Tuesday, March 9, 2021

आवाजाची नव्हे, सभागृहाची ‘उंची’ वाढवा!



महाराष्ट्राच्या विधिमंडळात आजपर्यंत खूप मोठे वक्ते होऊन गेलेत. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शेकापचे एन. डी. पाटील, केशवराव धोंडगे, आचार्य अत्रे, डॉ. बापूसाहेब काळदाते, रामभाऊ म्हाळगी, गोपीनाथ मुंडे, शरद पवार, आर. आर. पाटील, मृणाल गोरे, विलासराव देशमुख, शालिनीताई पाटील, पतंगराव कदम अशा अनेकांनी महाराष्ट्राचं विधिमंडळ गाजवलेलं आहे. शरद पवार यांची स्वतःची विधिमंडळातली भाषणं अतिशय अप्रतिम आणि गाजलेली आहेत. 

विधिमंडळाचं समालोचन वाचणं हा अभ्यासाचा विषय असायचा. वृत्तपत्रांतून सविस्तर भाषणं छापून यायची आणि त्यावर गावागावात चर्चाही व्हायची. सध्या मात्र विधिमंडळाच्या सभागृहाचा दर्जा एवढा खालावलाय की लाईव्ह भाषणं सुरू झाली तरी अनेकजण लगेच चॅनल बदलतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं हे मोठं अपयश म्हणावं लागेल.

राज्यासमोरील विविध प्रश्नांचा अभ्यास असेल, पोटतिडिक असेल, त्या प्रश्नांच्या सोडवणुकीविषयी आत्मियता असेल, मांडणार्‍या प्रश्नांविषयी कळवळा असेल तर संबंधितांचं भाषण आपोआप एका वेगळ्या उंचीला जाऊ शकतं. दुर्दैवानं विविध वक्तृत्व स्पर्धेतून पुढे आलेल्या काहींनी हवी तशी पोपटपंची करून सभागृहाची शान घालवली आहे. शालेय वक्तृत्व स्पर्धेतून पाठ केलेली भाषणं द्यावीत असं त्यांचं बोलणं असतं. आक्रस्ताळेपणा करत विषय भरकटत न्यायचा, पदाचा आणि अधिकारांचा वापर करत त्यावर आपल्या गटात चर्चा घडवून आणायची, यू ट्यूबसारख्या बिनखर्ची माध्यमांचा वापर करत आपापल्या वर्तुळात ते फिरवायचं आणि स्वतःची पाठ थोपटून घ्यायची असा काहीसा प्रकार सध्या रूढ होत आहे. सत्ताधारी आणि विरोधक दोघंही ‘मोले घातले रडाया, नाही आंसू आणि माया, तैसा भक्तिवाद काय, रंगबेगडीचा न्याय’ अशा पद्धतीनं सभागृहात बोलत असतात. त्यामुळं त्यांची भाषणं अतिशय सुमार दर्जाची होताहेत.

विधिमंडळात कागदपत्रं हातात घेऊन चर्चा करायची असते, प्रतिपक्षांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरं द्यायची असतात, शाब्दिक कोट्या करून टाळ्या घेणं यासाठी विधिमंडळाची जागा नाही हे उद्धव ठाकरे यांना मनोहरपंतांसारख्या अनुभवी नेत्यानं समजावून सांगणं गरजेचं आहे. पंत नाराज असले तरी ते उद्धवरावांना इतकं समजावून सांगू शकतील. मुळात ते ‘सर’ असल्यानं इतरांना शिकवण्याचा त्यांचा अनुभव दांडगा आहे. ते तुम्हाला शिकवतील, फक्त तुमची शिकायची तयारी असायला हवी. हे काम अजितदादाही चांगल्या पद्धतीनं करू शकतात. सध्याच्या काळात ते सर्वाधिक आनंदी दिसताहेत. त्यांच्याकडं भरपूर वेळ आहे. विरोधीपक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर तुटून पडत आहे आणि ठाकरे त्यांच्यावर नको नको ते आरोप करत आहेत, हे पाहत अजितदादा शांतपणे बसून आहेत. अजितदादा सध्या अजिबातच व्यक्त होत नाहीत आणि विरोधीपक्षही त्यांच्यावर काही टीका करत नाही. साडेतीन दिवसाच्या मधुचंद्राच्या आठवणी दोघंही जपताहेत की काय असं एकंदरीत चित्र आहे. त्यामुळं अजितदादांनी किमान मुख्यमंत्र्यांना चार अनुभवाचे बोल सांगायला हवेत. महाराष्ट्राचा इतिहास सर्वांना वारंवार सांगणारे, पश्चिम बंगालमध्ये काय झालं पाहिजे, अयोध्येत काय केलं पाहिजे याबाबत अखिल विश्वाला मार्गदर्शन करणार्‍या संजय राऊतांनी तरी हे मनावर घ्यायला हवं. त्यांनी विधिमंडळातील यापूर्वीची काही गाजलेली भाषणं मुख्यमंत्र्यांना वाचायला दिली तरी थोडाफार फरक पडू शकतो.

