Monday, March 30, 2015

दखलपात्र - एक चपराक

सुप्रसिद्ध साहित्यिक आणि इतिहास लेखक डॉ. सदाशिव शिवदे यांनी माझ्या 'दखलपात्र' या पुस्तकाचे केलेले परीक्षण 


प्राचार्य श्रीपाल सबनीस, भाई वैद्य, सुधीर गाडगीळ, श्रीराम पचिंद्रे, प्रदीप नणंदकर यांच्या उपस्थितीत पहिल्या आवृत्तीचे प्रकाशन.


श्री समर्थ रामदास म्हणतात,
आता असो हे बोलणे। विवेकी तोचि हे जाणे।
पूर्वपक्ष लागे उडवणे। एरवी अनुर्वाच।
आपल्या वाणीत सदैव चपखलपणा, परखड विचार घेऊन आपल्या लेखणीने अनेकांना अंतर्मुख व्हायला लावणार्‍या घनश्याम पाटील यांच्या ‘चपराक’ या साप्ताहिक आणि मासिकातील अग्रलेखांचा संग्रह म्हणजे ‘दखलपात्र‘! ही एक अपूर्व अशी ग्रंथनिर्मिती असल्याचा प्रत्यय त्यांच्या शब्दाशब्दातून येतो आणि विवेक जागृत होऊन वाचकांनाही अनुर्वाच असा प्रत्यय आल्यावाचून राहत नाही. संपादक तरूण, तडफदार, हरहुन्नरी असून सूक्ष्म निरीक्षण, निश्‍चय वचनी बाण्याचे, ‘मागे एक पुढे एक, बोले एक, करी एक’ किंवा ‘ज्ञान बोलोन करीन स्वार्थ’ अशी वृत्ती न ठेवणारे, परखडपणे आपले विचार मांडणारे, केवळ शब्दांची कचाटे न करता समाजजागृतीचे कार्य करणारे आहेत. त्यांचे कार्य केवळ स्वतःच्या संतुष्टीसाठी नसून निश्‍चितपणे इतरांच्या भल्यासाठी आहे. तो कर्ममार्ग आहे, ज्ञानमार्ग आहे आणि योगमार्गही आहे. म्हणूनच त्यांच्या प्रभावी लेखनाची दखल महाराष्ट्रधर्मी माणूस घेतल्यावाचून राहणार नाही.
लेखक खर्‍या अर्थाने बंडखोर आहे. त्याच्यात लोकमान्यांचा ‘केसरी‘, आचार्य अत्र्यांचा ‘मराठा’ आणि आगरकरांचा ‘सुधारक’ आहे. त्यांच्याच शब्दात सांगावयाचे झाल्यास, ‘आम्ही अनिष्ठतेचा खात्मा करण्यासाठी लढण्याची मर्दुमकी दाखवू. ही क्रांती घडविण्याचा आम्ही विडा उचलला आहे.’(ही लढाई जिंकलीच पाहिजे) सध्या ‘मी आणि माझे’ एवढाच संस्कार समाजात उरला आहे, याची खंत लेखकाला विदीर्ण करते. जागतिकीकरणाच्या अफाट अशा सत्यापुढे उभे राहिल्यावर या देशात रामराज्य निर्माण होण्याचा आशावाद ‘भय इथले संपत नाही’ असे कोणी म्हणू नये, याची जाणीव करून देतो. ज्या शिवछत्रपतींनी ‘राष्ट्रप्रेमाविषयी प्रबळ भावना’ असा भक्कम ‘महाराष्ट्र धर्म’ निर्माण केला त्याचे चरित्र सार्‍या विश्‍वात पोचावे मात्र त्यांच्या नावाने राजकारण होऊ नये, असे लेखकाला मनोमन वाटते. स्त्रियांचा सन्मान हा नव्या युगाचा झंकार असून तिच्यावर होणारे अत्याचार हा हिंदू संस्कृतीला काळीमा आहे, हे व्यक्त करताना लेखकाचे मन फार हळूवार होते.
आदरणीय अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाबद्दल लेखकाला आदर आहे. ‘राष्ट्रीय अस्मितेचे प्रतिक’ म्हणून अण्णांचा गौरव करताना त्यांचे अपरिपक्व वैचारिक स्वरूप मात्र स्पष्टपणे मांडताना संपादक घनश्याम पाटील मागेपुढे पाहत नाहीत.
पट्टेवाल्याची नोकरी करणारा बघता बघता एक मोठा राजकारणी होतो आणि वाढत वाढत देशाचा गृहमंत्री होतो. अशा नेत्याची अतिशय अल्प शब्दात मनोरंजक पण नेमकी अशी कथा ‘एक पट्टेवाला’ या अग्रलेखाद्वारे लेखकाने समाजापुढे उभी केली आहे. ‘भांडकुदळ अप्रिया’ या लेखातून अत्यंत चपखल व परखडपणे सुप्रियाताई सुळे यांच्या राजकारणाचा वेध घेताना लेखकाने त्यांना मार्गदर्शनच केले आहे, असे म्हणावे लागेल. नामदार आर. आर. पाटील यांच्यासारख्या किंवा लक्ष्मण ढोबळे यांच्यासारख्या मंत्र्यांना कडाडून फटकारे मारताना घनश्याम पाटील आपली साहित्यातली ‘पाटीलकी’ तर सिद्ध करतातच पण विलासराव देशमुख यांच्यावर ‘राजकारणातला सुपरस्टार गेला’ असा मृत्युलेख लिहून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून आपल्या विनयशील स्वभावाचे दर्शनही घडवितात.
प्रत्येकाने मरणाचे स्मरण ठेवले पाहिजे हे सांगतानाच लेखकाने ब्राह्मण समाजाने देशासाठी सर्व क्षेत्रात केलेल्या कामगिरीची जाणीव करून देऊन ‘जातीद्वेष म्हणजे राष्ट्रोद्धार नव्हे’ हे छानपणे पटवून दिले आहे. प्रकाशन व्यवसायातील प्रवृत्ती, लेखकांची अवहेलना, विके्रत्यांची, वाचकांची गळचेपी या गोष्टी किती ‘दखलपात्र’ आहेत, हे सांगताना मराठी माणसाने संघटित होऊन अशा प्रवृत्ती मोडून काढाव्यात, असे कळकळीचे आवाहन केले आहे. देशाला आज बौद्धिक क्षत्रियांची गरज आहे. मला काय त्याचे ही प्रवृत्ती आता सोडायलाच हवी. साहित्य संमेलनाचे पावित्र्य जपावे, संमेलन ही जत्रा नसून साहित्य जागृतीचा उत्सव आहे यासंबधीचे लेखकाचे विचार ‘आता असो हे बोलणे। अधिकारपरत्वे घेणे। शिंपीमधील मुक्त उणे। म्हणू नये!’ अशा पद्धतीने खुसखुशीत भाषेत आहेत.
अतिशय धारदार शब्दात त्यांनी ‘महापालिकेने केलेला खून’, ‘भक्षक नकोत, रक्षक हवेत’, ‘जागते रहो’, ‘उन्हे बाजार दिखाया’, ‘बोलतील, हसतील अन् गाडतीलही’,‘धारदार दुर्गंधी’, ‘कराड मास्तरांचा अमर होण्याचा अट्टाहास’, ‘अजब तुझे सरकार’, ‘होयबांच्या गर्दीतला नेता’, ‘यांना आवरा, त्यांना सावरा’ हे व असे अग्रलेख लिहिले आहेत. घनश्याम पाटील यांनी आपली लेखणीरूपी समशेर अशी काही चालवली आहे की, त्यांस युक्तीवंत, गुणवंत, बुद्धिवंत की बहुधारिष्ट्यवंत म्हणू? एक मात्र खरे हे सद्विद्येचे, विवेकाचे, संतोषरूपाचे, विमळ ज्ञानाचे लक्षण आहे. आम्ही मात्र वरील शब्दातून ‘दखलपात्र’ ची दखल घेत आहोत.
लेखकाने आपल्या ग्रंथाचा अखेरचा अध्याय श्रीमत् भगवतगीतेतील व्यास मुनींच्या गूढ प्रतिभेतून साकारलेल्या भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या चैतन्य संवादातून सुख-दुःख, लाभ-अलाभ, यश-अपयश या गोष्टींचा विचार  करत नाही. ‘आपण यां उचिता। स्वधर्मे राहाटतां। जें पावें तें निवांत्ता। साहोनि जावे।’ अशी स्थिती प्राप्त करून मनाचा प्रचंड निर्धार करून झुंजत राहणार्‍या लेखकाची प्रतिभा सहजच श्रीमंत झाल्यावाचून कशी राहील? निर्भिड पत्रकारिता ही आजच्या काळात दुर्मिळ झाली आहे. अशावेळी अगदी तरूण वयातच ’पोचटामध्ये घनवट। घनवटी उडी पोचट। तैसा शब्द हा फलगत।’ अशा भावनेने आजच्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी लेखकाने जो संदेश दिला आहे तोच याठिकाणी उद्धृत करणे योग्य ठरेल...
‘परिस्थितीशी चार हात करताना वस्तुस्थिती समजून घेऊन लढत राहणे केव्हाही शहाणपणाचे ठरते. फळाची अपेक्षा न करता कर्म करीत रहा, असे गीता सांगते; पण सत्कर्माचे फळ मिळतेच मिळते. मग भलेही त्याला थोडा उशीर होईल पण फलप्राप्ती होतेच यावर आमचा विश्‍वास आहे. मनाचा पक्का निश्‍चय केल्यास सहजगत्या दोष घडत नाहीत. त्यामुळे निश्‍चयाने युद्धास आरंभ करणेच हिताचे ठरते.’
अग्रलेखांचा ग्रंथ करून घनश्याम पाटील यांनी ‘उत्तिष्ठत जागृत‘ हा बहुमोलाचा संदेश देऊन आपल्या पत्रकारितेचे सार्थक केले आहे. इतिहास संशोधनात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक बाबींचा समावेश असतो. आजच्या सामाजिक घटना हा उद्याचा इतिहास असतो. इतिहास ही राष्ट्राची ज्योत समजली जाते. तिच्याद्वारे समाजाला अंधारातून प्रकाशाकडे जाता येते. या ग्रंथातून तोच दीपस्तंभ समाजापुढे घनश्याम पाटील यांनी उभा केला आहे यात शंका नाही. त्याचे मूल्य अपूर्व आहे. पत्रकारितेच्या अभ्यासाला एक संदर्भ ग्रंथ म्हणून त्याचा निश्‍चितच उपयोग होईल, यात सुतराम संदेह नाही. श्री. घनश्याम पाटील यांना आमच्या शुभेच्छा! 

द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन करताना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे.

 

- डॉ. सदाशिव शिवदे

सुप्रसिद्ध साहित्यिक आणि इतिहास लेखक
(पूर्वप्रसिद्धी : दैनिक 'ऐक्य' सातारा )



Sunday, March 29, 2015

बासरी अबोल झाली!

