Saturday, May 27, 2017

मृत्युंजयी!!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लातूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर होते. निलंगा येथून परतताना त्यांच्या विमानाचा छोटासा अपघात झाला. सुदैवाने त्यात कुणालाही काही लागले नाही.  या दुर्घटनेमुळे महत्त्वाच्या व्यक्तिंच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न मात्र पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुख्यमंत्र्यांचे विमान कोसळणे हा निव्वळ अपघात असला तरी या घटनेकडे दुर्लक्ष करता येण्यासारखे नाही. या अपघातातून बचावल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील 11 कोटी 20 लाख जनतेचे, आई भवानीचे, पांडुरंगाचे आशीर्वाद त्यांच्या पाठिशी असल्याचे सांगितले आहे. हेलिकॉप्टरच्या तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्यावर मुख्यमंत्री थोडक्यात बचावल्याची बातमी समाजमाध्यमांत आली आणि अनेक प्रतिक्रियावाद्यांच्या अनेक प्रवृत्तींचे दर्शन घडले.
‘ये, उग काई बी बोलू नका बे, वजन वाडल्यानं काय इमान पडत न्हाय’, ‘आज अमावस्या असल्यानं मुख्यमंत्र्यांनी दौरा टाळायला हवा होता, भूतं सोडतील का?’, ‘मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांचा हा तळतळाट आहे’, ‘हा पुनर्जन्म समजून आता तरी मामुंनी शेतकर्‍यांचे कर्ज माफ करावे’, ‘यातून हा वाचला हे महाराष्ट्राचे दुर्दैवच’, ‘विलासरावांच्या जयंतीच्या पूर्वदिनी त्यांनी ह्याला पाडले’ ‘ह्ये लोकान्सी तर फशीवत्यातच पर यांनी यमदेवालाबी फसवलं’, ‘जर कुणाला भल्लाळदेवची गाडी बनवायची असंल तर त्यांनी निलंग्यात जावं. तिथं हेलिकॅप्टरची पंख पडल्यात’ या व अशा स्वरूपाच्या अनेक प्रतिक्रियांचा पाऊस समाजमाध्यमांत पडला.
काही तथाकथित पुरोगाम्यांनी ही दुर्घटना दुर्दैवी असल्याचेही सांगितले; मात्र त्याचवेळी ‘मुख्यमंत्र्यांविषयी इतके सुमार विनोद होतात म्हणजे त्यांची लोकप्रियता किती घसरलीय? सोशल मीडियावर ‘लाफ्टर चॅलेंज’चा मुकाबला का सुरू झाला?’ असाही प्रश्‍न उपस्थित केला. ‘इथं हेलिकॉप्टर पडून काही होत नाहीये, तिथं मुंडेंच्या गाडीला धक्का लागून मृत्यू होतोय... दया कुछ तो गडबड है...?’ अशीही कुजकट शंका काहींनी उपस्थित केली; तर ‘ह्याची पुण्याई म्हणून हा वाचला म्हणता; मग आर. आर. आबा, विलासराव, महाजन, मुंडे यांची पुण्याई नव्हती का?’ असाही प्रश्‍न काहींनी उपस्थित केला. या सगळ्यावरून एकंदरीत आपली वाटचाल कोणत्या दिशेने सुरू आहे हे लख्खपणे दिसते.
माणसाला तंत्रज्ञानाचं वरदान लाभलंय असं म्हणताना ते टोकाचं मारक ठरतंय, हेच आपल्या लक्षात येत नाही. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आलाय आणि प्रत्येक स्थानिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घटनेबाबत आपले मत असलेच पाहिजे असा त्यांचा अट्टाहास असतो. मग ‘विचारवंत’ म्हणून मिरवण्याचा त्यातला त्यात सोपा पर्याय म्हणजे ‘व्हाट्स ऍप’ला जे काही येईल ते जसेच्या तसे पुढे पाठवणे....! या तंत्रज्ञानाच्या गैरवापरापुढे माणसाने त्याची बुद्धी वापरणे सोडून दिले आहे की काय, अशी शंका येण्याइतपत परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्य म्हणजे कधी नव्हे इतका जातीयवाद पसरवला जात असून यात सुशिक्षितांचे प्रमाण मोठे आहे.
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना सातत्याने जातीवरून डिवचले जातेय, हे जगजाहीर आहे. पुरोगाम्यांचे ‘जाणते राजे’ म्हणून मिरवून घेणार्‍या शरद पवार यांनी तर ‘पूर्वी शाहू महाराज पेशव्यांची नेमणूक करायचे आता पेशवे महाराजांची नेमणूक करतात’ असे उघडपणे बोलून त्यांच्या मनातील खदखद व्यक्त केली होती. बी. जी. कोळसे पाटील यांच्यासारख्या एकेकाळी न्यायाधीश असलेल्या माणसाने कुलभूषण जाधव यांचा खटला लढवणार्‍या वकिलाची ‘जात’ काढून त्यांच्या ‘काळ्याकुट्ट’ मनोवृत्तीचे दर्शन घडवले. कोणतीच भूमिका न घेणं ही एकमेव भूमिका घेणार्‍या साहित्य क्षेत्रानं याविषयी मूग गिळून गप्प बसणं पसंत केलं असताना संजय सोनवणी यांच्यासारखा लढवय्या लेखक मात्र या प्रवृत्तीला अपवाद ठरला. त्यांनी ‘कोळश्यां’ची जाहीर लक्तरे काढून हे समाजासाठी किती घातक आहे याची जाणीव करून दिली. मुख्यमंत्र्यांच्या विमानाच्या अपघाताने लोकांची मानसिकता दिसून येतेय. त्यावरून आपल्या राष्ट्राचे भवितव्य काय असेल आणि आपण कोणत्या दिशेने जातोय याचे चित्र स्पष्ट होते.