छगनराव भुजबळ यांचीही सुरूवातीची भाषणं अत्यंत आक्रमक आणि अभ्यासू आहेत. तीही त्यांनी स्वतः काढून वाचायला हवीत. नवीन पिढीतल्या आमदारांची भाषणं तर वक्तृत्व कसं नसावं याची मूर्तिमंत उदाहरणं आहेत. त्यांची शैली हा एक भाग आहे आणि लोकांच्या प्रश्नांचं प्रतिबिंब त्यात किती प्रमाणात उमटलंय हा दुसरा भाग आहे. दुसर्‍या भागात हे सुमार आमदार काठावरही पास होत नाहीत, हे रोहित पवार यांनी सभागृहात वाचलेली कविता पाहता कोणीही मान्य करेल. सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यात युक्तिवाद काय केला जाणार असा खुळचट प्रश्न विधानपरिषदेच्या सभागृहात केला गेला. शेवटी लॉ कॉलेजचे प्राचार्य राहिलेल्या विधिज्ञ रामराजे निंबाळकरांना सभागृहात सांगावं लागलं की ‘‘हे असे विषय मांडता येत नाहीत, खाली बसा!’’ सभागृहाचं कामकाज कसं चालतं याचं प्राथमिक ज्ञानही नसलेले आपले सध्याचे लोकप्रतिनिधी आहेत. हे पाहता विधिमंडळ हे महाराष्ट्रातल्या बारा कोटी जनतेच्या प्रश्नांचं आणि आशा-आकांक्षांचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह आहे की नाही असा प्रश्न पडतो. यांना मुद्देसूद भाषणं करायची असतात की अभ्यासाचा दिखाऊ शो करायचा असतो हेच कळत नाही. हा कसला व्हरायटी शो आहे का? त्यासाठी भाषणाचे स्टंट केले जातात? लोकांच्या प्रश्नांशी यांना काही देणंघेणं आहे की नाही? अनेक आमदार सभागृहात आपलं तोंड बंद करून समाजमाध्यमातून कायम टिवटिव करत राहतात. ट्विटरवर व्यक्त होण्यापेक्षा तुमच्या बुद्धिचा पसारा काय आहे हे विधिमंडळात दिसू द्या ना! त्यासाठीच तुमच्या मतदारांनी तुम्हाला या सभागृहात पाठवलंय.

या सगळ्यात मला वाईट ते फडणवीसांचं. त्यांनी जी टीम तयार केलीय ती अत्यंत होपलेस आहे. त्यांच्यासोबतच्या बोलघेवड्यांमुळं फडणवीस विनोदाचा विषय ठरताहेत. राधाकृष्ण विखे-पाटील, राणाजगजितसिंह पाटील असे काँग्रेस-राष्ट्रवादीतून जे भाजपात आले त्यांची तर तोंडं बंदच आहेत. त्यांना काहीच बोलू द्यायचं नाही असं भाजपचं धोरण दिसतंय. ‘त्यांनी पक्षांतर करून भाजपमध्ये आल्यावर आता त्यांना काय वाटतं?’ या विषयावर चर्चा ठेवली तरी ती रंजक होईल.  


