Tuesday, September 24, 2013

शरद कारखानीस यांच्याशी गप्पा!

शरद कारखानीस यांच्याशी गप्पा!

 
काल आमचे अर्थमंत्री दादाराजे तथा श्रीपाद भिवराव आणि  'चपराक' चे लेखक संदिपान पवार यांच्यासह  ज्येष्ठ संपादक श्री. शरद कारखानीस यांची भेट घेतली. त्यांनी त्यांचे 'लोकसत्ता', 'गोमन्तक' आणि 'एकमत'चे अनेक रंजक अनुभव सांगितले.  ते म्हणाले, "महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री मा. ना. श्री. यशवंतराव चव्हाण यांच्या निधनानंतर प्रसिद्धी माध्यमांना द्यायला सरकारकडे त्यांचा एखादा चांगला फोटोच नव्हता; किंवा मोहमद रफ़ी साहेब गेले तेव्हा 'लोकसत्ता' कडे त्यांचा फोटो नसल्याने पहिल्या दिवशी बातमी फोटो न देताच द्यावी लागली."
त्यांचे हे अनुभव ऐकून वाटले, आज तंत्रज्ञान इतके पुढे गेले आहे की, सर्व काही एका क्लिकवर मिळते. तरीही आजचे माझे व्यवसाय बंधू पूर्वीसारखी निर्भिड पत्रकारिता करू शकत नाहीत, हे वास्तव कोणीही नाकारण्याचे कारण नाही. 
"काही हजार करोडची संपत्ती बाळगुन असलेल्या नेत्यांना आणि पत्रकारांनाही गरीब कसे म्हणावे?" असा बिनतोड सवालही  त्यांनी केला. वृत्तपत्रे कशासाठी चालवली जातात? हे सांगताना त्यांनी अनेक किस्से सांगितले. "काही वृत्तपत्रे केवळ छोट्या जाहिराती आणि नोटीसा छापण्यासाठी काढली जातात. त्यांना अंकाचा खप वाढवायचाच  नसतो कारण या जाहिराती कमीत कमी लोकांपर्यंत जाण्यासाठीच दिल्या जातात. मुंबईत काही स्थानकावर रात्री १० नंतर मोठी वृत्तपत्रे मोठ्या प्रमाणात विकली जातात. कारण उशीराची गाडी गेल्याने रात्री मुक्काम स्थानकावर करावा लागतो. मग कमी पैशात जास्त पाने असलेली  वृत्तपत्रे  विकत घेवून ती  झोपण्यासाठी 'अंथरुण' म्हणून वापरली जातात…!"
"आधुनिक तंत्रज्ञानामुळे आजची मुले फारसे वाचत नाहीत. जे वाचायचे ते संगणक किंवा भ्रमणध्वनिवर! त्यावर हवी ती माहितीही त्यांना सहज मिळत असल्याने वृत्तपत्र विकत घेवून, त्यासाठी वेळ काढून वाचणा-यांची संख्या दिवसेंदिवस कमी  होत चालली आहे," असे निरिक्षणही त्यांनी नोंदवले. 'पर्यावरण' या विषयावर वृत्तपत्रांनी लिहिणे हा तर मोठा विनोद आहे कारण वृत्तपत्रांच्या कागदासाठीच सर्वाधिक वृक्षतोड होते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
एकंदर अडीच-तीन तासांत त्यांनी अनेक नवनवीन माहिती दिली. त्यातील बरीचशी माहिती ही गोपनीय असल्याने ती मित्रांसाठी देता येत नाही; मात्र या भेटीतून बरेच काही मिळाल्याचे समाधान मात्र नक्की आहे.

Monday, September 23, 2013

किल्लारी : बीस साल बाद!

  1. किल्लारी : बीस साल बाद!

