Tuesday, June 27, 2017

उमलत्या अंकुरांना बळ द्या!

मोठ्या वृक्षाखाली छोटी झाडं वाढत नाहीत असं म्हटलं जातं. मात्र या मोठ्या झाडांमुळेच नवनवीन झाडे तयार होतात आणि सृष्टीत नवचैतन्य फुलवतात. साहित्याचंही तसंच आहे. (फार तर होतं असं म्हणूया!) अफाट ताकदीच्या बेफाट लेखकांनी नव्या पिढीला ‘विचार’ दिला. चांगलं लिहिणार्‍यांना हेरून त्यांच्या प्रतिभेला खतपाणी घातलं. सध्याच्या काळात मराठीला प्रतिसादशून्यतेचं ग्रहण लागलेलं असताना एकेकाळी मात्र या लेखकांनी अनेक उमलते अंकुर पुढे आणले.
शिवाजी सावंत यांनी ‘मृत्युंजय’ लिहिली; मात्र त्यांना प्रकाशकच मिळत नव्हता. अनेकांचे उंबरठे झिजवूनही निराशाच वाट्याला येत होती. त्यावेळी त्यांनी गदिमांना त्यातील काही प्रकरणं पाठवली. गदिमांनी ती वाचली आणि ‘कॉन्टिनेन्टल प्रकाशन’च्या कुलकर्णींना फोन केला. गदिमा कुलकर्णींना म्हणाले, ‘मुलगी नाकीडोळी नीटस आहे. तुम्ही करून घ्यायला हरकत नाही...’ त्यानंतर शिवाजी सावंत यांच्यासारखा बलाढ्य लेखक मराठीला मिळाला.
कुसुमाग्रजांचंही तसंच! कविता हा साहित्यातील सर्वोत्कृष्ट आविष्कार असला तरी कवितासंग्रह छापण्याचे धाडस फारसे कोणी करत नाही. त्यातही नवोदित कविंच्या वाट्याला तर प्रचंड उपेक्षा आणि अवहेलना येते. तात्यासाहेबही याला अपवाद ठरले नाहीत. या कविता भाऊसाहेब खांडेकरांच्या वाचण्यात आल्या. त्यांनी पदरमोड करून कुसुमाग्रजांचा ‘विशाखा’ हा काव्यसंग्रह प्रकाशित केला. यातूनच मराठीला ‘ज्ञानपीठ’विजेता कवी मिळाला.
ज्येष्ठ कवी रमेश गोविंद वैद्य यांनी एक किस्सा सांगितला. म. दा. भट नावाचे एक विख्यात ज्योतिषी होते. वैद्य त्यांच्या घरी बसले होते. त्याचवेळी तिथे गझलसम्राट सुरेश भट आले. मदा आणि सुरेश भट यांच्यात चर्चा झाली. नंतर मदांनी सुरेश भटांना सांगितले, ‘हे रमेश गोविंद. उत्तम कविता करतात.’ सुरेश भटांनी लगेच त्यांना कविता म्हणायला लावल्या. त्या ऐकल्यानंतर ते म्हणाले, ‘माझ्यासाठी रिक्षा घेऊन ये...’
वैद्यांनी त्यांना ‘कुठं जायचंय?’ असं विचारल्यावर ते म्हणाले, ‘तुम्ही रिक्षा तर आणा.’
वैद्यांनी रिक्षा आणली. सुरेश भट घराबाहेर आले आणि वैद्यांना म्हणाले, ‘बसा रिक्षात.’ ते निमुटपणे रिक्षात बसले. भटांनी पहाडी आवाजात फर्मावले, ‘आकाशवाणीकडे घ्या...’
त्यानंतर ते दोघे पुणे आकाशवाणी केंद्रात पोहोचले. भटांनी तेथील प्रमुखांकडे रमेश वैद्यांना नेले आणि सांगितले, ‘मगाशी जी काही बडबड केली ती इथे करा...’
वैद्यांनी कविता ऐकवल्या. त्यानंतर भट आकाशवाणीतील अधिकार्‍याला म्हणाले, ‘वाट कसली पाहताय? यांच्या कविता आपल्या रसिकांपर्यंत जायला हव्यात...’ खुद्द सुरेश भट एका कविला घेऊन आल्याने त्यांना नकार देण्याची कुणाची बिशाद? रमेश गोविंद वैद्य हे नाव त्यावेळी सर्वप्रथम आकाशवाणीच्या श्रोत्यांपर्यंत गेले.
एकेकाळी बालभारतीत प्रमुख असलेल्या आणि आता महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह असलेल्या माधव राजगुरू यांनाही असाच एक सुखद अनुभव आला. त्यांनी त्यांची एक कविता राम शेवाळकर यांना वाचायला दिली. ती वाचल्यावर शेवाळकरांनी सांगितले, ‘जेवायला बोलवून हातावर बडीसोप ठेऊ नकात. मला तुमच्या सगळ्या कविता वाचायला द्या.’ राजगुरू यांनी त्यांची कवितांची डायरी शेवाळकरांकडे सुपूर्द केली. त्यानंतर काही दिवस गेले. राजगुरूंना शेवाळकरांना प्रतिक्रिया विचारण्याचे धाडस झाले नाही. शेवाळकरांनीही काही कळवले नाही. राजगुरूंनी विषय सोडून दिला आणि एकेदिवशी अचानक पुण्यातल्या एका प्रकाशकांचा त्यांना फोन आला. ते म्हणाले, ‘शेवाळकर सरांनी तुमच्या कविता माझ्याकडे पाठवल्यात. त्याची प्रस्तावनाही त्यांनीच लिहिलीय. त्या प्रकाशित करायच्या आहेत. एकदा येऊन भेटा.’ आणि माधव राजगुरू यांचा कवितासंग्रह वाचकांच्या भेटीस आला.
मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्याबाबतही मी अनेकवेळा हा अनुभव घेतला आहे. महाराष्ट्रातील लिहित्या हातांना ते कायम बळ देतात. प्रकाशक या नात्याने त्यांनी अनेक कवी, लेखकांना माझ्याकडे पाठवले आहे. व्याख्यानाच्या निमित्ताने फिरताना कुणी उपेक्षित कवी भेटला तर त्याचे साहित्य प्रकाशित व्हावे यासाठी त्यांची धडपड असते. इतकेच नाही तर काहींना त्यांच्या योग्यतेनुसार कुठे नोकरी मिळेल काय यासाठीही ते प्रयत्नशील असतात.
दुर्दैवाने सध्या अशा लेखकांची कमतरता जाणवत आहे. ‘एकवेळ माझं साहित्य बाजूला ठेवा पण या नवोदितांचं वाचा’ असं सांगणारे लेखक दुर्मीळ झालेत आणि हीच मराठीची शोकांतिका आहे. जोपर्यंत उमलत्या अंकुरांना आपण बळ देणार नाही तोपर्यंत मराठी भाषा, साहित्य, संस्कृती, समीक्षेला बहर येणार नाही. त्यासाठी प्रस्थापितांनी पुढाकार घेणे, संकुचितपणा बाजूला सारून नव्याचे कौतुक करणे गरजेचे आहे.
महाराष्ट्र सरकार आपल्याकडील महाविद्यालयात मराठी वाङ्मय मंडळ सक्तीचे करतेय. मराठीसाठी ‘सक्ती’ करावी लागते हे आपल्या सांस्कृतिक अधोगतीचे लक्षण आहे. मायमराठीचे जतन आणि संवर्धन करणे हे आपल्या सर्वांचेच कर्तव्य आहे. त्यासाठी आपण जास्तीत जास्त मराठीत बोलायला  हवे. मराठी वाचायला हवे. प्रस्थापितांबरोबरच नवोदितांचे साहित्य वाचून त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे. चांगले वाचक तयार झाले तरच चांगले लेखक निर्माण होतील. त्यामुळे लेखकांनी समाजाभिमुख होणे जितके गरजेचे आहे त्याहून समाजाने साहित्याभिमुख होणे जास्त आवश्यक आहे. तसे झाले तर मराठी भाषेच्या भवितव्याची चिंता करण्याचे कारण नाही. प्रत्येकाने आपापली जबाबदारी लक्षात घेऊन खारीचा वाटा उचलला तरी मराठी ही जगातली प्रमुख भाषा होऊ शकेल.
- घनश्याम पाटील, पुणे
7057292092

Tuesday, June 20, 2017

इतिहासाचे भीष्माचार्य!