नरेंद्र नाईक यांचा 'साहित्य चपराक' मासिकाच्या अंकातील विशेष लेख 


नर्मदे! हर हर...ऽऽ अशा गजरात स्त्री अस्तित्वाची रुजवात झाली अन् पुरुषीचक्राचं कास सहन करण्याचं बळ मिळालं. विश्‍वातील नियतिचं दार करकरलं अन् वसुंधरा प्रकटली. तशी काळी कपिला गायही हंबरली. वासरु थरथरलं अन् विश्‍वमोलाचा माता आविष्कार प्रकटला. इंद्रायणी दुथडी भरुन वाहू लागली. कावेरी, शरयू नद्या नर्तन करु लागल्या तर गंगा, यमुना मातृप्रेमाची आराधना आळवू लागल्या. याच मातृप्रेमाने असेतू हिमालयही आनंदघन बनला. आपलं आरस्पानी सौंदर्य परावर्तित करीत आसमंतात एक गहिरा आशय गुंफू लागला. तसा अर्णवही खडबडून जागा झाला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तची आरोळी उठली. या आरोळीची जन्मदात्री होती एक माता! अन् तिचा अचाट हुंकार म्हणजे कोकराच्या अंतर्आत्म्यातील आंतरिक गर्जना. खरचं आई हे काय असते? एक अंतस्थ, अतर्क्य, अथांग विश्‍वाला भिजविणारा भिज पाऊस. घमघमणारा आंतरगंध. मग खरंच आई अत्तरदाणी असते काय? ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी.’ मग आई कुठे असते? अणुरेणूत का अजून कुठे? अंतर्धान पावलेली पावले शोधण्यासाठी आज मी अधीर झालोय. फिरतोय गल्ली बोळात,अजिंक्य डोंगरकड्यातही. अगदी अनवाणी होवून पण आईची मूस काही हाती लागत नाही. काय ही यातायात.
अनादी काळापासून अनमोल रत्नाच्या शोधात फिरणारा एक अनर्वत पण अनुपम अनुराग काही आकळलाच नाही. आई आत्म्याची निर्लेप अनुभूती म्हणजे आदीअंत. तरीही अलक्ष आलाप का छळतो? तमाम मानवजातीच्या अभ्युत्थानासाठी. आई म्हणजे एक आत्मीय आनंदकंद अनार. आबादानीच आबादानी. साक्षात आबादी आबाद. पण हा आबाद कुठे असतो? आर्यावर्तात, हिमालयापासून विंध्याद्री पर्वतापर्यंत. आई म्हणजे साक्षात ईला-ईलाही. काय हे रहस्य? काय पुरावा? कुणी पाहिला ईलाही? असे असले तरी आई असते एक दिव्याची वात. कधीच टाकत नसते कात. आई असते एक काकडआरती. सांज दिव्यातील सांजवात. मातृगंधाचा कस्तुरी कलश. आई ही कल्पित कथा नव्हे. साक्षात कांचन पण धडाधडा पेटणारा कानण. भगवान महाबुध्दाच्या चेहर्‍यावरील कारुणिक महाप्रसाद! म्हणून ती घरादाराची कमलिनी असते. तिच्याकरता काही और पण आई या दोन शब्दाचं कोडं अंगदेशाच्या कर्णाला तरी खोलता आलं का? का भारतीय वीर असणार्‍या श्रीरामाला खोलता आलं? याचं उत्तर आहे-नाही.
आई समजून घेण्यासाठी समजावी लागते, गोठ्यातील गाय. तेव्हाच चराचरात दिसतील माय. खरचं सीता, द्रौपदी दोषी होत्या का? सीतेला अग्निपरीक्षा द्यावी लागली हा इथला इतिहास आणि द्रोपदीला उघडं नागडं व्हावं लागलं हा इथला नग्न इतिहास. त्यामुळेच कन्याकुमारी ते हिंदुस्तानचे दक्षिण टोक आळविते फक्तनरेन. महात्मा व्हावा तर आईचे महात्म्य जाणणारा. तरचं तिची उतराई करता येईल, पण विवेकानंदा सारख्यांचा अपवाद सोडला तर रामायण, महाभारतापासून धर्मात्म्याची निरस जिगीषा. कुठला आदरभाव व्यक्त करील? उदात्त आदरभाव अभिव्यक्त करण्यासाठी उधाण वार्‍यावर स्वार होणारा उन्मत महत्त्वाकांक्षी पुत्र असावा लागतो. तरच सत्त्वर आईची महती गाणारं उद्यान हाती लागतं आणि निर्झराचा ओलावा खळखळू लागतो! पण सध्याची आई भरल्या ओटीने जात आहे काय? ओली भिक्षा मागता मागता तिचे व्याकूळ ओठ निर्जन स्थळी विसावतात. ओहोळ, नदी, नाले हेही कटबाज होवून रजेवर जातात. तेव्हा माधुकरी आईचा आर्तस्वर कुठला आधारभूत आयाम देत असेल या विश्‍वाला? आदराचं ठिकाण जेव्हा अवहेलना घेतं तेव्हा अर्धपोटी उसासे आमूलाग्र आघातातून बाहेर झेपावतात. तेव्हाच पृथ्वीचं आवरणही कुठल्या उद्गमातून उदय पावलं याचा आतुरतेने विचार करावा लागतो. तरच आई नावाचे उद्यान फुलवता येईल. त्यासाठी बाप नावाचा बगीचाही तपासावाच लागतो. हा टीकाश्‍लोक नव्हे, ना लफंगा विचार नव्हे तर मानवी जीवनमूल्यांतून उफाळणारे कारंजे तपासले तरच कदरदान  नावाचा फानूस उपवनात टिकेल. अन्यथा आई नावाचं झाड कितीही उन्नत, उपकारक, उपदेशात्मक असलं तरी बेफाम दुनियेत उन्मळून पडेल. त्यासाठी बाप अधिक आई बरोबर कुटुंबवत्सलता. यातूनच आई वजा बाप बरोबर आई या सूत्राची क्रमिक बांधणी केली तर आशाळभूत आईची दृष्टी अवलोकन करता येईल कारण आई असते एक आराधना. सृष्टीभराचे आराध्य दैवत. त्यापुढे आरसेमहालही पडतो फिका. अवीट असा अव्यक्त, व्यक्तअलभ्य प्रीतीसोहळा म्हणजे आई. त्यात नसतो मत्सर, नसतो अस्थिरपणा. आई अस्थिपंजर झाली तरी ना खेद, ना आनंद. त्यासाठी कराव लागतं आकलन तरच आई शोधता येईल. आई असते एक आख्यान. नसतो तिच्यात आकस, आकांत. आक्रंदन असतात तिचे सगे सोबती. म्हणूनच तिचा दडपलेला असतो आकांत पुरुषी अहंकाराखाली. याच तत्त्वावर बाप असतो आग्रही, आचार विचार करतो आत्मगत, असतो असंतुष्ट, स्वार्थाची आतुरता आत्मकेंद्रित म्हणूनच सीता असो किंवा द्रौपदी तिच्याही भोवताल आग्यावेताळाची दाटी. जेव्हा भास हे आभास होवून येतात तेव्हा स्त्री होते आश्रित आणि दिला जातो एक इशारा- इशारत, उच्चपदस्थ संस्कृतीकडून. मग होते तिची ससेहोलपट, कालांतराने उच्चाटन अन् घेतात तिचा उचित आस्वाद. मग करतात एक दिवस तिचा लिलाव. निमिषात अलोट गर्दी तरीही तिचे मर्म अबाधित. एखाद्या इंद्रनील हिर्‍यासारखे. तरीही तिच्यावर भिडतात आरक्त नजरा अन् होते अवहेलना. तेव्हा तीही होते अमोघ, अमूर्त. अर्धनारीनटेश्‍वराच्या नावाने सूर्याला अर्घ्य देते. अन् रुदनाचा प्रपात करुन अभिषेक करते. अफीमबाजाचं अभिष्ट चिंतनही करते अबीरबुक्का होवून. तेव्हा तिची प्रभा फाकलेली असते. ‘दे दान सुटे गिरान’ म्हणत अभय देते चराचराला.
मग प्रश्‍न पडतो रावणराज्याचा? राम श्रेष्ठ का रावण श्रेष्ठ? रावणाने सीतेची अग्निपरीक्षा घेतली नाही. घेतली ती रामाने. द्रोपदीचा लिलाव कौरवांनी मांडला नाही. तो मांडला पाची पांडवांनी! मग इन्साफ कसा करायचा? कुणाची आहुती द्यायची? पुरुषप्रधान संस्कृतीची का स्त्रीप्रधान संस्कृतीची? आपल्या कपोलकल्पित कामना पूर्ण करण्यासाठी कामधेनूची कसोटी? हा उ:शाप आहे का उष:काल आहे? याचा उलगडा होणे आवश्यक आहे. तरच उत्कट अशा स्त्री हृदयाची उत्तम गती शोधून उत्तुंग स्त्री पर्वाची उंची मोजता येईल. अन्यथा उत्तरार्ध उद्विग्न असा हाती येईल. सृष्टीभराचे सौंदर्य प्राशन करुन प्रभातकाळी उष:पान करता येईल आणि राष्ट्राप्रती उमदा विचार मांडू शकू. अन्यथा अकस्मात उपरत्या कळेचा उमाळा दाटून येईल. आम्ही ऐटबाज हिंदू, वैभवसंपन्न ऐश्‍वर्यवादी, ऐहिक लोक निळसर डोळ्यावाटे स्त्रीला उपमा देण्यात तरबेज आहोत. स्त्री म्हणजे माता, सीता, गीता, गाथा, प्रथा पण पार्थ कोण? याचा विचार झालाच पाहिजे, तरच अभिनिवेशाची अमानुषता नष्ट होईल. अभावग्रस्तता जाईल आणि आई नावाची अमानत शिल्लक ठेवून आपण निष्णात आमीर होवू. तरच आपला अभ्युदय. अन्यथा आरिष्ट आलेच म्हणून समजा.
अपवाद सोडले तर अफसोस या गोष्टीचा आहे की, कुठलाच अनमान न करता आम्ही लोक आधाशीपणे अप्रतिम अप्सरेच्या मागे लागलो आहोत. आमच्यातला अजाण अंतर्भाव अगतिकता निर्माण करीत आहे. शुद्ध अंतःकरणाशिवाय ग्लानी जात नसते. त्यासाठी आपलाच अदमास घेतला पाहिजे तरच आपली अदालत निष्कलंक ठरेल. त्यासाठी अतुल पराक्रम करण्यासाठी अंतर्मुख व्हावं लागेल. तरच मातृत्वाचं अगाध दिव्य दर्शन घडेल. एवढं सारं असतानाही मातेचे प्रेम आंधळे का? याचे उत्तर आहे प्रसूतिवेदना. जेव्हा माता प्रसूत होते, तेव्हा वेदना ह्या वेणा होतात. साक्षात श्‍वेतकमळाची कुमुदिनी. तिचा कुलदीपक कुलवंत असला तरी, कुबेेर असला तरी तिच्यातील जागती ज्योत सदैव जागता पहारा करते. मग तो कुलदीपक कूपमंडूक वृत्तीचा घरकोंबडा असला तरी त्या खापरतोेंड्याचे रक्षण करण्यासाठी तिचा सारखा गुंजारव  चालू असतो. ‘घार हिंडे आकाशी, चित्त तिचे पिलापाशी’ याची अनुभूती येते. सुरेख असे गोमटे सुस्वरुप.. हाच तिचा मातृत्वाचा राजमार्ग असतो. यातूनच अनेक चक्रवर्ती राजे निर्माण झाले. ती सृष्टीला चकित करते पण चकवा देत नाही, ना चकार शब्द बोलत नाही, पण तिची चैतन्यचेतना चंद्रमा होवून अखंड सानुल्याचा जयघोष करीत जपमाळ जपते. मग ते जळतोंड्या कोकरु असलं तरी तिचं मातृत्व जाज्वल्य जिवित्वाचा जीर्णोद्धार करते. साक्षात जास्वंद असेल तर ज्योतिष्मान होवून झंकारते. तिच्या हरेक नजरेत मातृत्वाचा जोगवा असतो. तिचे लाघव नेत्रपल्लव झंझावात करुन द्यार्द्र स्वर चराचराला अपूर्ण चिंब करते. म्हणून मातृत्व म्हणजे दिगंतरीचा दर्पण, दिग्वीजय करणारा दिनकर, दीपस्तंभावरील दिवटी का दीपमाळ? पण सारखी फडफडणारी दीपिका. तर कधी  थंडीवार्‍यात दुर्गम दुर्गातील दुर्लभदुलई. देवगिरीच्या यादवांचीही दुवा. देदीप्यमान देवता.