गणेश उत्सव संपला …  आम्हा मराठवाड्यातील लोकांना हे दिवस विसरणे अजूनही खूप अवघड जाते.  ३० सप्टेम्बर १९९३ च्या काळरात्री मराठवाड्यात एकच हाहाकार उडाला. धरणी मातेचा कोप झाला आणि क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील ५२ गावांना भूकंपाचा तडाखा बसला. सर्वत्र अंधार! अनेक आप्त, मित्र या विनाशात दुरावले गेले.
माझे शिक्षण किल्लारीतील महाराष्ट्र महाविद्यालयात झाले. किल्लारी बस स्थानकाजवळ माझा वृत्तपत्र विक्रीचा गाळा होता. किल्लारी आणि परिसरात यानिमित्ताने फिरताना मी वाचकपत्र लिहू लागलो. काही कविता आणि लेख प्रकाशित झाले. पुढे पत्रकारितेची सुरवातही किल्लारीतून झाली आणि आज पुण्यासारख्या शहरात माझे स्वत:चे नियतकालिक आहे. लोकांची दुभंगलेली मने एक करताना जे अनुभव यायचे तेच माझ्या लेखणीतून कागदावर उतरायचे. त्यामुळे भूकंपाने माझ्यातील पत्रकार घडवला असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही.
भूकंपानंतर या ५२ गावांचे पुनर्वसन झाले. काही युवकांना सरकारी खात्यात नोक-या मिळाल्या. काहीजण अजूनही त्या प्रयत्नात आहेत. ज्याच्या कुटुंबातील सदस्यांचे निधन झाले त्यांना आर्थिक मदत मिळाली. लोकांनी दुःख विसरून त्या पैशाचा कसा विनियोग केला त्यावर लवकरच एक पुस्तक लिहितोय. ते जितके दुःखद आहे तितकेच रंजकही आहे. व्यसनाच्या, बायकांच्या आहारी गेलेल्या अनेकांची मात्र फारच वाताहात झाली.
मराठवाड्यातील लोकांत माणुसकी मात्र कायम जिवंत आहे. काही ठराविक अपवाद आहेत; मात्र सुखद अनुभव जास्त आढळतील. किल्लारीचे ग्रामदैवत असलेल्या निळकंठेश्वराच्या दर्शनाला जाताना आजही अंगावर काटा येतो. जुन्या आठवणी मनात येताच थरकाप होतो.
वृत्तपत्र विक्रेता ते संपादक असा माझा प्रवास किल्लारीच्या साक्षीने झाला आहे. लहानपणीच निसर्गाचे तांडव बघिल्याने कोणत्याही गोष्टीची भीती वाटत नाही. यापेक्षा मोठे संकट, दुःख, येवूच शकणार नाही याची खात्री आहे. निसर्ग एकदा परीक्षा बघतो मात्र त्यातून बरेच धडेही देतो. आज २० वर्षानंतर हा परिसर झपाट्याने बदलला आहे. परिवर्तन हा निसर्गाचा अटळ नियम असतो. त्याचे स्वागत करायला हवे. मात्र हे परिवर्तन कशा पद्धतीने होते हॆ पाहणेही औत्सुक्याचे असते. हा बदल कसा घडला, काय घडला, कोणी घडवला याविषयी लवकरच एक दीर्घ लेख 'चपराक' मध्ये लिहितोय. 

Wednesday, August 28, 2013

शरदमियाँ सुभानअल्ला !

शरदमियाँ सुभानअल्ला !