सरकारनं अवर्षणग्रस्त शेतकर्‍यांना भरीव मदत केली नाही. महाराष्ट्रातल्या शेतकर्‍यांना जो वीज पुरवठा करताय तो किमान दिवसा करा. महानगरातल्या फ्लेक्सवर, फलकांवर जी वीज वाया जाते तिथं बचत करता आली तर बघा. शेतकर्‍यांना पुरेशी आणि वेळेत वीज मिळावी यावर एकही आमदार बोलत नाही. एकमेकांवर टीका करणं, प्रसिद्धीच्या झोतात राहणं हेच अनेक आमदारांचं ध्येय दिसतं. ‘आम्ही पाच रूपयात शिवभोजन थाळी देतोय, थाळी वाजवायची का थाळी घ्यायची...’ हे सभागृहातलं भाषण होऊ शकतं का? विरोधीपक्षनेत्यांनी जे प्रश्न त्यांच्या भाषणातून उपस्थित केलेत त्यांना उत्तरं द्या. राजकीय सभेत काहीही बोललं तरी चालतं. तिथं टाळ्या वाजवायला, रेकॉर्डिंग करायला, ते भाषण व्हायरल करायलाही तुमचीच माणसं असतात. प्रत्येक चॅनलमध्ये तुमचा एखादा अर्णव गोस्वामी तुमची बाजू घ्यायला असतोच असतो. मग सभागृहाचे संकेत कोण पाळणार? तुमच्या भाषणानं तुमचं स्वतःचं तरी समाधान होतं का?

संजय राठोडच्या राजीनाम्यानंतर त्याचं पुढं काय करणार? सुशांतसिंह प्रकरणाचं पुढं काय झालं? गॅस-पेट्रोलचे दर वाढल्यानं सामान्य माणूस मेटाकुटीला आलाय. त्यावर काय करता येईल? केंद्रातले रोजगार कमी झालेत, त्यावर चर्चा करा. राज्यातले रोजगार किती वाढलेत ते सांगा. पोलीस भरती कधी करताय ते कळू द्या. स्पर्धा परीक्षातल्या भ्रष्टाचारावर बोला. सध्याच्या सत्ताधार्‍यांनी वेगळं काय केलंय? हे सांगायला हवं. फडणवीसांनी भ्रष्टाचार केलाय असं म्हणणं असेल तर त्यांच्यावर कारवाई करायला हवी. या सगळ्या विषयांवर विधिमंडळात सत्ताधारी आणि विरोधक दोघांकडूनही काही चमक दाखवायला हवी. भंडार्‍यात जी मुलं होरपळून गेली त्याचं पुढे काय झालं हा विषय अंबानीपेक्षा नक्कीच महत्त्वाचा आहे. फुले, शाहू, आंबेडकरांचा आधुनिक महाराष्ट्र म्हणताना असे विषय फक्त श्रद्धांजली वाहून संपवू नका. ‘सामान्यांच्या प्रश्नांकडं दुर्लक्ष करणारे निर्लज्ज राजकारणी’ अशी तुमची ओळख कृपा करून होऊ देऊ नका. तुमच्याविषयीच्या जिव्हाळ्यातून नाही तर सभागृहाच्या पावित्र्याची जपणूक म्हणून ही अपेक्षा व्यक्त करतोय.  

विधिमंडळ हे जर लोकशाहीचं मंदिर असेल तर इथं चांगले वक्ते येणं, त्यांनी अभ्यासपूर्ण प्रश्न उपस्थित करणं अपेक्षित आहे. या विधिमंडळात आजवर अनेक चांगली, वाङ्मयीन, गुणात्मक भाषणं केली गेलीत. लोकांचे प्रश्न जसे रस्त्यावर मांडले जातात तसे सभागृहात मांडले गेलेत. ज्या ताकतीनं शरद पवार बाहेर बोलायचे तसंच ते विधिमंडळात बोलायचे. चंद्रशेखर यांचा जो घणाघात संसदेच्या बाहेर असायचा तसाच तो सभागृहात दिसायचा. अटलजींचं जे विलक्षण काव्यात्मक वक्तृत्व त्यांच्या मतदारसंघात असायचं तसंच ते संसदेत बोलायचे. प्रमोद महाजन हे सभेत बोलताना लोक जसे मंत्रमुग्ध व्हायचे तशीच त्यांची तोफ सभागृहात धडधडत असायची. असं आपल्या आमदारांचं वक्तृत्व आहे का? ते सामान्य माणसांचे प्रश्न सभागृहात मांडत आहेत का? दोन-तीन टर्म आमदार असलेले काहीजण सभागृहात तोंडही उघडत नाहीत. त्यांची यादीही जाहीर करायला हवी. त्यांचे मतदार त्यांचं काय करायचं ते ठरवतील.