माणसाच्या मरणावर टपून बसलेली गिधाडं पुरोगामीपणाची अक्कल समाजाला शिकवतात. एखाद्यावर कोणतेच आरोप करणे शक्य नसेल तर त्याची जात काढायची हे शेवटचे अस्त्र त्यांना ठाऊक असते. देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतही तेच होतेय. खरंतर मुख्यमंत्री या नात्यानं महाराष्ट्राचं नेतृत्व करणारा हा नेता. त्यांच्यासोबत वैचारिक मतभेद असू शकतात; पण त्यांचे जगणे का नाकारावे? तो जगला तर भांडत बसू! त्यातून काही विधायक हाती येईल! पण अपघातातून तो बचावला तर यांची विनोदबुद्धी जागी होते!! यालाच तर द्वेष म्हणतात! बरं, हे दीर्घद्वेषी लोक मरणाचाही आनंद साजरा करतात. त्यापुढे जाऊन गांधी हत्येनंतर कसे पेढे वाटले गेले इथपासून ते सावरकरांनी नथुराम गोडसेला ‘यशस्वी व्हा, काम फत्ते केल्याशिवाय परत येऊ नका’ हे कसे सांगितले इथपर्यंतचे दाखले देतात. ते देताना ते या प्रत्येक घडामोडीचे ‘प्रत्यक्ष साक्षीदार’ होते, असा त्यांचा आविर्भाव असतो!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अपघातानंतर अजित पवार यांनी मात्र अतिमहत्त्वाच्या व्यक्तिंच्या संरक्षणाचा प्रश्‍न उपस्थित केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे वेळोवेळी ‘मेंटनंस’ होत नसल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. ही अतिशय चिंतेची बाब आहे. राज्याचा प्रमुख असलेल्या माणसाच्या जीवाची काळजी घेणे हे आपले कर्तव्यच आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे विमान हे जगातल्या काही अव्वल विमानांपैकी एक आहे. त्याचा वैमानिक हा अत्यंत अनुभवी आणि कुशल आहे; मात्र महाराष्ट्राच्या मंत्रालयाकडे हे एकच अत्याधुनिक विमान आहे. याचा वापर केवळ राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी महत्त्वाच्या दौर्‍यासाठी करावा असा संकेत आहे. तो संकेत धुळीस मिळवून कोणताही मंत्री त्याच्या गरजेसाठी या विमानाचा वापर करतो. इतकेच नाही तर निवडणुकीत प्रचारदौर्‍यासाठीही या विमानाचा वापर केला जात असल्याचे पुढे येत आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एक सूचना मांडली आहे. ‘प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक हेलिपॅड असावे. त्याची योग्य ती निगाही राखली जावी. अतिमहत्त्वाच्या व्यक्ती त्या त्या जिल्ह्यात आल्यास त्याच ठिकाणी सुरक्षितपणे उतरतील. तिथून पुढचा प्रवास इतर वाहनाने करणे सहज शक्य असते.’ त्यांच्या या सूचनेचाही विचार केला जावा.
शासकीय विमान, त्याची देखभाल, दुरूस्ती आणि वर सुचवलेले काही पर्याय याला मोठा खर्च येणार असल्याने हे टाळले जाते. अनेक महत्त्वाच्या योजनांचा निधी अपुरा पडत असताना असा खर्च सरकारी तिजोरीतून केला तर विरोधक त्यावर तुटून पडतील हे साधे गणित आहे; पण राज्याचे नेतृत्व करणार्‍या नेत्यांची आणि इतर अतिमहत्त्वाच्या व्यक्तिंची सुरक्षा हेही आपले कर्तव्य नाही का? आपापल्या अधिकारांसाठी सर्व समाजघटक भांडत असताना त्यांना या कर्तव्याचा मात्र सोयीस्करपणे विसर पडतो.
अफजलखानाच्या वधानंतर त्याची समाधी बांधणार्‍या शिवरायांच्या महाराष्ट्रात राज्याचा प्रमुख मेला कसा नाही? म्हणून त्रागा केला जातो आणि कुणी मरणाच्या दारात असेल तर आनंदोत्सव साजरा केला जातो; हे आपल्या सर्वांचेच दुर्दैव! ही मुर्दाड मानसिकता आपल्याला कुठे घेऊन जाईल हे ठाऊक नाही. ‘मी आणि माझे’ अशी मानसिकता गेल्या काही वर्षात वाढत गेली आहे. आता त्यापुढे जाऊन ‘माझे माहीत नाही पण समोरच्याचे आधी वाटोळेच झाले पाहिजे’ अशी मानसिकता निर्माण होत चालली आहे. जे विध्वंस घडवतात त्यांच्यात निर्मितीची क्षमता अभावानेच असते. अशा विध्वंसी मानसिकतेची कीड आपल्याला लागलीय. मुळात एक माणूस म्हणून जे काही थोडेफार चांगूलपण असावे तेही अस्तास जात आहे. त्यामुळे भविष्यात ही समस्या अक्राळविक्राळ रूप घेईल हे वेगळे सांगायला नकोच!
आपल्या राज्याचे प्रमुख एका अपघातातून बचावलेत. त्यांच्या मर्यादा आणि त्यांचे सामर्थ्य या दोन्हींची पूर्ण जाणीव त्यांना आहे. कर्तव्यतत्परता, प्रत्येक समस्येचा मुलभूत अभ्यास, व्यापक दृष्टिकोन आणि स्वच्छ चारित्र्य हे त्यांचे भांडवल आहे. म्हणूनच मग जातींचे राजकारण केले जाते. त्यांच्या अपघातातून वाचल्याचा खेद व्यक्त केला जातो. हे सारे क्लेषकारक आहे. संगमनेर येथील कवी मुरारीभाऊ देशपांडे या प्रवृत्तीविषयी लिहितात,
अपघातातून ‘सीएम’ बचावताच
प्रतिक्रिया आल्या रग्गड
विकृत, हीन वृत्तीचे
महाभाग पडले उघड