आई म्हणजे साक्षात देवालय. शिवप्रभूचं दैवत. नाही का जिजाऊ मॉंसाहेब गेल्या तेव्हा सार्‍या महाराष्ट्राचं देवस्थान नष्ट झालं? देव्हारा रितारिता पडला. दौलतीचा धनुर्धारी धनंजय निबिड अंध:कारात ढसाढसा रडला. सारं काही आई नावाच्या देहाचा देहांत, ध्वंस. साक्षात धरणीकंप. जेव्हा अशी आई कुठेतरी दूरदूर जाते तेव्हा रुमझुमणारी धूनही मुकी होते. राधा राधा कृष्ण राधा नावाची बासरीही अबोल होते. नंदादीप मालवतो. नभ दाटून येतात. नभोमंडल सैरभैर होतं. आई नावाचं नादब्रह्म लोप पावतं अन् नवकोट नारायण नागवला जातो. फक्त एका आईसाठी. आई असतो साक्षात कमळाचा समूह. म्हणून तर सारं जग म्हणतं, नलिनी नलिनी! निष्कांचन असणारी आई निष्काम सेवा पार पाडून निजधामास जाते तेव्हा आठवायला लागते तिचं अनुपम सौंदर्य. करायला लागते निरुपण, विवेचन पण निर्विकल्प आत्म्याचा निलाम आपणच केलेले असतो ना? आता आई झालीय निशंकनिर्माल्य, निचेष्टनिश्‍चेतन पडलेलं एक नीरज. नीरव शांततेत तिच्या नुपूराचाही नाद निःशब्द झालाय अन् निशाही निभ्रांत. आता कुठली नौबत दणाणेल पंकज पाकळीसाठी? पैंजणही झालेत निस्पंद. खरचं आई एक नगिना होती. अंबरावरती रेखलेली निलीमा. आता सृष्टीचाही नगारा दणाणेल. ध्वांत, श्रांत पडलेली थोरवी आळविण्यासाठी अन् त्यातूनच जन्मेल एक तुळस. उद्याच्या तत्त्वार्थ तीर्थराजासाठी. तपस्वी तपोनिधी तपोवनात गेली आता. निमग्नपणे पाहू तिची तसबीर. तात्त्विक, तेजस्वी, तेजःपुंज तत्त्वज्ञानाची. फक्त तलाश. तिचा कलेजा आता शांतशांत झाला आहे. काळ झोप. कुटुंबवत्सल कुजबूज निवली. कोकीळ खरेच रजेवर गेलाय तरीही धुंदकुंद वातावरणावर कौंमुदीचे चांदणे फेकीत. खरचं क्रौंैचवध झालाय का? कशावर आली होती स्वार होवून? साक्षात खगेंद्रावरती. कशासाठी आली होती? रुक्षपणा नष्ट करुन सार्‍या धरेला प्रदीप्त करण्यासाठी. तिची गजगती चाल अन् केश सांभारात माळलेला गजरा गाभारा श्रांतावून गेला. राउळही गहिरा आशय घेवून घनश्याम सुंदराची भूपाळी गात ग्रस्तास्त गोजिर्‍याचा गौरव करण्यासाठी झगमगू लागेल. गुरुकुलाचा महिमा गुंफत गुलाबदाणी शमलय, अगदी गोरज मुहूर्तावर. अखेरचा श्‍वास चालू असताना तिचा गुलालगोटा गुलाबी थंडीत गुलाबीझोप घेत होता अन् तिकडे आई गेलीय. दारावरचं तोरण काळवंडलंय आणि या तोंडचाट्याची तोंडपाटीलकी चालू झालीय म्हणे, आई गं.... थोतांड्याचा थोटका विचार. विद्वत्ताच ती काय? विचारशील असता तर विलाप करण्याची वेळ आलीच नसती पण बिचारा विहंगम वृंदावनाचे सचिदानंद स्वरुप कसे काय अवलोकन करु शकेल?  कारण मातृहृदय सेवाभाव जाणते. ते नुसते विद्यापीठीय विचारवंत नसते. त्यामुळे व्याख्या करत बसत नाही. व्याख्याता तरी नव्हेच नव्हे.
व्याधी आणि व्याधीग्रस्त लोकांवर शतदा उपाय करुन शालीन सांत्वन करते. त्याचबरोबर शिकस्तही. सेवाभाव हाच संकल्प. शुचिर्भूत आत्म्याचा संकल्प! एक संघर्ष! महा संघर्ष! जीवनमूल्यांचा संघर्ष! त्यासाठीच आई या नावानेच सतीचे वाण घेवून सात्त्विक सतार छेडलेला असतो आणि हाच तो सत्य संकल्प! सत्यनिष्ठा रोमारोमात भिनलेली म्हणूनच सत्त्व, सार हे सत्त्वशील होवून येतात. त्यामुळे मानवी जीवन सदाचारासमीप जाते. समरस होणे हा आईचा गुणधर्म, सोशीक समर्पण हा स्थायीभाव, त्यामुळेच सम्राटही तिच्यासमोर सर्वस्वाची सलामी देतो. कारण आई ही सहस्त्ररश्मी सविता असते. तिचे सर्वस्वाचे समग्र पतन झाले तरी सार्थकता ही सिंधु बनते. कारण तिच्यात असते वाहण्याची स्फूर्ती. नसतो आपपर भाव! म्हणूनच तर एखाद्या स्वाती नक्षत्रासारखी स्वयंभू हालाखी पचविते, पण हवेली मागत नाही ना हवालदिल हरिणी होत नाही. कारण तिचा नजराणाच असतो लोकहितेषी. म्हणूनच तर हिमनगाची हिमांशू ठरते. तिचा हुंकार आणि रुकार असतो हिरकणीसारखा. साक्षात आवेशपूर्ण क्षणप्रभा. तिचा अनाहूत अनुराग अमितमनोहर असतो ओतप्रोत. ती जळते सारखी आतबाहेर! साक्षात अरण्यरुदन. म्हणूनच तर तिचा विरह मागत असतो एक मोहरा. राजमुकुट ल्यालेला. गळ्यात कवडीमाळ अन् हाती परडी घेवून फुलेही उधळते गंधाळलेली. त्यातच तिचे प्राणपाखरु हर्षन्मुख होतं. असा हा तिचा अगाध महिमा अन् अगम्य इच्छाशक्ती. अविरत झगडणारी अबोल  अबोली. तिची स्वप्न अवस्था कुठला अमोद सुस्वर घेवून येत असेल  सुप्रभाते. विरहदु:ख कुंकवासंगे ल्यालेली आई म्हणजेच विराटस्वरुप. विरक्तविमल चारित्र्य विभूषित करुन विभूती ठरते तेव्हा मानवी जीवनात विनयाची विनयशील विपुलता, वात्सल्याची संबळ घेवून दणाणते. तेव्हा हिरवागार विपुल पर्णाचा वसंत प्रज्ञा, शील, करुणेचा विवेक सिंचन करण्याचा वसा घेतो. अशा मातेसमोर वस्त्रहरणाचा आणि वस्त्रलोचन करणार्‍याचे विधान विधिनिषेध ठरते. मग हा जळतोंड्या रडतोच कशासाठी? उत्तर सोपे आहे. प्रौढ प्रतापासाठी. कोण प्रेरित करेल? परागंदा झालेल्या प्रेरक प्रेरणांची हाव करणारा हा फुलमाळी ठरला तरी त्याची फुलारी भरेल काय?  ज्या मातेची निर्भत्सना होते, त्या मातेच्या हृदयातील कोलाहल घायाळ होवून परित्राणाची भिक्षा मागतो हे या पार्थिव गोट्यास, महमुदी मस्तवाल कारट्यास समजले का? आई नावाचं पिनाक असतंच मुळी पिंपळपान. साक्षात पारिजातकाचं झाड अन् हृदय असतो फुललेला प्राजक्त. तर कधी होतो बकुळ. म्हणूनच तर आई नावाचं पीयूष पुण्यश्‍लोक पुण्यक्षेत्र ठरतं. आई या शब्दातच पूर्वा फाकलेली असते. ती करत नसते प्रतारणा, ना प्रमाद. मग कशासाठी करत असेल हा सायास? हाती संसाररुपी बाणाची प्रत्यंचा खेचलेली असते. वाघीण वेळप्रसंगी दोन पावले मागं सरुन झेपावणारी म्हणूनच तर तिचा परिमळ सर्वत्र उधानलेला असतो. तिचा पयोधर असतो परिस अन् याच पयोधराचे स्तनपान केलेला जेव्हा तिच्याशीच पंगा घेतो तेव्हा त्याचा परागंद ठरलेलाच असतो. कारण त्यानं कुणाचे पांग फेडलेले असतात? एका पानस्थ पाचूचे? अरे मातृपारखी व्हा! गाजरपारख्यांनो! तुमच्याही हृदयी घुमू द्या पारवा! तरच प्रगल्भ पुष्कराज व्हाल. माता ही गुढी असते. चराचराला व्यापलेली सुरेख चाफेकळी. तिचा देखणा मुखडा पाहूनच तर तुझी रोतीसूरत रोमहर्ष पावली. रोमरंध्री ललामभूत झालास. तुझ्यासारखेे लाडोबा कुठली चिरंतन लढाई लढेल? वत्सा! वत्सलतेचा वध वरप्रद नसतो रे! तूही तिचा महिमाशाली पुत्र आहेस. अरे माणिकमोती हो! लाल हो! माधुर्य माधुरीच्या मांदीयाळीत मार्गस्थ हो. तरच तुझ्या कीर्तीचा मकरध्वज फडफडेल. ती पहा... मावळतीची किरणे मुक्त कैवल्याचा मुलामा घेवून आलीत. अरे सालसपणाची ग्वाही दे. बालिशपणाची बदसूरत सोडून  बधीरतेला सोडचिठ्ठी दे! अन् कर मातृवत्सल सौदामिनीला प्रणिपात! अन् हो तिचा भक्तवत्सल. बिजली तुझ्यावर मोहित होईल. अरे तुझ्यातला मनोहर भुलोबा काय कामाचा? मलूलता सोड अन् मनोरम समीरन लहर हो! उधळ एकदाचा बेलभंडार अन् घे खांद्यावर  पताका आई नावाची कारण आई पराधीन नव्हे, पणती आहे. एकतरी ओवी गा तिच्यासाठी. कारण आई गहिवर नव्हे तर दहिवर आहे. अरे गा तिच्या प्रीतीचे सोहळे.
आई म्हणजे साक्षात गुलाबपुष्पांनी बहरलेली मधुमालतीची वेल. रंगीबेरंगी पुष्पगंधांनी बहरलेला मनमोर वसंत. हसर्‍या गाली चाफा अन् मोगरीचे वैभव. पौर्णिमेच्या चांदण्याची बरसात. रातराणीची फुलारलेली गंधीत फुले. एकूणच मोहरलेला गुलमोहर. अभ्रपटलावर रेखलेली पहाटलाली अन् थयथयणारे निळे घन. स्वैर भरारणारा वारा, पाचूची नितळ छाया पण संध्यासमयी पारिजातक झडलेला, मात्र शेजार्‍यापाजार्‍याच्या अंगणी बहरलेला. डोळ्यात रेखलेला सुरमा... पण भन्नाटवारा सुटला आहे. ढग पांगताहेत. अशा खुलावटीत रेंगाळलेला सायंतारा. हेमंतात तोंड पसरलेला. आई म्हणजेच उलूपी अन् उर्वशीच्या केस सांभारात माळलेला पुष्पगुच्छ, निव्वळ हिरव्या, पिवळ्या, निळ्या फुलावर लहरणार्‍या लाटा. त्यातून परावर्तित होणारा इंद्रधनु. नाजूक साजूक हातावर चितारलेली मेहंदी. साक्षात शुक्र चांदणी. जीवन संग्रामात यशस्वी होणारी हसरी सकाळ. एक सुंदर विण, त्यात गहिर्‍या पहाटेचं विहंगम दृश्य. गंध फुलावर भिरभिरणारी दुपार... ही सकाळ होते, ब्रह्मांड हर्षफुल्ल होवून डोलू लागते. तेव्हा प्रीत होते, तिच्या पायाची दास अन् महन्मंगल क्षण रुणझुणतो केवड्याच्या रानानं, दर्याद्रभाव झुलतो पिंपळपानात अन् प्रीत उधानते नागेलीच्या बनात. नदीही अवखळपणे वाहत.. एक नयनमनोहर नजराण्यासाठी. हीच तर तिची खरी अदा. दूरच्या रानात उडालेली पाखरं दळदार फुलांनी वेडावतात. टपटपताहेत जास्वंदाची पिवळीधमक फुलं, गंधाळलेल्या रानवार्‍यात. हिमनग झालाय धुुंदफुंद, मधुमालतीच्या जाळ्यात. रंगाचं देखणं रुप अन् तलमसुतीचा मुग्धसोहळा. अवचित हंबरणारी गाय अन् हुंदाडणारं वासरु म्हणजे एक मातृहृदयी अनावर शीळ, मंतरलेला भास. अनोखी लय. यात अजाण पाखरु सैरभैरत. फुलांच्या उत्सवात आणि गात राहतं सुकुमार वसंतगीत.. पण आता या गीतालाही काजळी लागलीय. घनव्याकुळ संध्यासमयी. कारण देव्हारा रिता झालाय. कोण देईल गंधग्वाही मातृप्रीतिची? अद्भूत निसर्ग स्थितप्रज्ञ झालाय. आत्ममग्न काटेरी बाभूळबनात. गहनगूढ सांज उगवतीचं स्वप्न बाळगीत असते पण.. मश्गुल प्रवाहात आई नावाचं झाडच हुरहुरत्या अंत:करणानं थरथरुन, उन्मळून पडत असेल तर नावा चालल्या वाहत असेच म्हणावं लागेल आणि याच नावेवरती स्वार होवून वेदनेचे तलमगीत रेशमी कुंतल्यात गुंफून मोरांना, मेघांना, ढगांना, आळवित अखंड प्रपात करावा लागेल. तरीही भावविभोर मातृप्रीत दुर्लभ. आर्त हुरहुर, व्याकुळ हुंदका, देशोदेशीची दिगंतर मुसाफिरी! तरीही आई नावाचा कवडसा दूरच... दूर...
आभाळ गिरकी - घ्यावी फिरकी
गहन संदर्भ - चुकार टिटवी
बोचरा नाद - होईल बाद
फिर फिर्याद - यहॉं थी कहा गयी।
आई पाहिली का हो! आई...!!


