काल आमचे अर्थमंत्री दादाराजे तथा श्रीपाद भिवराव आणि 'चपराक'
चे लेखक संदिपान पवार यांच्यासह ज्येष्ठ संपादक श्री. शरद कारखानीस यांची भेट
घेतली. त्यांनी त्यांचे 'लोकसत्ता', 'गोमन्तक' आणि 'एकमत'चे अनेक रंजक अनुभव
सांगितले. ते म्हणाले, "महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री मा. ना. श्री.
यशवंतराव चव्हाण यांच्या निधनानंतर प्रसिद्धी माध्यमांना
द्यायला सरकारकडे त्यांचा एखादा चांगला फोटोच नव्हता;
किंवा मोहमद रफ़ी साहेब गेले तेव्हा 'लोकसत्ता'
कडे त्यांचा फोटो नसल्याने पहिल्या दिवशी बातमी फोटो न देताच द्यावी लागली."
त्यांचे हे अनुभव ऐकून वाटले, आज तंत्रज्ञान इतके पुढे गेले आहे की,
सर्व काही एका क्लिकवर मिळते. तरीही आजचे माझे व्यवसाय बंधू पूर्वीसारखी
निर्भिड पत्रकारिता करू शकत नाहीत, हे वास्तव कोणीही नाकारण्याचे कारण नाही.
"काही हजार करोडची संपत्ती बाळगुन
असलेल्या नेत्यांना आणि पत्रकारांनाही गरीब कसे म्हणावे?" असा बिनतोड
सवालही त्यांनी केला. वृत्तपत्रे कशासाठी चालवली जातात?
हे सांगताना त्यांनी अनेक किस्से सांगितले.
"काही वृत्तपत्रे केवळ छोट्या जाहिराती आणि नोटीसा छापण्यासाठी काढली जातात.
त्यांना अंकाचा खप वाढवायचाच नसतो कारण या जाहिराती कमीत कमी लोकांपर्यंत
जाण्यासाठीच दिल्या जातात. मुंबईत काही स्थानकावर रात्री १० नंतर मोठी वृत्तपत्रे
मोठ्या प्रमाणात विकली जातात. कारण उशीराची गाडी गेल्याने रात्री मुक्काम स्थानकावर
करावा लागतो. मग कमी पैशात जास्त पाने असलेली वृत्तपत्रे विकत घेवून ती
झोपण्यासाठी 'अंथरुण' म्हणून वापरली जातात…!"
"आधुनिक तंत्रज्ञानामुळे आजची मुले फारसे वाचत नाहीत. जे वाचायचे ते संगणक
किंवा भ्रमणध्वनिवर!
त्यावर हवी ती माहितीही त्यांना सहज मिळत असल्याने वृत्तपत्र विकत घेवून,
त्यासाठी वेळ काढून वाचणा-यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे," असे
निरिक्षणही त्यांनी नोंदवले. 'पर्यावरण' या विषयावर वृत्तपत्रांनी लिहिणे हा तर
मोठा विनोद आहे कारण वृत्तपत्रांच्या कागदासाठीच सर्वाधिक वृक्षतोड होते, याकडेही
त्यांनी लक्ष वेधले.
एकंदर अडीच-तीन तासांत त्यांनी अनेक नवनवीन माहिती दिली. त्यातील बरीचशी
माहिती ही गोपनीय असल्याने ती मित्रांसाठी देता येत नाही; मात्र या भेटीतून बरेच
काही मिळाल्याचे समाधान मात्र नक्की आहे.
No comments:
Post a Comment