीर्षकापासूनच हास्याचे फवारे उडू लागतात. या पुस्तकाचे शीर्षक आहे ‘हसण्यावर टॅक्स नाही.’ यात मजकूर फारसा नाही, मात्र आशयसंपन्नता जबरदस्त आहे. काही व्यंग्यचित्रे आणि काही हास्यचित्रे यांचे हे पुस्तक! सुबक चित्रे आणि त्यासोबत तितकाच ताकतीचा मजकूर यामुळे हे पुस्तक वाचताना आजूबाजूची विसंगती ध्यानात येते. काही भ्रष्ट लोकाचे बुरखे फाटतात, तर काहींना घेतलेले चिमटे पाहून आपोआप गालावर खळी पडते. व्यासपीठावर बसल्या बसल्याच यातील चित्रे पाहून सदानंद मोरे आणि नागनाथ कोत्तापल्ले यांच्यासारख्या दिग्गजांना हसू आवरता आले नाही यातच सारे काही आले.
‘तपोभूमी नाशिक’ या पुस्तकाचे नाशिकला लोकार्पण झाल्यानंतर या कार्यक्रमात त्याचे प्रकाशनही करण्यात आले. लोकार्पण सोहळ्यास यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, समीक्षक प्राचार्य श्रीपाल सबनीस, नाशिक येथील उद्योजक गिरीश टकले, सार्वजनिक वाचनालय नाशिकचे आप्पा पोळ आदी मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर या पुस्तकाची तडाखेबंद विक्री सुरू झाली. नाशिकच्या वैभवात भर टाकणारे हे पुस्तक म्हणजे महाराष्ट्राचा सांस्कृतिक दस्ताऐवजच झाला आहे. रमेश पडवळ यांच्यासारख्या युवा पत्रकाराने अथक परिश्रमातून हे पुस्तक साकारले. त्यामुळेच या पुस्तकाचा एक इतिहास निर्माण झाला. नाशिक आकाशवाणी केंद्रावरून सध्या या पुस्तकाचे रोज अभिवाचन सुरू आहे. लोकार्पणानंतर काही दिवसातच प्रकाशन सोहळा ठेवला; मात्र तोपर्यंत या पुस्तकाची पहिली आवृत्ती संपत आली आहे. फार थोड्या पुस्तकांना असे भाग्य लाभते.
विनोद श्रा. पंचभाई हे ‘चपराक’चे हक्काचे सदस्य आहेत. यापूर्वी त्यांची ‘थोडं मनातलं’ आणि ‘मुलांच्या मनातलं’ ही दोन पुस्तके ‘चपराक’ने प्रकाशित केली. त्यांचे तिसरे पुस्तक ‘तिच्या मनातलं’ हे अपेक्षित असताना मध्येच त्यांचे ‘आपले राष्ट्रसंत’ हे पुस्तक प्रकाशित झाले. या साहित्य महोत्सवात भाई काकांच्या पहिल्या पुस्तकाची दुसरी आवृत्तीही प्रकाशित झाली. ‘थोडं मनातलं’ची दुसरी आवृत्ती आणि ‘आपले राष्ट्रसंत’ अशी दोन पुस्तके प्रकाशित होण्याचा मान त्यांना मिळाला आहे. आजकाल कुणी वाचत नाही, असे म्हणणार्‍यांना आम्ही प्रत्यक्ष कृतिशीलतेतून ‘चपराक’ दिली आहे.
कवितासंग्रहाकडे कोणी ढुंकूनही पाहत नाही, असे म्हणत साहित्याचा हा सर्वोत्कृष्ट आविष्कार असलेला प्रकार मागे टाकण्याचे कारस्थान सुरू आहे. ‘चपराक’ने त्या अफवेलाही कधी भीक घातली नाही. अनेक कवितासंग्रह प्रकाशित करून आम्ही कवितासंग्रहाबाबतची अंधश्रद्धा दूर केली आहे. या साहित्य महोत्सवात आम्ही तीन कवितासंग्रह प्रकाशित केले. सुरत (गुजरात) येथील कवयित्री मनिषा वाणी यांचा ‘रे मना’ हा काव्यसंग्रह, पिंपरी येथील ज्येष्ठ कवी शांताराम हिवराळे यांचा ‘अंधारडोह’ आणि लातूर जिल्ह्याच्या देवणहिप्परगा येथील सुरेश धोत्रे यांचा ‘माणूस’ हा काव्यसंग्रह यावेळी प्रकाशित करण्यात आला.
‘चपराक’चा हा सुसाट सुटलेला वारू भविष्यातही असाच बेफाम राहील. मराठीतील जास्तीत जास्त साहित्य प्रकाशात आणण्याचे काम आम्ही नेटाने करू! मराठी भाषेच्या संवर्धनासाठी, आपल्या संस्कृतीच्या जतनासाठी हे कार्य आम्हाला महत्त्वाचे वाटते. ‘चपराक’सारखे दर्जेदार वृत्तसाप्ताहिक, ‘साहित्य चपराक’ हे प्रभावी मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमतेचा ध्यास घेणारी ग्रंथ प्रकाशन संस्था अस्तित्वात आहे तोपर्यंत वाचक कमी होत आहेत, नवोदितांना व्यासपीठ मिळत नाही अशी ओरड कोणीही करू नये! चांगले लिहिणार्‍यांसाठी ‘चपराक’ची दारे कायम खुली आहेत. वाचकांनीही ‘चपराक’चे सभासद होणे, आमच्या उत्तमोत्तम पुस्तकांना प्रतिसाद देणे हे प्रत्येकाचे सांस्कृतिक कर्तव्य आहे. जिवाला डागण्या देणार्‍या अनेक समस्या समोर असतानाही आम्ही हा विडा उचललाय. त्यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने हातभार लावावा. वाचनसंस्कृती कमी होत नाही तर ती झपाट्याने वाढतेय, हे दाखवून देण्याची योग्य वेळ आता आली आहे. आपला सर्वांचा सकारात्मक प्रतिसाद लक्षात घेऊनच आम्ही हे सारे कार्य उभे करू शकलो, भविष्यातही करू याची प्रकाशक या नात्याने ग्वाही देतो.

- घनश्याम पाटील 
संपादक, प्रकाशक 'चपराक' पुणे 
७०५७२९२०९२

No comments:

Post a Comment