- नरेंद्र नाईक 
कळमनुरी, जि. हिंगोली 
संपर्क : ७३५०६३४७८५

Friday, March 27, 2015

पराधीन आहे जगती...!

राजाभाऊ परदेशी
मंगळवार, दि. 24 मार्च 2015. वेळ : सकाळची. स्थळ : ‘चपराक’चे कार्यालय. फर्ग्युसन महाविद्यालयातून एम.ए. करणार्‍या रूक्मिणी येवले या आमच्या मुलाखतीसाठी आलेल्या. मराठी हा त्यांचा विशेष विषय. ‘मराठी प्रकाशन संस्थेचे कामकाज’ या विषयावर त्यांना प्रकल्प करायचा आहे. आम्ही संपादकीय विभागात बसून त्यांच्याशी तळमळीने बोलत होतो. बाहेरच्या कक्षात बालसाहित्यिक सुभाष कुदळे, राजाभाऊ परदेशी, समीर नेर्लेकर, सागर सुरवसे, तुषार उथळे पाटील, सचिन गोरे, नरहरी पत्तेवार आदी मंडळी गप्पा मारत बसलेली. रूक्मिणी येवले यांना हवी ती माहिती देऊन झाल्यानंतर आम्ही सांगितले, ‘‘प्रकाशक म्हणून आमची भूमिका तुम्ही ऐकली, आता बाहेर बसलेल्या लेखकांशी चर्चा करा. त्यांचे अनुभव तुम्हाला उपयुक्त ठरतील.’’
रूक्मिणीताईसह आम्हीही बाहेर आलो. नेर्लेकर, कुदळे, पत्तेवार, सुरवसे या लेखकांनी त्यांचे पुस्तक प्रकाशनाचे अनुभव सांगितले. तेव्हा राजाभाऊ परदेशी म्हणाले, ‘‘माझी लेखनाची गोडी ‘चपराक’मुळे वाढली. पीएमपीएमएलला असताना मी रोज एक सुविचार लिहायचो. त्याचे पुढे ‘शब्दरत्ने’ हे पुस्तकही काढले. आता निवृत्तीनंतर मी भरपूर लिहायचे ठरवले आहे आणि ‘चपराक’ हे आम्हाला त्यासाठी हक्काचे व्यासपीठ वाटते. मागच्याच महिन्यात ‘साहित्य चपराक‘ मासिकाच्या अंकात माझा लेख प्रकाशित झाला. मला ‘चपराक’ने लिखानासाठी विषय देऊन लिहिते केल्याचे समाधान मोठे आहे.’’
साहित्यावरची चर्चा संपल्यावर राजाभाऊंनी त्यांचे काही वैयक्तिक अनुभव सांगायला सुरूवात केली. सुभाष कुदळे यांना ते आदर्श मानायचे. कुदळे यांचे ‘बस मार्ग 42’ हे पुस्तक लवकरच ‘चपराक’कडून येत आहे. पीएमपीएमएलचे चालक आणि वाहक अनेक प्रकारामुळे बदनाम होत असताना त्यांचे प्रभावी कामकाज आणि चांगुलपण ठळकपणे अधोरेखित करणारे हे पुस्तक. परदेशी आणि कुदळे हे दोघेही याच संस्थेतून निवृत्त झाले असल्याने दोघांचेही दांडगे अनुभव. त्यात राजाभाऊ म्हणजे खर्‍याअर्थी जगन्मित्र. प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होऊन चुकलेल्यांना दिशा दाखवणारे आदर्श व्यक्तिमत्त्व.
ते म्हणाले, ‘‘मी पीएमपीएमएल मध्ये वरिष्ठ लेखापाल म्हणून नोकरी करताना सतत कर्मचार्‍यांच्या संपर्कात असायचो. एखादा कर्मचारी कामानिमित्त आला की मी त्याला तंबाखू मागायचो. साहेब तंबाखू मागताहेत म्हटल्यावर तो लगबगीने पुडी काढायचा. ती मी डसबीनमध्ये टाकायचो आणि त्याला व्यसनमुक्तीवर व्याख्यान द्यायचो.’’
बरे, कर्मचारी मित्रांना समजावून सांगायची यांची पद्धतही न्यारीच. म्हणजे एखाद्या कागदावर ते पेन्शिलने एक झाड काढायचे. त्या झाडाच्या खोडाला वाळवी दाखवायचे आणि विचारायचे, ‘‘आता या झाडाचे काय होईल?’’ कर्मचारी सांगायचा, ‘‘साहेब, झाड कोसळेल...’’ त्यावर ते म्हणायचे, ‘‘तुझ्या कुटुंबाचा गाडा तुझ्यावर अवलंबून आहे. या झाडाची भूमिका तुला पार पाडायची आहे. जर तू व्यसनाच्या वाळवीने कोसळलास तर तुझ्या संसाराच्या फांद्यांचे काय होईल याचा विचार कर!’’ कर्मचारी ओशाळायचा. ‘यापुढे कधीच व्यसन करणार नाही’ अशी शपथ घेऊन बाहेर पडायचा.
परवा राजाभाऊ सांगत होते, ‘‘समाज व्यसनमुक्त झाला पाहिजे. विशेषतः 40 ते 45 या वयोगटातील लोकाचे मद्यपान थांबायला हवे. या वयात लिव्हर लवकर ‘डॅमेज’ होते. हृदयविकाराने मरणार्‍यांचे प्रमाणही या वयात जास्त आहे.... नुकतीच निवृत्ती झाल्याने मी काही कौटुंबीक जबाबदार्‍यात अडकलो होतो. आता यापुढे जीवनाचा आणखी आनंद लुटणार. अजून काम करणार....’’
आम्ही ऐकतच होतो. विविध क्षेत्रात तळमळीने काम करणारे, निकोप आणि व्यसनमुक्त समाजाची अपेक्षा व्यक्त करणारे, त्यांच्या दोन्ही मुलींवर कायम भरभरून बोलणारे कुटुंबवत्सल राजाभाऊ, अंध कलाकारांसाठी हिरीरीने काम करणारे समाजसेवक, आपल्या सुरेल आवाजात मराठी आणि हिंदी गाणे गाऊन समोरच्याला थक्क करणारे कलाकार राजाभाऊ, सतत नव्याचा ध्यास घेत लिखानासाठी धडपडणारे लेखक राजाभाऊ... आणि सतत हसत राहत समोरच्या व्यक्तिची कोणतीही समस्या असली तरी सर्वस्व झोकून देऊन त्याच्या मदतीसाठी धडपडणारे राजाभाऊ.... एकाच माणसाची ही कितीतरी रूपे... मनासारखा राजा.. राजासारखे मन...
सुभाष कुदळे आणि राजाभाऊ परदेशी हे एक समीकरणच झाले होते. कुदळे यांच्यासोबत ते कायम ‘चपराक’च्या कार्यालयात यायचे. येताना कधी द्राक्षे, कधी केक-ढोकळा तर कधी भेळ आणायचे. ‘चपराक’च्या सदस्यांसह दिलखुलास गप्पा मारायचे. जे चांगले आहे, उदात्त आहे, मंगल, पवित्र आहे त्याचा त्यांना ध्यास होता. ‘इंग्रजीवर प्रभुत्व असायलाच हवे,’ हे ठासून सांगताना ‘मायबोली मराठीवरचे प्रेम यत्किंचितही कमी होऊ नये,’ असे ते म्हणायचे. त्याचसाठी त्यांनी त्यांच्या काही नातेवाईकांची ‘चपराक’ची वर्गणीही भरली होती.
मध्यंतरी त्यांच्या निवृत्तीचा कार्यक्रम झाला. त्यावेळी त्यांनी आम्हाला कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून येण्याची विनंती केली. आम्ही म्हणालो, ‘‘राजाभाऊ, निवृत्ती हा आयुष्यातला महत्त्वावा टप्पा आहे. एखाद्या नामवंत लेखकाला आपण बोलवूया. मी कार्यकर्ता म्हणून उपस्थित असेनच...’’ पण त्यांनी काही ऐकले नाही. ‘‘पीएमपीएमएल मधील माझ्या कर्मचारी, पदाधिकारी बांधवांना तुमचे विचार आवडतात, तुम्ही माझ्यासाठी म्हणून आलेच पाहिजे...’’ असा आग्रह त्यांनी धरला. आमच्यापुढे पर्याय नव्हता. आम्ही गेलो. त्यांच्याविषयी मनमोकळे बोललो. ते खुश झाले.