मरणावर टपलेली गिधाडे
घिरट्या घालून थकली
यमराजसुद्धा म्हणाला,
आमची वाट चुकली!


ही ‘चुकले’ली वाट मुख्यमंत्र्यांना ‘जीवनदान’ देणारी आहे, याचा या राज्याचा नागरिक म्हणून मला आनंद वाटतो. या गोष्टीचा ज्यांना पोटशूळ वाटतो त्यांना पर्याय नाही. देवेंद्र फडणवीस यांनी मात्र त्यांची उमेद सोडू नये आणि याच जोशात, याच उत्साहात भविष्यात विधायकतेचे डोंगर उभारावेत अशी सदिच्छा या निमित्ताने व्यक्त करतो. चिल्लरथिल्लर घुबडांच्या बुभुक्षित नजरांपेक्षा मुख्यमंत्र्यांविषयी जिव्हाळा असणारे अधिक आहेत आणि हेच देवेंद्रांचे मोठे यश आहे, इतकेच!

घनश्याम पाटील
7057292092


 


7 comments:

  1. अतिशय छान आणि सुसंस्कृत विचार मांडलेत सर ।🙏🙏

    ReplyDelete
  2. लेखातील मते रास्तच आहेत ,लिहिलंय पण भारी अत्रेंच्या मराठ्याची आठवण यावी असेच

    ReplyDelete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  4. नेहमी सारखा परखड आणि डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारा लेख . आपण म्हणजे दुसरे अञे आहात .

    ReplyDelete
  5. खुप छान लेख आहे सर.. वात्रट टीकाकारांना अंतर्मुख करणारे शब्द.

    ReplyDelete
  6. अप्रतिम लेख!
    माणसानं माणसाशी निदान माणसासारखं वागावं हेच खरं!!

    ReplyDelete
  7. अप्रतिम लेख! खुपच छान लेख आहे सरजी टिकाकाराच्य थाेबाडात मारणारे शब्द

    ReplyDelete