असे म्हणतात की, एकेक पायरी सोडवत गेल्यास गणित सुटते; मात्र इतिहासाचे तसे नसते! इतिहासलेखन जेव्हा पूर्ण होते तेव्हाच त्याला खरे फाटे फुटतात! म्हणूनच इतिहास लेखन हे आत्यंतिक जिकिरीचे आणि कष्टाचे काम असते. त्यासाठी प्रचंड अभ्यास लागतो. तटस्थ वृत्ती लागते. ते जीवनध्येयच बनायला हवे. महाभारतकार व्यास मुनींनी म्हटलंय की, ‘इतिहास ही राष्ट्राची ज्योत आहे’ आपल्या राष्ट्राचा उज्ज्वल आणि स्फूर्तिदायी इतिहास समाजापुढे यावा यासाठी अनेकजण प्रामाणिकपणे झटत असतात. ज्यांना इतिहासलेखन क्षेत्रातील भीष्माचार्य म्हटले जाते असे बहुव्यासंगी संशोधक वा. सी. बेंद्रे हे त्यापैकीच एक!
13 फेब्रुवारी 1894 ला पेण येथे जन्मलेल्या बेंद्रे यांनी 1918 ला प्रथम भारत इतिहास संशोधक मंडळात पाऊल टाकले आणि नंतर हयातभर स्वतःला महाराष्ट्राच्या इतिहास संशोधनासाठी वाहून घेतले. त्यांनी महाराष्ट्राचा ‘17 व्या शतकाचा इतिहास’ हे संशोधनाचे क्षेत्र निवडले. एक साधन-संग्राहक, साधनसंपादक, साधनचिकित्सक, संशोधक व इतिहासकार अशा भूमिका त्यांनी समर्थपणे पार पाडल्या. सन 1928 मध्ये शिवशाहीच्या इतिहासाचा प्रास्ताविक खंड ‘साधन चिकित्सा’ हा त्यांचा पहिला ग्रंथ प्रसिद्ध झाला. त्याद्वारे त्यांनी नवीन अभ्यासक आणि संशोधकांना बहुमोलाचे मार्गदर्शन केले. महाराष्ट्राच्या राष्ट्रीय इतिहासाची रचना करणे हेच त्यांचे जीवनध्येय होते. बेंद्रे यांचे अफाट कार्य, चिकाटी व इतिहासाविषयीचा त्यांचा अभ्यास पाहून 1938 मध्ये त्यांना खास शिष्यवृत्ती मिळाली व ते हिस्टॉरिकल रिसर्च स्कॉलर म्हणून इतिहास संशोधनासाठी युरोप व इंग्लंडला गेले. पेशवे दप्तरातील सुमारे चार कोटी विस्कळीत कागदपत्रांचे कॅटलॉगिंग व विषयवार मांडणी करण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी केले.
त्यावेळी इब्राहिम खान या परदेशी चित्रकाराने काढलेले मुस्लिम पेहरावातील छ. शिवाजी महाराजांचे चित्र प्रचलित होते. ते योग्य नाही हे बेंद्रेंच्या लक्षात आले होते. त्यामुळे शिवरायांच्या मूळ चित्राच्या संशोधनासाठी ते पुढे सरसावले. मॅकेनझीच्या ग्रंथाचे अवलोकन करताना त्यांना व्हलेंटाईन या डच चित्रकाराने काढलेले सुरतेच्या वखारीतील तिथल्या गव्हर्नराच्या भेटीचे महाराजांचे चित्र मिळाले. ज्यावेळी ते इंग्लंडला गेले त्यावेळी त्यांनी प्रथम या चित्राची खात्री केली. हे चित्र पुढे आणण्यासाठी ‘इंडिया हाऊस’कडून परवानगी मिळवली आणि पुण्याच्या शिवाजी मंदिरात साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांनी ते प्रसिद्ध केले. आज आपल्या सरकारी कार्यालयात लावले जाणारे छत्रपती शिवरायांचे हेच ते चित्र! वा. सी. बेंद्रे यांची ही कामगिरी इतिहास संशोधन क्षेत्रात उत्तुंग ठरली.
त्याकाळी संभाजी महाराजांच्या जीवनावर मराठी भाषेत पुष्कळ नाटके लिहिली गेली. त्यातील बहुतेक नाटकात संभाजीराजे व्यसनाधीन, बदफैली, व्यभिचारी, दुर्वर्तनी असेच चित्र नाटककारांनी उभे केले होते. सोनाबाई केरकर या पहिल्या महिला नाटककार. 1886 साली त्यांनी संभाजीराजांचे चरित्र लिहिले होते. त्यातही राजांचे असेच वर्णन होते. इतिहास संशोधनाच्या अपुर्‍या साधनांमुळे छ. संभाजीराजांची मलिन झालेली प्रतिमा प्रथम धुवून काढण्याचे प्रचंड मेहनती काम बेंेद्रे यांनी केले. त्यासाठी त्यांनी चाळीस वर्षे संशोधन केले. परदेशात जाऊन साधने मिळवली. इंग्लंडहून त्यांनी 25 खंड होतील इतकी कागदपत्रे भारतात आणली. पुढे सन 1958 साली ‘छ. संभाजीराजांचे चरित्र’ हा 650 पानांचा चिकित्सक ग्रंथ त्यांनी लिहून पूर्ण केला. त्यामुळे संभाजीराजांची युद्धनीती, त्यांची धर्मप्रवणवृत्ती, त्यांचा तेजस्वी पराक्रम लोकांना ज्ञात झाला. मराठ्यांची अस्मिता ठरणार्‍या या राजांच्या बदनामीचा कलंक पुसून काढण्याचे काम करणार्‍या या ग्रंथाच्या प्रसिद्धीसाठी तेव्हा स्व. यशवंतराव चव्हाण यांनी सात हजार रूपयांचे अनुदान दिले होते. छत्रपती संभाजीराजांची समाधी वढू ब्रुद्रुक येथे आहे हे सर्वप्रमथ त्यांच्याच लक्षात आले. त्यासाठीचे त्यांचे संशोधन महत्त्वाचे ठरले.
स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रेरणेने त्यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचेही चरित्र लिहिले. मालोजीराजे, शहाजीराजे, शिवाजी महाराज यांची चरित्रे लिहिली. विजापूरची आदिलशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही, शिवराज्याभिषेक प्रयोग, संत तुकाराम महाराजांचे अप्रकाशित अभंग, साठहून अधिक ग्रंथांचे लेखन, वयाच्या ऐंशीव्या वर्षी लिहिलेला ‘राजाराम चरित्रम्’ हा ग्रंथ, महाराष्ट्र इतिहास परिषदेची स्थापना अशा अफाट कार्यामुळे ते इतिहास संशोधन क्षेत्रातील भीष्माचार्य ठरतात. आपल्या सिद्धहस्त लेखणीद्वारे हे अफाट कार्य उभे करतानाच त्यांनी हुंडाविरोधी चळवळही उभी केली. ब्रदरहुड स्काऊट संघटना काढली. वयाच्या 90 व्या वर्षी म्हणजे 16 जुलै 1984 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांनी उभ्या केलेल्या अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेला त्यांची नात साधना डहाणूकर यांनी दीड लाख रूपये देणगी दिली. त्यातून दरवर्षी एका इतिहास संशोधकाला कै. वा. सी. बेंद्रे पुरस्कार दिला जातो. यंदाचा (2017) पुरस्कार संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांना देण्यात आला.
जाता जाता एक गोष्ट मात्र प्रांजळपणे सांगाविशी वाटते. प्रारंभी उल्लेख केल्याप्रमाणे इतिहास लेखन जिथे संपते तिथूनच त्याला खर्‍याअर्थी फाटे फुटतात. बेंद्रे यांनी छत्रपती संभाजीराजांचे ‘चंपा’ नावाच्या एका रजपूत मुलीशी लग्न झाल्याचे लिहिले आहे. या विवाहाचे सविस्तर वर्णनही त्यांनी केले आहे. वस्तुतः त्यावर पी. आर. गोडे या संशोधकाने शोधनिबंध लिहून ही घटना नंदुरबारच्या शंभूराजे देसाई यांच्याबाबत घडल्याचे सप्रमाण सिद्ध केले आहे. तरीही नुकत्याच प्रकाशित झालेल्या त्यांच्या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीतून हा मजकूर काढून टाकण्यात आला नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतिथी फाल्गुन वद्य तृतिया, शके 1551, (19 फेब्रुवारी, सन 1630) ही नक्की करण्याचे अभूतपूर्व कामही वा. सी. बेंद्रे यांनीच केले. या महान इतिहास संशोधकाची नव्या पिढीला माहिती व्हावी आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता जपली जावी यासाठी त्यांचे महाराष्ट्रात यथोचित स्मारक होणे गरजेचे आहे. त्यांना भावपूर्ण आदरांजली!
- घनश्याम पाटील, पुणे
7057292092

Tuesday, June 13, 2017

अफाट प्रतिभेचे धनी!