मात्र निवृत्तीला निरोप द्यायला गेल्यानंतर इतक्या लवकर त्यांना शेवटचा निरोप द्यायची वेळ येईल असे कधीच वाटले नव्हते...
राजाभाऊ म्हणजे चैतन्याचा झरा. महाबळेश्‍वरला एका संस्थेने पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन केले होते. ‘चपराक’च्या ज्येष्ठ उपसंपादिका सौ. चंद्रलेखा बेलसरे यांच्याकडे पुरस्कारासाठी नावे सुचवण्याची आणि निवडण्याची जबाबदारी होती. आम्ही बहुआयामी असलेल्या राजाभाऊंचे नाव या पुरस्कारासाठी सुचवले. सर्वजण कार्यक्रमासाठी गेलो. आमचे सहसंपादक माधव गिर, सुभाष कुदळे, मोहन ननावरे, तुषार उथळे-पाटील, संजय ऐलवाड आणि राजाभाऊ अशी आमची मैफिल रंगली. वाईला उमेश सणस यांच्याकडे पाहुणचार घेतला. राजाभाऊंनी तिथे ‘मानसीचा चित्रकार तो...’ हे गीत ठेक्यात म्हणून दाखवले. आम्हा सगळ्यांना कविता म्हणण्याचा आग्रह केला. ज्येष्ठ समीक्षक प्राचार्य डॉ. श्रीपाल सबनीस यांनी त्यांच्या गोड आवाजाचे कौतुक केले तर त्यांना इतका आनंद झाला... त्यानंतर कितीतरीवेळा त्यांनी सबनीस सरांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. ‘‘या पुरस्कारामुळे माझी उमेद वाढलीय, आता पुरस्काराच्या ट्रॉफी ठेवण्यासाठी वेगळे कपाट करून घेतो,’’ असेही त्यांनी मिश्किलीने सांगितले.
आकाशवाणीच्या निवेदिका व सुप्रसिद्ध कवयित्री स्वाती महाळंक आणि त्यांच्या मातोश्री अरूणा महाळंक यांनी मध्यंतरी मराठी भाषा दिनानिमित्त एका कवी संमेलनाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी आम्ही अध्यक्ष म्हणून यावे अशी त्यांची इच्छा होती. त्यांनी राजाभाऊंना मधे घातले आणि आम्हाला उपस्थित राहण्यास भाग पाडले. त्या कार्यक्रमाला आमचे लेखक संदिपान पवार, विनोद श्रा. पंचभाई, सागर सुरवसे यांच्यासह आम्ही गेलो. राजाभाऊंनी सर्वांच्या कविता ऐकल्या. भरभरून दाद दिली आणि वडील या विषयावर त्यांना आवडलेली एका कवीची कविता सादर केली. हा कुटुंबवत्सल पिता होता. त्यांच्या दोन्ही मुलींचे, जावयाचे संदर्भ त्यांच्या बोलण्यात नेहमी यायचे.
राजाभाऊंनी इंटक या कामगारांच्या संस्थेतही भरीव योगदान दिले. कामगारांच्या न्याय हक्कासाठी ते कायम आग्रही असायचे. पीएमपीएमएल मधील कामगारांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी ते धडपडायचे. त्यांनी ‘सूर संगम निराली’ हा अंध कलाकारांचा एक ग्रुप केला होता. त्यामाध्यमातून ते विविध कार्यक्रमांचे आयोजन करायचे. त्यांच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा यासाठी धडपडायचे.
24 मार्चला नेहमीप्रमाणे आमच्या मनसोक्त गप्पा झाल्या. घुमानच्या साहित्य संमेलनाची तयारी सुरू असल्याने त्यांनी आम्हा सर्वांना शुभेच्छा दिल्या. ‘‘माझीही यायची इच्छा होती पण कौटुंबीक जबाबदारीमुळे ते शक्य नाही.’’असे सांगितले. ‘‘चपराकचा विस्तार नक्की आहे. आपल्याला आता कोणीही थोपवू शकणार नाही. नवीन वाचक जोडण्यासाठी आणखी व्यापक प्रयत्न व्हायला हवेत. समाजाने, वाचकांनीही अशी मासिके वाढावित यासाठी प्रयत्न केले पाहिजेत’’ असे ते अंतःकरणापासून सांगत होते.
आज, म्हणजे, गुरूवार, दि. 26 मार्चला सकाळी त्यांनी ‘चपराक’च्या व्हाटस् अप ग्रुपला आजच्या क्रिकेट मॅचच्या निमित्ताने ‘आजचा दिवस विजयाचा’ अशी प्रतिक्रिया दिली. दुपारी ते ‘चपराक’च्या कार्यालयात आले. सुभाष कुदळे आणि राजाभाऊंची जोडगोळी असल्याने त्यांचे एकट्याने येणे आम्हाला विशेष वाटले. त्यांनी सांगितले, ‘‘सुभाषअण्णाची तब्येत बरी नसल्याने त्यांना त्रास दिला नाही. त्यांचे पुस्तकाचे स्क्रिप्ट द्या, तुम्ही घुमानवरून येईपर्यंत व्याकरण तपासून घेतो.’’
आज प्रथमच ते ‘चपराक’च्या कार्यालयातून चहा न घेता गेले. ‘’नातेवाईकाकडे जेवायला जायचे आहे’’ असे म्हणत ते लगबगीने पळाले. ‘‘येतो घनश्यामजी’’ हा त्यांचा निरोपाचा स्वर आमच्या कानात स्पष्टपणे घुमतोय. दुपारी ‘चपराक’मधून गेल्यानंतर ते सुभाष कुदळे यांच्या घरी गेले. त्यांना स्क्रिप्ट दिले. थोडावेळ मॅच पाहिली आणि ‘‘जरा जाऊन येतो’’ म्हणत गेले. नातेवाईकाकडे ते जेवायला जाणार होते. तिथेच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. रूग्णालयात नेईपर्यंत तर सगळा खेळ संपला होता. आमचे एक घनिष्ठ स्नेही, जॉॅली, रूबाबदार, सुहृदयी व्यक्तिमत्त्व काळाने हिरावून नेले. दुपारी एक वाजता भेटून गेलेला हट्टाकट्टा, हसतमुख माणूस चार वाजता गेला हा धक्का कसा पचवणार?
सुभाष कुदळे यांचा दूरध्वनी आला आणि अक्षरशः हबकून गेलो. काळजाचे पाणी पाणी झाले. ‘जो आवडे सर्वांना, तोचि आवडे देवाला’ असे म्हणतात ते उगीच नाही. त्यांच्याशी संबंधित कितीतरी घटना लख्खपणे डोळ्यासमोर दिसत आहेत. ‘निवृत्ती ही वृत्तीवर अवलंबून असते, तुम्ही निवृत्त झालात तरी चांगल्या कामापासून कधीही परावृत्त होणार नाही याची आम्हाला खात्री आहे’ असे मी त्यांच्या निवृत्ती समारंभातून अध्यक्षीय भाषणात बोललो होतो. त्यानंतर त्यांनी ‘चपराक’मधून सातत्याने लिहिण्याची अपेक्षा व्यक्त केली होती आणि आज अचानक ते कायमचे निवृत्त झाले. त्यांच्या दोन्ही मुली, जावई, पत्नी, त्यांचे गुरू कम मित्र सुभाष कुदळे, राजाभाऊंचे अन्य कुटुंबीय, मित्रमंडळी, पीएमपीएममधील सर्व चाहते यांना या धक्क्यातून सावरण्याची ताकत परमेश्‍वराने द्यावी.
अंध कलाकारांसाठी हाडाची काडे करणार्‍या राजाभाऊंनी जातानाही नेत्रदान केले. स्वतःजवळ जे आहे ते समाजाला देण्याचे व्रत त्यांनी शेवटपर्यंत जोपासले. राजाभाऊ, तुम्हाला विसरणे कदापि शक्य नाही. तुमच्या स्मृती आमच्या हृदयात जिवंत आहेत.
‘पराधीन आहे जगती, पूत्र मानवाचा’ हेच खरे! राजाभाऊ परदेशी यांना साप्ताहिक ‘चपराक’ परिवाराकडून भावपूर्ण आदरांजली!!