वय वाढले की भय वाढते. मात्र काही लोक जसजशी वयाने वाढतात तसतशी बिनधास्त होत जातात. त्यांना फ़क्त आपला स्वार्थ दिसत असतो. शरदमियाँनी आता ऐन नागपंचमीच्या मुहुर्तावर आपण किती भयमुक्त आहोत हे दाखवून दिले आहे. हिंजवडी येथे झालेल्या राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या  त्रैमासिक अधिवेशनात बोलताना ते म्हणाले की, " अन्याय झालेल्या मुस्लिम तरुणांनी बदला घेतला तर त्यांचा काय दोष?"
पवार ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे अजित पवारांचा 'प्रभाव' त्यांच्यावर पडलाय असे कोणी समजू नये.  त्यांच्या प्रत्येक कृतिमागे राजकारण असते. लोकसभा निवडणुकीच्या तयारीने पवारांनी हे व्यक्तव्य केले आहे. त्याचे काय आणि किती गंभीर परिणाम पडतील याची त्यांना कल्पना नाही, असे म्हणता येणार नाही. तरीही त्यांनी हे व्यक्तव्य केले; कारण हिंदुना विकत घेणे सहजशक्य  आहे, हे त्यांना पुरते ठावूक आहे. अल्पसंख्यांकांची मते मिळवण्यासाठी मात्र अधूनमधून असे बोलावे लागते. हिंदूंकड़े ना कसला स्वाभिमान, ना कसला विवेक. त्यांना काहीही बोला फरक पडत नाही. सारेच निऱढावलेले! त्यामुळे  मुस्लिमांचे लांगुलचालन महत्वाचे!
पाकधार्जिण्या वृत्तीच्या शरदमियाँनी सांगितले की, "शुक्रवारी मुस्लिम समाजातील मुले मस्जिदीत स्फोट घडवतील असे मला वाटत नाही. ते इतर कोठेही स्फोट करतील मात्र मस्जिदीत करणार नाहीत. मालेगावातील स्फोटामागे हिंदुत्ववादी संघटना असण्याची शक्यता आहे. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल श्रीकांत पुरोहित आणि समीर कुलकर्णी यांचा यात हात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अल्पसंख्यांकांविषयीची आपली मते बदलली पाहिजेत. या प्रकरणातील मुस्लिम समाजातील १९ मुले ३ वर्षे तुरुंगात पडली होती, त्यांच्या आयुष्याचे काय? या देशाकडे त्यांनी काय म्हणून बघायचे? मग त्यातल्याच एखाद्याच्या डोक्यात राग शिरून त्याने बदला घेतला तर त्याला दोष कसा देणार?"
पवार ज्येष्ठ नेते आहेत. आमच्यासारख्या पामराने त्यांना काय सांगावे? मात्र विशिष्ठ दिवशी, विशिष्ठ जातीतील, धर्मातील लोक देशद्रोही, समाजद्रोही कृत्य करणार नाहीत, असे गृहीत धरण्यामागचे तत्त्वज्ञान काही आम्हांस कळत नाही.  न्यायालयात भगवतगीतेवर हात ठेवून धडधडित खोटे बोलणा-या व्यक्तिंनाही  यापुढे निरपराध ठरवले पाहिजे; कारण 'आपल्या धर्मग्रंथावर हात ठेवून कोण कशाला खोटे बोलेल?' असेही उद्या नरेन्द्र मोदींसारख्या कुण्या नेत्याला वाटणे शक्य आहे.
विधीमंडळात जलसिंचन प्रकल्पातील घोटाळ्यांवर होणारी चर्चा थांबवण्यासाठी त्यांनी ते प्रकरण 'न्यायप्रविष्ठ' असल्याचे सांगितले. मग मालेगांव स्फोटाचे प्रकरणही  'न्यायप्रविष्ठ' असताना पवारांनी फुत्कार सोडण्याचे कारण नव्हते. तपास यंत्रणांच्या माध्यमातून आज ना उद्या त्यातील सत्य बाहेर आलेच असते. मग अशापद्धतीने गंभीर विधान करून त्यांना पोलिसांना काही संदेश तर द्यायचा नाही ना? 'मते नाही मिळाली तरी चालेल' असे सांगणारे पवार मतांसाठी किती खालच्या पातळीवर जाऊ शकतात हे पुन्हा एकदा जनतेसमोर आले आहे.
या व  अशा प्रकरणांतील सत्य जनतेसमोर यावे. यातील जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी. मात्र आयुष्यभर 'जातीय तेढ निर्माण करू नका' असे सांगणा-या पवारांनी दोन समाजात फूट पाढण्याची भाषा करून अनेकांना आश्चर्यचकित केले आहे. ज्या गोष्ठी पवार पडद्याआड, खाजगीत करतात, असा अनेकांचा ठाम समज आहे ते पवारांनी जाहीरपणे करण्याचे  धाडस दाखवले आहे. महात्मा गांधींच्या अहिंसेच्या तत्त्वज्ञानाला मूठमाती देत त्यांनी एकप्रकारे सुडाने  पेटून उठलेल्यांचे बळ वाढवण्याचा उद्योग केला आहे. 'त्यांनी बदला घेतल्यास दोष कुणाचा?' असा सवाल उपस्थित करून त्यांनी मुस्लिम समाजाचा रोष वाढवला आहे. अनेक देशभक्त मुस्लिमांनीही पवारांच्या या विधानाचा निषेधच केला आहे.