लोककवी मनमोहन नातू आणि रॉय किणीकर या अफाट प्रतिभेच्या बेफाट अवलियांनी आपल्या कुटुंबाची होणारी परवड लक्षात न घेता केवळ साहित्यासाठीच स्वतःला वाहून घेतले. दोघेही स्वच्छंदी आणि बेफिकीर मनोवृत्तीचे; मात्र सरस्वती मातेच्या दरबारातले सच्चे पुजारी! एकेठिकाणी मनमोहनांनी लिहून ठेवले आहे, ‘‘भविष्यात जेव्हा कधी दगडाचे भाव स्वस्त होतील, तेव्हा, पुतळा माझा उभारणार्‍यांनो, आधी किणीकर खोदा!’’
मराठीत रूबाई हा प्रकार माधव जुलियन यांनी आणला हे त्रिकालबाधीत सत्य असले तरी त्यात ‘प्राण’ फुंकण्याचे काम मात्र रॉय किणीकर नावाच्या एका कलंदर माणसाने केले. कथा, कविता, नाटक अशा सर्वच साहित्यप्रकारात लीलया संचार करणारे रॉयसाहेब हे संपादन क्षेत्रात मैलाचा दगड ठरावेत. आपल्या संपादकीय कारकिर्दीत त्यांनी अनेक नवनवीन प्रयोग करून मराठी वाचकांची दर्जेदार वाचनाची भूक भागवली.
एका ध्येयाने झपाटून त्यांनी आपली कलासाधना अविरत सुरूच ठेवली. नियतीने त्यांची पदोपदी परीक्षा बघितली; मात्र अशा गोष्टींना न जुमानता त्यांनी आपल्या चेहर्‍यावरील स्मितरेषा कधीही ढळू दिली नाही. प्रचंड विद्वान असणारे रॉयसाहेब विनोदी वृत्तीचे होते. त्यांच्याबाबतचा एक भन्नाट किस्सा याठिकाणी आवर्जून सांगावासा वाटतो.
दत्तगुरूवरील एका चित्रपटाचे चित्रिकरण सुरू होते. श्री दत्त त्यांचे भगवे कपडे परिधान करून शिष्यांच्या लवाजम्यासह चाललेत आणि त्यांच्यामागे काही कुत्री येताहेत असा प्रसंग चित्रीत करायचा होता. मात्र कॅमेर्‍यात हा ताफा येत नव्हता. कुत्री काही दत्ताच्या मागे येईनात. काहीवेळा कुत्री पुढे तर दत्तगुरू मागे आणि काहीवेळा दत्तगुरू पुढे तर कुत्री मागे, अशी कवायत चालली होती. हा सगळा गमतीशीर प्रकार पाहून किणीकर पुढे सरसावले आणि दिग्दर्शकाला सांगितले की, ‘‘हा प्रसंग मी पाच मिनिटात पूर्ण करतो.’’ आधीच वैतागलेल्या दिग्दर्शकाने त्यांना अनुमती दिली.
किणीकरांनी हुकूम सोडला, ‘‘अरे, जरा पाव किलो मटण आणा.’’   एकतर श्रीदत्तावरील चित्रपट; त्यात बहुतेक कलाकार अस्सल सदाशिवपेठी! त्यामुळे सगळ्यांनाच हा काय प्रकार ते कळेना. शेवटी त्यांच्या आदेशाप्रमाणे मटण आणले गेले. त्यांनी सांगितले, ‘‘ते टाका आता दत्ताच्या झोळीत!’’
दत्ताच्या झोळीत मटण टाकले आणि त्या वासाने कुत्र्यांनी त्यांचा पिच्छा पुरवला. खरोखरच पाच मिनिटात तो प्रसंग चित्रीत झाला.
त्यांच्या ‘उत्तररात्र’ च्या पहिल्या पानावर एक रूबाई आहे. ती अशी-
पूर्वरात्र एक वेदना घेऊन येते
मध्यरात्र एक स्वप्न देऊन जाते
आणि उत्तररात्र म्हणजे
जागर... यात्रेचे पुन्हा प्रस्थान!

त्याखाली नाव आहे ‘रवीन्द्रनाथ ठाकूर’ यांचे! मात्र गुरूवर्य रवीन्द्रनाथ टागोर यांच्याच वाटाव्यात इतक्या या अर्थपूर्ण ओळी खुद्द किणीकर साहेबांच्याच आहेत.
सदाशिव पेठेतील दीड खोल्यात आपला संसारगाडा चालविणार्‍या किणीकरांनी ‘खजिन्याची विहीर’ हे नाटक लिहून नाट्य रसिकांना एक विलक्षण अनुभव मिळवून दिला.
रॉयसाहेबांच्या रूबाईतला टवटवीतपणा अजरामर आहे. मराठी साहित्यात या माणसाने जे भरीव योगदान दिले त्याला तोड नाही. त्यांच्या  जबरदस्त क्षमतेचा अंदाज येण्यासाठी त्यांच्या काही रूबाया सांगतो-

इतिहास घडविला त्यांची झाली कीर्ती
इतिहास तुडवला त्यांची देखील कीर्ती
गहिवरला अश्रू कीर्तिस्तंभावरला
पिंडास कावळा अजून नाही शिवला

येताना त्याने दार लावले नाही
जाताना त्याने वळून पाहिले नाही
येईन म्हणाला, पाहिन वाट म्हणाली
दारात अहिल्या शिळा होऊन बसली

पण लिहावयाचे लिहून झाले नाही
पण सांगावयाचे सांगून झाले नाही
संपली कथा जी कुणी ऐकली नाही
संपली रात्र, वेदना संपली नाही

खांद्यावर घेऊ नको सोन्याचा सूळ
चार्वाक म्हणाला, पुनर्जन्म हे खूळ
देहाला कसलें आहे पुण्य नि पाप
आत्म्यास भोगुं द्या अमरत्वाचा शाप

कलेचा ध्यास घेऊन मराठी मनावर अधिराज्य गाजवणार्‍या या महान साहित्यिकास आमची प्रेमाची मानवंदना!!
- घनश्याम पाटील, पुणे
7057292092

Sunday, May 28, 2017

भंपक ‘पू’रोगामी विश्‍व!