Monday, March 23, 2015

'मसाप’चा अव्यापारेशु व्यापार!


राज्यस्तरीय युवा नाट्य-साहित्य संमेलनाच्या नावाखाली माकडचाळे; लाखोंचा चुराडा


 महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या बारामती शाखेच्या वतीने तिसरे राज्यस्तरीय युवा नाट्य-साहित्य संंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या संमेलनात एक-दोन स्थानिक कलाकारांच्या एकांकिका वगळता दुसरे काहीच झाले नाही. पाहुण्यांना यायला उशीर झाला म्हणून वेळ मारून नेण्यासाठी एका कलाकाराने मिमिक्रीच्या नावाखाली नुसतेच माकडचाळे केल्याचे पहायला मिळाले.
नाट्य क्षेत्रातील अभिराम भडकमकर हे त्या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात ते नाट्य-साहित्यावर कमी आणि व्यवसाय प्रशिक्षणावरच जास्त बोलले. व्यवसाय निष्ठेने करावा, नैतिकतेने करावा, कल्पकतेने करावा या विषयी भडकमकर भरभरून बोलले. मात्र नाट्यसाहित्य कसे लिहावे, त्याचे नियम काय, संवाद लेखन कसे असावे, नेपथ्य कसे असावे यावर मात्र त्यांनी चकार शब्दही काढला नाही.
या राज्यस्तरीय युवा नाट्य-साहित्य संमेलनाला रंगभूमीवरील एकही कलाकार उपस्थित नव्हता, हे दुर्दैवच. येथील काही तुरळक युवकांशी संवाद साधण्यास एकाही नाट्यलेखकाची उपस्थिती नव्हती. कार्यकारिणी सदस्यांची व्याख्याने आयोजित करून 'मसाप’ने या युवा नाट्यसाहित्य संमेलनाची बोळवण केली.
चित्रपट आणि साहित्य या विषयावर बोलताना राज काझी यांनी तर साहित्यातील गुणवत्तेचा मुद्दा बाजूला ठेऊन मार्केटींगलाच महत्त्व असल्याचे ठासून सांगितले. त्यामुळे युवा नाट्य-साहित्य संमेलन भरकटल्याचे पहायला मिळाले.
समारोपाचे प्रमुख पाहुणे असलेल्या ज्येष्ठ नाट्यकर्मी मोहन जोशी यांनीही कार्यक्रमाला दांडी मारली. संमेलनाचे सभामंडप तीनही बाजूंनी पडद्यांनी बंदिस्त असल्यामुळे जे काही जेमतेम श्रोते होते. मात्र उकाड्याने ते हैैराण झाले. कसलेही पूर्वनियोजन नसलेले हे युवा नाट्य-साहित्य संमेलन घाईघाईने उरकण्याचा अट्टहास 'मसाप’ने का केला असाही प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित होत आहे.     
(साप्ताहिक चपराक २३ मार्च २०१५)

Sunday, March 22, 2015

‘मराठवाड्यातून मिळवले आणि पुण्यात टिकवले’






सुप्रसिद्ध कथाकार प्रा. भास्कर बडे यांच्याकडून स्वागत

कवी रामदास केदार आणि सुधाकर वायचळकर

मराठवाडा आणि कविता हे दोन विषय माझे आत्यंतिक जिव्हाळ्याचे आहेत. अनेक वर्षानंतर केवळ दोन दिवसासाठी मराठवाड्यात गेलो आणि मायभूमिच्या दर्शनाने आत्मिक सामर्थ्याची ऊर्जा कैक पट वाढल्यासारखे वाटले. माझ्या मराठवाड्यातील लोकाचे उदंड प्रेम आणि त्यांच्याकडून मिळणारी जिव्हाळ्याची वागणूक याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही.
मी आणि सागर सुरवसे! आम्ही दोघांनी परवा लातूर शहर गाठले. तिथे भल्या सकाळी माझे स्नेही, सुप्रसिद्ध कथाकार डॉ. भास्कर बडे  यांचे घर गाठले. बडे सर आणि त्यांच्या सौभाग्यवती नभाताई यांनी जोरदार स्वागत केले. त्याठिकाणी कवयित्री अस्मिता फड याही आल्या होत्या. विविध विषयांवर आमच्या दिलखुलास गप्पा झाल्या. बडे सरांनी पत्रकारिता, राजकारण आणि साहित्य क्षेत्रातील अनेक रंजक व तितक्याच सुरस कथा सांगितल्या. त्याचवेळी तिथे एबीपी माझा या वृत्तवाहिनीचे युवा पत्रकार निशांत भद्रेश्‍वर, लातूर पत्रकार संघाचे सचिव विजयकुमार स्वामी हे भेटण्यासाठी आले. विजयकुमार स्वामी म्हणजे शून्यातून वेगळे विश्‍व निर्माण करणारा संघर्षशील माणूस!

मराठवाडयातील पत्रकार आणि लेखकांसह!
मराठवाड्यातील ‘पुण्य नगरी’च्या यशात त्यांचा मोठा वाटा आहे.
बडे संराचे ‘वावर’ हे निवासस्थान म्हणजे मराठवाड्यातील एक महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्रच झाले आहे. त्याठिकाणी सौ. नभाताई नृत्याचे प्रशिक्षण वर्गही चालवतात. या दाम्पत्याने आमचे जोरदार स्वागत केले. साप्ताहिक आणि मासिकाच्या अंकाची त्यांनी स्वतःची व बीड जिल्ह्यातील काही ग्रंथालयांची वर्गणी भरली. अस्मिताताई फड याही सभासद झाल्या. मराठवाड्यात ‘चपराक’चा विस्तार व्हावा यासाठी लातूरकरांनी सदैव पुढाकार घेतला आहे. थोडावेळ गप्पा झाल्यानंतर डॉ. बडे, भद्रेश्‍वर, स्वामी, सागर आणि मी असे सर्वजण गांधी चौकात पोहोचलो. तिथे माझे जुने स्नेही, ज्येष्ठ पत्रकार प्रदीपजी नणंदकर आले. पुन्हा सगळ्यांच्या गप्पा झाल्या आणि आम्ही उदगीरकडे निघालो.
उदगीर हे माझे आजोळ! मात्र मामा कंपनी आता पुण्यातच स्थायिक झाल्याने फारसा संपर्क राहिला नाही. उदगीरला सांस्कृतिक, ऐतिहासिक मोठी परंपरा आहे. या परंपरेचे खंदे पाईक आणि प्रचंड सद्गुणी असलेल्या सुधाकरराव वायचळकर यांनी आमचे जोरदार स्वागत केले. उदगीरमध्ये ‘चपराक’च्या विस्तारात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या आतिथ्याने भारावून गेलो. अनेक साहित्यविषयक गप्पा, जेवण यात तीन-चार तास गेले. मराठवाड्याची ओळख ठरण्याची क्षमता असलेले ताकतीचे युवा कवी प्रा. रामदास केदार आणि ज्येष्ठ कवयित्री सुनंदा सरदार यांनी वायचळकर सरांच्या घरी भेट घेऊन चर्चा केली.
तिथून आम्ही देगलूरला पोहोचलो. या सर्व व्यापात देगलूरला जायला उशीर झाला. तब्बल सात वर्षाने देगलूरला गेल्याने तिथे माझ्या ताईकडे कल्ला केला. भाचे कंपनीत रमताना मिळणारे सुख अवर्णनीय असते. सर्व थकवा धूम पळून गेला आणि पुन्हा ताजातवाना झालो.

सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. शेषराव मोरे सरांसोबत
काल सकाळी (शनिवार. दि. 21) देगलूरहून नांदेडला गेलो. जाताना चालकाशी गप्पा सुरू होत्या. मराठवाड्यातील दुष्काळ, विकासयोजना, भ्रष्टाचार अशा विषयांवर गप्पा सुरू होत्या. गाडीचे चालकही त्या परिसरातील बातमीदार असल्याने नवनवीन माहिती मिळत होती. ‘अशोक चव्हाणांचे कॉंग्रेसने पुनर्वसन केल्याने नांदेडकर खुश असतील ना?’ असे विचारल्यावर त्याने ‘मुडद्याला सफारी घालून काही उपयोग आहे का साहेब?’ असा प्रतिप्रश्‍न करून आमची बोलती बंद केली.
मराठवाड्याचेच नव्हे तर साहित्य क्षेत्राचे वैभव असलेल्या ज्ञानयोगी तत्त्वचिंतक प्रा. शेषराव मोरे सरांच्या घरी झालेल्या गप्पा अविस्मरणीय आहेत. त्याविषयी लवकरच एक वेगळा लेख लिहितो. सावरकर, आंबेडकर, टिळक, आगरकर, गांधी, जिना अशा असंख्य विषयांवर सरांनी इतकी तर्कसुसंगत मांडणी केली की अवाकच झालो. त्यांचा पाहुणचार घेऊन आम्ही कळमनुरीला नरेंद्र नाईक यांच्या निवासस्थानी पोहोचलो.
त्याठिकाणी कळमनुरी, हिंगोली परिसरातील साहित्यिक, कवी आमची वाटच पाहत बसले होते. त्यांच्याकडे प्रथम ग्रंथपूजन केले. साहित्यविषयक चर्चा केली. मराठवाडा मुक्ती दिनाविषयी जास्तीत जास्त लिहिण्याचे आवाहन केले. या लढ्याचे अभ्यासक असलेल्या विजय वाकडे काकांनी लगेच आम्हाला या विषयावरील एक दुर्मिळ ग्रंथ दिला. नरेंद्र नाईक, कवी शफी बोल्डेकर, कवी राजाराम बनसोडे, डॉ. रमेश पाईकराव, गजानन थळपते, धनंजय मुुळे, कलानंद जाधव, शीलवंत वाढवे आदींनी भेट घेतली, अंकाची वर्गणी भरली. नरेंद्र नाईक यांच्या आग्रहाने पुन्हा त्यांच्या घरी ‘सक्ती’ने जेवावे लागले. गुडीपाडव्याच्या दिवशी मराठवाड्यातील या माझ्या बांधवांकडून मिळणार्‍या प्रतिसादाने, त्यांच्या निर्व्याज प्रेमाने शब्दशः भाराऊन गेलो. नरेंद्र नाईक हे चिकित्सक वृत्तीचे कवी, लेखक, कादंबरीकार आहेत. ‘चपराक’च्या विस्तारासाठी त्यांनी स्वतःहून घेतलेला पुढाकार हे आमचे मोठे यश आहे.नरेंद्र नाईक यांनी केलेला सत्कार
तिथून आम्ही हिंगोली मार्गे परभणीला पोहोचलो. तिथे संतोष धारासुरकर आणि विजयराव जोशी यांनी दैनिक ‘दिलासा’चे पुनर्प्रकाशन सुरू केले आहे. त्यांच्या प्रथमांक सोहळ्यास हजेरी लावली. तिथे ज्येष्ठ पत्रकार यमाजी मालकर यांच्यासह अनेकांशी गप्पा झाल्या. ‘दिलासा’च्या प्रथमांक सोहळ्याची मुख्य बातमी त्यांच्याकडे बसून लावून घेतली. शीर्षक दिले आणि बाहेर पडलो.
मराठवाड्याच्या या आठवणी माझी श्रीमंती वृद्धिंगत करणार्‍या आहेत. जीवनात आनंद निर्माण करणार्‍या आहेत. ‘आपण कुठे आहोत, यापेक्षा कुठून आलोय याला जास्त महत्त्व असते’ असे म्हणतात. मराठवाड्याच्या मातीशी जोडलेली नाळ हे माझे खरे वैभव आहे. या मातीनेच माझ्या आयुष्याचे सोने केले आहे आणि त्यामुळेच मी स्वतःला धन्य समजतो. पुण्यासारख्या सांस्कृतिक नगरीत चांगल्याला चांगले म्हणणारे आहेत, त्यामुळे उत्साह द्विगुणीत होतो. ‘मराठवाड्यातून मिळवले आणि पुण्यात टिकवले’ अशी काहीसी माझी गत आहे.
आठवणींचा हा मृद्गंध असाच दरवळत रहावा आणि ‘चपराक’च्या व्यासपीठावर सामान्य माणसाचा आवाज आणखी बुलंद व्हावा, यासाठी माझे आणि माझ्या सर्व सहकारी मित्रांचे प्रामाणिक प्रयत्न असतील!
नरेंद्र नाईक यांच्याकडून सत्कार स्वीकारताना