काही हितसंबंधी गटांचं संरक्षण करणं यापेक्षा सध्या कोणी काही विचार मांडताना दिसत नाही. लाचार आणि निष्ठावंतांच्या टोळ्या दिसतात पण स्वाभिमानी नेते सध्या दिसत नाहीत. लोकांच्या प्रश्नांना दिशा देणं, नवे कायदे करणं हे तुम्हाला जमत नसेल तर सभागृहाचा दर्जा आणखी खालावण्याऐवजी अशी अधिवेशनं बंद करा आणि काही नाचगाण्याचे, तमाशाचे कार्यक्रम करा. त्यामुळं तरी महाराष्ट्रातल्या जनतेचं निखळ मनोरंजन होईल आणि तुमच्याकडूनच्या अपेक्षाभंगाचं दुःख वाट्याला येणार नाही.
- घनश्याम पाटील
7057292092


12 comments:

  1. बहुधा सारे मान्यवर आमदार पूर्वपुण्याईमुळे आलेत.
    अभ्यास तर अजिबात नाही .

    ReplyDelete
  2. विधीमंडळ हा अडाण्यांचा बाजार झालाय कारण जाणते, संवेदनशील,सुज्ञ आणि महत्वाचे म्हणजे प्रभावी वक्तृत्व हे निवडणुकीचे निकष राहिले नाहीत.जात,धर्म, पैसा, उपद्रव मुल्य आणि नेतृत्वाशी लाळघोटेपणा या पुंजीवर काय दिवे लावणार ?

    ReplyDelete
  3. अगदी योग्य... विद्यमान लोकप्रतिनिधी यांनी राजकारण हा धंदा केला आहे. त्यांना राज्य, देश, विकास यांच्याशी काहीही देणं घेणं नाही. हे पुरोगामी महाराष्ट्र चे दुर्दैव आहे!

    ReplyDelete
  4. अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषणात्मक लेख आहे हा. राजकारणाचे गजकरण झालं आहे हे जरी खरं असलं तरी ह्या लेखामुळे ज्यांच्यात थोडाफार विवेक शिल्लक असेल तर ह्याच राजकारणाचे समाजकारणात रुपांतर होऊ शकेल इतकी शाव्दिक आणि वैचारिक ताकद आहे ह्या लेखात. खूप प्रगल्भ व सडेतोड विचार मांडलेत सर. तुमच्यासारखे र्निभिड पत्रकारही हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच राहिलेत सध्या. तुमचे मनःपूर्वक आभार.🙏🏻🙏🏻

    ReplyDelete
  5. कविता हा जाणीवपूर्वक वापरण्याचा विषय नाही...वापरायचीच असेल तर थोडा रियाज करावा...शेरोशाय-या वापरणे म्हणजे पुर्वसुरींची नक्कल करणे नव्हे,हे त्यांना कुणीतरी सांगण्याची गरज आहे.



    ReplyDelete
  6. हे सर्व पाहिल्यावर
    अजब तुझे सरकार येवढंच म्हणावंस वाटतं

    ReplyDelete
  7. अतिशय अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण लेख. 'सर' या अर्थाने संबंधितांची 'शाळा' घेतल्यासारखे वाटले. हे वाचून तरी संबंधितांमध्ये काही सुधारणा व्हावी ही अपेक्षा! मतदार म्हणून एवढी अपेक्षा तर आम्ही करूच शकतो. लेख आवडला!

    ReplyDelete
  8. सत्य पररिस्थिती मांडली आपण
    विधिमंडळात गदारोळ, शेरोशायरी आणि अजून काय काय महत्वाचे मुद्दे सोडून
    हे चित्र खरंच बदलायला हवं

    ReplyDelete
  9. गेल्या चार ते पाच वर्षांपासुन महाराष्ट्रातील राजकारण्यांचा दर्जा खालावलेला दिसत आहे......


    ReplyDelete
  10. विधानसभा सदस्यांनी दखल घेतली पाहिजे असा लेख झालाय...

    ReplyDelete