प्रत्येक विचारधारेत, संस्थेत, पक्षात काही घरभेदी असतात. मूळ उद्दिष्टांपासून दूर जात ते त्याचा अतिरेक करतात. थोडक्यात काय तर ही ‘बांडगुळं’ असतात. झाडाच्या ज्या फांदीवर हे बसलेले असतात तीच फांदी हे महाभाग तोडतात. त्यांना त्याचं काही गांभीर्यच नसतं. गांभीर्य नसतं असं म्हणण्यापेक्षा मुळात तितकी अक्कलच नसते. मध्यंतरी काही कट्टरतावाद्यांनी हिंदू आणि हिंदुत्त्व हे शब्दही बदनाम केले होते. अशा वाचाळवीरांची पुरोगाम्यातील विकृत आवृत्ती म्हणजे विश्‍वंभर चौधरी!
पुरोगामी हा शब्द ‘ढोंगी’ या शब्दाला समानार्थी झालाय. त्यात पू भरल्याने हे रोगी झालेत. आपल्या भंपकपणामुळे वाटेल त्या थराला जायचे, वाटेल तसे तारे तोडायचे हेच त्यांचे जीवितकर्म झालेय. एखादी चांगली योजना पुढे फसावी तसे पुरोगामी विचारधारेचे झालेय. ‘पुरोगामी महाराष्ट्र’ ही व्यापक संकल्पना इतकी खुरटी झालीय की त्याला काही अर्थच नाही. पूर्वी धर्मावरून घसरणारे आता जातीवर उतरतात. त्यातूनही काही साध्य होत नाही म्हणून एखाद्या साहित्य संस्थेने एखाद्या हिंदुत्त्ववादी विचारसरणीच्या लेखकाच्या कलाकृतीला पुरस्कार दिला म्हणून त्याचेही राजकारण करतात. कोणतेच मुद्दे नसल्याने यांचे सैरभैर होणे समजून घेण्यासारखे असले तरी यामुळे ‘पुरोगामी’ या संकल्पनेचे मात्र बारा वाजले आहेत.
महाराष्ट्र साहित्य परिषद ही साहित्यातील मातृसंस्था आहे. जवळपास 111 वर्षे अव्याहतपणे आणि साहित्यिक निष्ठेने ही संस्था काम करतेय. ही संस्था विविध साहित्य प्रकारातील पुस्तकांना दरवर्षी पुरस्काराने सन्मानीत करते. यंदा ‘स्तंभलेखन’ या साहित्यप्रकारासाठी डॉ. सच्चिदानन्द शेवडे यांच्या ‘सेक्युलर्स नव्हे फेक्युलर्स’ या पुस्तकाची निवड झाली. पुरोगाम्यांच्या ढोंगीपणाचा लेखाजोखा या पुस्तकात मांडलाय. सुप्रसिद्ध पत्रकार भाऊ तोरसेकर यांची त्याला विवेचक प्रस्तावना आहे. शेवडे यांच्या अभ्यासपूर्ण लेखांचा उत्तम आविष्कार या पुस्तकात आहेच; पण केवळ भाऊंच्या या प्रस्तावनेसाठीही हे पुस्तक विकत घ्यायला हरकत नाही.
हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला आणि विश्‍वंभर चौधरी यांच्यासारख्या तथाकथित पुरोगाम्यांची मळमळ, खदखद बाहेर पडली. त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकली. ती अशी होती -
‘‘मसाप या अतिशय सुमार दर्जाच्या साहित्यिक संस्थेनं ’सेक्युलर नव्हे, फेक्युलर’ नावाच्या (नावातच सुमारपण दाखवणार्‍या) पुस्तकाला पुरस्कार दिला म्हणून महाराष्ट्रातील पुरोगामी विश्वात खळबळ माजली आहे. ती खळबळ अप्रस्तुत आहे कारण मसाप नावाच्या धोतर्‍याच्या झाडाला हापूस आंबे लागतील अशी वृथा अपेक्षा पुरोगामी ठेवत आहेत! हा दोष सर्वस्वी पुरोगाम्यांचाच.
मुळात या ’मसाप’ मध्ये ’साहित्य’ शोधायला पुरोगाम्यांनी जावेच कशाला? ही संस्था एखाद्या गणपती मंडळासारखी किंवा दहीहंडी मंडळासारखी नाहीय का? वर्षाला एकदा 2500000 रुपयांचा शासकीय रमणा घेऊन संमेलनाचा ऊरूस भरवणे आणि शासनात कोणते वारे वाहते ते कुक्कुटयंत्राच्या संवेदनशीलतेनं बघून काही पुरस्कार देणे एवढंच या संस्थेचं सध्या जिवीतकार्य! माझा तर अगदी अलीकडे असा समज झाला आहे की साहित्य परिषद म्हणजे साहित्य संमेलनाला लागणारे साहित्य (तंबू, सतरंज्या, खुर्च्या आदि) बाळगून असलेली परिषद! मला तरी विंदा करंदीकर किंवा मंगेश पाडगावकर कधी टिळक रस्त्याला दिसलेले नाहीत. माझ्यासारख्या सामान्य वाचकाच्या मनात तरी या संस्थेची एवढीच प्रतिमा आहे.
तेंव्हा एवढ्या प्रतिष्ठीत संस्थेकडून कोणत्याही पुस्तकाला पुरस्कार दिला तरी पुरोगाम्यांना काय फरक पडतो? सुमारांच्या सद्दीत दुसरे काय अपेक्षित असते?’’
विश्‍वंभर चौधरी यांनी यात जी अक्कल पाजळली आहे ती त्यांच्या बिनडोकपणाचा पुरावा आहे. पहिली गोष्ट म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून कार्यरत असलेल्या संस्थेला ‘सुमार’ समजणे हे यांच्या सडलेल्या मेंदूचे लक्षण आहे. ‘पुरोगामी विश्‍वात खळबळ’ म्हणजे त्यांना काय अपेक्षित आहे? असे काही ‘पुरोगामी विश्‍व’ अस्तित्वात आहे का? म्हणजे घरातल्या सिलेंडरवर पातेल्यात पाणी उकळायला ठेवायचे आणि ‘ज्वालामुखी खदखदू लागला’ असं म्हणायचं अशातला हा प्रकार झाला. गणपती मंडळ किंवा दहीहंडी मंडळाच्या माध्यमातून काय पुरोगामी विचार देता येतो हे जितेंद्र आव्हाडांनी दाखवून दिले आहेच. म्हणजे पुरोगामी म्हणून मिरवायचे आणि फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव घेत दहीहंड्या लावायच्या, तिथे बायका नाचवायच्या!! असे गोरखधंदे महाराष्ट्र साहित्य परिषदेने केले नाहीत.