जे मनाने कमकुवत आहेत, जे आक्रमक वृत्तीचे आहेत, ज्यांच्या मनात हिंदुस्तानविषयी द्वेष आहे , जे खरोखरीच सुडाच्या भावनेने पेटलेले आहेत, जे चुकीच्या धार्मिक संकल्पनांना बळी पडले आहेत, ज्यांनी हिंदुना संपवण्याचा विडाच उचलला आहे त्यांचा उत्साह पवारांनी वाढवला आहे. ते आज पवारांना धन्यवाद देताना फक्र महसूस करत आहेत.
मालेगाव स्फोट प्रकरणातील पोलिसांनी त्याबत घेतलेली १९ मुस्लिम मुले खरेच निरपराध आहेत, असे आपण गृहीत धरु.  त्यांनी सूड उगवला तर त्यांना दोष देता येणार नाही, असे नामदार पवारांना वाटते. मग शरदमियाँनी लोकांना हेही स्पष्टपणे सांगावे की, इथल्या व्यवस्थेचे बळी ठरलेल्या असंख्य लोकांनी सत्ताधारी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मंत्र्यांना, नेत्यांना किमान जोड्याने हाणावे का? सुडाच्या भावनेने स्फोट घडवणे, कुणाचा खून करणे हे सहिष्णू बांधवांना मान्य नाही. मात्र किमान या हरामखोरांचे  कपडे फाडून, त्यांना काळे फासून, मुळामुठेचे 'तीर्थ' पाजून त्यांची गाढवावरून धिंड काढली तर पवारांना चालेल का? तीन वर्षेच नाही तर आख्खे आयुष्य उध्वस्त झालेल्या अनेकांची या व्यवस्थेवर सूड उगवण्याची तीव्र इच्छा आहे. नामदार पवारांनी त्यास अनुमोदन दिले तर 'चपराक'च्या वतीने आम्ही अशा असंख्य तरुणांचे प्रतिनिधित्व करू! मुळातच भडकलेल्या माथ्यांना शांत करण्यासाठी अनेकांना बांबूने सटकवण्याची आमची तीव्र इच्छा पवारांच्या या 'उदारमतवादी' धोरणांमुळे  पूर्ण होऊ शकते.
विदर्भातील अनेक शेतक-यांनी आत्महत्या केल्या. दलालशाही, सरकारी धोरणे, लाचलुचपत यामुळे अनेक कुटुंबे उध्वस्त झाली. त्यांच्या कुटुंबीयांना आजही वाटते हे कसले स्वातंत्र्य? आजही त्यांना पुन्हा एकदा स्वातंत्र्याचा लढा द्यावा वाटतो. आपल्या कुटुंबाची वाताहत करणा-या अनेक प्रशासकीय अधिकारी आणि नेत्यांना सुळावर चढवावे अशी त्यांची भावना आहे. पवारांच्या 'नव्या धोरणां'नुसार त्यांना एवढी 'संधी' तरी मिळायलाच हवी ना! तिकडे आर. आर. पाटील म्हणताहेत, 'पोलिसांना पगार परवडत नसल्याने त्यांना लाच घ्यावी लागते. इकडे थोरले पवार विचारताहेत 'मुसलमानांनी बदला घेतला तर त्यांचा काय दोष?' या सगळ्या राजकीय स्वार्थगिरित दोष फक्त सामान्य माणसाचा आहे जो यांना खपवून घेतो.
जात, धर्म याचे आज कुणालाही फारसे काही वाटत नाही. मात्र राजकारणी त्याला खतपाणी घालतात. लोकांत फुट पाडतात. स्वत:ला 'जाणता राजा' म्हणवून घेणा-यानेही असे उद्योग करणे हे खरोखरी लाजीरवाणे आहे. अशावेळी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या जागृत ज्वालामुखीची आठवण आल्यावाचून राहत नाही. बाळासाहेबांनंतर महाराष्ट्र पोरका कसा झाला, हे पाहण्यासाठी पवारांचे हे विधान ध्यानात घ्यावे. आज बाळासाहेब असते तर त्यांनी यांची चांगलीच फाडली असती.
जनतेला आता सुडच घ्यायचा असेल तर अशा पृव्रत्तिचा घ्यावा. राजकारणाला बळी पडून आपापसात भांडत राहणे, सुडाची भाषा करणे हे शर्मनाक आहे. समाजच मुर्दाड झाल्याने काही गिधाडं घिरट्या घालतात. मात्र त्यांना जुमानण्याची आवश्यकता नाही. समाजात शांती प्रस्थापित होईल आणि सर्वजण गुण्यागोंविंदाने राहतील यासाठी सामान्य माणसांनी आता जाणीवपूर्वक कार्यरत राहणे गरजेचे आहे. कुणाच्याही चिथावणीला बळी न पडता बंधुभाव टिकवणे, वाढवणे हीच काळाची खरी गरज आहे.
(संपादकीय लेख - साप्ताहिक 'चपराक - १२ ते १८ ऑगस्ट २०१३ )