- घनश्याम पाटील 
संपादक, प्रकाशक 'चपराक', पुणे 
७०५७२९२०९२




Monday, March 16, 2015

चकटफूंना चपराक!


 घुमान येथे होणार्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे प्रसारण दूरदर्शन आणि आकाशवाणीने मोफत करावे, अशी मागणी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी केली होती. त्याचा खरपूस समाचार घेताना राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी ‘साहित्य संमेलनाची फुकटेगिरी बंद करा’ असा योग्य सल्ला दिला आहे. यावरून साहित्य क्षेत्रात उलटसुलट प्रतिक्रिया येत असतानाच सांस्कृतिक मंत्र्यांनी घुमजाव करत ‘घुमानजाव’चा नारा दिला आहे आणि दूरदर्शनच्या अधिकार्‍यांशी यासंदर्भात बोलणे सुरू असल्याचे सांगितले आहे. असे जरी असले तरी तावडेंच्या तावडीतून ही फुकटेगिरी सुटली नाही, याबद्दल त्यांचे अभिनंदन करायला हवे. ही फुकटेगिरी केवळ मोफत प्रसारणापुरती नाही तर यांच्या कामकाजात आणि वृत्तीत अनेक ठिकाणी ठळकपणे अधोरेखित होते. 
संत नामदेवांची कर्मभूमी असल्याने घुमानला साहित्य संमेलन झाल्यास त्याला आमचा पाठिंबा असेल, अशी भूमिका ‘चपराक’ने सुरूवातीपासून घेतली आहे. मात्र या संमेलनाच्या निमित्ताने केवळ ‘पिकनिक टूर’ करता येईल, इतक्या संकोचित भूमिकेतून अनेकजण या संमेलनाकडे पाहत आहेत. राज्य सरकारकडून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी दरवर्षी पंचवीस लाख रूपये देण्यात येतात. शिवाय आयोजक संस्था त्यांच्या कुवतीप्रमाणे मोठा निधी उभा करते. केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी यापूर्वीच प्रवास भाड्यात पन्नास टक्के सवलत जाहीर केली आहे. पंजाब सरकारनेही पुढाकार घेऊन या संमेलनासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे धोरण अवलंबिले आहे. असे असताना महामंडळाच्या पदाधिकार्‍यांचा प्रसिद्धीचा सोस काही सुटत नाही. सरकारकडून सर्वकाही फुकटात मिळावे ही वृत्ती अत्यंत घातक आहे.
य. दि. फडके हे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असताना बेळगावला एस. टी. बसने, स्वतःच्या खर्चाने गेले होते. हा इतिहास दुर्लक्षून साहित्य परिषद, साहित्य महामंडळाचे पदाधिकारी सर्वकाही फुकटात कसे मिळेल यासाठी धडपडताना दिसतात. विमान प्रवासाचा हट्ट असेल किंवा मोफत प्रसारणाची मागणी असेल. प्रत्येक वेळी या लोकाच्या मनाचे भिकारपण दिसून येते.
आज महाराष्ट्र प्रचंड आर्थिक अडचणीतून चाललाय. अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेतकरी राजा हवालदिल झालाय. रोज विविध भागातून शेतकर्‍यांच्या आत्महत्येच्या बातम्या येत आहेत. असे सारे असताना आपण सरकारी तिजोरीवर डोळा ठेऊन स्वतःची हौसमौज पुरी करून घेणे म्हणजे मेलेल्याच्या टाळूवरील लोणी खाण्यासारखेच आहे. खरेतर यावेळी साहित्य परिषद आणि साहित्य महामंडळाच्या पदाधिकार्‍यांनी स्वतःच्या खिशातील पैसे टाकून संमेलनाला जाणे अपेक्षित होते. मात्र हे कर्मदरिद्री लोक केवळ तीन हजार रूपये प्रतिनिधी शूल्क असूनही हे रेल्वेने येणार नाहीत. त्यांना सरकारच्या, आयोजकांच्या खर्चातून विमानसेवा हवी. स्वयंसेवक आणि इतर अनेक निमित्तानेही रेल्वेत फुकट्यांचा सुळसुळाट असणार आहे. संत नामदेवांच्या नावावर सहानुभूती मिळवत कोणी सरकारला गाळात घालण्याचे धंदे करीत असेल, तर ते हाणून पाडायला हवेत.
दुष्काळ, गारपीट आणि नापिकी यामुळे बळीराजा उद्ध्वस्त झालाय. सरकारकडून त्यांना यथायोग्य मदत मिळतेय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काका श्रीकृष्ण फडणवीस यांची चंद्रपूर जिल्ह्यात मूल आणि कोसंबी येथे शेती आहे. यंदाच्या नापिकीचा फटका मुख्यमंत्री देवेंद्र यांचे ज्येष्ठ बंधू आशिष आणि काका बाळासाहेब तथा श्रीकृष्ण यांनाही बसलाय. गारपिटीने त्यांच्या शेतातील गहू, हरभरा व भाजीपाल्याच्या पिकाची नासाडी झाली. शेतकर्‍यांना मिळणारी शासकीय मदत मुख्यमंत्र्यांचे ज्येष्ठ बंधू आणि काका यांच्याही बँक खात्यात जमा झाली. मात्र ‘आपण सधन शेतकरी असून ही मदत अन्य गरीब शेतकर्‍यांना देण्यात यावी’ असे म्हणत त्यांनी मूलच्या तहसीलदाराकडे हे पैसे धनादेशाद्वारे परत केले. याला म्हणतात नैतिकता! साहित्य आणि संस्कृतीच्या गप्पा मारणार्‍यांनी हा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा. केवळ तीन पाच हजार रूपयांसाठी आयोजकांवर आणि सरकारवर अवलंबून राहणार्‍या या टीनपाटांनी आपल्या मनाचा कोतेपणा सोडावा आणि पदरच्या पैशाने या साहित्योत्सवात सहभागी व्हावे.
साहित्य संमेलनाच्या नावावर ही ‘नाटक कंपनी’ वाटेल ते उद्योग करत आहे. श्री. पु. भागवतासारखा प्रकाशक साहित्य महामंडळाचा अध्यक्ष झाला होता, हा इतिहास विसरून प्रकाशक परिषदेने सुरूवातीला घुमान येथील 88 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर बहिष्कार टाकला. ‘चपराक’सारख्या काही संस्थांनी आणि अस्सल साहित्य रसिकांनी हा बहिष्कार फेटाळून लावला. ज्या अरूण जाखडे यांनी प्रकाशक परिषदेच्या वतीने आवेशात भाषणबाजी केली आणि प्रकाशक परिषदेच्या वतीने बहिष्काराची आवई दिली तेच आज घुमानमधील साहित्य संमेलनात एका कार्यक्रमात सहभागी होत आहेत. त्यामुळे प्रकाशक परिषद आणि साहित्य महामंडळाची ही ‘नाटक कंपनी’ तर नाही ना? अशी शंका येण्यासही वाव आहे.
आजवरचा इतिहास पाहता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पवार कुटुंबीयांचे योगदान मोठे राहिले आहे. दरवेळी पवारांचेच कोणीतरी बगलबच्चे या संमेलनाच्या आयोजनात पुढाकार घ्यायचे. मात्र यावेळी सत्तेचे फासे उलटे पडले आणि उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची वृत्ती दाखवून देत माधवी वैद्य आणि त्यांच्या सहकार्‍यांनी ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संमेलनाच्या बोधचिन्हाचे (लोगो)े अनावरण केले. उद्धव ठाकरे आणि शिवसेना हे मराठी माणसाचा पुळका येणारे घटक आहेत. त्यांना विनंती केली असती तर ते पुण्यात साहित्य महामंडळाच्या कार्यालयात नक्की आले असते. मात्र कायम लाचारीचे दर्शन घडवणार्‍यांनी ‘मातोश्री’चे उंबरठे झिजवले. त्यानंतर नितीन गडकरींनी स्वागताध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली आणि यांच्या जीवात जीव आला.
सुरूवातीला शे-पाचशे लोक तरी या संमेलनाला येतील की नाही, अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र ‘चपराक’ सारख्या संस्थांचा कृतीशील पाठिंबा बघून आठ ते दहा हजार साहित्य रसिक संमेलनाला येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. असे सारे पोषक वातावरण असताना सांस्कृतिक कार्यमंत्र्यांना तुम्हाला ‘फुकटेगिरी बंद करा’ असे सांगण्याची वेळ येत असेल तर तुम्ही मराठी माणसाचे नाक कापले आहे. तुमच्या करणीमुळे पदरचे पैसे टाकून येणारे साहित्य रसिक बदनाम होत आहेत.
‘चपराक’ परिवाराचे बारा सदस्य स्वतःचे पैसे टाकून या संमेलनास उपस्थित राहत आहेत. ते कुणापुढेही मिंधे नाहीत. पत्रकार म्हणून किंवा स्वयंसेवक म्हणून चार टाळकी घुसडण्याचा उद्योग आम्ही केला नाही. नेमके याच ठिकाणी चकटफू वृत्ती दाखवून देत महामंडळाच्या पदाधिकार्‍यांनी या साहित्योत्सवाला गालबोट लावले आहे. अशा करंट्या आणि कंजुष, चकटफू वृत्तीला चपराक देण्याचे दखलपात्र कार्य सांस्कृतिक मंत्र्यांनी केले आहे. त्यातून काहीतरी बोध घेऊन या बेशरमांनी आपली उरली सुरली लाज राखावी, एवढेच यानिमित्ताने सांगावेसे वाटते.