पंचवीस लाखाचा ‘रमणा’ घेणे हे त्यांना या संस्थेचे जीवितकार्य वाटते. यातली पहिली गोष्ट म्हणजे संमेलन भरवणे हे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे काम नाही. ते निमंत्रक संस्था आणि अखिल भारतीय साहित्य महामंडळ ही संस्था भरवते. त्यामुळे या निधीचा आणि मसापचा बादरायण संबंध नाही. आयुष्यभर रमणा घेऊनच जगणार्‍या विश्‍वंभरला असेच शब्द सुचणार. त्यांनी कष्टाने चार पैसे मिळवलेत हे कुणाला ठाऊक आहे का? ते जी तथाकथित एनजीओ चालवतात त्यासाठी कुणापुढे तरी वाडगा पसरून, खरीखोटी कागदपत्रे सादर करून, अंबानी-अदानीच्या मागे लागून, किंवा रस्त्यावरचा चोर, लुटारू, अगदी बेकायदा टपरी लावणारासुद्धा; अशा लोकांकडून पैसे घेऊन अशा एनजीओ चालतात. विश्‍वंभर चौधरींनी कोणत्या व्यवसायातून इतके पैसे मिळवले आणि सामाजिक काम केले, त्यांच्या संस्थेच्या या अमुक तमूक कामातून हे पैसे मिळाले हे त्यांनी जाहीर करावे! किंवा त्यांच्या या कामातून, विचारातून महाराष्ट्राला कोणता नवा पैलू मिळाला, कोणता प्रकल्प मार्गी लागला, बेरोजगारी संपली, साहित्यिक निर्माण झाले हे जाहीर करावे. त्यातून त्यांचे योगदान स्पष्ट होईल. माझ्यासारखा प्रकाशक कष्टाने चार पैसे मिळवतो. मसापचे पदाधिकारी अशा ‘रमण्या’वर पोट भरत नाहीत. त्यांच्या उत्पन्नाची वेगळी साधने आहेत. विश्‍वंभर चौधरी मात्र त्यांच्या ज्या काही पर्यावरणवादी संस्था आहेत त्यावर जगतात.
यांना टिळक रस्त्यावर कधी पाडगावकर, विंदा दिसले नाहीत असे त्यांचे म्हणणे आहे. उद्या ते म्हणतील की, मला सेनापती बापट रस्त्यावर कधी सेनापती बापट किंवा टिळक रस्त्यावर लोकमान्य टिळक दिसलेच नाहीत! साहित्य संमेलनासाठी लागणारे तंबू, सतरंज्या, खुर्च्या बाळगणारी ही संस्था असा यांचा ‘समज’ आहे. मुळात ही मंडळी समजावर जगतात. ना त्यांचा अभ्यास असतो, ना जीवनानुभव समृद्ध असतात. ‘समजा’तच जगणारे काहीही विचार मांडू शकतात. त्यांना कोण आवरणार? यांचा वास्तव जगाशी काही संबंधच नाही. हेच वास्तव तर शेवडे यांच्या या पुस्तकात मांडले आहे. सुप्रसिद्ध पत्रकार भाऊ तोरसेकर यांची या पुस्तकाची प्रस्तावना प्रत्येकाने वाचलीच पाहिजे. पुस्तक सोडा, पण ही प्रस्तावना वाचूनच विश्‍वंभर चौधरी यांच्यासारख्यांचा जळफळाट होणे आणि ते मनोरूग्ण होणे अपेक्षित होते. घडलेही तसेच.
दलित चळवळीचे अभ्यासक रावसाहेब कसबे हे साहित्य परिषदेचे अध्यक्ष आहेत. शिवाजीराव कदम, उल्हास पवार, यशवंतराव गडाख हे विश्‍वस्त मंडळावर आहेत. ही मंडळी हिंदुत्त्ववादी नाहीत. साहित्य परिषदेची एक यंत्रणा आहे. त्यांच्याकडे पुरस्कारासाठी पुस्तके पाठवावी लागतात. आलेल्या पुस्तकातून त्या त्या साहित्य प्रकारातील पुस्तके संबधित परीक्षक निवडतात. यंदा स्तंभलेखन या साहित्य प्रकारासाठी मी परीक्षक होतो आणि यातील सच्चिदानन्द शेवडे यांचे हे सर्वोत्तम पुस्तक आहे. या निवड प्रक्रियेत मसापच्या कोणत्याही पदाधिकार्‍यांनी कसलाही हस्तक्षेप केला नाही. मुळात हा पुरस्कार ‘विचारधारेला’ नाही तर ‘साहित्यप्रकाराला’ दिलाय हे लक्षात घ्यायला हवे. मुख्य म्हणजे या पुस्तकातील लेख एका समाजवादी विचारधारेच्या वृत्तपत्रातूनच सदर स्वरूपात प्रकाशित झालेले आहेत.
दुसरे म्हणजे विश्‍वंभर चौधरी काही लेखक नाहीत. माझ्या माहितीनुसार ते महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सभासदही नाहीत. मग ही जळाऊ वृत्ती कशासाठी? मसापच्या पुरस्कारावर त्यांचे काही आक्षेप असतील तर त्यांनी त्यांच्या तीर्थरूपांच्या नावे एखादी साहित्यिक संस्था काढावी आणि पुरूषोत्तम खेडेकरांपासून श्रीमंत कोकाटेपर्यंत हवे त्यांना पुरस्कार द्यावेत. त्यांना अडवतंय कोण? स्वतः तर काही विधायक करायचे नाही आणि इतर कोणी केले तर त्रागा करायचा हे कसले लक्षण?
अण्णा हजारे, केजरीवाल, मेधा पाटकर अशा परजीवी लोकासोबत राहून विश्‍वंभर चौधरी यांच्यासारख्या अनेकांच्या डोक्याचा ‘केेमिकल लोच्या’ झालाय. द्वेष पसरवणं, वाद निर्माण करणं, आक्रस्ताळेपणा करणं आणि आपली असभ्य, उर्मट वृत्ती दाखवून देत येनकेनप्रकारे चर्चेत राहणं हा यांचा आवडता उद्योग. प्रत्येक घटनेबाबत आपले मत असलेच पाहिजे आणि ते ग्राह्य धरले पाहिजे या दुराग्रहामुळे त्यांचा अहंकार सातत्याने दुखावला जातो. ‘अभ्यासाविन प्रगटे तो एक मूर्ख’ हे रामदास स्वामींचे तत्त्वज्ञान यांच्याकडे पाहून पूर्णपणे पटते.
महाराष्ट्र साहित्य परिषदेने यंदा सर्व विचारधारांच्या सर्व लेखकांचा पुरस्कार देऊन गौरव केलाय. अर्थात यात कुणाचीही विचारधारा बघितली नाही तर त्यांची साहित्यिक ‘कलाकृती’ बघितली. यांचा आक्षेप मात्र फक्त सच्चिदानन्द शेवडे यांच्या पुस्तकावरच आहे. मनाच्या या कोतेपणामुळेच महाराष्ट्र कधीही पुरोगामी राज्य होऊ शकले नाही आणि अशा चिरकुटांची बौद्धिक दिवाळखोरी पाहता भविष्यातही ते कधी होईल असे वाटत नाही, हेच यानिमित्ताने अधोरेखित करावे वाटते.
- घनश्याम पाटील, पुणे
7057292092