Wednesday, May 1, 2013

'दखलपात्र' अग्रलेखसंग्रहाचे प्रकाशन

'दखलपात्र' अग्रलेखसंग्रहाचे प्रकाशन

नमस्कार मित्रांनो! २००२ सालापासून पुणे शहरातून 'चपराक' हे नियतकालिक सुरु आहे हे आपणास माहीत आहेच. 'सामान्य माणसाचा उंचावलेला स्वर' हे मूलतत्त्व घेवून आम्ही कार्यरत आहोत. संवाद आणि संघर्ष हीच 'चपराक'ची भूमिका राहिली आहे. या अंकातील काही निवडक अग्रलेखांचे 'दखलपात्र' हे पुस्तक मंगळवार, दिनांक ७ मे २०१३ रोजी सायं. ६ वाजता पुण्यातील केसरी वाड्यात असलेल्या 'लोकमान्य सभाग्रह' या ऐतिहासिक वास्तूत होत आहे. यावेळी ज्येष्ठ विचारवंत भाई वैद्य, प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ, लेखक आणि समीक्षक श्रीपाल सबनीस, कवी आणि संपादक श्रीराम पचिंद्रे, लातुरचे ज्येष्ठ पत्रकार प्रदीप नणंदकर, लोकमंगल उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि माजी खासदार सुभाष देशमुख आदी उपस्थित राहणार आहेत. १७६ पानाच्या या पुस्तकात संपादक घनश्याम पाटील यांच्या ४६ अग्रलेखांचा समावेश असून १३० रुपये मूल्य आहे. प्रकाशन समारंभात हे पुस्तक अवघ्या १०० रुपयात मिळेल. याचवेळी आमच्या उपसंपादिका चंद्रलेखा बेलसरे यांच्या 'आर्यमा' या पहिल्या कवितासंग्रहाचे प्रकाशनही करण्याचे ठरले आहे. आपणा सर्वांना या प्रकाशन सोहळ्यासाठी सस्नेह निमंत्रण! अधिक माहिती आणि पुस्तकाच्या पूर्वनोंदणीसाठी संपर्क : ०२०-२४४६०९०९ / ९२२६२२४१३२

Thursday, January 31, 2013

एक पट्टेवाला..!