- घनश्याम पाटील 
संपादक, प्रकाशक "चपराक' पुणे 
७०५७२९२०९२

Monday, March 9, 2015

स्त्री-पुरुष भेद अमंगळ!


कालच जागतिक महिला दिन झाला. प्रत्येक दिवसाप्रमाणे हा दिवसही ‘साजरा’ करण्याची पद्धत रूढ होऊ पाहत आहे. महिलांच्या आरोग्य शिबिरापासून ते चर्चासत्र, व्याख्याने, पुरस्कार सोहळे असे कार्यक्रम या निमित्ताने पार पडतात. आज बर्‍याच ठिकाणी स्त्री सन्मानाचे चित्र रंगवले जात असले तरी महिला या ‘दीन’च असल्याचे चित्र दुर्दैवाने पहायला मिळते. एकीकडे ग्रामपंचायतीच्या सदस्यापासून ते  देशाच्या पंतप्रधान पदापर्यंत, राष्ट्रपती पदापर्यंत महिला गेल्याचे वास्तव असताना दुसरीकडे मात्र गावागावात, वस्त्यांवस्त्यांवर महिला अत्याचाराचे प्रमाण वाढतच आहे.
यंदाच्या महिला दिनाच्या पार्श्‍वभूमिवर दोन घटना प्रामुख्याने चर्चेत आल्या. पहिली म्हणजे, दिल्लीतील निर्भयाच्या बलात्कार प्रकरणात जो आरोपी आहे त्याची बीबीसीने तिहार तुरूंगात जाऊन मुलाखत घेतली. त्याबदल्यात त्याला चाळीस हजार रूपयेही दिले. स्त्रियांनी कसे कपडे घालावेत, येथपासूनची मुक्ताफळे त्याने उधळली आणि आपण किती ‘दिव्य ज्ञान’ लोकापर्यंत पोहोचवतोय या आविर्भावात बीबीसीने ते प्रेक्षकापर्यंत आणले. ‘चेहराच खराब असेल तर आरशाला दोष देण्यात अर्थ नाही’ असा युक्तीवादही त्यावर काहींनी केला; मात्र कवडीचीही नैतिकता शिल्लक नसलेल्या प्रसारमाध्यमांचे हे हिडीस आणि ओंगळवाणे रूप आहे. आसारामसारख्या भोंदूने किंवा तरूण तेजपालसारख्या लिंगपिसाटाने चारित्र्यावर प्रवचने झोडणे जितके हास्यास्पद आहे तितकेच प्रसारमाध्यमांनी ‘आपण फक्त सत्य समोर आणतोय’ असे म्हणणे हास्यास्पद आहे. समाजाला ज्ञान देणे, मार्गदर्शन करणे, त्यांचे रंजन करणे ही वृत्तपत्रांची उद्दिष्टे केव्हाच मागे पडलीत आणि त्यांना ‘धंदेवाईक’ रूप आलेय. त्यामुळे अशा माध्यमांनी आपण समाजमन कसे घडवतोय, याचा डांगोरा पिटणे म्हणजे ‘मी नाही त्यातली, कडी लावा आतली’ असा प्रकार आहे.
दुसरी घटना नागालँडमधील दिमापूर शहरातील आहे. येथील सईद फरिद खान या 35 वर्षाच्या नराधमाने एका महाविद्यालयीन युवतीवर धमकावून सातत्याने अत्याचार केले. तो दिमापूर जिल्हा तुरूंगात होता. तेथील जमावाने एकत्र येऊन सईदला आपल्या ताब्यात देण्याची मागणी तुरूंग प्रशासनाकडे केली. त्याला नकार मिळाल्याने जमावाने तुरूंगावर हल्लाबोल केला. पोलिसांनी त्यांना आवरण्यासाठी हवेत गोळीबार केला पण त्यांचे काही चालले नाही. तेथून चार किलोमिटर अंतरावर असलेल्या चौकापर्यंत सईदला फरफटत नेऊन जाहीर फाशी द्यायची असा जमावाचा बेत होता. त्यांनी त्याला नग्न करून गाडीला अडकवले आणि फटकारत चौकापर्यंत नेले. मात्र त्याआधीच या माराने त्याचा मृत्यू झाला. जनक्षोभ उसळल्यानंतर काय होते याचे हे उदाहरण आहे.
गुन्हेगाराला ठेचून मारण्याच्या घटना यापुर्वीही आपल्याकडे घडल्या आहेत. 13 ऑगस्ट 2004 ला नागपूर जिल्हा न्यायालयात बलात्कार प्रकरणातीलच अक्कू यादव नावाच्या गुन्हेगारास संतप्त झालेल्या दोनशे महिलांनी एकत्र येऊन न्यायालयाच्या आवारातच मारले होते. त्याच्यावर लाल तिखट टाकून आणि दगडांचा मारा करून या रणरागिणींनी त्याला ठेचून काढले. बलात्काराचा आरोप सिद्ध होऊनही त्याला वेळेत शिक्षा होत नसल्याने या महिलांनी कायदा हातात घेतला. आपली न्यायप्रक्रिया संथ गतीने चालते आणि बर्‍याच प्रकरणात सत्य प्रभावीपणे मांडूनही न्याय मिळेलच याची खात्री नसल्याने महिला असे करायला धजावतात. ही टोकाची प्रतिक्रिया असली तरी हा उद्रेक आपण समजून घेतला पाहिजे. एखादी गोष्ट आपण जितकी दाबून ठेऊ तितकी ती उफाळून येणार, हे सर्वमान्य सत्य आहे. त्यामुळे महिला अत्याचारांचा अतिरेक झाल्याने भविष्यात अशा घटना वाढल्या तर आश्‍चर्य वाटायला नको!
पुरूषांची वाढत चाललेली विकृती आणि आधुनिकतेच्या, स्वातंत्र्याच्या नावावर स्त्रियांचा वाढलेला स्वैराचार या दोन्ही चिंतेच्या बाबी आहेत. जिथे पाच वर्षाच्या निरागस मुलीवर बलात्कार होतो तिथे काय बोलावे? मोकाट जनावरातही अशी विकृत वासना नसते. आज भारतातील एकही शहर स्त्रियांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिने योग्य नसेल तर हे आपले सर्वांचेच मोठे अपयश आहे. जिथे तिथे वखवखलेल्या नजरा! एखादे भुकेजलेले हिंस्त्र श्‍वापद शिकारीवर तुटून पडते तसे स्त्रियांना ओरबाडण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो. स्वतःला सुशिक्षित म्हणवून घेणारेही यात मागे नाहीत. बायकोवरच्या ‘बलात्कारातून’च जन्माला येणारी ‘हायब्रिड’ पिढी पुढे स्त्रीकडे फक्त ‘मादी’म्हणूनच पाहते.
दुसरीकडे काही स्त्रियांही या प्रवृत्तीला खतपाणी घालताना दिसतात. फुटकळ आमिषाला, वैयक्तिक लाभाला बळी पडलेल्या स्त्रिया अशा घटनांच्या मोठ्या प्रमाणात शिकार होतात. ‘शरीर’ आणि ‘सौंदर्य’ या अनेकींच्या दृष्टिने त्यांच्या प्रगतीच्या पायर्‍या आहेत. ‘एकाच पुरूषासोबत अनेकवेळा झोपणे किंवा काही पुरूषांसोबत काहीवेळा झोपणे यात फरक तो काय? शेवटी आपली प्रगती महत्त्वाची नाही का?’ असा निर्लज्ज सवाल करणार्‍या काही करंट्या बायकाही आम्हाला भेटल्यात. त्यामुळे समाजात आज जे काही चालले आहे ते भविष्यात कोणत्या दिशेने जाणार याचा अंदाज बांधणेही अवघड आहे.
एकीकडे स्त्रियांना स्वातंत्र्य मिळत नाही, त्यांच्यावर कायम अन्याय होतो, त्यांना नागवले-पिचवले जाते असे गळे काढायचे आणि दुसरीकडे स्त्रियांनी असे उद्योग करून समाजमन कलुषित करायचे याला काही अर्थ नाही. शेवटी टाळी एका हाताने वाजत नाही. स्त्री सक्षमीकरणाच्या गप्पा करताना ज्या दुर्बल आहेत त्यांच्या पाठिशी आपण उभे रहायला हवे. त्या स्वावलंबी होतील, कुटुंब आणि समाजात मानाने राहू शकतील, इतरांना दिशा देऊ शकतील, संस्काराची शिदोरी नव्या पिढीकढे हस्तांतरीत करू शकतील, असे पोषक वातावरण निर्माण व्हायला हवे. स्त्रियांकडे केवळ ‘भोगवस्तू’ म्हणून पाहणार्‍या, त्यांच्यावर अन्याय, अत्याचार करणार्‍या पुरूषांना कठोर शासन व्हायला हवे. समाजमनावर वचक बसेल अशा जबर शिक्षा त्यांना न्यायव्यवस्थेने द्यायला हव्यात.
स्त्रीमुक्ती असेल किंवा पुरूषमुक्ती असेल! हे केवळ हवेचे बुडबुडे आहेत. आपण सध्या तंत्रज्ञानाच्या युगात आहोत. ज्ञानाची, माहितीची कवाडे सर्वांसाठी खुली झालीत. प्रत्येकाला त्याच्या क्षमतेनुसार संधी उपलब्ध झाल्यात. ग्रामीण भागातील ‘संधी’अभावी वंचित असलेले स्त्री-पुरूष आणि शहरी भागातील ‘अतिरेक’ करणारे स्त्री-पुरूष यांच्याकडे  आता लक्ष दिले पाहिजे. सर्व असूनही त्यांच्यापर्यंत काहीच पोहोचले नाही असा वर्ग आणि सर्व असूनही त्याचा गैरवापरच करणारा वर्ग यातील फरक आपल्या ध्यानात आला तर बर्‍याचशा समस्या सुटतील. देशासमोर अनेक आव्हाने असताना किमान स्त्री-पुरूष असा भेद आता रोडावत जायला हवा. सर्वजण एकमेकांचा सन्मान उंचावत, निर्भयपणे जगतील अशी अपेक्षा बाळगूयात आणि ती पूर्णत्वास येईल यासाठी खारीचा वाटा उचलूयात!


- घनश्याम पाटील 
संपादक, प्रकाशक 'चपराक' पुणे 
७०५७२९२०९२