Saturday, May 27, 2017

मृत्युंजयी!!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लातूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर होते. निलंगा येथून परतताना त्यांच्या विमानाचा छोटासा अपघात झाला. सुदैवाने त्यात कुणालाही काही लागले नाही.  या दुर्घटनेमुळे महत्त्वाच्या व्यक्तिंच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न मात्र पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुख्यमंत्र्यांचे विमान कोसळणे हा निव्वळ अपघात असला तरी या घटनेकडे दुर्लक्ष करता येण्यासारखे नाही. या अपघातातून बचावल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील 11 कोटी 20 लाख जनतेचे, आई भवानीचे, पांडुरंगाचे आशीर्वाद त्यांच्या पाठिशी असल्याचे सांगितले आहे. हेलिकॉप्टरच्या तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्यावर मुख्यमंत्री थोडक्यात बचावल्याची बातमी समाजमाध्यमांत आली आणि अनेक प्रतिक्रियावाद्यांच्या अनेक प्रवृत्तींचे दर्शन घडले.
‘ये, उग काई बी बोलू नका बे, वजन वाडल्यानं काय इमान पडत न्हाय’, ‘आज अमावस्या असल्यानं मुख्यमंत्र्यांनी दौरा टाळायला हवा होता, भूतं सोडतील का?’, ‘मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांचा हा तळतळाट आहे’, ‘हा पुनर्जन्म समजून आता तरी मामुंनी शेतकर्‍यांचे कर्ज माफ करावे’, ‘यातून हा वाचला हे महाराष्ट्राचे दुर्दैवच’, ‘विलासरावांच्या जयंतीच्या पूर्वदिनी त्यांनी ह्याला पाडले’ ‘ह्ये लोकान्सी तर फशीवत्यातच पर यांनी यमदेवालाबी फसवलं’, ‘जर कुणाला भल्लाळदेवची गाडी बनवायची असंल तर त्यांनी निलंग्यात जावं. तिथं हेलिकॅप्टरची पंख पडल्यात’ या व अशा स्वरूपाच्या अनेक प्रतिक्रियांचा पाऊस समाजमाध्यमांत पडला.
काही तथाकथित पुरोगाम्यांनी ही दुर्घटना दुर्दैवी असल्याचेही सांगितले; मात्र त्याचवेळी ‘मुख्यमंत्र्यांविषयी इतके सुमार विनोद होतात म्हणजे त्यांची लोकप्रियता किती घसरलीय? सोशल मीडियावर ‘लाफ्टर चॅलेंज’चा मुकाबला का सुरू झाला?’ असाही प्रश्‍न उपस्थित केला. ‘इथं हेलिकॉप्टर पडून काही होत नाहीये, तिथं मुंडेंच्या गाडीला धक्का लागून मृत्यू होतोय... दया कुछ तो गडबड है...?’ अशीही कुजकट शंका काहींनी उपस्थित केली; तर ‘ह्याची पुण्याई म्हणून हा वाचला म्हणता; मग आर. आर. आबा, विलासराव, महाजन, मुंडे यांची पुण्याई नव्हती का?’ असाही प्रश्‍न काहींनी उपस्थित केला. या सगळ्यावरून एकंदरीत आपली वाटचाल कोणत्या दिशेने सुरू आहे हे लख्खपणे दिसते.
माणसाला तंत्रज्ञानाचं वरदान लाभलंय असं म्हणताना ते टोकाचं मारक ठरतंय, हेच आपल्या लक्षात येत नाही. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आलाय आणि प्रत्येक स्थानिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घटनेबाबत आपले मत असलेच पाहिजे असा त्यांचा अट्टाहास असतो. मग ‘विचारवंत’ म्हणून मिरवण्याचा त्यातला त्यात सोपा पर्याय म्हणजे ‘व्हाट्स ऍप’ला जे काही येईल ते जसेच्या तसे पुढे पाठवणे....! या तंत्रज्ञानाच्या गैरवापरापुढे माणसाने त्याची बुद्धी वापरणे सोडून दिले आहे की काय, अशी शंका येण्याइतपत परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्य म्हणजे कधी नव्हे इतका जातीयवाद पसरवला जात असून यात सुशिक्षितांचे प्रमाण मोठे आहे.
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना सातत्याने जातीवरून डिवचले जातेय, हे जगजाहीर आहे. पुरोगाम्यांचे ‘जाणते राजे’ म्हणून मिरवून घेणार्‍या शरद पवार यांनी तर ‘पूर्वी शाहू महाराज पेशव्यांची नेमणूक करायचे आता पेशवे महाराजांची नेमणूक करतात’ असे उघडपणे बोलून त्यांच्या मनातील खदखद व्यक्त केली होती. बी. जी. कोळसे पाटील यांच्यासारख्या एकेकाळी न्यायाधीश असलेल्या माणसाने कुलभूषण जाधव यांचा खटला लढवणार्‍या वकिलाची ‘जात’ काढून त्यांच्या ‘काळ्याकुट्ट’ मनोवृत्तीचे दर्शन घडवले. कोणतीच भूमिका न घेणं ही एकमेव भूमिका घेणार्‍या साहित्य क्षेत्रानं याविषयी मूग गिळून गप्प बसणं पसंत केलं असताना संजय सोनवणी यांच्यासारखा लढवय्या लेखक मात्र या प्रवृत्तीला अपवाद ठरला. त्यांनी ‘कोळश्यां’ची जाहीर लक्तरे काढून हे समाजासाठी किती घातक आहे याची जाणीव करून दिली. मुख्यमंत्र्यांच्या विमानाच्या अपघाताने लोकांची मानसिकता दिसून येतेय. त्यावरून आपल्या राष्ट्राचे भवितव्य काय असेल आणि आपण कोणत्या दिशेने जातोय याचे चित्र स्पष्ट होते.
माणसाच्या मरणावर टपून बसलेली गिधाडं पुरोगामीपणाची अक्कल समाजाला शिकवतात. एखाद्यावर कोणतेच आरोप करणे शक्य नसेल तर त्याची जात काढायची हे शेवटचे अस्त्र त्यांना ठाऊक असते. देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतही तेच होतेय. खरंतर मुख्यमंत्री या नात्यानं महाराष्ट्राचं नेतृत्व करणारा हा नेता. त्यांच्यासोबत वैचारिक मतभेद असू शकतात; पण त्यांचे जगणे का नाकारावे? तो जगला तर भांडत बसू! त्यातून काही विधायक हाती येईल! पण अपघातातून तो बचावला तर यांची विनोदबुद्धी जागी होते!! यालाच तर द्वेष म्हणतात! बरं, हे दीर्घद्वेषी लोक मरणाचाही आनंद साजरा करतात. त्यापुढे जाऊन गांधी हत्येनंतर कसे पेढे वाटले गेले इथपासून ते सावरकरांनी नथुराम गोडसेला ‘यशस्वी व्हा, काम फत्ते केल्याशिवाय परत येऊ नका’ हे कसे सांगितले इथपर्यंतचे दाखले देतात. ते देताना ते या प्रत्येक घडामोडीचे ‘प्रत्यक्ष साक्षीदार’ होते, असा त्यांचा आविर्भाव असतो!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अपघातानंतर अजित पवार यांनी मात्र अतिमहत्त्वाच्या व्यक्तिंच्या संरक्षणाचा प्रश्‍न उपस्थित केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे वेळोवेळी ‘मेंटनंस’ होत नसल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. ही अतिशय चिंतेची बाब आहे. राज्याचा प्रमुख असलेल्या माणसाच्या जीवाची काळजी घेणे हे आपले कर्तव्यच आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे विमान हे जगातल्या काही अव्वल विमानांपैकी एक आहे. त्याचा वैमानिक हा अत्यंत अनुभवी आणि कुशल आहे; मात्र महाराष्ट्राच्या मंत्रालयाकडे हे एकच अत्याधुनिक विमान आहे. याचा वापर केवळ राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी महत्त्वाच्या दौर्‍यासाठी करावा असा संकेत आहे. तो संकेत धुळीस मिळवून कोणताही मंत्री त्याच्या गरजेसाठी या विमानाचा वापर करतो. इतकेच नाही तर निवडणुकीत प्रचारदौर्‍यासाठीही या विमानाचा वापर केला जात असल्याचे पुढे येत आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एक सूचना मांडली आहे. ‘प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक हेलिपॅड असावे. त्याची योग्य ती निगाही राखली जावी. अतिमहत्त्वाच्या व्यक्ती त्या त्या जिल्ह्यात आल्यास त्याच ठिकाणी सुरक्षितपणे उतरतील. तिथून पुढचा प्रवास इतर वाहनाने करणे सहज शक्य असते.’ त्यांच्या या सूचनेचाही विचार केला जावा.
शासकीय विमान, त्याची देखभाल, दुरूस्ती आणि वर सुचवलेले काही पर्याय याला मोठा खर्च येणार असल्याने हे टाळले जाते. अनेक महत्त्वाच्या योजनांचा निधी अपुरा पडत असताना असा खर्च सरकारी तिजोरीतून केला तर विरोधक त्यावर तुटून पडतील हे साधे गणित आहे; पण राज्याचे नेतृत्व करणार्‍या नेत्यांची आणि इतर अतिमहत्त्वाच्या व्यक्तिंची सुरक्षा हेही आपले कर्तव्य नाही का? आपापल्या अधिकारांसाठी सर्व समाजघटक भांडत असताना त्यांना या कर्तव्याचा मात्र सोयीस्करपणे विसर पडतो.
अफजलखानाच्या वधानंतर त्याची समाधी बांधणार्‍या शिवरायांच्या महाराष्ट्रात राज्याचा प्रमुख मेला कसा नाही? म्हणून त्रागा केला जातो आणि कुणी मरणाच्या दारात असेल तर आनंदोत्सव साजरा केला जातो; हे आपल्या सर्वांचेच दुर्दैव! ही मुर्दाड मानसिकता आपल्याला कुठे घेऊन जाईल हे ठाऊक नाही. ‘मी आणि माझे’ अशी मानसिकता गेल्या काही वर्षात वाढत गेली आहे. आता त्यापुढे जाऊन ‘माझे माहीत नाही पण समोरच्याचे आधी वाटोळेच झाले पाहिजे’ अशी मानसिकता निर्माण होत चालली आहे. जे विध्वंस घडवतात त्यांच्यात निर्मितीची क्षमता अभावानेच असते. अशा विध्वंसी मानसिकतेची कीड आपल्याला लागलीय. मुळात एक माणूस म्हणून जे काही थोडेफार चांगूलपण असावे तेही अस्तास जात आहे. त्यामुळे भविष्यात ही समस्या अक्राळविक्राळ रूप घेईल हे वेगळे सांगायला नकोच!
आपल्या राज्याचे प्रमुख एका अपघातातून बचावलेत. त्यांच्या मर्यादा आणि त्यांचे सामर्थ्य या दोन्हींची पूर्ण जाणीव त्यांना आहे. कर्तव्यतत्परता, प्रत्येक समस्येचा मुलभूत अभ्यास, व्यापक दृष्टिकोन आणि स्वच्छ चारित्र्य हे त्यांचे भांडवल आहे. म्हणूनच मग जातींचे राजकारण केले जाते. त्यांच्या अपघातातून वाचल्याचा खेद व्यक्त केला जातो. हे सारे क्लेषकारक आहे. संगमनेर येथील कवी मुरारीभाऊ देशपांडे या प्रवृत्तीविषयी लिहितात,
अपघातातून ‘सीएम’ बचावताच
प्रतिक्रिया आल्या रग्गड
विकृत, हीन वृत्तीचे
महाभाग पडले उघड