गरिबी म्हणजे एक मोठा शाप असतो. कुणा एकेकाळी मीही गरिबीने शापित होतो. त्याकाळात कुटुंबाला थोडाफार आर्थिक हातभार लागावा आणि जगणे सुसह्य व्हावे म्हणून मी अनेक उचापत्या केल्या. लोककवी मनमोहन नातू यांच्या रचना मी आकाशवाणीवरून ऎकायचो आणि पाठ करायचो. सोलापुर आणि परिसरातल्या गावात होणा-या लहानमोठ्या जत्रायात्रात ढोलकी पिटत निसर्गाने दिलेल्या सुमार आवाजात त्या गायचो. काही दयावंत मायबाप त्या बदल्यात मला पाचदहा पैसे द्यायचे आणि त्यामुळे मला गगन ठेंगणे वाटायचे. 'दलित असणं हा एकेकाळी मोठा गुन्हा होता'. अनेकांनी त्याची मोठी किंमत मोजली, मात्र याबाबतीतही मी सुदैवीच ठरलो. जातीचा मला सदैव लाभच झाला. सुरवातीला मी 'पट्टेवाला' म्हणून नोकरी केली ती जातीच्या आधारावरच! पुढे दलितपणाचे घोड़े कायम दामटत राहिलो आणि आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री अशी माझी चढती कमान कायम राहिली. माझी ही प्रगती पाहता कुणाही दलित बांधवांना स्वत:च्या जातीची लाज वाटू नये! उलट जातीमुळे मिळणारे लाभ पदरात पाडून घेउन आपली प्रगती साधावी, असे मला नम्रपणे सुचवावेसे वाटते. एकेकाळी नोकरी सांभाळताना माझा पट्टा चामड़याचा होता. राजकारणात चमचेगिरी करत करत मी मोठा झालो आणि तो पट्टा बघता बघता रत्नजडीत झाला. त्याला हिरे, माणीक, मोती बसवून घेण्याची क्षमता माझ्यात निर्माण झाली. 'आपले मूळ विसरायचे नाही' या न्यायाने मी माझ्यातला 'पट्टेवाला' सदैव जिवंतच ठेवला. 'साहेबाला खूष ठेवणे' हा पट्टेवाल्याचा धर्म! त्या धर्माला जागतच मी कायम खुषम्हस्क-या म्हणून कार्यरत राहिलो. पट्टेवाला असल्याकारणाने चमचे गिरी ही माझ्या रक्तातच भिनलेली आहे. एकेकाळी मी शरदराव पवारांचा चमचा होतो. जनसंघाच्या लोकांच्या मांडीला मांडी लावूनही मी अनेकवेळा कोंबड्या बक-यांची हाडुके चाखली आहेत. आजही सोनियाबाईसाहेब आणि राहुल महाराज यांची चमचेगीरी करणे मला माझा धर्मच वाटतो. राजकारणातले लोक हुशार असतात, हे अनुभवांती मला चांगलेच उमजले आहे. ते उगीच कुणाची चमचेगिरी करत नाहीत. ज्याची चमचेगिरी केल्याने मालामाल होता येते, अशाच लोकांची ते चमचेगिरी करतात. मी खुर्चीवरून कधी उठतोय याची वाट पाहणारी असंख्य मंडळी माझ्या अवतीभोवती आहेत. ही रांग भलीमोठी असल्याने मला सदैव श्रेष्टिंची चमचेगिरी करणे गरजेचे वाटते. जनता जोपर्यंत भोळसट, मूर्ख आहे तोपर्यंत माझ्यासारख्या माणसांची लबाडी कायम चालूच राहणार याचा मला पूर्ण विश्वास आहे. 'ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी', या न्यायाने मी खाल्ल्या मिठाला जागत असतो. लोकांना काहीही वाटत असले तरी या म्हणीमुळेच मी त्यांची चिंता करत नाही. 'पांढरे स्वच्छ इस्त्रीचे कपडे आणि माझी स्वत:ची कुठलीही कर्तबगारी नसताना मिळालेला गोरागोमटा चेहरा' याचाही माझ्या विकासाला हातभार लागला आहे, हे मी कृतज्ञतापूर्वक नमूद करतो. 'मनीमेकिंग' ची शिकवण कॉंग्रेसवाल्यांना जन्मजातच दिली जाते. त्यामुळे 'मनीमेकर' ची भूमिका मी कायमस्वरूपी हुबेहुबे वठवत असतो. बरेचजण राहुल महाराजांच्या पुढे येण्याने गांधी कुटुंबीयांवर घराणेशाहीचा आरोप करतात. मला स्वत:ला त्याचे काहीच सोयरसुतक नाही. राहुल हा पंतप्रधान व्हायला अयोग्य माणूस आहे, हे काय मला कळत नाही? पण तसे मी म्हटले तर मला लगेच 'डच्चू' मिळेल हे भोळ्याभाबड्या जनतेला कोण सांगणार? माझी प्रणीति राजकारणात पुढे यावी असे बाप म्हणून मलाही वाटतेच ना? मग मी सोनियाबाईसाहेबांना घराणेशाहीवरुन नावे ठेउन स्वत:ची अक्कल का पाजळावी? आमच्यासारखी नतदृष्ट माणसे सर्वकाळात सर्रासपणे वावरताना दिसून येतात ब्रिटिश आमदानीत देखिल 'ब्रिटिश राज्य म्हणजे ईश्वरी वरदान आहे' असे अकलेचे तारे तोडणारे महाभाग होउन गेलेले असताना जनतेने माझ्याकडे बोट दाखवणे हे मला माझ्याबाबतीत अन्यायकारक वाटते. नतदृष्टांची ही परंपरा जाणकार वाचकांनी इतिहासाची पाने चालून तपासून घेणे अधिक सोयीस्कर! काहीही करून