Tuesday, June 13, 2017

अफाट प्रतिभेचे धनी!

लोककवी मनमोहन नातू आणि रॉय किणीकर या अफाट प्रतिभेच्या बेफाट अवलियांनी आपल्या कुटुंबाची होणारी परवड लक्षात न घेता केवळ साहित्यासाठीच स्वतःला वाहून घेतले. दोघेही स्वच्छंदी आणि बेफिकीर मनोवृत्तीचे; मात्र सरस्वती मातेच्या दरबारातले सच्चे पुजारी! एकेठिकाणी मनमोहनांनी लिहून ठेवले आहे, ‘‘भविष्यात जेव्हा कधी दगडाचे भाव स्वस्त होतील, तेव्हा, पुतळा माझा उभारणार्‍यांनो, आधी किणीकर खोदा!’’
मराठीत रूबाई हा प्रकार माधव जुलियन यांनी आणला हे त्रिकालबाधीत सत्य असले तरी त्यात ‘प्राण’ फुंकण्याचे काम मात्र रॉय किणीकर नावाच्या एका कलंदर माणसाने केले. कथा, कविता, नाटक अशा सर्वच साहित्यप्रकारात लीलया संचार करणारे रॉयसाहेब हे संपादन क्षेत्रात मैलाचा दगड ठरावेत. आपल्या संपादकीय कारकिर्दीत त्यांनी अनेक नवनवीन प्रयोग करून मराठी वाचकांची दर्जेदार वाचनाची भूक भागवली.
एका ध्येयाने झपाटून त्यांनी आपली कलासाधना अविरत सुरूच ठेवली. नियतीने त्यांची पदोपदी परीक्षा बघितली; मात्र अशा गोष्टींना न जुमानता त्यांनी आपल्या चेहर्‍यावरील स्मितरेषा कधीही ढळू दिली नाही. प्रचंड विद्वान असणारे रॉयसाहेब विनोदी वृत्तीचे होते. त्यांच्याबाबतचा एक भन्नाट किस्सा याठिकाणी आवर्जून सांगावासा वाटतो.
दत्तगुरूवरील एका चित्रपटाचे चित्रिकरण सुरू होते. श्री दत्त त्यांचे भगवे कपडे परिधान करून शिष्यांच्या लवाजम्यासह चाललेत आणि त्यांच्यामागे काही कुत्री येताहेत असा प्रसंग चित्रीत करायचा होता. मात्र कॅमेर्‍यात हा ताफा येत नव्हता. कुत्री काही दत्ताच्या मागे येईनात. काहीवेळा कुत्री पुढे तर दत्तगुरू मागे आणि काहीवेळा दत्तगुरू पुढे तर कुत्री मागे, अशी कवायत चालली होती. हा सगळा गमतीशीर प्रकार पाहून किणीकर पुढे सरसावले आणि दिग्दर्शकाला सांगितले की, ‘‘हा प्रसंग मी पाच मिनिटात पूर्ण करतो.’’ आधीच वैतागलेल्या दिग्दर्शकाने त्यांना अनुमती दिली.
किणीकरांनी हुकूम सोडला, ‘‘अरे, जरा पाव किलो मटण आणा.’’   एकतर श्रीदत्तावरील चित्रपट; त्यात बहुतेक कलाकार अस्सल सदाशिवपेठी! त्यामुळे सगळ्यांनाच हा काय प्रकार ते कळेना. शेवटी त्यांच्या आदेशाप्रमाणे मटण आणले गेले. त्यांनी सांगितले, ‘‘ते टाका आता दत्ताच्या झोळीत!’’
दत्ताच्या झोळीत मटण टाकले आणि त्या वासाने कुत्र्यांनी त्यांचा पिच्छा पुरवला. खरोखरच पाच मिनिटात तो प्रसंग चित्रीत झाला.
त्यांच्या ‘उत्तररात्र’ च्या पहिल्या पानावर एक रूबाई आहे. ती अशी-
पूर्वरात्र एक वेदना घेऊन येते
मध्यरात्र एक स्वप्न देऊन जाते
आणि उत्तररात्र म्हणजे
जागर... यात्रेचे पुन्हा प्रस्थान!

त्याखाली नाव आहे ‘रवीन्द्रनाथ ठाकूर’ यांचे! मात्र गुरूवर्य रवीन्द्रनाथ टागोर यांच्याच वाटाव्यात इतक्या या अर्थपूर्ण ओळी खुद्द किणीकर साहेबांच्याच आहेत.
सदाशिव पेठेतील दीड खोल्यात आपला संसारगाडा चालविणार्‍या किणीकरांनी ‘खजिन्याची विहीर’ हे नाटक लिहून नाट्य रसिकांना एक विलक्षण अनुभव मिळवून दिला.
रॉयसाहेबांच्या रूबाईतला टवटवीतपणा अजरामर आहे. मराठी साहित्यात या माणसाने जे भरीव योगदान दिले त्याला तोड नाही. त्यांच्या  जबरदस्त क्षमतेचा अंदाज येण्यासाठी त्यांच्या काही रूबाया सांगतो-

इतिहास घडविला त्यांची झाली कीर्ती
इतिहास तुडवला त्यांची देखील कीर्ती
गहिवरला अश्रू कीर्तिस्तंभावरला
पिंडास कावळा अजून नाही शिवला

येताना त्याने दार लावले नाही
जाताना त्याने वळून पाहिले नाही
येईन म्हणाला, पाहिन वाट म्हणाली
दारात अहिल्या शिळा होऊन बसली

पण लिहावयाचे लिहून झाले नाही
पण सांगावयाचे सांगून झाले नाही
संपली कथा जी कुणी ऐकली नाही
संपली रात्र, वेदना संपली नाही

खांद्यावर घेऊ नको सोन्याचा सूळ
चार्वाक म्हणाला, पुनर्जन्म हे खूळ
देहाला कसलें आहे पुण्य नि पाप
आत्म्यास भोगुं द्या अमरत्वाचा शाप

कलेचा ध्यास घेऊन मराठी मनावर अधिराज्य गाजवणार्‍या या महान साहित्यिकास आमची प्रेमाची मानवंदना!!
- घनश्याम पाटील, पुणे
7057292092

10 comments:

  1. वास्तवदर्शी...

    ReplyDelete
  2. राय किणीकरांची प्रतिभा अफाटाच । त्यांचे मूल्यमापन आपण सूक्ष्मपणे केले आहे

    ReplyDelete
  3. खानोलकरांसारखेच प्रतिभेच्या नक्षत्रांचे देणं लाभलेलं, चतुरस्त्र पण अवलिया व्यक्तिमत्व. 'खजिन्याची विहीर'हे मराठी नाट्यलेखनातलं अत्यंत महत्त्वाचं, ताकदीचं व काळापुढचं काम आहे, ज्याचं योग्य श्रेय त्यांना मिळालं नाही.

    ReplyDelete
  4. ध्येयानं झपाटणं काय असतं ते या लेखातून कळलं.
    अतिशय सुंदर लेख!

    ReplyDelete
  5. मी खजिन्याची विहिर पाहिले. अप्रतिम.....

    ReplyDelete
  6. खरं तर जे काय वाचव्यास मिळाले ते अनमोल विचारधान, म्हणुन मनात सेव्ह झालं. आपल्या fb पेजवर असे आगळे वेगळे मिळते वाचावयास. धन्यवाद.

    ReplyDelete