मरणावर टपलेली गिधाडे
घिरट्या घालून थकली
यमराजसुद्धा म्हणाला,
आमची वाट चुकली!


ही ‘चुकले’ली वाट मुख्यमंत्र्यांना ‘जीवनदान’ देणारी आहे, याचा या राज्याचा नागरिक म्हणून मला आनंद वाटतो. या गोष्टीचा ज्यांना पोटशूळ वाटतो त्यांना पर्याय नाही. देवेंद्र फडणवीस यांनी मात्र त्यांची उमेद सोडू नये आणि याच जोशात, याच उत्साहात भविष्यात विधायकतेचे डोंगर उभारावेत अशी सदिच्छा या निमित्ताने व्यक्त करतो. चिल्लरथिल्लर घुबडांच्या बुभुक्षित नजरांपेक्षा मुख्यमंत्र्यांविषयी जिव्हाळा असणारे अधिक आहेत आणि हेच देवेंद्रांचे मोठे यश आहे, इतकेच!

घनश्याम पाटील
7057292092


 


Sunday, May 21, 2017

स्मरण ‘राजहंसा’चे!

 
एखादा जवळचा माणूस अचानक आपल्यातून गेला की, त्याच्या आठवणीने मन व्याकुळ होते. त्याचे ‘नसणे’ मान्य करणे आपल्याला अवघड जाते. निसर्गनियमापुढे कुणाचे काही चालत नाही, ते अटळ आहे हे माहीत असूनही आपण प्रचंड अस्वस्थ होतो. त्या माणसाच्या आठवणी दाटून आल्या की अश्रूंचा बांध फुटतो. परमेश्‍वर इतका निष्ठुर कसा, असे उगीचच वाटू लागते. अतीव दुःखाने आपण भयकंपित होतो. जवळच्या माणसाचे चटका लावून जाणारे ‘जाणे’ पचवणे फार अवघड असते.
विलासराव देशमुख असेच अचानक गेले. महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांसह त्यांच्यावर प्रेम करणार्‍या सर्व क्षेत्रातील लोकांना हा मोठा धक्का होता. माणूस गेल्यानंतर त्याचे मोठेपण कळते. जिवंतपणी त्याची कदर करणारे तुलनेने फारच कमी असतात. आपल्याकडे माणसापेक्षा माणसाच्या राखेचा इतिहास पूजण्याचा रिवाज तसा नवीन नाही. विलासरावांच्या जाण्याने एक अफाट क्षमतेचे पर्व संपले. याच आठवड्यात, म्हणजे 26 मे रोजी त्यांची जयंती! त्यामुळे या राजहंसाचे स्मरण करताना डोळे आपोआपच पाणावतात. हीच या लोकनेत्याची पुण्याई!
एक जळणारा दोरा मेणबत्तीला विचारतो, ‘‘जेव्हा मी जळत असतो तेव्हा तू स्वतःला का संपवतेस?’’ मेणबत्ती म्हणते, ‘‘अरे, ज्याला आपल्या हृदयात स्थान दिलं तो जळतोय हे पाहून कोणाच्याही डोळ्यात पाणी येणारच ना!’’ विलासरावांच्या बाबतही काहीसं असंच झालं. लोकांना आपल्या भावनांचा बांध आवरणे अवघड जात होते. हे रडणे नाटकी नव्हते. एक विकासपर्व संपल्याची जाणीव झाल्याने प्रत्येकाला पोरके झाल्यासारखे वाटत होते.
सरपंच ते केंद्रीय मंत्री अशा दीर्घ प्रवासात विलासरावांनी असंख्य माणसे जोडली. त्यांनी आपल्या राजकीय जीवनात अनेक चढउतार अनुभवले; मात्र कधी कुणाविषयी आपल्या मनात द्वेष बाळगला नाही. शत्रू असला तरी त्याचे निष्कपटपणे हसून स्वागत करणारे विलासराव राजकारणात त्यामुळेच दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरतात. ते शरीराने गेले असले तरी त्यांचे विचार कायम जिवंत राहतील. राजकारणात भवितव्य आजमावू पाहणार्‍यांना प्रेरणा देतील.
आपल्या जगण्यावर आणि जन्मावर विलक्षण प्रेम करणारे विलासराव हे वैभवशाली कुटुंबातून पुढे आले होते. ‘गढीवरच्या देशमुखांचे’ त्यांचे घराणे! त्यांच्या रूबाबदार व्यक्तिमत्त्वाचा सरंजामशाही थाट प्रत्येकाला लुभावणारा होता. रयतेची काळजी घेणारे विलासराव गरिबीत कधी जगले नाहीत; मात्र गरिबांविषयी त्यांच्या मनात कनवाळा होता. श्रीमंतीची, अधिकाराची किंवा पदाची मिजास त्यांना कधी वाटलीच नाही. प्रत्येक क्षण हा लोकांच्या भल्यासाठी जगायचा हेच त्यांचे तत्त्वज्ञान! यश-अपयशाची पर्वा न करता ते अखंडपणे राजहंसी डौलात चालत राहिले.
लातूरविषयी त्यांंच्या मनात प्रचंड जिव्हाळा होता. 1982 साली धाराशिव जिल्ह्यातून लातूर जिल्हा अस्तित्वात आला. त्यांनतर लातूरच्या विकासात त्यांनी भरीव योगदान दिले. ‘जे नवे; ते लातूरला हवे!’ असा त्यांचा अट्टाहास असायचा. त्यांनी अनेक कर्तबगार अधिकारी लातूरला आणल्यानेच लातूरचा विकास शक्य झाला. प्रत्येकाच्या कलागुणांना वाव देणे, सुख-दुःखात सहभागी होणे हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विशेष!
त्यावेळी नव्यानेच लातूर महानगरपालिका अस्तित्वात आली होती. लातूरचा पहिला महापौर कॉंग्रेसचा होऊ नये यासाठी विरोधकांनी जंग जंग पछाडले. देवेन्द्र फडणवीसांसारख्या नेत्याने लातूरात ठाण मांडून वातावरण तापविले. त्यात त्यांना यश आले नाही हा भाग निराळा; पण या काळात विलासरावांनी लातूरमध्येच आपला तळ ठोकला. एक केंद्रीय मंत्री लातूरसारख्या स्थानिक निवडणुकीत इतके लक्ष का घालतात, अशी टीका त्यांच्यावर झाली. त्यावेळी त्यांनी दिलेले उत्तर त्यांच्यातील प्रेमळ नेत्याचे दर्शन घडवून देते.
ते म्हणाले, ‘‘मी लातूरात फक्त माझ्या कार्यकर्त्यांच्या आव्हानाच्या काळात त्यांची साथ द्यायला आलोय. महानगरपालिकेचा नगरसेवक हे माझ्या दृष्टीने छोटे पद असले तरी या कार्यकर्त्यांचे ते फार मोठे स्वप्न आहे. माझ्या प्रत्येक निवडणुकीत हेच कार्यकर्ते पूर्णवेळ सक्रीय असतात; सर्व कामकाज, प्रचार हेच लोक पाहतात. त्यांच्यामुळेच माझे अस्तित्व आहे. मग त्यांच्या कठीण काळात मी त्यांच्यासोबत राहिलो तर बिघडले कुठे?’’ असे होते विलासराव!!
कुणालाही ‘नाही’ म्हणणे त्यांना कधीच जमले नाही. त्यांच्याकडे कुणीही, कुठलेही काम घेऊन गेले तरी त्यावर हमखास मार्ग निघायचा. आलेला प्रत्येक फोन स्वतः घेणे आणि प्रत्येकाशी त्याच्या अडचणींसंदर्भात बोलणे ही त्यांची खासीयत! त्यांच्या भिडस्त स्वभावाचा अनेकांनी फायदा घेतला पण त्यांनी त्यांचे चांगुलपण कधी सोडले नाही.
साहित्य, संगीत, नाट्य अशा कलांची अमर्याद आवड जोपासणारे विलासराव संस्कृतीचे जतन व्हावे, यासाठी आग्रही असायचे. विरोधकांशीही वैयक्तिक जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित करणारा हा नेता म्हणूनच कॉंग्रेसचा ‘आधारवड’ होता. त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अनेकवेळा आंदोलनाचा इशारा दिला; मात्र प्रत्येकवेळी त्यांना थोपवून ठेवण्यात विलासराव यशस्वी ठरले. इतकेच काय पण दिल्लीत अण्णांनी आंदोलनाचे अस्त्र उपसल्यानंतर सरकारच्यावतीने मध्यस्थी करण्याची जबाबदारीही त्यांच्यावरच पडली आणि त्यांनी ती चोखपणे पारही पाडली.
आमच्या लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यात वेळ आमावस्या मोठ्या उत्साहात साजरी होते. त्यादिवशी पांडवांचे पूजन केले जाते. रानात आपल्या आप्तेष्टांना, मित्रांना बोलवून वनभोजनाचा आनंद लुटला जातो. आंबील, खीर, भज्जी, भाकरी, तिळाच्या पोळ्या हे त्यादिवशीचे विशेष! विलासराव यादिवशी मुंबईहून न चुकता बाभळगावला येत. ‘देशमुख गडी’वर त्यादिवशी आनंदाला भरते आलेले असे. मुंबईहून येताना ते तेथील अधिकारी आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील आपल्या मित्रांना आवर्जून सोबत आणत. लातूरपासून बाभळगावपर्यंत असणारा हा गाड्यांचा ताफा त्यांच्यातील उत्साहाचे प्रतिक असायचा. आता हे चित्र दिसत नसल्याने अनेकांच्या दुःखाचे बांध फुटत आहेत.
1971 साली विलासराव शिक्षणासाठी म्हणून पुण्यात होते. त्यावेळी त्यांना सिनेमाची जबरदस्त आवड होती. पुढे हा मुलगा ‘राजकारणातला सुपरस्टार’ होईल असे कोणी भाकित केले असते तर कदाचित त्यावर कुणी विश्‍वात ठेवला नसता पण ही किमया घडली. पुणे आणि लातूर येथे जेमतेम साडेतीन वर्षे वकिली केल्यानंतर ते बाभळगावच्या राजकारणात सक्रिय झाले. गावची ‘देशमुखी’ असल्याने सरपंचपद त्यांच्याकडे चालत आले. पुढे उल्हासदादा पवार यांच्या शिफारशीनुसार त्यांना धाराशिव जिल्हा युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची संधी मिळाली. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून बघितलेच नाही. आमदार झाल्यानंतर वेगवेगळ्या मंत्रीपदाच्या खात्याचा कार्यभार यशस्वीपणे सांभाळताना त्यांनी आपली छाप उमटवली.
1995 साली त्यांच्या सुसाट सुटलेल्या वारूला लगाम बसला. विधानसभेत त्यांना प्रथमच पराभवाला सामोरे जावे लागले. अशी अचानक खिळ बसल्याने त्यांना नैराश्य आले होते. कॉंग्रेसनेही त्यांच्याकडे याकाळात दुर्लक्ष केले पण पराभवातून आलेल्या या संधीचा फायदा उठवत त्यांनी आपला दिल्लीतील संपर्क वाढवला. प्रत्येकाशी चांगले संबंध प्रस्थापित केले. पुढे 1999 ला मोठ्या मताधिक्क्याने आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांची राज्याच्या मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली.
त्यांनी आपल्याला मदत करणार्‍या प्रत्येकाला भरभरून दिले. मध्यंतरी अडगळीत पडलेल्या उल्हास पवारांना विधानपरिषदेवर घेऊन त्यांनी हे प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले.
या नेत्याचे अचानक जाणे त्यामुळेच चटका लावणारे आहे. सध्याच्या भयंकर राजकीय वातावरणात मुळातच ‘चांगल्या’ राजकारण्यांची कमतरता आहे. ज्यांच्याकडून देशहिताच्या काही अपेक्षा ठेवता येतील, असे नेते प्रमाणाने खूपच कमी आहेत. विलासराव देशमुखांच्या अकल्पित जाण्याने महाराष्ट्राचे फार मोठे नुकसान झाले आहे. सध्या राज्यात आणि देशात मोेठे परिवर्तन घडलेय. विलासरावानंतर लातूरचीही गणिते बदललीत. त्यांनी लातूरात मोठ्या प्रमाणात उद्योग आणले होते पण त्यांच्या जाण्याने त्यातील अनेक प्रकल्प परत गेले. आता तर उगवत्या सूर्याला नमस्कार करावा याप्रमाणे लातूरकरांनी अनेक बदल स्वीकारलेत पण तरीही विलासराव देशमुख यांच्यासारख्या द्रष्ट्या नेत्याची उणीव पावलापावलाला जाणवते. लातूर आणखी विकासासाठी आतूर आहे. विलासरावांच्या जाण्याने अनेक योजनांना खीळ बसलीय. राजकीय नेता म्हणून त्यांच्याबाबत काहींची मतमतांतरे नक्की असू शकतात पण त्यांच्या आठवणीने माझ्यासारख्या सामान्य पत्रकाराचे व्याकूळ होणे हे त्यांचे माणूस म्हणून असलेले मोठेपणच आहे. ते नाकारणे त्यांच्या तथाकथित विरोधकांनाही शक्य नाही.
- घनश्याम पाटील
7057292092