स्वतःची खुर्ची शाबूत ठेवणे हे राजकारण्यांचे आद्य कर्त्तव्य असते . खुर्चिचे फायदे किमान मी तरी अधिक स्पष्ट करून सांगण्याची गरज नाही. राजकारण एक व्यसन असते. या नशेची झिंग चढली की खुर्ची हवीहवीशी वाटते . एकदा का ही सत्तासुंदरी आपल्या कह्यात आली की 'हरतर्हेची' मौजमजा करता येते. माझा राजकीय वाटचालीत माझ्या चेहरयावरील हास्य, कपाळावर येणारी 'बायकी' बट याचे अनेकांना कौतुक वाटते. खुर्ची मिळाली की, 'होयबा' म्हणणारे अनेक उपचमचे आपल्याला लाभतात. जनतेला कसे मुर्ख बनवले म्हणून मी कायम हसत असतो, मात्र या हसण्यामागचे मर्म लोकांना कळत नाही त्याला मी काय करू ? नुकत्याच घडलेल्या दिल्लीतील सामुहिक बलात्कार प्रकरणाची माहिती गृहमंत्री या नात्याने सांगतानाही मी हसतच होतो. माझे हे हसे बघूनही लोक शांतच असतात, याला मी जबाबदार नाही ! सत्ता उपभोगताना संपूर्ण जनतेला सोडाच मात्र माझ्या स्वत:च्या समाजालाही मी कोणताही नवीन विचार दिला नाही. त्यासाठी कसलीही किंमत मोजली नाही. दलित, उपेक्षित, वंचितांच्या विकासासाठी, उद्धारासाठी फारसे काहीच केले नाही. समाजात वैचारिक, आर्थिक जागृती केली नाही. कोणत्याही अन्यायाविरुद्ध आवाज उठवला नाही. कुठे ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कुठे मी? कहाँ राजा भोज और कहाँ गंगू तेली? लोक असे म्हणत नसले तरीही मी मात्र अकार्यक्षम असूनही त्यांना 'त्यांचा' नेताच वाटतो. आपली जनमाणसातली प्रतिमा अधिकाधिक उजळ रहावी यासाठी पवार साहेब कायम दक्ष असतात. त्यांचाच आदर्श घेऊन मी त्यांची नक्कल करत असतो. अशी नक्कल करायलाही अक्कल लागते, हे काय वेगळे सांगणे झाले? पवारांप्रमाणेच मीही माझ्यावर गौरवांक काढून घेतले, विशेषांक काढून घेतले, पुरवण्या काढून घेतल्या, लघु चित्रफिती काढून घेतल्या! थोडक्यात काय तर आपली प्रतिमा अधिकाधिक उजळ आणि उज्वल रहावी यासाठी जी काही तंत्र वापरावी लागतात ती वापरण्यात मी वाकबगार आहे. ज्या चार पत्रकारांचे इंग्रजी चांगले आहे आणि जे गुळगुळीत वृत्तपत्रात माझ्यावर सातत्याने स्तुतीसुमने वाहू शकतील त्यांना मी सदैव माझ्या खिशात ठेवतो. माध्यमातले लोक खूष तर मी खूष! 'इतर अनेक राजकारण्याप्रमाणेच' काही पत्रकारांचा 'पोशिंदा' होण्याची ही कलाही मी प्रयत्नपूर्वक अवगत केली आहे. याबाबत मी केवळ पवार साहेबांचेच अनुकरण करतो, असे कुणाला वाटत असेल तर तीही माझी नैतिक जबाबदारी नाही. देशात संघ आणि भाजप परिवार भक्कमपणे कार्यरत आहे. त्यांना सुरुंग लावणे ही माझ्या किंवा कॉंग्रेसच्या क्षमतेबाहेरची बाब आहे. प्रत्येक आपत्तीच्या वेळी मदत कार्य करण्यासाठी संघ पुढाकार घेतो. त्यांना आवरणे तसे कठीण! मात्र त्यांना दुषणे लावली की सोनियाबाईसाहेब मला चिरीमिरी देतात. माझ्यावर मेहेरबाणी दाखवतात. संघ तर राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेतून कार्य करतोय; मात्र ज्या ज्या महापुरुषांनी जाती पद्धती, धर्म पद्धती नष्ट व्हाव्यात म्हणून आयुष्य खर्ची घातले त्याच महानेत्यांच्या नावे त्यांच्या त्यांच्या जातीच्या संस्था, संघटना उभ्या करून त्यांना मतांसाठी खतपाणी घालणे हे माझ्या राजकीय आरोग्याच्या दृष्टीने 'पौष्टिक' आहे. म्हणूनच अशा संस्थाना मी कायम पाठीशी घालत असतो आणि संघासारख्या संघटनांना लक्ष्य करीत असतो! 'भगवा दहशतवाद देशासाठी मारक' असे एखादे वाक्य उच्चारले की थोरल्या बाई साहेब आणि राहुल महाराज खूष होतात. मालकांना खूष ठेवण्यासाठी माझ्यातला पट्टेवाला मला टोकून टोकून जागा करत असतो. ही 'जागल्या'ची भूमिका पार पाडतच अतिशय स्वार्थी मनाने मी 'गस्त' घालतो. शब्दश: मूर्ख आणि नालायक जनतेला माझ्यातला धूर्तपणा कधीच कळणार नाही. त्यामुळेच माझे आणि माझ्यासारख्यांचे फावते. तुम्ही निस्वार्थी असाल तर त्यात गैर ते काय? शेवटी मंगेश पाडगावकरांच्या कवितेतला एकच शब्द बदलून अतिशय प्रांजळपणे सांगावेशे वाटते, ''एक पट्टेवाला बसला आहे माझ्या मनात खोल दडून...!''