Sunday, May 14, 2017

‘साला’ची साल किती काढणार?


राजकारण हा समाजाचा अविभाज्य भाग आहे. पूर्वी त्याला समाजकारणाची कड होती. सध्या राजकारणातून फक्त लाभ बघितले जातात. सत्तेच्या राजकारणाचा हव्यास सुटल्याने त्यातील सेवाधर्म मागे पडत गेला आणि हा धंदा बनला. कोटीच्या कोटी उड्डाणे घेताना राजकारण्यांना नैतिकेतेची चाड राहत नाही. मग त्यातूनच एक मस्तवालपणा अंगात येतो आणि सत्तेचा कैफ चढल्याने आपण कुणी फार वेगळे आहोत असा भ्रम त्यांच्या मनात निर्माण होतो. आजूबाजूची परिस्थिती त्यांच्या अहंकाराला खतपाणी घालते आणि ते स्वतःला राजे समजू लागलात. त्यातून त्यांच्या वागण्यात बेतालपणा येतो. रगेलपणा वाढत जातो. दर्पोक्तीचे ग्रहण त्यांना लागते. मनावरचा ताबा सुटल्याने हवी ती विधाने त्यांच्या तोंडात येतात. काही काळासाठी त्यातून जनभावना दुखावल्या जातात आणि पुन्हा लोक सगळे विसरतात व ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण होते.
हे सगळे सांगण्याचे कारण म्हणजे महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे विधान! जालना (मराठवाडा) येथे भाजप पदाधिकार्‍यांच्या बैठकीत ते मार्गदर्शन करत होते. त्यावेळी एका कार्यकर्त्याने त्यांना तुरीवरून प्रश्‍न विचारला. त्यावेळी त्या कार्यकर्त्याला उद्देशून ते म्हणाले, ‘‘तू जास्त पेपर वाचतो का? वाचू नको... तूर खरेदी, ऊस खरेदी, बाजरी खरेदी हे विषय सध्या तुम्ही बंद करा. ज्या मालाचे हमीभाव केंद्र सरकारने ठरवले आहेत तो माल जर का बाजारामध्ये हमी भावापेक्षा कमी भावाने खरेदी केला जात असेल तर सरकार 25 टक्के माल खरेदी करते. आपल्या सरकारने तर सारीच्या सारी तूर घ्यायला सुरूवात केली. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच 400 रूपयांपेक्षा जास्त अनुदान तुरीला दिले आहे. त्यामुळे रडे धंदे करू नका. आपल्या कार्यकर्त्यांनी आता रडायचे नाही लढायचे! पुन्हा काढायचा नाही आता तुरीचा विषय. ते काय ते आम्ही बघू. सगळी तूर आम्ही खरेदी करणार आहोत. आता परवाच एक लाख टन तूर खरेदी करायला केंद्राने परवानगी दिली. तरीही रडतात साले...!’’
त्यांच्या या विधानातील ‘साले’ या शब्दावरून सध्या महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. मुद्रित आणि दृकश्राव्य माध्यमात, समाजमाध्यमात केवळ दानवे यांचाच उद्धार होत आहे. आतापर्यंत राजकारण्यांची असभ्य, अप्रगल्भ, असंविधानिक भाषा आपण अनेकवेळा बघितली आहे. अगदी ‘धरणात पाणी नाही तर मी त्यात मुतू का?’ असाही प्रश्‍न यापूर्वीच्या उपमुुख्यमंत्र्यांनी विचारला होता. इतकेच काय तर ‘ग्रामीण भागात लोडशेडिंगमुळे शेतकर्‍यांना रात्री काही काम नसते; म्हणूनच आपली लोकसंख्या झपाट्याने वाढत चाललीय’ असेही वक्तव्य त्यांनी केले होते. त्यानंतर यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी म्हणजे कराड येथील प्रीतिसंगमावर जाऊन त्यांनी ‘आत्मक्लेश’ही केला. या पार्श्‍वभूमीवर हेच नेते आज दानवे यांच्या ‘साला’ शब्दावरून राजकारण करत आहेत. शेतकर्‍यांचा केवळ आपल्यालाच कसा पुळका आहे हे दाखवताना दानवेंचा मात्र वाटेल त्या शब्दात उद्धार करत आहेत. शेतकर्‍यांचा संताप आणि आक्रोश व्यक्त करतोय असे म्हणत दानवे यांना शिव्यांची जी लाखोली वाहिली जात आहे ती यांचा खरा चेहरा दाखवून देणारी आहे.
दानवे हे ग्रामीण मुशीतून पुढे आलेले नेते आहेत. त्यांचे आईवडील स्वतः शेतकरी होते. हा माणूस सर्वसामान्य माणसात मिळून मिसळून राहणारा आहे. आमदार, खासदार, केंद्रीय मंत्री आणि आता प्रदेशाध्यक्ष म्हणून ते त्यांची जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडत आहेत. जालना जिल्ह्यातील भोकरदन मतदार संघाचे प्रतिनिधित्व करताना त्यांच्या साधेपणाचे अनेकांनी अनुभव घेतले आहेत. सत्तेची आणि पदाची कसलीही धुंदी नसणारा हा रस्त्यावरचा माणूस आहे. गावच्या सरपंच पदापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास कुणालाही अचंबित करायला लावणारा आहे. हा माणूस त्यांच्या मतदारसंघात पायी फिरतो. बांधावर जाऊन शेतकर्‍यांसोबत त्यांच्या डब्यातली भाकरी खातो. त्यांची सुखदु:खे समजून घेतो. नेता म्हणून नव्हे तर प्रामाणिक लोकप्रतिनिधी या भावनेतून त्यांना जमेल तशी मदत करतो. म्हणूनच रोजच्या बोलण्यात जे एकमेकांचा आईबहिणीवरून उद्धार केल्याशिवाय चार वाक्येही धड बोलू शकत नाहीत, ते दानवेंच्या ‘साला’ शब्दावरून रान पेटवत आहेत. हा निर्लज्जपणाचा कळसच म्हणायला हवा.
मुळात दानवे ज्या कार्यक्रमात बोलले ती कसली सभा नव्हती. त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांशी ते संवाद साधत होते. हे वाक्य त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्याला उद्देशून वापरल्याचे सांगितले आहे. त्याबद्दल त्यांनी प्रसारमाध्यमांकडे दिलगिरीही व्यक्त केली आहे. मात्र पराचा कावळा करणार्‍यांनी त्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यापासून, जाळपोळ करण्यापासून ते त्यांच्या राजीनाम्यापर्यंतची मागणी लावून धरली आहे. ‘आदर्श’ प्रकरणात ज्यांचे हात कोळशासारखे काळेकुट्ट झालेत असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, करंगुळीवीर अजित पवार असे नेते दानवे यांच्या ‘साला’ शब्दावरून जेव्हा जंग जंग पछाडतात तेव्हा कुणालाही आश्‍चर्य वाटते. प्रसारमाध्यमांनी या घटनेत अकारण हवा भरल्याने दानवे यांच्यासारखा कार्यक्षम नेता हकनाक बळी जातोय. त्यांच्या चुकीबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त करूनही जे सुडाचे राजकारण केले जातेय ते महाराष्ट्राच्या सभ्य संस्कृतीला तडा देणारे आहे.
मुळात रावसाहेब दानवे जेव्हा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झाले तेव्हा ‘एक दानवे, बाकी जानवे’ अशा शब्दात आम्ही त्यांचे वर्णन केले होते. भाजपसारख्या पक्षाला जातीवादाच्या विटाळातून बाहेर पाडण्यात ज्या मोजक्या नेत्यांचा हात आहे त्यात दानवे यांचे स्थान मोठे आहे. महाराष्ट्रातला आणि देशातला सगळ्यात मोठा पक्ष झालेल्या भाजपाचे सर्वसमावेशक धोरण टिकून आहे ते दानवे यांच्यासारख्या नेत्यांमुळे! स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी जे काम केले तोच वारसा दानवे नेटाने पुढे चालवत आहेत आणि हेच विरोधकांचे खरे दुखणे आहे. म्हणूनच अगदी ठरवून त्यांना ‘टार्गेट’ केले जात आहे.
यापूर्वी नाशिक येथे त्यांनी शेतकरी आत्महत्येवरून जे वक्तव्य केले होते त्यावरून त्यांना अडचणीत आणले गेले. त्यांच्या मुलाच्या विवाहानिमित्त जो अवाढव्य खर्च केला गेला त्यावरून टिकेची झोड उठवली गेली. प्रत्यक्षात त्या लग्नाला राज्याच्या मुख्यमंत्र्यापासून ते विरोधकांपर्यंत सर्वजण सहभागी होते. मराठवाडा दुष्काळात होरपळत असताना कोट्यवधी रूपयांचा चुराडा का केला असा त्यांच्यावरचा आक्षेप! यापैकी कितीजणांनी या लग्नाच्या खर्चाचा तपशील मागितला? दानवे यांनी हा खर्च केवळ काळ्या पैशातून केला का? त्या खर्चाचा तपशील, त्यांनी मिळवलेल्या संपत्तीचा कर त्यांनी भरलाय का हे खरे प्रश्‍न असायला हवेत. जर त्यांनी नैतिक मार्गाने हा पैसा मिळवला असेल तर तो त्यांनी कुठे आणि कसा खर्च करावा  याबाबत त्यांना सांगणारे आपण कोण? तो पैसा ते त्यांच्या मुलाच्या लग्नात खर्च करतील किंवा दानधर्म करतील! तो पूर्णतः त्यांचा अधिकार आहे.
यापूर्वी दुष्काळात सामान्य माणूस तग धरून रहावा म्हणून रोजगार हमीसारख्या योजना राबवल्या गेल्यात. रावसाहेब दानवे यांच्या मुलाच्या लग्नात कोट्यवधी रूपयांचा खर्च झाला याचा अर्थ त्या परिसरातील अनेकांना मोठ्या संख्येने रोजगारच मिळाला. मग हे वाईट आहे का? आयुष्यात एक रूपयाही कधी कोणत्या विधायक कामाला न देणारे अशा खर्चावरून बोलतात तेव्हा त्यांची कीव करावीशी वाटते.
शेती आणि शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे. विरोधक त्यावरून सातत्याने राजकारण करतात. ते करायलाही हवे; मात्र नैतिकतेचे डांगोरे पिटताना आपण किती स्वच्छ चारित्र्याचे आहोत हे दाखवण्याचा जो केविलवाणा अट्टाहास आहे तो वाईट आहे. ‘रावसाहेब दानवे यांना पदावरून दूर करण्याची मागणी करू नका. असे नेते भाजप बुडवायला पुरेसे आहेत. त्यांच्यामुळे आपले काम सोपेच होत आहे’ अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिलीय. ‘जाणता राजा’ असे बिरूद मिरवणार्‍या या नेत्याने केंद्रीय कृषीमंत्री या नात्याने भरीव योगदान दिले असल्याचे सांगितले जात असले तरी त्यांनी शेतकर्‍यांसाठी काही ठोस केल्याचेही उदाहरण नाही. त्यांनी ‘कर्जमाफी’चा निर्णय घेतला खरा; पण त्याचे फलित काय? आज शेतकरी पुन्हा कर्जबाजारी झालाय आणि पुन्हा कर्जमाफीचीच मागणी सुरू आहे. त्यावरून राज्य पेटवले जातेय. त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे असे नेते लोकक्षोभ ओढवून सत्य सांगण्याचे काम करत आहेत. कर्जमाफीने तत्कालीक प्रश्‍न सुटतील पण शेतकर्‍यांना सावरण्याचा हा उपाय होऊ शकत नाही. शेतकरी पुन्हा कर्जाच्या खायीत ढकलला जाईल. त्यांच्यासाठी भरीव अशा काही योजना राबवण्यासाठी भाजप सरकार प्रयत्नशील आहे. आपण त्याकडे सकारात्मक दृष्टिने पहायला हवे. दानवे यांच्या ज्या वक्तव्यावरून गदारोळ सुरू आहे त्यातील ‘साला’ हा शब्द सोडला तर बाकी काहीही चुकीचे नाही. प्रदेशाध्यक्ष या नात्याने ते त्यांची बाजू उत्तम पद्धतीने मांडताना दिसतात. ‘रडायचे नाही, लढायचे’ असे म्हणत कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवताना दिसतात. त्यामुळे याची आपण आणखी किती साल काढणार? तळागाळातून वर आलेल्या आणि शेतकर्‍यांच्या  परिस्थितीची योग्य ती जाण असलेल्या रावसाहेब दानवे यांच्यासारख्या नेत्याला संपवण्याचे काम विरोधकांकडून सुरू आहे आणि दुर्दैवाने आपली प्रसारमाध्यमेही एकतर्फी बाजू मांडत त्यांना सहकार्य करत आहेत. यात सार्‍यांचेच हात बरबटले असल्याने दानवे यांना एकट्यालाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करणे योग्य होणारे नाही.
- घनश्याम पाटील
7057292092