Saturday, January 19, 2013

'दुर्बलता म्हणजे मृत्यू !'

सामाजिक स्थित्यंतरे बदलत असताना, प्रत्येकाची आत्मविकासाची भावना प्रबळ असावी. ती नसेल तर भौतिक साधनसामुग्रीला शून्य किंमत आहे. 'मी मोठा होणार', 'असामान्य कामगिरी गाजवणार' असे व्यापक ध्येय उराशी बाळगून प्रत्येकाने कृती करायला हवी. आपण हाती घेतलेल्या कार्याविषयी व्यर्थ अभिमानही नसावा आणि न्यूनगंड तर मुळीच नसावा. ध्येय डोळ्यांसमोर असेल तर ते गाठणे अधिक सुलभ होते. स्वामी विवेकानंद म्हणतात 'दुर्बलता म्हणजे मृत्यू; सामर्थ्य हेच जीवन!' म्हणून प्रत्येकाने सामर्थ्यवान असायला हवे आणि त्या सामर्थ्याची आपणास जाणीवही असायला हवी. आपल्या चांगुलपणाचा लाभ घेत कोणी आपल्याला चिरडू पाहत असेल तर तो त्याचा नाही आपलाच दोष असेल. पदव्यांचे भेंडोळे घेऊन फिरणा-यांची आज मुळीच कमतरता नाही. समाज सुशिक्षित झालाय; मात्र तो सुसंस्कृत केव्हा होणार? समाजात मोठ्या संख्येने वावरणा-या पदवीधरांचे वर्तन किती भयंकर असते याचा एकदा गांभिर्याने विचार करा. या संपन्न राष्ट्रात अनेक अपप्रवृत्तींनी इतका उच्छाद का मांडलाय याचे उत्तर आपल्याला त्यातून नक्की मिळेल.